Home Blog Page 1528

विद्यार्थ्यांना करिअर विषयक माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबीर उपयुक्त-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

0

पुणे दि.२५- दहावी आणि बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्यादृष्टीने महत्वाचे असते. या दोन वर्षात विद्यार्थ्यांच्या जीवनाला वेगळे आणि महत्वाचे वळण मिळत असल्याने शिक्षण आणि करिअर घडविण्यासाठी विविध क्षेत्रांची माहिती देण्यासाठी करिअर मार्गदर्शन शिबीर उपयुक्त आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

कोथरूड येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उच्च शिक्षण सहसंचालक वाय. पी.पारगावकर , जिल्हा रोजगार शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी बी.आर.शिंपले आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. शिबिराच्या माध्यमातून युवकांनी विविध क्षेत्रांची माहिती घेऊन योग्य पर्यायाची निवड करावी आणि जीवनात यश संपादन करावे.

दहावी-बारावीनंतर योग्य माहिती न मिळाल्यास चुकीचे क्षेत्र निवडले जाते आणि पर्यायाने भविष्यात निराशा पदरात पडते. म्हणून विविध अभ्यासक्रम, रोजगाराच्या संधी आणि शासनाच्या योजनांची माहिती असणे आवश्यक आहे. शासनातर्फे विदेशात जाणाऱ्या २०० विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी ३० लाख याप्रमाणे ५ वर्षात दीड कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सर्व शुल्क शासन भरते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, पालकांचे उत्पन्न अल्प असणाऱ्या विद्यार्थ्यांना अभिमत विद्यापीठासाठी ५ लाखापर्यंत शुल्क शासन भरणार आहे. अशा विविध योजनांची माहिती शिबिरातून मिळते असे सांगून कौशल्य विकासाच्या माध्यमातूनही चांगले करिअर घडविता येत असल्याने विद्यार्थ्यांनी चांगले कौशल्य प्राप्त करावे, असे आवाहनही श्री.पाटील यांनी केले.यावेळी कार्यक्रमाला अधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

हेल्मेटला पुणेकरांचा आजही विरोधच

पुणे- सरकारची हाजी हाजी करणाऱ्या काही अधिकाऱ्यांनी हेल्मेटचे पुणेकर स्वागत करत आहेत अशा बातम्या पेरायला सुरुवात केली असली तरी पुण्यातून आजही ७५ टक्के नागरिकांचा हेल्मेटला विरोधच असल्याचे स्पष्ट झाले आहे.सीसी टीव्ही द्वारे हेल्मेटचे दंड लादून लोक अदालत द्वारे त्यांची बार्गेनिंग करत वसुली सुरु आहे. बहुमताने शहरात हेल्मेटला विरोध असताना,तो लादून केलेली वसुली हि जाचक आणि अन्यायकारक ठरते आहे. लोकांना रोजगार देऊ न शकणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि सरकारला हा हक्क आहे काय? लोकांच्या जीवाची पर्वा लोकांना नाही आणि फक्त सत्तेवर येणाऱ्यांना च आहे काय? हेल्मेटचा वापर ऐच्छिक ठेवावा असा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांनी पुण्यात प्रशासनासमवेत बैठका घेऊन अनेकदा केलेला असताना वारंवार हेल्मेट चे भूत का यांच्या डोक्यावर बसते आहे जे लोक वातानुकुलीत मोटारीने फिरत आहेत ? हे न समजण्या इतके लोक दुध खुळे राहिलेले नाहीत.हेल्मेट चा दंड ज्यांनी ज्यांनी भरला असेल त्यांनी त्यांनी निवडणुकीत आता त्या त्या सरकारच्या उमेदवारांना वचपा दाखवावा हाच एक पर्याय आता जनतेपुढे उरला आहे.. हेल्मेट सक्ती,पोलीसाकरवी तरुणाईला अडवून वसुली या बाबी आणि बेरोजगारी,महागाई याबाबी आता निवडणुकीत उफाळून आल्याशिवाय राहणार नाहीत

दरम्यान काल परिवहन विभागाने ६५० विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.पुणे शहर वाहतूक शाखेने चौका चौकात यासाठी अधिकचे मनुष्यबळ नेमले होते. यामध्ये ४३ अधिकारी आणि ५०० अंमलदार ५१ चौक आणि शासकीय आस्थापनांच्या आवारात लाक्षणिक हेल्मेट दिवस उपक्रमात सहभाग घेतला. हेल्मेटधारी दुचाकीस्वार महिला पुरुषांनी या उपक्रमाचे स्वागत केले. पोलिसांनी हेल्मेट वापराचे महत्व प्रबोधनातून पटवून दिले. यावेळी विनाहेल्मेट वाहन चालविल्याबद्दल १ हजार ६२६ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ८ लाख १३ हजार रुपयांहून अधिक दंड आकारण्यात आला, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

मान्सून वेळेवर येणार……

मुंबई- मे महिन्याच्या अखेरीसही उन्हाच्या तडाख्याने नागरिक त्रस्त झालेले असताना आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मान्सून यंदा वेळेत दाखल होणार आहे. त्यामुळे बळीराजा देखील आता वरुणराजाची आतुरतेने वाट पाहत आहे.स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे तयार होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे राज्यात लवकरच मान्सून येईल, असे संकेत मिळालेत. कोकणात 27 मे ला मान्सूनपूर्व पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. 5 ते 7 जून दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

नैऋत्य मान्सूनचे दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, निकोबार बेटांवर, दक्षिण अंदमान समुद्रात आगमन झाले आहे. आता बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सून पोहचला आहे. पुढील 3-4 दिवसात पाऊस पुढे सरकण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होऊन मे महिन्यात पहिले नऊ दिवस ढगाळ वातावरण व जेथे पोषक वातावरण तिथेच पाऊस पडला. यात छत्रपती संभाजीनगरचा समावेश होता. शिवाय मे महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत कोणतेही उष्णकटिबंधीय वादळ आले नाही. एप्रिलमध्ये भारताच्या समुद्रात एकही चक्रीवादळ दिसले नाही. एप्रिल महिन्यात उष्णकटिबंधीय वादळ न येण्याचे हे सलग चौथे वर्ष राहिले. त्यामुळे तापमान कमी राहण्याची नोंद झाली.वातावरण सातत्याने बदल होत असल्याने तापमानात चढ-उतार होत आहेत. पूर्वमोसमी पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे तापमानाबरोबरच वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.

सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीयांसाठी शैक्षणिक योजना

सर्वसामान्य तळागाळातील वंचित व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठीच्या संधी उपलब्ध होत आहेत. तसेच अनुसूचित जाती व अनुसचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळून आर्थिक अडचणी कमी झाल्यामुळे चांगल्या प्रकारे शिक्षण घेण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेंतर्गत  सामाजिक  न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीद्वारे शिष्यवृत्तीचा लाभ  देण्यात येतो. यामध्ये शासन स्तरावर भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक प्रशिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता या योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येतात.

शासकीय निवासी शाळा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुले व मुली शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत या हेतूने शासकीय निवासी शाळा योजना राबविली जाते. सुसज्ज इमारत, निसर्गरम्य वातावरण, डिजीटल तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा, निवास व भोजनाची उत्तम सोय, मुबलक क्रीडा साहित्य, अद्ययावत व्यायामशाळा, शैक्षणिक साहित्य निर्मिती, सर्व महापुरुषांच्या जयंती तसेच पुण्यतिथी कार्यक्रम, व्यक्तिमत्व विकासपर मार्गदर्शन व्याख्याने, मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेमध्ये परिपाठ, विविध स्पर्धा, परीक्षा, प्रदर्शन अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास केला जातो.

शासकीय वसतिगृह योजना मागासवर्गीय मुलां-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुला-मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृह योजना राबविली जात आहे.

शासनाच्या ध्येय धोरणानुसार साधारणपणे माहे जूनपासून शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश देण्याची कार्यवाही सुरू केली जाते. वसतिगृहामधील प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन, अंथरुण-पांघरुण व ग्रंथालयीन सुविधा दिली जाते. विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी दोन गणवेश, क्रमिक पुस्तके, वह्या, स्टेशनरी दिली जाते. वैद्यकीय व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी विविध साहित्य दिले जाते. दैनंदिन खर्चासाठी विद्यार्थ्यांना प्रतिमहिना निर्वाहभत्ता दिला जातो.

संवाद उपक्रम शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे सोयीसुविधा मिळतात की नाही, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे तसेच त्यांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने नवनवीन संकल्पना राबवण्याच्या अनुषंगाने संवाद उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त, समाजकल्याण अधिकारी विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात.

अधिक माहितीसाठी संपर्क – सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा 415003 दूरध्वनी क्रमांक : 02162-298106

000

संकलन – सातारा जिल्हा माहिती कार्यालय

आता उद्घाटनासाठी सुद्धा सुप्रीम कोर्टात याचिका, राष्ट्रपतींनी करावे नव्या संसदेचे उद्घाटन; 20 विरोधी पक्षांचा बहिष्कार, 17 पक्ष सहभागी होणार

सकाळी हवन-पूजा, दुपारी 12 वाजता पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन
28 मे, रविवारी सकाळी नवीन संसद भवनात हवनासह पूजा -. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 12 वाजता उद्घाटन करणार-

नवी दिल्ली-संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा वाद थांबता थांबेना. एकूण 40 पक्षांपैकी काँग्रेससह 20 विरोधी पक्षांनी बहिष्काराची घोषणा केली आहे. दुसरीकडे, भाजपसह 17 पक्षांनी सरकारचे निमंत्रण स्वीकारले आहे.दरम्यान, राष्ट्रपतींनी संसद भवनाचे उद्घाटन करण्याचे निर्देश देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने राष्ट्रपतींना उद्घाटनासाठी आमंत्रित न करून संविधानाचे उल्लंघन केले आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डावलून पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा निर्णय हा त्यांचा घोर अपमान तर आहेच, पण हा थेट लोकशाहीवरचा हल्ला आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे. या सरकारमध्ये संसदेतून लोकशाहीचा आत्माच काढून टाकण्यात आल्याचे बुधवारी विरोधी पक्षांच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे. अशा स्थितीत नवीन इमारत बांधण्यात अर्थ नाही.

भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिरोमणी अकाली दल, एनपीपी, एनडीपीपी, एसकेएम, जेजेपी, आरएलजेपी, आरपी (आठवले), अपना दल (एस), तमिळ मनिला काँग्रेस, एआयएडीएमके, बीजेडी, तेलगू देसम पार्टी, YSR काँग्रेस, IMKMK आणि AJSU MNF

(लोकसभेत 60.82% (328 सदस्य) आणि राज्यसभेत 42.86% (102 सदस्य).

विरोध करणारे 20 पक्ष

काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, आम आदमी पार्टी, शिवसेना (उद्धव गट), समाजवादी पक्ष, आरजेडी, सीपीआय, जेएमएम, केरळ काँग्रेस (मणी), व्हीसीके, आरएलडी, एनसीपी, जेडीयू, सीपीआय(एम) , IUML, नॅशनल कॉन्फरन्स, RSP, AIMIM आणि MDMK.

(विरोधी पक्षांचे लोकसभेत 26.38% (एकूण 143 सदस्य) आणि राज्यसभेत 38.23% (91 सदस्य) प्रतिनिधित्व आहे.)

बारावीचा निकाल जाहीर ! राज्याचा निकाल 91.25 टक्के

या वेबसाईटवर पाहता येणार निकाल
mahresult.nic.in
https://hsc.mahresults.org.in
http://hscresult.mkcl.org

पुणे:: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in किंवा maharesult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे.

असा आहे विभागाचा निकाल
पुणे : 93.34
नागपूर : 90.35
औरंगाबाद : 91.85
मुंबई : 88.13
कोल्हापूर : 93.28
अमरावती : 92.75
नाशिक: 91.66
लातूर : 90.37
कोकण : 96.01
एकूण : 91.25

मुलींचा निकाल मुलांपेक्षा 4.59 टक्के जास्त, 23 विषयांचा निकाल 100 टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व काेकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( १२ वी ) परीक्षा घेण्यात आल्या हाेत्या.

यंदा राज्यात निकाल ९१.२५ टक्के लागला असून १२ लाखाहूनही अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 96.01 तर सर्वात कमी निकाल मुंबई 88.13 टक्के लागला आहे. अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

१४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी १२ लाख ९२ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्याच्या निकालाची ९१.२५ टक्के एवढा आहे. कोकण विभाग अग्रेसर असून सर्वाधिक निकाल ९६.०१ टक्के तर सर्वात कमी निकाल मुंबई ८८.१३ टक्के एवढा आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.७३ टक्के असून मुलांचा निकाल ८९.१४ टक्के एवढा आहे.मुलांपेक्षा ४.५९ टक्के जास्त आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.२५) दुपारी दाेन वाजल्यापासून ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.

तीन देशांचा दौरा करून PM मोदी दिल्लीत 

 मोदींनी बुधवारी ऑस्ट्रेलियात घेतली पत्रकार परिषद
नवी दिल्ली-तीन देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सकाळी दिल्लीत परतले. पालम विमानतळावर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांचे स्वागत केले. इथे ते म्हणाले की लोकशाहीचा आत्मा काय आहे, लोकशाहीची ताकद काय आहे, हे ऑस्ट्रेलियात झालेल्या भारतीय कार्यक्रमाकडे पाहून समजू शकते.

ते म्हणाले की ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायामध्ये आयोजित समारंभात पंतप्रधान, माजी पंतप्रधान, सत्ताधारी पक्षाचे खासदार आणि संपूर्ण विरोधी पक्ष सहभागी झाले होते. ही तिथली लोकशाही आहे. या कार्यक्रमात सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही भारताच्या प्रतिनिधीचा सत्कार केला.

प्रत्यक्षात बुधवारी काँग्रेससह 19 पक्षांनी देशाच्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. या पक्षांनी लोकशाहीचा आत्मा बाहेर काढला असताना नव्या वास्तूचे दर्शन घडत नसल्याचे सांगितले. या विधानाशी पंतप्रधानांच्या भाषणाचा संबंध जोडला जात आहे.

बुधवारी, त्यांच्या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी, त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर झालेल्या हल्ल्यावर पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले- आम्ही यापूर्वीही फुटीरतावादी घटकांच्या कारवायांवर बोललो होतो. अशा कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, ज्यामुळे परस्पर संबंध बिघडतील. पीएम अल्बानीज यांनी कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.मोदी म्हणाले – एका वर्षात अल्बानीजशी माझी ही सहावी भेट आहे. यावरून भारत-ऑस्ट्रेलिया संबंध किती खोल आहेत हे सिद्ध होते. क्रिकेटच्या भाषेत बोलायचे झाले तर दोन्ही देशांमधील संबंध टी-20 मोडमध्ये आले आहेत. या वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी मोदींनी अल्बानीजला निमंत्रित केले.

पुण्यात टिंबर मार्केट येथील लाकडाच्या गोदामाला भीषण आग,सुदैवाने कोणीही जखमी नाही

पुणे

पुण्यातील टिंबर मार्केट येथील लाकडाच्या गोदामाला आज पहाटे 4.14 वाजता भीषण आग लागली. सकाळी पावणे आठवाजेपर्यंत वाजेपर्यंत येथे आग धुसमत होती. अग्निशमन दलाचे 30 बंब घटनास्थळी आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. अखेर साडेतीन तासानंतर ही आग आटोक्यात आल्याची माहिती आहे.गोदामाच्या आजुबाजुला असलेल्या चार घरांनादेखील या आगीची झळ बसली. जवानांनी प्रथम ही आग शेजारील घरांमध्ये, शाळेमध्ये व परीसरामध्ये पसरू न देण्याची खबरदारी घेतली. आजुबाजुच्या परिसरातून 10 सिलेंडर तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठा धोका टळला.

दरम्यान, या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासमवेत इतर 20 अधिकारी व जवळपास 100 जवान आणि पुणे मनपा- पुणे कॅन्टोमेंट-पीएमआरडीए-पिंपरीचिंचवड अग्निशमन दल अशी एकुण जवळपास 30 अग्निशमन वाहने व खाजगी वॉटर टँकर घटनास्थळी दाखल आहेत. आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप समजू शकलेले नाही.

आंबील ओढ्याचे ,दक्षिण पुण्याचे वाट्टोळे कोणी केले..अजितदादा सांगू शकतील काय ?

‘आंबील ओढा’ पुस्तकाचे शनिवारी अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे- दक्षिण पुणे म्हणजे निसर्गाची मुबलक संपदा लाभलेलं पुण्याचं दक्षिण द्वार..कात्रजचे जंगल, पेशवेकालीन धरणे (ज्याची आता तळी म्हणून उल्लेख करता ते) कात्रजच्या घाटातून उगम पावलेला आंबील ओढा आणि धरणातून पुण्याला होणाऱ्या भुयारी पाणीपुरवठा मार्ग,अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी केलेला आंबील ओढ्याचा वापर,कधी काळी या दोन्ही धरणांच्या आसपासच्या जंगलात आढलेली प्राणी मात्रा.. या नैसर्गिक संपदेची माहिती घेऊन हि संपदा कोणी कशी उध्वस्त केली याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार सांगतील काय ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. त्यास कारण हि तसेच आहे  ‘आंबील ओढा – बॅबलींग ब्रुक टू नॅस्टी ड्रेन’ या संशोधनात्मक पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी (दि.२७) अजितदादांच्या हस्ते होणार आहे. तत्कालीन आयुक्त संजय कुमार यांच्याकडे पेशवेकालीन भुयारी यंत्रणा जतन करण्यासाठी दिलेल्या अहवालाला दिलेली तिलांजली,आणि तत्पूर्वी बालाजी राव जेव्हा कात्रजच्या जंगलात रानगवा पाहायला आले होते तेव्हाच्या जंगलाचे रक्षण करण्यासाठी केलेल्या विनवण्या काळाच्या उदरात गडप झाल्या.पण निसर्गाची हानी करणारांची नावे इतिहासात राहतील.पण ती जाहीर होणार नाहीत या पार्श्वभूमीवर अजितदादा या पुस्तकाचे प्रकाशन करणार आहेत हि बाब महत्वाची मानली जाते आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अजितदादा काय पावले उचलतात हे त्याहून महत्वाचे मानले जाते.

भौगोलिक माहिती प्रणालीचे संशोधक आणि ग्राफियाज सोल्युशन्सचे संचालक डॉ. श्रीकांत गबाले व मंजुश्री पारसनीस लिखित ‘आंबील ओढा – बॅबलींग ब्रुक टू नॅस्टी ड्रेन’ या संशोधनात्मक पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी (दि. २७) दुपारी १२.४५ वाजता साज हॉल, सिद्धी गार्डन, डी. पी. रोड पुणे येथे होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पुणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार असून, ग्राफियाज सोल्युशन्स आणि वंचित विकास पुणे या संस्थांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम आयोजिला आहे, अशी माहिती डॉ. श्रीकांत गबाले यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी मंजुश्री पारसनीस आणि देणगीदार दत्ता पुरोहित आदी उपस्थित होते.
पुस्तकाविषयी बोलताना डॉ. श्रीकांत गबाले म्हणाले, “गेल्या १० वर्षांपासून आंबील ओढा विषयावर काम करत आहे. पुण्यासह शेजारील गावांवर या विषयासंबंधी पीएचडी केली आहे. भौगोलिक माहिती प्रणाली व दूरसंवेदनाचा वापर करून शहरातील पाणवठे, नैसर्गिक प्रवाह, झरे, भौगोलिक स्थिती, भूशास्त्र, भूगर्भातील परिस्थिती, पावसाचे मापदंड, जैविक घटकांशी संबंध, परिसरातील वाढती लोकसंख्या, सद्यस्थितीत महाराष्ट्रामध्ये लागू असलेल्या एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार नैसर्गिक प्रवाहासाठीचे नियम व या संबंधित इतर समस्यांचा उहापोह या पुस्तकात केला आहे. मंजुश्री पारसनीस या परिसरात राहत असून, त्यांचा जैवविविधता, पर्यावरण शास्त्रावर सखोल अभ्यास आहे. २०१९ मध्ये आलेल्या पुरानंतर त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून आंबील ओढ्यातील जैवविविधता आणि पर्यावरण शास्त्र या अनुषंगाने लेखन केले आहे.” 
या पुस्तकात ऐतिहासिक आंबील ओढ्याची पेशवेकालीन स्थिती आणि आता त्यामध्ये झालेला कायापालट यावरही प्रकाश टाकला आहे. येथील समस्यांवर शास्त्रशुद्ध उपाय सांगण्याचा प्रयत्न यातून केला आहे. विकास आणि नैसर्गिक घटकांचा समतोल साधण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. शासकीय स्तरावर अहवाल बनविताना हा संदर्भग्रंथ ठरू शकेल,” असे डॉ. श्रीकांत गबाले यांनी नमूद केले

मुंबई पारबंदर- एमटीएचएल आर्थिक भरभराट आणणारा प्रकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महत्त्वाकांक्षी समुद्री पुलाची मुख्य भूमीशी (mainland) प्रत्यक्ष जोडणी पूर्ण

महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा मार्ग एमटीएचएलवरून – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 24 :- मुंबई पारबंदर अर्थात एमटीएचएल प्रकल्प आर्थिक भरभराट आणणारा ठरेल. हा तिसऱ्या मुंबईची सामाजिक – आर्थिक परिस्थिती पालटून टाकणारा गेम चेंजर ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. तर महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा मार्ग एमटीएचएलवरून जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबई पारबंदर प्रकल्पांतर्गत (MTHL) या महत्त्वाकांक्षी समुद्री पुलाची मुख्य भूमीशी (mainland) प्रत्यक्ष जोडणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभपूर्वक करण्यात आली. या समारंभात ते बोलत होते.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण या प्रकल्पाचे भूमिपूजन करणारे आणि पुढे हा प्रकल्प पूर्णत्वास जावा यासाठी सर्वतोपरी पाठबळ देणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल, असे देखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले.

यावेळी खासदार राहुल शेवाळे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, जपानचे मुंबईतील वाणिज्यिक दूतावास प्रमुख डॉ. फुकाहोरी यासुकाटा, “जायका”च्या भारतातील प्रमुख इव्हा मोतो, प्रकल्प आकारास आणणारे एल अँड टी, देवू, आएएचाय चे अभियंते, तांत्रिक अधिकारी, कर्मचारी, मजूर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, हा प्रकल्प पूर्णत्वास जात आहे याचा अतिशय आनंद होत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाप्रमाणेच या प्रकल्पाचे भूमिपूजन आणि लोकार्पण यांचा योग जुळून येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन श्री. फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत झाले होते, आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हा प्रकल्प मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील सामाजिक, आर्थिक परिस्थिती पालटून टाकणारा ठरणार आहे. हा समुद्री पूल साकारण्याचे मोठे आव्हान होते. पण ते एका सांघिक भावनेने पेलण्यात आले. हा पुल पुढे मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे, आणि मुंबई -गोवा मार्गाला जोडण्यात येणार आहे. यामुळे तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात शैक्षणिक, औद्योगिक आणि सेवा क्षेत्र यांचा विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या राज्यात पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेगाने सुरू असतात त्या राज्याच्या प्रगतीचा वेग चांगला असतो असे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, आम्ही राज्यातील कुठलाही प्रकल्प रखडू दिला नाही. मुंबईतील मेट्रोचे प्रकल्पही मार्गी लावले. यामुळे कोट्यावधी प्रवाशांना सुविधा उपलब्ध झाली. अगदी कोविडच्या काळातही एमटीएचएलचे काम सुरू होते. त्यामुळेच हा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकला आहे. त्यासाठी हा प्रकल्प साकारण्यात योगदान देणाऱ्यांचे कौतुक करावेच लागेल. या प्रकल्पामुळे वेळ, इंधनाची बचत होणार आहे. प्रदूषण रोखले जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करताना पर्यावरणाच्या समतोलचे भान राखले आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. यातून फ्लेमिंगो पक्षांचे अधिवासही संरक्षित राहिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, हा समुद्री पूल अभियांत्रिकीचा चमत्कार समजला जाईल. मुंबई शहर हे आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजनाची राजधानी आहे. पण बेटा सारख्या भुप्रदेशामुळे या गोष्टीच्या वाढीला मर्यादा होत्या. या पुलामुळे या अडचणी दूर झाल्या आहेत. आता महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा मार्ग एमटीएचएलवरून जाईल, असा विश्वास आहे. गेली तीस पस्तीस वर्षे अशा प्रकारचा पूल केवळ चर्चेतच होता. तो आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी आणि पाठबळाच्या जोरावर पूर्ण होत असल्याचा आनंद असल्याचेही ते म्हणाले.

सुरुवातीला श्रीनिवासन यांनी प्रास्ताविक केले. तत्पूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पुलाची जोडणी पूर्ण झाल्याच्या ठिकाणावरून प्रकल्पावरील अभियंते, अधिकारी, कर्मचारी यांची बस मार्गस्थ करण्यात आली.

मुंबई पारबंदर एमटीएचएल प्रकल्पाविषयी..

देशातील सर्वात लांब आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा पहिल्या समुद्री पुलाचे मुंबई ते मुख्यभूमी (mainland) पर्यंतचे जमिनीवरील तसेच समुद्रातील २२ किलोमीटर्सचे बांधकाम पूर्ण झाले आहे. अशाप्रकारे मुंबई पारबंदर प्रकल्पातील पॅकेज १ व पॅकेज २ मधील प्रत्येकी ६५ ते १८० मी. लांबीच्या एकूण ७० गाळ्यांची उभारणी ऑर्थोट्रॉपीक स्टील डेक (Orthotropic Steel Deck OSD ) पद्धतीच्या सुपरस्ट्रक्चरने करण्यात आली आहे. उभारणीचे हे काम वैशिष्ट्यपूर्ण अशा तंत्रज्ञान, उपक्रमांद्वारे तसेच आव्हानात्मक परिस्थितीत पूर्ण करण्यात आले आहे. तसेच या तिसऱ्या टप्प्यात आता पाण्यावरील हा पूल आता जमिनीशी जोडण्यात आला आहे.

यापुढील अनुषंगिक सोयी, सुविधा, रस्ते व वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना, वेगवेगळ्या तांत्रिक बाबींची पूर्तता, माहिती फलक सुशोभीकरण अशा अनेक गोष्टी पूर्ण झाल्यानंतर हा पारबंदर प्रकल्प नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती एमएमआरडीएच्यावतीने देण्यात आली.

  • प्रकल्पामध्ये मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे २२ किमी लांबीच्या ६ पदरी (३+३ मार्गिका २ आपात्कालीन मार्गिका) पुलाचा समावेश आहे.
  • या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे १६.५ किमी असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे ५.५ किमी इतकी आहे.
  • या पुलाला मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील (mainland)शिवाजी नगर व राष्ट्रीय महामार्ग-४ब वर चिर्ले गावाजवळ आंतरबदल (Interchanges) आहेत.

प्रकल्पाचे फायदे

  • नवी मुंबई व रायगड जिल्हा या प्रदेशांचा भौतिक व आर्थिक विकास.
  • नवी मुंबई विमानतळाशी वेगवान दळणवळण,तसेच मुंबई पोर्ट व जवाहरलाल नेहरू पार्ट यांच्या दरम्यान वेगवान दळणवळण शक्य.
  • मुंबई व नवी मुंबई,रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई-गोवा महामार्ग यांमधील अंतर सुमारे १५ किमीने कमी झाल्यामुळे इंधन, वाहतूक खर्च आणि अमुल्य वेळेची सुमारे एका तासाची बचत
  • मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा आणि जगातील १० व्या क्रमाकांचा समुद्री पूल ठरणार आहे.

  • ऑर्थोट्रॉपीक स्टील डेक (Orthotropic Steel Deck DSD)पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा भारतात प्रथम वापर
  • सुमारे ५०० बोईंग ७४७ विमानांच्या वजनाइतका म्हणजेच सुमारे ८५ हजार मेट्रीक टन ऑयोट्रॉपीक स्टील चा प्रकल्पात वापर.
  • सुमारे १७ आयफेल टॉवरच्या वजनाइतक्या म्हणजेच सुमारे १ लाख ७० हजार मेट्रीक टन वजनाच्या स्टीलच्या सळयांचा प्रकल्पात वापर.
  • पृथ्वीच्या व्यासाच्या ४ पट म्हणजेच सुमारे ४८ हजार किमी लांबीच्या प्रिस्ट्रेसींग वायर्सचा वापर
  • स्टैच्यू ऑफ लिबर्टीच्या पुतळ्याकरीता वापरण्यात आलेल्या काँक्रीटच्या सहा पट म्हणजेच सुमारे ९ लाख ७५ हजार घनमीटर काँक्रीटचा वापर.
  • बुर्ज खलिफाच्या ३५ पट उंचीच्या म्हणजेच सुमारे ३५ किमी लांबीच्या पाईल लाइनर्सचा वापर.
  • सद्य:स्थितीत स्थापत्य काम इतकी ९४% पूर्ण झाले आहे.
  • प्राधिकरणामार्फत प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यात आले असून मच्छिमारांना शासनाच्या धोरणानुसार नुकसानभरपाई देण्यात आली आहे व देण्यातही येत आहे.

०0000०

राज्याच्या स्थापित क्षमतेत ६६० मेगावॅटची भर पडणार महानिर्मितीचा ४ था सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील संच

नवी दिल्ली : महानिर्मितीच्या भुसावळ 660 मेगावॅट संच क्रमांक 6 चे अभियांत्रिकी, खरेदी आणि उभारणीचे काम केंद्र शासनाचा सार्वजनिक उपक्रम मेसर्स भेल (BHEL) कंपनी करीत असून या कामांना अधिक जलद गतीने पूर्णत्वाकडे नेण्यासाठी महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन यांनी आज दिल्ली येथे भेल कंपनीचे सी.एम.डी. डॉ.नलिन सिंघल यांची भेट घेतली.

महानिर्मितीच्या भुसावळ  संचाचे  बाष्पक प्रदीपन 30 मार्च 2023 रोजी संपन्न झाले, त्यानंतर सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून  हा संच माहे ऑक्टोबर 2023 मध्ये कार्यान्वित करण्यासाठी  मेसर्स भेल चे युद्धस्तरीय प्रयत्न सुरू असल्याचे  डॉ.नलिन सिंघल यांनी सांगितले.

मेसर्स भेल आणि महानिर्मिती अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत भुसावळ वीज प्रकल्पाच्या विकास कामांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. तसेच भविष्यातील वीज प्रकल्प, विद्युत उत्पादन क्षेत्रातील नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान, बदलते निकष, पर्यावरणीय ऱ्हास आणि घडामोडी या विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यासंदर्भात मेसर्स भेल कंपनीने घेतलेल्या पुढाकाराबद्दल डॉ.पी.अनबलगन यांनी भेल कंपनीच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

महानिर्मिती आणि मेसर्स भेल कंपनी यांचे मागील चार दशकांपासून असलेले सौहार्दपूर्ण संबंध लक्षात घेता आवश्यक ते संपूर्ण सहकार्य महानिर्मितीकडून भेल कंपनीला करण्यात येईल असे डॉ.पी.अनबलगन यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या वीज क्षेत्राच्या दृष्टिकोनातून भुसावळ 660 मेगावॅट हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यावर्षी राज्याच्या ग्रीडमध्ये 660 मेगावॅटची भर पडणार आहे. भुसावळ मधील 660 मेगावॅट क्षमतेचा पहिला आणि  कोराडीच्या 3 संचांनंतर हा महानिर्मितीचा चौथा संच आहे.

याप्रसंगी महानिर्मितीचे संचालक (प्रकल्प), अभय हरणे, मरावीम सूत्रधारी कंपनीचे निवासी कार्यकारी संचालक प्रफुल्ल पाठक तसेच भेलचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

उदंड होऊ देत अतिक्रमणे…वाहतूक कोंडीला येतील हजारो कोटीची उड्डाणे..

पुणे-महापालिका आणि उपनगरातील अतिक्रमणे आणि बेकायदा बांधकामे यांनी शहरात उच्छाद मांडलेला असताना यास राजकीय आश्रय लाभलेला असताना आता महापालिका आयुक्तांचा देखील अप्रत्यक्षपणे सहारा लाभत असल्याचे स्पष्ट चित्र आहे.यामुळे रस्त्याच्या बाजूच्या इमारतीतील दुकाने,बांधकाम मालक त्यांच्यापुढे महापालिकेच्या जागेत अर्थात रस्त्यावर होणाऱ्या अतिक्रमणातून बक्कल कमाई करत आहेत,तर काही ठिकाणी माजी नगरसेवकांनी महापालिकेच्या जागेत,रस्तोरस्ती पथारीवाल्यांना आपल्या छत्रछायेखाली दरमहाच्या भाड्यापोटी बसवून कमाई प्रशासकीय कार्यकालात देखील सुरु ठेवली आहे.स्वारगेट पासून जवळ असलेल्या एका शाळेच्या गेट जवळ तर एका माजीमानानीय महोदयांनी चक्क मटक्याच्या अड्ड्यासाठी आश्रय देऊन कमाईचा मोठा हप्ता सुरु ठेवला आहे. आणि महापालिका आयुक्त मात्र कडक अधिकाऱ्यांचे पंख छाटून राजकीय दबावाचे बळी ठरताना दिसत आहेत.त्यामुळे पुणेकरांनी या अतिक्रमणांमुळे आणि बेकायदा बांधकामांमुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीला किंवा अन्य समस्यांना आता जबाबदार तरी कोणाला धरायचे हे समजेनासे झाले आहे.

अतिक्रमण कर्मचारी म्हणतात,मरू देत..उदंड होऊ देत अतिक्रमणे.

दरम्यान पथारीवाले,यांचे काही ठिकाणी पुनर्वसन केलेली आहेत,अनेक ठिकाणी महापालिकेने त्यांना दिलेले गाळे धूळ खात पडून तर इतर कोणाला भाड्याने दिलेले आढळून येत आहेत.प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण कारवाई झाली कि पुन्हा तिथेच बिनदिक्कतपणे अतिक्रमणे उभारली जात आहेत.पण याचा राग कोणाला येत नाही,रस्त्यावर पायी चालणे,रस्ता ओलांडणे हे जिकीरीचे झाले असल्याने वृद्धांनी आता रस्त्यावर जाणेच बंद केले आहे. आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या दबंग अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी राजकीय दबाव येत असल्याने आणि त्यास भ्रष्ट लोकांची साथ मिळत असल्याने आयुक्त त्यापुढे झुकत असल्याचे दिसून आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अतिक्रमण आणि बांधकाम निर्मुलन खात्यात प्रामाणिकपणे कामे करणे सोपे राहिलेले नाही,माजी मंत्र्यांपासून माजी नगरसेवक,अधिकारी यांचा यात मोठा सहभाग आहे..पुणे बकाल झाले ते नियोजन नसल्यामुळे असे सर्वच म्हणतात पण या नियोजनाचे धाज्जे उडविणारे हेच असतात हे दुर्दैव म्हणावे लागेल.४० फुट रुंदीचा रस्ता डीपी च्या कागदावर दिसतो पण प्रत्यक्षात जागेवर तो अतिक्रमणाने २० फुटच उरतो.आणि मग होते वाहतुक कोंडी,नाले बुजवून बांधकामे झाल्याने, बेकायदा बांधकामे झाल्याने ड्रेनेज व्यवस्था कोलमडून पडते,आणि मग पुन्हा दोष दिला जातो महापालिकेच्या कारभाराला..हा कारभार पाहताना डोळे मिटून घेणाऱ्या जनतेला पालिकेला नावे ठेवणे सर्वात सोपे वाटते पण पालिकेत प्रामाणिकपणे,कर्तव्य निष्ठ अधिकारी बनणे सोपे आहे काय ? आणि असे प्रयत्न करणाऱ्यांना…कादरखान चा छन छन कि सुनो सुन्कार..के पैसा बोलता है…हा सिनेमा आठवतो आणि हेच गाणे आवडले तर नवल का वाटावे ?

‘शेरलॉक होम्स सर्वांना आवडतो कारण तो आपला मित्र बनतो!’- संदीप खरे

युवा पिढीतील लोकप्रिय गीतकार-कवी संदीप खरे सर्वपरिचित आहेत. सोपी पण अर्थवाही, तसेच आजच्या पिढीच्या थेट परिचयाची भाषा आणि अभिव्यक्ती हे संदीप खरे यांच्या गीतांचे वैशिष्ट्य आहे. ‘चकवा’, ‘निशाणी डावा अंगठा’, ‘हाय काय नाय काय’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘‘मोरया’ असे २५ चित्रपट. संगीतकार सलील कुलकर्णी यांच्यासोबत ‘आयुष्यावर बोलू काही’, ‘अग्गोबाई ढग्गोबाई’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ असे लोकप्रिय सादर करणारे संदीप खरे आता स्टोरिटेलवर उन्हाळी सुट्टीनिमित्त अनोखा खजिना घेऊन येत आहेत. ‘शेरलॉक होम्स’च्या गाजलेल्या रहस्यकथा आता स्टोरीटेलवर त्यांच्या आवाजात ऐकता येणार आहेत. दीर्घकाळ जगभरातील वाचकांना भुरळ घालणाऱ्या या अजरामर कथा मराठीत ऑडिओबुकच्या स्वरूपात आणताना आलेल्या अनुभवांबद्दल संदीप खरे यांच्याशी साधलेला संवाद…

प्रश्न १) लहान मुलांसह सर्वक्षेत्रातील व्यक्तींसाठी तुम्ही खूप काम केलंयलिहिलंयकविता गाणी सगळं केलं आहेया सगळ्यामध्ये शेरलॉक होम्सचं वाचनहा प्रवास नेमका कसा सुरु झालं?

संदीप खरे : शेरलॉक होम्स हे इतकं अद्धभुत व्यक्तिमत्व आहे, त्याने माझ्या आयुष्यात खूप लहानपणीच प्रवेश केला आहे. भालबा केळकर यांनी अनुवादित केलीली शोरलॉक होम्सची सर्व पुस्तके मी लहानपणी वाचली आहे. आणि जेव्हा हा प्रोजेक्ट करायचा असं मला स्टोरिटेलने सांगितले तेव्हा खूप आनंद झाला. कारण मला आठवतंय कि या कथा मी वाचून दाखविल्या आहेत, पण त्या स्टुडिओमध्ये नाहीत तर स्टुडिओ बाहेर. बालपणाच्या काळात आपण जे जे वाचतो त्यामध्ये ‘फास्टर फेणे’ असो वा ‘टारझन’ असो. त्यावयात असताना माझ्यावर शेरलॉक होम्सने एक वेगळीच छाप उमटवली होती. आणि हे फक्त माझ्या बाबतीतच घडले असे नाही, तर जगभरातील सगळ्यांवर या कथांनी मोहिनी घातली होती. हे सगळं अद्धभुत म्हणावं तसं शेरलॉक होम्सने जगावर पकड घेतली, त्यांच्या कथांची भाषांतरे जगातल्या सगळ्या भाषांमध्ये झाली. आणि ती इतकी लोकप्रिय झाली आहेत कि मी या ‘ऑडिओबुक्स’मध्ये सुरुवातीला शेरलॉक होम्सबद्दल लिहिलं गेलं आहे ते सुद्धा वाचलं आहे. तेही ऐकण्यासारखं आहे. हे पात्र इतकं अजरामर झालंय कि ते खरोखरच होतं आणि अजूनही आहे असंच लोकांना वाटतंय. आजही लंडन येथील ‘२२१ बेकर्स स्ट्रीट’ला त्याचं क्रिएट घर, रुम आहे. तर सांगायचा मुद्दा म्हणजे त्यांनी मला तेव्हापासूनच झपाटलं आहे.

प्रश्न २) शेरलॉक होम्स‘ या पात्राकडे तुम्ही कसं पहाता?

संदीप खरे : मी शेरलॉक होम्स लहानपणी वाचत असताना मला या व्यक्तिरेखेने पार झपाटलं होत आणि नेमके त्याचवेळी  टीव्हीवर ‘ग्रॅनडा’ ही मालिका (Granada TV Series) सुरु झाली होती. यात जेरेमी ब्रेट (Jeremy Brett) ह्या अभिनेत्यानी ‘शेरलॅाक होम्स’ची भूमिका साकारली होती. अजूनही शेरलॉक होम्स म्हटलं कि तोच माझ्या डोळ्यासमोर येतो. ज्यांनी ही सिरीज पाहिली असेल त्यांना ‘स्टोरीटेलवर’ ही ‘ऑडिओ बुक्स’ची सिरीज ऐकताना हे नक्की जाणवेल कि मी जे मराठीत वाचलंय त्याचा प्रभाव मात्र या मालिकेतील व्यक्तिरेखेचा आहे. जेरेमी ब्रेट यांनी साकारलेल्या शेरलॉक होम्सच्या बोलण्याची ढब, त्याची एक्सेंट्रिक म्हणजे अतिशय हुशार असलेली माणसे जशी तंद्री लागल्या सारखी किंवा सणकू पद्धतीची असतात तशी ती शेरलॉक होम्सची प्रतिमा माझ्या मनात कोरली गेली आहे. मालिकेत दाखविलेली लंडन मधील लोकेशन्स, बग्गी, दगडी पेव्ह रोड, कॉस्च्युम्स, असं सारं वातावरण मला फार लोभस वाटतं. आणि या सोबत त्यातील रहस्य आणि त्यांची शेरलॉक होम्सने चतुराईने केलेली उकल यामुळे या व्यक्तिरेखेच्या आपसूक प्रेमात पडायला होते.

प्रश्न ३) मूळ शेरलॉक होम्स मधील गंमत अनुवादित कथांमध्ये कशी आली आहे?

संदीप खरे : कुमार वयोगटातच साधारणतः आपण वाचायला लागतो. या लहान वयात अद्भुत कथा सगळ्यांनाच वाचायला आवडतात आणि त्या आवडीने वाचल्याही जातात. ‘शेरलॉक होम्स’च्या मूळ कथांचे प्राध्यापक भालबा केळकर यांनी केलेले अनुवाद तसं पाहिलं तर अतिशय सोप्या सहज भाषेमध्ये आहे. त्यामुळे ओरिजनल कथांप्रमाणेच मराठीतील अनुवाद – भाषांतरही खूप इंटरेस्टिंग झालाय आणि तुम्ही एकदा हे स्टोरीटेलवर ऐकायला – वाचायला लागला की कधी पकड घेतली जाते, तुम्ही त्या कथेत केव्हा रमता हे कळत नाही. आम्ही लहान असताना  ‘शेरलॉक होम्स’चे ‘पकडा पकडी’चे हे शहरी खेळ, सुट्टीच्या काळात गावातही खेळले जायचे. तू कुठून आलायस? तुझ्या बुटाच्या वरती असलेले मातीचे डाग, म्हणजे तू बागेतून आला आहेस, असे खेळात तर्क लावून ‘शेरलॉक होम्स’चे खेळ आम्ही मुले खेळत होतो. आणि हीच गंमत या अनुवादित कथांमध्ये असल्याने तीच धम्माल या कथा ऐकताना येते.  

प्रश्न ४) बालपणी तुमच्यावर शेरलॉक होम्सच्या कथांनी नेमकी कोणती छाप उमटवली होती?

संदीप खरे : मराठी मीडियम मध्ये शिकलो आहे. त्यामुळे तसे इंग्लिश ते सुद्धा त्यांच्या एक्ससेन्ट(accent) कळणे  शक्यच नव्हतं. आणि तरीही मी शेरलॉक होम्स यांच्यावरील इंग्रजी मालिकेचे पाऊण तास – एक तासाचे एपिसोड पूर्ण खिळून पहात बसलेला असे. बरं ते वय असं नव्हतं की ज्या प्रकारची रहस्य या कथेत सांगितलेत आणि ज्या प्रकारे त्याची उकल शेरलॉक होम्स करतो ते  कळावं इतकं माझं वय नव्हतं. परंतु त्या मालिकेत दाखवलंय तसं त्यावेळेसचे ते लंडन, त्या सगळ्या त्याच्या बग्या, ते सगळे त्यांचे दगडी रोड, कॉस्च्युम, धुकं मला टेरिफिक आवडायचं, अजूनही आवडते. यातील शेरलॉक होम्सची चतुराई, त्याची रुबाबदार छबी, तीक्ष्ण नजर, अफाट बुद्धिमत्ता यामुळे त्याची माझ्यावर बालपणात पडलेली छाप, यामुळे  नकळत सुट्टीच्या काळात त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला जायचा.

प्रश्न ५) शेरलॉक होम्सचं वैशिष्ट्य काय सांगाल?

संदीप खरे : शेरलॉक होम्स आजही सर्वांना आवडतो, आवडत राहतो आणि त्याचे कारण म्हणजे तो माणूस झाला, मित्र झाला जसं हॅरी पॉटर आजच्या मुलांचा मित्र झाला तसेच शेरलॉक होम्सबद्दल म्हणता येईल. शेरलॉक होम्स (Sherlock Holmes) हे स्कॉटिश लेखक सर आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहिलेल्या कथानकांमधील नायकाचे नाव आहे. होम्स हे व्यवसायाने खाजगी गुप्तहेर आहेत. अविश्वसनीय चातुर्य असलेले होम्स आधुनिक विज्ञान, रसायन शास्त्र आणि सूक्ष्म निरीक्षणाचे वापर करून अनेक अवघड गुन्हे सोडवत असे. शेरलॅाक होम्सच्या या कथा जगप्रसिद्ध असून तो आणि त्याचा सहकारी डाॅ. वाॅटसन हे जगभरातील गुप्तहेरकथा वाचकांच्या आणि कुमार वाचकांच्या गळ्यातील अजरामर काळासाठीचे ताईत बनले आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

प्रश्न ६) स्टोरीटेलवरील शेरलॉक होम्सच्या या ऑडिओ बुक्सचे सादरीकरण करताना काळानुरूप तुम्ही कोणते वेगळेपण आणण्याचा प्रयत्न केला आहे का?

संदीप खरे : अनेकजण असं करतात की सुरुवातीला कथा वाचून घेतात आणि मग सुरुवात करतात. मला अपवाद करावासा वाटला अशासाठी की ते ‘रहस्य, रहस्य, रहस्य आहे ना ते मलाही खेचत जातं. मला जर का ते ऑलरेडी माहित असेल तर कदाचित शिळेपणा येऊ शकेल. म्हणून मी मुद्दामून खूप खोलात जाऊन त्याचा अभ्यास वगैरे केला नाही. कथा जरी त्याकाळची असली तरी ती क्लिष्ट भाषा नक्कीच. त्यामुळे मला नाव वाचताना फार गंमत येत गेली. एखादा रहस्यमय सिनेमा बघावा, तशी कथा सादर केली आहे. यात संवाद भरपूर आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखेचा आवाज त्याच्या स्वभावानुसार दिला असून त्यातून मुळात कथा सांगितली आहे.

‘पीडी’ वीजग्राहकांकडून ३१ कोटींच्या थकबाकीची वसूली

पुणे परिमंडलामध्ये १७३५ ठिकाणी आढळली ३ कोटींची वीजचोरी

पुणे, दि. २४ मे २०२३: पुणे परिमंडल अंतर्गत विविध कारणांमुळे वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित (पर्मनन्ट डिस्कनेक्ट) केलेल्या ग्राहकांच्या वीजजोडण्यांची तपासणी मोहीम वेगाने सुरु आहे. यामध्ये गेल्या वर्षभरात १९ हजार ग्राहकांकडून वीजबिलांपोटी ३० कोटी ५९ लाख रुपयांची वसूली करण्यात आली आहे. तर कायमस्वरुपी खंडित ८० हजार १९९ पैकी ६१ हजार ३९७ वीजजोडण्यांची बुधवार (दि. २४) पर्यंत तपासणी करण्यात आली. त्यात १७३५ ग्राहकांनी ३ कोटी १३ लाख रुपयांची वीजचोरी केल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरु आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांच्या नेतृत्वात महसूलवाढ व वीजहानी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरु आहेत. त्यात कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या वीजजोडण्यांची संख्या कमी करणे व संबंधित ग्राहकांकडून थकबाकीची वसूली करणे ही एक महत्त्वाची मोहीम राबविण्यात येत आहे. संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांच्याकडून सातत्याने आढावा घेत या मोहिमेला वेग देण्यात आला आहे. तसेच कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या परिमंडलाच्या यादीमध्ये यापुढे नव्या ग्राहकाचा समावेश करण्याचा अधिकार आता थेट फक्त मुख्य अभियंत्यांना देण्यात आला आहे.

प्रामुख्याने वीजबिलांच्या थकबाकीमुळे व ग्राहकांच्या मागणीप्रमाणे वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला जातो. पुणे परिमंडलामध्ये सद्यस्थितीत एकूण २ लाख ६६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. त्यांच्याकडे ४१७ कोटी ५२ लाख रुपयांची थकबाकी आहे. या सर्व वीजजोडण्यांच्या प्रत्यक्ष तपासणीचे काम महावितरणकडून सुरु करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात गेल्या दोन वर्षांतील ८० हजार १९९ ग्राहकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्या वीजजोडण्यांची तपासणी मोहीम वेगाने सुरु आहे. या मोहिमेत मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्यासह वरिष्ठ अभियंता, अधिकारी विविध ठिकाणी जाऊन तपासणी करीत आहेत. काही भागामध्ये प्रसंगी पोलीस संरक्षण घेण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात कायमस्वरुपी खंडित १९ हजार ग्राहकांकडून ३० कोटी ५९ लाख रुपयांच्या थकबाकीची वसूली करण्यात आली आहे. यात गेल्या दोन महिन्यात ६ हजार ग्राहकांकडील १० कोटी ३७ लाख रुपयांचा समावेश आहे.

       आतापर्यंत पुणे परिमंडलात कायमस्वरुपी खंडित ६१ हजार ३९७ (७६.६ टक्के) वीजजोडण्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये बहुतांश ठिकाणी वीजवापर नसणे, वीजजोडणीच असलेल्या जागेवरील इमारत पाडलेली असणे तसेच थकबाकीचा भरणा केलेला आहे मात्र नवीन वीजजोडणी घेतलेली नाही असे निदर्शनास आले आहे. मात्र कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केला असताना वीजवापर सुरु असल्याचे प्रकार आढळून आले. यात पुणे शहरात ६७५ ठिकाणी १ कोटी ३८ लाख ५६ हजार, पिंपरी चिंचवड शहरात ५८० ठिकाणी ९६ लाख २७ हजार तर आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यामध्ये ४८० ठिकाणी ७९ लाख ४ हजारांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनास आले. या वीजचोरीप्रकरणी आतापर्यंत ६९६ ग्राहकांकडून १ कोटी २७ लाख रुपयांच्या वीजबिलांची वसूली करण्यात आली आहे तर उर्वरित ग्राहकांविरुद्ध कलम १३५ नुसार कारवाई करण्यात येत आहे.

 जागेची मालकी बदलली तरी थकबाकीची वसूली 

जागेच्या पूर्वीच्या मालकाने किंवा ताबेदाराने न भरलेल्या वीजबिलांची थकबाकी नंतरच्या नवीन मालक ताबेदाराकडून वसूल करण्याचा अधिकार वीज वितरण कंपन्यांना असल्याचा निकाल मा. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. जागेच्या नवीन मालकांनी नवीन वीजजोडणीसाठी अर्ज केले होते. मात्र त्या जागेवर पूर्वीच्या बिलाची थकबाकी भरल्याशिवाय नवीन वीजजोडणी देण्याचे वीज वितरण कंपन्यांकडून नाकारण्यात आले. याबाबत महाराष्ट्र व इतर काही राज्यांतून १९ प्रकरणांत सर्वोच्च न्यायालयामध्ये अपिल दाखल झाले होते. यासंदर्भात निकाल देताना जागेची मालकी बदलली तरी पूर्वीच्या वीजबिलांच्या थकबाकीची वसूली करण्याचा अधिकार वीज कंपन्यांना असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

मुली व महिला बेपत्ता:प्रत्येक जिल्ह्यामधील स्पेशल ज्युवेनाईल पोलीस युनिट (SJPU) स्ट्रॉंग करा -राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड.सुशीबेन शाह

मुंबई, दि. 24 : प्रत्येक जिल्ह्यामधील स्पेशल ज्युवेनाईल पोलीस युनिट (SJPU) हे जास्तीत जास्त सक्रिय व अद्ययावत असणे आवश्यक आहे, असे मत राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष अॅड. सुशीबेन शाह यांनी आज व्यक्त केले.

महिला, बाल अत्याचार, प्रतिबंध विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक पांडे यांची अध्यक्ष अॅड. सुशीबेन शाह यांनी भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आयोगाच्या सदस्य अॅड. निलिया चव्हाण उपस्थित होत्या.

अॅड. सुशीबेन शाह म्हणाल्या की, मुली व महिला बेपत्ता होण्याच्या घटना होऊ नये म्हणून प्रत्येक जिल्ह्यामधील स्पेशल ज्युवेनाईल पोलीस युनिट (SJPU) हे जास्तीत जास्त सक्रिय व अद्ययावत असणे आवश्यक आहे. या युनिटच्या कामकाजाचा अहवाल व त्यावर देखरेख याबाबत भेटीदरम्यान विस्तृत चर्चा करण्यात आली. लहान मुली आणि महिलांमध्ये जनजागृती होण्यासाठी आयोगाने माहितीपर पोस्टर्स तयार केलेले असून, हे पोस्टर सर्व पोलीस स्थानकात लावण्यासाठी त्याची प्रत आयोगामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक यांना देण्यात आली.

विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक पांडे म्हणाले की, या विषयाबाबत सविस्तर अहवाल ते आयोगास सादर करतील. आयोगातील पोलीस विभागाशी संबंधित सर्व प्रकरणे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयामार्फत प्राधान्याने निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे श्री. पांडे यांनी सांगितले.

****