Home Blog Page 1527

वेताळ टेकडीवर करण्यात येणाऱ्या 250 पोल्सचे बांधकाम तात्काळ थांबवा-डॉ .नीलम गोऱ्हेंचे आदेश

डॉ.नीलम गोऱ्हे यांचे नगरविकास प्रधान सचिव व पुणे मनपा आयुक्त यांना लेखी पत्र …

पुणे दि.२५ : पुणे महानगरपालिकेमार्फत बालभारती ते पौड फाटा लिंक रोड करण्याचे काम सध्या सुरू असलेचे समजते. त्यानुषंगाने वेताळ टेकडीवरती 250 काँक्रीट पोल्स उभे करून रस्त्याचे रेखांकन करण्यात येणार आहे. या रस्त्यावरील अनेक झाडे तोडली जाणार आहेत. याबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिनांक २५ एप्रिल, २०२३ रोजी लेखी पत्र पाठवून सदरहू काम थांबविणेबाबत कळवले होते. सदर पत्रामध्ये न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे वृक्षतोड करू नये तसेच रहदारी कमी करण्यासाठी सदर रस्त्याचा उपयोग किती होणार आहे याचेही सर्वेक्षण करावे असे सांगितले होते. तसेच पुणे शहरातील पर्यावरण संरक्षणामध्ये काम करणाऱ्या संस्थांना सहभागी करून त्यांचे हरकतीचा सकारात्मक विचार करण्याबाबत सूचित करण्यात आले होते.

यानुसार महानगरपालिकाकडे ज्या हरकती प्राप्त आहेत त्याबाबत सविस्तर सुनावणी होईपर्यंत सदर टेकडीवरती कोणतेही कामकाज करण्यात येऊ नये तसेच वृक्षतोडही करण्यात येऊ नये अशा सूचना संबंधितांना तात्काळ देण्यात याव्यात अशी लेखी सूचना डॉ.गोऱ्हे यांनी प्रधान सचिव नगरविकास विभाग आणि मनपा आयुक्त पुणे यांना आज दिल्या.
तसेच याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

आझम कॅम्पस च्या शाळांचे १२ वी च्या परिक्षेत घवघवीत यश !

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कुल अँड आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज फॉर गर्ल्स ‘ ,अँग्लो उर्दू बॉईज स्कूल अँड ज्युनियर कॉलेज , एम.सी.इ.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बारावी परिक्षेत यश मिळवले. संस्थेचे अध्यक्ष डॉ .पी ए इनामदार ,उपाध्यक्ष अबेदा इनामदार ,सचिव प्रा. इरफान शेख ,मुख्याध्यापक शिरीन खान,मुख्याध्यापक रोशन आरा,मुख्याध्यापक राज मुजावर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले . अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल अँड ज्युनियर कॉलेजचा निकाल ८८.२० टक्के लागला. विज्ञान शाखेचा निकाल ८७.५० टक्के इतका लागला. कला शाखेचा निकाल ६२.२६ टक्के,तर वाणिज्य शाखेचा निकाल ९३ टक्के इतका लागला. विज्ञान शाखेतून ९१.६७ टक्के गुण मिळवून जैन जान्हवी प्रवीण प्रथम आली . कला विभागात अडसुरे अर्थम रवींद्र ८८.३३ टक्के गुण मिळवून प्रथम आला तर कॉमर्स विभागात अंतुले मारुफ असिफ ८४.१७ टक्के गुण मिळवून प्रथम आला . ‘अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कुल अँड आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज फॉर गर्ल्स ‘चा एकूण निकाल ९६.२० टक्के लागला. विज्ञान शाखेचा निकाल ८७.९० टक्के, वाणिज्य शाखेचा ९६.११ टक्के तर कला शाखेचा ८८.६० टक्के निकाल लागला. मुलाणी मेहविश अयुबखान ही ८१.५० टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम आली . कॉमर्स विभागात सय्यद लायेबा शरीफ ९४.१७ टक्के मिळवून प्रथम आली तर शेख आयेशा महमद रफिक ९०.८३ टक्के गुण मिळवून कला शाखेत प्रथम आली.’एम.सी.इ.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेज’ चा निकाल ९३.९३ टक्के लागला.विज्ञान शाखेचा निकाल ९४.७७ टक्के इतका लागला. कला शाखेचा निकाल ८० टक्के,तर वाणिज्य शाखेचा निकाल ९७.९० टक्के इतका लागला. शेख आयेशा अफरोज ७९.५० टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम आली. कॉमर्स विभागात चव्हाण ख़ुशी राकेश ७९.३३ टक्के मिळवून प्रथम आली तर घडियाली सारा जफर ८६.७० टक्के गुण मिळवून कला शाखेत प्रथम आली.

अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या१०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम 

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ संचलित अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने (कला, वाणिज्य व विज्ञान) शंभर टक्के निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे. सलग आठव्या वर्षी १०० टक्के निकाल लागला आहे. या यशामध्ये सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्था व्यवस्थापन सर्वांचे योगदान मोलाचे राहिले. कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतून ३७० विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत बसले होते.
विज्ञान शाखेत हर्षाली रमेश कुंजीर (८९.५० टक्के), श्रेय दिलीप सराफ (८८.६७ टक्के), अरुंधती अमरसिंग तावरे (८७.८३ टक्के) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. अखिलेश नितीन लोणकर याने आयटी विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवले. कविता आनंद कनकणे हिने हिंदी विषयात ९५, तर दामोदर केतन पेंडसे याने गणित विषयात ९८ गुण मिळवले.
महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे अध्यक्ष मोहनदादा जोशी, संस्थेचे सचिव प्रसाद आबनावे, खजिनदार प्रथमेश आबनावे, सहसचिव पुष्कर आबनावे, सदस्य प्रज्योत आबनावे, गौरव आबनावे, मुख्याध्यापिका विद्या कांबळे यांनी पेढे भरवून शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे गुणवत्तापूर्ण निकालाबद्दल कौतुक केले.

कुटुंब पद्धतीमुळे भारतात सामाजिक सुरक्षा-खासदार प्रकाश जावडेकर

पुणे-पाश्चात्य देशांमध्ये एका कुटुंबात सरासरी 2.5 व्यक्ती असतात, तर भारतात 4.5 व्यक्ती असतात. याचा अर्थ आपल्याकडे तीन पिढ्या एकत्र नांदत असल्याने ज्येष्ठांची काळजी घेतली जाते, नातवंडांवर संस्कार होतात. या कुटुंब पद्धतीमुळे आपल्या देशात सामाजिक सुरक्षा असल्याचे मत खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

सामान्य परिस्थितीतून बालविवाह, पुनर्विवाह असा संघर्ष करीत यशस्वी व्यवसाय करणाऱ्या आणि गरजवंतांसाठी मायेची सावली असणाऱ्या माई कुलकर्णी यांच्या जीवनातील संजय कुलकर्णी यांनी शब्दबद्ध केलेल्या महत्त्वाच्या लेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन रा. स्व. संघाचे अखिल भारतीय कुटुंब प्रबोधन संयोजक रविंद्र जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जावडेकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

जावडेकर म्हणाले, ”भारतीय कुटुंब व्यवस्थेत कुटुंबाचे व्यवसाय, आचार, विचार, परंपरा यांना महत्त्व आहे. अन्य देशांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण असणारी कुटुंब व्यवस्था ही आपली ताकद आहे. ‘माई’ या भारतीय कुटुंब व्यवस्थेचे प्रतिक आहेत.”

जोशी म्हणाले, ”आईजवळ व्यवस्थापन शिकता येते, परंतु आजच्या मुलीला आई व्हायचे नाही. हा विरोधाभास संपवून कुटुंब व्यवस्थेचा वसा पुढे नेण्यासाठी प्रत्येकाच्या मनात ‘माई’ असणे आवश्यक आहे.”

रमा कुलकर्णी यांनी स्वागत व सूत्रसंचालन, संजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक आणि ऋता कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

कान्स 2023 मध्ये सनी लिओनी तिच्या चित्रपट प्रीमियर मध्ये झळकली ! 

बहु-प्रतिभावान अभिनेत्री सनी लिओनी तिच्या नवीन आणि प्रशंसित अनुराग कश्यप दिग्दर्शित केनेडी या चित्रपटाने कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये प्रेक्षकांना  मंत्रमुग्ध केलं आहे. या चित्रपटाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 
केनेडी हा असा एक चित्रपट आहे ज्यात सनी लिओनीने तिच्या अनेक भूमिका पलिकडे जाऊन ही भूमिका साकारली आहे. कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये या चित्रपटाचं स्क्रिनिंग नुकतंच पार पडलं आणि या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकली. या चित्रपटाने प्रेक्षकांचं स्टँडिंग ओव्हेशन मिळवले आणि हाच खास क्षण सनी साठी अनोखा सोहळा होता.
अभिमानाने आनंद व्यक्त करत सनी लिओनी, दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि सह-कलाकार राहुल भट यांच्या सोबत कान्समध्ये खास फोटो पोझ दिली. 
कान्समध्ये चित्रपटाच्या उत्तुंग यशाने भारतीय प्रेक्षकांमध्ये या चित्रपटासाठी खूप उत्सुकता आहे. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांकडून मिळालेली जागतिक प्रशंसा आणि जबरदस्त प्रतिसाद यामुळे उत्साह वाढला आहे, ज्यामुळे देशभरातील चाहत्यांसाठी एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव मिळेल.
केनेडी हा असा एक चित्रपट आहे ज्यात सनीच्या अभिनयाची अनोखी झलक बघायला मिळणार आहे. आकर्षक कथा आणि उत्कृष्ट कामगिरीने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. भारतीय प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे चाहते सनी लिओनी ला मोठ्या पडद्यावर  पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
कान्स येथे केनेडीचे अनोखं कौतुक झालं आहे. सनी लिओनीच्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे ज्यामुळे एक अष्टपैलू आणि कुशल कलाकार म्हणून तिने स्वतः ची वेगळी ओळख संपादन करत अनुराग कश्यप यांच्या सोबत चित्रपट करण्याची संधी सनीला मिळाली आणि या चित्रपटाला सगळ्यांचं प्रेम मिळालं.

 मिस्टर इंडियाला पूर्ण झाली ३६ वर्षे!

मिस्टर इंडिया अनिल कपूरचा चित्रपट जो भारतीय चित्रपटसृष्टीत एक मैलाचा चित्रपट मानला आहे. 
अनिल कपूरचा आणि  श्रीदेवी यांचा सुपर ठरलेला मिस्टर इंडिया चित्रपटाची छत्तीस वर्षे ! 
अनिल कपूर आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या मिस्टर इंडियाला ३६ वर्षे पूर्ण झाली!
90 च्या दशकात ” लम्हे ते तेजाब ” पर्यंतचे जास्तीत जास्त आयकॉनिक चित्रपट अनिल कपूरने आपल्याला दिले आहेत यात शंका नाही पण मिस्टर इंडियाने 1987 मध्ये रिलीज होऊन भारतीय सिनेमाची बाजू बदलून टाकली. हा चित्रपट आजही तितकाच नवा वाटतो आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. 
अनिल कपूर आणि श्रीदेवी यांची जोडी त्यावेळी सुपर हिट ठरली होती. त्या वेळी चित्रपटाची क्रेझ इतकी जास्त होती की त्याने अमिताभ बच्चन यांनाही मागे टाकले आणि अनिल कपूरला त्यावेळचा सुपरहिरो ठरला. अलीकडेच, अनिल कपूरने देखील लेफ्टनंट श्रीदेवी आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यासोबत मिस्टर इंडिया सेटवरील एक दुर्मिळ फोटो शेअर केला होता ज्यातून प्रत्येकासाठी खूप  जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 
हा चित्रपट त्या काळात एक अनोखा चित्रपट ठरला कारण नवीन तंत्रज्ञान आणि सगळ्यांचं मनोरंजन या चित्रपटा मुळे झालं. आजही या चित्रपटातील पात्र सगळ्यांना आवडतात आणि चित्रपटाची गाणी प्रेक्षकांच्या मनात आहेत.
मिस्टर इंडिया या चित्रपटात अनिल कपूर, श्रीदेवी, लि. सतीश कौशिक, अमरीश पुरी आणि आफताब शिवदासानी ही अनोखी स्टार कास्ट होती. अनिल कपूर सध्या अँड्रॉइड कुंजप्पन व्हेर 5.25 हिंदी रूपांतर , सुभेदार ,  फायटर, अॅनिमलसाठी या चित्रपटा साठी तयारी करताना दिसत आहे.

महाराष्ट्र पोलीस देशात अग्रेसर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी दि. २५ : महाराष्ट्र पोलीस ही देशाची शान आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय सक्षमपणाने गृहमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. राज्यातील पोलीस हे देशात अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरामध्ये पार पडलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रत्नागिरी पोलीस दलाला जिल्हा विकास निधीतून उपलब्ध करुन देण्यात आलेली १० बोलेरो वाहने, २० मोटार सायकल व चार बसेसचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, या वाहनांमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होण्यास निश्चितपणाने मदत होईल. पोलिसांच्या घर निर्मितीला त्याचबरोबर त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील. नैसर्गिक आपत्तीमध्ये पोलीस सक्षमपणाने कार्यरत राहिल्यामुळे नागरिक सुखाची झोप घेऊ शकतात. नागरिकांना पोलिसांची भीती न वाटता त्यांच्या कामाचा चांगला अनुभव यावा यासाठी त्यांनी कार्यरत रहावे. 55 वर्षावरील वाहतूक पोलिसांना शासनाने बंदोबस्ताबाबत सवलत दिली आहे. पोलिसांना अनेक वेळेला आनंदाचे क्षण त्यांच्या कुटुंबियासोबत घालवावयाचे असतात तथापि कार्यबाहुल्यामुळे त्यांना ते शक्य होत नाही. गडचिरोलीचा पालकमंत्री म्हणून कार्यरत असताना पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली असल्याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली.

याप्रसंगी पोलीस दलासाठी घेण्यात आलेल्या वाहनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

यावेळी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, रत्नागिरी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्यासह पोलीस दलातील इतर अधिकाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते.

मुंबईकरांसाठी आजचा दिवस दिवाळीसारखा

राज्य सरकारच्या झोपडपट्टीधारकांना अडीच लाखात घर देण्याच्या निर्णयाचे मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अ‍ॅड.आशिष शेलार यांच्याकडून स्वागत

मुंबई-गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने झोपडपट्टीवासियांसाठी काहीही केले नाही. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत २००० ते २०११ पर्यंत अस्तित्वात असलेल्या झोपडपट्टीधारकांना फक्त अडीच लाखात घर देण्याचा शिंदे-फडणवीस सरकार निर्णय अत्यंत स्तुत्य असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत केलेल्या घोषणेमुळे आजचा दिवस प्रत्येक मुंबईकरांसाठी दिवाळीचा असल्याची भावना मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अ‍ॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केली.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या सुमारे १० ते १२ लाख कुटुंबीयांना हक्काचे घर मिळणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर सरकार बदलले व घरांच्या किंमती निश्चित करण्याचा निर्णय रखडला. आज शिंदे-फडणवीस सरकारने याबाबत जीआर काढून निर्णयाला अंतिम स्वरूप दिले. त्यामुळे याबाबत मुंबईकरांच्यावतीने आ.ॲड. आशिष शेलार यांनी आनंद व्यक्त केला.

याबाबत बोलताना मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अ‍ॅड. आशिष शेलार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून अभिनंदन करतो. मुंबईकरांच्यावतीने त्यांना धन्यवाद देतो. मुंबईकरांना आपल्या स्वप्नातलं घर आणि त्याला संरक्षण या दोन गोष्टींची चिंता कायम असते. २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २००० ते २०११ पर्यंत ज्यांच्याकडे झोपडपट्टी पुरावे आहेत. जे २००० ते २०११ पर्यंत वास्तव्याचा दाखला देवू शकतात अश्या मुंबईकरांना झोपडट्टी पुनर्विकास योजनेमध्ये पक्क घर मिळेल याबाबत त्यांनी निर्णय घेतला. त्या घराची किंमत काय असली पाहिजे याबाबत गेल्या अडीच वर्षांत उद्धव ठाकरे यांचं सरकार झोपलं असल्याने निर्णय झाला नाही. त्यावर कोणतीही कार्यवाही केली गेली नाही. मुंबईकरांचे दुःख, समस्या यावर पांघरूण घालण्याचे काम उद्धवजी आणि महाराष्ट्र विकास आघाडीने केले. आता या सगळ्याला वाचा फुटली आणि सर्वसामान्य झोपडपट्टी धारकांना न्याय मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक ‘बेघराला घर’ ही संकल्पना मांडली त्यानुसार आता सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळणार आहे असेही ते म्हणाले.

विद्यार्थ्यांनी प्रदर्शातून केला चमत्कारिक तंत्रज्ञानाचा उलगडा

पुणे- चित्रपटातील व्हीएफएक्स आणि त्यातील व्हिज्युअल इफेक्ट्स या तंत्रज्ञानामुळे बाहुबली, आरआरआर सिनेमांची भुरळ सर्वांनाच पडली आहे. वेगवेगळे ग्राफिक्स आणि व्हीएफएक्स च्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे हे सिनेमे एका उंचीवर गेले आहेत. ऐतिहासिक,पौराणिक,चमत्कारिक किंवा ऍक्शन फिल्म्स,ॲनिमेशन चित्रपटात व्हीएफएक्स वापरले जाते. चित्रपटातच नाही तर हे तंत्रज्ञान जाहिराती, कार्टून, मालिका ई. मध्येही वापरले जाते. हे तंत्रज्ञान कशा पद्धतीने काम करते? यातील चमत्कारिक गोष्टींचा उलगडा पुण्यातील फ्रेमबॉक्स ॲनिमेशन ॲन्ड व्हीएफएक्स इन्स्टिटयूट कोथरूड, या विद्यार्थ्यांनी केला. कोथरूड येथील फ्रेमबॉक्स इन्स्टिटयूटमध्ये गेमिंग आणि 3डी व्हीएफएक्स, या संकल्पनेवर आधारित “स्किलबॉक्स आर्ट” चे प्रदर्शन नुकतेच पुणेकरांना पाहायला मिळाले.

यावेळी फ्रेमबॉक्स कंपनीच्या उपाध्यक्षा विनिता बचानी, कोथरूड शाखेच्या संचालिका संगीता वाघ, संचालक धर्मराज वाघ व संकेत वाघ यावेळी उपस्थित होते.

या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी स्पायडर मॅन, मारिओ, जंगलबुक मोगली साकारला, जंगल आणि जंगलातले प्राणी यांचे हुबेहूब प्रतिबिंब संस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी साकारले होते. त्याचबरोबर डिश पेंटिंग, इलूष्ट्रेशनद्वारे केलेली चित्रकला, स्टाॅपमोशन अगदी मोहकरूपात साकारण्यात आल्या होत्या.

संचालक धर्मराज वाघ म्हणाले की, चित्रपटांना अधिक विश्वासार्ह आणि मनोरंजक बनवण्याचा मार्ग म्हणून सिनेमाच्या सुरुवातीच्या काळापासून व्हिज्युअल इफेक्ट्सचा वापर केला जात आहे. आजचे चित्रपट निर्माते त्यांचा उपयोग केवळ त्यांच्या मनोरंजनासाठीच नव्हे तर शब्दांचा वापर न करता चित्रपटाद्वारे कल्पना आणि संदेश देण्याचे साधन म्हणून करतात. व्हिज्युअल इफेक्ट्स किंवा थोडक्यात व्हीएफएक्स ही एक आभास निर्माण करण्यासाठी चित्रपट निर्मितीमध्ये विविध तंत्रे वापरण्याची कला आहे. या कलेचे प्रशिक्षण फ्रेमबॉक्स इन्स्टिटयूट कोथरूडमध्ये आम्ही गेली १५ वर्षे अविरतपणे करत आहोत.

विनिता बचानी म्हणाल्या की, एखादे दृश्य चित्रित करताना जर ते कॅमेऱ्यात शूट करणे अशक्य असेल, खर्चिक होत असेल किंवा धोकादायक असेल त्यासाठी व्हीएफएक्स हे तंत्रज्ञान वापरतात. मोठे बॉम्बस्फोट, जुन्या काळातील सेट/भविष्यकालीन सेट तयार करण्यासाठी, गाड्यांचे स्टंट दाखवण्यासाठी, सुपर पॉवर दाखवण्यासाठी, विज्ञान कथा, अ‍ॅनिमेशन चित्रपटांसाठी व्हिज्युअल इफेक्टसचाचा मोठा वाटा असतो. भारतीय चित्रपटातील या स्पेशल इफेक्ट्सने हॉलिवूडच्या तंत्रज्ञांनी मागे सारले आहे. भारतातील किंबहुना जगभरात असलेल्या या क्षेत्रातील संधी काय आहेत या संबंधी या प्रदर्शनातून माहिती देण्यात आली.

परिवहन विभागामार्फत शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी ‘फेसलेस’ सुविधा नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

पुणे, दि. २५: जिल्ह्यात परिवहन विभागाच्या फेसलेस सुविधेअंतर्गत २०२२ मध्ये २ लाख ६ हजार ४०२ तर सन २०२३ मध्ये ३० हजार १०३ शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करण्यात आलेल्या आहेत. एक प्रकारे या माध्यमातून ‘शासन आपल्या दारी’ आले आहे. नागरिकांना ऑनलाईनपद्धतीने सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी परिवहन विभागाच्या ११० सेवांपैकी २२ सेवा फेसलेस पद्धतीने सुरु करण्यात आल्या असून नागरिकांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या सुविधेअंतर्गत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सन २०२२ मध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत १ लाख १२ हजार २७८, उप प्रादेशिक परिवहन, पिंपरी चिंचवड कार्यालयामार्फत ७७ हजार ४४१ आणि बारामती कार्यालयामार्फत २०२२ मध्ये १६ हजार ६८३ असे एकूण २ लाख ६ हजार ४०२ तसेच सन २०२३ मध्ये पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत १६ हजार ७७५, उप प्रादेशिक परिवहन, पिंपरी चिंचवड कार्यालयामार्फत १२ हजार ३७४ तर बारामती कार्यालयामार्फत ९५४ असे एकूण ३० हजार १०३ फेसलेस पद्धतीने शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करण्यात आलेल्या आहेत.

परिवहन कार्यालयामार्फत वाहन विषयक व अनुज्ञप्ती विषयक एकूण ११० सेवा नागरिकांना पुरविण्यात येतात. वाहन ४.० व सारथी ४.० या दोन संगणक प्रणाली सन २०१७ पासून कार्यान्वीत आहेत. त्यापैकी २२ सेवा फेसलेस पद्धतीने सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांना वाहन कर, पर्यावरण कर, शुल्क इत्यादी भरण्याकरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने सेवा उपलब्ध असून या कामाकरिता त्यांना कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता नाही.

फेसलेस सुविधा
अर्जदार कार्यालयामध्ये न येता फेसलेस पद्धतीने शिकाऊ अनुज्ञप्ती प्राप्त करुन घेण्याकरिता कार्यपद्धती खालील प्रमाणे आहे. https://parivahan.gov.in या संकेतस्थळावरील सारथी प्रणालीवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. सदर अर्ज सादर करतांना प्रथम नविन शिकाऊ अनुज्ञाप्ती हा पर्याय निवडून सबमिट विथ आधार ऑथेंटिकेशन या कळीवर क्लिक करावे. आपल्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल. सदर ओटीपी संगणकावर टाकावा. त्यापुढील संगणकीय खिडकीवर अर्जदाराची स्वाक्षरी अपलोड करावी.

सदर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शुल्क भरणा करण्यासाठीची खिडकी ओपन होईल, सदर ऑनलाईन शुलक् अदा केल्यानंतर रस्ता सुरक्षे संदर्भातील व्हिडीओची लिंक क्लिक करुन हा व्हिडीओ स्किप न करता संपूर्ण व्हिडीओ पहाणे अनिवार्य आहे. त्यानंतर शिकाऊ अनुज्ञप्तीकरता १५ प्रश्न असलेल्या प्रश्नावली खुली होईल. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ३० सेकंदाचा वेळ असेल. या चाचणीत किमान ९ गुण मिळाल्यास आपणास शिकाऊ अनुज्ञप्ती देण्यात येते, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे ११९७ कोटी जिल्ह्यांना वितरित – सचिव सुमंत भांगे

मुंबई, दि. २५ : संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या दोन्हीही योजनांमधून लाभार्थ्यांना दरमहा वेळेवर अनुदान मिळावे यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत ४४५ कोटी रुपये तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत ७५२ कोटी रुपये असा एकूण ११९७ कोटी रुपयेइतका निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना बुधवार २४ मे २०२३ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून वितरित करण्यात आला असून लाभार्थ्यांना तो तत्काळ वाटप करावा, अशा सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत किमान १८ ते ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु, पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षावरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो.

या योजनेमध्ये दारिद्रयरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१,०००/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. या योजनेखाली पात्र लाभार्थ्यांना रुपये १०००/- दरमहा इतके अर्थसहाय्य दिले जाते. तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून दारिद्रयरेषेखालील यादीच्या कुटुंबात नाव असलेल्या व रु.२१,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या ६५ व ६५ वर्षावरील पात्र लाभार्थ्यास दरमहा रु. १०००/- अर्थसहाय्य देण्यात येते.

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनांचे स्वरुप विचारात घेऊन या पुढील काळात योजनेतील लाभार्थ्यांना तातडीने अर्थसहाय्य वितरित होण्यासाठी आपल्या स्तरावर नियोजन करावे, अशा सूचनाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव श्री. भांगे यांनी दिल्या आहेत.

दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत केंद्राचे विधेयक संमत होऊ देणार नाही – शरद पवार

मुंबई-केंद्र सरकारने दिल्ली सरकारचे अधिकार हिसकावले. केंद्राने एक अध्यादेशही याबाबत काढला. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आम्हाला पाठिंबा मागण्यासाठी आले होते. दिल्लीतील अधिकाऱ्यांवरील नियंत्रणाचे अधिकार आपल्याकडे ठेवण्याबाबत केंद्र सरकार विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मांडणार आहे. ते आम्ही पास होऊ देणार नाही, असे म्हणत त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केले.

दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगबाबत केंद्र सरकारने अध्यादेश आणला आहे. त्याविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विरोधकांची मोट बांधायला सुरुवात केली आहे. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन दिवसांपासून मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही आहेत. केजरीवाल यांनी काल उद्धव ठाकरेंची भेट घेतली, तर आज शरद पवारांना पाठिशी उभे राहण्यासाठी साकडे घातले. उभय नेत्यांत झालेल्या बैठकीनंतर वाय. बी. चव्हाण सभागृहात संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शरद पवार बोलत होते.शरद पवार म्हणाले, सध्या लोकशाहीवर आघात होत आहेत. ही समस्या दिल्लीची नसून पूर्ण देशाची आहे. दिल्लीत केंद्रसरकारकडून त्यांच्यावर अन्याय झाला आहे. यावर समर्थन मागण्यासाठी ते महाराष्ट्रात आले आहेत.

शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी काॅंग्रेसने केजरीवाल यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. सर्वजण एकजुटीने मिळून भाजप आणि केंद्र सरकारच्या धोरणांचा विरोध करू. राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांवर केंद्र सरकारचे कंट्रोल असणारे विधेयक केंद्र सरकार संसद आणि राज्यसभेत ठेवणार आहे, त्याला आपण सर्वांनी विरोध करायला हवा.

केजरीवालांची पवारांकडे धाव:भाजप 3 प्रकारे राज्यातील सरकार पाडते, काम करू देत नाही – अरविंद केजरीवाल

दिल्लीच नाही देशाची समस्या ,केजरीवाल यांना आमचा पाठिंबा– शरद पवार

मुंबई-भाजपप्रणीत केंद्रातील सरकार राज्यातील सरकार पैशांच्या जोरावर तसेच तपास यंत्रणांद्वारे आणि विशेषाधिकाराद्वारे अध्यादेश काढून राज्यातील सरकार पाडते. त्यांच्यावर बंधने आणत असून कामही करू देत नाही असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. यासह दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगबाबत केंद्र सरकारने अध्यादेश आणला आहे. त्याला विरोध करावा असे आवाहनही त्यांनी राष्ट्रवादी का्ॅंग्रेससह भाजप विरोधी पक्षांना केले आहे.अरविंद केजरीवाल म्हणाले, आमचे सर्व सहकारी शरद पवार व त्यांच्या नेत्यांनी भेटण्यासाठी आलो आहोत. २०१५ मध्ये आमचे सरकार बनले होते. केंद्र सरकारने दिल्ली सरकारची अधिकाऱ्यांवरील कंट्रोल करण्याचे सर्व शक्ती हिसकावली. त्यानंतर आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. आमच्यावर अन्याय झाला होता.केजरीवाल यांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आज त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. उभय नेत्यांत झालेल्या बैठकीनंतर वाय. बी. चव्हाण सभागृहात संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगबाबत केंद्र सरकारने अध्यादेश आणला आहे. त्याविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी विरोधकांची मोट बांधायला सुरुवात केली आहे. त्याचसाठी केजरीवाल यांनी काल उद्धव ठाकरेंची भेट घेतली, तर आज शरद पवारांना पाठिशी उभे राहण्यासाठी साकडे घातले. यावेळी त्यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही आहेत.

अरविंद केजरीवाल म्हणाले, भाजपच्या त्या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो तेथे आमच्या बाजूने निर्णय लागला. आठ वर्षांत आम्ही ही लढाई जिंकली. पण आठ दिवसांत केंद्र सरकारने विशेषाधिकाराद्वारे अध्यादेश काढून पुन्हा हा विषय संसदेत नेला आहे. त्यामुळे आमचा अधिकार पुन्हा गमावला गेला. ते आता या मुद्द्याबाबत विधेयक सादर करणार आहेत. ते जेव्हा लोकसभा आणि राज्यसभेत विधेयक ठेवतील तेव्हा ते परित होऊ नये त्याला विरोध व्हावा ही आमची मागणी आहे. हाच विषय घेऊन आम्ही आमच्या सहकारी विरोधकांना भेटत आहोत.अरविंद केजरीवाल म्हणाले, भाजप पैशांच्या जोरावर सरकार पाडून स्वतःचे सरकार स्थापन करते. तसेच इडीसारख्या तपाससंस्थांचा लोकप्रतिनिधींच्या मागे लावून सरकार पाडते, त्याशिवाय अध्यादेश काढून सरकारला तोडण्याचे प्रकार करीत आहेत राज्य सरकारला काम करू दिले जात नाही. हे विषय गंभीर आहे.अरविंद केजरीवाल म्हणाले, आम्ही देशप्रेमींना देशातील राज्य सरकारांना आवाहन करतो की, अशी कृत्य करणाऱ्या भाजपविरोधात एकत्र यावे. शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे आम्हाला सहकार्य लाभेल त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनाही हा संदेश द्यावा. भाजपच्या या विधेयकाला जर आपण पराभूत करू शकलो तर हे लोकसभा निवडणुकीचे सेमीफायनल आपण जिंकलो असे समजता येईल.

शरद पवार म्हणाले, सध्या लोकशाहीवर आघात होत आहेत. ही समस्या दिल्लीची नसून पूर्ण देशाची आहे. दिल्लीत केंद्रसरकारकडून त्यांच्यावर अन्याय झाला आहे. यावर समर्थन मागण्यासाठी ते महाराष्ट्रात आले आहेत.

शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी काॅंग्रेसने केजरीवाल यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. सर्वजण एकजुटीने मिळून भाजप आणि केंद्र सरकारच्या धोरणांचा विरोध करू. राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांवर केंद्र सरकारचे कंट्रोल असणारे विधेयक केंद्र सरकार संसद आणि राज्यसभेत ठेवणार आहे, त्याला आपण सर्वांनी विरोध करायला हवा.

शरद पवार म्हणाले, दिल्ली सरकारच्या अधिकारांवर केंद्र सरकार गदा आणत असून त्यासाठी भाजप सरकार विधेयकही आणणार आहे पण आम्ही ते विधेयक राज्यसभेत पास होऊ देणार नाही. देशातील लोकशाही वाचवण्याची गरज आहे. केंद्र सरकारविरोधात आम्ही लढा उभारणार आहोत. सर्वांनी यासाठी एकत्र यावे हाच विचार आम्हीही करत आहोत.

मॉरिशसमध्ये सावरकरांच्या पुतळ्याचे २८ मे रोजी अनावरण; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राहणार उपस्थित

मुंबई, दि. 25 : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत नेण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु राहावे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजित केले जाते. यावर्षी हे संमेलन, मॉरिशस येथे स्वा.सावरकरांच्या जयंतीनिमित्त 28 मे 2023 रोजी संपन्न होणार आहे. मॉरिशसच्या राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मॉरिशस येथे होणाऱ्या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रूपन आणि उपपंतप्रधान लीलादेवी डुकन लच्छुमन यांची उपस्थिती लाभणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित राहणार असून महाराष्ट्रातून असंख्य सावरकर भक्त या अपूर्व सोहळ्यासाठी मॉरिशसमध्ये दाखल होणार आहेत.महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये रस्ते विकास, पायाभूत सुविधा, गुंतवणूक याबाबत  मंत्री श्री.चव्हाण विविध स्तरांवर भेटीगाठी घेणार असून दोहोंमध्ये परस्पर सहकार्य करण्यावर त्यांचा भर असणार आहे. मॉरिशस म्हणजे चहूबाजूंनी हिंदी महासागराने वेढलेले पाचूचे बेट असून निसर्गाने मुक्त उधळण केलेले पर्यटन स्थळ आहे. सागरी जैव विविधता आणि पारदर्शक स्फटिकासारखे निळेशार पाणी व सुंदर स्वच्छ समुद्रकिनारे अनुभवणे असा सुवर्णयोग जुळून आला आहे.

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना पाणी, आरोग्य, स्वच्छतेच्या सर्व सोयी पुरवा-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे दि.२५: पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. अधिक महिन्यामुळे दरवर्षीपेक्षा एक महिना अगोदर पालखी प्रस्थान होत असल्याने उन्हाचा त्रास वारकऱ्यांना होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

विधान भवन पुणे येथे झालेल्या आषाढी वारी पालखी सोहळा-२०२३ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. दूरदृष्यप्रणालीद्वारे महसूलमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. बैठकीस आमदार दत्तात्रय भरणे, संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पालखी सोहळ्याचे प्रमुख आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पालखी प्रस्थान लवकर होणार असल्याने उन्हाळ्याचा त्रास होऊ शकतो. यासाठी पुरेसा ओआरएसचा साठा, औषधे, पिण्याच्या पाण्याचे अधिकाधिक टँकर ठेवावेत. पाण्याच्या स्रोतांची, पाण्याची वेळोवेळी तपासणी करावी, रुग्णवाहिका वाढवाव्यात. आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व पथके, यंत्रणा सज्ज ठेवाव्यात.

पुणे शहरात महानगरपालिकेने पालखीच्या मार्गावर प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर पाणी, आरोग्य पथक, शौचालयांची व्यवस्था आदींसाठी मंडप (पेंडॉल) टाकण्याचे नियोजन केले आहे. त्याप्रमाणे ग्रामीण भागातही पालखी तळ आणि विसाव्याच्या दरम्यान अशी व्यवस्था करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असेही निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिले.

आळंदी, देहू, सासवड आदी ठिकाणी पालखीप्रस्थानापूर्वी मुक्कामास येणाऱ्या वारकऱ्यांना मूलभूत सोयीसुविधा पुरवाव्यात. पालखीच्या अनुषंगाने पालखी मुक्काम, विसावा आणि मार्गावरील गावांना देण्यात येणारे अनुदान लवकरात लवकर देण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. तोपर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या निधूतून वा जिल्हा परिषदेने निधी देण्याच्या अनुषंगाने पर्याय तपासून कार्यवाही करावी, असेही श्री. पाटील म्हणाले.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी या मोठ्या पालख्यांबरोबरच अन्य सर्व पालख्यांच्या मार्गावरील रस्त्यांचे खड्डे बुजविण्यात यावेत, साईड पट्‌ट्या भराव्यात. रस्त्यांच्या डागडुजीचे प्रस्ताव तात्काळ सादर करून पालखी प्रस्थानापूर्वी सर्व कामे पूर्ण करुन घ्या. हरीत वारी आणि निर्मल वारीसाठी सर्वांचा सहभाग घ्यावा. १० हजार वृक्षलागवडीचे नियोजन करा, असेही पालकमंत्री म्हणाले.

जी-२० परिषदेअंतर्गत ‘डिजिटल इकॉनॉमी’ गटाची बैठक ११ ते १३ जूनदरम्यान पुणे येथे होत असून या कालवधीत पालख्या पुणे येथे मुक्कामी आहेत. यावेळी जी-२० बैठकीसाठी २५ देशांचे प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत. दोन्हींच्या अनुषंगाने पोलीसांकडून काटेकोर सुरक्षा व्यवस्था करण्यात येत असून परदेशी पाहुण्यांना आपल्या वारीच्या समृद्ध परंपरेचे, संस्कृतीचे दर्शन घडविण्याची संधी असल्याचेही मंत्री पाटील म्हणाले.

माहिती संवादासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा-राधाकृष्ण विखे पाटील
पालखीच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागांच्या प्रमुख व संपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधता यावा यासाठी त्यांचे संपर्क क्रमांक असलेली पुस्तिका डिजिटल स्वरुपात ऑनलाईन उपलब्ध करुन द्यावी. भाविकांना कोणत्याही समस्येच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांशी संपर्क साधताना अडचण येऊ नये यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा, अशा सूचना महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.

विभागीय आयुक्त श्री. राव यांनी वारी सोहळ्याबाबत केलेल्या नियोजनाची माहिती दिली. अधिकारी आणि सोहळा प्रमुखांच्या संयुक्त पाहणीत आढळलेल्या त्रुटी दूर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षीपेक्षा टँकर, शौचालयांची संख्या वाढवली असून शौचालयांच्या स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात तयारी अंतिम टप्प्यात
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी पुणे जिल्ह्यात केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली. सासवड येथील कऱ्हा नदीवरील पूलाचे काम झाले असून पोहोच रस्त्याचे काम गतीने सुरू आहे. ५ जूनपूर्वी हे काम पूर्ण होऊन यावर्षी पालखी पुलावरुन जाईल. जेजुरी पालखी तळाच्या विकासाची कामे अंतिम टप्प्यात आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी, संत तुकाराम महाराज पालखी आणि संत सोपान महाराज पालखीसाठी मिळून दररोज २ हजार ७०० शौचालयांची पालखी मुक्कामी उभारणी करण्यात येणार आहे.

दिवे घाटाची चढण झाल्यानंतर भाविकांना त्रास होऊ शकतो हे लक्षात घेऊन झेंडेवाडी घाटात १० खाटांच्या विशेष आंतररुग्ण कक्षाची स्थापना करण्यात येणार असून कार्डियाक रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहे. ‘डायल १०८’ सेवेच्या एकूण ३० आणि १०२ सेवेच्या एकूण ११० रुग्णवाहिका नियुक्त करण्यात आल्या असून दुचाकीवरुन सेवा देण्यासाठी ३९ आरोग्यदूत सुसज्ज ठेवण्यात येणार आहेत. ८७ बाह्यरुग्ण रुग्णवाहिका पथके, ग्रामीण रुग्णालयाची आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची एकूण २४ पालखी मुक्काम औषधोपचार केंद्रे, ३३ औषधोपचार उपकेंद्रे, २ फिरते वैद्यकीय वैद्यकीय पथके अशी १४६ पथके आरोग्य सुविधांसाठी सज्ज करण्यात आली आहेत.

अन्न व औषध प्रशासनातर्फे खाद्य आणि पेय पदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. मोबाईल नेटवर्क अडचणी येऊ नये यासाठी मोबाईल कंपन्यांना अतिरिक्त व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. पालख्यांसाठी संदेशवहनासाठी बिनतारी संदेशवहन यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

आषाढी वारी ॲप
पालखी सोहळ्यामध्ये येणाऱ्या नागरिकांना आवश्यक माहिती व मदत मिळण्यासाठी मोबाईल ॲप तयार करण्यात येत आहे. या ॲपमध्ये पालखी मार्गक्रमण, विसावा व मुक्कामचे ठिकाण, पालखी सोहळ्याचे प्रमुख, वैद्यकीय सेवा, टँकर, गॅसची टाकी मिळण्याचे ठिकाण, रुग्णवाहिका, अग्निशमन, लाईव्ह पंढरपूर दर्शन आदी महत्वाची माहिती पुरविण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यातील नियोजन
सातारचे अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी सातारा जिल्ह्यातील नियोजनाची माहिती दिली. पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणी आवश्यक सुविधा व दुरुस्ती करण्यात येत आहे. पालखी तळांची स्वच्छता व दुरुस्ती करण्यात येत आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात औषधांची सुविधा करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील नियोजन
दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील नियोजनाची माहिती दिली. पालखी आणि रिंगण सोहळ्याच्या नियोजनासाठी २१ आपत्ती व्यवस्थापन केंद्र तयार करण्यात आले आहेत. यशदामार्फत अधिकाऱ्यांना, मंदिर व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पंढरपूर शहरात पुरेशा प्रमाणात शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण ४९ टँकरची व्यवस्था करण्यात आली असून ५१ ठिकाणी पाणी भरण्याची व्यवस्था केली आहे. दर्शन रांगासाठी भाविकांसाठी पत्रा शेड तयार करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पालखी प्रमुखांनी प्रशासनाला सूचना केल्या. त्या सूचनेनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री श्री.पाटील आणि श्री. विखे पाटील यांनी दिले. बैठकीस तिन्ही जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी, पालखी सोहळ्यातील पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते
0000