मुंबई-राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून 72 तास उलटले आहेत. तरीही राज्याचे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस गप्प का?, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.तसेच, राज्यपालांचा राजीनामा घेऊन इथे बदला घ्या बदला, असा जोरदार टोलाही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला.
आज पत्रकार परिषदेत राज्यपाल भगितसिंह कोश्यारी यांनी काल औरंगाबादेत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा चांगलाच समाचार घेत भाजप व शिंदे गटावर जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले, राज्यपालांचे वक्तव्य हे दळभद्री आहे. एवढेच नव्हे तर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली, असे वक्तव्य एका नॅशनल चॅनेलवर केले.
भाजपची हीच भूमिका आहे का?
पुढे संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचा स्वाभिमान वैगरे शब्दच्छल करीत भाजपने शिवसेना फोडली व एक मिंधे सरकार सत्तेवर आणले. छत्रपती शिवाजमहाराजांचा अपमान भाजपचे राज्यपाल आणि राष्ट्रीय प्रवक्ते खुलेआम करीत असताना स्वाभिमानी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गप्प का? भाजपचीदेखील हीच भूमिका आहे का? संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतोय.
राज्यपालांना जोडे मारणार का?
संजय राऊत म्हणाले, राज्यपालांनी यापूर्वीही शिवाजी महाराजांचा तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला आहे. एका वर्षात या राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला चार वेळेस दुखावले आहे. हीच आपली अधिकृत भूमिका आहे का?, हे आता भाजपला सांगावेच लागेल. वीर सावरकरांबद्दल वादग्रस्त बोलल्यास भाजप पेटून उठतो. जोडे मारो आंदोलन करतो. त्याचे स्वागत आहे. मात्र, शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल हे जोडे आता कोणाला मारणार. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांना मारणार की राज्यपालांना मारणार?
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचा स्वाभिमान असणाऱ्यांविषयी असे वक्तव्य आम्ही सहन करू शकत नाही. मोठमोठ्या स्वाभिमानाच्या गप्पा मारत मिंधे गट मविआतून बाजूला झाला. आता या 40 आमदारांचा स्वाभिमान कुठे गेला? एकानेही राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकृतपणे राज्यपालांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा शिवसैनिक जोडे मारो आंदोलन करणार. शिवसैनिकांचे जोडे कसे असतात, हे तेव्हा तुम्हाला कळेल.
संजय राऊत म्हणाले, शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना भाजप पाठीशी घालत असेल तर पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का घेतात? नौदलाला शिवरायांचे बोधचिन्ह का देण्यात आले आहे? शिवरायांचा अपमान सहन करता तर अफझल खान, औरंगजेबाची कबर पाडण्याचे नाटक का करता? वीर सावरकर हे शिवरायांची आरती करत होते. छत्रपती शिवाजी महाराज हे वीर सावरकरांचे प्रेरणास्त्रोत होते. केवळ सत्तेला चिकटून बसण्यासाठी मिंधे गट आता शांत आहे. महाराष्ट्र तुमच्यावर थुंकतोय, अशा शब्दांत राऊतांनी आज टीका केली.