Home Blog Page 1507

११ जून रोजी पुण्यात गांधी दर्शन शिबीराचे आयोजन 

पुणे :
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार, दि. ११ जुन २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी  ६ या वेळेत ‘गांधी दर्शन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोथरूड येथील गांधी भवनच्या दुस-या मजल्यावरील सभागृहात हे शिबीर होणार असून डॉ. राम पुनियानी,डॉ. कुमार सप्तर्षी,युवराज मोहिते हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.’ गांधी और सांप्रदायिक सद्भावना’विषयावर ज्येष्ठ अभ्यासक  डॉ. राम पुनियानी मार्गदर्शन करणार आहेत. ‘सत्याग्रह शास्त्र’ विषयावर डॉ.कुमार सप्तर्षी,तसेच ‘गांधी-आंबेडकर विचारांचा वारसा आणि महत्व’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार  युवराज मोहिते मार्गदर्शन करणार आहेत.’गांधी दर्शन’ विषयावरचे हे तिसरे शिबीर आहे. 

https://forms.gle/7HdWHS2ADp144WkTA  या गुगल फॉर्मवर नावनोंदणी करता येणार आहे.अधिक माहितीसाठी सुदर्शन चखाले (प्रकल्प प्रभारी) – ७८८७६३०६१५,संदीप बर्वे (विश्वस्त सचिव, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी  ) – ९८६०३८७८२७,सचिन पांडुळे (अध्यक्ष, युवक क्रांती दल पुणे शहर) – ९०९६३१३०२२ यांच्याशी संपर्क साधता येईल.शिबिरासाठी शंभर रुपये नोंदणी शुल्क आहे. त्यात शिबिरस्थळी नाश्ता,चहा आणि भोजनाचा समावेश आहे.  

देहू ते पंढरपूर वारीमध्ये‘आनंदडोह – आनंदवारी’ संपन्न होणार!

पुणे-देहूहून पंढरपूरला जाणाऱ्या वारी सोबत यंदा जगद्गुरू संत तुकारामांचे जीवन एकपात्री प्रयोगातून सादर करण्याचा अनोखा ‘आनंदडोह – आनंदवारी’ उपक्रम यंदा आयोजित करण्यात आला आहे. अभिनेते योगेश सोमण यांच्या सुमारे पावणेदोन तासांच्या या कार्यक्रमाचे आयोजन संवाद – पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीयसेवा योजनेचे विद्यार्थी आणि राज्यच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने संपन्न होत आहे. याकामी निकिता मोघे, हरी चिकणे आणि मंदार चिकणे यांचा सहभाग लाभत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवार दि. ९ जून रोजी सायं. ५.०० वाजता श्री क्षेत्र देहू येथील सुजन फाउंडेशनचे अभंग इंग्लिश मीडियम स्कूलमधील गाथा मंदिर येथे भव्यतेने संपन्न होईल. याचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील करतील. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. याप्रसंगी देहू संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी प्रमुख सर्व श्री संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे आणि अनिल महाराज मोरे, निमंत्रक प्राध्यापक विकास कंद, राष्ट्रसेवा योजनेचे सल्लागार समिती सदस्य राजेश पांडे, राष्ट्रसेवा योजनेचे संचालक प्राध्यापक डॉ. सदानंद भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील अशी माहिती संयोजक संवाद – पुणेचे अध्यक्ष सुनिल महाजन आणि राष्ट्रसेवा योजनेचे सल्लागार राजेश पांडे यांनी दिली.

या ‘आनंदडोह – आनंदवारी’ कार्यक्रमात अभिनेते योगेश सोमण संत तुकारामांच्या वेशभूषेत संत तुकारामांच्या जिवनाचे अर्थ विविध प्रसंगाचे निरुपण करून सादर करतील. अतिशय ओघवत्या भाषेत सादर होणारा हा कार्यक्रम पावणेदोन तासांचा आहे. देहू, पुणे, लोणी, सासवड, वरवंड, इंदापूर, अकलूज, वेळापूर, वाडी पुरवली आणि पंढरपूर या पालखीच्या मुक्कामाच्या गावांमध्ये तेथील महाविद्यालयांच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न होईल. यासाठीचे स्थानिक व्यवस्थापन या सर्व गावांमधील महाविद्यालयाचे प्राचार्य करणार आहेत. या ‘आनंदडोह’ कार्यक्रमात संत तुकारामांचे विचार अतिशय ओघवत्या भाषेत मांडले आहेत. या बरोबरच त्यांच्या संपूर्ण जीवनाचा वेधही अत्यंत प्रासादिक भाषेत घेण्यात आला आहे. याचे लेखन श्री. योगेश्वर, दिग्दर्शन श्री. आनंद स्वरूप, संगीत केदार दिवेकर, रंगमंच व्यवस्था धवल पाठक, अक्षय पाटणकर आणि सादरकर्ते अभिनेते योगेश सोमण आहेत.

या ‘आनंदडोह’ कार्यक्रमाच्या मार्गावरील ठिकठिकाणच्या गावांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे २०० महाविद्यालयीन विद्यार्थी व्यवस्थापनाची धुरा सांभाळतील व तसेच संपूर्ण देहू ते पंढरपूर या वारी प्रवासात हे विद्यार्थी सोबत असतील. या अनोख्या कार्यक्रमाची माहिती देहू पासून पंढरपूरपर्यंतच्या मार्गावरील सर्व गावांमध्ये देण्यात आलेली असून वारकरी व प्रेक्षक या सर्वांना हा कार्यक्रम विनामुल्य असेल. गावोगावी या कार्यक्रमाची उत्सुकता वारकरी व गावकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.

भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला क्षण म्हणजे … ‘६ जून १६७४’.

छत्रपतींच्या कार्यकर्तृत्वाची असामान्य गाथा सिंहासनाधिश्वर रुपेरी पडद्यावर

छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला शिवराज्याभिषेक सोहळा…

शिवराज्याभिषेक म्हणजे  पारतंत्र्याच्या जोखडातून रयतेला मुक्त करीत, अभिमानाने स्वातंत्र्याचा श्वास घेण्याची संधी मिळाली तो क्षण… माझ्या राजासारखा राज्यकर्ता असावा हे अभिमानाने, छाती फुगवून जगाला ओरडून सांगण्याचा क्षण…  भारतीयांनाच नव्हे तर सर्व जगाला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली तो क्षण… प्रतिकूल परिस्थितीतही आपण शत्रूशी सामना करु शकतो ही जिद्द निर्माण करणारा क्षण…  

शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले, राज्याभिषेक करवून घेतला, अखंड हिंदुस्थानाला राजा मिळाला या प्रेरणादायी इतिहासामुळेच पुढे कित्येक वर्षे राजा नसतानाही रयतेने धैर्याने संकटाचा मुकाबला केला. आताच्या शतकातही कित्येकांच्या आयुष्यात उमेद निर्माण करणाऱ्या या सुवर्णक्षणाला यावर्षी ३५० वर्षे  पूर्ण होत आहेत. या वर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला तिथी प्रमाणे २ जून २०२३ रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात शिवाजी महाराजांच्या दरबारात, राजसदरेवर शकील प्रॉडक्शन्स निर्मित सिंहासनाधिश्वर या भव्य मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली सोबत चित्रपटाच्या दिमाखदार पोस्टरचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित निर्माते श्री.शकील खान यांची निर्मिती असलेला आणि श्री.विजय राणे दिग्दर्शित करीत असलेला सिंहासनाधिश्वर हा चित्रपट जून २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. याप्रसंगी श्री.नितीन पावले, कार्याध्यक्ष – शिवराज्याभिषेक सोहळा,  श्री.सुनील पवार, अध्यक्ष – श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड आणि पदाधिकारी उपस्थित होते.  

शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमाची आठवण आपापल्या स्वार्थासाठी, सोयीनुसार सगळ्यांनीच केली परंतु महाराजांनी रयतेसाठी केलेल्या कार्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंगातून आताच्या पिढीने नेमके काय घ्यावे हे मांडण्याचा प्रयत्न निर्माता आणि दिग्दर्शक सिंहासनाधिश्वर चित्रपटातून करणार आहेत. ३५० वर्षांपूर्वीचा महाराजांचा भव्यदिव्य शिवराज्याभिषेक सोहळाही या चित्रपटात  पहायला मिळणार आहे. 

हिंदी चित्रपट, अनेक मालिका आणि शॉर्ट फिल्म्सच्या निर्मितीनंतर शकील खान यांनी ‘सिंहासनाधिश्वर या मराठी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. ‘राजा शिवछत्रपती’, ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’, अशा वेगवेगळ्या मालिका देव अवतारी बाळूमामा, पॉवर, रुदन यांसारखे चित्रपट आणि असंख्य इव्हेंटच्या माध्यमातून विजय राणे यांनी आपली दिग्दर्शकीय चुणूक दाखविली असून आगामी सिंहासनाधिश्वर या भव्य चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाची असामान्य गाथा रसिकांना पहायला मिळणार आहे.  

कोथरूड येथील ‘शासन आपल्या दारी’ मेळाव्यात १ हजार ३८१ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधान-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, दि.५: शासन आपल्या दारी’ उपक्रमामुळे नागरिकांना विविध योजना आणि सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळत असल्याने त्यांचा त्रास कमी होऊन त्यांच्या मनात समाधानाची भावना आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

कोथरूड येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार किरण सुरवसे, गटविकास अधिकारी भूषण जोशी, किरण दगडे पाटील, अपर्णा वरपे, पुनीत जोशी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचून अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रम, रोजगाराची माहिती मेळाव्याच्या माध्यमातून देण्यात येत आहे. अशा शिबिरांमुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचतो, त्यांना होणारा त्रास कमी होतो. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधान आहे. तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे कामकाज पारदर्शक आणि गतिमान झाले आहे. शासनाने जनहिताचे अनेक महत्वाचे निर्णय घेतल्याने सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्री.आसवले यांनी मेळाव्याविषयी माहिती दिली. महाराष्ट्र शासनाचा हा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून एकाच छताखाली शासनाच्या सर्व सेवा व योजनांचा लाभ देण्यात येत आहे. आतापर्यंत हवेली उपविभागांतर्गत ७३ हजार दाखले वितरित करण्यात आले आहे. येत्या काळात हवेली तालुका ई-चावडी योजनेअंतर्गत आणण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात विविध सेवा आणि लाभाचे वितरण करण्यात आले.
१ हजार ३८१ लाभांचे वितरण:
मेळाव्यात एकात्मिक बालविकास प्रकल्प (नागरी) यांच्याकडील १५, कृषि विभाग- १८, ग्रामविकास- २१, अन्न धान्य वितरण (रेशनिंग)- ३००, संजय गांधी निराधार योजना, राज्य परिवहन मंडळ, पुणे मनपा समाजकल्याण विभाग यांचे प्रत्येकी ३४, पंचायत समिती- २०, पुणे मनपा आरोग्य विभाग-२३, महिला व बालकल्याण- ४३, मतदार नोंदणी अधिकारी- ३५, महावितरण- ७, पुणे मनपा- १० याप्रमाणेच उत्पन्न दाखले- ५५२, अधिवास प्रमाणपत्र-८० आणि आधारकार्ड- १८५ अशा एकूण १ हजार ३८१ विविध सेवा आणि योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले.

भीती नका दाखवू ..न्यायासाठी १० सेकंदात नौकरीदेखील सोडू

नवी दिल्ली- आमच्या मेडल्स ला १५/ १५ रुपयांचे म्हणवून हिणवणारे आता आमच्या नौकरीच्या मागे लागले आहेत पण आम्ही न्यायासाठी जीवनच पणाला लावले तिथे नौकरी काय ? ती १० सेकंदात सोडू , भीती दाखवणे सोडा असा स्पष्ट इशारा आंदोलक कुस्तीपटू नी दिला आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी असलेले कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी रेल्वेतील नोकरी सोडण्याची धमकी दिली आहे. जर नोकरी न्यायाच्या मार्गात अडथळा ठरत असेल तर ती सोडायला आम्हाला 10 सेकंदही लागणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. नोकरीची भीती दाखवू नका.

साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट सोमवारी त्यांच्या नोकरीवर परतले. तिघेही रेल्वेत काम करतात. तिघेही आजच ड्युटीवर रुजू झाले आहेत ड्युटीवर परतल्यानंतर बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणार्‍या अल्पवयीन कुस्तीपटूने जबाब बदलला आहे. दाव्यानुसार, अल्पवयीन मुलीने दिल्लीच्या कॅनॉट प्लेस पोलिस स्टेशनमध्ये जबाब दिला आहे. यानंतर तिला पटियाला हाऊस कोर्टात नेण्यात आले, तिथे तिने जबाब मागे घेतला. या तिन्ही पैलवानांनीही आंदोलनातून आपली नावे मागे घेतली आहेत.

रोजगारासाठी उपलब्ध संधींचा लाभ घ्या- पालकमंत्री

पुणे, दि. ५: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात आयोजित महारोजगार मेळाव्यास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट दिली. रोजगारासाठी नवनवीन क्षेत्र उपलब्ध असून तरुणांनी मेळाव्याच्या माध्यमातून त्यांची माहिती करून घ्यावी आणि या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला आमदार सुनिल कांबळे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, महेश पुंडे उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, वर्षानुवर्षे पदवी शिक्षण म्हणजेच करिअरची सुरुवात अशी धारणा आहे. परंतु विविध प्रकारची कौशल्ये आत्मसात करण्यासाठी कमी कालावधीचे व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यातूनही युवकांना स्वत:चा विकास साधता येईल. पारंपरिक प्रशिक्षणाशिवायही अनेक नवनवीन क्षेत्र उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.पाटील म्हणाले. राज्य शासनाच्यावतीने २८८ मतदार संघात ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यात येत आहे. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघात करिअर मार्गदर्शन शिबीर व रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. लोकप्रतिनिधींनी शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले, यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाचे ७५ हजार नागरिकांना नोकरी देण्याचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र शासनाने परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याकरता दरवर्षी ३० लाख रुपये शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. पाच वर्षामध्ये दीड कोटी रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. युपीएससीच्या तयारी राज्य शासनामार्फत दिल्ली येथे शिक्षणाची व राहण्याची सोय करण्यात येते. एमपीएससीसाठी गरीब मुलांचे शुल्क शासन माफ करते. तरुणांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध झालेल्या तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

महारोजगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधी, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000

पथारीचे लायसन,अथवा स्टॉल भाड्याने देणाऱ्यांना माधव जगतापांचा दणका , ३०० परवाने रद्द करणार

पुणे : स्टॉल, पथारी यांचे परवाने महापालिकेकडून मिळवून स्वतः व्यवसाय न करता याच परवान्यावर इतरांना व्यवसाय करण्यास मुभा देऊन त्यापोटी त्यांच्याकडून दरमहा भाड्याच्या नावाने वसुली करणाऱ्या ३०० जणांना आता अतिक्रमण निर्मुलन खात्याचे प्रमुख माधव जगताप दणका देणार आहेत.पाठरेचे परवाने इतरांना भाड्याने देण्याचा धंदा करणारे हे बहुधा राजकीय कार्यकर्ते असल्याने हा विषय पुन्हा वादाचा ठरू शकणार आहे.

नियमांचे उल्लंघन करून भाडेकरू ठेवणाऱ्या पथारी व्यावसायिकांविरोधात महापालिका प्रशासनाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत ३०० पथारी व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. येत्या काही दिवसांत ही मोहीम तीव्र करण्यात येणार आहे.महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून अधिकृत फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांना वार्षिक शुल्क भरून प्रमाणपत्र दिले जाते. ज्या व्यक्तीच्या नावावर प्रमाणपत्र आहे आणि ज्या व्यावसायासाठी प्रमाणपत्र दिले आहे, त्या व्यक्तीने तोच व्यावसाय करणे तरतूदीनुसार बंधनकारक आहे. मात्र, अनेक पथारी व्यावसायिकांनी नियमांचे उल्लंघन करत भाडेकरू ठेवल्याच्या तक्रारी अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे सातत्याने करण्यात आल्या होत्या.

भाडेकरू ठेवल्यास नियमांचे भंग केल्याप्रकरणी पहिल्या वेळी एक हजार रुपये दंड, दुसऱ्या वेळी पाच हजार रुपये दंड आकारण्यात येतो. त्यानंतरही भाडेकरू ठेवल्यास प्रमाणपत्र रद्द करण्याची तरतूद आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत व्यावसायिक आणि त्याच्याकडील प्रमाणपत्र तपासण्यात आले. त्यानुसार पोटभाडेकरू ठेवणाऱ्या ३०० व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात आले. यापुढे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी सातत्याने प्रमाणपत्राची पाहणी करणार आहेत, असे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ५ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना हस्तांतरीत

पुणे, दि.५ : पोलीस प्रत्येक गुन्ह्यांचा तपास गांभीर्याने आणि परिश्रमपूर्वक करतात. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांसोबत असणे, त्यांना सहकार्य करणे आणि प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पुणे शहर पोलीस मुख्यालय मैदान येथे पुणे शहर पोलीस दलातर्फे आयोजित मुद्देमाल हस्तांतरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, रामनाथ पोकळे, प्रविणकुमार पाटील आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम अभिनव असून त्याद्वारे मुद्देमाल मिळालेल्यांना समाधान मिळते आणि जनतेत पोलिसांविषयी चांगला संदेश जातो, विश्वासाची भावना निर्माण होते. त्यासोबत चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनही मिळते.

एखादा गुन्हा घडू नये म्हणून प्रयत्न करण्यासोबत झालेल्या गुन्ह्यांचा शोध लावून गुन्हेगाराला शिक्षा झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचे वातावरण निर्माण होते. गुन्ह्याच्या मागे एकप्रकारचे मानसशास्त्र असते. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना खूप परिश्रम करावे लागतात. त्यामुळे चांगली कामगिरी करणारे पोलीस अधिकारी अभिनंदनाला पात्र आहेत.

अलीकडच्या काळात गुन्हेगार अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहेत. त्या तुलनेत पोलीस अत्यंत मर्यादित साधनांसह आपले काम चांगल्याप्रकारे करतात. पोलिसांना अद्ययावत शास्त्र, साधने उपलब्ध करून देण्यासाठी आणि पोलीस वसाहतीच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समिती आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रास्ताविकात पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, गुन्हे उघडकीस आल्यावर मुद्देमाल हस्तगत करणे कठीण असते. पोलीस अधिकारी परिश्रमपूर्वक हे काम करतात आणि कायदेशीर बाबी पूर्ण करून मुद्देमाल फिर्यादींना हस्तांतरित केला जातो. असा सुमारे ५ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल कार्यक्रमात हस्तांतरित करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते ५८ नागरिकांना मुद्देमाल हस्तांतरित करण्यात आला आणि चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पालकमंत्र्यांनी स्वतः भेटवस्तू देऊन या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
0000

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतले ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

मुंबई, दि. ५ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभादेवी येथील निवासस्थानी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी आमदार सदा सरवणकर, अभिनेते सचिन पिळगावकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “सुलोचनादीदींचे निधन ही अत्यंत दुःखद, रसिकांच्या मनाला चटका लावणारी घटना आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टी पोरकी झाली आहे. त्या चित्रपटसृष्टीतल्या मूर्तिमंत वात्सल्य होत्या. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला. विशेषकरून त्यांनी साकारलेली ‘आई’ ची भूमिका ठसा उमटवणारी ठरली. ज्येष्ठ अभिनेते देवानंद, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्या सारख्या दिग्गज कलावंतांसोबत त्यांनी चित्रपटांत काम केले. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मायेची पखरण करणाऱ्या वात्सल्यमूर्ती हरपल्या. त्यांच्या जाण्याने प्रत्येकालाच वाटते की आपल्यातलेच कुणी गेले आहे. इतका प्रेम, जिव्हाळा त्यांनी निर्माण केला आहे”, या शब्दांत राज्य शासनाच्यावतीने सुलोचनादीदींना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

सुलोचनादीदींची कारकीर्द अनेकांना प्रेरणादायी ठरेल– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये काही नावे अशी आहेत. ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे ती अजरामर आहेत. चित्रपटसृष्टीत त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. यातीलच एक नाव सुलोचनादीदींचे आहे. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी नायिकेच्या भूमिका साकारल्या. नंतर आईच्या भूमिका साकारल्या, त्या अत्याधिक लोकप्रिय झाल्या. माझ्या पिढीने त्यांना आईच्या रुपात बघितले आहे. अतिशय सोज्वळ आणि ममत्त्व वाटावे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. सुलोचनादीदींची कारकीर्द अतिशय थक्क करणारी आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. या पुरस्कारांपेक्षाही त्यांचे कार्य मोठे होते. त्यांनी गाजवलेली कारकीर्द अनेकांना प्रेरणादायी ठरेल”, अशा शब्दात श्री. फडणवीस यांनी विनम्र श्रद्धाजली अर्पण केली.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सुलोचनादीदींच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

महावितरणच्या ग्राहकसेवा, विविध योजनांची माहिती देणाऱ्या सौर रथयात्रेला प्रारंभ

पुणे, दि. ०५ जून २०२३: महावितरणच्या प्रामुख्याने छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प, मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनसह विविध योजना व ग्राहकसेवांची माहिती देणाऱ्या पाच दिवसीय सौर रथयात्रेचा सोमवारी (दि. ५) मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते प्रारंभ झाला. या सौर रथयात्रेद्वारे येत्या ९ जूनपर्यंत पुणे परिमंडल अंतर्गत सर्वच ४१ उपविभाग कार्यालयांच्या क्षेत्रात वीजग्राहकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.

महावितरणचा दि. ६ जूनला १८ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त पुणे परिमंडलाकडून दि. ५ ते ९ जूनपर्यंत विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये आज पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सौर रथयात्रेला प्रारंभ झाला. रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी झेंडा दाखवून या यात्रेचा शुभारंभ केला. यावेळी अधीक्षक अभियंता सर्वश्री अरविंद बुलबुले, युवराज जरग, संजीव राठोड तसेच ‘मास्मा’चे अध्यक्ष रोहन उपासनी, सचिव स्वप्नील बाथे, प्रदीप कुलकर्णी, संजय कुलकर्णी, समीर गांधी, योगेश गोसावी, सुनील मुसळे, श्रीधर भामधिपती यांच्यासह महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महावितरण व महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशनचे यांच्या सहकार्याने छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.०, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन तसेच महावितरणच्या विविध ग्राहकसेवा, वीजबचतीचे उपाय, वीजसुरक्षा आदींबाबत जनजागृती करण्यात येणार आहे तसेच माहितीपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. पुणे परिमंडलातील शहरी व ग्रामीण भागातील सर्वच ४१ उपविभागांमध्ये हा रथ जाणार आहे. या यात्रेचे समन्वयक म्हणून उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटनी काम पाहत आहे.

पर्यावरण दिनानिमित्त इ-बाईक रॅली- महावितरण व ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनच्या वतीने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रास्तापेठ येथून गणेशखिंडपर्यंत इ-बाईक रॅली काढण्यात आली. अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलेबुले यांच्यासह या रॅलीमध्ये ४५ जण इ-बाइकसह सहभागी झाले होते. मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेशखिंड येथे रॅलीचा समारोप झाला. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले व श्री. संजीव राठोड, कार्यकारी अभियंता भागवत थेटे, संजय वाघमारे तसेच एनर्जी असोसिएशनचे विवेक सुतार, मुकुंद कमलाकर, अनुराधा ठाकूर, संतोष सुराणा आदींसह अभियंता, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

सुदर्शन मित्र मंडळातर्फे पुनीत बालन यांचा विशेष सन्मान

कोविड काळात आणि त्यानंतरही गणेशोत्सव मंडळांना दिलेल्या पाठबळाबद्दल कृतज्ञता

पुणे : कोविडच्या संकटामुळे कोणतेही उत्सव आर्थिक पाठबळ नसल्याने उत्साहाने साजरे झाले नाहीत. गणेशोत्सव हा केवळ पुण्याचा नव्हे, तर महाराष्ट्राचा मानबिंदू. मात्र, कोविड संकटामुळे गणेशोत्सव मंडळांनाही आर्थिक पाठबळ न मिळाल्याने कार्यकर्ते हतबल झाले होते. अशा परिस्थितीत व त्यानंतरही गणेशोत्सव मंडळांना दिलेल्या पाठबळाबद्दल उद्योजक पुनीत बालन यांचा विशेष सन्मान फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील सुदर्शन मित्र मंडळातर्फे करण्यात आला. यावेळी डॉ.शैलेश गुजर, सुदर्शन मित्र मंडळाचे अध्यक्ष शाम मारणे,  विनोद चव्हाण, प्रमोद पवार, रुपेश कापडे, योगेश धुमाळ, प्रमोद चव्हाण ,सतीश पिल्ले यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. पुणेरी पगडी, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे सन्मानाचे स्वरूप होते.
डॉ. शैलेश गुजर म्हणाले, पुण्याच्या गणेशोत्सवाला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. अखंडितपणे अत्यंत उत्साहात हा उत्सव दरवर्षी केला जातो. मात्र कोविडच्या काळात याला काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या. त्यावेळी विघ्नहर्त्याप्रमाणे पुनीत बालन यांनी गणेश मंडळांना मदतीचा हात दिला. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला. शाम मारणे म्हणाले, कोविड काळात आणि त्यानंतरही गणेशोत्सव मंडळांना मिळणा-या वर्गणी व देणगीचा ओघ अत्यंत कमी झाला होता. त्यामुळे सण-उत्सव साजरे करणे, सामाजिक उपक्रम राबविणे जवळपास बंद झाले. अशा वेळी आॅक्सिरिच आणि पुनीत बालन यांनी मदतीचा हात दिल्याने श्री गणेशाची विधीवत स्थापना, सजावट, मिरवणुका काढणे शक्य झाले. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक क्षेत्रात म्हणजेच गणेशोत्सवाप्रती दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

२० लाखांवर वीजग्राहकांचा ५६५ कोटींचा भरणा,‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यात पुणेकरांची भरारी

पुणे, दि. ०५ जून २०२३: महावितरणच्या पुणे परिमंडलातील वीजग्राहकांनी ‘ऑनलाइन’ भरणा करण्यामध्ये राज्यात आघाडी कायम ठेवली आहे. गेल्या मे महिन्यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिकसह इतर २० लाख १५ हजार लघुदाब वीजग्राहकांनी रांगेत उभे न राहता व सुरक्षितपणे ५६४ कोटी ९९ लाख रुपयांचा ‘ऑनलाइन’द्वारे भरणा केला आहे.

पुणे परिमंडलामध्ये गेल्या एप्रिल ते सप्टेंबर २०२२पर्यंत लघुदाब वर्गवारीतील सरासरी १७ लाख ४१ हजार ८६० वीजग्राहक दरमहा ‘ऑनलाइन’ वीजबिल भरणा करीत होते. ही संख्या ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२पर्यंत १८ लाख ६४ हजार ८२० वर गेली. त्यानंतर जानेवारी ते मे २०२३ पर्यंत सरासरी दरमहा ग्राहकांची संख्या २० लाख २१ हजार १३० वर गेली आहे. ‘ऑनलाइन’ बिल भरण्यास पुणे परिमंडलामध्ये वीजग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि दरमहा सरासरी १ लाख ५६ हजार ३३० वीजग्राहकांची गेल्या ५ महिन्यांमध्ये वाढ झाली आहे.

गेल्या मे महिन्यात पुणे शहरातील ११ लाख ३० हजार २२५ लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांनी ३१२ कोटी ८७ लाख रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. यामध्ये महावितरणच्या बंडगार्डन विभागातील सर्वाधिक १ लाख ९१ हजार ९१३ ग्राहकांचा समावेश आहे. उर्वरित शिवाजीनगर, कोथरूड, नगररोड, पद्मावती, पर्वती व रास्तापेठ विभागांमध्ये सरासरी १ लाख ५६ हजार ३८५ वीजग्राहकांनी ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यास पसंती दिली आहे.

तसेच पिंपरी चिंचवड शहरामध्ये मे महिन्यात लघुदाब ५ लाख २८ हजार ६४ ग्राहकांनी १४९ कोटी १० लाखांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. पुणे परिमंडलामध्ये ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यात पिंपरी चिंचवड शहर आघाडीवर आहे. गेल्या महिन्यात या शहर अंतर्गत पिंपरी विभागातील ३ लाख ८ हजार ११६ तर भोसरी विभागातील २ लाख १९ हजार ९४८ ग्राहकांनी ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. पुणे ग्रामीणमध्ये रांगेत उभे न राहता ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यास प्रतिसाद वाढला आहे. यात गेल्या महिन्यात आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यातील ३ लाख ५६ हजार ९४५ ग्राहकांनी १०३ कोटी २ लाख रुपयांचा सुरक्षितपणे भरणा केला आहे.

महावितरणकडून प्रामुख्याने बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहण्याऐवजी किंवा कार्यालयीन वेळेतच वीजबिल भरण्याऐवजी ‘ऑनलाइन’द्वारे घरबसल्या व २४ तास वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यासाठी घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक व इतर लघुदाब ग्राहकांना www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅप उपलब्ध आहे. त्यामुळे एकाच नोंदणीकृत खात्यातून स्वतःच्या एकापेक्षा अधिक कुठल्याही वीजजोडण्यांचे बिल ‘ऑनलाइन’ भरणे तसेच सर्व वीजजोडण्यांच्या वर्षभरातील मासिक बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती संगणकात किंवा मोबाईलमध्ये जतन करण्याची सोय उपलब्ध आहे.   

लघुदाब वीजग्राहकांनी क्रेडिट/डेबीट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकींग, मोबाईल वॉलेटदवारे ‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. तसेच क्रेडिट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्यांयाद्वारे ‘ऑनलाइन’द्वारे होणारा बिल भरणा आता नि:शुल्क आहे. विशेष म्हणजे ‘ऑनलाइन’ वीजबिल भरणा केल्यानंतर लगेचच संबंधीत ग्राहकांना मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे पोच देण्यात येत आहे.

मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार – पुणे परिमंडलातील वीजग्राहकांची ‘गो-ग्रीन’ योजनेत व ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यात राज्यामध्ये आघाडी कायम आहे. ‘गो-ग्रीन’मध्ये इमेलद्वारे प्राप्त झालेले वीजबिल तसेच ‘ऑनलाइन’ भरणा केलेली पावती मोबाईल किंवा संगणकात जतन करून ठेवता येते व कधीही प्रिंट काढता येते. त्यामुळे जास्तीत जास्त वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेला व ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यास प्रतिसाद द्यावा.

शिवसेनेच्या वर्धापन दिनी म्हणजेच 19 जूनपूर्वी राज्य मंत्रिमंडळ विस्तार करावा अमित शहांकडे एकनाथ शिंदेंचा आग्रह

शिवसेनेच्या वर्धापन दिनी म्हणजेच 19 जून पूर्वी राज्य मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर धरला आहे. त्यामुळे आता 19 जून पूर्वी किंवा 19 जून याच दिवशी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, राज्यातील शिवसेनेच्या एकूण आमदारंपैकी नाराज असलेल्या आमदार संख्या पाहता मंत्रिमंडळ विस्तारानंतरही शिवसेनेत पुन्हा एकदा फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शंदे यांनी म्हटले पुढील निवडणुका आम्ही भाजपा समवेत एकत्र लढणार

कृषि, सहकारसहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री श्री. शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली. राज्यात आगामी सर्व निवडणूका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार….असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे

दरम्यान राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच्यानंतर मात्र, शिवसेनेचे अनेक आमदार नाराज होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद न मिळाल्यामुळे काही आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. या वेळी तर आम्हाला संधी मिळेल, अशी अपेक्षा असणारे शिवसेनेत अनेक आमदार आहेत. त्यामुळे या वेळी मंत्रिमंडळ विस्तारानंतर होणाऱ्या घटना – घडामोंडीकडे लक्ष्य द्यावे लागणार आहे.

छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाठ यांनी शिंदे यांच्या बंडाच्या काळात प्रमुख भूमिका निभवली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर संजय शिरसाट यांचे मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र तरी देखील शिरसाट यांना डावलण्यात आले. आता मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या ते मंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.असे असले तरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या 3 मंत्री आहेत. त्यामुळे एकाच जिल्ह्याला एवढी मंत्रिपदे मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे एकतर आधीच्या मंत्र्याला डच्चू मिळून संजय शिरसाट यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. किंवा त्यांना या वेळी देखील हुलकावणी मिळू शकते.जळगाव जिल्ह्यामध्ये गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील आणि आमदार किशोर पाटील यांच्यासह एक महिला मंत्री म्हणून लता सोनवणे यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात महिलांना संधी दिली जाण्याची शक्यता असल्यामुळे लता सोनवणे यांचा दावा प्रबळ मानला जात आहे.शिरोळचे आमदार आणि माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष असूनही शिवसेनेकडून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते. तरीदेखील त्यांनी बंड करत एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. त्यामुळे राजेंद्र पाटील हे देखील मंत्रीपदाचे कट्टर दावेदार मानले जात आहे.

शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. ५ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात  वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने भारतीय टपाल  विभागाच्या सहकार्याने एक टपाल  तिकीट  काढण्याचा निर्णय घेतला आहे.  येत्या मंगळवारी,6 जून रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथील दरबार हॉलमध्ये  समारंभपूर्वक या  तिकिटाचे अनावरण होणार आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री  सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे,  सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, राज्यपालांचे सचिव संतोषकुमार  प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

‘छत्रपती शिवाजी महाराज‘ हा शब्द चेतनेचा संचार करणारा प्रेरणामंत्र आहे. कित्येक राष्ट्रनायकांना लढण्याची आणि विजयाची प्रेरणा देणारे अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असून त्यांचा विचार जगभरात  जनाजनांत आणि मनामनांत पोहोचविण्याचा दृढ निश्चय राज्य शासनाने केला आहे. याचाच एक भाग म्हणून  महाराजांवरील पोस्ट तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

शिवराज्याभिषेकाचे महत्व अधिक ठळकपणे अधोरेखित करण्याचा राज्य शासनाचा विचार असून राजमाता माँ जिजाऊ यांची यामागील भावना, संकल्पना लोकांपर्यंत पोहोचण्याचा यामागील उद्देश आहे. महाराजांच्या काळांतील नाणी, गडकिल्ले, अष्टप्रधान मंडळ प्रत्येक गोष्ट ही प्रेरणादायी आहे; या प्रेरक गोष्टी सर्वांपर्यंत सहजपणे पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

शिववंदना कार्यक्रमाचे आयोजन

टपाल तिकीट अनावरणानंतर सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने ‘शिववंदना’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अहमदनगरच्या संदलमध्ये औरंगजेबाचे पोस्टर,फडणवीस म्हणाले या कृत्याला माफी नाही

0

अहमदनगर-सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो घेऊन एक तरुण नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ अहमदनगरचा असून संदल मिरवणूक काढण्यात आलेली असताना औरंगजेबाचे पोस्टर्स झळकवत काही युवकांनी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप होत आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकारची भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, औरंगजेबाचे फोटो जर कोणी झळकवत असेल तर ते इथे मान्य केले जाणार नाही. या देशात, या महाराष्ट्रात आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहेत. कोणीही औरंग्याचे नाव घेत असेल तर त्याला माफी मिळणार नाही.

अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी होळकरनगर करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. मात्र, त्यामुळेच अहमदनगरचे वातावरण खराब करण्यासाठीच अशा प्रकारे औरंगजेबाचे फोटो झळकवले जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

औरंगाबादच्या पोस्टच्या माध्यमातून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून यातून दंगली घडवण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. याप्रकरणी तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याची मागणी देखील शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

अहमदनगर येथील उरूस मिरवणुकीत औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्या चार जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या चौघांचा शोधदेखील पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये शहरातील फकीरवाडा परिसरात दमबारा हजारी दर्ग्याचा सदंल उरुस साजरा करत असताना काही तरुण डीजेच्या तालावर नाचत औरंगजेबाचे फोटो हातात घेऊन बाप तो बाप होता है, बेटा तो बेटा होता है, अशा घोषणा देऊन दोन समाजात जातीय तेढ निर्माण होऊन द्वेष पसरेल असे कृत्य केल्याच्या आरोपावरून मोहमंद सर्फराज इब्राहिम सय्यद उर्फ सर्फराज जहागिरदार, अफनान आदिल शेख, शेख सरवर आणि जावेद शेख या तरुणांवर भिंगार पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वी. 505 (2), 298, 34 प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्वतः पोलीस या ठिकाणी फिर्यादी झाले असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे, तर या प्रकारामुळे शहरामधील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.