Home Blog Page 1506

प्रियकरासाठी पित्याचा केला खून ,आईनेही दिली साथ …

पुणे-शिक्रापूर परिसरातून एक (Pune) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या प्रेम संबंधाला विरोध केल्याने मुलगी आणि आईने कट रचून मुलाच्या प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या पित्याला संपवलं. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाऊनही टाकला. परंतु पोलिसांना एक पुरावा सापडला. आणि त्यानंतर पोलिसांनी तब्बल 223 सीसीटीव्ही कॅमेरे तपासात आरोपींना अटक केली. 

जॉन्सन कॅजिटन लोबो असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अग्नेल जॉय कसबे (वय 23, रा. साईकृपा सोसायटी वडगाव शेरी पुणे), सॅन्ड्रा जॉन्सन लोबो (वय 43, गुड विल वृंदावन, आनंद पार्क, वडगाव शेरी) या दोघांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत जॉन्सन यांची मुलगी आणि आरोपी अग्नेल यांच्यात प्रेम संबंध होते. या प्रेमसंबंधाला जॉन्सन यांचा विरोध होता तर मुलीच्या आईचा पाठिंबा होता.

यातून दोघांच्यामध्ये भांडण व्हायचे. रोजच्या भांडणाला कंटाळून या तिघांनीही जॉन्सनचा कायमस्वरूपी काटा काढण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी काही क्राईमच्या वेब सिरीज देखील पाहिल्यात. त्यानंतर 30 जूनच्या रात्री डोक्यात वरवंट्याने वार करून आणि मानेवर चाकूने वार करून जॉन्सनचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी तिघांनीही मृतदेह शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेऊन जाळून टाकला.

दरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांना अनोळखी मृतदेह सापडल्याने त्यांनी (Pune) तपासाला सुरुवात केली होती. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एक वॅगनार कार त्यांना त्या ठिकाणी आल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी पुणे नगर महामार्गावरील 223 कॅमेरे तपासले आणि आरोपींचा शोध लावला.

खून झाल्यानंतर मयताची पत्नी काही झालेच नाही अशा अविर्भावात वावरत होती. तिने त्याच्या व्हाट्सअप वरून स्टेटस देखील बदलले होते. मात्र पोलिसांनी अवघ्या एका पुराव्यावरून शोध घेतला आणि दोघांनाही अटक केली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, महादेव शेलार, नितीन अतकरे, पोलीस कर्मचारी जितेंद्र पानसरे जनार्धन शेळके अमोल दांडगे, शिवाजी चितारे, किशोर शिवणकर, चंद्रकांत काळे, सचिन होळकर यांच्या पथकाने केली.

पहिल्याच पावसात पालखी मार्गाची दुरवस्था खासदार सुळे यांनी करताच ट्वीट:काम सुरु …

पुणे : रविवारी झालेल्या पहिल्याच पावसात पालखी महामार्गावर अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साठली आहेत. खड्डे बुजविण्यासाठी मुरुमाची तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती. परंतु पावसामुळे त्याचा चिखल झाला आहे. पालखी सोहळा अवघ्या आठवड्यावर आला असताना या रस्त्याची ही अशी अवस्था झाली असून तातडीने रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे त्यांनी ट्विटद्वारे ही मागणी केली आणि त्याची दाखल हि तेवढ्याच वेगाने घेण्यात आली .आणि रस्ते दुरुस्तीचे काम सुरु झाले.


पालखी सोहळा अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला तरी या रस्त्याची कामे अतिशय संथ गतीने येथे काम सुरु आहेत. मतिमिश्रित मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी करू नये, उत्तम दर्जाचे डांबरीकरण करावे, अशी मागणी गेल्याच आठवड्यात सुळे यांनी केली होती. त्यातील तथ्य कालच्या पहिल्याच पावसात लक्षात आले असून खड्ड्यात भरल्या गेलेल्या मतिमिश्रित मुरुमामुळे जागोजागी चिखल झाला आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा गडकरी यांना आठवण करून दिली आहे.

पालखी सोहळ्याच्या काळात वारकरी व नागरीकांची सोय लक्षात घेता हा रस्ता तातडीने दुरुस्त होणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू

केंद्रीय महिला बाल विकास विभागाच्या दि. १४ जुलै, २०२२ च्या मिशन शक्ती मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, पुणे यांचे दि. १९ मे २०२३ च्या पत्रानुसार प्रधान मंत्री मातृ वंदना योजना नव्या अटींसह लागू करण्यात आली आहे.

प्रधान मंत्री मातृ वंदना योजनेचे उद्दिष्ट गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना या अवस्थेमुळे मिळणारी मजुरी कमी होण्यामुळे होणाऱ्या नुकसानीची आंशिकरित्या भरपाई मिळावी, जेणेकरून पहिल्या बाळाच्या जन्मापूर्वी आणि नंतर पुरेशी विश्रांती घेण्यास प्रोत्साहन मिळेल. हा लाभ दोन टप्प्यात रु. ५०००/- (पाच हजार रुपये) देण्यात येईल. जर दुसरे अपत्य मुलगी झाले तर मुलीविषयीच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल होण्याकरिता एकाच टप्प्यात ६०००/- रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे.

गर्भवती व स्तनदा मातांना कुटुंबातील पहिल्या जीवित अपत्यासाठी या योजनेअंतर्गत गर्भवती व स्तनदा मातांनी काही निकष पूर्ण केल्यानंतर दोन टप्प्यात ५०००/- रु. तर दुसरी मुलगी झाल्यानंतर एका टप्प्यात ६०००/-  रुपयांचा लाभ थेट लाभार्थीच्या आधार संलग्न (सीडेड) बँक खात्यात जमा केला जातो. मात्र वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना किंवा सार्वजनिक उपक्रमातील महिलांना तसेच सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्याने सामान लाभ मिळत असल्यास या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.

एखाद्या लाभार्थीस दुसऱ्या गरोदरपणात जुळं/तीळं किंवा चार अपत्य झाल्यास आणि त्यापैकी एक मुलगी किंवा अधिक मुली असतील तरीदेखील दुसऱ्या मुलीसाठीचा लाभ अनुज्ञेय आहे.

  नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार लाभार्थीकडे लाभ घेण्यासाठी खालीलपैकी किमान एक कागदपत्र असणे आवश्यक आहे.

१) ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न रु. ८ लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

२) अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या महिला.

३) ज्या महिला ४० टक्के किंवा पूर्णतः दिव्यांग आहेत.

४) बीपीएल शिधापत्रिका धारक महिला.

५) आयुष्मान भारत अंतर्गत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत महिला लाभार्थी.

६) ई- श्रम कार्ड धारण करणाऱ्या महिला.

७) किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी.

८) मनरेगा जॉब कार्ड घेतलेल्या महिला.

९) गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका (AWW) /अंगणवाडी मदतनीस (AWHs)/आशा कार्यकर्ती (ASHAs)

योजनेचा लाभ मिळण्यासाठी वरील नमूद किमान एक कागदपत्रांव्यतिरिक्त

१)      लाभार्थी आधार कार्ड,

२)      परिपूर्ण भरलेले माता आणि बाल संरक्षण कार्ड,

३)      लाभार्थीच्या स्वतःच्या बँक पासबुकची झेरॉक्स.

४)     नवजात बालकाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र.

५)      RCH  नोंदणी क्रमांक देणे आवश्यक आहे.

६)      मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील आशा कार्यकर्ती, आरोग्य सेविका/ सेवक, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, नागरी आरोग्य केंद्र येथे संपर्क साधावा. फॉर्म नोंदणी आणि कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर लाभार्थीची माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवर भरल्यानंतर विनाअडथळा फॉर्म मान्य झाल्यास लाभार्थीच्या बँक खात्यात थेट (DBT द्वारे) रक्कम जमा होईल.

०००

एनआयआरएफ रँकिंगमध्ये भारती विद्यापीठाच्या’ भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय ‘ सह ५ इन्स्टिट्यूटचा समावेश

पुणे:

भारती विद्यापीठाच्या ‘ भारती अभिमत विश्वविद्यालया ‘ ला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क’( एनआयआरएफ) क्रमवारीत ९१वे स्थान मिळाले आहे. भारती विद्यापीठ अंतर्गत ५ इन्स्टिट्यूटचा या क्रमवारीत समावेश झाला आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आय.एम.ई.डी.) ला एन.आय.आर.एफ सर्वेक्षणात देशातील सर्वोत्तम १२५ व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या क्रमवारीत ( १०१ ते १२५ या रँक बँडमध्ये) स्थान मिळाले आहे. भारती विद्यापीठाची फ़ार्मसी इन्स्टिट्यूट २९ व्या ,दंत महाविद्यालय ३९ व्या तसेच फार्मसी इन्स्टिट्यूट (कोल्हापूर) ७९ स्थानावर आहे .

‘ उच्चशिक्षणाला पोषक वातावरण, उत्तम शिक्षणपद्धती, उत्तम शिक्षकवर्ग व विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळेच भारती विद्यापीठा ला शिक्षणक्षेत्रात मोठे योगदान देणे शक्य झाले आहे. सर्वोत्तम प्लेसमेंट संधी, कालानुरूप आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण, उद्योजकता विकासाला वाव, विद्यार्थी केंद्रीत उपक्रम याचा फायदा झाला’ ,अशी प्रतिक्रिया भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विद्या शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडी चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी आमच्या प्रतिनिधीने विचारली असताना व्यक्त केली.संस्थापक स्व.डॉ.पतंगराव कदम यांची प्रेरणा तसेच कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ.विश्‍वजीत कदम, कुलगुरू डॉ.विवेक सावजी यांच्या पाठिंब्यामुळे व त्यांच्या प्रोत्साहनामुळे भारती विद्यापीठाने हे यश मिळविले आहे.

दरवर्षी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे देशातील प्रमुख विद्यापीठासह दहा वेगवेगळ्या प्रवर्गातील महाविद्यालयांची क्रमवारी मानांकन जाहीर केले जाते. यंदा केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री राजकुम कुमार रंजन सिंह यांनी ५ जून रोजी क्रमवारी मानांकन जाहीर केली.

अनेक स्थित्यंतरांतून महावितरणची गगनभरारी अभिमानास्पद

मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांचे प्रतिपादन

पुणे, दि. ०६ जून २०२३: तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विभाजन होऊन ग्राहकसेवा व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण कंपनीची २००५ मध्ये स्थापना झाली. त्यानंतर गेल्या १८ वर्षांमध्ये अनेक आव्हानात्मक स्थित्यंतरांतून यशस्वी मार्गक्रमण करीत व वीजग्राहकांना केंद्रबिंदू ठेवून देशाच्या वीजक्षेत्रात महावितरणने महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी गगनभरारी घेतली आहे, असे प्रतिपादन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी मंगळवारी (दि. ६) केले.

रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित महावितरणच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्य अभियंता श्री. पवार बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, युवराज जरग, संजीव राठोड, डॉ. सुरेश वानखेडे तसेच सहायक महाव्यवस्थापक ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन) व माधुरी राऊत (वित्त व लेखा) यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले, की नव्वदीच्या दशकात निर्माण झालेल्या वीजसंकटावर राज्य व केंद्र शासनाच्या आधाराने महावितरणने यशस्वी मात केली आहे. ‘फयान’, ‘तौक्ते’, ‘निसर्ग’, यासारखे भयंकर चक्रीवादळे, राज्यातील प्रलयकारी महापूर आणि कोविड-१९ संसर्गाच्या कालावधीत जीवावर उदार होऊन महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी ग्राहकसेवेचा नवा मानदंड निर्माण केला आहे. फोटो मीटर रीडिंगचे पेटंट घेतले आहे. तसेच मोबाईल ॲपद्वारे अचूक रीडींगद्वारे ग्राहकांना वीजबिल देण्यात येत आहे. त्यामुळे बिलिंगच्या तक्रारी देखील नगण्य झाल्या आहेत. यापुढेही सर्वच ग्राहकांना तत्पर व दर्जेदार सेवा देण्यासाठी महावितरण कटिबद्ध आहे, असे श्री. पवार यांनी सांगितले.

यावेळी महावितरणच्या मृत कर्मचाऱ्यांच्या ५ वारसांना तसेच विद्युत सहायक पदासाठी सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून निवड झालेल्या तीन उमेदवारांना मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लघु प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष पटनी यांनी केले. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला महावितरणचे अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

सह्याद्रि हॉस्पिटल्स आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधांसाठी करणार ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक

· हडपसरमध्ये सह्याद्रि सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ऑब्स्टेट्रिक्स, गायनॅकॉलॉजी आणि पेडियाट्रिक्सचा भाग असलेल्या केंद्रात १०० खाटांचे ९ वे रुग्णालय सुरू

·  पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये हॉस्पिटल साखळी विस्ताराच्या संधीच्या शोधात

· न्यूरोसायन्स, ऑन्कोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, कार्डियाक सायन्सेस, हेमॅटोलॉजी आणि मदर आणि चाइल्ड केअर यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्रात आपले उत्कृष्टता केंद्र मजबूत करेल.

पुणे, ०६ जून २०२३: पश्चिम भारतातील सर्वात मोठी हॉस्पिटल साखळी असलेले सह्याद्रि हॉस्पिटल्स लक्षणीय वाढ आणि विस्तारासाठी सज्ज असून आरोग्य सेवेतील पायाभूत सुविधांमध्ये ७५० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करत पुढील ३ ते ४ वर्षांमध्ये क्षमता दुप्पट करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

या साखळीतील ९ व्या हॉस्पिटलची सुरूवात सह्याद्रि हॉस्पिटल्सच्या आक्रमक विस्तार योजनांचा एक भाग आहे कारण पुणे आणि नाशिक मधील स्थान आणखी मजबूत करताना आरोग्यसेवा नेटवर्क नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर आणि या भागातील इतर शहरांमध्ये विस्तारण्याची त्यांची योजना आहे.

विस्तार योजनेत ब्राउनफील्ड तसेच ग्रीनफिल्ड प्रकल्प दोन्ही समाविष्ट आहेत. शिवाय, सह्याद्रि हॉस्पिटल्सचा यशस्वी विलीनीकरण आणि अधिग्रहणांचा एक मजबूत ट्रॅक रेकॉर्ड आहे. देशाच्या पश्चिम भागात विस्तारासाठी सध्या काही करारांवर काम सुरू आहे.

विस्तार योजनांचा एक भाग म्हणून, सह्याद्रि हॉस्पिटल्सने हडपसर परिसरात सह्याद्रि हॉस्पिटल हडपसर अॅनेक्ससह आपली क्षमता दुप्पट केली आहे. सह्याद्रिकडे माता आणि बाल संगोपनासाठी समर्पित असे २० हून अधिक उच्च कुशल चिकित्सक आणि विविध वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्रा मधील १००  हून अधिक समर्पित चिकित्सकांची टीम कार्यरत आहे.

विस्ताराविषयी बोलताना, सह्याद्रि हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्री. अब्रारअली दलाल म्हणाले, “महाराष्ट्रातील दर्जेदार आरोग्य सेवेची वाढती मागणी आम्ही पूर्ण करत असताना सह्याद्रि हॉस्पिटल्सच्या महत्त्वाकांक्षी विस्तार योजनांची घोषणा करताना मला आनंद होत आहे. बेडची क्षमता वाढवणे आणि वैशिष्ट्यपूर्ण आरोग्य सेवा प्रदान करण्यावर असलेले आमचे धोरणात्मक लक्ष यामुळे आम्हांला आरोग्य सेवेमधील अंतर भरून काढण्यात आणि समाजाच्या गरजा पूर्ण करण्यात मदत होईल. धोरणात्मक विलीनीकरण आणि अधिग्रहणांसह आमच्या ब्राउनफील्ड आणि ग्रीनफिल्ड प्रकल्पांद्वारे अधिकाधिक रुग्णांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा-सुविधा मिळण्याची खातरजमा  सुनिश्चित करण्याचे आमचे ध्येय आहे. आमच्या हडपसर केंद्राचा विस्तार हे या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे आणि स्थानिक नागरिकांच्या विशिष्ट आरोग्य सेवा गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.

खाटांची क्षमता वाढवण्यावर आणि विशेष वैद्यकीय सेवेची उपलब्धता यावर लक्ष केंद्रित करून, सह्याद्रि हॉस्पिटल्स समाजाला सर्वसमावेशक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी वचनबद्ध आहे.

भारतातील घनकचरा समस्या सोडवणे हे एक सामूहिक आव्हान-गायत्री दिवेचा

भारत आपल्या प्रचंड मोठ्या कचऱ्याच्या समस्येचे ऊर्जा, अर्थव्यवस्था आणि सक्षमीकरणाच्या इंजिनमध्ये रूपांतर करू शकतो.

हे चित्र डोळ्यासमोर आणा – रोजच्या दिवसाला ७,५०० कचऱ्याच्या गाड्यांची रांग चालत आहे आणि त्यातून दरवर्षी आपण वापरलेला ५० दशलक्ष टन घनकचरा जमा होत आहे. आपण जे फेकतो ते आपल्या देशभरातली ३,१५० डंपसाइट्सच्या विस्तारणाऱ्या समुद्रात जमा होते. आपल्या भूमीवरचा तो डाग आहे. पण हे थांबलेले नाही. यात भरच पडत आहे. कारण २०३० पर्यंत ही संख्या तिप्पट होण्याचा अंदाज असून वार्षिक १६५ दशलक्ष टन कचरा वाढेल. हा कचरा ठेवण्यासाठी आपल्याला अशा लँडफिलची, जमिनीची गरज भासू शकते जी आपल्या स्वप्नांचे अनमोल शहर असलेल्या मुंबईच्या विस्तीर्ण आकाराची असेल. कचऱ्याच्या एक भयंकर शहरामध्येच् रूपांतर होईल.

कचर्याबाबतच्या आपल्या दृष्टिकोनाचा पुनर्विचार

भारतातील केवळ शहरी आणि औद्योगिक सेंद्रिय कचऱ्यामध्येच अंदाजे ५,६९० मेगावॅट ऊर्जा इतकी प्रचंड क्षमता आहे. क्षणभर त्याची कल्पना करा. ही अशी शक्ती आहे जी संपूर्ण वर्षासाठी २,५०० हून अधिक घरांच्या उर्जेची सर्व गरज पूर्ण करू शकते आणि हे सर्व आपण जे टाकून, फेकून दिलेले आहे त्यातून होऊ शकते.

परंतु हे फायदे केवळ पर्यावरणीय नाहीत. आपला कचरा ही आर्थिकदृष्ट्या सोन्याची खाणही  बनू शकते. पुनर्वापर उद्योगाद्वारे कचरा व्यवस्थापनाकडे बघण्याचा एक गंभीर, नाविन्यपूर्ण दृष्टीकोन दरवर्षी ३०,०००  कोटी रुपयांचा खजिना खुला करू शकतो. कचऱ्याकडे फेकून देण्याची टाकाऊ गोष्ट म्हणून पाहण्यापासून न वापरलेल्या संधींचा साठा म्हणून बघण्याची आणि आपला दृष्टीकोन बदलण्याची हीच वेळ आहे.

आपल्या कचऱ्याचे दायित्व

आपण ज्या कचर्‍याशी झगडत आहोत त्याच्या साठत चाललेल्या ढिगाऱ्याबाबत चिंतन केले तर हे स्पष्ट होते की आता आपण सर्वांनी पुढे जाण्याची वेळ आली आहे. प्रत्येक नागरिक, महामंडळे आणि सरकारी घटकांनी एकमेकांच्या साथीने प्रयत्न केले पाहिजेत आणि या समस्येचा निकराने  सामना केला पाहिजे.

गोदरेजमध्ये, आम्ही स्थानिक नगरपालिका आणि नागरिकांशी सहयोग करून अनेक सामुदायिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू केले आहेत. आमचे सर्वांगीण धोरण तीनपदरी आहे – लँडफिल्समधून कचरा वळवणे, एक शाश्वत कचरा व्यवस्थापन व्यवसाय मॉडेल स्थापित करणे आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामाचा गौरव करणे.

तंत्रज्ञानाच्या शक्तीचा उपयोग करून आम्ही पालिकेच्या कचरा व्यवस्थापनात पारदर्शकता आणि जबाबदारी आणली आहे. आता, कंत्राटदार, शहरी स्थानिक संस्था अधिकारी आणि पर्यवेक्षक कचऱ्याच्या उत्पत्तीपासून शेवटपर्यंतच्या प्रवासाचा मागोवा घेऊ शकतात आणि दररोज प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याच्या सेवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करू शकतात. या स्पष्ट दृष्टीकोनामुळे  जलद समस्या सोडवण्याची खात्री मिळते, नागरिकांना त्यांच्या कचऱ्याचे विलगीकरण करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि पुनर्वापराच्या शक्यतांचे दरवाजे खुले होतात.

आमच्या सार्वजनिक खाजगी लोकसहभागाच्या मॉडेलला यश मिळाले आहे. २०१६ मधील आमच्या सुरुवातीच्या पथदर्शी प्रकल्पापासून आम्ही १३,००० टन घनकचरा लँडफिल्समधून यशस्वीरित्या वळवला आहे. या उपक्रमाने वैज्ञानिक कचरा व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधांना प्रोत्साहन दिले, कचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांचे प्रबोधन केले आणि स्वच्छता कामगारांना सुरक्षा आणि सन्मान प्रदान केला.

कचरा व्यवस्थापन पूर्णपणे स्वीकारण्यासाठी आणि त्याच्या अंतर्भूत संधींचा फायदा घेण्यासाठी आपण या त्रिस्तरीय सहभाग मॉडेलचा स्वीकार केला पाहिजे. कचरा विलगीकरणाबद्दल प्रत्येकन प्रत्येक नागरिकाला शिक्षित करण्यासाठी खाजगी क्षेत्र सरकारसोबत सहकार्य करू शकते आणि कचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मदत करू शकते. त्याचवेळी स्थानिक अधिकारी मंडळे घराघरात कचरा वेगळा  करण्याच्या आवश्यकतेसाठी  नियमांची अंमलबजावणी करू शकतात.

स्त्रोत वेगळे करणे हा शाश्वत कचरा व्यवस्थापन परिसंस्थेचा अत्यावश्यक पाया आहे. विघटनशील आणि नॉन-बायोडिग्रेडेबल कचरा वेगळे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कचरा पुनर्वापर संसाधने खर्च केली जातात, ही समस्या स्त्रोत विलगीकरणाद्वारे सहजतेने सोडवली जाते. समाज आणि स्वच्छता कामगारांचा समावेश असलेली एक सुव्यवस्थित जागरूकता मोहीम हे ध्येय गाठू शकते. नागरिक आणि रहिवासी संघटनांनी वैज्ञानिक कचरा वर्गीकरण, संकलन आणि विल्हेवाटीचा पाया बनू शकेल अशी ही प्रणाली अंतर्गत पातळीवर राबवविणे आवश्यक आहे.

भारतात अंदाजे १.५ दशलक्ष कचरा गोळा करणारे कर्मचारी आहेत. सर्व प्रकारच्या पुनर्वापरयोग्य कचऱ्यापैकी ८०% कचरा गोळा करणारे हे खरेखुरे हीरो आहेत. यापैकी बहुतेक कामगार मोजक्याच संरक्षण आणि सुरक्षिततेसह असंघटितपणे काम करतात. त्यांच्या कौशल्य विकासामध्ये गुंतवणूक करणे हा सर्वांगीण कचरा व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. मूलभूत संरक्षणात्मक सुविधा पुरवून त्यांच्या सामाजिक-आर्थिक अधिकारांबद्दल जागरूकता वाढवून, त्यांना मूलभूत ओळखपत्रे मिळविण्यासाठी सक्षम करून आणि सरकारी धोरणांमध्ये प्रवेश सुलभ करून आपण आपल्या पुनर्वापर प्रणालीला लक्षणीयरीत्या मजबूत करू शकतो.

शेवटी, कचऱ्याच्या अफाट विस्ताराचा सामना करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पारदर्शकता, मजबूत पुनर्वापर प्रणाली स्थापित करणे आणि आपण निर्माण करत असलेला कचरा आणि स्त्रोत वेगळे करण्याचे महत्त्व याबद्दल व्यक्तींना शिक्षित करणे यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आपल्या कचऱ्याचे संपत्तीत रूपांतर करण्याची वेळ आली आहे.

,

बालासोरचे २८८ मृत्यू हे रेल्वे मंत्रालयाच्या निष्क्रीयतेचे बळी:पुणे कॉंग्रेसचा आरोप

     पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ओडिसा येथे झालेल्या भयानक रेल्वे अपघातातील मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली आणि शोकसभा.

पुणे- ओरिसा येथील बालासोर येथे तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळून २८८ लोकांचा मृत्यू झाला आणि हजर एक लोक जखमी झाले हि दुर्घटना केंद्र सरकारच्या आणि रेल्वे मंत्रालयाच्या निष्क्रीयतेमुळे च घडली असा आरोप काल शहर कॉंग्रेसच्या वतीने पुण्यातील कॉंग्रेस नेत्यांनी केला .

शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने फातिमा नगर येथील बिग बाजार चौका मध्ये तीन दिवसांपूर्वी ओडिशा येथे कोरोमंडल एक्स्प्रेस, माल गाडी आणि हावडा एक्स्प्रेस ह्या तिन्ही गाड्यांचा भयानक मोठा अपघात झाला. ह्या महाभयंकर अपघातामध्ये सरकारी आकडेवारी नुसार २८८ प्रवासी मृत्यु पावले, खरे तर ही आकडेवारी खरी आहे का खोटी हे सरकारच जाणे. ह्या अपघातामध्ये जे प्रवासी मृत्युमुखी पडले. त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेसने ही श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. या श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे  तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी नगरसेवक माजी मंत्री उपस्थित होते. ह्यावेळी श्रद्धांजली सभे मध्ये सर्व नेत्यांनीश्रद्धांजली वाहिली, या श्रद्धांजली सभेचे नियोजन माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, नगरसेवक अभिजीत शिवरकर, पुणे कॅन्टोन्मेंट ब्लॉकचे अध्यक्ष प्रदीप परदेशी यांनी केले होते.

     या शोकसभेसाठी पुणे शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे माजी, मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी मंत्री रमेश बागवे, प्रदेश महासचिव अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे,रजनी त्रिभुवन, नीता परदेशी,अविनाश बागवे, संगीता तिवारी, अजित दरेकर, ,सुजाता शेट्टी, लता राजगुरू,  साहिल केदारी, मुक्तार शेख, प्रशांत सुरसे, मंजूर शेख,  सीमा महाडिक, सीमा सावंत, सनी रणदिवे, विजय जाधव, द. स. पोळेकर, विनोद रणपिसे, सुनिल पंडित, रमेश सोनकांबळे, इरफान शेख, क्लेमंट लाजरस, नितीन वायदंडे, मुन्ना खंडेलवाल,सतिश पवार, रफिक शेख,  तसेच पुणे शहर काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

     यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे श्रध्दांजली वाहताना म्हणाले की, ‘‘हा अपघात आहे की हत्या आहे. ह्या सरकारने हे बळी घेतले आहेत. तसेच रेल्वेचे बजेट कसे कमी केले ह्या सरकारने सिग्नल फेल्युअर रिपोर्ट आल्यावर ही गप्प बसले. निष्क्रियता दाखवली केंद्र सरकारने कॅग रिपोर्टवर रेल्वेमध्ये हजारोंची राहिलेली भरती सरकारने अजून केली नाहीये, रेल्वे ट्रॅक रिपेअर केलेले नाही. रेल्वे मेंटेनन्स अजिबात नाहीये यामुळे हा दुर्दैवी अपघात होऊन नागरिकांचा नाहक बळी गेला आहे.’’ 

     यानंतर एक तिरंगा मेणबत्ती लावून सर्वांनी मेणबत्ती पेटवून अपघातातील मृत प्रवासी व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली आणि तसेच जे जखमी आहेत त्यांना देव लवकर बरे करो अशी प्रार्थना केली.

‘जितो पुणे’ची बाबा रामदेव यांच्यासमवेत तळजाईला योगसाधना

चोरडिया,सांकला,भंडारी,ओसवाल,लोढा,छाजेड,जैन आदींनी केले रामदेवबाबांचे स्वागत ..

पुणे -जितो स्पोर्टस्‌‍च्या सहकार्याने जगविख्यात योगगुरू बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत काल (दि. 4) योगसाधना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पहाटे 5 वाजता सहकार नगर (Pune)  येथील सदू शिंदे मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन पुणे जीतो चॅप्टरने जितो स्पोर्टस्‌‍च्या माध्यमातून केले होते. आपले स्वास्थ उत्तम व आरोग्यदायी ठेवण्यासाठी योगसाधनेचे महत्त्व या विषयावर योगगुरू बाबा रामदेव यांनी जितो सदस्यांना आणि नागरिकांना मार्गदर्शन केले. बाबा रामदेव यांच्यासमवेत योगसाधना-प्राणायाम करण्याची संधी या निमित्ताने नागरिकांना मिळाली. जितो स्पोर्टस्‌‍ ॲपेक्सचे अध्यक्ष विशाल चोरडिया, जितो पुणे चॅप्टरचे अध्यक्ष राजेश सांकला यांनी बाबा रामदेव यांच्यासह योगसाधना केली.

जितो स्पोर्टस्‌‍च्या सहकार्याने जगविख्यात योगगुरू बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत काल (दि. 4) योगसाधना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पहाटे 5 वाजता सहकार नगर (Pune)  येथील सदू शिंदे मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन पुणे जीतो चॅप्टरने जितो स्पोर्टस्‌‍च्या माध्यमातून केले होते. आपले स्वास्थ उत्तम व आरोग्यदायी ठेवण्यासाठी योगसाधनेचे महत्त्व या विषयावर योगगुरू बाबा रामदेव यांनी जितो सदस्यांना आणि नागरिकांना मार्गदर्शन केले. बाबा रामदेव यांच्यासमवेत योगसाधना-प्राणायाम करण्याची संधी या निमित्ताने नागरिकांना मिळाली. जितो स्पोर्टस्‌‍ ॲपेक्सचे अध्यक्ष विशाल चोरडिया, जितो पुणे चॅप्टरचे अध्यक्ष राजेश सांकला यांनी बाबा रामदेव यांच्यासह योगसाधना केली.सुरुवातीस णमोकार मंत्र आणि गुरुवंदना सादर करण्यात आली. बाबा रामदेव यांचे स्वागत विशाल चोरडिया, राजेश सांकला, अभय श्रीश्रीमाळ, कांतिलाल ओसवाल, संजय लोढा, नरेंद्र छाजेड, मनोज छाजेड, विकी ओसवाल, अजित सेठ, एस. के. जैन, इंद्रजित जैन, अचल जैन, धीरज छाजेड, दिलीप जैन, कुणाल ओस्तवाल, अमोल कुचेरिया, संगीता ललवाणी, हितेश शहा, लकिशा मलरेचा आदींनी केले.

आरोग्यासाठी योगसाधनेची उपयुक्तता विशद करताना बाबा रामदेव म्हणाले, नागरिकांनी व्यसन, दुर्गुणांच्या आहारी न जाता रोग-व्याधीमुक्त जीवनाला प्राधान्य दिले पाहिजे. आयुष्याचा आनंद विवेकपूर्णतेने घेणे आवश्यक आहे. आहारात मीठ, साखर, तळकट, तुपकट अन्नाचा अतिरेक न करता भाज्या, फळांचे रस, भरड धान्याचा उपयोग केल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.

योगसाधनेची सुरुवात योगिक जॉगिंगने केल्यानंतर सूर्यनमस्कारासह विविध आसनांची, प्राणायामाची माहिती देत त्याची उपयुक्तता बाबा रामदेव यांनी पटवून दिली. ताडासन, वृक्षासन, गरुडासन, भुजंगासन, शलभासन, धनुरासन, पवनमुक्तासन, सर्वांगासन, अर्ध हलासन, मकरासन, अर्ध पवन मुक्तासन, मर्कटासन, उष्ट्रासन, गोमुखासन अशा विविध आसनांसह प्राणायामातील भस्त्रिका, कपालभाती, अनुलोमविलोमचे प्रात्यक्षिक दाखवित उपस्थितांकडून ते करवून घेतले. दिवसातून कमीतकमी एक तास तरी व्यायाम-योगसाधना करा असा सल्लाही त्यांनी दिला.

योग हे महत्त्वाचे तत्त्व आहे. त्याची अवहेलना करू नका. योगसाधनेने शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक अशा सर्व प्रकारचे स्वास्थ्य तसेच सर्व प्रकारची समृद्धी प्राप्त होते. सकाळी योगसाधना करा, नंतर दिवसभर कर्मयोग, सहयोग करून कर्मयोगी, सहयोगी, उपयोगी, उद्योगी, उद्यमशील बना.

मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करून जितो पुणे चॅप्टरचे अध्यक्ष राजेश सांकला म्हणाले, बाबा रामदेव यांनी संपूर्ण विश्वाला योगसाधनेचे महत्त्व पटवून तर दिले आहेच त्याचबरोबरीने योग साधना करण्यास प्रवृत्तही केले आहे.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांचे स्वागत करून उपाध्यक्ष विजय भंडारी म्हणाले, जितोच्या स्पोर्टस्‌‍ विभागात योगाचा समावेश करणे ही अभिनंदनीय बाब आहे. जितो ॲपेक्सचे अध्यक्ष अभय श्रीश्रीमाळ म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त जितोतर्फे या वर्षात 75 हजार वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्याच प्रमाणे देशात विविध उर्जादायी उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

जितो स्पोर्टस्‌‍ ॲपेक्सचे चेअरमन विशाल चोरडिया, जितो पुणे (Pune)  चॅप्टरचे चेअरमन राजेश सांकला, उपाध्यक्ष विजय भंडारी, जितो पुणे चॅप्टरचे चिफ सेक्रेटरी चेतन भंडारी, सेक्रेटरी दिनेश ओसवाल, सह सेक्रेटरी संजय डागा, खजिनदार किशोर ओसवाल, डायरेक्टर इन्चार्ज दिलीप जैन, कॉन्व्हेनर कुणाल ओस्तवाल, को कॉन्व्हेनर अमोल कुचेरिया यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश ओसवाल यांनी केले.

लोकसहभागातून आळंदीत शंभर खोल्याची इमारत उभारण्यात येणार – चंद्रकांतदादा पाटील

वारीसाठी उपयोगी साहित्याचे चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत वाटप

पुणे – अनेक वारकरी बांधवांची इच्छा असते की, आपला अंतिम काळात श्रीक्षेत्र पंढरपूर किंवा आळंदी येथे व्यतित करावा. त्यामुळे अशा वारकरी बांधवांसाठी सुखात राहता यावं; यासाठी लवकरच लोकसहभागातून आळंदीत शंभर खोल्याची इमारत उभारण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे. आषाढी वारीनंतर चंद्रकांत वांजळे गुरुजींच्या उपस्थित भूमिपूजन करुन, सदर इमारतीच्या कामाची सुरुवात करण्यात येईल अशी घोषणा देखील त्यांनी केली.

वारकरी संप्रदायाची एक महत्वाची परंपरा म्हणजे वारीची परंपरा. येत्या काही दिवसातच आषाढी वारीला सुरुवात होणार असून कोथरूड परिसरातून देखील मोठ्या प्रमाणावर दिंड्या पंढरपूरसाठी रवाना होणार आहेत.तत्पूर्वी कोथरूड परिसरातील दिंड्यांना आणि भजनी मंडळांना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वारीसाठी उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संत पूजनाचा सोहळा देखील पार पडले.याप्रसंगी 15 दिंडयाचे प्रमुख, भजनी मंडळ आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात वारकरी बांधव उपस्थित होते.

ह. भ. प. भाऊ महाराज परांडे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, अनंत (बाप्पू )सुतार अध्यक्ष ,सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, साई एज्युकेशन ट्रस्टचे सागर शेडग सर,शैलेश जाधव,अध्यक्ष, विठ्ठल मित्र मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, आषाढी वारीचे महत्त्व सर्वांना समजावून सांगण्यासाठी यंदाच्या आषाढी वारीदरम्यान तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित उत्तम नाट्यप्रयोग पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी होणार आहेत. याचे २४ प्रयोग होणार असून, नाट्यप्रयोगादरम्यान पालखीच्या ठिकाणी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाणार आहेत. त्याचा पहिला प्रयोग श्री क्षेत्र देहू येथे होणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

संयोजक गिरीश खत्री म्हणाले,आज चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांची सेवा हे कर्तव्य मानून “संतपुजन व वारकरी मंडळांना विशेष वारीसाठी उपयोगी साहित्य वाटप” टाळ, मृदंग, वीणा, तंबू, रेनकोट, बॅग या साहित्याचे वाटप आज होत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रास वारकरी संप्रदायाचा थोर वारसा आहे. आमचे वडील आम्हाला कायम सांगायचे की साधु संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा. आज खोरोखरचं दिवाळी दसरा असल्याची प्रचिती येत आहे.ही सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबाबत दादांचे आभार.

या सोहळ्याच्या सुरुवातीला ह. भ. प. चंद्रकांत महाराज वांजळे यांचे अतिशय श्रवणीय असे कीर्तन पार पडले.यावेळी ते म्हणाले, मालक, चालक हे ज्या प्रमाणे महत्वाचे असतात त्याप्रमाणे पालक देखील महत्वाचे असतात. आज हा लॉन्स म्हणजे पंढरीचे वाळवंट असल्याची अनुभूती दादा आणि गिरीश खत्री यांच्यामुळे येत आहे. चंद्रकांतदादांनी वाटप केलेल्या या साहित्याचा निश्चितच वारकऱ्यांना उपयोग होईल असे ते म्हणाले.

माणसाची प्रगती आणि पर्यावरणाचा संहार यात समतोल हवा-निसर्ग छायाचित्रकार श्रीधर देशपांडे

– इकोफॉक्स आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्या वतीने फोटोथाॅन २०२३ छायाचित्रण स्पर्धेचा फ्लॅग ऑफ
पुणे : आपण आणि पर्यावरण एक आहोत. दोन्हीमध्ये समतोल राखला गेला नाही तर पर्यावरणाचा संहार होईल. माणूस जी प्रगती करतोय ती आवश्यकच आहे पण माणसाची प्रगती आणि पर्यावरणाचा संहार याच्यामध्ये समतोल राखायला हवा. पृथ्वीच नसेल तर त्या प्रगतीचा उपयोग नाही. पृथ्वी सुंदर आहे त्याचे सौंदर्य पुढच्या पिढीलाही दिसायला हवे, असे मत प्रसिद्ध निसर्ग छायाचित्रकार श्रीधर देशपांडे यांनी व्यक्त केले.

पर्यावरणाविषयी जनजागृतीचा प्रयत्न करणारी फोटोथाॅन २०२३ छायाचित्रण स्पर्धा इकोफॉक्स आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळातर्फे घेण्यात आली आहे. स्पर्धेचा फ्लॅग ऑफ म्हात्रे पुलाजवळील इंद्रधनुष्य सभागृह येथे झाला. यावेळी श्रीधर देशपांडे, सुधीर हसमनीस, राजेंद्र महामुनी, विश्वनाथ जोशी, भरत डोरले, गिरीश पोटफोडे यावेळी उपस्थित होते.

फोटो स्टोरी, नेचर, मोबाईल छायाचित्र आदी श्रेणीत पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक देण्यात येईल.  यंदा पुण्यासह मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजी नगर या शहरांत देखील स्पर्धा होत आहेत. सर्व ठिकाणी मिळून एकूण सुमारे ३ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. यापूर्वी विविध सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी फोटोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, असे माहिती आयोजक परेश पिंपळे यांनी दिली. 

श्रीधर देशपांडे म्हणाले, निसर्गाचे छायाचित्रण करताना आपल्या मनापासून करा. निसर्गाची काळजी करणारे खूप जण आहेत. छायाचित्रणाच्या माध्यमातून भावनिक पद्धतीने संदेश गेला तर नक्की फायदा होईल. फोटोचा अर्थ सुंदर नाही तर खरा असावा, त्यात वस्तुस्थिती असावी. सुधीर हसमनीस, राजेंद्र महामुनी यांनी मनोगत व्यक्त केले. गिरीश पोटफोडे यांनी सूत्रसंचालन केले.

मतपेटीतून खोके आमदार जन्माला येणे हे लोकशाहीसाठी धोक्याचे !

मुंबई-सर्वसामान्यांना व्यवस्थेला प्रश्न विचारायला शिकविण्यासाठी ही आम आदमी पक्षाची स्वराज्य यात्रा आहे. या यात्रेमुळे या सर्वसामान्यांना ताकद मिळून त्यांची सत्ता येणार असल्याचे प्रतिपादन आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी केले. मतपेटीतून सत्तेसाठी सर्व तत्वहीन तडजोडी करणारे खोके आमदार जन्माला येणे हे लोकशाहीसाठी धोक्याचे आहे !. खोकेवाल्या सरकारमुळे महाराष्ट्र कलंकित झाले अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभा क्षेत्रातील सभेत राचुरे यांनी केली. आम आदमी पक्षाची पंढरपूर ते रायगड ही स्वराज्य यात्रा ठाणे येथे पोहचली त्यावेळी ते बोलत होते.

दि. २८ मे रोजी पंढरपूरहून निघालेली ही स्वराज्य यात्रा गेले ९ दिवस प्रवास करून ठाणे येथे ४ जून रोजी पोहचली. शहराच्या मुख्य बाजारपेठेतून निघालेली ही यात्रा इंदिरानगर नाका येथे सभेमध्ये रुपांतरीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. आजच्या घडीला सगळ्यात मोठा प्रश्न हा संविधान आणि लोकशाही वाचविण्याचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शिक्षण आणि आरोग्यासाठी लागणाऱ्या भरमसाठ खर्चामुळे गरीबांना या सुविधा मिळू शकत नाहीत. यावर आम आदमी पार्टीने यशस्वी पर्याय शोधला असून आज दिल्लीतील सरकारी शाळेत आमदारांची मुले सर्वसामान्य मुलांसोबत शिकत आहेत. आज दिल्लीत उत्तम अशा आरोग्याची सोय सर्वसामान्यांनाही उपलब्ध आहेत. दिल्ली आणि पंजाबमध्ये उभे राहिलेले हे मॉडेल आपल्याला महाराष्ट्रातही उभे करायचे आहे. यासाठी पक्षाचे विचार समाजाच्या तळागाळात पोचविण्याची ही यात्रा असल्याचे आप नेते रंगा राचुरे यांनी यावेळी सांगितले.

गेले ९ दिवस ही यात्रा पंढरपूर, सोलापूर,बारामती, सांगली , कोल्हापूर,सातारा, पुणे, पिंपरी चिंचवड, पनवेल, नवी मुंबई असा प्रवास करत ठाणे येथे पोहचली. पुढे पनवेल व महाड येथे स्वराज्य यात्रा सोमवारी पोहचली.

या सर्व यात्रेत कार्यकर्त्यांच्या उदंड सहभाग होता. प्रत्येक गावात शिरताना नागरिक उत्स्फर्तपणे प्रतिसाद देत होते. आम आदमी पार्टी महाराष्ट्रात यायलाच हवी, निवडणुकीत आम्ही निश्चितपणे पाठिंबा देवू अशी भावना सामान्य नागरिक व्यक्त करीत होते.

यावेळी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य सह प्रभारी गोपाल इटालिया, यात्रेसोबत असणारे पक्षाचे पदाधिकारी डॉ फैजी, धनंजय शिंदे, देवेंद्र वानखेडे, मुकुंद किर्दत, संदीप देसाई, अन्सार शेख, किशोर मंध्यान, स्थानिक नेते पचौरी यासह राज्याच्या विविध क्षेत्रातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेसाठी ठाणेकरानी मोठी गर्दी केली होती.

११ जून रोजी पुण्यात गांधी दर्शन शिबीराचे आयोजन 

पुणे :
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार, दि. ११ जुन २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी  ६ या वेळेत ‘गांधी दर्शन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोथरूड येथील गांधी भवनच्या दुस-या मजल्यावरील सभागृहात हे शिबीर होणार असून डॉ. राम पुनियानी,डॉ. कुमार सप्तर्षी,युवराज मोहिते हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.’ गांधी और सांप्रदायिक सद्भावना’विषयावर ज्येष्ठ अभ्यासक  डॉ. राम पुनियानी मार्गदर्शन करणार आहेत. ‘सत्याग्रह शास्त्र’ विषयावर डॉ.कुमार सप्तर्षी,तसेच ‘गांधी-आंबेडकर विचारांचा वारसा आणि महत्व’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार  युवराज मोहिते मार्गदर्शन करणार आहेत.’गांधी दर्शन’ विषयावरचे हे तिसरे शिबीर आहे. 

https://forms.gle/7HdWHS2ADp144WkTA  या गुगल फॉर्मवर नावनोंदणी करता येणार आहे.अधिक माहितीसाठी सुदर्शन चखाले (प्रकल्प प्रभारी) – ७८८७६३०६१५,संदीप बर्वे (विश्वस्त सचिव, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी  ) – ९८६०३८७८२७,सचिन पांडुळे (अध्यक्ष, युवक क्रांती दल पुणे शहर) – ९०९६३१३०२२ यांच्याशी संपर्क साधता येईल.शिबिरासाठी शंभर रुपये नोंदणी शुल्क आहे. त्यात शिबिरस्थळी नाश्ता,चहा आणि भोजनाचा समावेश आहे.  

देहू ते पंढरपूर वारीमध्ये‘आनंदडोह – आनंदवारी’ संपन्न होणार!

पुणे-देहूहून पंढरपूरला जाणाऱ्या वारी सोबत यंदा जगद्गुरू संत तुकारामांचे जीवन एकपात्री प्रयोगातून सादर करण्याचा अनोखा ‘आनंदडोह – आनंदवारी’ उपक्रम यंदा आयोजित करण्यात आला आहे. अभिनेते योगेश सोमण यांच्या सुमारे पावणेदोन तासांच्या या कार्यक्रमाचे आयोजन संवाद – पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीयसेवा योजनेचे विद्यार्थी आणि राज्यच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने संपन्न होत आहे. याकामी निकिता मोघे, हरी चिकणे आणि मंदार चिकणे यांचा सहभाग लाभत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवार दि. ९ जून रोजी सायं. ५.०० वाजता श्री क्षेत्र देहू येथील सुजन फाउंडेशनचे अभंग इंग्लिश मीडियम स्कूलमधील गाथा मंदिर येथे भव्यतेने संपन्न होईल. याचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील करतील. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. याप्रसंगी देहू संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी प्रमुख सर्व श्री संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे आणि अनिल महाराज मोरे, निमंत्रक प्राध्यापक विकास कंद, राष्ट्रसेवा योजनेचे सल्लागार समिती सदस्य राजेश पांडे, राष्ट्रसेवा योजनेचे संचालक प्राध्यापक डॉ. सदानंद भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील अशी माहिती संयोजक संवाद – पुणेचे अध्यक्ष सुनिल महाजन आणि राष्ट्रसेवा योजनेचे सल्लागार राजेश पांडे यांनी दिली.

या ‘आनंदडोह – आनंदवारी’ कार्यक्रमात अभिनेते योगेश सोमण संत तुकारामांच्या वेशभूषेत संत तुकारामांच्या जिवनाचे अर्थ विविध प्रसंगाचे निरुपण करून सादर करतील. अतिशय ओघवत्या भाषेत सादर होणारा हा कार्यक्रम पावणेदोन तासांचा आहे. देहू, पुणे, लोणी, सासवड, वरवंड, इंदापूर, अकलूज, वेळापूर, वाडी पुरवली आणि पंढरपूर या पालखीच्या मुक्कामाच्या गावांमध्ये तेथील महाविद्यालयांच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न होईल. यासाठीचे स्थानिक व्यवस्थापन या सर्व गावांमधील महाविद्यालयाचे प्राचार्य करणार आहेत. या ‘आनंदडोह’ कार्यक्रमात संत तुकारामांचे विचार अतिशय ओघवत्या भाषेत मांडले आहेत. या बरोबरच त्यांच्या संपूर्ण जीवनाचा वेधही अत्यंत प्रासादिक भाषेत घेण्यात आला आहे. याचे लेखन श्री. योगेश्वर, दिग्दर्शन श्री. आनंद स्वरूप, संगीत केदार दिवेकर, रंगमंच व्यवस्था धवल पाठक, अक्षय पाटणकर आणि सादरकर्ते अभिनेते योगेश सोमण आहेत.

या ‘आनंदडोह’ कार्यक्रमाच्या मार्गावरील ठिकठिकाणच्या गावांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे २०० महाविद्यालयीन विद्यार्थी व्यवस्थापनाची धुरा सांभाळतील व तसेच संपूर्ण देहू ते पंढरपूर या वारी प्रवासात हे विद्यार्थी सोबत असतील. या अनोख्या कार्यक्रमाची माहिती देहू पासून पंढरपूरपर्यंतच्या मार्गावरील सर्व गावांमध्ये देण्यात आलेली असून वारकरी व प्रेक्षक या सर्वांना हा कार्यक्रम विनामुल्य असेल. गावोगावी या कार्यक्रमाची उत्सुकता वारकरी व गावकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.

भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला क्षण म्हणजे … ‘६ जून १६७४’.

छत्रपतींच्या कार्यकर्तृत्वाची असामान्य गाथा सिंहासनाधिश्वर रुपेरी पडद्यावर

छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला शिवराज्याभिषेक सोहळा…

शिवराज्याभिषेक म्हणजे  पारतंत्र्याच्या जोखडातून रयतेला मुक्त करीत, अभिमानाने स्वातंत्र्याचा श्वास घेण्याची संधी मिळाली तो क्षण… माझ्या राजासारखा राज्यकर्ता असावा हे अभिमानाने, छाती फुगवून जगाला ओरडून सांगण्याचा क्षण…  भारतीयांनाच नव्हे तर सर्व जगाला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली तो क्षण… प्रतिकूल परिस्थितीतही आपण शत्रूशी सामना करु शकतो ही जिद्द निर्माण करणारा क्षण…  

शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले, राज्याभिषेक करवून घेतला, अखंड हिंदुस्थानाला राजा मिळाला या प्रेरणादायी इतिहासामुळेच पुढे कित्येक वर्षे राजा नसतानाही रयतेने धैर्याने संकटाचा मुकाबला केला. आताच्या शतकातही कित्येकांच्या आयुष्यात उमेद निर्माण करणाऱ्या या सुवर्णक्षणाला यावर्षी ३५० वर्षे  पूर्ण होत आहेत. या वर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला तिथी प्रमाणे २ जून २०२३ रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात शिवाजी महाराजांच्या दरबारात, राजसदरेवर शकील प्रॉडक्शन्स निर्मित सिंहासनाधिश्वर या भव्य मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली सोबत चित्रपटाच्या दिमाखदार पोस्टरचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित निर्माते श्री.शकील खान यांची निर्मिती असलेला आणि श्री.विजय राणे दिग्दर्शित करीत असलेला सिंहासनाधिश्वर हा चित्रपट जून २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. याप्रसंगी श्री.नितीन पावले, कार्याध्यक्ष – शिवराज्याभिषेक सोहळा,  श्री.सुनील पवार, अध्यक्ष – श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड आणि पदाधिकारी उपस्थित होते.  

शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमाची आठवण आपापल्या स्वार्थासाठी, सोयीनुसार सगळ्यांनीच केली परंतु महाराजांनी रयतेसाठी केलेल्या कार्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंगातून आताच्या पिढीने नेमके काय घ्यावे हे मांडण्याचा प्रयत्न निर्माता आणि दिग्दर्शक सिंहासनाधिश्वर चित्रपटातून करणार आहेत. ३५० वर्षांपूर्वीचा महाराजांचा भव्यदिव्य शिवराज्याभिषेक सोहळाही या चित्रपटात  पहायला मिळणार आहे. 

हिंदी चित्रपट, अनेक मालिका आणि शॉर्ट फिल्म्सच्या निर्मितीनंतर शकील खान यांनी ‘सिंहासनाधिश्वर या मराठी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. ‘राजा शिवछत्रपती’, ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’, अशा वेगवेगळ्या मालिका देव अवतारी बाळूमामा, पॉवर, रुदन यांसारखे चित्रपट आणि असंख्य इव्हेंटच्या माध्यमातून विजय राणे यांनी आपली दिग्दर्शकीय चुणूक दाखविली असून आगामी सिंहासनाधिश्वर या भव्य चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाची असामान्य गाथा रसिकांना पहायला मिळणार आहे.