पुणे, दि. ०५ जून २०२३: महावितरणच्या प्रामुख्याने छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प, मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनसह विविध योजना व ग्राहकसेवांची माहिती देणाऱ्या पाच दिवसीय सौर रथयात्रेचा सोमवारी (दि. ५) मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते प्रारंभ झाला. या सौर रथयात्रेद्वारे येत्या ९ जूनपर्यंत पुणे परिमंडल अंतर्गत सर्वच ४१ उपविभाग कार्यालयांच्या क्षेत्रात वीजग्राहकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.
महावितरणचा दि. ६ जूनला १८ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त पुणे परिमंडलाकडून दि. ५ ते ९ जूनपर्यंत विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये आज पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सौर रथयात्रेला प्रारंभ झाला. रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी झेंडा दाखवून या यात्रेचा शुभारंभ केला. यावेळी अधीक्षक अभियंता सर्वश्री अरविंद बुलबुले, युवराज जरग, संजीव राठोड तसेच ‘मास्मा’चे अध्यक्ष रोहन उपासनी, सचिव स्वप्नील बाथे, प्रदीप कुलकर्णी, संजय कुलकर्णी, समीर गांधी, योगेश गोसावी, सुनील मुसळे, श्रीधर भामधिपती यांच्यासह महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महावितरण व महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशनचे यांच्या सहकार्याने छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.०, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन तसेच महावितरणच्या विविध ग्राहकसेवा, वीजबचतीचे उपाय, वीजसुरक्षा आदींबाबत जनजागृती करण्यात येणार आहे तसेच माहितीपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. पुणे परिमंडलातील शहरी व ग्रामीण भागातील सर्वच ४१ उपविभागांमध्ये हा रथ जाणार आहे. या यात्रेचे समन्वयक म्हणून उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटनी काम पाहत आहे.
पर्यावरण दिनानिमित्त इ-बाईक रॅली- महावितरण व ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनच्या वतीने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रास्तापेठ येथून गणेशखिंडपर्यंत इ-बाईक रॅली काढण्यात आली. अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलेबुले यांच्यासह या रॅलीमध्ये ४५ जण इ-बाइकसह सहभागी झाले होते. मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेशखिंड येथे रॅलीचा समारोप झाला. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले व श्री. संजीव राठोड, कार्यकारी अभियंता भागवत थेटे, संजय वाघमारे तसेच एनर्जी असोसिएशनचे विवेक सुतार, मुकुंद कमलाकर, अनुराधा ठाकूर, संतोष सुराणा आदींसह अभियंता, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.