Home Blog Page 1508

सुदर्शन मित्र मंडळातर्फे पुनीत बालन यांचा विशेष सन्मान

कोविड काळात आणि त्यानंतरही गणेशोत्सव मंडळांना दिलेल्या पाठबळाबद्दल कृतज्ञता

पुणे : कोविडच्या संकटामुळे कोणतेही उत्सव आर्थिक पाठबळ नसल्याने उत्साहाने साजरे झाले नाहीत. गणेशोत्सव हा केवळ पुण्याचा नव्हे, तर महाराष्ट्राचा मानबिंदू. मात्र, कोविड संकटामुळे गणेशोत्सव मंडळांनाही आर्थिक पाठबळ न मिळाल्याने कार्यकर्ते हतबल झाले होते. अशा परिस्थितीत व त्यानंतरही गणेशोत्सव मंडळांना दिलेल्या पाठबळाबद्दल उद्योजक पुनीत बालन यांचा विशेष सन्मान फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील सुदर्शन मित्र मंडळातर्फे करण्यात आला. यावेळी डॉ.शैलेश गुजर, सुदर्शन मित्र मंडळाचे अध्यक्ष शाम मारणे,  विनोद चव्हाण, प्रमोद पवार, रुपेश कापडे, योगेश धुमाळ, प्रमोद चव्हाण ,सतीश पिल्ले यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. पुणेरी पगडी, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे सन्मानाचे स्वरूप होते.
डॉ. शैलेश गुजर म्हणाले, पुण्याच्या गणेशोत्सवाला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. अखंडितपणे अत्यंत उत्साहात हा उत्सव दरवर्षी केला जातो. मात्र कोविडच्या काळात याला काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या. त्यावेळी विघ्नहर्त्याप्रमाणे पुनीत बालन यांनी गणेश मंडळांना मदतीचा हात दिला. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला. शाम मारणे म्हणाले, कोविड काळात आणि त्यानंतरही गणेशोत्सव मंडळांना मिळणा-या वर्गणी व देणगीचा ओघ अत्यंत कमी झाला होता. त्यामुळे सण-उत्सव साजरे करणे, सामाजिक उपक्रम राबविणे जवळपास बंद झाले. अशा वेळी आॅक्सिरिच आणि पुनीत बालन यांनी मदतीचा हात दिल्याने श्री गणेशाची विधीवत स्थापना, सजावट, मिरवणुका काढणे शक्य झाले. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक क्षेत्रात म्हणजेच गणेशोत्सवाप्रती दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

२० लाखांवर वीजग्राहकांचा ५६५ कोटींचा भरणा,‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यात पुणेकरांची भरारी

पुणे, दि. ०५ जून २०२३: महावितरणच्या पुणे परिमंडलातील वीजग्राहकांनी ‘ऑनलाइन’ भरणा करण्यामध्ये राज्यात आघाडी कायम ठेवली आहे. गेल्या मे महिन्यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिकसह इतर २० लाख १५ हजार लघुदाब वीजग्राहकांनी रांगेत उभे न राहता व सुरक्षितपणे ५६४ कोटी ९९ लाख रुपयांचा ‘ऑनलाइन’द्वारे भरणा केला आहे.

पुणे परिमंडलामध्ये गेल्या एप्रिल ते सप्टेंबर २०२२पर्यंत लघुदाब वर्गवारीतील सरासरी १७ लाख ४१ हजार ८६० वीजग्राहक दरमहा ‘ऑनलाइन’ वीजबिल भरणा करीत होते. ही संख्या ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२पर्यंत १८ लाख ६४ हजार ८२० वर गेली. त्यानंतर जानेवारी ते मे २०२३ पर्यंत सरासरी दरमहा ग्राहकांची संख्या २० लाख २१ हजार १३० वर गेली आहे. ‘ऑनलाइन’ बिल भरण्यास पुणे परिमंडलामध्ये वीजग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि दरमहा सरासरी १ लाख ५६ हजार ३३० वीजग्राहकांची गेल्या ५ महिन्यांमध्ये वाढ झाली आहे.

गेल्या मे महिन्यात पुणे शहरातील ११ लाख ३० हजार २२५ लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांनी ३१२ कोटी ८७ लाख रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. यामध्ये महावितरणच्या बंडगार्डन विभागातील सर्वाधिक १ लाख ९१ हजार ९१३ ग्राहकांचा समावेश आहे. उर्वरित शिवाजीनगर, कोथरूड, नगररोड, पद्मावती, पर्वती व रास्तापेठ विभागांमध्ये सरासरी १ लाख ५६ हजार ३८५ वीजग्राहकांनी ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यास पसंती दिली आहे.

तसेच पिंपरी चिंचवड शहरामध्ये मे महिन्यात लघुदाब ५ लाख २८ हजार ६४ ग्राहकांनी १४९ कोटी १० लाखांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. पुणे परिमंडलामध्ये ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यात पिंपरी चिंचवड शहर आघाडीवर आहे. गेल्या महिन्यात या शहर अंतर्गत पिंपरी विभागातील ३ लाख ८ हजार ११६ तर भोसरी विभागातील २ लाख १९ हजार ९४८ ग्राहकांनी ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. पुणे ग्रामीणमध्ये रांगेत उभे न राहता ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यास प्रतिसाद वाढला आहे. यात गेल्या महिन्यात आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यातील ३ लाख ५६ हजार ९४५ ग्राहकांनी १०३ कोटी २ लाख रुपयांचा सुरक्षितपणे भरणा केला आहे.

महावितरणकडून प्रामुख्याने बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहण्याऐवजी किंवा कार्यालयीन वेळेतच वीजबिल भरण्याऐवजी ‘ऑनलाइन’द्वारे घरबसल्या व २४ तास वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यासाठी घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक व इतर लघुदाब ग्राहकांना www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅप उपलब्ध आहे. त्यामुळे एकाच नोंदणीकृत खात्यातून स्वतःच्या एकापेक्षा अधिक कुठल्याही वीजजोडण्यांचे बिल ‘ऑनलाइन’ भरणे तसेच सर्व वीजजोडण्यांच्या वर्षभरातील मासिक बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती संगणकात किंवा मोबाईलमध्ये जतन करण्याची सोय उपलब्ध आहे.   

लघुदाब वीजग्राहकांनी क्रेडिट/डेबीट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकींग, मोबाईल वॉलेटदवारे ‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. तसेच क्रेडिट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्यांयाद्वारे ‘ऑनलाइन’द्वारे होणारा बिल भरणा आता नि:शुल्क आहे. विशेष म्हणजे ‘ऑनलाइन’ वीजबिल भरणा केल्यानंतर लगेचच संबंधीत ग्राहकांना मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे पोच देण्यात येत आहे.

मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार – पुणे परिमंडलातील वीजग्राहकांची ‘गो-ग्रीन’ योजनेत व ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यात राज्यामध्ये आघाडी कायम आहे. ‘गो-ग्रीन’मध्ये इमेलद्वारे प्राप्त झालेले वीजबिल तसेच ‘ऑनलाइन’ भरणा केलेली पावती मोबाईल किंवा संगणकात जतन करून ठेवता येते व कधीही प्रिंट काढता येते. त्यामुळे जास्तीत जास्त वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेला व ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यास प्रतिसाद द्यावा.

शिवसेनेच्या वर्धापन दिनी म्हणजेच 19 जूनपूर्वी राज्य मंत्रिमंडळ विस्तार करावा अमित शहांकडे एकनाथ शिंदेंचा आग्रह

शिवसेनेच्या वर्धापन दिनी म्हणजेच 19 जून पूर्वी राज्य मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर धरला आहे. त्यामुळे आता 19 जून पूर्वी किंवा 19 जून याच दिवशी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, राज्यातील शिवसेनेच्या एकूण आमदारंपैकी नाराज असलेल्या आमदार संख्या पाहता मंत्रिमंडळ विस्तारानंतरही शिवसेनेत पुन्हा एकदा फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शंदे यांनी म्हटले पुढील निवडणुका आम्ही भाजपा समवेत एकत्र लढणार

कृषि, सहकारसहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री श्री. शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली. राज्यात आगामी सर्व निवडणूका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार….असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे

दरम्यान राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच्यानंतर मात्र, शिवसेनेचे अनेक आमदार नाराज होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद न मिळाल्यामुळे काही आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. या वेळी तर आम्हाला संधी मिळेल, अशी अपेक्षा असणारे शिवसेनेत अनेक आमदार आहेत. त्यामुळे या वेळी मंत्रिमंडळ विस्तारानंतर होणाऱ्या घटना – घडामोंडीकडे लक्ष्य द्यावे लागणार आहे.

छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाठ यांनी शिंदे यांच्या बंडाच्या काळात प्रमुख भूमिका निभवली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर संजय शिरसाट यांचे मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र तरी देखील शिरसाट यांना डावलण्यात आले. आता मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या ते मंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.असे असले तरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या 3 मंत्री आहेत. त्यामुळे एकाच जिल्ह्याला एवढी मंत्रिपदे मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे एकतर आधीच्या मंत्र्याला डच्चू मिळून संजय शिरसाट यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. किंवा त्यांना या वेळी देखील हुलकावणी मिळू शकते.जळगाव जिल्ह्यामध्ये गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील आणि आमदार किशोर पाटील यांच्यासह एक महिला मंत्री म्हणून लता सोनवणे यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात महिलांना संधी दिली जाण्याची शक्यता असल्यामुळे लता सोनवणे यांचा दावा प्रबळ मानला जात आहे.शिरोळचे आमदार आणि माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष असूनही शिवसेनेकडून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते. तरीदेखील त्यांनी बंड करत एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. त्यामुळे राजेंद्र पाटील हे देखील मंत्रीपदाचे कट्टर दावेदार मानले जात आहे.

शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. ५ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात  वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने भारतीय टपाल  विभागाच्या सहकार्याने एक टपाल  तिकीट  काढण्याचा निर्णय घेतला आहे.  येत्या मंगळवारी,6 जून रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथील दरबार हॉलमध्ये  समारंभपूर्वक या  तिकिटाचे अनावरण होणार आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री  सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे,  सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, राज्यपालांचे सचिव संतोषकुमार  प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

‘छत्रपती शिवाजी महाराज‘ हा शब्द चेतनेचा संचार करणारा प्रेरणामंत्र आहे. कित्येक राष्ट्रनायकांना लढण्याची आणि विजयाची प्रेरणा देणारे अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असून त्यांचा विचार जगभरात  जनाजनांत आणि मनामनांत पोहोचविण्याचा दृढ निश्चय राज्य शासनाने केला आहे. याचाच एक भाग म्हणून  महाराजांवरील पोस्ट तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

शिवराज्याभिषेकाचे महत्व अधिक ठळकपणे अधोरेखित करण्याचा राज्य शासनाचा विचार असून राजमाता माँ जिजाऊ यांची यामागील भावना, संकल्पना लोकांपर्यंत पोहोचण्याचा यामागील उद्देश आहे. महाराजांच्या काळांतील नाणी, गडकिल्ले, अष्टप्रधान मंडळ प्रत्येक गोष्ट ही प्रेरणादायी आहे; या प्रेरक गोष्टी सर्वांपर्यंत सहजपणे पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

शिववंदना कार्यक्रमाचे आयोजन

टपाल तिकीट अनावरणानंतर सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने ‘शिववंदना’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अहमदनगरच्या संदलमध्ये औरंगजेबाचे पोस्टर,फडणवीस म्हणाले या कृत्याला माफी नाही

0

अहमदनगर-सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो घेऊन एक तरुण नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ अहमदनगरचा असून संदल मिरवणूक काढण्यात आलेली असताना औरंगजेबाचे पोस्टर्स झळकवत काही युवकांनी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप होत आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकारची भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, औरंगजेबाचे फोटो जर कोणी झळकवत असेल तर ते इथे मान्य केले जाणार नाही. या देशात, या महाराष्ट्रात आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहेत. कोणीही औरंग्याचे नाव घेत असेल तर त्याला माफी मिळणार नाही.

अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी होळकरनगर करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. मात्र, त्यामुळेच अहमदनगरचे वातावरण खराब करण्यासाठीच अशा प्रकारे औरंगजेबाचे फोटो झळकवले जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

औरंगाबादच्या पोस्टच्या माध्यमातून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून यातून दंगली घडवण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. याप्रकरणी तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याची मागणी देखील शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

अहमदनगर येथील उरूस मिरवणुकीत औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्या चार जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या चौघांचा शोधदेखील पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये शहरातील फकीरवाडा परिसरात दमबारा हजारी दर्ग्याचा सदंल उरुस साजरा करत असताना काही तरुण डीजेच्या तालावर नाचत औरंगजेबाचे फोटो हातात घेऊन बाप तो बाप होता है, बेटा तो बेटा होता है, अशा घोषणा देऊन दोन समाजात जातीय तेढ निर्माण होऊन द्वेष पसरेल असे कृत्य केल्याच्या आरोपावरून मोहमंद सर्फराज इब्राहिम सय्यद उर्फ सर्फराज जहागिरदार, अफनान आदिल शेख, शेख सरवर आणि जावेद शेख या तरुणांवर भिंगार पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वी. 505 (2), 298, 34 प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्वतः पोलीस या ठिकाणी फिर्यादी झाले असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे, तर या प्रकारामुळे शहरामधील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

शिरूर:विलास लांडेंचा पत्ता कट,अमोल कोल्हेच लढणार; शरद पवारांचे शिक्कामोर्तब

मी फक्त इच्छा व्यक्त केली-विलास लांडे

पुणे-शिरूर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या उमेदवारी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे कोल्हेंना दिलासा मिळाला आहे.

शिरूर लाेकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेमकी उमेदवारी काेणाला मिळणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या हाेत्या. विद्यमान खासदार डाॅ. अमाेल काेल्हे यांनी आपण पुन्हा लाेकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले हाेते. मात्र, भाेसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनीही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने सदर दाेघात चुरस निर्माण झाली हाेती.

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातल्या निर्सग मंगल कार्यालय येथे साेमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवार यांचे उपस्थितीत पक्षातील महत्त्वपूर्ण नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी शिरूर लाेकसभा मतदारसंघाचे अनुषंगाने आढावा घेण्यात आला आणि त्यावर मतदारसंघातील प्रमुख नेत्यांशी विचार विनिमय झाला. यावेळी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत पवार यांनी आगामी २०२४ च्या लाेकसभा निवडणुकीसाठी शिरूर मतदारसंघातून डाॅ. अमाेल काेल्हे यांच्या नावावर शिक्कामाेर्तब केले. त्यामुळे काेल्हे यांना दिलासा मिळाला असून, पक्षांर्तगत गटबाजी राेखण्यात त्यांना यश आले आहे.

याबाबत डाॅ. अमोल काेल्हे म्हणाले की, पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक् पार पडली. 2019 मध्ये सर्व कार्यकर्ते, नेत्यांनी ताकदीने निवडणूक लढविण्यास मला मदत केली. माजी आमदार विलास लांडे हे ज्येष्ठ नेते असून त्यांची साथ आमच्यासाठी महत्त्वाची आहे. गेल्या निवडणुकीत भाेसरी मतदारसंघात विलास लांडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हाेती. तशाचप्रकारे आगामी निवडणुकीत त्यांची साथ माझ्यासाठी बहुमूल्य आहे. निवडणुक लढविण्यासाठी काेणी इच्छा व्यक्त करणे यात काेणतेही गैर नाही.

विलास लांडे म्हणाले की, शरद पवार यांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे. संसदपटू व उत्कृष्ट वक्ता, अभिनेता म्हणून डाॅ. काेल्हे हे परिचित आहेत. मला 2009 मध्ये लाेकसभा निवडणुकीचे तिकीट दिले हाेते. 2019 मध्ये मला पुन्हा तिकिट दिले जाणार हाेते. परंतु ऐनवेळी डाॅ. अमोल काेल्हे यांचा प्रवेश झाला आणि त्यांना तिकीट दिले गेले. उमेदवारीसाठी मी केवळ इच्छा व्यक्त केली हाेती. याबाबत पवार यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तिकीट प्रश्नावर पडदा पडलेला आहे.

राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे भारतीय बालकल्याण परिषदेचे आवाहन

मुंबई, दि. ५ : भारतीय बालकल्याण परिषद (इंडियन कौन्सिल फॉर चॉइल्ड वेल्फेअर अर्थात आयसीसीडब्ल्यू) नवी दिल्लीतर्फे दरवर्षी मुलांनी बजावलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यात येतात. २०२३ च्या पुरस्कारांसाठी १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय बालकल्याण परिषदेतर्फे गेल्या ६६ वर्षांपासून हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी विविध स्त्रोतांकडून शिफारशी प्राप्त होतात. मात्र, ज्या बालकांच्या शौर्याची नोंद घेण्यात आलेली नाही, अशा मुलांचे धाडस आणि पराक्रमाचे कौतुक व्हावे म्हणून अर्ज मागविण्यात आले आहेत. सन २०२३ च्या पुरस्कारांची अधिक माहिती आणि नामांकन अर्जासाठी www.iccw.co.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जीवाला धोका किंवा शारीरिक दुखापत होण्याचा धोका असताना असामाजिक तत्व, गुन्हेगारांविरुद्ध धाडसाने कृती करणाऱ्या बालकांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात येणार आहे. त्यांच्यापासून अन्य बालकांना नि:स्वार्थ सेवेची प्रेरणा मिळावी, म्हणून हे पुरस्कार देण्यात येतात. अर्जदाराने अर्जासमवेत त्याने बजावलेल्या शौर्याची माहिती देणारे वर्णन २५० शब्दांत द्यावयाचे आहे. त्याच्या पुराव्यासाठी वृत्तपत्रीय कात्रण, प्रथम माहिती अहवालाची (एफआयआर) प्रत, घटनेविषयी दोन सक्षम अधिकाऱ्यांनी साक्षांकित केलेली कागदपत्रे जोडावीत. बालकाचे वय ६ ते १८ वर्षांदरम्यान असावे. बालक ज्या शाळेत शिक्षण घेत आहे, त्या शाळेचे मुख्याध्यापक, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्य बालकल्याण परिषदेचे सरचिटणीस, जिल्हाधिकारी किंवा समपदस्थ अधिकारी, पोलिस अधिकारी यापैकी दोन जणांची शिफारस जोडणे आवश्यक आहे. १ जुलै २०२२ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत घटना घडलेली असावी.

राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची निवड भारतीय बालकल्याण समितीतर्फे गठित उच्चाधिकार समितीच्या माध्यमातून करण्यात येते. अर्ज सादर केला म्हणजे निवड होईलच, असे नाही. कोणत्याही कारणास्तव नाकारलेले अर्ज पुन्हा विचारात घेतले जाणार नाहीत. पुरस्कारासाठी आलेला अर्ज निवड समितीला योग्य वाटला, तर ते आपल्या विवेक बुद्धीनुसार अटी, नियम शिथिल करण्याचा विचार करू शकतात. निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. सुवर्ण, रौप्य पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप राहील. पुरस्कारांची  सविस्तर माहिती अशी (कंसात पुरस्काराची रक्कम) : भारतीय बालकल्याण परिषद भारत पुरस्कार (१ लाख रुपये), भारतीय बाल कल्याण परिषद ध्रुव पुरस्कार (७५ हजार रुपये), भारतीय बाल कल्याण परिषद मार्केंडेय पुरस्कार (७५ हजार रुपये), भारतीय बाल कल्याण परिषद श्रावण पुरस्कार (७५ हजार रुपये), भारतीय बाल कल्याण परिषद प्रल्हाद पुरस्कार (७५ हजार रुपये), भारतीय बाल कल्याण परिषद एकलव्य पुरस्कार (७५ हजार रुपये), भारतीय बाल कल्याण परिषद अभिमन्यू पुरस्कार (७५ हजार रुपये), सर्वसाधारण पुरस्कार (४० हजार रुपये). एकूण २५ पुरस्कार देण्यात येतील.

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्यांना त्यांचे शालेय शिक्षण होईपर्यंत आर्थिक मदत केली जाते. तसेच पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, व्यावसायिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्थसाहाय्य केले जाते. अर्जाची प्रत राज्याच्या बालकल्याण समितीकडे पाठविणे आवश्यक आहे. त्याचा पत्ता असा : सचिव, महाराष्ट्र राज्य बालकल्याण परिषद, बाल भवन, चौधरी संकुल नाशिक- पुणे महामार्ग, पळसे, ता. जि. नाशिक” ४२२२१०१ (महाराष्ट्र), ई- मेल आयडी : presidentmsccw@gmial.com, rkjadhav1948@gmail.com येथे पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रिलायन्सच्या सोन्याच्या शोरूमवर भर दिवसा दरोडा,13 कोटीची लुट , १५ किलो सोने,दीडशे विविध रत्ने पोत्यात भरून गोळीबार करत पसार

सांगली-मिरज रस्त्यावरील रिलायन्स कंपनीच्या सोन्याच्या शोरूमवर भरदिवसा रविवारी दुपारी ३ वाजता आठ दरोडेखोरांनी गोळीबार करत सशस्त्र दरोडा टाकला. यामध्ये त्यांनी जवळपास कोटी रुपयांची लूट केली. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात एक ग्राहक जखमी झाला. सांगली पोलिसांनी जिल्ह्याची तातडीने नाकेबंदी केली आहे. याप्रकरणी पोलिस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. सांगली-मिरज हमरस्त्यावरील मार्केट यार्ड चौकात व जिल्हा पोलिस मुख्यालयापासून अवघ्या दोन हजार फुटांवरील रिलायन्सच्या शोरूममध्ये रविवारी दुपारी ३ वाजता दरोडेखोर ग्राहक म्हणून शिरले.

आठ दरोडेखोरांनी आत प्रवेश करून रिलायन्सच्या व्यवस्थापकाला पोलिस असल्याचे सांगत दुकानची तपासणी करायची म्हणत धमकावले. त्यानंतर शोरूममधील ग्राहकांना बाहेर काढले. त्याच वेळी दुकानातील सुमारे २० कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून त्यांना एका खोलीत डांबले. काही कर्मचाऱ्यांनी विरोध करताच त्यांच्यावर गोळीबार केला. यात दुकानातील एक ग्राहक जखमी झाला. दरोडेखोरांनी दुकानातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. तसेच पोलिसांना माग काढता येऊ नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज जमा होणारे ५ पैकी ४ उपकरणेही दरोडेखोरांनी पळवली आहेत.


रिलायन्सच्या शोरूममधील जवळपास १५ किलो सोने दरोडेखोरांनी पोत्यात भरले. तसेच जवळपास दीडशे विविध रत्ने पेटीत टाकून पुन्हा गोळीबार करत पसार झाले. सोने व ३-४ कोटींची रत्ने दरोडेखोरांनी लुटली आहेत. रात्री उशिरापर्यंत दुकानात शिल्लक असलेल्या किरकोळ स्टॉकची मोजणी सुरू होती. दरोड्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेलींसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरोडेखोर एका स्कॉर्पिओ गाडीतून घटनास्थळी आले होते. दरोडेखोर सोलापूर किंवा कर्नाटकाकडे पळाले असल्याचा अंदाज आहे.

मुंबई विमानतळावर सुमारे 6.2 कोटी रुपये किमतीचे 10 किलो सोने केले जप्त, 2 जण ताब्यात

नवी दिल्‍ली, 4 जून 2023

महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) मुंबईने 3 आणि 4  जून 2023 रोजी दोन वेगवेगळ्या कारवाईत 10 किलोग्राम सोने जप्त केले आहे.

पहिल्या प्रकरणात शारजाहून मुंबईत एयर इंडिया एक्स्प्रेस फ्लाईट क्रमांक IX 252 ने आलेल्या दोन प्रवाशांना  विशिष्ट माहितीच्या आधारे, विमानतळावर थांबवण्यात आले. या प्रवाशांची तपासणी केल्यावर अंगाभोवती गुंडाळलेल्या कपड्यांमध्ये  8 किलो वजनाचे 24 कॅरेटचे परदेशी शिक्का  असलेले सोन्याचे 8 बार सापडले. याविषयीच्या अधिक माहितीच्या आधारे तातडीने कारवाई  करत या प्रवाशाच्या आणखी एका साथीदाराला ताब्यात घेण्यात आले. 8 किलो वजनाचे 4.94 कोटी रुपयांचे सोने बारच्या स्वरुपात आढळले. पहिल्या प्रकरणात तीन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

दुसऱ्या प्रकरणात दुबईवरून येत असलेल्या एका भारतीय नागरिकाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3 जून 2023 रोजी चौकशीसाठी थांबवण्यात आले आणि त्याच्या सामानाची तपासणी केली असता  56 लेडीज पर्स त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आल्या.  या सर्व लेडीज पर्सच्या धातूच्या पट्ट्यांमध्ये चंदेरी रंगाच्या धातूच्या तारांच्या स्वरुपात 24 कॅरट सोने लपवण्यात आल्याचे आढळले. ताब्यात घेतलेल्या या सोन्याच्या तारांचे निव्वळ वजन 2005 ग्रॅम होते आणि त्यांची अंदाजे किंमत सुमारे रु.1,23,80,875/- इतकी होती. या प्रकरणातील संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या प्रकरणात वरवर पाहता सुशिक्षित व्यक्तींचा सोन्याच्या तस्करीचे नियोजन आणि कृतीमध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे आढळले.

या दोन्ही प्रकरणात गुन्हे करण्याचे पूर्णपणे नवे प्रकार दिसून आले, ज्यातून डीआरआय अधिकाऱ्यांना सोन्याच्या तस्करी करणाऱ्या गटांच्या तपासणीमध्ये नियमितपणे निर्माण होत असलेली आव्हाने समोर आली.  परदेशी शिक्के असलेल्या आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त करण्यात आलेल्या चंदेरी रंगाच्या धातूच्या तारांच्या स्वरुपात लपवलेले 24 कॅरट सोने,  सोन्याच्या तस्करीच्या विरोधात सुरू असलेल्या लढ्यामधली  ठळक घटना ठरली आहे.

या दोन्ही कारवाईत 6.2 कोटी रुपयांचे एकूण 10 किलो सोने जप्त करण्यात आले आणि संबंधित प्रकरणांमध्ये 4 प्रवाशांना अटक करण्यात आली. या प्रकरणात पुढील चौकशी सुरू आहे.

पिंपरी, भोसरी, चाकणमध्ये दीड तासांपर्यंत भारनियमन

पुणे, दि. ०४ जून २०२३: विजेची मागणी वाढल्यामुळे महापारेषणचे ४०० केव्ही क्षमतेच्या अतिउच्चदाब (EHV) चाकण व लोणीकंद उपकेंद्रामध्ये अतिरिक्त वीजभार निर्माण झाला. परिणामी चाकण व लोणीकंद उपकेंद्र अतिभारित (ओव्हरलोड) होण्याचा धोका टाळण्यासाठी स्वयंचलित यंत्रणेद्वारा काही अतिउच्चदाब उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे पिंपरी, चिंचवड गाव, भोसरी एमआयडीसी व गावठाण, मोशी, नाशिक रोड तसेच चाकण एमआयडीसी अंतर्गत काही गावांचा वीजपुरवठा रविवारी (दि. ४) दुपारी २.३० नंतर अर्धा ते दीड तासांपर्यंत बंद ठेवण्यात आला होते.

याबाबत माहिती अशी, की विजेच्या वाढलेल्या मागणीमुळे महापारेषण कंपनीचे चाकण व लोणीकंद ४०० केव्ही अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रामध्ये विजेचा भार मोठ्या प्रमाणात वाढला. या अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रामधील विजेच्या अतिरिक्त भाराचे व्यवस्थापन शक्य नसल्याने दुपारी २.३० च्या सुमारास स्वयंचलित यंत्रणेद्वारे विजेचे भारनियमन करण्यात आले. यामुळे पिंपरी विभाग अंतर्गत चिंचवड गाव, रावेत, वाल्हेकरवाडी, ताथवडे, पुनावळे, थेरगाव, वाकड व पिंपरीच्या काही भागात दीड तास, भोसरी विभाग अंतर्गत भोसरी, नाशिकरोड, मोशी व भोसरी एमआयडीसीमधील भागात सुमारे एक तास तसेच राजगुरुनगर विभाग अंतर्गत चाकम एमआयडीसीमधील नानेकरवाडी, कुरुळी, चिमळी, म्हाळुंगे, निघोजे, खालुंब्रे, सावरदरी, वासुली, शिंदे, बांभोली, वराळे, येलवडी, सांगुर्डी या गावांमधील रहिवासी, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा ३.३० ते ४ वाजेपर्यंत अर्धा तास बंद ठेवावा लागला.

दरम्यान, वादळामुळे केसनंद येथे एका दुकानाचा लोखंडी पत्र्याचा फलक वीजखांबावर पडला. हा खांब वाकल्याने वीजवाहिन्या देखील तुटल्या. त्यामुळे केसनंद गाव व परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. या यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. तसेच महापारेषणच्या लोणीकंद ते काटापूर आणि लोणीकंद ते रांजणगाव या २२० केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांच्या आवश्यक दुरुस्ती कामामुळे दुपारी ४.३० वाजता वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे वढू खुर्द, तुळापूर, फुलगाव इस्टेट आदी परिसरातील सुमारे दोन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा रात्री ११ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येत आहे. 

नवीन संसद इमारत ही राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून उभे राहिलेले मंदिर – विनायक देशपांडे यांची भावना

पुणे, प्रतिनिधी,

नवी दिल्लीत उभी राहिलेली नवीन संसद इमारत ही स्वतंत्र भारताने स्व:तासाठी उभारलेली पहिली संसद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून आणि हजारो मजुरांच्या राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून लोकशाहीचे हे नवे मंदिर उभे राहिले. ही अप्रतिम देखणी वास्तू भावी पिढ्यांना मोठ्या प्रमाणात प्रेरणा व आत्मविश्वास देईल, असे मत नव्या संसद भवन प्रकल्पाचे मुख्य सल्लागार विनायक देशपांडे यांनी रविवारी व्यक्त केले.
स्मार्ट पुणे फाउंडेशनतर्फे पुण्यातील कोथरूडचे सुपुत्र असलेल्या देशपांडे यांच्या स्वागत व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही देशपांडे यांचा सत्कार केला. स्मार्ट पुणे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला यांनी प्रास्तविक केले. उत्तरार्धात प्रसिद्ध वास्तुविशारद केतन सुधीर गाडगीळ यांनी देशपांडे यांच्याशी संवाद साधला. नव्या संसद भवनाच्या निर्मितीची कथा जाणून घेतली.
नवी संसद ही केंद्र सरकारने हाती घेतलेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील मेरूमणी आहे. टाटा प्रोजेक्ट्सकडे हे काम आल्यानंतर आम्ही राष्ट्रीय कर्तव्य म्हणूनच याकडे पाहिले. भूमीपूजनावेळी पंतप्रधान मोदींच्या मनातील राष्ट्रप्रेमाच्या भावनेची सर्वांना जाणीव झाली. तीच भावना सर्वांच्या मनात उतरली. त्यामुळे देशाच्या विविध भागातून आलेल्या मजुरांपासून ते प्रकल्पात विविध टप्प्यांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच राष्ट्रीय कर्तव्य म्हणून काम केले. त्यामुळेच करोना व लॉकडाउनसारख्या आव्हानात्मक काळातही २८ महिन्यांच्या विक्रमी वेळेत हे काम पूर्ण झाले, असे देशपांडे म्हणाले. या काळातील आव्हाने, रात्रंदिवस केलेले काम, कामाचे व्यवस्थापन याचे बारकावेही देशपांडे यांनी उलगडले.
या नव्या इमारतीत भारतीय संस्कृती, भारतीय स्थापत्यकला आणि अत्याधुनिक स्थापत्यशास्त्राचा अनोखा मिलाफ आहे. विमल पटेल यांनी त्याचे आरेखन केले. तर सांस्कृतिक मंत्रालयाने कुठे काय असावे, याचे नियोजन केले. यासाठीच्या विविध वस्तू देशाच्या कानाकोपऱ्यातून आणण्यात आल्या. याशिवाय विविध राज्यातील कलाकारांनी त्याची कलाकुसर केली. त्यामुळे या वास्तूला राष्ट्रीय एकात्मकेचे प्रतीक म्हणता येईल. ही इमारत पर्यावरण पूरक, शाश्वत, भूकंपरोधी असून भविष्याचा विचार करून यात अधिक आसनक्षमता ठेवण्यात आली आहे. लोकसभेची रचना राष्ट्रीय पक्षी मोराप्रमाणे, राज्यसभेची रचना राष्ट्रीय फूल कमळाप्रमाणे आहे. बांधकाम सुरू असताना तीन वेळा पंतप्रधानांनी अचानक प्रकल्पस्थळी येऊन कामगारांशी आपुलकीने संवाद साधला. त्यांना काही अडचण नाही ना, त्यांना या प्रकल्पाविषयी काय वाटते हे जाणून घेतले. त्यामुळे त्यांना नवी ऊर्जा मिळाली. टाटा समूहाने दिलेला संपूर्ण पाठिंबा व देशभावनेतून कामाकडे पाहण्याची शिकवण महत्त्वाची ठरली. या राष्ट्रीय प्रकल्पाची जबाबदारी मला मिळाली, हे मी माझे परमभाग्यच समजतो, असे देशपांडे म्हणाले.
स्वतंत्र भारतासाठी नवी संसद उभारण्याची अनेकदा चर्चा झाली. पण फक्त नरेंद्र मोदीच आपल्या संकल्पनेतून ती साकार करू शकले. पुणेकर देशपांडे यांच्या नेतृत्वात आकाराला आलेली ही भव्यदिव्य इमारत अतिशय सुबक, देखणी आणि थक्क करणारी आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नवी दिल्ली ही जगातील सर्वात आकर्षक सुबक राजधानी ठरेल असे खासदार प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. अजित वाराणशीवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन

देव आनंद, सुनील दत्त, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आदी सुपरस्टार अभिनेत्यांच्या आईची तर कधी वहिणी, बहिणीचे ममत्व रुपेरी पडद्यावर जिवंत करणाऱ्या, ज्येष्ठ अभिनेत्री पद्मश्री, महाराष्ट्र भूषण सुलोचना यांचे आज निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या. मुंबईतील दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वासोच्छवासाचा त्रास आणि वयोमानानुसार इतर आजारांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान, सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगी, नात- नातजावई असा परिवार आहे. सुलोचना दीदी यांच्या निधनाने मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एका पर्वाची अखेर झाली असल्याचे म्हटले जात आहे. सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर सोमवार, 5 जून रोजी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी प्रभादेवी येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. शनिवारी, 3 जून रोजी सुलोचना दीदी यांची तब्येत बिघडली आणि अशा स्थितीत त्यांना काल रात्रीपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मार्च महिन्यातही सुलोचना यांची तब्येत बिघडली होती आणि त्यानंतरही त्यांना श्वासोच्छवासाच्या आणि वयोमानाशी संबंधित इतर आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, रुग्णालयातील 3 आठवड्यांच्या उपचारानंतर त्या बऱ्या झाल्या. सुलोचना दीदी यांनी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानासाठी 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्याशिवाय,  2004 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. 2009 मध्ये महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बेळगावमध्ये 30 जुलै 1928 रोजी जन्म झालेल्या सुलोचना दीदी यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 1946 पासून केली. 1946 ते 1961 या काळात सासुरवास (1946), वहिनीच्या बांगड्या (1953), मीठ भाकर, सांगते ऐका (1959), लक्ष्मी आली घरा, मोठी माणसं आदी गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली. सुलोचना दीदी यांनी 250 हून अधिक मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.  

सुलोचना दीदी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आईची भूमिका ताकदीने साकारली.  एक चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांनी आपली छाप सोडली. देव आनंद, सुनील दत्त, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आदी सुपरस्टार अभिनेत्यांच्या आईची ऑनस्क्रीन भूमिका साकारली होती. देव आनंद यांची भूमिका असलेल्या बऱ्याच चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये जब प्यार किसीसे होता है, प्यार मोहब्बत, दुनिया, जॉनी मेरा नाम, अमीर गरीब. , वॉरंट आणि जोशिला आदी चित्रपटांचा समावेश आहे. राजेश खन्ना यांच्या दिल दौलत दुनिया, बहरों के सपने, डोली, कटी पतंग, मेरे जीवन साथी, प्रेम नगर, आक्रमन, भोला भला यांचा समावेश आहे. त्याग , आशिक हूँ बहरों का आणि अधिकार आदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. तर, हीरा, झुला, एक फूल चार कांटे, सुजाता, मेहरबान, चिराग, भाई बहन, रेश्मा और शेरा आदी चित्रपटांमध्ये त्यांनी सुनिल दत्त यांच्यासोबत भूमिका साकारली.  

महाराष्ट्रातील ९ रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि ११ उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे भूमिपूजन

महाराष्ट्र फाटकमुक्त करण्यासाठी राज्यात विशेष मोहिम-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे दि. ४: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘महारेल’तर्फे महाराष्ट्रात उभारण्यात आलेल्या ४४० कोटी रुपयांच्या ९ रेल्वे ओलांडणी उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि नियोजित ७०० कोटी रुपयांच्या ११ उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे भूमिपूजन करण्यात आले. महाराष्ट्र फाटकमुक्त करण्यासाठी राज्यात विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून गतीने ही कामे पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिली.

शिवाजीनगर येथील पोलीस मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री श्री. गडकरी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल कांबळे, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायसवाल, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, राज्य आणि केंद्र एकत्र आल्याने चांगली कामे उभी रहात आहेत. रेल्वे मार्ग ओलांडण्याच्या ठिकाणी फाटक नसले की नागरिकांच्या जीवाला धोका असतो. म्हणून असे प्रकल्प लवकर पूर्ण करून जनतेचा त्रास दूर करण्याचे प्रयत्न आहे. राज्यात रेल्वेसंबंधी प्रकल्प जलदगतीने पूर्ण व्हावेत म्हणून राज्य शासनाने महारेलची स्थापना केली. महारेलतर्फे वेगाने कामे करण्यात येत आहेत. राज्यात ९ उड्डाणपूलांचे लोकार्पण आणि ११ उड्डाणपूलांचे भूमिपूजन प्रथमच होत आहे. उड्डाणपूल आणि भूयारी मार्गाच्या कामांमुळे जनतेचा वेळ वाचणार आहे.

पायाभूत सुविधांच्या विकासामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक
नागरिकांचा वेळ वाचावा आणि कार्यक्षमता वाढावी यासाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत आहे. देशात पायाभूत सुविधांची सर्वाधिक कामे महाराष्ट्रात सुरू आहेत. महाराष्ट्रात पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ क्षमता आहे, दळवळण सुविधा आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. राज्यातील प्रकल्प उभारणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी वेगाने निर्णय घेण्यात येत आहेत. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणात राज्यात गुंतवणूक करीत आहेत. समृद्धी महामार्ग खऱ्या अर्थाने विकासाचा महामार्ग होणार आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुण्यातील रस्त्यांच्या कामाला चालना
राज्यात केंद्र सरकारच्या सहकार्याने अनेक विकासकामे होत आहे. मडगाव-मुंबईच्या रुपाने चौथी वंदे भारत रेल्वे महाराष्ट्राला मिळाली आहे. मुंबई-पुणे महामार्गाच्या माध्यमातून पुण्याच्या प्रगतीला गती मिळाली आहे. या महामार्गावर प्रवास करताना वेळ वाचावा यासाठी खालापूर ते सिंहगड इन्स्टिट्यूट असा जगातला सर्वाधिक रुंदीचा बोगदा मिसिंग लिंक अंतर्गत तयार करण्यात येत आहे. पुणे मेट्रो, पुण्यातील रिंगरोड, चांदणी चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक कामे करण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी’ अभियानाद्वारे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवा आणि योजनांचा लाभ देण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कात्रज चौक ते खडीमशीन मोठा पूल तयार केल्यास त्याचाही लाभ नागरिकांना होईल. महाबळेश्वर येथील वाई-सुरूर-महाबळेश्वर-पोलादपूर हा मार्ग केंद्राने केल्यास पर्यटन वाढीसाठी त्याचा उपयोग होईल, असेही त्यांनी सांगितले.

दरवर्षी ११ उड्डाणपूल याप्रमाणे १६ हजार कोटींची कामे करणार-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यावेळी श्री.गडकरी म्हणाले, सेतू बंधन योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या ११ उड्डाणपूलांसाठी १०० टक्के निधी भारत सरकारने मंजूर केला आहे. महाराष्ट्र प्रगतीशील आणि संपन्न राज्य आहे. राज्यात नागरिकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे फाटकांचे रुपांतर उड्डाणपुलात करणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन आणि रेल्वेने मिळून ९ उ्डाणपूल पूर्ण केले आणि ११ पूलांचे भूमिपूजन होत आहे. दरवर्षी ११ पूल याप्रमाणे १६ हजार कोटींची ही कामे करण्यात येणार आहेत. येत्या काळात फाटकमुक्तीसाठी उ्डाणपूल बांधून जनतेला चांगली सुरक्षा देण्यात येईल.

पालखी मार्गाचे काम राज्याच्या वैभवात भर घालणारे होईल
महाराष्ट्राची सर्व क्षेत्रात चांगली प्रगती होत आहे. महामार्ग आणि रस्त्यांची कामे वेगाने होत आहे. पुण्यात पालखी मार्गाचे काम वेगाने होत आहे. पालखी तळाच्या विकासाची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी चांगला आराखडा करून ही कामे पूर्ण करण्यात येतील. पालखी मार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल आणि महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे हे काम होईल.

’महारेल’ गुणवत्तापूर्ण काम करेल
‘महारेल’ने रेल्वेचे नियम लक्षात घेऊन चांगले काम केले आहे. योजनेअंतर्गत एकूण ९१ पूल उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात २५ आणि दुसऱ्या टप्प्यात ६६ पूल प्रस्तावित आहेत. यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचना महारेलला देण्यात आल्या असून त्यांच्याकडेच ही जबाबदारी देण्यात येणार आहे. महारेल गुणवत्तापूर्ण कामे करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रेल्वेच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारने रेल्वेसह स्थापन केलेल्या महारेलने चांगले काम केले आहे. या सर्व प्रकल्पात रेल्वेच्या नियमांचे पालन करतानाच वेळेत काम पूर्ण करण्यात आले आहे, असे सांगून त्यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

४४० कोटी रुपयांच्या ९ उड्डाणपुलांचे लोकार्पण
महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे उभारण्यात आलेल्या ४४० कोटी रुपयांच्या राज्यातील ९ उड्डाणपुलांचे लोकार्पण करण्यात आले. यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे मंत्रालयाच्या यांच्या भागीतदारीतून उभारण्यात आलेल्या ८ पुलांचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तर केंद्रीय रस्ते निधीतून सेतूबंधन योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या एका पुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले. यात मध्य रेल्वेच्या पाटण-पंढरपूर राज्य महामार्गावरील मसूर ते शिरवडे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे फाटक क्र. ९२ येथील दोन पदरी उड्डाणपूल, मध्य रेल्वेच्या अतिग्रे-इचलकरंजी राज्य महामार्गावरील रुकडी ते हातकणंगले रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. २० येथील दोन पदरी उड्डाणपूल, मध्य रेल्वेच्या रहिमतपूर-सातारा रोडवरील रहिमतपूर ते तारगाव रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र.८१ येथील दोन पदरी उड्डाणपूल, पश्चिम रेल्वेच्या अमळनेर-चोपडा राज्य महामार्गावरील अमळनेर ते टाकरखेडे रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. १३६ येथील दोन पदरी उड्डाणपूल, पश्चिम रेल्वेच्या सिंदखेडा-चिमठाणा राज्य महामार्गावरील सोनशेलू ते शिंदखेडा रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. ११२-ए येथील दोन पदरी उड्डाणपूल, दक्षिण मध्य रेल्वेच्या हिंगोली-नांदेड राज्य महामार्गावरील हिंगोली ते धामणी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. १४४बी येथील दोन पदरी उड्डाणपूल, मध्य रेल्वेच्या डोंगरगाव-गुमगाव रोडवरील बुटीबोरी ते अजनी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. ११६ येथील दोन पदरी उड्डाणपूल, मध्य रेल्वेच्या उमरेड- बुटीबोरी रोडवरील बुटीबोरी ते सिदी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. १११ येथील दोन पदरी उड्डाणपूलाचा आणि सेतूबंधन योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या उमरेड बस स्टॅन्ड जवळील उमरेड ते भिवापूर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र.३४ येथील दोन पदरी उड्डाणपूलाचा समावेश आहे.

७०० कोटी रुपयांच्या ११ उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे भूमिपूजन
केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते यावेळी सेतू बंधन योजनेअंतर्गत महारेलतर्फे उभारण्यात येणाऱ्या ७०० कोटी रुपयांच्या ११ उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे भूमिपूजनदेखील करण्यात आले. यात पालघर जिल्ह्यातील तेवडीरोडवरील दिवा ते वसई रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. १० येथील दोन पदरी उड्डाणपूल, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा-वडगाव रोडवरील श्रीगोंदा रोड ते बेलवंडी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. ८ येथील दोन पदरी उड्डाणपूल, सांगली जिल्ह्यातील बुधगाव-सांगली रोडवरील सांगली ते माधवनगर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. १२९ येथील दोन पदरी उड्डाणपूल, सातारा जिल्ह्यातील कोळवडी रेवडी रोडवरील पळशी ते जरंडेश्वर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. ५२ येथील दोन पदरी उड्डाणपूल, सोलापूर जिल्ह्यातील आसरा चौक पुलाजवळील सोलापूर ते वाडी रेल्वे स्थानकांदरम्यान सीएच ४५८/५ येथील दोन पदरी उड्डाणपूल, धाराशिव जिल्ह्यातील ढोकी ते धाराशिव रोडवरील पालसप ते कळंबरोड रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. ३४ येथील दोन पदरी उड्डाणपूल, लातूर जिल्ह्यातील लातूर शहर रस्त्यावरील कुर्डुवाडी ते लातूर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. २ येथील दोन पदरी उड्डाणपूल, जळगाव जिल्ह्यातील शिरसोली ते जळगाव रेल्वे स्थानकांदरम्यान जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील दोन पदरी उड्डाणपूल आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-सांगोला रोडवरील कुर्डुवाडी ते मिरज रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. २४ येथील दोन पदरी उड्डाणपूलांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव टाऊन रोडवरील जळंब ते खामगाव रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. ६ येथील भुयारी मार्ग, ठाणे जिल्ह्यातील कळमगाव जवळील आटगाव ते तानशेत रेल्वे स्थानकांदरम्यान सीएच ९८ /२ येथील भुयारी मार्गाच्या कामाचेही भूमिपूजन यावेळी करण्यात आले.

नेत्यांनी गद्दारांना ताकद देण्यापेक्षा सच्च्या कार्यकर्त्यांना ताकद दिली तरच कॉंग्रेसची निर्विवाद सत्ता

कॉंग्रेसचे उमेदवार पाडणारे पक्षातील गद्दार नेत्यांच्या समवेत मिरवत राहतील तोवर कॉंग्रेसचे खरे नाही -माजी मंत्र्यांनी व्यक्त केली खदखद

पुणे- कॉंग्रेसचा पराभव करण्याची ताकद भाजपात नाहीच, पण तरीही पराभव होत आला त्याला कारण कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत गद्दारी आणि गद्दारांना नेत्यांकडून मिळणारी ताकद हेच असल्याचे स्पष्ट भाषेत एका माजी मंत्र्यांनी सुनावले आहे. मुंबई टिळक भवन येथे पुणे लोकसभा २०२४ निवडणुकीबाबत बाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी माजी मंत्री असलेल्या एका नेत्याने पुणे शहरात काँग्रेस पक्षाचे गटबाजी मुळे प्रचंड नुकसान झाले कॅन्टोन्मेंट,शिवाजीनगर विधानसभा संघात १०० टक्के निवडून येणार्‍या काँग्रेस उमेदवारांचा शहरातील अंतर्गत गटबाजीमुळे थोड्या मतांनी पराभव करवून पक्षाचे फार मोठे नुकसान करण्यात आले, तरीही अशा गद्दारांची दखल नेत्यांनी घेतली नाही अशी पोटतिडकीने खंत प्रदेशाध्यक्ष व प्रदेश वरिष्ठां पुढे मांडली अश्या तऱ्हेने निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला गद्दारी व धोका देणाऱ्या व्यक्तींवर पक्षाच्या नियमानुसार कारवाई करावी आणि काँग्रेस पक्षाच्या प्रामाणिक सच्चा कार्यकर्त्याला ताकद द्यावी अशी भूमिका पोटतिडकीने यावेळी मांडली.

एक नेते तर निवडणूक हारण्यासाठीच उमेदवारी मिळवितात कारण त्यातच त्यांचा फायदा दडलेला असतो असाही आरोप यावेळी काही कार्यकर्त्यांनी माध्यम प्रतीनिधी यांच्याशी खाजगीत बोलताना केला.ते म्हणाले ते कायम दिल्ली आणि मुंबईत बड्या बड्या नेत्यांच्या मागे पुढे जी जी करत असतात मात्र त्यांचा पुण्यातील कोणत्याही पालिकेच्या वार्डात देखील प्रभाव नसतो किंवा संपर्क नसतो,जे महापालिकेच्या निवडणुकीला कधी निवडून येऊ शकत नाहीत अशांना बडी बडी पदे देऊन उमेदवारी देखील ते मिळवितात पण हि उमेदवारी त्यांनी जिंकण्यासाठी नाही तर हारण्यासाठी मिळविलेली असते आणि त्यातच त्यांचा मोठा आर्थिक फायदा दडलेला असतो असाही दावा काल टिळक भवनाबाहेर काही मान्यवर कार्यकर्त्यांनी केला होता एक नगरसेवक गेली ३५ वर्षे नगरसेवकच आहेत कधीच त्यांना आमदारकीचे तिकीट दिले गेले नाही,ते निवडून येऊ नये यासाठी राष्ट्रवादीशी सौदेबाजी केली गेली.असाही आरोप केल गेला.

दरम्यान कॉंग्रेसमध्ये निवडून येण्याच्या क्षमतेचे उमेदवार असताना केवळ अशी संधिसाधू आणि पक्षाचे नुकसान करून तुंबडी भरू मंडळीच्या भीतीने क्षमता असतानाही काही जण निवडणूक लढविण्यास कचरत असतात असेही बोलले जाते.

विश्वजित कदम यांच्यावर देखील आता टीका होऊ लागली आहे त्यांनी सुद्धा पुण्यात निवडणूक लढविली तेव्हा मनापासून लढविली नसल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. कदम आता बहुतेक वेळा भाजपच्या नेत्यांसमवेत रमलेले असतात,बहुधा त्यांना भाजपा ची भीती वाटत असावी पण त्यांनी कॉंग्रेस मध्ये राहून भाजपाचे काम करण्यापेक्षा थेट भाजपात जावे असेही कार्यकर्ते बोलू लागले आहेत.निवडणूक समयी झालेल्या राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यात त्यांनी राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना गांधीच्या समोर बसवून पुण्यात फिरकू दिले नव्हते आणि पुणेकरांशी त्यांचा संबध येणार नाही याची दक्षता घेतली होती असा आरोप त्यांच्यावर केला जातो आहे.

ज्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांचा मोठ्ठा समूह आहे,त्यांना बाजूला सारणारे एकटे दुकटे असतात, त्यांच्या बरोबर ना कार्यकर्त्यांचा समूह असतो ना जनसंपर्क त्यांचा असतो पण नेत्यांच्या आगे मागे फिरून त्यांनी आपले स्थान बळकट केलेले असते अशा बहुरूप्यांना नेत्यांनी ओळखले पाहिजे असा एकूण सूर आहे.

कात्रजमध्ये कोल्हापूरकर प्रवाश्याला लुटले

पुणे- शहरातील कात्रज भागात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणावर कोयत्याने वार करुन चोरट्यांनी रोकड लुटल्याची घटना घडली.

सचिन वसंत तळवार (वय -३१, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, कोल्हापूर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सचिन यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सदर तक्रारीनुसार तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सचिन तळवार पुण्यात कामानिमित्त आले होते. ते कात्रज भागातून निघाले होते. त्या वेळी तीन चोरट्यांनी त्यांना अडवले आणि पत्ता विचारण्याचा बहाणा केला.चोरट्यांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखविला. त्यांच्याकडील असलेली ४५०० रुपयांची रोकड हिसकावूनपसार झाले सचिन यांनी चोरट्यांना विरोध केला. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. त्यांच्याकडील रोकड हिसकावून चोरटे पसार झाले. जखमी झालेले सचिन यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. कोल्हापूरमधील शाहुपुरी पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली. शाहुपुरी पोलिसांनी गुन्हा तपासासाठी भारती विद्यापीठ पोलिसांकडे सोपविला असून सहायक पोलीस निरीक्षक रसाळ तपास करत आहेत.