शिवसेनेच्या वर्धापन दिनी म्हणजेच 19 जून पूर्वी राज्य मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर धरला आहे. त्यामुळे आता 19 जून पूर्वी किंवा 19 जून याच दिवशी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, राज्यातील शिवसेनेच्या एकूण आमदारंपैकी नाराज असलेल्या आमदार संख्या पाहता मंत्रिमंडळ विस्तारानंतरही शिवसेनेत पुन्हा एकदा फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शंदे यांनी म्हटले पुढील निवडणुका आम्ही भाजपा समवेत एकत्र लढणार
कृषि, सहकारसहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री श्री. शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली. राज्यात आगामी सर्व निवडणूका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार….असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे
दरम्यान राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच्यानंतर मात्र, शिवसेनेचे अनेक आमदार नाराज होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद न मिळाल्यामुळे काही आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. या वेळी तर आम्हाला संधी मिळेल, अशी अपेक्षा असणारे शिवसेनेत अनेक आमदार आहेत. त्यामुळे या वेळी मंत्रिमंडळ विस्तारानंतर होणाऱ्या घटना – घडामोंडीकडे लक्ष्य द्यावे लागणार आहे.
छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाठ यांनी शिंदे यांच्या बंडाच्या काळात प्रमुख भूमिका निभवली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर संजय शिरसाट यांचे मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र तरी देखील शिरसाट यांना डावलण्यात आले. आता मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या ते मंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.असे असले तरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या 3 मंत्री आहेत. त्यामुळे एकाच जिल्ह्याला एवढी मंत्रिपदे मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे एकतर आधीच्या मंत्र्याला डच्चू मिळून संजय शिरसाट यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. किंवा त्यांना या वेळी देखील हुलकावणी मिळू शकते.जळगाव जिल्ह्यामध्ये गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील आणि आमदार किशोर पाटील यांच्यासह एक महिला मंत्री म्हणून लता सोनवणे यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात महिलांना संधी दिली जाण्याची शक्यता असल्यामुळे लता सोनवणे यांचा दावा प्रबळ मानला जात आहे.शिरोळचे आमदार आणि माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष असूनही शिवसेनेकडून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते. तरीदेखील त्यांनी बंड करत एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. त्यामुळे राजेंद्र पाटील हे देखील मंत्रीपदाचे कट्टर दावेदार मानले जात आहे.