पुणे, दि. ५: कात्रज शिंदेवाडी रस्ता राज्य मार्ग क्र. १२६ (जुना कात्रज घाट) कि.मी. १२/०० ते २०/२०० या लांबीत घाट रस्त्याचे डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम करण्यात येत असल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार ३१ डिसेंबरपर्यंत सातारा ते पुणे जुन्या कात्रज घाटातून पुण्याकडे येणारी वाहतूक बंद करून ती नवीन बोगद्यातून दरीपूल मार्गे पुण्याकडे वळविण्यात आली आहे.
पुणे ते सातारा अशी कात्रज घाटतून एकेरी वाहतुक सुरु आहे. वाहनधारकांनी साताऱ्याकडून पुण्याकडे येताना नवीन बोगद्यातून यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंडळ अधीक्षक अभियंता ब. नि. बहिर यांनी केले आहे.
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक 2 मधील नागपूर चाळ, फुलेनगर येथील 70 झोपडपट्टीधारकांचे आहे त्या जागी किंवा इतर ठिकाणी पुनर्वसन करावे. पुनर्वसनाचा प्रश्न सुटेपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केली आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी केली आहे.
या वेळी गणेश अंकुशी, आप्पा चाबुकस्वार, सोमेश उपाध्यक्ष, प्रताप काळे, धनलाल कांबळे, मंदाकिनी कांबळे, सीमा उपाध्ये, पूजा भोसले, चंद्रभागा सकट आदीसह नागरिक उपस्थित होते.
डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, प्रभाग क्रमांक 2 मधील नागपूर चाळ, फुलेनगर या प्रभागातील राज्य शासनाच्या मनोरूग्णालयांच्या जागेवर माता रमाई झोपडपट्टीमधील 70 घरे गेल्या 40 वर्षापासून वास्तव्यास आहे. या झोपडपट्टीमधील झोपडपट्टीधारकांकडे 40 वर्षांपासून पुरावे आहेत. तसेच राज्य शासनाच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या परिपत्रकामधील पात्र झोपडपट्टीधारक हा 1 जानेवारी 2010 पूर्वीचा असावा असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यानुसार येथील 70 घरे पात्र ठरत आहेत. या झोपडपट्टीधारकांकडे राज्य शासनाच्या नियमानूसार मतदान ओळखपत्र, मतदान यादीतील नाव, आधारकार्ड, रेशनकार्ड व इतर पुरावे देखील उपलब्ध आहेत.
त्यामुळे मानवी हक्क आयोगामधील एका याचिकेबाबत उच्च न्यायालयात जी सुनावणी चालू आहे. त्यामध्ये पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने मनोरूग्णालयाच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांना बेकायदेशीर ठरविण्यात आल्याचे येत आहे. परंतू येरवडा क्षेत्रीय कार्यालयाने या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय, पथ दिवे, कचरा निर्मुलन तसेच महावितरणने घरोघरी विजेचे मीटर दिलेले आहेत. त्यामुळे हे सर्व झोपडपट्टीधारक झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या नियमाप्रमाणे त्यांचे पुनर्वसन राज्य शासनाने केल्याशिवाय त्यांना बेघर करू नये. संबंधित क्षेत्रीय कार्यालय, महा सहाय्यक आयुक्त, विभागीय आयुक्त यांच्यामार्फत माता रमाई झोपडपट्टी फुलेनगर येथील वास्तूनिष्ठ अहवाल मागवून घ्यावा. त्यानंतर योग्य तो निर्णय घ्यावा. कायद्याप्रमाणे पात्र असणाऱ्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी डॉ. धेंडे यांनी केली.
तसेच चंद्रमानगर येथील 2008 मध्ये केंद्र व राज्य सरकार, पुणे मनपा यांच्या संयुक्त प्रकल्पांतर्गत 178 घरांचा सर्व्हे मंजूर केला आहे. या सर्व्हे प्रमाणे पुणे महानगरपालिकेने 178 घरांच्या कामाला मंजूरी दिलेली आहे. या पैकी 97 घरांचे काम चालू केले असून 77 घरांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत घरे अर्धवट असून त्यांचा देखील विचार व्हावा, हे निर्दशनास आणून दिले.
या वेळी संबंधीत झोपडपट्टीधारकांना शासनाच्या नियमानूसार योग्य न्याय दिला जाईल. तसेच नियमानूसार पुनर्वसन करण्याची कार्यवाही करू, असे सकारात्मक आश्वासन अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी दिले असल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.
मुंबई, दि. ५ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा सन २०२३ करिता भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील विनामूल्य प्रवेश परीक्षा राज्यातील सात केंद्रांवर ऑफलाईन पद्धतीने यशस्वीरित्या झाल्याची माहिती, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालकांनी दिली.
उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (सीॲक) मुंबईचे भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर, तसेच राज्य शासनाच्या अखत्यारितील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (एसीईसी) पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले अकॅडेमी, पुणे या सर्व केंद्रातील प्रवेश परीक्षा दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद कोल्हापूर, नागपूर व अमरावती या सात केंद्रांवर ऑफलाईन पद्धतीने यशस्वीरित्या झाली.
मुलाखतीचा कार्यक्रम राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबईच्या संकेतस्थळावर लवकरच जाहीर करण्यात येईल. या परीक्षेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार व संस्थेची प्रवेश क्षमता आणि प्रवेशाबाबतच्या नियमाप्रमाणे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा सन २०२३ करीता विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबईचे संचालक तथा सामायिक प्रवेश परीक्षा समन्वयक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
मुंबई, दि. ५ : “वस्त्रोद्योगामध्ये भारताने पूर्वीपासूनच आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. पारंपरिक कापड निर्मितीपासून ते तांत्रिक वस्त्रोद्योगाकडे वाटचाल सुरु असून या क्षेत्रात रोजगार निर्मितीला मोठी संधी उपलब्ध आहे. राज्याच्या प्रस्तावित नवीन वस्त्रोद्योग धोरणात १० लाख रोजगार निर्मिती आणि ३६ हजार कोटी रुपयांची गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे”, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
टेक्नोटेक्स-२०२३ कर्टन रेझर सेरेमनीचे हॉटेल ट्रायडंट मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते. याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त रुप राशी, केंद्रीय सहसचिव राजीव सक्सेना, फिक्कीचे चेअरमन मोहन कावरीय, एसआरटीईपीसीचे चेअरमन धीरज शहा, वस्त्रोद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, देशातील वस्त्रोद्योगात महाराष्ट्राचा महत्त्वाचा वाटा आहे. वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने वीज सवलत दिली आहे. वस्त्रोद्योगासाठी लागणारा कापूस सुरुवातीला कमी दरात उपलब्ध होतो. परंतु नंतरच्या काळात कापसाचे भाव खूप वाढलेले असतात. वस्त्रोद्योगासाठी नियमित योग्य दरात कापूस उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य शासन मोठ्या प्रमाणात कापसाची थेट खरेदी करुन खरेदी केलेल्या भावामध्ये वस्त्रोद्योगासाठी कापूस पुरवठा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. वस्त्रोद्योगातील संधी आणि त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी कौशल्य आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येईल. जागतिक पातळीचे वस्त्रोद्योग महाराष्ट्रात प्रदर्शन भरविण्यासाठी सेंटर उभारण्यात येईल, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
केंद्र शासनाच्या पीएम मित्र योजनेंतर्गत राज्य शासनाने अमरावती येथील ब्राऊनफिल्ड पार्क आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रीनफिल्ड पार्क असे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविले आहेत, असे सांगून केंद्र सरकारचे वस्त्रोद्योग मंत्रालय आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजच्या सहकार्याने राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग मिशन (NTTM) अंतर्गत मुंबईत दि. २२ ते २४ फेब्रुवारी २०२३ दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाने तांत्रिक वस्त्रोद्योग परिषद-टेक्नोटेक्स-2023 या परिषदेला राज्य शासन सहकार्य करेल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
वस्त्रोद्योग आत्मनिर्भर भारताच्या उभारणीतील महत्त्वाचे क्षेत्र
– केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश
“भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. यामध्ये वस्त्रोद्योग क्षेत्राचा महत्त्वाचा वाटा आहे. भारतीय वस्त्रोद्योग बाजारपेठेत तांत्रिक वस्त्रोद्योगाचा वाटा जवळपास 13 टक्के असून जागतिक पातळीवरील तांत्रिक वस्त्रोद्योगाची वाढती मागणी लक्षात घेता वस्त्रोद्योग क्षेत्रात गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी संधी उपलब्ध आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या पीएम मित्र या योजनेमुळे या क्षेत्राला अधिक प्रोत्साहन मिळत आहे”, असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश यांनी केले.
“तांत्रिक वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र शासन प्रयत्न करत आहे. जागतिक स्तरावर तांत्रिक वस्त्रोद्योग ही एक मोठी बाजारपेठ आहे. ती अधिक मजबूत करण्यासाठी देशांतर्गत वापर आणि निर्यात या दोन्ही घटकांवर अधिक भर देणे आवश्यक आहे, असे सांगून वस्त्रोद्योगासाठी महाराष्ट्रात उत्तम पायाभूत सुविधा आणि पोषक वातावरण असल्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिलेले राज्य आहे”, असेही केंदीय राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी टेक्नोटेक्स-2023 महितीपुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करून ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली.
महाराष्ट्र काय आहे दाखवून द्यायची वेळ आलीय-उद्धव ठाकरे
राज्यपालांना मोर्चापुर्वी हटवले तरी मोर्चा निघणार – अजित पवार
मुंबई: राज्याचे राज्यपाल आणि सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होत आहे, शिवरायांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलं जात आहे, सीमाभागातील गावांवर कर्नाटकडून दावा केला जात आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसत असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. त्याविरोधात आता येत्या 17 तारखेला जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये मोर्चाचा हा निर्णय घेण्यात आला.
महाविकास आघाडीचे सरकार गद्दारी आणि कटकारस्थान करून पाडले. हे सरकार कायदेशीर की बेकायदेशीर याचा निकाल लागायचा आहे. पण, ते अस्त्वितात आल्यानंतर महाराष्ट्राची सातत्याने होणारी अवहेलना, अपमान आणि फुटीरतेची बीजं टाकण्यात येत आहेत. काही गाव कर्नाटकात, तेलंगणा आणि गुजरातमध्ये जायचं म्हणत आहेत. हे आजपर्यंत कधी घडलेलं नव्हतं. छत्रपतींचा एकसंघ महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न हेतूपुरस्सर होतोय, असा हल्लाबोल शिवसेना ( ठाकरे गट ) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर केला आहे.“कर्नाटक सरकार आक्रमकपणे महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगत आहे. अक्कलकोट, सोलापूर आणि मग पंढरपूरच्या विठोबावर सुद्धा ते हक्क सांगतील. त्यामुळे आपल्या राज्यात सरकार आहे का नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
गुजरातची निवडणूक जिंकावी म्हणून यांनी महाराष्ट्राचे उद्योग पळवले. त्यानंतर आता कर्नाटकची निवडणूक पण होणार आहे, त्यामुळं महाराष्ट्राची गावं ते कर्नाटकला जोडणार आहेत का? असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख पक्षांची बैठक झाली त्यानंतर आमच्या मित्र पक्षांशी बोलल्यानंतर सर्वांनी एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे.त्यामुळं येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी १७ डिसेंबरला शनिवारी जिजामाता उद्यान ते आझाद मैदान अशा विराट मोर्चाचं मविआनं आयोजन केलं आहे. यामध्ये केवळ मविआचं नव्हे तर ज्यांना महाराष्ट्राचा अपमान सहन झालेला नाही त्यांनी महाराष्ट्राच्या एकजुटीचं विराट दर्शन या मोर्चातून घडवावं असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.
उद्धव ठाकरे यांनी हा मोर्चा केवळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्यासाठी नाही. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या सर्वांच्या विरोधात हा मोर्चा असेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडीचं चांगलं चाललेलं सरकार गद्दारी आणि कटकारस्थान केल्यानंतर जे सरकार आलं ते कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे याचा निकाल अजून लागायचा आहे. हे सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची होणारी अवहेलना, अपमान विशेष म्हणजे महाराष्ट्रात फुटीरतेची बिजं दिसत आहेत. काही गावं कर्नाटकमध्ये, काही गावं तेलंगाणा, काही गावं गुजरातमध्ये जायचा दावा करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असं घडतंय. अक्कलकोटवर हक्क सांगत आहेत. सोलापूरवर हक्क सांगत आहेत म्हणजे आमचा पंढरपूरचा विठोबा देखील नेण्याचा प्रयत्न आहे, असं ठाकरे म्हणाले.राज्यपाल म्हणून कुणालाही पाठवलं जात आहे. राज्यपाल महाराष्ट्राच्या आदर्शांचा अपमान करत आहेत. महाराष्ट्राची अस्मिता, आदर्श यांना छिन्न विच्छिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गुजरातच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातले प्रकल्प तिकडे गेले. कर्नाटकच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील गावं तोडून तिकडे जाणार का असा सवाल आहे. पण, मुख्यमंत्री महाराष्ट्राला आहेत हे कळणार कधी? महाराष्ट्राचे मंत्री कर्नाटकला जाणार होते, तिकडच्या मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यावर हा दौरा रद्द झाला. इतका नेभळट महाराष्ट्र कधी झाला नव्हता. महाराष्ट्र काय हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. विधानमंडळाचं अधिवेशन १९ डिसेंबरला नागपूरला सुरु होत आहे. मविआचं नव्हे तर ज्यांना अपमानामुळं ठेच पोहोचली आहे. त्यांनी यामध्ये सहभागी होऊन महाराष्ट्राची ताकद दाखवून देऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीची बैठक ८ डिसेंबरला होणार आहे. ८ डिसेंबर ते १७ डिसेंबर दरम्यान राज्यपालांना हटवलं तरी मोर्चा निघणारच, असा इशारा अजित पवार यांनी दिला. महाराष्ट्र कधीही कुणापुढं झुकला नाही मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला की मंत्री जाणार नाही असं सांगतात, काय चाललंय या राज्यात असं अजित पवार म्हणाले.
शिंदे सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची सातत्यानं अवहेलना होत आहे. महाराष्ट्राचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांपासून स्थानिक पातळीवरील नेत्यांकडून महाराष्ट्राच्या महापुरुषांची अवहेलना केली जात आहे. महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रचंड असंतोष असून तो या महामोर्चाच्या माध्यमातून दाखवून देऊ, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे आयोजन ; स्वरोत्सवात ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांचा बाबूजी व मी कार्यक्रम उत्साहात पुणे : ओम नमो भगवते रुद्राय… च्या उद््घोषाने लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा परिसर दुमदुमून गेला. सोमप्रदोष निमित्त महिलांद्वारे श्रीमती बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या उत्सव मंडपात रुद्रपठण पार पडले. भगवान दत्तात्रयांच्या चांदीच्या मूर्तीवर अखंडपणे रुद्राभिषेक सुरु असताना हे मंत्रपठण महिलांनी केले. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १२५ वा दत्त जयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सोहळ्यांतर्गत रुद्रपठण व रुद्राभिषेकाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अॅड.शिवराज कदम जहागिरदार, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, राजू बलकवडे आदी उपस्थित होते. ट्रस्टच्या उत्सवप्रमुख अॅड.रजनी उकरंडे, काळुराम उकरंडे, संस्कृतच्या अभ्यासिका डॉ.माधवी कोल्हटकर, धर्मादाय कार्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी सुनिता तिकोने, सुनीता फडके, स्मिता खाडीलकर यांनी रुद्राभिषेक व रुद्रपठणाचे यजमानपद भूषविले. विद्या अंबर्डेकर व सहका-यांनी रुद्रपठण केले. अमोल मुळ्ये गुरुजी यांनी पौरोहित्य केले. धार्मिक कार्यामध्ये महिलांचा सहभाग असावा, यासाठी ट्रस्टतर्फे प्रोत्साहन दिले जाते. दर एकादशीला देखील महिलांद्वारे कीर्तनसेवा रुजू होते. गणेश कला क्रीडा मंच येथे सुरु असलेल्या स्वरोत्सवात बाबूजी व मी हा ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांच्या गीतांचा कार्यक्रम झाला. त्यापूर्वी गायिका प्रतिभा विनय थोरात व सहका-यांचा भाव आणि भक्ती संगीताचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. तसेच स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचा श्री दत्त कथा या कार्यक्रमाला देखील उर्त्स्फूत प्रतिसाद मिळत आहे.
“शाश्वत भूजल” या विषयावरील वनराई वार्षिक विशेषांक प्रकाशन समारंभ
पुणे– पाणी मर्यादित संसाधन असल्यामुळे ते कमी जास्त होत नाही. जलचक्र कायमस्वरूपी एकच आहे. पाण्याची गरज कशी पूर्ण होईल याकडेच प्रत्येकाचे लक्ष आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागामध्ये पाण्याची दरडोई उपलब्धता जास्त आहे. भारतात देशाच्या एकूण क्षेत्रफळावर सरासरी ११७० मि.मी. एवढा पाऊस पडतो. पाण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन काटेकोरपणे होत नसल्याने आपल्याकडे सातत्याने दुष्काळजन्य आणि तीव्र टंचाईची परिस्थिती उद्भवत असते. त्यामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा काटकसरीने वापर करण्याबरोबरच जागरूकता निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत जेष्ठ संशोधक आणि द इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी- एरिड ट्रॉपिक्स (इक्रिसॅट)चे माजी संचालक डॉ. सुहास वाणी यांनी व्यक्त केले.
“शाश्वत भूजल” या विषयावरील वनराई वार्षिक विशेषांक प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाचे आयुक्त चिंतामणी जोशी यांच्या हस्ते या विशेषांकाचे प्रकाशन झाले तर जेष्ठ संशोधक आणि द इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी- एरिड ट्रॉपिक्स (इक्रिसॅट)चे माजी संचालक डॉ. सुहास वाणी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. जलसंवाद मासिकाचे संपादक डॉ. दत्ता देशकर, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, सचिव अमित वाडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश खाडे यांनी केले तर आभार मंगेश काळे यांनी मानले.
डॉ. वाणी म्हणाले, पाणी उपाययोजना संदर्भात आपण वृक्ष झालो आहोत. मांसाहाराच्या तुलनेत फळभाज्या आणि पालेभाज्या पिकवण्यासाठी कमी पाणी लागते. सगळ्यांनी शाकाहारी झाल्यास पाण्याची गरज भासणार नाही. ज्या पाण्यावर कोणाची तरी तहान भागवली जाऊ शकते असे हजारो लीटर पाणी शॉवर, बाथटब, टॉयलेट फ्लश, वॉश बेसिन इत्यादीद्वारे दररोज घराघरांतून वाया घालवले जाते. म्हणूनच केवळ धरणे बांधून आणि ग्रामीण भागात जलसंधारण करून ‘जलसुरक्षा’ साधता येणार नाही, तर शहरांमध्येसुद्धा पाण्याच्या वापरबाबत जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे.
चिंतामणी जोशी म्हणाले, भूजल ही नैसर्गिक आणि राष्ट्रीय संपत्ती असून, भूजलावर प्रत्येक नागरिकाचा समान हक्क आहे. जागतिक भूगर्भातील पाणीसाठ्यापैकी २४ टक्के पाण्याचा उपसा आपण पाण्याची गरज भागवण्यासाठी करत आहोत. भूजल उपशाच्या बरोबरीने जलसंधारणासाठी किंबहुना भूजल पुनर्भरणासाठी पुरेसे प्रयत्न होत नाहीत. मृदा-जलसंधारणाच्या कामांतून गावांत जलसाठे निर्माण झाले आणि भूजल पातळीत वाढ झाली म्हणजे गावकऱ्यांची सामुदायिक जबाबदारी संपली, असे मानून चालत नाही. तर उपलब्ध पाण्याचा मुख्यत्वे भूजलाचा काटकसरीने आणि समन्यायी वापर होण्यासाठीही व्यक्तिगत आणि सामुदायिक पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे.
रवींद्र धारिया म्हणाले की, पाणी टंचाईची झळ बसू नये म्हणून छतावर पडणारे पावसाचे पाणी साठवणे, भूजल पुनर्भरण करणे आणि वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या अखेरीस ओढ्या नाल्यातून वाहून जाणारे पाणी श्रमदानातून ठिकठिकाणी अडवण्या-मुरवण्यासाठी “वनराई बंधारा” हे बांधण्यात आले. यातूनच गावागावांमध्ये मृदा, जलसंधारणाची लोकचळवळ उभी राहिली आणि शेकडो गावे जलसमृद्ध झाली. जलसंधारणाबरोबरच जलसाक्षरतेसाठी ‘वनराई’ संस्था गेली ३६ वर्षे धोरणात्मक पातळीवर आणि तळागाळामध्ये आपले योगदान देत आहे. शिवाय लोकशिक्षण आणि जनजागृतीसाठीही विशेष प्रयत्न करत आहे. या विशेषांकाची निर्मिती देखील त्याचाच एक भाग आहे.
मुंबई, दि. ५ : सन २०२३-२०२४ या वर्षातील १ जानेवारी २०२३ ते ३० जून २०२३ या सहा महिन्याच्या कालावधीसाठी, सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या १२९ व्या सत्राच्या प्रशिक्षणास प्रवेश घेण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टिकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थीना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानवन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा येथे देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्रातून मत्स्यव्यवसाय नौकानयनाची मूलतत्वे, सागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने, प्रात्यक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रशिक्षणासाठी दारिद्र्य रेषेवरील प्रशिक्षणार्थी यांचेकडून ४५०/- व दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थीकडून १००/- शुल्क आकारले जाते. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. तसेच प्रशिक्षणार्थी १८ ते ३५ वयोगटातील असावा. त्यास पोहता येणे आवश्यक आहे, किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण, मासेमारीचा किमान २ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्डधारक /आधारकार्ड धारक असावा. प्रशिक्षणार्थीचा विहित नमुन्यात परिपूर्ण अर्ज असावा व त्या अर्जावर संबंधित मच्छिमार संस्थेची शिफारस असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी दारिद्रय रेषेखालील असल्यास, अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गट विकास अधिकारी यांच्या दाखल्यांची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
पुणे- काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी आमदार मोहन जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताह २०२२” अंतर्गत आयोजित भव्य जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन भवानी पेठेतील क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे बॉक्सिंग स्टेडियम पुणे, येथे आयोजित करण्यात आले होते. स्पर्धेत 128 महिला व पुरुष खेळाडूंनी सहभाग नोंदविला, स्पर्धेचे बक्षीस वितरण राज्याचे माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, यांच्या हस्ते करण्यात आले . या प्रसंगी मोहन जोशी, रमेश बागवे, छत्रपती पुरस्कार विजेते अंतर राष्ट्रीय बॉक्सर सलमान शेख, गौरव बोराडे, प्रशांत सुरसे, विठाल थोरात, दयानंद अडागले, सौ. सुरेखा खंडागळे, सुनील बावकर, मारुती कसबे, चेतन अगरवाल, मुन्नाभाई शेख, मदन वानी, विजय गुजर तसेच कान्होजी जेधे व इतर मान्यवर उपस्थित होते.
अशा स्पर्धेतून खेळाडूना आपल्या कौशल्य दाखवण्याची, व या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या क्रीडा संकुलात खेळण्याची संधी उपलब्ध होत असते, तसेच पुण्यातील अशा मध्यवर्ती भागात आजूबाजूला इतकी दाट लोकवस्ती, झोपडपट्टी , असताना इतके सुंदर क्रीडा संकुल उपलब्ध केले आहे, व ते टिकविले आहे याचा मला अभिमान आहे व त्यासाठी बागवे यांचे त्यांनी कौतुक केले. तसेच या सप्ताह निमित्त उत्तम प्रकारे विविध कार्यक्रम आयोजित करत असल्यामुळे येणाऱ्या काळात याचे अवोलोकन देशात होईल अशी अपेक्षा देखील डॉ. कदम यांनी व्यक्त केली. गेली १८ वर्ष हा उपाक्रम दर वर्षी अखंडित पणे चालू आहे व काय काय उपक्रम या सप्ताह मध्ये इतक्या वर्षात रभवले त्याची संशेकप्त मध्ये माहिती मोहन यांनी दिली, तसेच सोनियाजिंचा देशातील सर्वोच्च पदाचा त्याग हा आपण लक्षात ठेवून येणाऱ्या पिढीने त्याचे उधरहण घेवून आपली वाटचाल करावी ही विनंती देखील मोहन जोशी यांनी आपल्या भाषणात केली. आजच्या या तणावाच्या जीवन शैलीत युवकांनी, व नागरिकांनी आपल्या प्रकुर्तीची योग्य काळजी घ्यावी व या क्रीडा संकुलातील अनेक क्रीडा प्रकरापैकी कुटल्याही क्रीडा खेळ खेळून आपले आरोग्य जपावे असा सल्ला रमेशबागवे यांनी आपल्या भाषणात धीला.
यावेळी नुकत्याच महाराष्ट्रात पार पडलेल्या भारत जोडो यात्रेत महत्वाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल डॉ. विश्वजीत कदम यांचा सत्कार सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने रमेश बागवे व मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.विश्वजित कदम यांच्या पारितोषिके प्रदान करण्यात आली . बेस्ट बॉक्सर पुरस्कार- अनिता आहुजी बेस्ट चॅलेंजर पुरस्कार-श्वेता पवार बेस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर पुरस्कार-संचिती घोडके यांनी मिळविला. या स्पर्धेचे सूत्रसंचालन व आयोजन माजी नगरसेवक,बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांनी केले, प्रास्ताविक सुनील बावकर यांनी केले तर आभार विठ्ठल थोरात यांनी मांडले.
पुणे – अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, पुणे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ व जिल्हाअधिकारी कार्यालय (निवडणूक शाखा) पुणे यांचे संयुक्त विद्यमाने नवमतदार नोंदणी महाअभियान राबविण्यात आले. या अभियानाची सुरवात अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे खजिनदार विजयसिंह जेधे , उपजिल्हाधिकारी सुरेखा माने व नायब तहसीलदार अविनाश कांबळे,प्राचार्य डॉ.सुनील ठाकरे यांचे उपस्थितीत झाली. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मतदार यादीत नाव येण्यासाठी काय करावे लागेल ,कोणता फॉर्म भरावा, अर्ज ऑनलाइन करायचा की ऑफलाइन, मतदार यादीत नावासाठी कोणती कागदपत्रे लागतील, अर्ज कुठे करावा, नाव नोंदणी अर्ज सादर करणे ते ओळखपत्र मिळवणे यादरम्यान ची सर्व प्रक्रिया व त्यासाठी किती वेळ लागतो ह्या तरुणाईला पडलेल्या अशा असंख्य प्रश्नाचे उत्तरे यावेळी माने यांनी दिली. समृद्ध सुजाण उबळकट आणि पारदर्शक लोकशाही प्रक्रियेसाठी तरुणांनी मतदार यादीत नाव नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन या प्रसंगी सौ.सुरेखा माने यांनी केले श्री. अविनाश कांबळे यांनी भारताची लोकशाही व्यवस्था ही जगातील मोठी लोकशाही आहे. लोकशाही टिकवण्यासाठी अधिक सुदृढ करण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे. पारदर्शक निवडणुका हा लोकशाहीचा गाभा आहे. त्यासाठी मतदार याद्या निर्दोष, पारदर्शक, परिपूर्ण व अधिक अचूक असावी. कोणी ही मतदानापासून वंचित राहू नये आजच्या तरुण वर्गाच्या हातात लोकशाहीच्या नाड्या आहेत तेच जर या प्रक्रियेच्या बाहेर असतील तर लोकशाही कशी बळकट होणार म्हणून तरुणांनी वंचित, समाजातील घटकांना प्रवाहात आणण्यासाठी प्रवृत्त करावे. जास्तीत जास्त युवा वर्गाला मतदार यादीत नाव नोंदणी करता यावी यासाठी वर्षातून चार वेळा आगाऊ नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे या सुविधेचा लाभ घेऊन 18 वर्षे पूर्ण न झालेल्या तरुणांनाही नाव नोंदविता येणार आहे मात्र त्याचे नाव वाचा समावेश 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत होणार असे मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमासाठी सौ.सुरेखा माने, अविनाश कांबळे, विजयसिंह जेधे, डॉ.सुनील ठाकरे,सौ.चंद्रकला शेळके, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.वैशाली भिमटे,विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा.सुप्रिया शिंदे , महाविद्यालय मतदार नोंदणी प्रतिनिधी श्री.सचिन भोरडे यांनी केले. महाविद्यालयाने हा उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेच्या सरचिटणीस मा.सौ.प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
पुणे -मुलांनी त्रास देऊ नये म्हणून त्यांच्या हाती मोबाइल दिला जातो. मोबाइलमुळे कुटुंबातील संवाद संपत चालला आहे. तो पुनःस्थापित करण्यासाठी संगीतासारखे छंद जोपासले पाहिजेत, असे मत शास्त्रीय संगीत गायीका मंजिरी आलेगावकर यांनी व्यक्त केले.
डीईएस मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या वतीने पालक आणि विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘जोडी तुझी माझी’ या संगीत स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून आलेगावकर बोलत होत्या. शाला समितीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, डॉ. सविता केळकर, मुख्याध्यापिका मंजूषा खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मोहन पारसनीस आणि चित्रा पंडीत यांनी परिक्षण केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
गट क्र. 1 (प्राथमिक) प्रथम क्रमांक – राधा खासनीस (गोळवलकर गुरुजी विद्यालय) आणि मानसी खासनीस दुसरा क्रमांक – अवधूत लेले (गोळवलकर गुरुजी विद्यालय) आणि नीता लेले
गट क्र. 2 (प्राथमिक) प्रथम क्रमांक – रघुनाथ निमकर (गोळवलकर गुरुजी विद्यालय) आणि सुरश्री निमकर दुसरा क्रमांक – आनंदी जायदे (गोळवलकर गुरुजी विद्यालय) आणि सोमनाथ जायदे
गट क्र. 3 (5 वी ते 7 वी) प्रथम क्रमांक – साईश्वरी गुंजाळ (एच. ए. स्कूल) आणि दत्तात्रय गुंजाळ दुसरा क्रमांक – वेदांग असनिकर (डी. ई. एस. स्कूल) आणि ज्योती असनिकर
गट क्र. 4 (8 वी ते 10 वी) प्रथम क्रमांक – अर्णव पुजारी (गोळवलकर गुरुजी विद्यालय) आणि अपर्णा पुजारी दुसरा क्रमांक – श्रेया वैद्य (एन. ई. एम. एस.) आणि केतकी वैद्य
पर्यवेक्षक विकास दिग्रजकर यांनी सूत्रसंचालन आणि राजश्री औटी यांनी आभार प्रदर्शन केले.
मुंबई, ०5 डिसेंबर 2022: भारतातील एकात्मिक लॉजिस्टिक आणि मोबिलिटी सोल्यूशन्स पुरवठादारांपैकी एक महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड (एमएलएल) ने महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटीच्या सहकार्याने इलेक्ट्रिक वाहनांवर एमएलएलच्या लास्ट-माईल डिलिव्हरी कार्गो सेवा ईडेल साठी महिला ड्रायव्हर नियुक्त करत असल्याची घोषणा केली आहे.
रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या सरकारच्या धोरणाला महत्त्वपूर्ण चालना देण्यासाठी ईडेल महिला ड्रायव्हर्सना रोजगार उपलब्ध करून देईल. त्यांना ईव्ही चालवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे विशेष प्रशिक्षित केले जाईल.
एमएलएलच्या १००० वर्तमान ईव्हीच्या ताफ्यातील ८५% महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी तीनचाकीद्वारे समर्थित आहेत. अलिकडेच सादर केलेले Zor Grand DV+ १७० cu.ft फॅक्टरी फिट डीव्ही बॉक्ससह असून ते एका चार्जवर १०० किलोमीटर रेंजचे आश्वासन देतात. त्यांची १.५ लाख किलोमीटर/५ वर्षांची बॅटरी वॉरंटी आहे आणि ही ताफ्या मधील सर्वात अलिकडची भर आहे. झोर ग्रँड डीव्ही+ चा वापर ई-कॉमर्स, एफएमसीजी, रिटेल, फार्मा आणि इतर अनेक पहिल्या आणि लास्ट माईल उपयोजनात केला जाऊ शकतो. एमएलएल सध्या पुढील ६ महिन्यांमध्ये (भारतभर) १००० मोठ्या क्युबिक साईझ वाहनांसह त्यांच्या ताफ्याचा विस्तार करण्याच्या प्रक्रियेत आहे. या जोडीलाच् कंपनी त्यांच्या लवकरच सादर होणार्या इलेक्ट्रिक दुचाकी कोचीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर चालवत आहे, ज्या देशभरात सादर केल्या जातील. ही वाहने रिचार्ज करण्यासाठी २० ईव्ही चार्जिंग हब देखील उभारण्यात आले आहेत.
या घोषणेवर भाष्य करताना महिंद्रा लॉजिस्टिकचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रामप्रवीण स्वामिनाथन म्हणाले: “आम्ही आमचे कर्मचारी, सहयोगी, व्यावसायिक भागीदार, ग्राहक आणि समुदाय यांच्यातील विविधतेला प्रोत्साहन आणि महत्त्व देतो. महिलांना समान संधी देऊन आमचे कार्यस्थळ आकर्षक बनवण्यासाठी आम्ही अनेक उपक्रम हातात घेतले आहेत. बेंगळुरूमध्ये ईडेल साठी महिला चालकांची नियुक्ती करणे हे या दिशेने एक पाऊल आहे. विस्तार योजनेचा एक भाग म्हणून; जास्तीत जास्त महिला चालक तथा मालक, फ्लीट मालक आणि इतर वाहतूकदारांना लास्ट माईल डिलिव्हरीसाठी ईडेल मध्ये सामील होण्याकरता प्रोत्साहित केले जाईल. या सहयोगींना त्यांच्या दीर्घकालीन करिअरचा विकास आणि रोजगार सक्षम करणाऱ्या कौशल्यांसह सक्षम बनवून आमच्या मोठ्या RISE उद्देशासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
महिंद्रा इलेक्ट्रिक – लास्ट माईल मोबिलिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन मिश्रा म्हणाल्या, “आमच्या इलेक्ट्रिक तीनचाकी महिलांसाठी रोजगार निर्माण करणाऱ्या आहेत. त्यायोगे त्यांना ईव्ही क्रांतीचा अविभाज्य भाग बनण्यास मदत करत आहेत. ट्विस्ट अँड गो ऑपरेशन, हादरे आणि आवाज-मुक्त वाहन चालविण्याचा अनुभव, विश्वासार्हता, तसेच सर्वोत्तम अशी मालकीची एकूण किंमत (TCO) महिलांना त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी ईव्ही चालविण्यास प्रवृत्त करते.”
पुणे :गेली ६ वर्षे २४ तास समान पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली वाढीव पाणीपट्टी वसूल करणाऱ्या महापालिकेकडून अजूनही बाणेर, पाषाण, सूस- म्हाळूंगे गावांना पुरेसा पाणी पुरवठा केला जात नाही. याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही दूर्लक्ष केले जात आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपाचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली चांदणी चौक येथील पाण्याच्या चौकोणी टाकीवर निषेध आंदोलन करण्यात आले. एकीकडे वारजे त पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत असताना बाणेर बालेवाडी हि सुटलेली नाही. दुसरीकडे हडपसर ,महंमदवाडी या परिसरासह दक्षिण पुण्याच्या अनेक भागात अजूनही महापालिका दिवसा आड ३ /४ तासाचा पाणीपुरवठा करत आहे .
दरम्यान आजच्या आंदोलन समयी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धरणात पाणी असताना केवळ प्रशासकीय नियोजन नसल्याने पाणी मिळत नसल्याने या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तसेच जो पर्यंत पुरेसे पाणी मिळत नाही तो पर्यंत या टाकीवरून उठणार नसल्याचे यावेळी अमोल बालवडकर यांनी सांगितले. भाजपचे पदाधिकारी गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर , शशिकांत बालवडकर यांच्यासह बाणेर-बालेवाडी भागातील नागरिक तसेच भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी बाणेर-बालेवाडीला जाणाऱ्या पाण्याचा व्हॉल्व फिरवित पाणीही सोडले. तसेच यावेळी नंदीबैलही पाण्याच्या टाकीच्या परिसरात आणत हलवी वाजवित प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
यावेळी बोलताना बालवडकर म्हणाले की, गेल्या पाच वर्षात आम्ही पाण्यासाठी वेगवेगळया योजना केल्या. त्यानंतर आम्हाला लॉकडाऊनमध्ये ही पुरेसे पाणी मिळत होते. तर डिसेंबर 2021 नंतर पाणी मिळण्यात पुन्हा समस्या निर्माण झाल्या तर प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर पाणीच येत नाही. तर यंदा धरणे 100 टक्के भरलेली असूनही पाणी मिळत नाही. अधिकारी सांगतात टाक्या भरल्या नाहीत, विजेचा प्रॉब्लेम आहे, कर्मचारीच नाहीत अशी कारणे देत पाणी सोडले जात नाही. मात्र, प्रत्यक्षात ही समस्या केवळ प्रशासकीय नियोजन नसल्याने होत असून तातडीनं ही समस्या सुटावी या मागणीसाठी हे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असून इथेच बसणार असल्याचे ते म्हणाले.
तर, प्रशासन वारजे जलकेंद्र तसेच इतर जलवाहिन्यांची कारणे पाणी सोडत नसून जाणून-बुजून बाणेर बालेवाडीला पाणी कमी देत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या मनमानीचा निषेध ठिय्या आंदोलन करत केला जाणार असून नागरिकांनीही त्यात सहभागी व्हावे असे आवाहन कळमकर यांनी केले आहे.
अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान च्या क्रुझवरील अंमली पदार्थ प्रकरणी झालेल्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.हिंदू महासंघाचे संस्थापक आनंद दवे, अॅड. सुबोध पाठक ( पालघर) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.सोमवार, दिनांक 5 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता पत्रकार भवन येथे हिंदू महासंघ च्या वतीने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मनोज तारे, प्रीतम देसाई उपस्थित होते.
घटना स्थळी रंगे हाथ पकडले गेलेल्या, गुन्हा मान्य असल्याचे तपास अधिकाऱ्यांपुढे मान्य केलेल्या, आणि त्याच आधारावर खालच्या न्यायालयाने 2 वेळा जामीन नाकारल्या गेलेल्या आर्यन खान आणि त्याच्या सहकाऱ्यांना तपास यंत्रणांनी आपल्या अधिकार क्षेत्रा बाहेर जाऊन निर्दोष मुक्त केले, असे त्यांनी सांगीतले.
या संपूर्ण घटने विरोधात हिंदू महासंघाने 13 जुलै 2022 रोजी कोर्टात आव्हान दिले असून या संपूर्ण प्रक्रियेत तपास यंत्रणा किती गाफिल राहिल्या, त्यांनी कसे त्यांच्या अधिकार क्षेत्रा बाहेर जाऊन या सर्व आरोपीना मदत केली, हे मुद्दे उपस्थित केले.याची पूर्ण 36 पानांची कागदपत्रे कोर्टात सादर केली आहेत, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात अाले.
सुमारे ८० वर्षीय पित्यासाठी मुलीने दिली स्वतःची किडनी – पिता ;पुत्री च्या कौतुकाला बहर
ट्रांसप्लांटनंतर लालूंना 3 किडन्या होतील–पत्नी राबडी देवी, मुलगी मीसा भारती व तेजस्वी यादवही सिंगापुरात
लालू यादव जामिनावर बाहेर आहेत. त्यांची तब्येत लक्षात घेऊन त्यांना कोर्टातून जामीन मिळाला.किडनीसोबतच त्यांना हृदय, रक्तातील साखर, रक्तदाबाचा आजारही आहे.
सिंगापूरमधील एका रुग्णालयात सोमवारी राजद सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांच्यावर किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. ही शस्त्रक्रिया तासभर चालली. लालूंना त्यांच्या कन्या रोहिणी आचार्या यांनी किडनी डोनेट केली आहे. लालूंपूर्वी रोहिणीचे ऑपरेशन करण्यात आले. सध्या दोघेही ICU मध्ये आहेत.
लालूंचे छोटे सुपुत्र तथा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी फेसबूकवर एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात ते म्हणाले की, पप्पा शुद्धीत आहेत. बोलत आहेत. तुम्हा सर्वंच्या शुभेच्छांसाठी कोटी-कोटी आभार. मीसा भारतींनीही सोशल मीडियावर आपल्या वडिलांची प्रकृती चांगली असल्याचे म्हटले आहे.
ऑपरेशनपूर्वी रोहिणीने लालूंसोबतचे एक छायाचित्र ट्विट केले. त्यात त्या म्हणाल्या – रेडी टु रॉक एंड रोल. तुमचे कल्याण हेच माझे आयुष्य आहे. माझ्यासाठी एवढेच पुरेसे आहे.
लालू व रोहिणी हे दोघेही सध्या रुग्णालयात दाखल आहेत. या दोघांचाही रक्तगट एबी पॉझिटीव्ह आहे. सिंगापूरच्या माउंट एलिझाबेथ रुग्णालयात प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया झाली.
किडनी ट्रांसप्लांटपूर्वी लालूंच्या कन्या रोहिणीने ट्विटरवर रुग्णालयातील फोटो शेयर करत म्हटले आहे की, रेडी टू रॉक अँड रोल…दुसऱ्या ट्विटमध्ये रोहिणींनी लालूंची प्रकृतीच आपल्यासाठी सर्वकाही असल्याचे म्हटले आहे
.
रूबन रुग्णालय पाटण्याचे नेफ्रोलॉजिट्स डॉ. पंकज हंस यांनी सांगितले की, लालूंना स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी लागेल. गर्दीपासूनही दूर रहावे लागेल. आहारही पौष्टिक घ्यावा लागेल. हळूहळू पेशंटचे हिमोग्लोबिन वाढत असताना ते जास्त प्रमाणात वाढणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. इम्यूनोसेप्रेसिव्ह औषधीच्या परिणामांमुळे रक्तदाबही वाढतो.
शरीरातून खराब झालेली किडनी काढली जात नाही. म्हणजे ट्रांसप्लांटनंतर लालूंच्या शरीरात आता 3 किडन्या होतील. रक्तदाब व इम्यूनोसेप्रेसिव्ह औषधी नियमितपणे वेळेवर घ्यावी लागेल. यावरच नव्या किडनीचे आयुष्य अवलंबून असेल. त्यात ट्रायक्रोलिमस किंवा सायक्लोस्पोरीन औषध असते. त्याचे लेव्हल योग्य प्रमाणात राखणेही महत्त्वाचे असते.
लालूप्रसाद यादव व रोहिणी आचार्यांना सध्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याची भेट घेण्याची परवानगी नाही. सोमवारी शस्त्रक्रिया झाल्यानंतर 48 तासांनी त्यांना त्यांची काचेच्या भीतींपलिकडून पाहता येईल. लालूंच्या पत्नी राबडी देवी, मोठी मुलगी मीसा भारती, सुपुत्र तेजस्वी यादव, लालूंचे निकटवर्तीय सुनील कुमार सिंह, भोला यादव व सुरेंद्र यादवही सिंगापूरमध्ये आहेत. किडनी डोनेट करणाऱ्या रोहिणींचे कुटुंब सिंगापूरमध्येच सेटल आहे.