श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे आयोजन ; स्वरोत्सवात ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांचा बाबूजी व मी कार्यक्रम उत्साहात
पुणे : ओम नमो भगवते रुद्राय… च्या उद््घोषाने लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा परिसर दुमदुमून गेला. सोमप्रदोष निमित्त महिलांद्वारे श्रीमती बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या उत्सव मंडपात रुद्रपठण पार पडले. भगवान दत्तात्रयांच्या चांदीच्या मूर्तीवर अखंडपणे रुद्राभिषेक सुरु असताना हे मंत्रपठण महिलांनी केले.
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १२५ वा दत्त जयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सोहळ्यांतर्गत रुद्रपठण व रुद्राभिषेकाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अॅड.शिवराज कदम जहागिरदार, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, राजू बलकवडे आदी उपस्थित होते.
ट्रस्टच्या उत्सवप्रमुख अॅड.रजनी उकरंडे, काळुराम उकरंडे, संस्कृतच्या अभ्यासिका डॉ.माधवी कोल्हटकर, धर्मादाय कार्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी सुनिता तिकोने, सुनीता फडके, स्मिता खाडीलकर यांनी रुद्राभिषेक व रुद्रपठणाचे यजमानपद भूषविले. विद्या अंबर्डेकर व सहका-यांनी रुद्रपठण केले. अमोल मुळ्ये गुरुजी यांनी पौरोहित्य केले. धार्मिक कार्यामध्ये महिलांचा सहभाग असावा, यासाठी ट्रस्टतर्फे प्रोत्साहन दिले जाते. दर एकादशीला देखील महिलांद्वारे कीर्तनसेवा रुजू होते.
गणेश कला क्रीडा मंच येथे सुरु असलेल्या स्वरोत्सवात बाबूजी व मी हा ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांच्या गीतांचा कार्यक्रम झाला. त्यापूर्वी गायिका प्रतिभा विनय थोरात व सहका-यांचा भाव आणि भक्ती संगीताचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. तसेच स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचा श्री दत्त कथा या कार्यक्रमाला देखील उर्त्स्फूत प्रतिसाद मिळत आहे.