Home Blog Page 1503

पुणे लोकसभा निवडणूकप्रमुखपदी मुरलीधर मोहोळ तर पुणे महापालिका निवडणूक प्रमुखपदी राजेश पांडे

पुणे- पुणे लोकसभा निवडणूक प्रमुख पदावर माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची तर पुणे महापालिका निवडणूक प्रमुख पदावर राजेश पांडे यांची भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्ती केल्याने आज भाजप सह एकूणच राजकीय वातावरण पुण्यातील आगामी निवडणुकीच्या चर्चेने ढवळून निघाले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 48 मतदार संघासाठी निवडणूक प्रभारी जाहीर केले आहेत. येत्या लोकसभेसाठी पुणे आणि पुणे जिल्ह्यावर भाजपनं विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघ आणि 288 विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या.सर्व लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रमुख यांना त्यांचा अनुभव आणि संघटन कौशल्याच्या बळावर 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला प्रचंड विजय मिळवून देण्याची जबाबदारी या द्वारे त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, जी 20 परिषदेनंतर राजेश पांडे यांच्यावर आता पुणे महापालिका निवडणुकीची मोठी जबाबदारी देण्यात आलीय. निवडणूक प्रमुखपदी निवड झाल्यानंतर पुणे महापालिकेत पुन्हा एकदा विजय खेचून आणण्याची जबाबदारी आपण पार पाडाल, असा विश्वास व्यक्त बावनकुळेंनी व्यक्त केला आहे.

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती मतदार संघ काबीज करण्यासाठी कंबर कसली असून, या मतदार संघात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीदेखील भेट देत निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला आहे. आगामी लोकसभेसाठी पवारांच्या बालेकिल्ल्यात सुरूंग लावण्यासाठी भाजपनं बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पुन्हा राहुल कुल यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे आता पवारांचा बालेकिल्ला भाजपकडे कसा जाईल यासाठी कुल आता कशी सूत्रं फिरवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बारामती लोकसभा मतदार संघात दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर, भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ येतो. या लोकसभा मतदार संघावर १९९१ पासून पवार कुटुंबियांचे वर्चस्व आहे. या मतदार संघावर भाजपचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी राहुल कुल यांच्याकडे आली आहे. आता शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्यांकडे दिली आहे.

पश्चिम महाराष्ट्र :लोकसभा निवडणूक प्रमुख

१) पुणे : श्री. मुरलीधर मोहोळ
२) बारामती : श्री. राहुल कुल
३) शिरुर : श्री. महेश लांडगे
४) मावळ : श्री. प्रशांत ठाकूर
५) कोल्हापूर : श्री. धनंजय महाडिक
६) हातकणंगले : श्री. सत्यजीत देशमुख
७) सांगली : श्री. दिपक शिंदे
८) सातारा : श्री. अतुल भोसले
९) सोलापूर : श्री. प्रशांत परिचारक

पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत असेल. पार्टीने आजवर दिलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पुणे लोकसभेच्या आगामी निवडणुकीतही भारतीय जनता पार्टी प्रचंड बहुमताने विजयी होईल, हा ठाम विश्वास आहे.आगामी काळात पुणे लोकसभेतील संघटन अधिकाधिक मजबूत करणार आहोत. शिवाय सर्वांना सोबत घेऊन देशाचे नेतृत्व सक्षमपणे पुन्हा करण्यासाठी पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

मुरलीधर मोहोळ,
निवडणूक प्रमुख, पुणे लोकसभा

प्रदेश भाजपने पुणे महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शिफारशीनुसार ही निवड झाली आहे. पक्ष नेतृत्वाने टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवीन. महापालिकेच्या माध्यमातून भाजपने शहरात मोठी विकासकामे केली आहेत. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत आम्ही मागील यशाची पुनरावृत्ती करू. त्यासाठी मी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करीन. बूथ रचनेचे सक्षमीकरण, नियोजनबद्ध निवडणूक व्यवस्थापन आणि विकासकामे व योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करू.

राजेश पांडे
प्रदेश उपाध्यक्ष, भाजप, महाराष्ट्र
पुणे महापालिका निवडणूक प्रमुख, भाजपा

विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक प्रमुखांची घोषणा करण्यात आली त्यामध्ये पुण्यातील नियुक्त्या पुढीलप्रमाणे –

हडपसर – योगेश टिळेकर
पर्वती – जितेंद्र पोळेकर
कसबा – हेमंत रासने
वडगावशेरी – जगदीश मुळीक
शिवाजीनगर – दत्ता खाडे
खडकवासला – सचिन मोरे
पुणे कँटोन्मेंट – अजिंक्य वाळेकर
कोथरूड – पूनित जोशी

पालखी सोहळ्यानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात बदल

पुणे दि. ८ : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (आयडीटीआर), नाशिक फाटा, भोसरी, आळंदी रास्ता कार्यालय व दिवे ब्रेक टेस्ट ट्रॅक येथील कामकाजात बदल करण्यात आल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी कळवले आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा १२ जुन रोजी दुपारचा मुक्काम प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आळंदी रस्ता येथील चाचणी मैदानावर असल्याने येथे नियमितपणे होणारे वाहन तपासणी व अनुज्ञप्ती चाचणी विषयक कामकाज आणि १२ जून रोजीची पूर्वनियोजित वेळ घेतलेल्या वाहनधारक आणि उमेदवारांची वाहन तपासणी किंवा चाचणी १७ जून रोजी होईल.

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची पालखी १२ जुन रोजी जुना पुणे-मुंबई रस्ता- नाशिक फाटा या मार्गे पुण्याकडे प्रयाण करणार आहे. या दिवशी ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि संशोधन संस्था येथे येण्या-जाण्याचा मार्ग बंद ठेवण्यात आल्याने अनुज्ञप्ती चाचणीसाठी अर्जदारांना आयडीआर येथे पोहोचण्यास गैरसोय निर्माण होऊ शकते. अनुज्ञप्ती चाचणीसाठी ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (आयटीडीआर) येथील १२ जुन रोजी पूर्वनियोजीत वेळ घेतलेल्या उमेदवारांनी अनुज्ञप्ती चाचणीसाठी १७ जुन रोजी उपस्थित रहावे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी १४ जुन रोजी पुणे येथून सासवडकडे प्रयाण करणार आहे. या दिवशी हडपसर-सासवड मार्ग वाहतूकीकरिता बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी १४ जुन रोजीची पूर्वनियोजित वेळ घेतलेल्या वाहनांची दिवे ता. पुरंदर येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर तपासणी होऊ शकणार नाही. अशा वाहनधारकांनी त्यांची वाहने १४ जुन पासून पुढील सात दिवासांमध्ये कोणत्याही दिवशी तपासणीसाठी दिवे येथे सादर करावीत.

वाहन तपासणी, अनुज्ञप्ती चाचणी व वाहनाची योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण विषयक कामकाजात झालेल्या बदलाची वाहनधारकांनी, उमेदवारांनी नोंद घेवून बदल केलेल्या तारखेला नियोजित ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहनही उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित

पुणे, दि. ८: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

पूर्व पुनरिक्षण उपक्रमांतर्गत १ जून २०२३ ते १६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण, प्रमाणिकरण करणे, दुबार, समान नोंदी, एका पेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा, विभाग/भाग यांची आवश्यकतेनुसार सुधारणा व मतदान केंद्रांच्या सीमांच्या पुर्नरचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीला मान्यता आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबद्ध योजना आखण्यात येईल. ३० सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारुप यादी तयार करण्यात येईल.

एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी १७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२३ आहे. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दोन शनिवार आणि रविवारी विशेष मोहिमेअंतर्गत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. तर २६ डिसेंबर २०२३ पर्यंत दावे व हरकती निकाली काढले जाणार आहेत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी २०२४ रोजी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली आहे.
0000

डीईएसच्या ११० एकर कॅम्पसवर रेनवॉटर हार्वेस्टिंग डीईएस आणि कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार

पाणी बचत विषयातील सर्वात शिक्षण संस्थेचा सर्वात मोठा प्रकल्प

पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) फर्ग्युसन रस्त्यावरील ११० एकर कॅम्पसवर पर्जन्यजल पुनर्भरण प्रकल्प (रेनवॉटर हार्वेस्टिंग) राबविण्यात येत असल्याची माहिती संस्थेच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी कळविली आहे.

डीईएस आणि कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्यात या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पासाठी श्री. शिवदुर्ग संवर्धन या स्वयंसेवी संस्थेचे सहाय घेण्यात येणार आहे. डीईएसच्या वतीने डॉ. कुंटे, उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, प्रकल्पाचे प्रबंधक सुनील भिडे, कार्यकारी अभियंता नीरज पूर्णपात्रे, कमिन्स इंडियाच्या उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) विभागाच्या प्रमुख सौजन्या वेगुरू, पंकज कुलकर्णी, शिवदुर्गचे पंडित अतिवाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुंटे म्हणाले, शहराच्या मध्यवर्ती भागात टेकडीसह ११० एकरचा फर्ग्युसन महाविद्यालयाचा परिसर असून, दुर्मीळ वनस्पतींचा समावेश असणारे बोटॅनिकल गार्डन आहे. दरवर्षी सरासरी ८०० मिमि पावसाचा अंदाज धरल्यास या परिसरात ३५ कोटी लीटरहून अधिक पाणी वाहून जाते. या प्रकल्पामुळे या पाण्याचा पुनर्वापर करता येणार आहे. परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. माती वाहून जाऊ नये यासाठी गवताची लागवड केली जाणार आहे. त्यानंतर बोटॅनिकल गार्डनसह सर्व परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाईल. त्यामध्ये आणखी काही दुर्मीळ वृक्षांचा समावेश असेल. शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या स्वरूपात हरित क्षेत्र विकसित झाल्याने शहराचे प्रदूषण आणि तापमान कमी होण्यास मदत होणार आहे. महाविद्यालयात शिकत असलेल्या अकरा हजारहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या माध्यमातून समाजात पर्यावरण, पाण्याची बचत याबाबतची जनजागृती करण्यात येणार आहे. पाणी बचत या विषयात कुठल्याही शैक्षणिक संस्थेने हाती घेतलेला हा मोठा प्रकल्प आहे.

वेगुरू म्हणाल्या, शिक्षण, पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र या क्षेत्रात कमिन्स इंडिया फाउंडेशन सीएसआरच्या माध्यमातून कार्यरत आहे. डीईएससारख्या ऐतिहासिक शिक्षण संस्थेबरोबर पाणी बचत क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणे हा भाग्याचा क्षण आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक आर्थिक मदत कमिन्स करणार आहे. तीन वर्षांसाठी हा करार आहे. तो पुढे वाढवला जाईल. उत्तम प्रकारचा नैसर्गिक अधिवास या ठिकाणी विकसित होईल असा विश्‍वास वाटतो. या हरित परिसराचा उपयोग संपूर्ण शहराच्या पर्यावरणासाठी होणार आहे.

-गेली दोन वर्षे या प्रकल्पावर प्राथमिक काम सुरू आहे. हरित क्षेत्र निर्माण करण्यासाठी पाण्याची गरज आहे. खुल्या विहिरी तयार करणे, परिसरातील १५ बोअरवेल मधील गाळ काढून त्या कार्यान्वित करणे, टेकडीवर चर खोदणे, खोल चर घेणे, गॅबियन स्टॅक्चर निर्माण करणे, शोषण खड्डे घेणे अशा शास्त्रीय उपाययोजना या प्रकल्पांतर्गत केल्या जाणार आहेत. त्यासाठी परिसर हरित करण्यासाठी आणि बोटॅनिकल गार्डनसाठी आवश्यक असणारी पाण्याची गरज भागणार आहे. त्याबरोबर प्रत्येक विभागाची गरज लक्षात घेऊन पाणी वापराचे ऑडिट, बॅलन्सशीट तयार केले जाईल, पाण्याचा गरजेनुसार वापर व्हावा यासाठी उपायोजना केल्या जातील.
सुनील भिडे, प्रबंधक

तिकोना, धर्मवीर, रोहिडेश्‍वर, राजगड, तुंग, रायरेश्‍वर या किल्ल्यांवरील निसर्गाचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी श्री. शिवदुर्ग संवर्धन संस्था कार्यरत आहे. या क्षेत्रातील संस्थेचा कामाचा अनुभव दांडगा आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सोबत घेऊन परिसर हिरवागार करण्यासाठी आम्ही शास्त्रीय पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणची पाण्याची गरज या प्रकल्पामुळे भागू शकेल असा विश्‍वास वाटतो.
पंडित अतिवाडकर

तर राणे बंधूंना पळता भुइ थोडी होईल..म्हणाले प्रदीप देशमुख

राणेपुत्रांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशाचे नेते शरदपवार यांच्याबाबत अनुदार उदगार काढल्याचा ठपका ठेवत माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रवक्ते प्रदिप देशमुख, संतोष नांगरे , नितीन कदम , किशोर कांबळे , अमोल ननावरे , अजिंक्य पालकर , मूणालिणी वाणी , शशिकला कुंभार , सुशांत ढमढेरे , मंगेश जाघव ,संकेत शिंदे , प्रतिक कांबळे , बाळासाहेब अटल समिर पवार व पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राणे बंधू हे सातत्याने पवार साहेबांवर अतिशय खालच्या भाषेत वक्तव्ये करीत आहेत. लोकशाहीत विरोधकांना टिकेचा अधिकार दिला आहे. तो त्यांनी अवश्य वापरावा परंतु आपले वडील देखील ज्यांच्या पायावर नतमस्तक होतात त्यांच्यावर खालच्या भाषेत टिका करताना राणे बंधू यांनी किमान लाज बाळगावी अशी टिका यावेळी करण्यात आली
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.राणे बंधू यांनी यापुर्वी अनेक वेळा मर्यादा सोडून वक्तव्ये केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता केवळ संसदीय लोकशाहीतील संस्कारामुळे शांत आहे परंतु जर तो भडकला तर राणे बंधूंना पळता भुइ थोडी होइल असा इशारा पक्षाचे प्रवक्ते प्रदिप देशमुख यांनी दिला आहे.

आळंदी येथे पालखी सोहळ्यानिमित्त लोकशिक्षणपर कार्यक्रमाचे आयोजन

(शुक्रवार, दि. ९ जून ते रविवार, दि. ११ जून २०२३)
पुणे, ०८: विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने  (शुक्रवार, दि. ९ जून ते रविवार, दि. ११ जून २०२३)  या दरम्यान श्री संत ज्ञानेश्‍वर-तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्‍वरूप दर्शन मंच, श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी सोहळा प्रस्थाना निमित्ताने युनेस्को अध्यासन अंतर्गत लोकशाही, मानवाधिकार, शांती व सहिष्णुतेसाठीचा लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने व्याख्यान/प्रवचन/कीर्तन व भक्ती संगीत भजनाचे विविध कार्यक्रम होणार आहेत.
तीन दिवसांच्या या महोत्सवात सायंकाळच्या ५.१५ ते ६.१५च्या सत्रात पुणे येथील ह.भ.प.श्री. धर्मराज महाराज हांडे, परभणी येथील ह.भ.प श्री. ठाकुरबुवा दैठणेकर आणि  आळंदी देवाची येथील ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक ह.भ.प. श्री. किसनमहाराज साखरे  यांची व्याख्याने / प्रवचने होणार आहेत.
सायंकाळच्या ७ ते ९ च्या सत्रात जालना येथील ह.भ.प.डॉ.सुदाम महाराज पानेगांवकर आणि प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.श्री बाबामहाराज सातारकर यांच्या कन्या ह.भ.प.श्रीमती भगवतीताई दांडेकर (सातारकर)  यांची कीर्तने होणार आहेत.
रोज रात्री ९.१५ ते ११.३०च्या सत्रात सौ. योजना शिवानंद पाटील, मुंबई यांचा जीव विठ्ठल शिव विठ्ठल हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम, श्री. ज्ञानेश्वर मेश्राम यांचा भजनांजली  हा कार्यक्रम होणार आहे. तसेच, श्री लक्ष्मण सूर्यभान याचा संत श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या जीवनचरित्राचे दशर्न करणारी सुवर्णपिंपळ ही आध्यात्मिक नाट्यकृतीचा कार्यक्रम  होणार आहे.  तसेच सकाळच्या सत्रात ह.भ.प. श्री.रामचंद्र महाराज इंगोले, ह.भ.प.श्री.अर्जुन महाराज लाड गुरूजी व ह.भ.प.श्री अच्युतमहाराज दस्तापूरकर यांचीही कीर्तने होणार आहेत.
काकडा आरती, हरिपाठ, भजन व टाळ- मृदंगाची साथ एमआयटी हनुमान भजनी मंडळ व विश्वदर्शन देवता भजनी मंडळ,  विश्वराजबाग, पुणे  हे करतील.अशी माहिती युनेस्को अध्यासन प्रमुख व विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड व श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या समन्वयक प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी दिली.

लाईक्स मिळवा पैसे कमवा: निवृत्त कर्नलला 2 कोटीचा गंडा

पुणे-समाजमाध्यमातील ध्वनीचित्रफितींना दर्शकपसंती (लाइक्स) मिळवून दिल्यास चांगले पैसे मिळतील असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका ७१ वर्षीय निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने सायबर पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार निवृत्त कर्नल आहेत. समाजमाध्यमातून चोरट्यांनी त्यांना एक संदेश पाठविला होता.

समाजमाध्यमातील ध्वनीचित्रफितींना दर्शकपसंती (लाइक्स) मिळवून दिल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमिष चोरट्यांनी दाखविले होते. सुरुवातील चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यात काही पैसे जमा केले. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. चोरट्यांनी त्यांच्याशी पुन्हा संवाद साधला. त्यांना ऑनलाइन टास्क योजनेत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगितले.त्यानंतर चोरट्यांनी दिलेल्या १८ बँक खात्यात वेळोवेळी दोन कोटी रुपये जमा केले. लष्करी अधिकाऱ्याने निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम तसेच साठवलेली रक्कम चोरट्यांच्या खात्यात ४१ व्यवहारांद्वारे जमा केली आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात चोरट्यांनी फसवणुकीचा प्रकार घडला आहे. फसवणूक झाल्यानंतर सुरुवातील लष्करी अधिकाऱ्याने कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली नव्हती.

या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चोरट्यांनी लष्करी अधिकाऱ्याला ज्या बँक खात्यात पैसे पाठविण्यास सांगितले होते. ती बँक खाती तसेच रक्कम गोठविण्याची विनंती पोलिसांनी बँकेकडे केली आहे, असे सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले- न्यायालयाने सरकारला फाशी सुनावली; आता शिक्षा देण्याचे काम जल्लादाने करावे

छत्रपती संंभाजीनगर

”राज्यात सध्या घटनाबाह्य सरकार बसले आहे. सर्वोच्च न्यायालायाने हे सरकार डिसमीस केलेले आहे. न्यायालयाने या सरकारला फाशी सुनावली आहे. आता फाशी द्यायचे काम जल्लादाने करायचेय असे ठणकावून सांगत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांनी हिमतीने निर्णय घ्यावा, आम्ही त्यांचा सत्कार करू असेही म्हटले आहे.

-शिवसेनेच्या छत्रपती संभाजीनगरच्या ३८ व्या शाखेच्या वर्धापन दिनानिमीत्ताने आयोजित या मेळाव्यात खासदार संजय राऊत बोलत होते.माजी खासदार चंद्रकांत खैरे,विधान परिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, आमदार उदयसिंह राजपुत,संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर,जिल्हाध्यक्ष किशनचंद तणवानी जिल्हाध्यक्ष राजु राठोड, माजी महापौर नंदकुमार घोडेले, प्रदीप पटवर्धन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

संजय राऊत म्हणाले, न्यायालयाने सरकारला फाशी सांगितली. पण फाशीची शिक्षा सुनावत स्वत: न्यायालय फाशी देत नाही. त्यासाठी जल्लाद आणावा लागतो. कायदा संविधान नुसार हे प्रकरण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षाकडे आले आहे. हा निकालाचा सोपा साधा सरळ अर्थ आहे. विधानसभा अध्यक्षांनी जल्लादाचे काम केले; जे कायद्याने सांगितले तर आम्ही काम केले तर त्यांचा सत्कार करू.

संजय राऊत म्हणाले, ”मी माझ्या पक्षासाठी ठाकरे कुटुंबासाठी एकदा नाही, शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. सध्या मी महाराष्ट्रातल्या मंत्र्याची प्रकरणे बाहेर काढत आहे. आमच्यावर दोन पाच लाखांसाठी कारवाई केलीत. आता या मंत्र्यावर कारवाई करावी लागेल. दादा भुसे अब्दुल सत्तार तानाजी सावंत तुम्ही पहा भविष्यात काय होते? यांना मंत्रीमंडळात ठेवणे परवडणारे नसून लोक रस्त्यावरुन जोडे मारतील तुम्हाला २०२४ ला आम्हीच आहोत. यादी तयार ठेवा.”

संजय राऊत म्हणाले, राज्यात दंगली सुरु आहेत.औरंगजेबाची कबर इथे आणि तो जिंवत होतो कोल्हापुरात? का कबरीवरची माती का काढता? कधी कोल्हापूर संगमनेर अजून कुठे काढता तुम्हाला कुठे औरंगजेब हवा आहे. कर्नाटकात बजरंगबली कामाला आले नाही. आता टिपु सुलतान बहादुरशहा जफर कोणालाही काढा, तुम्हाला याची गरज आहे.

संजय राऊत म्हणाले, तुमचे हिंदुत्व या खानावर अवलंबून आहे. एकनाथ शिंदेना हिंदुची व्याख्या विचारा हो. तसेच अब्दुल सत्तार हिंदुत्वाचे प्रचारक आहे. काही दिवसांनी संंघाचे प्रचारकही होतील. सत्तेसाठी काहीही करतील अशी टिका त्यानी केली. कोल्हापूरच्या दंगलीत ९० ट्क्के कोल्हापूरच्या बाहेरुन आले होते. राज्यातून एका रात्रीत निरोप दिला जातो आणि त्यानंतर दंगली घडवल्या जातात.

कोल्हापुरात दंगल; 15 पोलिस जखमी; औरंगजेबाचे स्टेट‌स ठेवल्याच्या निषेधार्थ आंदोलनात दगडफेक

0

कोल्हापुर-दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात सात तरुणांनी औरंगजेब व टिपू सुलतानाचे स्टेटस ठेवले होते. त्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी शहर बंदची हाक दिली होती. सकाळी मोठ्या संख्येने आंदोलक शिवाजी चौकात जमले. तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली नाही. मात्र आंदोलक ठाम होते. त्यामुळे पोलिसांशी त्यांची बाचाबाची झाली. याच वेळी काही तरुणांनी बिंदू चौक, अकबर मोहल्ला आदी भागात दगडफेक केली. त्यात ५० वाहने, काही दुकानांची तोडफोड झाली. एक ते सव्वा कोटींचे नुकसान झाले. १५ पोलिसांसह काही नागरिकही जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी आधी लाठीचार्ज व नंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

शिंदे-फडणवीस सरकार कायदा- सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले. त्यामुळे गृहमंत्री फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे आत्ताच बिळातून बाहेर कसे आले? दंगली घडवून पोळी भाजण्याचा भाजपचा डाव आहे.- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस

अहमदनगरमध्ये औरंगजेबाचा फोटो दाखवला त्यामुळे पुण्यात आंदोलनाची गरज काय? कुणीतरी मेसेज पाठवला म्हणून कोल्हापूरला रस्त्यावर उतरून धार्मिक रूप देण योग्य नाही. राज्यकर्ते यामध्ये उतरत आहेत, यातून कटुता वाढतेय. हे चांगले लक्षण नाही. – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

महाराष्ट्रात दंगली होणार हे विरोधक सातत्याने सांगत होते. त्याला विशिष्ट समुदायाचा प्रतिसाद मिळून अनेक जिल्ह्यात औरंगजेब, टिपू सुलतानचे उदात्तीकरण होत आहे. औरंग्याच्या इतक्या औलादी अचानक कशा पैदा झाल्या याचा आम्ही शोध घेऊ. – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल

पुणे: श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुणे-सासवड-लोणंद मार्गे पंढरपूर अशी जाते. तर संत तुकाराम महाराज पालखी पुणे ते सोलापूर मार्गाने रोटी घाटमार्गे बारामती इंदापूर अकलूज मार्गे पंढरपूरला जाते. या दोन्ही पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी या मार्गावरील वाहतुकीत बदल आवश्यक असल्याने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी १४ ते १८ जून या कालावधीत तर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी १५ जून ते २४ जुन या कालावधीत पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत. तसेच या कालावधीसाठी वाहतूक नियमनाचे आदेश त्यांनी जारी केले आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गातील वाहतुकीत बदल:
पुणे ते सासवड (सासवड मुक्काम) – १४ जूनच्या रात्री २ वाजल्यापासून ते १६ जूनच्या रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवे घाट व बोपदेव घाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. ही वाहतूक खडीमशीन चौक- कात्रज- कापूरहोळमार्गे सुरू राहील. सासवड बाजूकडून येणारी सर्व वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे पुण्याकडे येईल.

सासवड ते जेजुरी (जेजुरी मुक्कम) व जेजुरी ते वाल्हे (वाल्हे मुक्काम) – १६ जून रात्री २ वाजेपासून ते १७ जून रात्री १२ या कालावधीत पुणे येथून सासवड- जेजुरी- वाल्हे- निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी- पारगाव मेमाणे- सुपे- मोरगांव- नीरा या मार्गाचा वापर करावा.

वाल्हे ते लोणंद (लोणंद मुक्कम)- १८ जून रोजी पहाटे २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुणे येथून सासवड- जेजुरी- वाल्हे- निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी सासवड- जेजुरी- मोरगांव या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

लोणंद येथून पुढे फलटण मार्गे- १६ ते १८ जून या कालावधीत फलटण- लोणंद येथून पुणे येथे येणारी तसेच पुणे येथून फलटण-लोणंदकडे जाणारी वाहतुक शिरवळ मार्गे जाईल.

श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पर्यायी वाहतुकीचा मार्ग:

लोणीकाळभोर ते यवत (यवत मुक्काम)- १५ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने वाघोली- केसनंद- राहू- पारगांव- चौफुला या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूर बाजूकडून पुण्याकडे येणारी वाहतूक चौफुला- पारगांव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील.

यवत ते वरवंड ( वरवंड मुक्कम)- १६ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने थेऊर फाटा- केसनंद- राहू- पारगांव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गे जातील. सोलापूर बाजूकडून येणारी वाहने कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगांव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील.

वरवंड ते उंडवडी, ता. बारामती (मुक्काम उंडवडी)- १७ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने चौफुला- पारगांव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे येणारी वाहतूक कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगांव- चौफुला- वाघोली- पुणे या मार्गाचा वापर करतील.

उंडवडी ते बारामती (बारामती मुक्काम)- १८ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड हे रस्ते बंद राहतील. ही वाहतूक भिगवन मार्गे बारामतीला जाईल. व बारामतीकडून येताना भिगवन मार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर येईल.

बारामती ते सणसर (सणसर मुक्काम) – १९ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत जंक्शन ते बारामती हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. वालचंदनगर व इंदापुरकडून येणारी वाहतूक जंक्शन येथून कळस मार्गे बारामती- आष्टी वळविण्यात येईल. बारामतीकडून येताना भिगवन कळस जंक्शन कडे जाईल.

सणसर ते अंथुर्णे (अंथुर्णे मुक्काम) तसेच अंथुर्णे ते निमगांव केतकी (निमगांव केतकी मुक्काम)- २० जून रोजी पहाटे २ ते २१ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत व २१ जून रोजी पहाटे २ ते २२ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बारामतीकडून इंदापूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने बारामती- कळंब- बावडा- इंदापूर या मार्गे किंवा बारामती- भिगवण- इंदापूर या मार्गे जातील. इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने इंदापूर- बावडा-कळंब- बारामती या मार्गे किंवा इंदापूर- भिगवण- बारामती या मार्गे जातील.

निमगाव केतकी ते इंदापूर (इंदापूर मुक्काम) २२ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत निमगाव केतकीकडून इंदापूरकडे जाणारी वाहतूक बंद राहील. इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक लोणी देवकर- कळस – जंक्शन मार्गे किंवा लोणी- देवकर- भिगवण मार्गे बारामतीकडे जातील.

इंदापूर- २३ जून रोजी पहाटे ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत अकलूजकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक ही अकलूज- बावडा- नातेपुते मार्गे जातील. अकलुजकडून बारामती व पुण्याकडे जाण्याकरीता इंदापूर मुख्य हायवेचा वापर करावा. इंदापूर शहरातील जुना पुणे सोलापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. त्यावरील वाहतूक मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक अशी बायपासने वळविण्यात येईल.

इंदापूर ते सराटी (सराटी मुक्काम)- २४ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत व २५ जून रोजी पहाटे २ ते दुपारी १२ वाजेपर्यंत इंदापूर ते अकलूज रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या मार्गावरील वाहतूक इंदापूर- हिंगणगांव- टेंभुर्णी- गणेशगाव- माळीनगर- अकलूज या मार्गे जातील. तसेच अकलूज ते इंदापूर या मार्गावरील वाहने अकलूज- नातेपुते- वालचंदनगर- जंक्शन- भिगवण या मार्गे जातील.

ग्राहक सेवेच्या गुणवत्तेत सातत्य राखा – लोकेश चंद्र

महावितरणचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

मुंबई-

ऊर्जा ही सर्व प्रगती साध्य करण्याची मुलभूत गरज आहे. सर्व क्षेत्रांच्या प्रगतीकरिता आवश्यक तेवढी ऊर्जा उपलब्ध करून दिली पाहिजे. त्याद्दष्टीने महावितरण सध्या चांगले काम करत आहे. गेली अनेक वर्षे महावितरणमधील अधिकारी  व कर्मचारी सातत्याने कठोर परिश्रम करत आहेत. ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व शाश्वत वीजपुरवठा देत वीजहानी कमी  करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

          महावितरणच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात  अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. याप्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,आरडीएसएस योजनेच्या माध्यमातून स्मार्ट मीटर, स्काडा असे प्रकल्प अधिक प्रभावीपणे राबवायचे आहेत.यापुढेही आपण ग्राहक सेवेच्या गुणवत्तेत सातत्य राखाल. येणाऱ्या काळात महावितरणची  आणि पर्यायाने राज्याची प्रगती अधिक जोमाने होईल असे प्रतिपादन श्री लोकेश चंद्र यांनी व्यक्त केले.

          यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे मुख्य  संपादक पराग करंदीकर, महावितरणचे संचालक(संचालन) संजय ताकसांडे, संचालक(वित्त) अनुदीप दिघे, संचालक(प्रकल्प) प्रसाद रेशमे, संचालक(वाणिज्य) योगेश गडकरी व संचालक (मानव संसाधन) अरविंद भादिकर उपस्थित होते.

श्री.लोकेश चंद्र पुढे म्हणाले, ‘केंद्राच्या मदतीने राज्यात आरडीएसएस योजना राबवण्यात येत आहे. ही योजना यशस्वी होण्याकरिता चांगल्याप्रकारे कालबद्ध कार्यक्रम आखण्यात  यावा. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० यामुळे शेतकऱ्यांना दिवसा व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा होईल. क्रॉस सबसिडीचा भार कमी होणार असल्याने उद्योग व व्यावसायिक ग्राहकांना स्पर्धात्मक दराने वीज मिळण्यास मदत होईल. तसेच अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवायचा असून यामुळे वीजदर कमी होणे अपेक्षित आहे. या सर्वाचा फायदा राज्यातील उद्योगांना होईल.

मराविमं सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक श्री विश्वास पाठक म्हणाले, ‘राज्यात औद्योगिक व आर्थिक प्रगती साधायची असेल तर वीज ही अत्यावश्यक घटक आहे. त्याकरिता विजेचे नियोजन आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वीज यंत्रणेचे सक्षमीकरण झाले होते. त्यामुळे महाराष्ट्राची इकॉनॉमी वन ट्रिलीयनवर नेण्यास महाराष्ट्र तयार आहे.

महावितरणसमोरील आव्हाने या विषयावर बोलताना दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे मुख्य संपादक पराग करंदीकर म्हणाले, ‘मंडळापासून कंपनी झाल्यानंतर महावितरणची परिस्थिती चांगली झाली आहे. मात्र अद्याप काही सुधारणा करणे अपेक्षित आहे. ग्राहकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडवणे गरजेचे आहे. आज ग्राहक आपल्या हक्कांबद्दल जागरूक आहेत त्यामूळे महावितरणला अधिक ग्राहकाभिमुख व्हावे लागेल. आर्टीफिशियाल इंटीलीजन्सचे दिवस आले असून यातही आपले अस्तित्व टिकवून ठेवले पाहिजे. याकरिता कठोर परीश्रमाशिवाय पर्याय नाही. वीज क्षेत्र हे सर्व प्रगतीचा कणा आहे. तो सक्षम असणे गरजेचे आहे.

            या कार्यक्रमास महावितरणमधील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रणाली निमजे  यांनी केले तर आभार कंपनी सचिव अंजली गुडेकर यांनी मानले. वर्धापन दिनानिमित्त प्रकाशगड येथील अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता दुपारच्या सत्रात ‘मनाची अमर्याद शक्ती’ या विषयावर डॉ.दत्ता कोहिनकर यांनी कार्यशाळा घेतली. तर सायंकाळी स्वरस्पर्श हा मराठी गीतांचा कार्यक्रम झाला.

अजितदादा तुमच्या मनात लपलंय काय ?

पुणे- बापटांच्या निधनामुळे लोकसभेची पोटनिवडणूक होईल? कधी होईल ?का होणार नाही ? असे प्रश्न उपस्थित होत असताना लोकसभेच्या उमेदवारीबाबत मात्र अनेकांनी चाचपणी सुरु केली आहे तर काही वातावरणात हवा सोडण्याची कामे करू लागले आहेत.यावेळी महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचे ठरवले तर निश्चितच भाजपाचा पराभव होईल असे मानले जाते.मात्र अजित दादांनी कुरघोडी करून पुण्याची जागा कॉंग्रेसला नाही तर राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे असा दावा सुरु केलेला आहे. एका अर्थी या दाव्याला तसे महत्व देखील आहे.पणअगदी गोपाळ तिवारी जिथे उमेदवारी मागत आहेत त्या कॉंग्रेसच्या ते पचनी पडणार नाही,कॉंग्रेसकडे लोकसभा लढण्यासाठी तगडा उमेदवार म्हणून कोण या दृष्टीने पाहिले तर केवळ रमेश बागवे यांचे नाव पुढे येते,त्यानंतर बागुलांचे नावही काही लोक घेतात बागुल लढणार नाहीत असा राजकीय समीक्षकांचा दावा आहे.पण बागवे तरी मनापासून लढण्यास तयार आहेत काय ? आणि त्यांना मविआ साथ देणार काय ? हे प्रश्न देखील त्याबरोबर पुढे केले जात आहेत.एकूणच त्यांचे नाव वगळले तर कॉंग्रेसकडे विजयी होईलच असा तगडा उमेदवार नसल्याचा दावा होऊ लागल्यानेच अजित पवारांनी या मतदार संघावर दावा करायला सुरुवात केली आहे.पण विशेष म्हणजे राष्ट्रवादीकडे देखील केवळ दीपक मानकर यांच्या शिवाय कोणी तगडा उमेदवार दिसत नाही.प्रशांत जगताप इच्छुक असले तरी त्यांची कार्यशक्ती मर्यादित मानली जाते आणि मानकर यांची कार्यशक्ती त्याहून व्यापक अशी संपूर्ण मतदार संघावर पकड असलेली मानली जाते.आणि मानकर हे कॉंग्रेस मधूनच राष्ट्रवादीत आलेले आहेत.त्यामुळे कॉंग्रेस पक्षात देखील त्यांचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत.

अशा सर्व स्थितीत जेव्हा अजित पवार पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करतात तेव्हा नेमके त्यांच्या मनात उठणाऱ्या राजकीय समीकरणा बाबत उत्सुकता निर्माण होऊ लागते जी आज राजकीय सामिक्षकात निर्माण झाली आहे.

त्यातच सोशल मिडिया वर व्ह्युअर्स आणि लाइक्स मिळवण्या इतकी लोकसभेची निवडणूक सोपी नसते,पण तरीही या माध्यमांतील गाजावाजा करणाऱ्यांना महापालिकेची निवडणूक देखील जड होणार आहे,अशांनी रिंगणात येऊ अशी हवा करायला सुरुवात केली आहे,त्या केवळ तुम्हाला आम्ही पाडण्यास कारणीभूत होऊ शकतो एवढेच इशारा देण्यापुरत्या मर्यादित असल्याचे मानले जाते असा सूत्रांचा दावा आहे.

भाजपने टिळकांच्या घरात उमेदवारी दिली नाही म्हणून कसबा हारला हा फसवा प्रचार आतापर्यंत अनेक नेत्यांच्या लक्षात आला असेलही,पण बापटांच्या सुनेला तेव्हाच उमेदवारी दिली असती.. तर…हा विचार कोणाच्या मनाला शिवत कसा नाही ? हाच प्रश्न आहे.अर्थात बापटांच्या सुनबाई यांना प्रत्यक्षात प्रचारात उतरता आले नसते ते मतदार देखील जाणून आणि समजून घेणारे होतेच.पण त्या जर कसब्याच्या रिंगणात असत्या तर कॉंग्रेसच उमेदवाराला विजय कठीण होता,आणि बंडखोरी रोखणे कठीण होते.पण आता या भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेला बापटांच्या घरात उमेदवारी दिली तर..हा विचार केला तर…अनेकंची विभिन्न मते व्यक्त होताना दिसतात.महापालिका पदाधिकाऱ्यापैकी कोणालाही पुन्हा उमेदवारी दिली तर मात्र भाजपचा पराभव होईल असा दावा केला जातो.आणि म्हणूनच भाजपकडे विजयी होण्यासाठी पुढे असलेले नाव आहे ते माजी खासदार संजय काकडे यांचे.ते उद्योजक आहेत आणि सर्व धर्मियात आणि सर्व पक्षात त्यांचा चांगला संपर्क आहे.जो अन्य कुणाहि पेक्षा अधिक सरस आहे असाही दावा देखील केला जातो.

एकूणच सध्याच्या वातावरणात जर पुण्याची लोकसभा पोट निवडणूक झाली तर ती राजकारणात चांगलेच रंग भरेल अशी शक्यता दिसून येते आहे.

बिशप थॉमस डाबरे यांना दि. ९ जून रोजी ‘मराठी रत्न – कोहिनूर’ पुरस्कार

पुणे-बिशप थॉमस डाबरे यांनी गेली १४ वर्षे बिशप म्हणून केलेले समाजकार्य आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यावर केलेली पीएचडी यानिमित्त त्यांना ‘मराठी रत्न – कोहिनूर’ पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे. शुक्रवार दि. ९ जून २०२३ रोजी सायं ०५.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक मार्ग, पुणे येथे हा कार्यक्रम संपन्न होईल. मराठी भाषा संवर्धन समिती आणि कोहिनूर ग्रुप तर्फे दिला जाणार हा पुरस्कार अकरा हजार रुपये, सन्मान चिन्ह, पुणेरी पगडी, शाल व श्रीफळ असा आहे.  

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी भूषवणार आहेत. वेदभवनचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी आणि पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. विशानेमा ज्ञाती समाजाचे बिपीन ज. मोदी हे निमंत्रित असतील. या कार्यक्रमात युवा गायिका तन्मयी मेहेंदळे प्रार्थना सादर करणार असून नीलिमा बोरवणकर सूत्रसंचालन करतील.

बिशप थॉमस डाबरे हे मूळ वसईचे असून वयाच्या १६व्या वर्षापासून त्यांनी लॅटिन भाषेचे शिक्षण मुंबईत पूर्ण केले. ३ वर्षानंतर त्यांनी फादर म्हणून धर्मकार्य सुरु केले व त्यानंतर पुण्यात दीर्घकाळ अध्यापन केले.  सन २००९ पासून गेली १४ वर्षे पुण्यात बिशप म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांचे कार्यक्षेत्र पुण्याप्रमाणेच सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर पासून कर्नाटकातील होटगी पर्यंत होते. या प्रदीर्घ काळात अनेक समाजपयोगी कार्यात ते सहभागी झाले. कोरोना काळात पुण्यापासून होटगी पर्यंतच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात चर्चच्या माध्यमातून त्यांनी 1 कोटीहून अधिक गरजू नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था केली.  जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यावर त्यांनी पीएचडी पूर्ण केली असून नाशिक येथील मराठी साहित्य संमेलनात त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यावर मराठीतून अभ्यासपूर्ण व्याख्यानही दिले होते. नुकतेच बिशप पदावरून ते निवृत्त झाले असून निवृत्तीनंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यावर अधिक वाचन, अभ्यास व संशोधन करून ग्रंथ लिहण्याचा त्यांच्या मानस आहे असे मराठी भाषा संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रवीण प्र. वाळिंबे यांनी सांगितले.

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी २० जूनपर्यत अर्ज करावेत – वस्त्रोद्योग आयुक्त एम.जे. प्रदिप चंदन

मुंबई : केंद्र सरकारच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाकरिता दि.२० जून २०२३ पर्यत प्रवेश अर्ज करावेत, असे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त एम.जे. प्रदिप चंदन यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) करीता १३ जागा, आर्थिकदृष्या दुर्बल घटकाकरीता १ जागा आणि वेंकटगिरी करीता २ जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडून दि. २० जून २०२३ पर्यंत विहीत नमून्यात प्रवेश अर्ज  मागविण्यात येत आहेत.

यासाठी इच्छुक उमेदवारांनी दि. २० जून २०२३ पर्यंत संबंधित प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. तसेच अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहेत, अशी माहिती वस्त्रोद्योग आयुक्त प्रदीप चंदन यांनी दिली आहे.

मराठ्यांच्या पराक्रमाची तेजस्वी गाथा ‘रामशेज’ रुपेरी पडद्यावर

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्य स्थापनेच्या या अग्निकुंडात त्यांच्या असंख्य शिलेदारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाची पाने चाळताना अनेक शूर मावळ्यांनी गाजवलेले पराक्रम आपण वाचलेले आहेत. महाराजांनी केवळ स्वराज्य स्थापलं नाही तर त्यासाठी प्राणपणाने लढणारे, जीवाला जीव देणाऱ्या एकनिष्ठ सहकाऱ्यांची पिढी तयार केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतही मंडळी प्रखर निष्ठेने मोगली सत्तेशी झुंजत राहिली. त्यांच्या तेजस्वी पराक्रमाची दुर्लक्षित गाथा म्हणजे नाशिक नजीकच्या ‘रामशेज’ किल्ल्याची लढाई.

३५० व्या शिवराज्याभिषेकदिनाचे औचित्य साधत ‘आलमंड्स क्रिएशन्स प्रोडक्शन’ने ‘रामशेज’ या भव्यदिव्य ऐतिहासिक मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’च्या यशानंतर आणि ‘मुरारबाजी’ चित्रपटाचे चित्रीकरण जोमात सुरु असतानाच निर्माते अजय आरेकर आणि अनिरूद्ध आरेकर आपल्या ‘आलमंड्स क्रिएशन्स’द्वारा ‘रामशेज’ ही चौथी कलाकृती शिवप्रेमींसाठी घेऊन येत आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर औरंगजेबाने महाराष्ट्रातील किल्ले जिंकून आपली सल्तनत बुलंद करण्याचा मनसुबा बोलून दाखवला आणि त्याची पहिली नजर पडली ‘रामशेज’ किल्ल्यावर पण हा किल्ला सर करायला त्याला एक नाही.. दोन नाही.. तब्बल साडे सहा वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही किल्ला जिंकता आला नाही. केवळ ६०० मावळ्यांनी हा किल्ला प्राणपणाने जपला; तो हस्तगत करण्यासाठी शहाबुद्दीन खान, फतेह खान आणि कासम खान यांसारख्या मातब्बर  सरदारांनी अक्षरशः शर्थ केली पण हाती केवळ निराशा आली. त्या ६०० मावळ्यांच्या शौर्याची, चिकाटीची आणि बुद्धिचातुर्याची चित्तथरारक गोष्ट म्हणजे ‘रामशेज’.

लवकरच ‘रामशेज’ चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे.