Home Blog Page 1504

मराठ्यांच्या पराक्रमाची तेजस्वी गाथा ‘रामशेज’ रुपेरी पडद्यावर

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्य स्थापनेच्या या अग्निकुंडात त्यांच्या असंख्य शिलेदारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाची पाने चाळताना अनेक शूर मावळ्यांनी गाजवलेले पराक्रम आपण वाचलेले आहेत. महाराजांनी केवळ स्वराज्य स्थापलं नाही तर त्यासाठी प्राणपणाने लढणारे, जीवाला जीव देणाऱ्या एकनिष्ठ सहकाऱ्यांची पिढी तयार केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतही मंडळी प्रखर निष्ठेने मोगली सत्तेशी झुंजत राहिली. त्यांच्या तेजस्वी पराक्रमाची दुर्लक्षित गाथा म्हणजे नाशिक नजीकच्या ‘रामशेज’ किल्ल्याची लढाई.

३५० व्या शिवराज्याभिषेकदिनाचे औचित्य साधत ‘आलमंड्स क्रिएशन्स प्रोडक्शन’ने ‘रामशेज’ या भव्यदिव्य ऐतिहासिक मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’च्या यशानंतर आणि ‘मुरारबाजी’ चित्रपटाचे चित्रीकरण जोमात सुरु असतानाच निर्माते अजय आरेकर आणि अनिरूद्ध आरेकर आपल्या ‘आलमंड्स क्रिएशन्स’द्वारा ‘रामशेज’ ही चौथी कलाकृती शिवप्रेमींसाठी घेऊन येत आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर औरंगजेबाने महाराष्ट्रातील किल्ले जिंकून आपली सल्तनत बुलंद करण्याचा मनसुबा बोलून दाखवला आणि त्याची पहिली नजर पडली ‘रामशेज’ किल्ल्यावर पण हा किल्ला सर करायला त्याला एक नाही.. दोन नाही.. तब्बल साडे सहा वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही किल्ला जिंकता आला नाही. केवळ ६०० मावळ्यांनी हा किल्ला प्राणपणाने जपला; तो हस्तगत करण्यासाठी शहाबुद्दीन खान, फतेह खान आणि कासम खान यांसारख्या मातब्बर  सरदारांनी अक्षरशः शर्थ केली पण हाती केवळ निराशा आली. त्या ६०० मावळ्यांच्या शौर्याची, चिकाटीची आणि बुद्धिचातुर्याची चित्तथरारक गोष्ट म्हणजे ‘रामशेज’.

लवकरच ‘रामशेज’ चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे.

गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य द्यावे –सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

मुंबई : जनतेला  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून  अधिक व्यापक  सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत  आहेत. त्यामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. अशाच पद्धतीने गुणवत्तापूर्ण कामाला सर्वांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन  सार्वजनिक बांधकाम, अन्न, नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

सार्वजनिक बांधकाम भवन येथे आयोजित बांधकाम विभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांच्या गौरव सोहळयात मंत्री श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर,  सचिव (रस्ते) स.शं. साळुंखे, सचिव (बांधकाम) सं. द. दशपुते, सा.बां. प्रादेशिक विभाग, मुंबईचे मुख्य अभियंता र. रा. हांडे, सहसचिव रोहिणी भालेकर, प्रादेशिक कार्यालय पुणेचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होत असलेला प्रत्येक प्रकल्प, प्रत्येक काम राष्ट्राला समर्पित महत्त्वाचे काम असते. त्यामुळे  जोपर्यंत राष्ट्रीय सेवेच्या वृत्तीने काम करण्याची भावना प्रत्येकात असेल, तोपर्यंत आपल्या हातून निश्चित दर्जेदार काम होईल. कोणत्याही यंत्रणेत अधिकारी, कर्मचारी यांना काम करण्याची व्यापक संधी उपलब्ध असते. त्याचा सुयोग्य वापर करून योगदान देणाऱ्यांचा पुरस्काराने गौरव झाला पाहिजे, त्यातून चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.  कर्मचाऱ्यांनीही  गुणवत्तापूर्ण काम करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. आपल्या कामातून प्रत्येकजण वेगळा ठसा उमटवू शकतो, असे सांगून मंत्री श्री चव्हाण म्हणाले की, यापुढे सर्वांच्या सहकार्याने विभागाचा व्यापक विस्तार करत  विभागाचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्राला वेगळं वैभव प्राप्त करून देण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. विभागाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा वाढवण्यासाठीची क्षमता आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे आहे. त्यादृष्टीने सर्वांनी अ़धिक जोमाने काम करावे. यापुढे  वार्षिक पुरस्कार वितरण वेळेत  करण्याकडेही लक्ष देणार असल्याचे मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर म्हणाल्या की, शासनात काम करण्याची संधी मिळणे ही महत्त्वाची बाब आहे. कोणत्याही कामाच्या यशस्वीतेत त्यात सहभागी प्रत्येकाने  कामात दिलेले योगदान महत्त्वाचे असते. तसेच काम करताना समूह भावना आवश्यक आहे. आपल्या कामाची दखल घेतली गेली, ही भावना पुरस्काराने वाढते.त्यासोबतच गुणवत्तापूर्ण कामासाठीचे प्रोत्साहन मिळते. या पुढचे पुरस्कार त्याच वर्षाखेर वितरीत करण्याची दक्षता विभागामार्फत घेण्यात येईल. सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे गुणवत्ता हे समीकरण आपण सर्व मिळून प्रस्थापित करू, असे श्रीमती म्हैसकर यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील सर्व पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांना संबंधित विभागीय स्तरावर पुरस्कार वितरण करण्याच्या सूचना मंत्री श्री. चव्हाण यांनी विभागाला दिल्या होत्या त्यानुसार मुंबई, पुणे विभागातील पुरस्कार प्राप्त सर्व कर्मचाऱ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

दलित पँथरची पुनर्स्थापना करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई – अन्याय अत्याचारांचा मुकाबला करणाऱ्या दलित पँथर या आक्रमक संघटनेचे पुनर्जिवन करण्याचा आपण विचार करीत आहोत. आजची तरुण पिढी केवळ व्हॉटसअप, फेसबुकवर आपला राग व्यक्त करते आहे. या नव्या पिढीला पुन्हा सामाजिक क्रांतीच्या आंदोलनात उभे करण्यासाठी नव्या पिढीच्या हाती दलित पॅंथरचे संघटन देण्याचा आपण विचार करीत आहोत. रिपब्लिकन पक्षाशी संलग्न असणा-या आणि सामाजिक संघटना म्हणुन दलित पँथरचे पुर्नजिवन करण्याचा आपण विचार करीत आहोत असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

नागपुर येथे दलित पॅंथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमीत्त आयोजित सोहळयामध्ये ते बोलत होते. दलित पँथरचा सुवर्ण महोत्सव डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी भुपेश थुलकर , अर्जुन डांगळे, दिलीप जगताप, रिपाइं चे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, दिवाकर शेजवळ ; दयाळ बहादूर;विजय आगलावे; सूत्रसंचालन राजन वाघमारे; विनोद थुल; बाळासाहेब घरडे; निखिल कांबळे आदी अनेक उपस्थित होते.

जो तो उठतो आणि राष्ट्रीय नेता बनतो. समाजातील प्रत्येक नेत्याला अखिल भारतीय नेता बनायचे असते. त्यामुळे आपले पक्ष, संघटना एकसंघ राहत नाहीत. आंबेडकरी समाजाला फुटीचा शाप आहे, त्यामुळे आपली राजकीय आर्थीक प्रगती होत नाही. अशी टीका ना. रामदास आठवले यांनी केली.

दलित पँथरची स्थापना १९७२ रोजी झाली. पँथरमुळे रिपब्लिकन पक्षाला, आंबेडकरी चळवळीला बळ मिळाले. परंतु राजा ढाले आणि नामदेवराव ढसाळ यांच्यात वाद झाला आणि पँथर १९७४ ला फुटली. दलित पँथरची फुट दलित चळवळीसाठी धक्का होता. भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना नागपुरात ३ ऑक्टोबर १९५७ साली झाली. वास्तविक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्राच्या आधारे पक्ष स्थापन होणे अपेक्षित होते. सर्व जातीधर्माचा हा पक्ष असावा आणि तो सत्ताधारी झाला पाहिजे, अशी इच्छा बाबासाहेबांची होती. पण समाजाला फुटीचा शाप आहे. पक्षाची घटना काय असावी यावरून वाद निर्माण झाला आणि एका वर्षात पक्षात फुट पडली. आता आरपीआयमधील सर्व गट एकत्र यावे, अशी समाजाच्या लोकांची भूमिका आहे. त्यावर आणि दलित पँथर ही चळवळ पुन्हा उभी राहू शकते काय, यावर विचार झाला पाहिजे, असेही ना.रामदास आठवले म्हणाले.
सध्याची पिढी ही केवळ सोशल मिडीयाद्वारे निषेध व्यक्त करते. रस्त्यावर उतरुन आता कोणीही आंदोलन करीत नाही. आम्ही दलित पँथरच्या काळात रस्त्यावर उतरुन आंदोलने केलीत. आणि दलित पँथर हा राजा ढाले यांनी बरखास्त केल्यानंतर राजा ढाले आणि जे.बी. पवार यांनी बरखास्त केल्यानंतर भारतीय दलित पँथरच्या रुपाने जिवंत ठेवण्याचे काम हे रामदास आठवले यांनी केले होते. रामदास आठवले यांनीच दोन पिढया दलित पँथरमधील युवकांना पँथर म्हणुन घडविले असे यावेळी अनेक वक्त्यांनी सांगितले.

कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेल्या गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घ्या :- नाना पटोले

नागरिकांनी अफवांवार विश्वास न ठेवता शांतता राखावी.

मुंबई-
महाराष्ट्रात कटकारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळत आहे? राज्यात दंगली घडवण्याचा पहिला प्रयत्न मागील महिन्यात फसल्यानंतर आता पुन्हा औरंगजेबाचा मुद्दा पुढे करून वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचसोबत मुंबईसारख्या सुरक्षित शहरामध्ये एका विद्यार्थीनीची वसतीगृहात अत्याचार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. राज्यात पोलिसांचे नाही तर समाजकंटकाचे आणि गुन्हेगाराचे राज्य आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे गृहखात्यावर आणि पोलिसांवर नियंत्रण राहिलेले नाही त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचा राजीनामा घेऊन सक्षम गृहमंत्री नेमावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पंचनामा करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, या सरकारच्या काळात औरंगजेबाचे उदात्तीकरण सुरु आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे आत्ताच बिळातून बाहेर कसे आले? राज्यात रोज दंगली सुरु आहेत. मुख्यमंत्री व गृहमंत्री काय करत आहेत? शिंदे फडणवीस सरकार नपुंसक आहे असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते ते खरेच आहे. संभाजीनगर, अहमदनगर, शेवगाव, अमरावती, नाशिकमध्ये धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न मागील महिन्यात झाला पण लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने तो प्रयत्न फसला. आता पुन्हा धर्मांध शक्ती अहमदनगर व कोल्हापूर जिल्ह्यात औरंगजेबाचा मुद्दा पुढे करुन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस खात्याचा वचक असेल तर गुन्हेगारांची अशी हिम्मत होणार नाही. राज्यात धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन दंगली भडकावून आपली राजकीय पोळी भाजपाचा कुटील डाव आहे. त्यामुळे फडणवीस जाणिवपूर्व अशा घटनांकडे दुर्लक्ष करत आहेत का?
राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे हे गृहविभागाचे काम आहे पण गृहमंत्री आणि पोलीस यंत्रणा काय करते आहे? हा राज्यातील जनतेला पडलेला प्रश्न आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने १९ मे रोजी या संदर्भात राज्याच्या पोलीस महासंचालकांची भेट घेऊन कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत आणि महिला सुरक्षेबाबत कठोर पावले उचलण्याची मागणी केली होती. पण दुर्देवाने या संदर्भात काहीच कारवाई होताना दिसत नाही. गुन्हेगारांना जरब बसेल अशी कारवाई होणे गरजेचे आहे पण सरकार केवळ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये व्यस्त आहे हे अत्यंत दुर्देवी आहे. फडणवीस यांच्याकडे गृह खात्याबरोबरच अर्थ, ऊर्जा, गृहनिर्माण, राजशिष्टाचार अशा सहा विभागांचा कारभार असून सहा जिल्ह्यांचे ते पालकमंत्री आहेत. त्यामुळे ते गृह विभागाला योग्य न्याय देऊ शकत नाहीत. फडणवीस यांच्याकडील गृहखाते तात्काळ काढून घ्यावा आणि राज्याला अनुभवी, सक्षम व पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा असे पटोले म्हणाले.

मुंबईत महिला मुली सुरक्षित नाहीत
मुंबईतील चर्चगेट येथील हॉस्टेलमध्ये एका महाविद्यालयीन तरुणीची हत्या केल्याचे उघड झाले आहे, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे दिसत आहे. मंत्रालय आणि मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असणा-या मलबार हिल पासून हाकेच्या अंतरावर असणा-या वसतीगृहात दिवसाढवळ्या एका विद्यार्थीनीवर अत्याचार करून तीची हत्या केली जाते ही महाराष्ट्राला लाज आणणारी बाब आहे. मात्र सत्तेवर बसलेल्या लोकांना याचे काहीच वाटत नाही, ही अत्यंत दुर्देवाची गोष्ट आहे. मुंबई सारख्या शहरातच मुली सुरक्षित नाहीत. राज्यातून हजारो महिला आणि मुली बेपत्ता होत आहेत आणि सरकार मात्र झोपलेले आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

आदित्य बिर्ला ग्रुपचा रिटेल ब्रँडेड ज्वेलरी क्षेत्रात प्रवेश ५००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह भारतभर रिटेल स्टोअर्स

मुंबई- आदित्य बिर्ला समूह सुमारे ५००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ब्रँडेड ज्वेलरी रिटेल व्यवसायात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. हा व्यवसाय “नोवेल ज्वेल्स लिमिटेड” या नवीन कंपनीमार्फत चालवला जाणार असून ही कंपनी संपूर्ण भारतामध्ये इन-हाऊस ज्वेलरी ब्रँडसह मोठ्या स्वरूपातील वैशिष्ट्यपूर्ण ज्वेलरी रिटेल स्टोअर्स उभारेल. नवीन कंपनी अद्वितीय डिझाईन्स आणि मजबूत प्रादेशिक संस्कृती जपत एक महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय ब्रँड तयार करून ग्राहकांच्या अनुभवामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करेल. पेंट्स आणि बिल्डिंग मटेरियलसाठी बीटूबी ई-कॉमर्स नंतर गेल्या दोन वर्षांतली समूहाची नवीन व्यवसायात प्रवेश करण्याची ही तिसरी मोठी वेळ आहे.

आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष श्री. कुमार मंगलम बिर्ला म्हणाले, “आदित्य बिर्ला ग्रुपचा ब्रँडेड ज्वेलरी रिटेलमध्ये प्रवेश हा विश्वासावर आधारित व्यवसाय उभारण्याच्या आमच्या समृद्ध परंपरेतील एक महत्त्वाचा क्षण आहे. या क्षेत्रातला प्रवेश ही एक धोरणात्मक पोर्टफोलिओ निवड असून त्यामुळे आम्हाला नवीन वाढीची क्षेत्रे शोधण्याची आणि गतिमान भारतीय ग्राहक विश्वात आमचे स्थान वाढविण्याची अनुमती मिळते. वाढत्या खर्च करता येणाऱ्या उत्पन्नासह, विवेकी आणि महत्त्वाकांक्षी ग्राहक डिझाइन-प्रणीत, खास बनवून घेतलेल्या आणि उच्च-गुणवत्तेच्या दागिन्यांना अधिक पसंती देत आहे. ही कंपनी आदित्य बिर्ला समूहाच्या जीवनशैली विषयक रिटेल आणि ग्राहकांच्या प्राधान्यांची अचूक समज यामधील सखोल कौशल्याचा लाभ घेईल.”

नवीन कंपनी सखोल रिटेल आणि श्रेणी कौशल्य अनुभव असलेल्या नव्याने नियुक्त केलेल्या आघाडीच्या टीम द्वारे कार्यरत राहील.

भारताच्या रत्न आणि दागिन्यांच्या बाजारपेठेचा जीडीपी मध्ये अंदाजे ७% वाटा आहे. दागिन्यांची बाजारपेठ २०२५ पर्यंत ९० अब्ज अमेरिकी डॉलर पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. या वेगवान वाढीमध्ये, असंघटित क्षेत्राकडून संघटित क्षेत्राकडे एक स्थिर संक्रमण दिसून येत आहे. भारतीय ग्राहकांना बारकाईने तयार केलेल्या आणि नाजूक, सुबक डिझाइन केलेल्या दागिन्यांची वैविध्यपूर्ण श्रेणी सादर करत समूहाचा या क्षेत्रात वेळेवर झालेला प्रवेश या प्रभावी क्षेत्राला आणखी सुशोभित करण्यासाठी सज्ज आहे.

वारकरी भवनसाठी अतिरिक्त १५ कोटी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ठाणे :- वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचे भूषण आहे. वारकऱ्यांसाठी दिव्यातील बेतवडे येथे उभारण्यात येणाऱ्या आगरी कोळी वारकरी भवनसाठी आता 15 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. भवनच्या कामासाठी अतिरिक्त 15 कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दिवा शहरातील बेतवडे येथे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या आगरी कोळी वारकरी भवनाचा भूमिपूजन समारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, वारकरी संप्रदायाचे जितेंद्र महाराज, चेतन महाराज घागरे, बाळकृष्ण महाजन पाटील, प्रकाश महाराज म्हात्रे, विनायक महाराज, जयेश महाराज भाग्यवंत यांच्यासह वारकरी संप्रदायातील मंडळी, बेतवडे गावाचे नागरिक उपस्थित होते. वारकरी भवनसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले. महानगरपालिकेमार्फत हे भवन उभारण्यात येणार असून यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, वारकरी संप्रदाय कीर्तनाच्या माध्यमातून गावागावात समाज प्रबोधनाचे काम करत आहे. नागरिकांच्या प्रेमामुळे गेल्या वर्षी मला आषाढी वारीची पूजा करण्याचे भाग्य मिळाले. वारकऱ्यांची पंढरी असलेल्या पंढरपूर देवस्थानच्या सुशोभीकरण व इतर कामांसाठी व वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष विकास आराखडा बनविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून त्यासाठी 83 कोटींचा निधी वर्गही केला आहे. पंढरपूर वारी मार्गावर आरोग्य तपासणी व इतर आरोग्यविषयक सुविधा पुरविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. यावर्षीची आषाढी वारी ही मंगलमय, आनंददायी व सुखकारक होईल.

संत सावळाराम महाराज स्मारकासाठी जागा आणि निधी देण्यात येईल. तसेच आगरी कोळी वारकरी भवनला सावळाराम महाराजांचे नाव देण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करू असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

पुरातन देवस्थानांचे जतन, संवर्धन व विकास करण्याचे काम राज्य सरकार करत आहे. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय राज्य शासनामार्फत घेत आहोत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परदेशी गुंवतणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आले आहे, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, ठाणे, दिवा, कल्याण परिसरात आगरी, कोळी व वारकरी मोठ्या प्रमाणात राहतात. त्यांच्यासाठी हे भवन उभारण्यात येत असून आगरी कोळी वारकरी भवन हे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाईल. येत्या वर्षभरात हे भव्यदिव्य वारकरी भवन उभे राहिल. या वास्तूत आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन घडेल. कल्याण येथे संत सावळाराम स्मारकासाठी जागा अंतिम झाली असून लवकरच त्याचे भूमीपूजन होईल.

यावेळी बेतवडे ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

अनधिकृत इमारतींचा शिक्का पुसणार

  • दिवा परिसरातील ६१० कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न
  • दिवामध्ये स्वंतत्र पोलीस ठाणे इमारतीसाठी ५ कोटी देणार

ठाणे – दिवा शहरातील अनधिकृत इमारतींचा शिक्का पुसण्यात येईल. तसेच सुनियोजित शहर म्हणून दिवा शहर विकसित करण्यासाठी ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही समूह विकास योजना (क्लस्टर) राबविण्यात येईल, अशी घोषणा करून यासाठीची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापालिका आयुक्तांना दिले. तसेच दिवामध्ये स्वतंत्र पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी 5 कोटींचा निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी केली.

ठाणे महानगर पालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या दिवा शहरातील सुमारे 610 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज दिवा येथे पार पडला. यावेळी यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेतवडे ते दिवा आगासन रस्त्यावर दुतर्फा नागरिकांनी मुख्यमंत्री महोदयांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. जागोजागी मुख्यमंत्री महोदयांना पुष्पहार अर्पण करून व नागरिकांनी पुष्पवर्षाव करून मुख्यमंत्री महोदयांचे दिवा शहरात स्वागत केले.

यावेळी दिवा शहरातील धर्मवीर नगर येथे नवीन मुख्य जलवाहिनी लोकार्पण, दिवा आगासन रस्ता येथील आरोग्य केंद्र, दातिवली गावातील व्यायाम शाळा, खुला रंगमंच, साबे गावातील शाळा, देसाई खाडी पुल आदी कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज झाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, दिवा शहराच्या विकासाचा शब्द दिला होता. मोठ्या प्रमाणात निधी देऊन तो शब्द पाळत आहे. यापुढील काळातही दिवा शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल. आतापर्यंत या शहरात पाणीपुरवठ्यासाठी 240 कोटी, दिव्यातील रस्त्यांसाठी 132 कोटी, दिवा-आगासन रस्त्यासाठी 63 कोटी, आगरी कोळी वारकरी भवनसाठी 15 कोटी, देसाई खाडीपूलसाठी 67 कोटी, आगासन येथे 100 खाटांच्या रुग्णालयासाठी 58 कोटी, खिडकारी, दातिवली, देसाई तलावच्या सुशोभिकरणासाठी 22 कोटी व खिडकाळेश्वर मंदिराच्या विकासासाठी 13.5 असे एकूण 610 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यापुढील काळातही आणखी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल.

दिवा शहरातील नागरिकांच्या प्रेमाने मी भारावलो आहे. त्यांच्या प्रेमापुढे आतापर्यंत दिलेला निधीही कमी पडेल. दिवा रेल्वे स्थानकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मा. प्रधानमंत्री व रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. बेतवडे येथे प्रधानमंत्री आवास योजनेतील 2800 घरांचा प्रकल्प उभा राहत आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो आवास योजनेतून 10 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. नागरिकांच्या सुविधांसाठी निधी देण्यात हात आखडता घेणार नाही, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, दिवा शहराच्या विकासासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आतापर्यंत हजार कोटींपेक्षा जास्त निधी देण्यात आला आहे. दिवा स्थानकामध्ये कोकणात जाणाऱ्या रेल्वेला थांबा मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या रेल्वे थांबविण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवावी लागणार असून त्यासाठी जेवढा निधी लागेल तेवढा देण्यात येईल. तसेच दिव्यात 150 बेडचे सुसज्ज रुग्णालयासाठीची जागा राज्य सरकारकडून मिळाली असून त्याच्या भूसंपादनासाठी 68 कोटी निधी मंजूर झाला आहे. दिवा शहरात स्वतंत्र पोलिस ठाणे असावे तसेच ठाण्याप्रमाणे येथेही क्लस्टर योजना राबवावी, अशी मागणीही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी केली.

महापालिका आयुक्त डॉ. बांगर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियानातून नागरिकांना अभिमान वाटेल असे बदल ठाणे शहरात होत आहे. मुख्यमंत्र्यांनी जो दृष्टिकोन मांडला होता त्यानुसार कामे सुरू आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, सुशोभिकरण आदी कामे वेगाने सुरू आहेत. दिवा शहरातही मोठ्या प्रमाणात कामे होत आहेत. मुख्यमंत्री महोदयांमुळे दिवा वासियांची रुग्णालयाती मागणी पूर्ण होत आहे. ही कामे होत असताना ती दर्जेदार आणि वेळेत व्हावी, यासाठी मुख्यमंत्री महोदय आग्रही आहेत. त्याप्रमाणे महापालिका प्रशासन काम करत आहे. याकामांमुळे लवकरच दिवा शहराचे स्वरुप पालटलेले दिसेल.

यावेळी माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी दिवा वासियांतर्फे मुख्यमंत्री महोदयांचा नागरिक सत्कार करण्यात आला.

खिडकाळेश्वर मंदिर सुशोभिकरण कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

दिवा येथील खिडकाळेश्वर महादेव मंदिराच्या परिसराचे सुशोभिकरणाचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले. येथील भूमिपुत्रांचे आराध्य दैवत असलेल्या या मंदिराचे सुशोभिकरणाचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, खिडकाळेश्वर मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून राज्यकारभार करत आहोत. राज्यातील प्राचीन देवस्थानांचे जतन, संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे गडकोट, किल्ले यांचेही संवर्धन करण्यात येणार आहे. खिडकाळेश्वर मंदिराच्या सुशोभिकरणासाठी जेवढा निधी लागेल ती देण्यात येईल. विकास कामांसाठी निधी सर्व अडथळे दूर करून सहकार्य करण्यात येईल.

यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी खिडकाळेश्वर महादेवाचे दर्शन घेतले.

पीएमपीने विद्यार्थांना सुरक्षित सेवा पुरवावी-आ.सिद्धार्थ शिरोळे

पुणे – शहरातील शाळा आणि महाविद्यालये लवकरच सुरू होतील. पीएमपीसाठी विद्यार्थ्यांची गर्दी वाढेल. हे लक्षात घेऊन, सुरक्षित बससेवेचे नियोजन करावे, अशा सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पीएमपी प्रशासनाला आज (बुधवारी) दिल्या.

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासन अधिकाऱ्यांची बैठक आमदार शिरोळे यांनी घेतली. सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात सुरक्षित सेवा देण्यास पीएमपी सज्ज असते. शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरिताही नियोजन व्हावे, यासाठी आमदार शिरोळे यांनी आढावा घेतला. गर्दीच्या वेळा आणि स्थळ याची पाहाणी करून तिथे चेकर्स नेमावेत आणि बस फेऱ्या वाढवाव्यात, आदी सूचना आमदार शिरोळे यांनी बैठकीत केल्या.

बैठकीला योगेश बाचल, चंद्रशेखर उर्फ नाना गव्हाणे, गणेश नाईकरे, संतोष कदम तसेच पीएमपीचे अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेतील मानधन तत्त्वावरील सर्व कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याबाबत शासन निर्णय जारी..पाहा.. शासन निर्णय

माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या प्रयत्नांना यश
“अनेक वर्षे च कार्य करणाऱ्या कर्मचार्‍यांना न्याय देता आला हे समाधान मोठे. मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार” – डॉ. मेधा कुलकर्णी.

पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाकडील पदनिर्मितीबाबत व मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या सेवकांना महानगरपालिका सेवेत सामावून घेणेबाबतच्या विषयात मेधा कुलकर्णी यांनी . देवेंद्र फडणवीस यांची
भेट घेतली होती. त्यांनीही या विषयाला
सकारात्मक प्रतिसाद आणि तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानुसार शासनाच्या वतीने निर्णय घेण्यात आला असून या शासन निर्णयाची प्रत मेधा कुलकर्णी यांनी आज आयुक्त विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त बिनवडे यांना सुपूर्त केली.
पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाकडील कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याबाबत गेली अनेक वर्ष उलट सुलट पत्रव्यवहार चालू होते. . समाज विकास विभाग, सामान्य प्रशासन विभाग, नगरविकास विभाग सर्व विभाग सकारात्मक असताना व नगर विकास विभागाच्या सर्व प्रश्र्नांना समर्पक उत्तरे मिळालेली असतानाही हा विषय मार्गी लागत नव्हता. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले होते.
नवी मुंबई मनपा (समाजविकास विभाग), संभाजीनगर मनपा(समुहसंघटिका पद), परभणी मनपा स्थापत्य विभाग पिंपरी-चिंचवड मनपा (RCH), नांदेड मनपा (उपभियंता स्थापत्य),कल्याण डोंबिवली मनपा (वाहनचालक), मीरा भाईदर मनपा विधी विभाग लातूर मनपा (ANM) इ.ठिकाणी ठोक मानधनावर असलेल्या सेवकांना मनपा सेवेत कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात आले होते. पुणे मनपा मध्येदेखील आरोग्य विभागाकडील (RCH) च्या 75 अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले होते. हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिले व समाज विकास विभागाकडील या सर्व कर्मचाऱ्यांनाही याच धर्तीवर न्याय मिळावा अशी विनंती निवेदनात केली होती. त्यावर त्यांनी त्वरित कार्यवाही करावी असा आदेश UD 2 विभागाला दिला होता.
या संदर्भात सकारात्मक शासन निर्णय झाला असून त्याची प्रत आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांना दिल्यावर त्यांनी पुढील कार्यवाही त्वरित करण्याचे आश्‍वासन दिले. सर्व समूह संघटक, समुपदेशक यांच्या वतीने मेधा कुलकर्णी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. सुभाष नागवडे, सुनीता मोरे आणि अन्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

(शासन निर्णय प्रत सोबत पाहा)

शिवराज्याभिषेक होताच आपच्या स्वराज्य यात्रेचा समारोप…

पुणे:

26मे रोजी पंढरपूर येथून निघून, गेले 10 दिवसभर उन्हात हजारो लोकांशी संवाद साधत, 800 किलोमीटर पेक्षा अधिक प्रवास करीत, 8 जिल्हयातून,12 लोकसभा , 30 विधानसभा, 9 महानगरपालिका, 12 नगर पालिका , परीषद क्षेत्रातून जात, ही आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा रायगडावर समाप्त झाली. आप राष्ट्रीय पक्ष झाल्यावरची ही पहिली लक्षवेधी संवादयात्रा ठरली आहे.

तत्पूर्वी दिनांक 5 जून रोजी महाड गावातून पदयात्रा काढण्यात आली. महाड येथील चवदार तळ्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.

या यात्रा दरम्यान एक लाख पेक्षा अधीक कार्यकर्ते , समर्थक जोडले गेले तर विविध माध्यमातून पाच लाख लोकांपर्यंत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या आप ची भूमिका पोहचवण्यात यश आले. या यात्रेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवाउत्साह आला आहे. यात्रे दरम्यान कार्यकर्त्यांमध्ये देशभक्ती आणि संघटनशक्ती याचा उत्तम संगम पहायला मिळाला.
सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांनी या यात्रेची दखल घेतल्याचे दिसते आहे. अनेक राजकीय नेत्यांनी पुढील काळात आप मध्ये प्रवेश करण्याचा मनोदय पक्ष नेतृत्वाकडे व्यक्त केला आहे.

सद्यस्थितीतील मतपेटीतून सत्तेसाठी सर्व तत्वहीन तडजोडी करणारे खोके आमदार जन्माला येणे हे लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. खोकेवाल्या सरकारमुळे महाराष्ट्र कलंकित झाला आहे.
सर्वसामान्यांना व्यवस्थेला प्रश्न विचारायला शिकविण्यासाठी ही आम आदमी पक्षाची स्वराज्य यात्रा होती . या यात्रेमुळे या सर्वसामान्यांना ताकद मिळून त्यांची सत्ता येणार असल्याचे प्रतिपादन आम आदमी पार्टी करत आहे.

जनतेची वेदना, प्रश्न समजून घेणे, संवादाचे पूल बांधणे, पक्षाची ध्ययधोरणे पोहचवणे,कार्यकर्त्यांच्या नेतृत्व गुणांना संधी देणे हा या यात्रेचा उद्देश होता आणि त्या अनुषंगाने सर्व नियोजन करण्यात आले होते ,तो उद्देश सफल झाला आहे.

शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहन मालकांनी वाहनांची तपासणी करुन घेण्याचे आवाहन

पुणे : माहे जूनमध्ये शाळा सुरु होत असून सर्व शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहन मालकांनी त्यांच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्राची तपासणी करुन घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी केले आहे.

स्कूल बस नियमावलीमधील विद्यार्थी व वाहनाचे सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. स्पीड गव्हर्नर, वैध योग्यता प्रमाणपत्र, वैध विमा प्रमाणपत्र, वाहनामध्ये परिचारक असणे, अग्निशमन यंत्रणा असणे इत्यादी बाबींचा त्यामध्ये समावेश आहे. स्कूल बस नियमावलीची पूर्तता करीत असल्याची व शालेय विद्यार्थी वाहतुकीचा परवाना असल्याची खातरजमा करुनच वाहन मालकांनी विद्यार्थ्यांची वाहतूक करणे आवश्यक आहे.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कार्यालयाच्या वायुवेग पथकाद्वारे अवैधरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल वाहन तसेच स्कूलबस परवान्यामधील अटींचा वा स्कूलबस नियमावलीमधील तरतूदीचा भंग करून चालवणाऱ्या स्कूल व्हॅन व स्कूल बस यांवर कारवाईसाठी चार पथकास आदेशित करण्यात आलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने स्कूल बस नियमावलीमधील वाहनात सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक असणाऱ्या बाबीचा भंग करुन पूर्तता न करणारी वाहने, स्पीड गव्हर्नर नसलेली वाहने, आसनक्षमतेचा भंग करून चालणारी वाहने, बंध योग्यता प्रमाणपत्र नसलेली वाहने, वैध विमा प्रमाणपत्र नसलेली वाहने, परिचारक नसलेली वाहने, अग्निशमन यंत्रणा नसलेली वाहने याबाबींची तपासणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे.

सर्व संबंधित वाहन मालकांनी त्यांच्या वाहनाचे परवाना नुतनीकरण करून, योग्यता प्रमाणपत्र तपासून घ्यावे आणि स्कूल बस नियमावलीमधील तरतुदीच्या अनुषंगाने सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात यावी, असेही कळविण्यात आले आहे.
०००

जेजुरी देवस्थान विश्वस्तांच्या धमार्दाय आयुक्तांनी केलेल्या नेमणुका घटनेनुसार

नवनियुक्त विश्वस्त मंडळ ; राजकीय पक्षाशी निगडीत विश्वस्त निवड असल्याचे आरोप चुकीचे

पुणे : श्री मार्तंड देवस्थान जेजुरी च्या विश्वस्त निवडीवरून सध्या वाद सुरु असून या पार्श्वभूमीवर, धमार्दाय आयुक्त पुणे विभाग यांच्या वतीने करण्यात आलेल्या सात विश्वस्तांची निवड घटनेनुसार करण्यात आली आहे. तसेच नवनियुक्त विश्वस्त राजकीय पक्षाशी निगडीत असल्याचा आरोप चुकीचा असून या निवडीमध्ये सर्वसमावेशक व उच्चविद्याविभूषित लोकांना पसंती देण्यात आली आहे. ज्यामध्ये डॉक्टर, वकील, व्यावसायिक, बँक अधिकारी अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे, अशी माहिती श्री मार्तंड देवस्थान जेजुरी च्या नवनियुक्त सात विश्वस्तांनी पत्रकार परिषदेत दिली.

विश्वस्तांपैकी अध्यक्ष पोपटराव खोमणे, मंगेश घोणे व डॉ. राजेंद्र खेडेकर हे मूळ जेजुरी गावचे रहिवासी आहेत. अ‍ॅड. विश्वास पानसे व अभिजीत देवकाते हे जेजुरी पंचक्रोशीतील निवासी आहेत. अ‍ॅड. पांडुरंग थोरवे हे पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व अनिल सौंदडे हे उद्योगपती व उत्तम व्यवस्थापन करणारे व्यक्तिमत्त्व आहे. कोणत्याही विश्वस्ताला न्यायालयाने आज पर्यंत दोषी ठरवून शिक्षा सुनावलेली नाही. तसेच, सदर नियुक्तीच्या वेळी कोणत्याही शिफारस पत्राचा वापर करण्यात आलेला नाही. किंबहुना माननीय सह धर्मादाय आयुक्त यांनी कोणाचाही दबावाला बळी पडून किंवा शिफारस पत्राच्या आधारे सदर नियुक्त्या केल्या नाहीत, हे निकालातून स्पष्ट आहे. आंदोलनातील काही व्यक्ती खोटी माहिती पसरवत आहेत.

त्याचप्रमाणे श्री मार्तंड देवस्थान जेजुरी या ठिकाणी विश्वस्त हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच हिंदू धर्मातील, त्याचप्रमाणे पुरुष किंवा स्त्री असावा एवढेच स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी स्थानिकत्वाचा कोणताही मुद्दा नाही. सन २०१२ च्या घटना दुरुस्ती मध्ये पुणे किंवा सासवड बार असोसिएशन चा एखादा पदाधिकारी विश्वस्त म्हणून असावा, असे स्पष्ट नमूद आहे.

त्यामुळे यानुसार धर्मादाय आयुक्त यांनी सर्व विश्वस्त नेमलेले आहेत. देवस्थान साठी तब्बल ४७९ जणांनी अर्ज केले होते, त्यातील ९५ अर्ज बाद झाले आणि जवळपास ३०० पेक्षा जास्त जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. विश्वस्तांना त्यांच्या मुलाखतीमध्ये विविध क्षेत्रातील प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये सामाजिक विषयांसोबतच मंदिर व्यवस्थापन, दैनंदिन दिनचर्या, पूजा-अर्चा, श्री खंडोबा दैवत याविषयी माहिती, आपत्कालीन व्यवस्थापन आणि अनेक प्रश्न विचारले. त्याला सगळ्या विश्वस्तांनी सक्षमपणे उत्तरे दिली. विश्वस्त राजकीय पक्षाशी निगडित असावा किंवा नसावा, या संदर्भात घटनेमध्ये अशी कोणतीही तरतूद अथवा माहिती उपलब्ध नाही.

आंदोलनामुळे जेजुरीविषयी समाजात चुकीचा संदेश

श्रीक्षेत्र खंडोबा मार्तंड देवस्थान हे अवघ्या महाराष्ट्रात नव्हे तर जगभरातील भाविकांचे दैवत असल्यामुळे या ठिकाणी भाविकांसाठी चांगल्या सुविधा तयार करून उत्तम व्यवस्थापन निर्माण होण्यासाठी या नवीन विश्वस्तांच्या नियुक्त्या पूर्णपणे मेरिटवर व कोणत्याही दबावाला बळी न पडता झालेल्या आहेत. या नियुक्तीमुळे सेवेकरी, खांदेकरी, पुजारी, गुरव इत्यादी कोणाच्याही दैनंदिन कामकाजात बाधा येत नाही. मंदिराचे व्यवस्थापन, भाविकांच्या पायाभूत सोयी सुविधा यासंदर्भात नवे विश्वस्त मंडळ कटीबद्ध आहे.

सध्या सुरु असलेल्या आंदोलनामुळे श्री मार्तंड देवस्थान जेजुरी या क्षेत्राबद्दल विनाकारण चुकीचा संदेश समाजात पसरत आहे. इतकेच नव्हे तर भक्तनिवास च्या प्रवेशदाराशीच आंदोलन सुरू असल्यामुळे भक्तनिवास येथे येणा-या भाविकांच्या किंवा कर्मचारी वर्गामध्येही दहशतीचे घबराटीचे वातावरण आहे. मंदिरावर अनेक चांगल्या भाविकांसाठी सोयी सुविधा करण्याचा मानस नवीन विश्वस्तांचा आहे, ज्यामध्ये सुसज्ज हॉस्पिटल, नवीन अध्यायावत भक्त निवास, वृक्षारोपण, दर्शन सभा मंडप, प्रशस्त अन्नछत्र आधी अनेक गोष्टींचा समावेश आहे. मल्हार गडाच्या सर्वांगिण विकासासाठी नवीन विश्वस्त मंडळ कटिबद्ध आहे.

७कोटी स्क्वेअर फूट जागा कागदोपत्री पालिकेच्या ताब्यात; पण वाहतूक कोंडी कायम,आबा बागुल म्हणाले…

‘ डीपी’ नुसार शहरात रस्त्यांचे रुंदीकरण तातडीने करा:आबा बागुल

पुणे : क्षेत्रफळाने दिवसेंदिवस पुणे शहराचा विस्तार होत असताना विकास आराखड्यानुसार रस्त्यांचे रुंदीकरण करण्याकडेच पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने शहराची वाहतूक जीवघेणी ठरत आहे.त्यात पालिकेकडे ७कोटी स्क्वेअर फूट जागा कागदोपत्री ताब्यात असूनही प्रत्यक्ष किती ठिकाणी रस्ता रुंदीकरण झाले याची ठोस आकडेवारीही नाही.त्यामुळे १९८७ते २०१७पर्यंत मान्य विकास आराखड्यानुसार पालिका प्रशासनाने मोबदला अदा केलेल्या जागा ताब्यात घेवून रस्त्यांचे रुंदीकरण तातडीने करावे ,अशी मागणी महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

याबाबत माजी उपमहापौर आबा बागुल यांनी म्हटले आहे की,सद्यस्थितीत शहराचा वाहतुकीचा गंभीर बनलेला प्रश्न सोडविण्याकडे महापालिकेसह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.परिणामी जीवघेण्या वाहतुकीत पुणेकरांचा श्वास गुदमरत आहे आणि अपघातांचा आलेखही उंचावत आहे.
भविष्याचा विचार करता आतापासून आपल्याला वाहतूक नियोजनासाठी ठोस पाऊले उचलावी लागणार आहेत. त्यासाठी शहराच्या वाहतुकीबाबत नियोजनाचा मास्टर प्लॅन तयार असणे अनिवार्य आहे. मात्र सद्यस्थितीत बिकट बनलेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना प्रभावीरीत्या राबविल्यास वाहतूक कोंडीतून पुणेकरांना दिलासा मिळणे सहजशक्य आहे.मात्र त्यासाठी १९८७ पासून २०१७पर्यंत विकास आराखड्यात दर्शविलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण तातडीने करणे अपरिहार्य आहे. पण त्याकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. ‘ पी पी पी ‘ तत्वावर काही मूठभर लोकांसाठी रस्त्यांची आखणी करणाऱ्या पालिका प्रशासनाला एफ. एस.आय.,टीडीआर,आर्थिक मोबदला अदा करून कागदोपत्री ताब्यात घेतलेल्या ७कोटी स्क्वेअर फूट जागांचा सोईस्कर ‘विसर ‘पडला आहे.
विशेष म्हणजे माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीत प्रशासनाने झोन निहाय दिलेल्या माहितीत ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.त्यामुळे एफ. एस.आय, टीडीआर,आर्थिक मोबदला दिलेल्या बहुतांश जागा या आजही मूळ मालकांच्या ताब्यात आहेत.अनेक ठिकाणी अतिक्रमणे कायम आहेत .केवळ सातबारावर पालिकेचे नाव लागले आहे मात्र ताबा पालिकेकडे आजतागायत नसल्याची वस्तुस्थिती आहे.त्यामुळे रस्ता
रुंदीतील या जागा ताब्यात घेऊन तातडीने रस्ते विकसित करणे आवश्यक आहे.असेही माजी उपमहापौर आबा बागुल यांनी नमूद केले आहे.

सुरळीत वाहतुकीसाठी प्रभावी उपाययोजना

सध्या शहरात होत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अरुंद रस्त्यांसह शहरातील सर्वच रस्त्यांवर चार चाकी वाहनांना पार्किंगला अटकाव घालणे, वाहतूक नियंत्रक दिव्यांचे सुसूत्रीकरण करणे, अतिक्रमण विरहित फुटपाथ, रस्ता रुंदीतील जागा ताब्यात घेऊन रस्ते विकसित करणे, प्रत्येक चौकात दोनशे मीटर अंतरावर गतिरोधक उभारणे, रस्त्यात बंद पडलेल्या वाहनांना घेऊन जाण्यासाठी क्रेनची व्यवस्था सक्षम करणे, चोवीस तास वाहतूक नियंत्रक दिवे सुरु ठेवण्यासाठी वीज बॅटरी बॅकअप यंत्रणा प्रभावी करणे, जिथे आवश्यक,त्या ठिकाणी एकेरी मार्गाची आखणी करणे, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर वाहनतळांची निर्मिती करणे आदी विविध उपाययोजना माजी उपमहापौर आबा बागुल यांनी प्रशासनाला सुचविल्या असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.
क्षेत्रीय कार्यालय स्तरावर स्वतंत्र ट्रॅफिक प्लॅनर नेमावेत आणि प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयस्तरावर पोलिसांच्या मदतीने सुरळीत वाहतुकीची जबाबदारी त्या त्या ट्रॅफिक प्लॅनरवर सोपवावी असेही आबा बागुल यांनी म्हटले आहे

बांधकाम कामगांरासाठी गोयल गंगा तर्फे मोफत वैद्यकीय शिबीर संपन्न



पुणे: पुण्यातील गंगा अल्टस आणि गंगाधाम टॅावर्सच्या बांधकाम साईट वरील कामगांरासाठी गोयल गंगा ग्रुपच्यावतीने एक दिवसीय वैद्यकीय शिबीराचे आयोजन केले होते. तारा मोबाईल क्रेचेस आणि FPAI यांच्या सहकार्याने हा उपक्रम घेण्यात आला होता

या शिबीराचा उद्देश गोयल गंगा ग्रुपसाठी काम करणाऱ्या बांधकाम साइटवरील कामगारांवर उपचार करण्यासाठी होता. कॉर्पोरेशनचे हे मत आहे की कुठल्याही व्यवसायाला कर्मचारी हेच महत्त्वपूर्ण आणि शक्तिशाली करीत असतात, म्हणून कंपनीनेच त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेलाही प्राधान्य दिले पाहिजे.हे कर्मचारी बऱ्याच उंचीवर काम करीत असल्यामुळे कामगारांचे आरोग्य आणि रक्तदाब यावर नजर ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. गोयल गंगा ग्रुप दर सहा महिन्यांनी, म्हणजे वर्षातून दोनदा हा उपक्रम आयोजित करतात.

या शिबिरात सल्ला व उपचार देण्यासाठी बालाजी हॉस्पिटल, खराडी येथील प्रमुख तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करण्यात आले होते.

शिबिरात एकूण 137 कामगारांनी सहभाग घेतला होता. या तपासणीमध्ये त्यांचे रक्तदाब, नाडी, ऑक्सिजन संपृक्तता आणि BSL यांचे परीक्षण करण्यात आले. शिबीरात सहभागी झालेल्या प्रत्येक कामगाराची मोफत शारीरिक तपासणी व सामान्य तपासणी, तसेच उपचार व फिजिओथेरपी देखील करण्यात आली.

“अतिशय मनापासून काम करणाऱ्या या कामगारांसाठी शिबीराचे आयोजन करणे हा एक अद्भुत अनुभव होता.मला असे वाटते की त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचीही काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे”, गोयल गंगा ग्रुपचे सेफ्टी मॅनेजर श्री सचिन पी. गायकवाड यांनी सांगितले.

गोयल गंगा ग्रुप विषयी: पुणे, नागपूर आणि मुंबईमध्ये कार्यरत असलेल्या गोयल गंगा ग्रुपला उच्च-गुणवत्तेच्या निवासी आणि व्यावसायिक निर्माण तसेच पायाभूत सुविधा प्रकल्प बांधण्याचा उत्तम अनुभव आहे. ग्रुपचे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ.अतुल गोयल यांचा दृष्टीकोन हा ग्राहकांना विलक्षण अनुभव देण्याचा आहे,आणि त्यांनी याद्वारे उद्योगात नवीन प्रतिमान स्थापित केले आहेत. हा ग्रुप चार दशकांचा उत्तुंग अनुभव असलेला रिअल इस्टेट उद्योगातील अग्रगण्य समूह आहे. त्यांना इकॉनॉमिक टाईम्सच्या द बिझनेस लीडरशिप अवॉर्ड्स २०२१ मध्ये “वर्षातील सर्वोत्कृष्ट रिअल इस्टेट कंपनी” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नुकतेच गोयल गंगा ग्रुपने नागपुरातील सीताबल्डी मेट्रो स्टेशनवर मध्य भारतातील पहिले जागतिक व्यापार केंद्र बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे,आणि महाराष्ट्राला बांधकाम क्षेत्रात एका उत्तुंग उंचीवर नेले आहे.

लाल महालातील शिवराज्याभिषेक सोहळ्यात शरद पवारांचा उत्साहपूर्ण सहभाग

पुणे:अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने आज लाल महालात ३४९ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. खासदार शरद पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराज वैदिक विद्यालयात धार्मिक विधीचे प्रशिक्षण घेतलेले शिवसेवक कैलास वडघुले तसेच बाल शिवसेवक स्वरा धुमाळ यांनी राज्याभिषेक विधी पार पाडले. शस्र पूजन, शेतकऱ्यांच्या शेतात पिकवलेली फळे, धान्य यांच पूजन, छत्रपती शिवराय त्यांच्या नित्य वापरात कवड्याची माळ वापरत कवड्याच्या माळेचे पूजन, राजमुद्रेचे पूजन करण्यात आले. शिवराज्याभिषेक दिनी स्वराज्याचे पाहिले युवराज म्हणून शंभुराजाना घोषित विधिवत करण्यात आले होते. शंभूराजांना अभिवादन करण्यात आले. खास ३४९ व्या राज्याभिषेकासाठी बनविलेल्या सुवर्ण नाण्यांचे पूजन करून त्याच नाण्यांनी अभिषेक करण्यात आला.

‘शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे’ अस म्हणत छत्रपती ही पदवी सर्वप्रथम संत तुकाराम महाराजांनी शिवरायांना दिली त्याचं औचित्य साधून संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे पूजन करण्यात आले.

या प्रसंगी समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आले यामध्ये.आमदार संग्राम थोपटे, चित्रपट दिग्दर्शक दिग्दर्शक दिगपाल लांजेकर, सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार, महाराष्ट्र कॉस्मोपोलीटियन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार मॅडम, लेखक, व्याखाते संपादक ज्ञानेश महाराव, पुणे मनपाचे सिटी इंजिनिअर प्रशांत वाघमारे, माजी उपमहापौर दिपकभाऊ मानकर, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, आमदार रवींद्र धंगेकर याचे सन्मान करण्यात आले.

शिवराज्याभिषेक ३५० वे वर्ष सुरू होत आहे, या वर्षभरात समितीच्या वतीने ३५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे त्याची सुरुवात आज दोन गरजू विद्यार्थिनींना शरद पवार यांच्या हस्ते शिष्यवृत्ती देण्यात आली.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, “आजचा दिवस हा महाराष्ट्रच नाही तर देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस आहे. सर्वसामान्यांचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले अशा शिवछत्रपतींचे स्मरण आपण करत आहोत. त्यांनी स्वराज्य उभे केल्यावर राज्यकारभार स्वीकारला तो दिवस हा आजचा दिवस आहे. कारभार स्वीकारला पण राज्य कोणासाठी करायचे? तर राज्य हे सर्वसामान्यांसाठी करायचे, ही राज्यातील जनतेची शक्ती, आणि सत्ता ही जनतेसाठी वापरायची हे सूत्र शिवछत्रपतींनी आपल्यापुढे ठेवले. त्याचे स्मरण करण्याचा आजचा हा दिवस आहे.

पवार पुढे.म्हणाले,या देशात अनेक राजे होऊन गेले. त्यांचा इतिहासही आहे. पण साडेतीनशे वर्षे झाल्यानंतर सुद्धा देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेल्यावर देशातील राजांपैकी शिवछत्रपती हे एकच नाव निघते. त्याचे कारण त्यांनी कधीच राज्य त्यांच्यासाठी चालवले नाही. देशात अनेकांची नावे घेता येतील ज्यांनी राज्य त्यांच्या घराण्याच्या नावाने चालवले. यात एकच शिवछत्रतींचा अपवाद होता. त्यांनी कधीही भोसले यांचे राज्य केले नाही, तर हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य तयार केले. राज्य हे रयतेसाठी चालवायचे, हा आदर्श त्यांनी संपूर्ण देशासमोर ठेवला.

सत्ता ही कशी वापरावी, कोणासाठी वापरावी याचाही आदर्श शिवछत्रपतींनी घालून दिला. शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका किंवा सोन्याच्या नांगराचा फाळ देण्याचा विचार असो.. शेवटच्या माणसाला सन्मानाने जगण्यासाठी, त्याला पुढे नेण्यासाठी जे काही लागेल ते देण्यासाठी सत्ता, असे त्यांचे सूत्र होते. म्हणून त्यांनी कष्टाने, घामाने, त्यागाने, शौर्याने राज्य प्रस्थापित केले. ते राज्य ग्रहण करण्याचा ऐतिहासिक सोहळा झाला.काही घटकांनी त्याला वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला. पण या देशातील सामान्य माणसाने पहिल्यांदा आपला राजा हा सत्तेवर बसलेला पाहिला. त्याचा सन्मान, त्याचे स्वागत ही भूमिका अंत:करणापासून स्वीकारली. जनतेच्या अंत:करणात स्थान प्राप्त करून घेणारे असे आदर्श राजे आणि त्यांच्या सत्ताग्रहणाचा आनंद सोहळा विशेषत: लाल महालात होतोय यालाही एक इतिहास आहे असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

विराज तावरे यांनी सूत्रसंचालन केले, दिपकभाऊ मानकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे संयोजन प्रशांत धुमाळ, रोहित ढमाले, मंदार बहिरट, निलेश इंगवले, जयंत गायकवाड, अक्षय रणपिसे, पूजा झोळे, मोनिका सांडभोर, मेघा कदम, स्मिता बहिरट यांनी केले