पुणे – शहरातील शाळा आणि महाविद्यालये लवकरच सुरू होतील. पीएमपीसाठी विद्यार्थ्यांची गर्दी वाढेल. हे लक्षात घेऊन, सुरक्षित बससेवेचे नियोजन करावे, अशा सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पीएमपी प्रशासनाला आज (बुधवारी) दिल्या.
छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासन अधिकाऱ्यांची बैठक आमदार शिरोळे यांनी घेतली. सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात सुरक्षित सेवा देण्यास पीएमपी सज्ज असते. शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरिताही नियोजन व्हावे, यासाठी आमदार शिरोळे यांनी आढावा घेतला. गर्दीच्या वेळा आणि स्थळ याची पाहाणी करून तिथे चेकर्स नेमावेत आणि बस फेऱ्या वाढवाव्यात, आदी सूचना आमदार शिरोळे यांनी बैठकीत केल्या.
बैठकीला योगेश बाचल, चंद्रशेखर उर्फ नाना गव्हाणे, गणेश नाईकरे, संतोष कदम तसेच पीएमपीचे अधिकारी उपस्थित होते.