पुणे-बिशप थॉमस डाबरे यांनी गेली १४ वर्षे बिशप म्हणून केलेले समाजकार्य आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यावर केलेली पीएचडी यानिमित्त त्यांना ‘मराठी रत्न – कोहिनूर’ पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे. शुक्रवार दि. ९ जून २०२३ रोजी सायं ०५.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक मार्ग, पुणे येथे हा कार्यक्रम संपन्न होईल. मराठी भाषा संवर्धन समिती आणि कोहिनूर ग्रुप तर्फे दिला जाणार हा पुरस्कार अकरा हजार रुपये, सन्मान चिन्ह, पुणेरी पगडी, शाल व श्रीफळ असा आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी भूषवणार आहेत. वेदभवनचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी आणि पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. विशानेमा ज्ञाती समाजाचे बिपीन ज. मोदी हे निमंत्रित असतील. या कार्यक्रमात युवा गायिका तन्मयी मेहेंदळे प्रार्थना सादर करणार असून नीलिमा बोरवणकर सूत्रसंचालन करतील.
बिशप थॉमस डाबरे हे मूळ वसईचे असून वयाच्या १६व्या वर्षापासून त्यांनी लॅटिन भाषेचे शिक्षण मुंबईत पूर्ण केले. ३ वर्षानंतर त्यांनी फादर म्हणून धर्मकार्य सुरु केले व त्यानंतर पुण्यात दीर्घकाळ अध्यापन केले. सन २००९ पासून गेली १४ वर्षे पुण्यात बिशप म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांचे कार्यक्षेत्र पुण्याप्रमाणेच सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर पासून कर्नाटकातील होटगी पर्यंत होते. या प्रदीर्घ काळात अनेक समाजपयोगी कार्यात ते सहभागी झाले. कोरोना काळात पुण्यापासून होटगी पर्यंतच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात चर्चच्या माध्यमातून त्यांनी 1 कोटीहून अधिक गरजू नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था केली. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यावर त्यांनी पीएचडी पूर्ण केली असून नाशिक येथील मराठी साहित्य संमेलनात त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यावर मराठीतून अभ्यासपूर्ण व्याख्यानही दिले होते. नुकतेच बिशप पदावरून ते निवृत्त झाले असून निवृत्तीनंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यावर अधिक वाचन, अभ्यास व संशोधन करून ग्रंथ लिहण्याचा त्यांच्या मानस आहे असे मराठी भाषा संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रवीण प्र. वाळिंबे यांनी सांगितले.