Home Blog Page 1502

पवारांना धमकी देणाऱ्याला दीपक मानकरांनी दिले खुले चॅलेंज म्हणाले,असेल तुझ्या XX मध्ये दम तर ये पुढे..

निलेश राणे याद राखा तुमची दादागिरी इकडे चालणार नाही

पुणे- शरद पवार यांच्या विषयी निलेश राणे यांनी केलेले वक्तव्य त्यांची केलेली औरंगजेबाशी तुलना आणि त्यातच सोशल मीडियातून एकाने शरद पवारांना ‘ तुमचा दाभोलकर करू ‘ अशी दिलेली धमकी यामुळे पवार यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांत संतापाची लाट उसळली असून आज पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पवार साहेबांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला त्यांनी खुले चालेंज दिले आहे. माकडा जर तुझ्या XXX मध्ये दम असेल तर ये पुढे …असे ते म्हणालेत,कोणीही उठतो आणि पवारांना धमकी काय देतो त्यांच्याविषयी काहीही काय बोलतो हे आता अजिबात खपवून घेतले जाणार नाही.ज्याने धमकी खरेच दिलीय त्याने पुढे यावे.सुप्रियाताई यांना आम्ही एवढाच शब्द देतो,अशी माकडे आम्ही खूप बघितलीत आपण काळजी करू नये.नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी त्यांची थेट औरंगजेबाशी तुलना करणे म्हणजे अति झाले,त्या राणेंची दादागिरी इथे चालणार नाही,कोणी कोणाला घाबरत नाही, पवार साहेबांच्या बद्दल जर काही वक्तव्ये केली तर त्याची प्रतिक्रिया जोरदार उमटेल हे समजून त्यांनी यापुढे विधाने केली पाहिजेत अन्यथा आता आम्ही खपवून घेणार नाही असे ते म्हणाले. मुगलांच्या राज्यात काय घडलेय हे सर्वांना ठाऊक आहे.पवार साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानुसार महाराष्ट्रासाठी वाटचाल करत आहेत.एवढा मोठा चांगला नेता मिळालाय हे महाराष्ट्राचे भाग्य आहे.गोपीचंद पडळकर याची काय क्षमता आहे? किती काम आहे /त्यांची पवारांशी तुलना होऊ शकते काय ? हिंदुत्व कोणी कोणाला शिकवू नये अमृत देखील नासविण्याचे काम धर्म मार्तंडानी केले,ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आता कौतुकाने नेली जाते,पण याच माउलींचा छळ कोणी केला ? अगदी रेड्याच्या मुखातून त्यांना वेद वदवावे लागले तेव्हा त्यांना मान्यता मिळाली.तेव्हा धर्माच्या नावाखाली कोणी अधर्मीपणा केला तर तो आम्ही खपवून घेणार नाही.

तुमचा दाभोळकर करू:शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मागण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात तक्रार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘तुमचा देखील दाभोळकर करू’ अशी धमकी देण्यात आली आहे.

या संदर्भात मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार करण्यासाठी गेलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना माहिती दिली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जेलभरो आंदोलन आहे. याच दरम्यान ही धमकी आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. सुप्रिया सुळे यांनी पोलिस आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

एका सोशल मीडिया हँडवरुन अशा प्रकारची धमकी येते आणि त्यावर खाली विचित्र आणि दुर्दैवी कमेंट्स येतात, हे राज्यात काय सुरू आहे, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. मला सकाळी व्हॉटसअपवरुन या बाबत ची माहिती मिळाली असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

राजकारणात मतभेद जरूर असतात मात्र, इतका द्वेश ज्या पद्धतीने पसरवला जातोय ते अतिशय दुर्दैवी आहे. या धमकीची तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मला न्याय मागण्यासाठी मी पोलिस आयुक्तांकडे आले आहे, मला न्याय द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. जर काही झाले तर त्याला सर्वस्वी देशाचे आणि राज्याचे गृहमंत्री जबाबदार असतील, असा इशारा देखील त्यांनी दिला.
राज्यात दडपशाही आणि गुंडाराज वाढला असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी सोलापूर मध्ये घडलेल्या घडनेचा उल्लेख केला. लोकशाही असली तरी कोणीही कसेही वागेल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री अचानक 3 दिवस गोपनीय दौऱ्यावर

जनसंपर्कप्रमुख म्हणतात, साहेब कुठे गेले माहीत नाही

मुंबई:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवार रात्रीपासून नाॅट रिचेबल आहेत. तीन दिवस ते मुंबईबाहेर असून नेमके कुठे गेले याची माहिती मात्र गोपनीय ठेवण्यात आली आहे. दिल्लीहून परतल्यानंतर ते नाराज असल्याचे सांगितले जाते. सरकारची वर्षपूर्ती काही दिवसांवर असताना तसेच राज्यात दंगलीचे लोण पसरलेले असताना मुख्यमंत्री अचानक कुठे गेले, असा प्रश्न विचारला जात आहे.

मुख्यमंत्री कार्यालयास विचारणा केली असता, ‘साहेब कुठे आहेत माहिती नाही’’ असे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक व जनसंपर्क प्रमुख यांना विचारले असता ‘साहेब तीन दिवस मुंबईबाहेर आहेत, मात्र कुठे आहेत याची माहिती नाही, असे सांगितले गेले. उन्हाळ्यात अनेक राजकीय नेते परदेशात जातात. मात्र मुख्यमंत्र्यांचा दौरा गुप्त का, असा प्रश्न विचारला जातो आहे.

दर बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत असते. या आठवड्यात मात्र ती झाली नाही. बुधवारी दिवसभर मुंबईतच विविध कार्यक्रमांनी शिंदेंनी हजेरी लावली. बालाजी मंदिराची भूमिपूजन केले. नवी मुंबई विमानतळ कामाची पाहणी केली. ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी रात्री संभाजीनगरच्या काही नगरसेवकांचे पक्षप्रवेशही झाले. त्यानंतर मात्र शिंदे कुठे गेलेत याची माहिती गुप्त ठेवली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे गावी जाणार होते. मात्र भाजपकडून त्यांना काश्मीरला जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे तीन दिवस कुटुंबासह शिंदे मुंबईत असणार नाहीत, अशी माहिती आहे.

आश्चर्य म्हणजे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांचे दिवसभराचे कार्यक्रम माध्यम प्रतिनिधींना आदल्या रात्रीच दिले जातात. बुधवारपासून मात्र दोघांचेही कार्यक्रम कार्यालयांनी दिलेले नाहीत. याविषयी सीएम, डीसीएम कार्यालयाकडे चौकशी केला असता ‘कार्यक्रम नाहीत’ इतकेच सांगण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपुरात स्वगृही आहेत.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागच्या आठवड्यात दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. मंत्रिमंडळ विस्ताराची शिंदेंची मागणी शाह यांनी मान्य केली नसल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. ३० जून रोजी शिंदे सरकारची वर्षपूर्ती आहे. वर्षपूर्तीला अवघे २० दिवस बाकी असतानाही सरकारी पातळीवर अद्याप काही तयारी दिसत नाही.


” अनदेखी ” ठरली आयएमडीबीच्या यादीत अव्वल !

अभिनेत्री अपेक्षा पोरवाल हिच्या ” अनदेखी ” मधील तिच्या अभिनयाने सगळ्यांची मन जिंकली. तिच्या अभिनयाचं कौतुक देखील झालं ! सोबतीने तिच्या  ‘द स्लेव्ह मार्केट’ या तिच्या अरबी वेब सीरिज साठी तिला प्रेक्षकांनी  भरभरून प्रेम दिलं आहे म्हणून यंदा च वर्ष नक्कीच उत्साहवर्धक ठरलं आहे.
अलीकडेच IMDB ने आताच्या टॉप 50 सर्वात लोकप्रिय भारतीय मालिका ची यादी लाँच केली आणि यात  ” अनदेखी ” 20 व्या क्रमांकावर आहे. अपेक्षा साठी हि बातमी नक्कीच आनंददायक आहे ती म्हणते  “ ही बातमी ऐकून मला आनंद झाला आहे ” अनदेखी ” हा माझा डेब्यू प्रोजेक्ट होता आणि तो अगदी तीन वर्षांपूर्वी रिलीज झाला असला तरी, तो आतापर्यंतच्या सर्वात लोकप्रिय भारतीय मालिकांच्या यादीत आहे याचा आनंद आहे. अनदेखी ला इतके प्रेम दिल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार” 
https://www.instagram.com/p/CtHOJZyN1Pv/?igshid=ZWQyN2ExYTkwZQ==
एक कलाकार म्हणून, अपेक्षाने स्वत: च वेगळं स्थान निर्माण केलं आहे. लोकप्रिय अरबी मालिकेत भूमिका करणारी ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली. अवघ्या तीन वर्षांत तिने ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अनेक उत्तोत्तम प्रोजेक्ट्स ती करणार असून अबु धाबीमधील “द स्लेव्ह मार्केट 2” च्या आगामी सीझन मध्ये ती दिसणार आहे. तिच्या या प्रोजेक्ट साठी सगळेच वाट बघत आहेत.

राज्यातील विद्यापीठांनी सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी गुणात्मक सुधारणा करावी-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 8 : भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकन यादीत महाराष्ट्राचा क्रमांक वरचा असला पाहिजे. सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी सर्व विद्यापीठांनी आवश्यक गुणात्मक सुधारणा करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत विविध कार्यालय कामकाज आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, उपसचिव प्रताप लुबाळ, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव सतीश तिडके, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, ‘रुसा’चे संचालक निपुण विनायक, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष आयुक्त महेंद्र वारभुवन, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा.उज्ज्वला चक्रदेव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकनाचा सन 2023 चा अहवाल जाहीर झाला आहे. शिक्षण आणि संसाधने, शोध आणि व्यावसायिक कार्यप्रणाली, पदवी परिणाम, संपर्क आणि समावेशिता, कल्पना, नवीन संशोधन या मापदंडांवर संस्थांचे मानांकन ठरत असते. यात महाराष्ट्रातील विद्यापीठ आणि संस्थांचा क्रमांक यादीत वरचा असावा. त्यासाठी विद्यापीठांनी गुणात्मक सुधारणा करावी. अशा सूचना मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.
शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांची सुरक्षा, महाराष्ट्रातील विद्यापीठ महाविद्यालयांची स्थिती आणि सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना, महाराष्ट्र राज्य अध्यापन प्रशिक्षण संस्था, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा), एसएनडीटी विद्यापीठ, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा, प्रवेश नियामक प्राधिकरण, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, उच्च शिक्षण संचालनालय व तंत्रशिक्षण कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, नियामक परिषद इत्यादी विषयांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.
0000

श्री महालक्ष्मी मंदिरात यज्ञोपवीत उपनयन संस्कार 

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागेच्यावतीने आयोजन ; घनश्यामाचार्याजी महाराज यांची उपस्थिती
पुणे : कुर्यात बटो मंगलम्… चे स्वर आणि मंत्रोच्चारांच्या उद््घोषाच्या साक्षीने सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात यज्ञोपवीत उपनगर संस्कार पार पडले. तब्बल २० हून अधिक मुले व युवकांवर मंत्रपठण, याग, पूजन अशा पारंपरिक विधींनी उपनयन संस्कार करण्यात आले. अनंत श्री विभुषित जगद््गुरु रामानुजाचार्य झालरीया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी श्री घनश्यामाचार्याजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न झाला. 
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने यज्ञोपवीत उपनगर संस्कार या आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, हेमंत अर्नाळकर, अ‍ॅड.प्रताप परदेशी यांसह पदाधिकारी व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले. 
घनश्यामाचार्याजी महाराज म्हणाले, परमेश्वर आणि ज्ञान यांच्या जवळ जाण्याकरिता हा संस्कार आवश्यक आहे. गायत्री मंत्रापासून हा संस्कार सुरु होतो. गायत्री मंत्रामध्ये तीन चरण आणि २४ अक्षरे असतात. उपनयन संस्कार झालेल्यांनी ६४ कला आणि ३२ विद्या शिकण्याचा प्रयत्न करायला हवा, अशी धारणा आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये या संस्काराच्या वयोमर्यादेच्या कालावधीमध्ये देखील बदल झाले आहेत. मात्र, लहान वयातचा मुलांवर हा संस्कार होणे अत्यंत आवश्यक आहे.

पुणे महापालिका सुरु करतेय लकी ड्रॉ.. भाग घेण्यासाठी भर वेळेत मिळकतकर

मिळकतकर वेळेत भरा अन्‌ थेट ‘कार’ जिंका ! पुणे पालिकेची बक्षीस योजना.. ई-बाइक, मोबाइल जिंकण्याची संधी

पुणे -मिळकतकराचे उत्पन्न वाढविण्यासह प्रामाणिक करदात्यांना भेट म्हणून महापालिका या वर्षीपासून लकी ड्रॉ काढणार आहे. त्यात दि.15 मे ते 31 जुलै या कालावधीत कर भरणाऱ्यांना तब्बल 5 कार, 15 ई-बाइक आणि मोबाइल यांसह 10 लॅपटॉप बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत.

या लकी ड्रॉमध्ये निवासी, बिगर निवासी तसेच रिकाम्या जागा असलेल्या मिळकतधारकांना समाविष्ट केले जाणार आहे. ऑगस्टमध्ये हा लकी ड्रॉ काढला जाणार आहे.

महापालिकेकडे नोंदणी असलेल्या सुमारे साडेबारा लाख मिळकतींपैकी सुमारे आठ लाख मिळकतकतधारकच नियमित कर भरतात. महापालिकेच्या मिळकतकराचे उत्पन्न मागील वर्षी सुमारे 2 हजार कोटींवर गेले आहे. त्याचवेळी थकबाकीही दहा हजार कोटींच्या घरात आहे. त्यामुळे मिळकतकर उत्पन्न वाढविण्यासाठी पालिका विविध उपाययोजना करत आहे. दरम्यान, नियमित कर भरणाऱ्यांसाठी आयुक्तांनी 2022-23 च्या अंदाजपत्रकात बक्षीस योजना जाहीर केली होती. या योजनेचे स्वरूप अखेर जाहीर करण्यात आले. याद्वारे जवळपास 40 मिळकतधारकांना कोटीभर रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. मात्र, 31 जुलैपूर्वी कर भरलेले नागरिकच योजनेसाठी पात्र असतील.

कर रक्‍कम (रुपयांत) आणि बक्षीस
1 लाखांपुढे : 1 कार, 3 ई-बाइक, 3 मोबाइल, 2 लॅपटॉप
50 हजार ते 1 लाख – 1 कार, 3 ई-बाइक, 3 मोबाइल, 2 लॅपटॉप
25 हजार ते 50 हजार- 1 कार, 3 ई-बाइक, 3 मोबाइल, 2 लॅपटॉप
25 हजार किंवा त्यापेक्षा कमी – 2 कार, 6 ई-बाइक, 6 मोबाइल,
4 लॅपटॉप

प्रोत्साहन योजना
मिळकतकर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा सर्वाधिक मोठा स्रोत आहे. आधी जकात आणि एलबीटी बंद केल्यानंतर महापालिकेस या उत्पन्नाची प्रतिपूर्ती म्हणून शासनाकडून एक निश्‍चित उत्पन्न दिले जाते. पण, त्यासाठी शासनाच्या निर्णयावर अवलंबून राहावे लागते. परिणामी, महापालिकेने मिळकतकर वसुली वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अशा प्रोत्साहन योजना राबविण्यात येत आहेत.

पुण्यातील पाणी कपातीमुळे नागरिकांत नाराजी,काही भागात दिवसाआड तर काही भागात आठवड्यातून एकदा पाणी बंद

२४ तास पाणीपुरवठा योजनेचे तीन तेरा ….

आठवड्यातून एक दिवस बंद ची घोषणा मात्र पुरवठ्यावर २ दिवस परिणाम

पुणे – महापालिकेकडून शहरात 18 मे पासून आठवडयातून एक दिवस पाणी बंद ठेवण्यात येत आहे. मात्र, या पाणीबंद नंतर शहरातील काही भागात पुढे दोन ते तीन दिवस पाणी अतिशय कमी दाबाने तसेच कमी येत असल्याने महापालिकेकडून दोन आठवडयांपूर्वी सिंहगड रस्ता आणि कात्रज भागातील पाण्याचे नियोजनात बदल केला होता.

त्यानंतर आता खराडी- चंदननगर भागाच्या पाण्याच्या नियोजनात बदल करण्यात आला असून येत्या शनिवार ( दि. 10 ) पासून प्रभाग क्रमांक 4 मध्ये काही भागात दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

एक दिवसआड पाणीपुरवठा होणारा भाग व वेळ
शुक्रवार, रविवार, मंगळवार
सकाळी 9.3 ते दुपारी 2 : चौधरी वस्ती, सातववस्ती, पंढरीनगर, गुलमोहर, शंकरनगर.
दुपारी 1.30 ते सायंकाळी 6. 30 : चंदननगर, श्रीकृष्ण सोसायटी, हनुमान व्यायाम शाळा, मथुरानगर, संघर्ष चौक, शिवाजी पुतळा, दत्तप्रसाद, चव्हाण नगर, त्रिमूर्ती सोसायटी, प्रीत नगर, समता सोसायटी, म्हाडा सोसायटी, नागपाल रोड.

शनिवार, सोमवार, बुधवार
सकाळी 9.30 ते दुपारी 2 : गणपती सोसायटी, तुकारामनगर, बोराटेवस्ती, झेन्सार, थिटे नगर, पाटील बुवानगर
दुपारी 1.30 ते सायंकाळी 6 : बोराटे वस्ती गल्ली नं. 1 ते 23, शंकरनगर, वृंदावन सोसायटी, राघवेंद्रनगर, यशवंतनगर, तुकराम नगर, सितारा बेकरी, साई पार्क, शेजवल पार्क, साईबाबा मंदिर

दर महिन्याला मुंबईतील महिला वसतिगृहांचे सिक्युरिटी ऑडिट करा

मुंबई-
मरीन ड्राईव्हजवळील सावित्रीबाई फुले वसतिगृहातील १८ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन हत्या केल्याप्रकरणी सखोल तपास करुन दोषींवर कडक कारवाई करावी त्याचबरोबर भविष्यात अशा घटनांना पायबंद घालण्याकरिता दर महिन्याला मुंबईतील महिला वसतिगृहांचे सिक्युरिटी ऑडिट करावे अशी मागणी मागणी आ. मनिषाताई चौधरी यांच्या नेतृत्वात भाजपा शिष्टमंडळाने केली. याबाबत आज उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांना निवेदन दिले.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ०६ जुन २०२३ रोजी मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई फुले महिला वसतीगृहात चौथ्या मजल्यावरील खोलीमध्ये राहणाऱ्या तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिच्यावर अत्याचार करुन हत्या केली गेली आहे. त्यामुळे वसतीगृहात राहणाऱ्या महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या प्रकरणातील संशयित सुरक्षा रक्षक आरोपीने आत्महत्या केली असल्याची बाब देखील उघडकीस आली आहे. तरी भविष्यात अश्या दुर्दैवी घटना घडू नयेत याकरिता सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आ. मनिषाताई चौधरी यांनी यावेळी केली.

मुंबई महामंत्री शशिबाला टाकसाळ, मुंबई महिला मोर्चा प्रभारी शलाका साळवी, माजी नगरसेविका रिटा मकवाना, राजेश्री शिरवडकर उपस्थित होत्या.

महाराष्ट्रातील काही ओबीसी जातींचा केंद्रीय यादीत होणार समावेश – राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर

नवी दिल्ली, 8 जून : महाराष्ट्रातील लोधी, लिंगायत, भोयर पवार, झांडसे यासह इतर मागासवर्गीय काही जाती केंद्रीय यादीत सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया राष्ट्रीय मागासवर्ग आयोग राबवत असल्याची माहिती राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी दिली.

महाराष्ट्र सदनात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी श्री. अहीर यांनी ही माहिती दिली. त्यांनी मागील सहा महिन्यांत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून केलेल्या कामांची माहिती दिली.  यामध्ये राज्यातील काही ओबीसीमध्ये असणाऱ्या जातींना केंद्रीय यादीत सूचीबद्ध करण्याबाबतची प्रक्रिया सूरू असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्रात इतर मागासवर्ग आयोगाचे काम चांगले सुरू असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यावेळी आयोगाचे सचिव राजीव रंजन उपस्थित होते.

सन 1993 मध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली असून सन  2018 मध्ये या आयोगाला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. आयोगाच्या सक्रियतेमुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना बळ मिळत आहे. शैक्षणिक सत्र वर्ष 2021-22 मध्ये वैद्यकीय क्षेत्रात घेतलेली झेप उल्लेखनीय असल्याचा उल्लेख करीत श्री. अहीर यांनी माहिती दिली,  देशभरात अनुक्रमे 1500 आणि 2500 विद्यार्थ्यांना एम.बी.बी.एस व  एम.डी. अभ्यासक्रमात  प्रवेश मिळाला आहे.

यासह केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि सैनिक शाळेत सन 2020-21 पासून 27 टक्के आरक्षण सुरू करण्यात आले. यामुळे केंद्रीय विद्यालयात सन 2020-ते 2023 पर्यंत 1,29,414 विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळविला आहे, तर नवोदय विद्यालयात शैक्षणिक सत्र 2021-23 मध्ये 59,243 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. देशभरातील एकूण 33 सैनिकी शाळेत वर्ष 2021-22 मध्ये जवळपास 32.91 टक्के ओबीसी विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळविला आहे. आता सैनिकी शाळेत मुलींनाही प्रवेश देण्यात येत असल्याचा उपक्रम केंद्र सरकारच्या पुढाकाराने सुरू करण्यात आल्यामुळे त्याचा लाभ ओबीसी विद्यार्थीनीनाही होत असल्याचे श्री. अहीर यांनी सांगितले.

विद्यापीठांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याचे श्री. अहीर यांनी नमूद करून सांगितले की, वर्ष 2014-15 च्या तुलनेत 2020-21 मध्ये 32.6 टक्क्यांनी विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. तसेच वर्ष 2014-15 च्या तुलनेत वर्ष 2020-21 मध्ये 40.4 टक्के विद्यार्थींनींची वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या राष्ट्रीय संस्थांमध्ये वर्ष 2014-15 च्या तुलनेत 2020-21 मध्ये जवळपास 71 टक्क्यांची उल्लेखनीय वाढ झाली असल्याचे श्री. अहीर यांनी नोंदविले.

राष्ट्रीय मागासवर्ग वित्त महामंडळद्वारे आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 1,94,810 लाभार्थ्यांना 678.05 कोटी रूपयांच्या वार्षिक कार्य योजनेला कार्य मंजुरी प्रदान करण्यात आली. राष्ट्रीय मागास वर्ग वित्त आणि विकास महामंडळ, प्रधानमंत्री दक्षता आणि कुशल संपन्न हितकारी योजनाच्या अंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांची अंमलबजावणी करीत आहे.

बँकांच्या माध्यमातून विविध योजनातंर्गत ओबीसींना पुरेपूर लाभ दिला जात असल्याचे श्री. अहीर यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय बँकांमध्ये ओबीसींचे खाते मोठ्या प्रमाणात उघडण्यात आले असून त्यांना विविध योजनांचा लाभ दिला जात असल्याची माहिती श्री. अहीर यांनी दिली. यासह पेट्रोल पंप आणि गॅस एजेन्सी वाटपातही 27 टक्के  आरक्षण दिले जात असल्यामुळे आता ओबीसी लोकांच्या जीवनस्तरात चांगला बदल होत असल्याचे चित्र दिसत असल्याचे श्री. अहीर यांनी सांगितले.

इंद्रायणी नदीमध्ये प्रदूषित सांडपाणी सोडणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची शिवसेनेची मागणी

पुणे – आळंदी परिसरातून वाहणारी इंद्रायणी नदी हा सर्वांच्या आस्थेचा, प्रथा, परंपरा, श्रद्धेचा विषय असून, नदीमध्ये प्रदूषित सांडपाणी येऊ नये, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायत हद्दीतील गावांमधील दैनंदिन वापराचे ६० ते ६५ एमएलडी पाणी कुठलीही प्रक्रिया न करता दूषित पाणी थेट इंद्रायणी नदीत सोडले जात आहे. तसेच या परिसरातील औद्योगिक वसाहती आणि काही लघु, माध्यम कारखाने नदीत थेट सांडपाणी सोडत असल्याचे निदर्शनास येत आहे. आषाढी वारी पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ऐन वारीच्या तोंडावर आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांच्या, भाविकांच्या जीवाशी खेळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित कंपन्या सहकारी सोसायट्या, स्थानिक स्वराज्य संस्थांचे बेजवाबदार अधिकारी, औद्योगिक वसाहतींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.  लवकरात लवकर यावर कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाणार असल्याचे निवेदन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळच्या पुणे विभाग प्रादेशिक अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी शहर प्रमुख संजय मोरे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, युवा सेनेचे युवराज पारीख, विभागप्रमुख राजेश मोरे, शिवाजीनगर विभाग संघटक अतुल दिघे, शाखाप्रमुख राजेश शेलार, राजा गांजेकर, अभिषेक जगताप  उपस्थित होते.

अनंत घरत म्हणाले की, इंद्रायणीतील केमिकलसह सांडपाणी मिश्रीत पाणी वारकऱ्यांना तीर्थ म्हणून प्यावं लागत आहे हे आमच्यासाठी धार्मिक भावना दुखावल्या इतकेच धक्कादायक आहे. आषाढी वारीच्यावेळी राज्यभरातील चार ते पाच दिवस लाखो भाविकांना याच पाण्यात आंघोळ करावी लागते. शिवाय काही ठराविक वेळेला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीला मुखवट्याला देखील इंद्रायणीच्या पाण्याने अभिषेक केला जातो. प्रदूषित पाण्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. भाविकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. प्रशासनाकडून देखील याकडे लक्ष दिलं जात नसल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अलंकापुरी जणू इंद्रायणीला काळ्या पाण्याची शिक्षा मिळाली आहे. त्यामुळे वेळेप्रसंगी अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या उक्तीप्रमाणे “नाठाळाच्या माथी हाणू काठी” चा वापर करावा लागेल असे घरत म्हणाले.

पुणे लोकसभा निवडणूकप्रमुखपदी मुरलीधर मोहोळ तर पुणे महापालिका निवडणूक प्रमुखपदी राजेश पांडे

पुणे- पुणे लोकसभा निवडणूक प्रमुख पदावर माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची तर पुणे महापालिका निवडणूक प्रमुख पदावर राजेश पांडे यांची भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्ती केल्याने आज भाजप सह एकूणच राजकीय वातावरण पुण्यातील आगामी निवडणुकीच्या चर्चेने ढवळून निघाले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 48 मतदार संघासाठी निवडणूक प्रभारी जाहीर केले आहेत. येत्या लोकसभेसाठी पुणे आणि पुणे जिल्ह्यावर भाजपनं विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघ आणि 288 विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या.सर्व लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रमुख यांना त्यांचा अनुभव आणि संघटन कौशल्याच्या बळावर 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला प्रचंड विजय मिळवून देण्याची जबाबदारी या द्वारे त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, जी 20 परिषदेनंतर राजेश पांडे यांच्यावर आता पुणे महापालिका निवडणुकीची मोठी जबाबदारी देण्यात आलीय. निवडणूक प्रमुखपदी निवड झाल्यानंतर पुणे महापालिकेत पुन्हा एकदा विजय खेचून आणण्याची जबाबदारी आपण पार पाडाल, असा विश्वास व्यक्त बावनकुळेंनी व्यक्त केला आहे.

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती मतदार संघ काबीज करण्यासाठी कंबर कसली असून, या मतदार संघात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीदेखील भेट देत निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला आहे. आगामी लोकसभेसाठी पवारांच्या बालेकिल्ल्यात सुरूंग लावण्यासाठी भाजपनं बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पुन्हा राहुल कुल यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे आता पवारांचा बालेकिल्ला भाजपकडे कसा जाईल यासाठी कुल आता कशी सूत्रं फिरवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बारामती लोकसभा मतदार संघात दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर, भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ येतो. या लोकसभा मतदार संघावर १९९१ पासून पवार कुटुंबियांचे वर्चस्व आहे. या मतदार संघावर भाजपचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी राहुल कुल यांच्याकडे आली आहे. आता शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्यांकडे दिली आहे.

पश्चिम महाराष्ट्र :लोकसभा निवडणूक प्रमुख

१) पुणे : श्री. मुरलीधर मोहोळ
२) बारामती : श्री. राहुल कुल
३) शिरुर : श्री. महेश लांडगे
४) मावळ : श्री. प्रशांत ठाकूर
५) कोल्हापूर : श्री. धनंजय महाडिक
६) हातकणंगले : श्री. सत्यजीत देशमुख
७) सांगली : श्री. दिपक शिंदे
८) सातारा : श्री. अतुल भोसले
९) सोलापूर : श्री. प्रशांत परिचारक

पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत असेल. पार्टीने आजवर दिलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पुणे लोकसभेच्या आगामी निवडणुकीतही भारतीय जनता पार्टी प्रचंड बहुमताने विजयी होईल, हा ठाम विश्वास आहे.आगामी काळात पुणे लोकसभेतील संघटन अधिकाधिक मजबूत करणार आहोत. शिवाय सर्वांना सोबत घेऊन देशाचे नेतृत्व सक्षमपणे पुन्हा करण्यासाठी पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

मुरलीधर मोहोळ,
निवडणूक प्रमुख, पुणे लोकसभा

प्रदेश भाजपने पुणे महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शिफारशीनुसार ही निवड झाली आहे. पक्ष नेतृत्वाने टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवीन. महापालिकेच्या माध्यमातून भाजपने शहरात मोठी विकासकामे केली आहेत. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत आम्ही मागील यशाची पुनरावृत्ती करू. त्यासाठी मी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करीन. बूथ रचनेचे सक्षमीकरण, नियोजनबद्ध निवडणूक व्यवस्थापन आणि विकासकामे व योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करू.

राजेश पांडे
प्रदेश उपाध्यक्ष, भाजप, महाराष्ट्र
पुणे महापालिका निवडणूक प्रमुख, भाजपा

विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक प्रमुखांची घोषणा करण्यात आली त्यामध्ये पुण्यातील नियुक्त्या पुढीलप्रमाणे –

हडपसर – योगेश टिळेकर
पर्वती – जितेंद्र पोळेकर
कसबा – हेमंत रासने
वडगावशेरी – जगदीश मुळीक
शिवाजीनगर – दत्ता खाडे
खडकवासला – सचिन मोरे
पुणे कँटोन्मेंट – अजिंक्य वाळेकर
कोथरूड – पूनित जोशी

पालखी सोहळ्यानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात बदल

पुणे दि. ८ : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (आयडीटीआर), नाशिक फाटा, भोसरी, आळंदी रास्ता कार्यालय व दिवे ब्रेक टेस्ट ट्रॅक येथील कामकाजात बदल करण्यात आल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी कळवले आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा १२ जुन रोजी दुपारचा मुक्काम प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आळंदी रस्ता येथील चाचणी मैदानावर असल्याने येथे नियमितपणे होणारे वाहन तपासणी व अनुज्ञप्ती चाचणी विषयक कामकाज आणि १२ जून रोजीची पूर्वनियोजित वेळ घेतलेल्या वाहनधारक आणि उमेदवारांची वाहन तपासणी किंवा चाचणी १७ जून रोजी होईल.

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची पालखी १२ जुन रोजी जुना पुणे-मुंबई रस्ता- नाशिक फाटा या मार्गे पुण्याकडे प्रयाण करणार आहे. या दिवशी ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि संशोधन संस्था येथे येण्या-जाण्याचा मार्ग बंद ठेवण्यात आल्याने अनुज्ञप्ती चाचणीसाठी अर्जदारांना आयडीआर येथे पोहोचण्यास गैरसोय निर्माण होऊ शकते. अनुज्ञप्ती चाचणीसाठी ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (आयटीडीआर) येथील १२ जुन रोजी पूर्वनियोजीत वेळ घेतलेल्या उमेदवारांनी अनुज्ञप्ती चाचणीसाठी १७ जुन रोजी उपस्थित रहावे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी १४ जुन रोजी पुणे येथून सासवडकडे प्रयाण करणार आहे. या दिवशी हडपसर-सासवड मार्ग वाहतूकीकरिता बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी १४ जुन रोजीची पूर्वनियोजित वेळ घेतलेल्या वाहनांची दिवे ता. पुरंदर येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर तपासणी होऊ शकणार नाही. अशा वाहनधारकांनी त्यांची वाहने १४ जुन पासून पुढील सात दिवासांमध्ये कोणत्याही दिवशी तपासणीसाठी दिवे येथे सादर करावीत.

वाहन तपासणी, अनुज्ञप्ती चाचणी व वाहनाची योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण विषयक कामकाजात झालेल्या बदलाची वाहनधारकांनी, उमेदवारांनी नोंद घेवून बदल केलेल्या तारखेला नियोजित ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहनही उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित

पुणे, दि. ८: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

पूर्व पुनरिक्षण उपक्रमांतर्गत १ जून २०२३ ते १६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण, प्रमाणिकरण करणे, दुबार, समान नोंदी, एका पेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा, विभाग/भाग यांची आवश्यकतेनुसार सुधारणा व मतदान केंद्रांच्या सीमांच्या पुर्नरचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीला मान्यता आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबद्ध योजना आखण्यात येईल. ३० सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारुप यादी तयार करण्यात येईल.

एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी १७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२३ आहे. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दोन शनिवार आणि रविवारी विशेष मोहिमेअंतर्गत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. तर २६ डिसेंबर २०२३ पर्यंत दावे व हरकती निकाली काढले जाणार आहेत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी २०२४ रोजी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली आहे.
0000

डीईएसच्या ११० एकर कॅम्पसवर रेनवॉटर हार्वेस्टिंग डीईएस आणि कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार

पाणी बचत विषयातील सर्वात शिक्षण संस्थेचा सर्वात मोठा प्रकल्प

पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) फर्ग्युसन रस्त्यावरील ११० एकर कॅम्पसवर पर्जन्यजल पुनर्भरण प्रकल्प (रेनवॉटर हार्वेस्टिंग) राबविण्यात येत असल्याची माहिती संस्थेच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी कळविली आहे.

डीईएस आणि कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्यात या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पासाठी श्री. शिवदुर्ग संवर्धन या स्वयंसेवी संस्थेचे सहाय घेण्यात येणार आहे. डीईएसच्या वतीने डॉ. कुंटे, उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, प्रकल्पाचे प्रबंधक सुनील भिडे, कार्यकारी अभियंता नीरज पूर्णपात्रे, कमिन्स इंडियाच्या उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) विभागाच्या प्रमुख सौजन्या वेगुरू, पंकज कुलकर्णी, शिवदुर्गचे पंडित अतिवाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुंटे म्हणाले, शहराच्या मध्यवर्ती भागात टेकडीसह ११० एकरचा फर्ग्युसन महाविद्यालयाचा परिसर असून, दुर्मीळ वनस्पतींचा समावेश असणारे बोटॅनिकल गार्डन आहे. दरवर्षी सरासरी ८०० मिमि पावसाचा अंदाज धरल्यास या परिसरात ३५ कोटी लीटरहून अधिक पाणी वाहून जाते. या प्रकल्पामुळे या पाण्याचा पुनर्वापर करता येणार आहे. परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. माती वाहून जाऊ नये यासाठी गवताची लागवड केली जाणार आहे. त्यानंतर बोटॅनिकल गार्डनसह सर्व परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाईल. त्यामध्ये आणखी काही दुर्मीळ वृक्षांचा समावेश असेल. शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या स्वरूपात हरित क्षेत्र विकसित झाल्याने शहराचे प्रदूषण आणि तापमान कमी होण्यास मदत होणार आहे. महाविद्यालयात शिकत असलेल्या अकरा हजारहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या माध्यमातून समाजात पर्यावरण, पाण्याची बचत याबाबतची जनजागृती करण्यात येणार आहे. पाणी बचत या विषयात कुठल्याही शैक्षणिक संस्थेने हाती घेतलेला हा मोठा प्रकल्प आहे.

वेगुरू म्हणाल्या, शिक्षण, पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र या क्षेत्रात कमिन्स इंडिया फाउंडेशन सीएसआरच्या माध्यमातून कार्यरत आहे. डीईएससारख्या ऐतिहासिक शिक्षण संस्थेबरोबर पाणी बचत क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणे हा भाग्याचा क्षण आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक आर्थिक मदत कमिन्स करणार आहे. तीन वर्षांसाठी हा करार आहे. तो पुढे वाढवला जाईल. उत्तम प्रकारचा नैसर्गिक अधिवास या ठिकाणी विकसित होईल असा विश्‍वास वाटतो. या हरित परिसराचा उपयोग संपूर्ण शहराच्या पर्यावरणासाठी होणार आहे.

-गेली दोन वर्षे या प्रकल्पावर प्राथमिक काम सुरू आहे. हरित क्षेत्र निर्माण करण्यासाठी पाण्याची गरज आहे. खुल्या विहिरी तयार करणे, परिसरातील १५ बोअरवेल मधील गाळ काढून त्या कार्यान्वित करणे, टेकडीवर चर खोदणे, खोल चर घेणे, गॅबियन स्टॅक्चर निर्माण करणे, शोषण खड्डे घेणे अशा शास्त्रीय उपाययोजना या प्रकल्पांतर्गत केल्या जाणार आहेत. त्यासाठी परिसर हरित करण्यासाठी आणि बोटॅनिकल गार्डनसाठी आवश्यक असणारी पाण्याची गरज भागणार आहे. त्याबरोबर प्रत्येक विभागाची गरज लक्षात घेऊन पाणी वापराचे ऑडिट, बॅलन्सशीट तयार केले जाईल, पाण्याचा गरजेनुसार वापर व्हावा यासाठी उपायोजना केल्या जातील.
सुनील भिडे, प्रबंधक

तिकोना, धर्मवीर, रोहिडेश्‍वर, राजगड, तुंग, रायरेश्‍वर या किल्ल्यांवरील निसर्गाचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी श्री. शिवदुर्ग संवर्धन संस्था कार्यरत आहे. या क्षेत्रातील संस्थेचा कामाचा अनुभव दांडगा आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सोबत घेऊन परिसर हिरवागार करण्यासाठी आम्ही शास्त्रीय पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणची पाण्याची गरज या प्रकल्पामुळे भागू शकेल असा विश्‍वास वाटतो.
पंडित अतिवाडकर