Home Blog Page 1501

असल्या धमक्या देऊन आवाज बंद केला जाईल,असं वाटत असेल तर हा त्यांचा गैरसमज- शरद पवार

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर यावर माध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना शरद पवार म्हणालेत कि , ‘राज्याची कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्यांनी यासंबंधी काळजी घ्यावी. कोणत्याही प्रश्नावर मत व्यक्त करण्याचा अधिकार या राज्यातील प्रत्येक नागरिकाला आहे आणि असं असताना धमक्या देऊन आवाज कोणाचा बंद करू शकेल असं कोणाला वाटत असेल तर त्यांचा हा गैरसमज आहे. पोलीस दलावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि या धमक्यांची चिंता मी करत नाही ,’ अशा शब्दांत शरद पवार यांनी याबाबत भाष्य केलं आहे. तसंच ज्यांच्या हातात राज्याची सूत्र आहेत त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही, असंही पवार म्हणाले.

पवार यांच्या विषयी होणार्या वक्तव्यांमुळे आणि आज सोशल मिडिया तून आलेल्या धमकी मुले राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत सरकारला लक्ष्य केलं. त्यानंतर सत्ताधारी गोटातूनही या टीकेला प्रत्युत्तर देत आमच्या सरकारमध्ये राज्यातील कायदा-सुव्यवस्था सक्षम असल्याचा दावा करण्यात आला. मात्र या धमकीबद्दल आता स्वत: शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त रामोड यांच्या घरी सीबीआयचे छापे

पुणे: पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने पकडले. रामोड यांचे कार्यालय, क्विन्स गार्डन येथील सरकारी निवासस्थान आणि बाणेर येथील ‘ऋतुपर्ण’ सोसायटी या खाजगी निवासस्थानी छापे टाकण्यात आले असून, या ठिकाणी तीन ते चार कोटी रुपयांची रक्कम आढळली असून, पैसे मोजण्याची मशिनच पोलीस अधिकाऱ्यांनी मागविली आहे.रामोड हे मुळचे नांदेड येथील असून, गेल्या दोन वर्षांपासून ते पुण्यात अरिरिक्त विभागीय आयुक्त या पदावर काम पहात आहेत. महामार्गावरील भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यांनी पैशाची मागणी केली होती. ती रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

दुपारी सीबीआयने रामोड यांचे कार्यालय, क्विन्स गार्डन येथील सरकारी निवासस्थान आणि बाणेर येथील ‘ऋतुपर्ण’ सोसायटी या खाजगी निवासस्थानीही छापा टाकला आहे. अधिकाऱ्यांनी याठिकाणी पैसे मोजण्याच्या दोन मशीन्स मागवून घेतल्या आहेत.रामोड यांच्याविषयी मागील काही दिवसांपासून तक्रारी कानावरती येत होत्या. या तक्रारींची शहानिशा करुन सीबीआयने रामोड यांच्याभोवती सापळा लावला होता. आज लाच स्वीकारताना अखेर सीबीआयने रामोड यांना अटक केली. रामोड हे मुळचे नांदेडचे असून मागील 2 वर्षांपासून ते पुण्यात अतिरिक्त विभागीय आयुक्त आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून सासवड -जेजुरी पालखी मार्गाची पाहणी

पुणे, दि. ९ : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सासवड जेजुरी येथील पालखी मार्गाची आणि कऱ्हा नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामाची आज पाहणी केली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावरील रस्त्याचे कामे जलदगतीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी आमदार संजय जगताप, , पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाचे संजय कदम, पुरंदरचे प्रभारी तहसिलदार मिलिंद घाडगे, दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार आदी उपस्थित होते.

श्री.चव्हाण यांनी यांनी दिवे घाटमाथ्यावरील पालखी विसावा, झेंडेवाडी ग्रामपचायतीने वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेला हिरकणी कक्ष, सासवड येथील कऱ्हा नदीवरील नवीन बांधण्यात आलेला पुल आणि जेजुरी येथील पालखी मुक्काम स्थळाची पाहणी केली. ते म्हणाले, पालखी सोहळ्यात वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाची महत्वाची जबाबदारी आहे. सार्वजनिक विभागाच्यावतीने पालखी मार्गावरील रस्त्याच्या कामासह वारकऱ्यांना विश्रांतीसाठी सुविधा उपलब्ध कराव्यात.

पालखी मार्गावरील रस्त्यांची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करावीत. रस्त्याच्या साईड पट्ट्या, रस्ता रुंदीकरण, रस्ता डांबरीकरण, आवश्यक ठिकाणी मुरूम भरणे, अतिक्रमण काढणे इत्यादी कामे राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाने आणि बांधकाम विभागाने वेळेत पूर्ण करावीत. पुलाच्या जोडरस्त्याच्या भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. रस्त्याच्या कामासाठीची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी दक्षता घेवून पालखी सोहळ्याचे उत्तम नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सासवड मधील बोरकर कुटुंबीयांनी पुलाच्या जोड रस्त्यासाठी जमीन देवून सहकार्य केल्याने मंत्री श्री. चव्हाण यांनी त्यांना धन्यवाद दिले.

यावेळी मुख्य अभियंता चव्हाण आणि कार्यकारी अभियंता पवार यांनी पालखी मार्गावरील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची माहिती दिली.

वसतिगृहासाठी खासगी इमारत भाड्याने देण्याचे आवाहन

पुणे दि. ९ : पुणे शहरात इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील १०० मुले व १०० मुलींच्या वसतिगृहासाठी दोन इमारती भाड्याने घेण्यात येणार असून त्यासाठी खासगी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या ठिकाणी मुलांसाठी व मुलींसाठी प्रत्येकी एक वसतिगृह सुरू केले जाणार आहे. इच्छुकांनी पाचशे रूपयाच्या बंधपत्रावर मालकाचे इमारत भाड्याने देण्याबाबत संमतीपत्र, इमारतीचा तपशील, खोल्या, स्वच्छतागृह, विजेची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था आदी बाबी नमूद कराव्यात.

इच्छुकांनी सहायक आयुक्त समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सर्व्हेक्षण क्रमांक १०४/१०५, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर समोर, येरवडा, पुणे-६ (दूरध्वनी ०२०-२९७०६६११) येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.

उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी प्रशिक्षणाची शिदोरी

अनुसूचित जमातीचे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी शासकीय अनुदानित, विना अनुदानित तसेच शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल निवासी शाळा व वसतिगृहात शिक्षण घेत असताना अभियांत्रिकी व वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा दिल्यावर योग्य मार्गदर्शनाअभावी यशस्वी होत नाहीत. त्यामुळे त्यांचा या परीक्षांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा कल वाढावा यासाठी इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये शिकत असतानाचा या विद्यार्थ्यांकरीता अभियांत्रिकी, वैद्यकीय व विधी पदवी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, स्पेशल क्लास रेल्वे अप्रेंटीस अभ्यासक्रम तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा तयारी प्रशिक्षण कार्यक्रम राबविल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा आय.आय.टी.मधील अभ्यासक्रमांना जास्तीस जास्त मुलांना प्रवेश घेणे सोयीस्कर व्हावे, यासाठी राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दहावी नंतर दोन वर्ष कालावधीमध्ये नामवंत खासगी प्रशिक्षण संस्थेच्या साह्याने अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शन करण्यासाठी योजना राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

या योजनेंतर्गत ४८० विद्यार्थ्यांना परीक्षा मार्गदर्शनासाठी नामवंत खासगी प्रशिक्षण संस्थेस  १ लाख रुपये प्रति विद्यार्थी प्रति वर्ष प्रमाणे यात व्याख्यातांचे मानधन, स्टडी मटेरियल, वाचन साहित्य, टेस्ट सेरीज, वर्तमानपत्र, मासिके, पुस्तके, स्टेशनरी इत्यादीसह प्रशिक्षणाच्या खर्चा पोटी शासन चार कोटी ८० लक्ष इतका निधी खर्च करणार आहे.

अशी असेल योजना

आदिवासी विकास विभाग अंतर्गत कार्यरत असलेल्या प्रत्येक अपर आयुक्त कार्यालय स्तरावर शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल निवासी शाळा येथील कोणत्याही एका शाळेमध्ये एक तुकडी वैद्यकीय व दुसरी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा तयारी करण्यासाठी बनविण्यात येईल. या तुकडीमध्ये इयत्ता ११ व १२ या वर्गात शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. प्रत्येक तुकडी मध्ये मुले व मुली असे एकूण ३० विद्यार्थी असतील.

विद्यार्थी निवड व प्रवेश परीक्षा

कोणत्याही शासनमान्य असलेल्या शाळा, महाविद्यालये, शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल निवासी शाळा येथील कोणत्याही एका शाळेमध्ये शिकत असलेल्या दहावी उतीर्ण अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकडून अर्ज मागविले जातील. त्यानंतर एकाच वेळी प्रवेश परीक्षा घेण्यात येईल. अंतिम गुणवत्ता यादीमध्ये प्रवेश परीक्षेमधील प्राप्त गुणास ५० टक्के भारांक तसेच उमेदवारास त्याच्या दहावीच्या बोर्ड परीक्षामध्ये प्राप्त गुणास ५० टक्के भारांक देण्यात येईल व गुणानुक्रमे अंतिम गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक या कार्यालयाच्या स्तरावरून प्रकाशित केली जाईल.

या योजनेसाठी प्रत्येक अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग कार्यालयाच्या स्तरावर दर वर्षी एक वैद्यकीय व एक अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा तयारी करवून घेण्यासाठी प्रत्येकी ३० प्रशिक्षणार्थी प्रती तुकडी असे एकूण ६० विद्यार्थ्यांची निवड ११ वीच्या वर्गासाठी केली जाईल. परंतु फक्त प्रथम वर्षासाठी प्रत्येकी ३० प्रशिक्षणार्थी प्रती तुकडी (वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रम) ११ वी व १२ वी या दोन्ही वर्गासाठी एकूण ४८० विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेकरिता प्रत्येक तुकडीमधील विद्यार्थ्यांच्या संख्येपैकी किमान ५० टक्के जागा शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमधून भरण्यात येतील.

योजनेची स्वरूप

या योजनेनुसार आदिवासी विकास विभागाअंतर्गत कार्यरत एकूण ४ अपर आयुक्त, आदिवासी विकास कार्यालय त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एक असे एकूण ४ महाविद्यालये, शाळा सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवडतील. यासाठी निवडलेल्या महाविद्यालयात, शाळेमध्ये सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रवेशित उमेदवारांना वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षांच्या सर्वांगीण तयारीसाठी म्हणजेच मेडीकल नीट, जेईई, सीईटीचा संपूर्ण अभ्यासक्रम तसेच व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये दर शनिवारी व रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी तसेच दररोज शालेय अभ्यासक्रम व्यतिरिक्त जादा सत्र घेण्यात येतील. प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे तज्ज्ञ अनुभवी व्याख्याते यांच्या मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणार्थीची सर्व साधारण पात्रता

सदर प्रशिक्षणाचा लाभ घेते वेळेस उमेदवार त्याच शैक्षणिक वर्षात दहावी उत्तीर्ण असावा. तसेच उपरोक्त परीक्षेची इतर अर्हता, वय व इतर पात्रता अटी पूर्ण केलेल्या असाव्यात. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असला पाहिजे. उमेदवाराची जमात ही महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीमधील असणे आवश्यक. प्रशिक्षणासाठी प्रवेश घेते वेळेस उमेदवाराकडे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. त्यानंतर सहा महिन्यांच्या आत सदर उमेदवाराने अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांची जबाबदारी राहील. अनुसूचित जमातीच्या प्रशिक्षणार्थी व त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखा पेक्षा कमी असावे.

प्रशिक्षणार्थीना सूचना

विद्यार्थ्याने खोटे कागदपत्रे सादर करून योजनेचा लाभ घेतला असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचेकडून संपूर्ण प्रशिक्षणाचा खर्च वसूल करून कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच सदर उमेदवारास भविष्यात आदिवासी विकास विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही.

प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी धुम्रपान करणे, अंमली पदार्थाचे सेवन करणे, मद्यपान करणे, गैर वर्तन, गैर प्रकार केल्यास सदर प्रशिक्षणार्थ्यांची निवड रद्द करण्यात येऊन कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. जर संस्थेने पुरविलेल्या निवासव्यवस्थेचा लाभ उमेदवार घेणार नसल्यास, विद्यार्थ्यांने निवास व्यवस्थेचा पत्ता व हमी पत्र या कार्यालयास तसेच प्रशिक्षण संस्थेस कळविणे देणे बंधनकारक आहे. सुरक्षेची जबाबदारी स्वतः उमेदवारांची असणार आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रशिक्षणास ७५ टक्के उपस्थिती आवश्यक आहे. परंतु विद्यार्थी गंभीर आजारी पडणे, अपघात होणे, इतर स्पर्धा परीक्षांना उपस्थित राहणे (नैसर्गिक आपत्ती / कौटुंबिक समस्या / वैद्यकीय कारण) या कारणामुळे प्रशिक्षणासाठी अनुपस्थित असल्यास अपवादात्मक परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यासाठी देण्यात येणारी फी अदा करण्याबाबतचा अंतिम निर्णय आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक यांना असेल.

ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांची निवड झाल्यानंतर तात्काळ नियुक्त केलेल्या महाविद्यालय , शाळामध्ये रुजू होणे बंधनकारक असेल व ७ दिवसाच्या आत हमीपत्र या कार्यालयास जमा करून जे उमेदवार दिलेल्या तारखेपासून १५दिवसाच्या आत रुजू होत नाहीत, अशा उमेदवारांची निवड रद्द करून प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड केली जाईल. उमेदवाराने इतर कागदपत्रे, अहवालाबाबत संशयास्पद, फसवणुकीचे वर्तन केल्यास उमेदवाराची निवड रद्द केली जाईल.

प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची निवड व पात्रता

आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक यांचेमार्फत जाहिरात देऊन प्रथमतः सदर योजनेसाठी पात्र असलेल्या काही नामवंत वैद्यकीय , अभियांत्रिकी महाविद्यालय प्रवेश परीक्षा प्रशिक्षण देण्याच्या संस्थेची निविदा प्रक्रियेद्वारे शासनस्तरावर निवड केली जाईल. प्रशिक्षण संस्थेची भारतातील कोणत्याही राज्यामध्ये नोंदणी असावी.  प्रत्येक विषयानुसार तज्ञ व अनुभवी मार्गदर्शकांची उपलब्धता . अद्ययावत लायब्ररी व स्टडी रूम संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या संगणक व इंटरनेट सुविधा मागील पाच वर्षातील संस्थेचा यशस्वी कार्यकाळ तसेच  मागील सतत पाच वर्षांतील संस्थेमार्फत यशस्वी झालेले विद्यार्थी, संस्थेचा मागील पाच वर्षांचा चढता नफा ताळेबंद.  संस्थेची जीएसटी,पॅन कार्ड, व उद्योग आधार सह कायदेशीर नोंदणी. धर्मादाय आयुक्त यांच्याकडे (Non-Profit Organization) अशी नोंदणी असलेल्या संस्थेस प्राधान्य दिले जाईल. वैयक्तिक प्रशिक्षणार्थीचा विद्यार्थी विमा प्रशिक्षण संस्था घेईल. संस्थेकडील अद्ययावत प्रशिक्षण वर्ग तसेच संस्थेमधील अभ्यासपूर्ण वातावरण. प्रशिक्षण संस्था काळ्या यादीतील नसावी.

सर्व विद्याथ्र्यांनी सत्र निहाय उपस्थित राहणे बाबतची जबाबदारी ही महाविद्यालयातील सर्व कर्मचारी व प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची राहील. सदरचा प्रशिक्षण कार्यक्रम निवासी, नियमित स्वरूपाचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे. भोजन व निवास यासाठी येणारा सर्व खर्च संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास कार्यालयामार्फत करण्यात येईल. प्रशिक्षणार्थीने अनुसूचित जमात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल.  सदर प्रशिक्षण संबंधित दरमहा सादर करण्यात येणारे टेस्ट अहवाल, प्रगती अहवाल समाधानकारक नसल्यास त्यास सदर प्रशिक्षण देणारी संस्था जबाबदार राहील. रुजू प्रमाणपत्र सदर प्रशिक्षणार्थीचे शाळा, संस्था, महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी रुजू प्रमाणपत्र प्रशिक्षण देणारी संस्था व मुख्याध्यापक,  केंद्रप्रमुख यांच्या संयुक्त स्वाक्षरीने तर सर्व आवश्यक कागदपत्रांसोबत आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना सादर करावे. परस्पर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रम स्पर्धा परीक्षा मेडीकल,नीट,जेईई प्रशिक्षण कार्यक्रम राबविताना सेवा पुरवठादार संस्थेने प्रशिक्षण कार्यक्रम ऑफलाईन पद्धतीने २ वर्षे कालावधीकरीता राबविणे सदर सेवापुरवठादार संस्थेस बंधनकारक राहील.

०००

पालखी सोहळ्यांसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज

पुणे, दि. ९ जून २०२३: जगदगुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यांसाठी महावितरणकडून पुणे परिमंडल अंतर्गत वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरूस्तीचे कामे करून यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच संबंधित विभागांच्या कार्यक्षेत्रात २४ तास कार्यरत राहणार्‍या ३० अभियंता व १३५ कर्मचाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. यासह मागणीप्रमाणे तात्पुरती वीज जोडणी देखील तात्काळ उपलब्ध होणार आहे.

आषाढी यात्रेनिमित्त पुणे परिमंडल अंतर्गत भोसरी, पिंपरी, रास्तापेठ, राजगुरुनगर व मुळशी विभागांच्या कार्यक्षेत्रात जगदगुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखी सोहळा रविवारी (दि. ११) ते बुधवार (दि. १४) पर्यंत होणार आहे. या विभागांमध्ये विविध ठिकाणच्या पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी अतिरिक्त स्वरुपात रोहित्रे व इतर साधनसामग्री तयार ठेवण्यात आली आहे. वीज सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आली आहे. आवश्यक ठिकाणी मोबाईल ट्रॉन्सफॉर्मरद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सोबतच सामाजिक बांधिलकी म्हणून महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांकडून पिण्याचे पाणी, फळ, अल्पोपाहार आदींची सेवा देण्यात येणार आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत संपूर्ण पालखी सोहळा मार्गावर तसेच मुक्कामाच्या ठिकाणी व परिसरातील वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात आली आहे. उपरी वीजवाहिन्या भूमिगत करणे, अर्थिंग, उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांची तसेच रोहित्रांसह कुंपणाची देखभाल व दुरुस्तीची कामे, फिडर पिलर्सची दुरुस्ती, डिस्क इन्सूलेटर बदलणे, झोल पडलेल्या तारा ओढणे, तारांना स्पेसर्स लावणे, वाकलेले खांब सरळ करणे, गंजलेले वीजखांब बदलणे आदी कामे करण्यात आली. पालखी सोहळ्याच्या कालावधीत मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्यासह संबधित विभागाचे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता विविध भेटी देणार आहेत.

पालखी मार्गावर किंवा मुक्कामाच्या दरम्यान कोणत्याही व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणेपासून सावध व सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे तसेच उन्हाळा देखील तापलेला आहे. त्यामुळे वीजखांब, फिडर पिलर, डीपी बॉक्स किंवा अन्य ठिकाणच्या वीजयंत्रणेपासून सुरक्षित अंतर ठेवावे. पालखी सोहळा मार्ग व मुक्कामाच्या ठिकाणी पुणे परिमंडल अंतर्गत अभियंता व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून ते २४x७ वीज सेवा देणार आहेत. वीजविषयक कोणतीही तक्रार असल्यास २४ तास सुरु असलेल्या १९१२ / १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल– पालखी सोहळ्याच्या कालावधीत अभियंता व कर्मचाऱ्यांना सुरळीत वीजपुरवठ्यासह भाविकांच्या वीजसुरक्षेबाबत संपूर्ण खबरदारी घेण्यात येईल. वीजपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था तयार ठेवण्यात आली आहे. तसेच भाविकांनी किंवा स्वयंसेवकांनी वीज सेवेबाबत काही अडचणी असल्यास संबंधित अभियंता/ कर्मचारी किंवा महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात येईल.

वाकड, बाणेर, सांगवी परिसरात चक्राकार भारनियमन

पुणे, दि. ९ जून २०२३: तापलेल्या उन्हामुळे विजेची मागणी वाढल्यामुळे महापारेषण कंपनीची २२० केव्ही उर्से ते चिंचवड अतिउच्चदाब वीजवाहिनी अतिभारित (ओव्हरलोड) होण्याचा धोका असल्याने वाकड, बाणेर, बालेवाडी, हिंजवडी, पिंपळे सौदागर, बावधन, निगडी आदी परिसरात शुक्रवारी (दि. ९) सकाळी पावणे दहापासून दुपारी २ वाजेपर्यंत अर्धा ते दीड तासांपर्यंत चक्राकार पद्धतीने विजेचे भारनियमन करण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या २२० केव्ही उर्से ते चिंचवड अतिउच्चदाब वीजवाहिनीद्वारे चिंचवड २२० केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा केला जातो. तथापि तापलेल्या उन्हामुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या वीजवाहिनीच्या ७५० ॲम्पीअरपेक्षा अधिक वीज भार (लोड) वाढत असल्याने सुमारे ५० ते ६० मेगावॅट विजेचे भारनियमन आवश्यक झाले. त्यामुळे महापारेषणच्या २२० केव्ही चिंचवड व हिंजवडी आणि १३२ केव्ही रहाटणी व एनसीएल या अतिउच्चदाब उपकेंद्राद्वारे विजेचे भारनियमन करण्यास कळविण्यात आले.

त्याप्रमाणे या अतिउच्चदाब उपकेंद्रांशी संलग्न महावितरणच्या वीजवाहिन्यांवर सकाळी पावणे दहापासून अर्धा ते दीड तासांपर्यंत विजेचे चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागले. यामध्ये हिंजवडी परिसर, वाकड, ताथवडे, थेरगाव, चिंचवड, पिंपळे सौदागर, सांगवी, पिंपळ निलख, पुनावळे, बालेवाडी, बाणेर, बावधन, निगडीया परिसराचा समावेश होता. दुपारी दोन वाजताच्या सुमारास उर्से ते चिंचवड अतिउच्चदाब वीजवाहिनीवरील वीजभार कमी झाल्यानंतर या सर्व भागातील विजेचे भारनियमन मागे घेण्यात आले.

शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदानाचे अर्ज ३० जूनपर्यंत करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ९ : अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगर परिषद शाळा व दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी सन २०२३-२४ वर्षासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक शाळांनी परिपूर्ण अर्ज जिल्हा नियोजन समिती, मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे दि. ३० जून २०२३ पर्यंत सादर करावेत. त्यानंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, असे मुंबई शहर जिल्हा नियोजन अधिकारी  जी. बी. सुपेकर यांनी सांगितले.

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी ३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई दि. ९ : राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या वर्षासाठी पात्र मदरशांकडून दि. ३० जून, २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत व मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरसांनी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा नियोजन समिती, मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात करण्याचे आवाहन, मुंबई शहर जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर यांनी केले आहे.

आमदार शिरोळे यांनीकेली पालखी मार्गाची पाहणी

पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकोबाराय यांच्या पालख्यांची मार्गक्रमणा सुकर व्हावी याकरिता आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत पालखी मार्गाची आज (शुक्रवारी) पाहणी केली.

या पाहणीत सर्व व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. जुन्या पुणे–मुंबई महामार्गावर रस्ता रुंदीकरणामुळे रस्ता बराच खराब झालेला असून, हा रस्ता पालखी येण्यापूर्वी दोन दिवसात व्यवस्थित केला जाईल. तसेच वारकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना आमदार शिरोळे यांनी दिल्या.

या पाहणी दौऱ्यात प्रकाशभाऊ ढोरे, आनंद छाजेड, सचिन वाडेकर, धर्मेश शहा, सुनिताताई वाडेकर, परशुराम वाडेकर, अनिल भिसे, अजित पवार, सुभाष पाडळे, रोहित भिसे, राजू पिल्ले, अनिकेत भिसे, पोलीस अधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, औंध क्षेत्रीय कार्यालयाचे वार्ड ऑफिसर व अधिकारी आदि उपस्थित होते.

भक्तिरसात तल्लीन करणारा ‘विठ्ठल माझा सोबती’

आषाढी एकादशीच्या निमित्ताने २३ जूनपासून महाराष्ट्रातील भाविकांच्या भेटीस

‘विठू माउली तू, माउली जगाची..’ गात-गुणगुणत मोठ्या भक्तिभावाने महाराष्ट्रातील लाखो भाविक आषाढी एकादशीला आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या भेटीस येत असतात. रात्रंदिन अविरत टाळ-मृदुंगाच्या तालावर तुळशी वृंदावन आणि पालखी नाचवत भक्तिरसात तल्लीन; विठ्ठलाच्या एका भेटीसाठी आसुसलेली, ही भक्तमंडळी असं प्रसन्न चित्र सध्या आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतंय. त्यात दुग्धशर्करा योग म्हणजे विठू नामाचा गजर करणारा विठ्ठल माझा सोबती हा चित्रपट भाविकांच्या भेटीस आला आहे. फक्त मराठी आणि नाईंटी नाईन प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठल माझा सोबती या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून हा चित्रपट येत्या २३ जूनला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

विठ्ठल जीवाचा जिव्हाळा। विठ्ठल कृपेचा कोंवळा ।

विठ्ठल प्रेमाचा पुतळा। लावियेलें चाळा । विश्व विठ्ठलें ॥

तुकाराम गाथे मधील या अभंगाचा साक्षात्कार घडवणारा विठ्ठल माझा सोबती हा चित्रपट पांडुरंगाच्या एका निस्सीम भक्तावर आधारित आहे. ही कथा एका श्रीमंत कुटुंबात घडते. जिथे पैसा आहे पण नात्यांत गोडवा नाही. अशातच कुटुंबकलहाला कंटाळलेल्या त्या भक्ताच्या आयुष्यात एक साधारण ‘विठ्ठल’ नामक मदतनीस येतो. ‘विठ्ठल’च्या येण्याने नेमकी काय जादू घडते?, त्या भक्ताच्या घरातील सदस्यांमधील मतभेद दूर होतात का?, हा ‘विठ्ठल’ नेमका आहे तरी कोण आणि कुठून आला? या आणि अशा रंजक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी विठ्ठल माझा सोबती पाहायलाच हवा.

पल्लवी मळेकर (फक्त मराठी) निर्मित आणि संदीप मनोहर नवरे’ दिग्दर्शित ‘विठ्ठल माझा सोबती या चित्रपटात अरुण नलावडे, संदीप पाठक, राजेंद्र शिरसाटकर, आशय कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी, दिव्या पुगांवकर, अभय राणे यांसारख्या दर्जेदार कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळतील. या चित्रपटाची उत्कंठावर्धक कथा संदीप मनोहर नवरे यांनी लिहिली असून पटकथा-संवाद विक्रम एडके यांचे आहेत. गौरव चाटी आणि गणेश सुर्वे यांचं सुमधुर संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. मनू अस्थी संकलक तर चित्रपटाच्या छायांकनची जबाबदारी गौरव पोंक्षे यांनी सांभाळली आहे. शिवाय नाईंटी नाईन प्रोडक्शनचे विजय शिंदे आणि बॉम्बे बरोडा वेब टॉकीज हे या चित्रपटाचे लाईन प्रोड्युसर आहेत.

शरद पवारांना आलेल्या धमकीची सरकारने घेतली गंभीर दखल; शिंदे – फडणवीसांकडून तपासाच्या सूचना

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनाही धमकी मिळाली आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिस आयुक्तांना भेटून तक्रार दाखल केली. मात्र, अशा धमक्या खपवून घेतल्या जाणार नाही, असा इशारा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.’राजकारण महाराष्ट्राचे’ या नावाचा अकाउंट वरून शरद पवार यांना धमकी देण्यात आली आहे. यानंतर या धमकी प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्कतांकडे तक्रार दाखल केली. याची तत्काळ दाखल घेत राज्य शासन ॲक्शन मोडमध्ये आले असून पोलिस आयुक्तांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना आलेल्या धमकीची तक्रार पोलिस आयुक्तांकडे केल्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली असून तात्काळ कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान अशा धमक्या खपवून घेणार नसल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.या धमकी प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. ‘तुमचा दाभोलकर करू’ अशी धमकी दिल्यानंतर राज्यात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले वातावरण बिघडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत, त्यातून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. औरंगजेब, टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करुन धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. आपल्या राजकारणासाठी महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान हाणून पाडले जाईल, असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

आमदार नीलेश राणे, खा.संजय राऊत यांच्यासारख्या वाचाळवीरांवर बंदी घाला – माजी खा.संजय काकडे

पुणे-आमदार नीलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेचा मी निषेध व्यक्त करताे. पवार आमचे विराेधी नेते असले तरी महाराष्ट्राची संस्कृती याप्रकारची नाही. आमदार राणे, खासदार संजय राऊत सारख्या वाचाळवीरांवर पक्षाने प्रसारमाध्यमाशी बाेलण्यास बंदी घातली पाहिजे असे वक्तव्य माजी खासदार संजय काकडे यांनी केले आहे.

माजी खासदार संजय काकडे पुढे बोलताना म्हणाले की, नीतेश राणे, नीलेश राणे यांच्याबाबत पक्षातील वरिष्ठांकडे मी तक्रार करणार आहे की, अशाप्रकारचे त्यांच्या वक्तव्यामुळे काही लाेक पक्षापासून दुरावले जातात.याची काळजी घेतली पाहिजे. विराेधकांनी आम्ही सत्ता चालवताना काही चुकत असेल तर टिका टिप्पणी करावी. परंतु काेणत्याही नेत्याबाबत कुत्र्यापासून माकडापर्यंत, डुक्करापर्यंत खालच्या पातळीची टिका करणे याेग्य नाही. काेणत्याही प्राण्याची नेत्यांना उपमा देण्याचे राहिलेले नाही इतका टीकेचा दर्जा घसरलेला आहे, असे मत माजी खासदार संजय काकडे यांनी येथे व्यक्त केले.

संजय काकडे म्हणाले की, प्रसारमाध्यमांनी लाेकांना काय दाखवायचे ठरवावे त्यानुसार त्यांनी राेज सकाळी संजय राऊत, नीलेश राणे यांच्याकडे जाणे बंद करावे. आमच्या पक्षातील देखील वाचाळवीरांना प्रसारमाध्यमांशी बाेलण्यास बंदी घालावी. त्यामुळे पक्षाला धाेका निर्माण हाेऊ शकताे असे लेखी पत्र केंद्र व राज्यातील पक्षाचे वरिष्ठ नेत्यांना देणार आहे.

संजय काकडे म्हणाले की, काेल्हापूर दंगल सक्षमपणे सांभाळण्यास पाेलीस दल सज्ज आहे, माध्यमांनी थाेडा संयम बाळगावा. औरंगजेबच्या उपमा काेणत्याही पक्षाने काेणाला देऊन काही उपयाेग हाेणार नाही. काेणाला काेणत्या उपमा द्यावा याबाबत राणे यांना काेणी काही पक्षातील नेत्यांनी सांगितलेले नाही. विषयाला धरुन केवळ बाेलण्यात यावे. त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याने पक्षाची प्रतिमा मलीन हाेते. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून आमचा विराेध वैचारिक आहे. नितिमत्तेच्या बाहेर जाऊन वक्तव्यास माध्यमांकडून खतपाणी घातले जाऊ नये. 26 खासदार आमचे राज्यात आहे. विद्यमान लाेकसभा खासदारांना लाेकसभा क्षेत्राची जबाबदारी दिलेली नाही. केवळ निवडणूक तयारी अनुषंगाने जबाबदारी वाटप करण्यात आलेले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार संजय राऊत यांच्यासह सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी; सुनील राऊत यांची पोलिसांकडे तक्रार

सकाळी नऊचा भोंगा महिनाभरात बंद करा यासाठी दिली महिनाभराची मुदत

मुंबई- खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना धमकीचा फोन आल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली आहे. संजय राऊत आणि सुनील राऊत या दोघांनाही अशा प्रकारची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारा फोन कॉल आला असल्याची माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत त्यांनी पोलिसांना दिली.या संबंधी देण्यात आलेल्या माहितीनुसार संजय राऊत यांनी सकाळी 9 वाजेचा भोंगा बंद करावा, त्यासाठी एक महिन्याचा वेळ देत असल्याचे या फोनवर सांगण्यात आले आहे. हा धमकीवजा फोन सुनील राऊत यांच्या फोनवर आला असून संबंधित व्यक्ती हिंदी भाषेत बोलत असल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये संबंधित व्यक्ती वारंवार सकाळी नऊ वाजेचा भोंगा बंद करा, अशा इशारा देत होता, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे.

ज्याने धमकी दिली त्यालाच पोलिसांनी दिले संरक्षण ….

पोलिसांना कळवून सुद्धा ते धमकी देणाऱ्याला संरक्षण देतात, अशा शब्दात संजय राऊत यांनी त्यांना आलेल्या धमकीवर प्रतिक्रिया दिली आहे. मला वारंवार धमक्या येत आहेत. या बाबत मी चार वेळा गृहमंत्र्यांना कळवले आहे. एका गुंडाचे फोटो काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि त्यांच्या चिरंजीवासोबत पाहिले होते. त्याने माझ्यावर हल्ल्या करण्याचा कट रचला होता, त्याचे पुरावे देखील मी मुख्यमंत्र्यांकडे पाठवले. पण काही दिवसांनी मला कळाले की, मी पाठवलेल्या पुराव्याबाबत काहीच कारवाई झाली नाही. पण त्या गुंडाला पोलिस संरक्षण दिले गेले आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता, अजित पवार यांची माहिती; म्हणाले, ही भाजपची भूमिका आहे का?

पुणे -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आलेल्या धमकीवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारचा समाचार घेतला आहे. धमकी देणाऱ्याला अटक झाली पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. इतकंच नाही तर धमकी देणारा सौरभ पिंपळकर हा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.या संदर्भात माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, धमकी देणाऱ्याला अटक झाली पाहिजे. सोशल मीडियावर द्वेष पसरवणाऱ्यांच्या विरोधात कारवाईसाठी तत्काळ कायदा करण्याची मागणी देखील त्यांनी केली. सौरभ पिंपळकर याच्या अकाउंट वरून ही धमकी देण्यात आली असून त्याच्या अकाउंटवर हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा उल्लेख असल्याची माहिती देखील अजित पवार यांनी दिली. विचारांची लढाई विचारांनी लढावी, असा सल्ला देखील अजित पवार यांनी दिला.

मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला होता. मात्र, ते उपलब्ध नसल्याची माहिती मला त्यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. तर मग उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन लागला नाही, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. पोलिस अधिकाऱ्यांशी बोलण्यापेक्षा मी या दोघांशी बोलणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.सर्वच पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांना सांभाळावे असे म्हणत अजित पवार यांनी राजकीय नेत्यांना सल्ला दिला आहे. सध्या सोशल मीडियावर ज्याप्रमाणे द्वेष पसरवला जात आहे, ती आपली संस्कृती नाही. आपली संस्कृती जपली पाहिजे, मी प्रत्येक पक्षाबद्दल बोलतोय, त्यात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील आला असेही त्यांनी सांगितले. सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून द्वेष पसरवण्याचे काम होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे असे ते म्हणाले.सोशल मीडियावर ज्याप्रमाणे द्वेष पसरवला जात आहे, या विरोधात कायदा करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. सध्या कायदा करायला उशीर लागत असेल तर तसा अध्यादेश काढा, या प्रकारची नेत्यांची बदनामी थांबायला हवी, असेही ते म्हणाले.