Home Blog Page 1499

जेव्हा मंत्री चंद्रकांत पाटील बनतात शाळेचे शिक्षक…

पुणे-राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे नेहमीच लहान मुलांमध्ये रमून जातात. लहान मुलांशी संवाद साधताना, ते अतिशय आनंदी होतात. आजही त्यांचे एक वेगळे रुप सर्वांना पाहायला मिळाले. आज त्यांनी चक्क शाळेच्या शिक्षकाच्या भूमिकेतून विद्यार्थिनींना स्वच्छतेचे धडे दिले. तसेच सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थिनींचे पालकत्व स्वीकारले. तसेच एक पालक असलेल्या विद्यार्थिनींचे शैक्षणिक पालकत्व स्विकारण्याची घोषणा केली.

कोथरूड मधील कर्वेनगर भागातील जिव्हाळा फाऊंडेशन संचालित अनुराधा पूर्व माध्यमिक शाळा आणि स्व. सुरेश मुठे मुलींचे वसतिगृह सुमन बालसंस्कार केंद्राला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. पुण्याच्या ग्रामीण भागातील या शाळेत भटक्या विमुक्त जाती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतात. तसेच या सर्व मुलीं शाळेच्या वसतिगृहात राहतात.

या शाळेला भेट दिल्यानंतर सर्वप्रथम मुलींनी ‘गुड मॉर्निंग’ म्हणत माननीय चंद्रकांतदादा पाटील यांचे स्वागत केले. यावर माननीय दादांनी गुड मॉर्निंगला मराठीत काय म्हणतात असा प्रश्न केला. त्यावर विद्यार्थ्यांनींना काही सांगणे शक्य झाले नाही, त्यामुळे प्रेमाने गुड मॉर्निंगच्या ऐवजी ‘सुप्रभात’ शब्द वापरत असल्याचे सांगितले. आणि सर्वांना चॉकलेट वाटप केले.

त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी “माझ्याशी कोण बोलणार?” असे विचारताच, राजनंदनी नरेंद्रसिंह घोरपडे, रेखा भीमा शेट्टी आणि आरोही अविनाश तुपेकर या तीन मुले पुढे आल्या. माननीय दादांनी या तिन्ही मुलींची आत्मियतेने विचारपूस केली. तसेच मोठी झाल्यावर काय होणार? असा प्रश्न विचारला. दादांच्या या प्रश्नानंतर या तिन्ही मुलींनी आपल्या भावना व्यक्त करताना डॉक्टर, पोलीस अधिकारी, शिक्षिका असे सांगितले. त्यानंतर दादांनी ही तिघींचे आनंदाने कौतुक केले.

यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारतच्या संकल्पाविषयी सर्व विद्यार्थिनींना सविस्तर माहिती दिली.‌ तसेच, “मी आता दिलेले चॉकलेटचा कागद खाली कुठेही न टाकता, कचरा पेटीतच टाकावा,” असे समजावून सांगितले.

विद्यार्थिनींशी संवादानंतर जिव्हाळा फाऊंडेशनच्या संचालिका ॲड. शर्वरी मुठे आणि अनुराधा शाळेच्या शिक्षिका सोनिया मारणे, निलिमा वाडकर, सुजाता जोशी, विनया चौधरी, योगिनी शिंदे, मोनिका कदम, दादांनी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर शिक्षिकांना सुकन्या समृद्धी योजनेची माहिती देऊन, सर्व‌ विद्यार्थिनींचे सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून पालकत्व घेतले.

तसेच, संस्थेच्या शिक्षिकांनी पुण्यातील शाळांचे सर्वेक्षण करावे, आणि ज्या विद्यार्थिंनीच्या एका पालकाचे निधन झाले आहे, अशा एक पालक असलेल्या विद्यार्थिनींची माहिती संकलित करावी. या सर्व विद्यार्थिनींचे शैक्षणिक पालकत्व स्विकारण्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त मोफत नेत्रचिकित्सा व शस्त्रक्रिया शिबीर संपन्न

12 गरजू व्यक्तींवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया – सौ. मंजुश्री खर्डेकर.
पुणे-भारतीय जनता पार्टी प्रभाग 13, क्रिएटिव्ह फाउंडेशन, म. ग. आचवल ट्रस्ट आणि नयनतारा आय क्लिनिक च्या सहकार्याने लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष व माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी एरंडवणे, दहा चाळ येथे आयोजित केलेल्या शिबिरात तब्ब्ल 12 गरजू व्यक्तींवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगितले. शिबिराचा लाभ घेण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. ह्या शिबिरास माजी नगरसेवक व भाजपा पुणे शहर सरचिटणीस दीपक पोटे, नगरसेवक जयंत भावे, स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर,सरचिटणीस प्राची बगाटे, उद्योग आघाडीचे सरचिटणीस रामदास गावडे,ब्राह्मण संघाचे दत्तात्रय देशपांडे इ मान्यवर उपस्थित होते.
नयनतारा आय क्लिनिक चे डॉ. अनिल परांजपे आणि डॉ. मेधा परांजपे व त्यांच्या चमुने नेत्रतपासणी करून शस्त्रक्रियेसाठीच्या रुग्णांची निवड केली. उद्याच ह्या सर्वांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.हे शिबीर यशस्वी करण्यासाठी भाजपा महिला आघाडी उपाध्यक्ष संगीताताई आदवडे व संगीताताई वांद्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आम्हाला सतत समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्याची शिकवण दिली, त्यालाच अनुसरून त्यांच्या जयंती दिनी मोफत शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केल्याचे सौ. खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,पुन्हा जाहिर माफी मागतो, अटक केली त्यांची मुक्तता करा ,पोलिसांचे निलंबन मागे घ्या

पुणे- माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने  निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता.  त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे, मी पुन्हा एकदा ह्या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहिर माफी मागतो. माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे त्यांची मुक्तता करावी ,ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ती ही मागे घ्यावी . तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना करतो आहे. माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही . माझ्या दृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकत आहे. अशा शब्दात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज आपल्या भावना व्यक्त करत एकूणच त्यांच्या बाबत निर्माण झालेला वाद आता संपुष्टात अंत असल्याचे स्पष्ट केले आहे

मंत्री पाटील नेमके काय म्हणालेत वाचा त्यांच्याच शब्दात …..

जय महाराष्ट्र , महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उध्दारकर्ते , महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासुर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. माझ्या कृतीत त्यांचे अनुकरण करत आलो आहे.  त्यांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने  निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता.  त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक  ठरल्या आहेत . शिवरायांच्या एका मा,वळ्यावर असे आरोप लावले जावेत याचे वाईट वाटत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये असे मला वाटते. मी पुन्हा एकदा ह्या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहिर माफी मागतो. माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे त्यांची मुक्तता करावी ,ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ती ही मागे घ्यावी . तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना करतो आहे. माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही . माझ्या दृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा ही विनंती.

आपला-चंद्रकांत (दादा) पाटिल.

अमित शहांनी महाराष्ट्र-कर्नाटक दोन्ही राज्यांच्या प्रमुखांची बैठक बोलावली

नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आता केंद्राकडून आता हालचाली सुरु झाल्या आहेत. नुकतीच राज्यातील महाविकास आघाडीच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर या हालचालींना वेग आला आहे. त्यानुसार, अमित शहा यांनी बैठक बोलावली आहे.बोम्मई म्हणाले, “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या प्रमुखांची परवा (१४ डिसेंबर) बैठक बोलावली आहे” काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतली होती. यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, फौजिया खान, तर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, राजन साळवी, प्रियंका चतुर्वेदी आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.

पाटलांनी जपून बोलायला हवे होते:शरद पवार यांचा सल्ला

मुंबई-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी जे शब्द वापरले ते वापरायला नको होते, त्यानंतर देखील गिरणी कामगारांचा मुलगा आहे म्हणून कांगावा केला ही त्यांनी हद्दच केली.अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केली. शरद पवार म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीचे समर्थन राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाहीच. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वापरलेला शब्द चुकीचाच होता. यानंतरही चंद्रकांत पाटील यांनी कांगावा करत आपण सामान्य कुटुुंबातून आलो आहोत म्हणून हे सगळे सुरू ठेवले , असा राज्याच्या राजकारणात 5 वर्षे मंत्रिमंडळात मंत्री होतात पक्षाचे अध्यक्ष होतात आणि आताही मंत्री आहात आणि एखाद्या सामान्य कुटुुंबामधील व्यक्ती ही सत्तेच्या शिखरावर जाते ही काही केवळ तुमच्या बाबतीत घडलेले नाही, असे अनेक उदाहरणे महाराष्ट्रात देता येतील, असा टोलाही त्यांनी हाणला. पण शाईफेक करणे ही भूमिका आपण कधी घेणार नाही. आपणही अशी भूमिका घेऊ नये, असे आवाहन त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले.

माजी गृहमंत्री देशमुख यांना तब्बल 13 महिन्यांनी जामीन:पण सीबीआयच्या विरोधानंतर 10 दिवसांची स्थगिती

0

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. ईडीनंतर आता सीबीआयच्या केसमध्येही त्यांना जामीन मंजूर झालाय. सीबीआयकडून देशमुखांच्या जामिनाला विरोध करण्यात आला असून 10 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे.सीबीआयकडूनही अनिल देशमुख यांच्या जामीनाला सुप्रीम कोर्टात चॅलेज करण्यात येणार आहे. मात्र ईडीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली अनिल देशमुखांच्या जामीनाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती.महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री असणारे अनिल देशमुख हे 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुख आरोपी आहे. त्यांना आधी ईडीने अटक केली होती. मात्र ईडीकडून त्यांना आधीच जामीन मंजूर झाला तर आज सीबीआयच्या केसमध्येही जामीन मंजूर झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक झाली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल आहे. न्या. एन. जे. जमादार यांनी देशमुख यांना 1 लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

सरकारी कार्यक्रमातून विरोधकांवर टीका करणं कितपत शहाणपणाचं आहे? शरद पवारांचा पीएम मोदींना टोला

मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गासह विविध विकासकामांचं उद्घाटन केलं. उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणातून पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सरकारी कार्यक्रमातून विरोधकांवर टीका करणं कितपत योग्य आहे? असा सवाल विचारत निशाणा साधला आहे. ते ८२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आभासी कार्यक्रमात बोलत होते.

ऑनलाइन पद्धतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमातून उपस्थिती लोकांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले, “काल नागपूरमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण होतं. या भाषणामध्ये त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर विरोधकांवर टीका केली. ते पक्षाच्यावतीने किंवा निवडणुकीच्या निमित्ताने जाहीरसभेसाठी गेले, त्याठिकाणी त्यांनी पक्षाची भूमिका मांडली किंवा विरोधकांवर टीका टिप्पणी केली, तर तो त्यांचा १०० टक्के अधिकार आहे. पण एखाद्या रेल्वेचं, रस्त्याचं किंवा हॉस्पिटलचं उद्घाटन करणं, हे सरकारी कार्यक्रम आहेत. अशा सरकारी कार्यक्रमांचं उद्घाटन देशाचा पंतप्रधान करत असतो, तेव्हा सरकारी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून विरोधकांवर टीका करणं, कितपत शहाणपणाचं आहे? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.” अशी टीका शरद पवारांनी केली.

पवार पुढे म्हणाले, “मी आतापर्यंत अनेक पंतप्रधानांची कार्यक्रमं पाहिली आहेत. भाषणं ऐकली आहेत. अगदी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून त्यानंतरचे वेगवेगळ्या पंतप्रधानांना ऐकलं आहे. पंडित नेहरू निवडणुकीच्या प्रचाराला गेल्यानंतरही त्यांनी विरोधी पक्षाची सरकारं असली तरी त्यांच्यावर कधी टिप्पणी केली नाही. त्यांनी आपली भूमिका मांडली. पण विरोधक, विरोधी पक्षनेता, विरोधी पक्ष याही लोकशाहीच्या संस्था आहेत, त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे, हे संकेत आपल्या देशाच्या जवळपास प्रत्येक पंतप्रधानांनी पाळले. पण आज काही हे पाळलं जात नाही,” असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

पुणे बंदच्या आवाहनाला पुण्यनगरीतील गणेशोत्सव मंडळांचा पाठिंबा

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये मोठ्या पदावरील व्यक्ती तसेच काही लोकप्रतिनिधींकडून केली जात आहेत. यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या असून, या वक्तव्याचा खेदजनक निषेध व्यक्त करीत पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी १३ डिसेंबर पुणे बंदच्या आवाहनाला पाठिंबा दिला.

श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ, केसरीवाडा मंडळ, श्री तुळशीबाग गणपती सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांसह शहरातील ३६ गणेशोत्सव मंडळांनी या बंदला पाठिंबा दिला आहे.

अण्णा थोरात म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. ते आमचे प्रेरणास्थान आणि स्फूर्तिस्थान आहेत आणि कायम राहतील. देशातील इतर सर्वच महापुरुष आणि महान स्त्री व्यक्तिमत्वांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे व या सर्वांचे देशाप्रती असलेल्या अमूल्य योगदानाचे आम्हाला भान आणि अभिमान हे दोन्ही आहे.

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल अपमानास्पद व्यक्तव्ये मोठ्या पदावरील व्यक्ती तसेच काही लोकप्रतिनिधींकडून केली जात आहेत. यामुळे आमच्या भावना तीव्र दुखावल्या गेल्या असून, या गोष्टीचा आम्ही खेदजनक निषेध व्यक्त करीत आहोत, खेदजनक यासाठी कारण आपणच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आमच्या श्रद्धास्थानाबद्दल अशी बेताल विधाने करीत आहेत.

यापुढे कधीही कोणत्याही व्यक्तीने मग ती राजकीय असो किंवा अराजकीय, छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल एक शब्द जरी चुकीचा किंवा अपमानास्पद काढला, तर अजिबात खपवून घेतले जाणार नाही. याची नोंद घ्यावी व भविष्यात छत्रपती शिवाजीमहाराजांबद्दल बोलताना याचे भान राखावे, असे आवाहनही यावेळी गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी केले.

पीएमपीएमएल कडून कोंढणपूर येथील श्री तुकाईदेवी यात्रेनिमित्त जादा बसेसचे नियोजन

पुणे–पीएमपीएमएल कडून कोंढणपूर येथील श्री तुकाईदेवी यात्रा निमित्ताने भाविकांच्या सोयीसाठी मार्ग क्र. २९२-
कात्रज सर्पोद्यान बसस्थानक ते कोंढणपूर या मार्गावर दि. १३/१२/२०२२ ते दि. २८/०२/२०२३ या कालावधीत
आठवड्यातील दर रविवार, मंगळवार व शुक्रवार या दिवशी २ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
सध्या कात्रज सर्पोद्यान बसस्थानक ते कोंढणपूर या मार्गावर पीएमपीएमएलच्या दररोज नियमित ५ बसेस दर ३०
मिनिटांच्या वारंवारीतेने सुरु असून दिवसभरात एकूण ५८ फेऱ्या होतात. या ५ बसेस व्यतिरिक्त २ जादा बसेसचे नियोजन
दि. १३/१२/२०२२ ते दि. २८/०२/२०२३ या कालावधीत आठवड्यातील दर रविवार, मंगळवार व शुक्रवार या दिवशी
करण्यात आले आहे. सदरच्या २ जादा बसेस भाविकांच्या गर्दीनुसार व आवश्यकतेनुसार धावतील.
तसेच पुणे सातारा रोडवर कात्रज सर्पोद्यान बसस्थानकावरून बसमार्ग क्र. ६१- कात्रज सर्पोद्यान ते सारोळा (दररोज
५ बसेस), मार्ग क्र. २९३- कात्रज सर्पोद्यान ते सासवड – मार्गे कापूरहोळ (दररोज २ बसेस), मार्ग क्र. २९६- कात्रज सर्पोद्यान
ते विंझर (दररोज ३ बसेस) व मार्ग क्र. २९६अ- कात्रज सर्पोद्यान ते वांगणीवाडी (दररोज १ बस) या मार्गावर संचलनात
असणाऱ्या बसेस कोंढणपूर फाट्यापर्यंत जाणेसाठी उपलब्ध आहेत.
तरी कोंढणपूर येथील श्री तुकाईदेवी दर्शनासाठी जाणाऱ्या सर्व भाविकांनी सदर बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन
पीएमपीएमएल कडून करण्यात येत आहे.

साडेचार तास ‘तो’ मृत्यूशी देत होता झुंज ….अखेर त्याचे नशीब …(व्हिडीओ)

पुणे- सकाळी साडे आठ वाजल्या पासून कावळ्यांचा एकच आकांत चालू होता .. पण सकाळच्या गडबडीत कोणाला या कोलाहालाकडे लक्ष द्यायला वेळ होता .. 

९ वाजता एकाने सांगितले ,’ एक कावळा कुठे तारेत कि मांजात अडकलाय .. पण मी माझ्या दररोजच्या कामाच्या शेड्युल लावण्यात गर्क होतो ,१० वाजता बाथरूम मध्ये गेलो तर खिडकीतून दूरवर एका दिसेनासे असलेल्या दोरीला एक कावळा लटकलेला दिसला , आता कावळ्यांचा कोलाहल हि थांबला होता. पण निट  बारकाईने पाहिले , तो जिवंत होता , जीवाची तडफड त्याची सुरूच होती . मान इकडे तिकडे वळवून कोणी जणू मदतीला येतेय काय ? याकडे त्याची भेदरलेली नजर भिर भिरत होती.. आणि माझे अंतर्मन हेलावून गेले , बाथरूम मधून अर्धवटच तातडीने बाहेर येऊन पुतण्याला सांगितले अरे तो कावळा तिथे लटकलाय , झुंजतो आहे जीवासाठी  ..गतप्राण नाही झालेला ..बघ त्याला सोडविता येतेय काय ? असे सांगून पुन्हा बाथरूम मध्ये आवरायला गेलो परत येईपर्यंत पुतण्याने प्रत्यक्षात पाहणी करून  फोनोफोनी सुरु  ठेवली  होती .त्याची फोनोफोनी सुरु असताना समोरच्या रस्त्या पलीकडच्या  बिल्डींग मधूनही कोणी प्रयत्न सुरु ठेवले होते , ते सकाळी साडेआठ पासून अलीकडे येऊन त्यांनी त्याला सोडविण्याचा प्रयत्न केला तो असफल झाला तरी त्यांचे प्रयत्न सुरु होतेच ,काही कावळे कुठून कुठून त्यांचा दाणापाणी आणून अडकलेल्या कावळ्याच्या चोचीत उडत येऊन  भरून उडत जात होते  फायरब्रिगेड शी वारंवार संपर्क साधून अखेरीस पुतण्याने केलेल्या प्रयत्नाला यश आले आणि अग्निशामक दलाची गाडी आपले जवान घेऊन आली, कात्रज चे स्टेशन ऑफिसर संजय रामटेके, जयवंत तळेकर ,संदीप घडशी ,पंकज इंगवले ,रमेश मांगडे ,संकेत शेलार अशी हि टीम कामाला लागली . पण हि गाडी काही करू शकणार नाही म्हणून त्यांनी एम एस इ डीसी एल ची गाडी मागविली पण या गाडी तूनही ७० फुट उंचीवर अडकलेल्या  कावळ्या पर्यंत किंवा त्याला अडकविलेल्या मांजापर्यंत पोहोचणे अशक्य होऊन बसले , एकीकडे असे मानवी प्रयत्न सुरु होते तर दुसरीकडे तो स्वतःच मृत्यूशी झुंज देत सुटका करवून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता . अखेरीस साडेबाराच्या सुमारास पुतण्या आणि फायर ब्रिगेडचे कर्मचारी शेजारील ७ मजली इमारतीच्या  टेरेस वर पोहोचले आणि तिथून त्यांनी त्या’ मांजा ‘ पर्यंत पोहोचून तो हलवून इकडून प्रयत्न केले आणि तिकडून म्र्त्युशी झुज देणाऱ्या त्या जीवाला क्षणार्धात बळ मिळाले , भोवताली जखडलेला मृत्यूचा  पाश बनलेला मांजा तून उसळी मारून त्याने झेप घेतली आणि रस्त्याच्या पलीकडील एका ‘अपूर्वाई ‘ नावाच्या बंगल्याच्या झाडात पुन्हा त्याच्या समवेत गेलेल्या मांजाच्या दोरीने त्याला जखडविले .. सुदैवाने हे झाड आणि ‘तो खाली बंगल्याच्या पोर्च मध्येच होता जिथे खाली असलेल्या फायर ब्रिगेड च्या जवानाने जाऊन त्या च्या शरीर भोवतालचा मांजा काढून त्याची सुटका केली . .. पण माणूस जवळ जाताच तो दूर जात होता .आणि इतर कावळे जे त्याभोवती घिरट्या मारत होते ..तेही आता जवळ नव्हते ,’अपूर्वाई ‘ बंगल्यावरून तो जणू वाचवण्याचे प्रयत्न करणाऱ्या आणि अचंबित नजरेने  त्याकडे पाहणाऱ्याकडे जणू कृतज्ञतेने पाहत होता ,पक्षीप्रेमी तोवर आले होते त्यांनी त्याला उपचारासाठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण तो काही हातही लागत नव्हता . अखेरीस चला ,जीव तर वाचला.. याचं समाधान मानून ,  पुढे त्याचे नशीब म्हणून ..आम्ही आमच्या पुढच्या शेड्युल मध्ये बिझी व्हायला निघालो ..

समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण; महामार्गावर १० किलोमीटरचा प्रवास

0

नागपूर, दि.११ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. महामार्गाच्या नागपूर येथील झिरो पॉईंट पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या टोल प्लाझा येथे अनावरणाचा हा कार्यक्रम झाला.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.

कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी महामार्गाची पाहणी केली. तत्पूर्वी श्री. मोदी यांनी समृद्धी महामार्गावर झिरो पॉईंट ते टोल प्लाझा असा 10 किलोमीटरचा प्रवास केला. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य मान्यवर होते.

प्रधानमंत्र्यांनी घेतला ढोलताशाचा आनंद

कोनशिला अनावरणप्रसंगी प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी ढोलताशा पथक ठेवण्यात आले होते. प्रधानमंत्र्यांनी स्वतः ढोल वाद्य वाजवत अनोखा आनंद घेतला. तसेच या पथकातील कलावंतांशी संवाद साधला. कार्यक्रमस्थळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अनावरण संपवून निघताना प्रधानमंत्र्यांनी नागरिकांची गर्दी असलेल्या ठिकाणी वाहन हळू करत नागरिकांना हात दाखवित त्यांचे अभिवादन स्वीकारले.

तुकडे तुकडे गँग मुंबईची शकलं शकलं करतील – आ. ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि: ११ डिसेंबर २०२२

महाविकास आघाडीचे लोक हेच स्वतः तुकडे तुकडे गँग आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजे काय? तर तुटून उरलेली शिवसेना, तुटून आलेली काँग्रेस, तुटून आलेली राष्ट्रवादी आहे. पहिला तुकडा मूळ काँग्रेसमधून तुटून आलेला काँग्रेस (आय) दुसरा तुकडा काँग्रेसमधून तुटून आलेली राष्ट्रवादी काँग्रेस तर तिसरा तुकडा वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसेनेपासून तुटून आलेली उद्धवजी यांची शिवसेना आहे. त्यांना अजून तुकडे हवेत. याला बघ त्याला बघ अन् महापालिका जिंक असं चालू असून तुकडे तुकडे गॅंग मुंबईची शकलं करणार आहेत अशी घणाघाती टीका करत भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

जागर मुंबईचा अभियानांतर्गत २५ वी जाहीर सभा विले पार्ले विधानसभेत दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे रविवारी पार पडली. या सभेला माजी नगरसेविका ज्योती अळवणी, सुशम सावंत, वीरेंद्र म्हात्रे, राजेश मेहता, स्वप्ना म्हात्रे, सुनीता मेहता, अनिष मकवाणी, अभिजित सामंत, प्रकाश मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मतासाठी मराठी – मुस्लिम तुष्टीकरण
आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले,
मतासाठी कुर्निसात घालणं हे भाजपाला मान्य नाही. कोरोना काळात मुंबईकरांच्या जीवनमरणाचा प्रश्न असताना याकूब मेमन थडग सुशोभीकरण केले जाते. उद्धव ठाकरे दाऊदशी संबंध असणारे नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज्याकडे पुरावे मागितले जातात. औरंगजेबाचे स्वप्न उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केले. असुरांचा नाश करण्यासाठी हा जागर आहे. हा जागर सत्तेसाठी नाही. समाजात तेढ निर्माण होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. २२ ऑक्टोबरला सामनामध्ये मराठी मुस्लिमांचे आम्ही स्वागत करत आहोत असे लिहिले गेले. आम्ही कुठल्याही धर्माच्या, जातीच्या विरोधात नाही आहोत. आम्ही ‘सबका साथ सबका विकास’ आहोत. तुष्टीकरण्याच्या आणि लांगुलचालनाच्या विरोधात आम्ही आहोत. मुस्लिम मराठी अशी मांडणी केली जात आहे. मराठी गुजरातीला विरोध का? मराठी जैनच्या विरोधात उभे का राहता? मराठी उत्तर भारतीय तुम्हाला का चालत नाहीत? मराठी हिंदू या शब्दांशी तुमचे वैर का आहे? असा सवाल ॲड. आशिष शेलार यांनी केला. ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक टेंडरमध्ये पैसे खाण्याचे काम केले. प्रत्येक वार्डात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून मराठी आणि मुस्लिम मताचं गणित जुळवलं जात आहे. सलग २५ वर्ष राज्य करून तुम्हाला जाती धर्माच्या आधारावर मतं मागण्याची वेळ का आली? केलेल्या कामाच्या आधारावर मतं मागा? सांगा तुम्ही किती प्रकल्प केले, रस्ते बांधले, किती शाळा बांधल्या? यातील काहीही त्यांना सांगता येत नाही. मुंबई महापालिकेची सत्ता हातातून जात असल्याने शेवटचा डाव हा रडीचा म्हणजेच कलीचा डाव खेळला जात आहे. जाती आणि धर्माच्या आधारावर मतं मागण्याचा कार्यक्रम हा अजेंडा उद्धव यांच्या शिवसेनेचा आहे. मराठी आणि मुस्लिमांना फसवण्याचे काम सुरू आहे. हिंदू मराठी आणि मुस्लिम मते भारतीय जनता पार्टीला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आम्ही कुठल्याही धर्माच्या, जातीच्या विरोधात नाही आहोत. आम्ही ‘सबका साथ सबका विकास’ आहोत. तुष्टीकरण्याच्या आणि लांगुलचालनाच्या विरोधात आहोत. हिंदुत फूट पाडण्याचे काम सुरू आहे ते कधीही यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा आ. ॲड. आशिष शेलार यांनी दिला.

मूषक संहार घोटाळा

पैसा खाण्याची स्पर्धा ठेवली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पहिला नंबर मिळेल. मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने कचऱ्यात खाल्ले, नाल्यात खाल्ले. पालिकेत उंदीर मारण्यात घोटाळा झाला. पाच वार्डात उंदीर मारले खर्च झाला एक कोटी. किती मारले? कुठे पुरले? नोंद कुठे केली? फाईल दाखवा तर म्हणतात पुरात वाहून गेली? वाघ म्हणता उंदरात पण खाता? यांनी २५ वर्षांत २ लाख करोड रुपयांचा घोटाळा केला अशी टीका आ. ॲड. आशिष शेलार यांनी केली.

खा. पूनम महाजन म्हणाल्या, सर्वसामान्यांच्या पुनर्विकासाचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी एकूणच हा जागर सर्वसामान्य मुंबईकरांसाठी आहे. रामसेतुला काँग्रेसने विरोध केला. राहुल गांधी यांनी मातेच्या मागे उभा राहून आपले राजकारण चालवले आता सीतामातेचा वापर करून राजकारण केले जात आहे. राहुल गांधी चुनावी हिंदू असल्याची टीका खा. पुनम महाजन यांनी केली.

आ. पराग अळवणी म्हणाले, मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे. या अभियानाच्या माध्यमातून विरोधकांचा भ्रष्टाचार जनतेपर्यंत पोहोचवला जात आहे. त्यामुळे विरोधक गोंधळून गेले आहेत. त्यावरून विषयांतर व्हावं यासाठी रोज प्रयत्न केला जात आहे. रस्ते, नाले सफाईत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कारवाई झाली. महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्वाचा अजेंडा पुन्हा बनला याचा आम्हाला आनंद आहे असेही ते म्हणाले.

नॅशनल फिनस्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत पश्चिम बंगालला सर्वसाधारण विजेतेपद

पुणे, दि.११: अंडरवॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने शिवछत्रपती क्रीडासंकुल म्हाळुंगे- बालेवाडी येथे ९ ते ११ डिसेंबर २०२२ या कालावधीत आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय फिनस्विमिंग स्पर्धेत पश्चिम बंगालने 32 सुवर्ण पदकांसह 90 पदके जिंकत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. केरळने 17 सुवर्णपदकांसह 44 पदके मिळवत दुसरे स्थान मिळवले तर तेलगंणाने 16 सुवर्ण पदकांसह 34 पदके मिळवत तिसरे स्थान पटकावले. तर महाराष्ट्राला 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि एका कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

अंडरवॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया (USFI) द्वारे आयोजित दुसऱ्या नॅशनल फिनस्विमिंग चॅम्पियनशिप पुणे 2022 स्पर्धेचा समारोप रविवारी झाला. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, अंडरवॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. तपन कुमार पानिग्रही, रोल बाॅल राज्य संघटनेचे अध्यक्ष संदिप खर्डेकर, अभिषेक लोणकर, अचिंता पंडित (कोषाध्यक्ष USFI),रियर एडमिरल पीडी शर्मा (अध्यक्ष RLSS (I),साईश्री हॉस्पिटलचे डॉ. नीरज आडकर आदी मान्यवर उपस्थित होते

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, फिनस्विमिंग खेळ ज्या उद्देशाने खेळला जातो त्याप्रमाणे या खेळाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, अधिकाधिक खेळाडूंनी फिनस्विमिंग हा खेळ खेळला पाहिजे, यासाठी आगामी काळात पुणे येथे आयोजित होणाऱ्या स्पर्धेला सहकार्य करेल, पाटील म्हणाले, रोलबॉलची सुरुवात पुणे येथून झाली असून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी शासकीय खात्यात नोकरी तसेच इयत्ता १० व १२ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या खेळाडूंला २५ गुण देण्यात येते. राज्यात खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.

या स्पर्धेत ३४ राज्य, केंद्रशासित प्रदेशातून ३०० पेक्षा जास्त जिल्ह्यातील १ हजार पेक्षा जास्त खेळाडू आणि प्रशिक्षक, तांत्रिक अधिकारी सहभाग घेतला आहे. यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना सुवर्ण, कांस्य व रौप्य पदक प्रदान करण्यात करुन खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्मिता राजन काटवे, यांना मास्टर्स व्ही 2 महिला गटात सुवर्णपदक, साब्यासाची पानिग्रही ला 50 मीटर मोनोफिन मध्ये रौप्यपदक तर निया पतंगे, ज्युनिअर डी गर्ल, 50 मीटर सरफेस (मोनो फिन) कांस्यपदक मिळाले आहे.

पालकमंत्र्यांवरील शाईहल्ल्याविरोधात निषेध आंदोलन !

पुणे-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर झालेल्या भ्याड शाईहल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. विचारांचा सामना विचारांनी करता येत नसल्यामुळे असामाजिक तत्त्वांनी जाणीवपूर्वक आणि इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने चंद्रकांत दादांवर शाईहल्ला केला. दादांनी याबाबत दिलगिरी व्यक्त करुनही हा प्रकार घडला. या प्रवृत्तीविरोधात आणि विशेषत: हल्ल्याच्या सुत्रधारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करत निषेध नोंदवला.
विश्वासघाताने आणि संधी साधूपणामुळे राज्यात आलेली सत्ता गेल्याने विरोधक सैरभैर झाले आहेत. राज्यातील शांततेचे वातावरण बिघडवून कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करायचा विरोधक सतत प्रयत्न करीत आहेत. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता संयमी आहे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या मर्यादेत राहून काम करणार आहे.
यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरीताई मिसाळ, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ,आमदार भीमरावअण्णा तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, पुणे प्रभारी धीरज घाटे, गणेश बीडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दिपक पोटे, दिपक नागपुरे, दत्ताभाऊ खाडे, संदीप लोणकर, बापू मानकर, नगरसेवक, मंडल अध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे मंडईतील १०० कष्टकरी व्यावसायिकांना जंबो छत्री वाटप

पुणे : राजकारणापेक्षा टिपेला पोहोचलेली महागाई, बेरोजगारी आणि गुन्हेगारीकडे वाढत जाणारा तरुणाईचा कल, हे महत्वाचे आहे. राज्यकर्त्यांना रॉ मटेरियल लागते, त्यांच्या मोर्चे, आंदोलन व सभांसाठी. जर सगळ्याच मुलांना नोक-या लागल्या, तर राज्यकर्त्यांकडे रॉ मेटेरियल म्हणून कोण जाईल? त्यामुळे ते रॉ मटेरियल करु इच्छितात. त्यामुळे हे रॉ मटेरियल होऊ नका, असे आवाहन शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या उपनेत्या अ‍ॅड. सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले. 


अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे मंडईतील बुरुड आळी येथे १०० कष्टकरी व्यावसायिकांना जंबो छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गील्ल, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, म्हसोबा ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, सारिका निंबाळकर आदी उपस्थित होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माणिक चव्हाण यांचा विशेष सन्मान करण्यात आला. वेंकिग उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
अ‍ॅड.सुषमा अंधारे म्हणाल्या, कष्टकरी व संघर्षाच्या वारशातून आलेल्या माणसाला सुख- दु:ख कळतात. गेल्या काही महिन्यात महापुरुषांचा अवमान असेल, महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडविणे असेल, जाणीवपूर्व खोडसाळपणा करणे, यागोष्टींमुळे सर्वसामान्य माणूस सैरभर होत चालला आहे. सर्वसामान्यांचे जगण्या-मरण्याचे जे प्रश्न आहेत, त्यावरुन लक्ष हटावे, याकरिता हे ठरवून चालले आहे. त्यावरुन न हालता, आपण प्रश्न विचारत राहूया, असे आवाहनही त्यांनी केले. 
संदीपसिंग गील्ल म्हणाले, समाजामध्ये एकमेकांना हात देऊन मदत करणे महत्वाचे आहे. म्हसोबा ट्रस्टतर्फे कष्टकरी वर्गाला दिलेली ही मदत खूप महत्वाची आहे. प्रत्येकाने असेच कार्य करत रहायला हवे, असेही त्यांनी सांगितले. निवृत्ती जाधव म्हणाले, मंडईतील कष्टकरी व्यावसायिकांचे ऊन-पावसापासून संरक्षण व्हावे, याकरिता हा उपक्रम घेण्यात आला. उत्तम प्रतीच्या १०० जंबो छत्र्या या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले. सुधीर साकोरे, योगेश निकम, सागर जाधव, उमंग शहा, दिनेश पिसाळ आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला. करिश्मा शेख यांनी सूत्रसंचालन केले.