Home Blog Page 1498

एलिफंट रेस्टॉरंट अ‍ॅन्ड बारवर ‘साऊंड सिस्टीम जप्त’ कारवाई

पुणे-रात्री 10 नंतर साऊंड सिस्टीम लावुन मोठया आवाजात संगीत वाजविणार्‍या रेस्टॉरंट अ‍ॅन्ड बारवर पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली आहे. पोलिसांनी 4 लाख रूपये किंमतीची साऊंड सिस्टीम देखील जप्त केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, येरवडा परिसरातील काही रेस्टॉरंट अ‍ॅन्ड बारमध्ये रात्री 10 नंतर मोठया आवाजात साऊंड सिस्टीम सुरू असते. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी कल्याणीनगर परिसरातील निलांजली सोसायटीतील गौरीशंकर कल्याणी बंगोल सो. ले नं. 2, सेंट्रल अ‍ॅव्हेन्यु येथील एलिफंट अ‍ॅन्ड को. रेस्टॉरंट अ‍ॅन्ड बारवर छापा टाकला. तेथे मोठया आवाजात डीजे सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी हॉटेलवर कारवाई करून तेथील 4 लाख रूपये किंमतीचे साऊंड सिस्टीम जप्त केले आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव , सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे , सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील , पोलिस अंमलदार अजय राणे, हनमंत कांबळे, अमेय रसाळ आणि अमित जमदाडे यांच्या पथकाने केली आहे.

मोबाईल हिसकावून पळविणाऱ्या टोळीला अटक, 8 गुन्हे उघडकीस

पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील युनिट-1 च्या पथकाने मोबाईल जबरदस्तीने चोरून नेणार्‍या तिघांना अटक केले असून त्यांच्याकडून 8 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे . पोलिसांनी आरोपींकडून 14 मोबाईल आणि गुन्हयात वापरलेले वाहन असा एकुण 1 लाख 91 हजार रूपयाचा ऐवज जप्त केला आहे.

धनराज शिवाजी काळुंके (21, रा. वाडेश्वर नगर, बॉलिवुड थिएटर जवळ, वडगांव शेरी ), विरेंद्रकुमार जगदीशप्रसाद प्रजापती (25, रा. ताडीवाला रोड, मेरू हॉटेल, पुणे) आणि किशोर सुरेश कोल्हे(30, रा. गवळी गल्ली, सारथी शाळेशेजारी, साईनाथनगर, वडगांव शेरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पालखी सोहळयाच्या पार्श्वभुमीवर गुन्हे शाखेतील युनिट-1 चे अधिकारी व पोलिस अंमलदार पेट्रोलिंग करून रेकॉर्डवरील गुन्हेगारांबद्दल माहिती घेतले होते. त्यावेळी पोलिस अंमलदार अनिकेत बाबर यांना काहीजण हत्ती गणपती मंदिराच्या समोरील बाळामध्ये सदाशिव पेठेत मोटारसायकलवरून येणार असून ते मोबाईलची विक्री करणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांना कळविले. त्यावेळी त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्राप्त माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचुन तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 14 मोबाईल आणि दुचाकी असा एकुण 1 लाख 91 हजार रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. आरोपींकडून विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेले 2, समर्थ पोलिस स्टेशनमधील 3, फरासखाना पोलिस स्टेशन , दत्तवाडी पोलिस स्टेशन आणि बंडगार्डन पोलिस स्टेशनमधील प्रत्येकी एक असे एकुण 8 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपी धनराज शिवाजी काळुंके हा पुणे शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द वाहन चोरीचे 6 गुन्हे दाखल आहेत.पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक ,अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलिस उपायुक्त अमोल झेंडे,सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवारयांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद,सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कवठेकर ,
पोलिस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी , पोलिस उपनिरीक्षक रमेश तापकीर,पोलिस उपनिरीक्षक अजय जाधव , पोलिस अंमलदार अनिकेत बाबर,राहुल मखरे, शशिकांत दरेकर, दत्ता सोनावणे, आय्याज दड्डीकर, अभिनव लडकत, इमरान शेख, निलेश साबळे, शुभम देसाई,आण्णा माने, तुषार माळवदकर आणि महेश बामगुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

पुण्यात गांधी दर्शन शिबीरास चांगला प्रतिसाद

सत्ता टिकवण्यासाठी तेढ निर्माण केली जातेय :डॉ.राम पुनियानी

पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार, दि. ११ जुन २०२३ रोजी आयोजित ‘गांधी दर्शन’ शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. कोथरूड येथील गांधी भवनच्या दुस-या मजल्यावरील सभागृहात हे शिबीर झाले. त्यात डॉ. राम पुनियानी,डॉ. कुमार सप्तर्षी,युवराज मोहिते या मान्यवरांनी मार्गदर्शन केले.’ गांधी और सांप्रदायिक सद्भावना’विषयावर ज्येष्ठ अभ्यासक डॉ. राम पुनियानी यांनी मार्गदर्शन केले. ‘सत्याग्रह शास्त्र’ विषयावर डॉ.कुमार सप्तर्षी,तसेच ‘गांधी-आंबेडकर विचारांचा वारसा आणि महत्व’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांनी मार्गदर्शन केले.’गांधी दर्शन’ विषयावरचे हे तिसरे शिबीर होते.

पुनियानी यांचा परिचय डॉ.कुमार सप्तर्षी यांनी करून दिला.प्रास्ताविक संदीप बर्वे यांनी केले. जांबुवंत मनोहर यांनी वक्त्यांचा सत्कार केला. दत्ता बाळसराफ,डॉ उर्मिला सप्तर्षी,अन्वर राजन,विकास लवांडे ,सुदर्शन चखाले,अप्पा अनारसे,सचिन पांडुळे,नीलम पंडित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.शिबिराला खास करून उपस्थित राहिलेल्या
राष्ट्रवादी काँग्रेस च्या नवनियुक्त कार्याध्यक्ष खा.सुप्रिया सुळे यांचा सत्कार डॉ.कुमार सप्तर्षी यांनी केला.

डॉ. पुनियानी म्हणाले, ‘धर्म कधीच धोक्यात येत नसतो, त्या त्या धर्मातील वर्चस्ववादी लोकांचे वर्चस्व धोक्यात आल्याने धर्म पुढे करून आपली सत्ता टिकवण्यासाठी धर्मा धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम केले जाते. “महात्मा गांधींनी मानवतावादी हिंदू धर्म मानला, आणि सर्व धर्मातील नैतिक मूल्ये चांगलीच असतात, हे त्यांनी जाणले, मात्र आपल्या स्वार्थी, मतलबासाठी काही वर्चस्ववादी लोक धर्माचा वापर विष कालवण्यासाठी करत आहेत.चांगल्या प्रकारची, प्रबळ लोकशाही अस्तित्वात येऊ नये आणि तळागाळातील लोकांपर्यंत लोकशाहीचा फायदा, हक्क, सत्ता लाभू नये, याचसाठी आज वर्चस्ववादी देशात धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे, असेही डॉ. पुनियानी यांनी सांगीतले..

ते म्हणाले, ‘मूलतत्ववादी धर्म मानल्याने आणि इतर धर्मांचा अनादर करीत , इतर धर्मियांवर अन्याय केल्याने आज पाकिस्तान आणि श्रीलंकेत जी अवस्था झाली, तीच अवस्था मूलतत्ववादी धार्मिक आक्रमणामुळे भारताची होऊ शकेल.भारतीय स्वातंत्र्य चळवळीतही हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग हे इंग्रजांच्या बाजूने होते आणि गांधींच्या स्वातंत्र्य लढ्याला विरोध करीत होते, या उलट महात्मा गांधी आणि काँग्रेस हे सर्व धर्मांना एकत्रित घेऊन इंग्रजांना विरोध करून स्वातंत्र्य मिळवणे, हे त्यांचे ध्येय होते’.

‘देशाचे सामुदायिक शहाणपण जिवंत ठेवण्यासाठी आणि जागे करण्यासाठी अशाप्रकारच्या गांधी दर्शन शिबीरांची आवश्यकता असते’, असे मत डॉ सप्तर्षी यांनी व्यक्त केले.ते म्हणाले,’गेल्या शतकातील दोनच गोष्टी जगभर मान्यता पावल्या आहेत, आणि ज्यांची चर्चा आजही जगभर होत असते, त्या म्हणजे एक अणुबॉम्ब निर्मिती आणि दुसरे महात्मा गांधी.महात्मा गांधी हे भारतीय विवेकाचे प्रतीक आहे. भारतीय विवेक जागा ठेवला तरच जगाचा विवेक जागा राहू शकेल,आणि त्यासाठीच गांधी विचार दर्शन हा आपल्या पुढे आदर्श आहे.’, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादीच्या नवनियुक्त कार्याध्यक्ष खा.सुप्रिया सुळे यांनी घेतले आशीर्वाद !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनियुक्त कार्याध्यक्ष खा.सुप्रिया सुळे यांनी गांधी दर्शन शिबिराच्या निमित्ताने गांधी भवन ला भेट देऊन गांधीजींच्या पुतळ्याला वंदन केले. युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी यांचे आशीर्वाद घेतले. गांधी दर्शन शिबिरात वक्त्यांचे विचार त्यांनी ऐकले. डॉ.कुमार सप्तर्षी यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन खा.सुप्रिया सुळे यांचा सत्कार केला.मागील महिन्यातही खा.सुळे यांनी गांधी भवनला भेट दिली होती. दत्ता बाळसराफ,विकास लवांडे तसेच युक्रांद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सकारात्मक आशा निर्माण करण्याचे काम ज्योतिषांनी करावे : रवींद्र प्रभुदेसाई

ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे उद्घाटन

पुणे:श्री ज्योतिष संशोधन केंद्र (जळगाव )तर्फे पुणे शहरात आयोजित ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते रविवारी,११ जून रोजी सकाळी झाले.स्वागताध्यक्षा सौ.जयश्री बेलसरे , संयोजक ज्योती जोशी, नितीन कश्यप(दिल्ली), गोविंद कुलकर्णी(ब्राह्मण महासंघ),नवीनकुमार शहा,आनंद दवे (हिंदू महासंघ),सुनील पुरोहित (मुंबई),सौ.सुनीता पागे,आदी मान्यवर व्यासपीठावर  उपस्थित होते.अभिजित प्रतिष्ठान, दि इन्स्टिट्युट ऑफ डेस्टिनी मॅनेजमेंट मुंबई,द लीला टॅरो (पुणे) व पितांबरी प्रॉडक्टस प्रा.लि. यांचे या अधिवेशनाचे सहकार्याने आयोजन करण्यात आले असून संपूर्ण महाराष्ट्रातील ३१ ज्योतिष संस्थांचा सक्रिय सहभाग यात आहे. 

 हे अधिवेशन द प्रेसिडेंट हॉटेल (प्रभात रस्ता ) येथे ११ व १२ जून २०२३ या कालावधीत सकाळी ९.३० ते सायंकाळी ६. ३० या वेळेत सुरु राहणार  आहे.अधिवेशनाचे हे तिसरे वर्ष आहे. या अधिवेशनामध्ये दोन दिवस ज्योतिष विषयक भरगच्च संवाद,विचारांची रेलचेल  आहे. मान्यवरांच्या व्याख्यानासह विविध पुरस्कारांचेही वितरण केले जाणार आहे .
‘ज्योतिष हे सर्वांना मार्गदर्शन करणारे शास्त्र आहे.सकारात्मक आशा निर्माण करण्याचे काम ज्योतिषांनी करावे,संशोधनावर भर द्यावा.अभ्यास पूर्ण करून मगच मार्गदर्शनाकडे वळावे. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना संशोधन महत्वाचे आहे. संशोधनावर भर दिला तर ज्योतिष हे जग पादाक्रांत करेल’,असे प्रतिपादन  रवींद्र प्रभुदेसाई यांनी यावेळी केले. ते म्हणाले,’ चॅट जीपीटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स पेक्षाही ज्योतिष पुढे जाऊ शकते .काळाच्या आधी आपल्याला काही गोष्टी समजू शकणार असतील आणि त्यातील ९० टक्के गोष्टी बरोबर येत असतील तर ज्योतिष हे शास्त्र म्हणून जगात पुढे नेले पाहिजे . ज्योतिष संमेलनाच्या निमित्ताने विविध गोष्टींवर उहापोह होत आहे,ही अतिशय चांगली गोष्ट आहे’.ज्योतिषशास्त्राचा प्रचार-प्रसार करण्यासाठी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असल्याची भूमिका श्री ज्योतिष संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ.सौ. ज्योती जोशी यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केली.

 ‘ज्योतिषशास्त्र अ ब क ड ‘,’अष्टकवर्ग एडव्हान्स भाग -२’,’अक्षय पात्र -२’,’लीला टॅरो -खंड ३’ या ‘पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले. अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून ज्योतिषप्रेमी व मान्यवर उपस्थित  आहेत. सौ.जयश्री बेलसरे यांनी स्वागत केले.हेमंत बर्वे यांनी सूत्रसंचालन केले,मोरेश्वर मराठे यांनी आभार मानले.यानंतर सकाळ व दुपारच्या सत्रांमध्ये ज्योतिषशास्त्रातील महत्त्वपूर्ण विषयांवर  उपस्थित   तज्ज्ञ मान्यवरांनी  ज्योतिषप्रेमींना मार्गदर्शन केले. त्यात अनिल वत्स,नितीन कश्यप ,प्रदीप पंडित,मकरंद सरदेशमुख ,नीलम पोतदार ,सौ सुनीता पागे ,जितेंद्र वझे,संतोष जोशी,आरती घाटपांडे,सुनील पुरोहित यांचा समावेश होता.
सोमवारी ज्योतिश्री पुरस्कार प्रदान सोहळा

दि. १२ जून २०२३ रोजी म्हणजे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात तज्ज्ञ मान्यवरांच्या व्याख्यानाने होईल. त्यात सिद्धेश्वर मारटकर(सत्ता संघर्ष ),आनंद घुर्ये (डिस्टन्स पामेस्ट्री ),ज्योती जोशी (‘ज्योती जोशी ज्योतिष पद्धती’),नंदकिशोर जकातदार(ग्रह गोचर),श्वेता बोकील (अ.ल.भागवत पद्धती),संजय बुधवंत(वास्तू सक्सेस चार्ट ),गौरी पोळ (कुंडली मिलनातील धोके ),सचिन बेहरे (ग्रहबल ) हे मार्गदर्शन करतील.दुपारच्या सत्रात २ वाजता काही मान्यवरांना ज्योतिष क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल ज्योतिश्री जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. त्यामध्ये विजय जकातदार ( पुणे) ,वि. श. अष्टेकर(पुणे) यांचा समावेश आहे . सौ. सुमती सावंत यांना ज्योतिश्री आदर्श महिला ज्योतिर्विद पुरस्कार, योगेश्वर गौडा ,सौ. दीपश्री जोशी याना ज्योतिश्री पुरस्कार प्रदान करण्यात येईल.यानंतर सायंकाळी ज्योतिष विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याने अधिवेशनाचा समारोप होईल.अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी सायंकाळी ४ वाजता डॉ.मधुसूदन घाणेकर अतिथी म्हणून उपस्थित राहतील तर आदिनाथ साळवी अध्यक्षस्थानी असतील.

संजय राऊतांचा नीतेश राणेंविरोधात अब्रुनुकसानीचा दावा; 4 जुलैला शिवडी कोर्टात सुनावणी

मुंबई- खुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते नीतेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. संजय राऊतांनी नीतेश राणेंना नोटीस पाठवली आहे. यावर आता 4 जुलैरोजी शिवडी कोर्टात सुनावणी होणार आहे.नीतेश राणेंना कोर्टात आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. त्यामुळे नीतेश राणे व संजय राऊतांमधील वाद आता न्यायालयात पोहोचला आहे.

संजय राऊत रोज पत्रकार परिषद घेऊन शिंदे गट व भाजपवर हल्लाबोल करतात. त्याला भाजपकडून नीतेश राणेंच्या माध्यमातूनही राऊत यांच्यावर आक्षेपार्ह शब्दातील वाक्ये वापरत हल्ला केला जात आहे. नीतेश राणे संजय राऊतांचे संपूर्ण नाव घेत तसेच, राऊतांचा एकेरी उल्लेख करत सडकून टीका करत असतात. आतापर्यंत नीतेश राणेंनी संजय राऊतांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आतापर्यंत संजय राऊतांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिलेले नाही. नीतेश राणेंचा उल्लेख करणेही संजय राऊत टाळतात. आता मात्र संजय राऊतांनी नीतेश राणेंविरोधात थेट कायदेशीर कारवाई करण्याचा पवित्रा घेतला आहे. याचे पुढे काय होते?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.दरम्यान, राऊतांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्यावर आता भाजप नेते, शिंदे गट देखील तसेच पाऊल उचलण्याची शक्यता आहे. दरम्यान, नीतेश राणेंविरोधात आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी देखील दावा दाखल केला होता.

आतापर्यंत नीतेश राणेंनी संजय राऊतांवर अनेकदा वादग्रस्त टीका केली आहे. नीतेश राणेंनी संजय राऊतांची तुलना गौतमी पाटीलशी केली होती. नीतेश राणे म्हणाले होते, संजय राऊत हे महाविकास आघाडीची गौतमी पाटील आहे. गौतमी पाटील ज्याप्रमाणे लोकांची करमणूक करते. त्याचप्रमाणे संजय राऊत रोज सकाळी टीव्हीवर येऊन आपणही लोकांचे करमणूक करत असल्याचा दावा करतात. माझी गौतमी पाटील यांना विनंती आहे की, त्यांनी आपल्याकडील थोडे पावडर व मेकअपचे सामान संजय राऊतांना पाठवून द्यावे. संजय राऊतांना ते कामी येईल. थोडासा चेहरा चांगला होईल. तसेच, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी चाटूगिरीमध्ये पीएचडी केली आहे. त्यामुळेच सध्या ते रोज सकाळी टीव्हीवर येऊन काँग्रेसची भूमिका मांडत आहेत, असा हल्लाबोलही नीतेश राणेंनी केला होता.दंगलींचे मास्टरमाईंट हे कलानगर येथे बसलेले असल्याचा आरोप नीतेश राणे यांनी केला होता. तसेच, राऊत हे मुस्लिम लीगचे प्रवक्ते असल्याचा टोलाही राणेंनी लगावला होता. या सर्व आरोपांविरोधात संजय राऊतांनी आता नीतेश राणेंविरोधात कोर्टात धाव घेतली आहे.

पुणे – सातारा महामार्गावर कापूरहोळजवळ अपघात, 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 23 जण गंभीर

पुणे- पुणे – सातारा महामार्गावर कापूरहोळजवळ वरवे गावाच्या हद्दीत तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. एक खासगी बस, एक शिवशाही व एका कंटेनरची एकमेकांना जोरदार धडक बसली. यात खासगी चार बसमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, 23 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहितीही समोर आली आहे.आज सकाळी साधारण 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. वाहनांची धडक एवढी भीषण होती की, यामध्ये खासगी बस पूर्ण उलटली आहे. याच बसमधील चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, 23 जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातात एसटीच्या शिवशाही बसचेही मोठे नुकसान झाले आहे.महामार्ग पोलिसांनी या अपघाताबाबत माहिती दिली आहे की, ही वाहने पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना हा भीषण अपघात झाला आहे. पुण्याच्या दिशेने येत असलेल्या कंटेनरला खासगी बसने मागून जोराची धडक दिली. या धडकेत बस उलटली. बस उलटल्यामुळे बसमधील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी आहेत. याचवेळी मागे असलेल्या शिवशाही बसचीही कंटेनरला धडक बसली. एक कार देखील कंटेनरला मागून धडकली. मात्र, कारमधील प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.

दरम्यान, सातारा रस्त्यावर या अपघातामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासाभराच्या प्रयत्नानंतर वाहतूक कोंडी सोडवण्यात पोलिसांना यश आले. हा अपघात एसटीच्या भोर आगाराच्या हद्दीमध्ये घडला असून आगारातील एसटीचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहे.

सरकारी योजना लोकांपर्यंत पोहचणे आवश्यक; हे काम केंद्रिय संचार ब्यूरो करत आहे, याचे समाधान: चंद्रकांत पाटील


पुणे, 11 जून 2023

सर्वसामान्यांना सुखी, आनंदी व मुख्यत: सुरक्षित करण्यासाठी सरकार अनेक योजना आणत आहे, परंतु माहिती अभावी त्यास प्रतिसाद मिळत नाही. केंद्रिय संचार ब्यूरोचे अभिनंदन की जनतेपर्यंत सरकारच्या योजनांची माहिती पोहचविण्याची ही संधी त्यांनी शोधली, असे मनोगत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मांडले.पुणे येथील केंद्रिय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालयच्यावतीने आयोजित फिरत्या मल्टिमिडीया वाहन प्रदर्शनाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

वारी डोंबात चालणारा लाखोंच्या समुदायाला ही दृश्य स्वरूपातील माहिती चांगली कळेल. योजनांची अंमलबजावणी व माहिती अभावी त्यास मिळणारा अल्प प्रतिसाद यासाठी असे उपक्रम उपयोगी ठरतात. योजनांची लोकांना माहिती व्हावी, त्यासाठी त्यांनी नोंदणी करावी, वारीमध्ये सहभागी झालेली ग्रामीण जनता आपापल्या तहसीलदार, तलाठी यांना योजनांच्या अंमलबजावणीकरीता विचारणा करेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त केंद्र सरकाचे ९ वर्षातील कार्य व प्रमुख योजनांची माहिती देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे ते पंढरपूर, दोनही मार्गांवर एक-एक वाहन प्रवास करणार आहे. 

विभागीय आयुक्त कार्यालय (विधानभवन) येथे हा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, उपायुक्त (सामान्य प्रशासन) वर्षा लढ्ढा, तहसीलदार मनीषा देशपांडे, केंद्रिय संचार ब्यूरो, पुणेचे उपसंचालक निखिल देशमुख, व व्यवस्थापक डॉ. जितेंद्र पानपाटील, तसेच इतर संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या विविध विकासात्मक उपक्रमांची माहिती, कलापथके सांस्कृतिक सदरीकरणातून देणार आहेत. मनोरंजन करत अभंग, गीते, नृत्य अशा माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार आहे. शिवाय पुण्यात पालखी दाखल झाल्यापासून ते पंढरपूरपर्यंत जाणाऱ्या या वाहनांमध्ये एलइडी स्क्रीन लावण्यात आली आहे. यावर सरकारी योजनांची माहिती देणारे व्हिडिओ प्रसारित केले जातील. विविध संतावर अधारित  भक्तीपर चित्रपट देखील यामध्यमातून दाखविण्यात येणार आहेत.

या फिरत्या प्रदर्शनास वारकरी आणि भाविकांनी भेट द्यावी, असे आवाहन केंद्रिय संचार ब्यूरोचे उपसंचालक निखिल देशमुख यांनी केले आहे.

दुरांतो एक्सप्रेसमध्ये,कमरेच्या पट्ट्यात दडवलेले पावणेआठ कोटीचे सोने पकडले; दोघांना अटक

पुणे- बांगलादेशातून तस्करी करून आणण्यात आले सोने कोलकाता ते नवी दिल्लीला नेले जात आहे, या माहिती वरून सीमाशुल्क विभागाने पाटणा जंक्शन येथे NDLS दुरांतो एक्सप्रेस ट्रेनमधून दोन जणांना पकडले. त्यांच्या कमरेच्या पट्ट्यात एकूण 12.57 किलो सोने,7,72,61,125/- किमतीचे जप्त करण्यात आले 
 

डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटनेकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिष्टचिंतन

पुणे – महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा काल अभिष्टचिंतन सोहळा पार पडला असून चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अभिष्टचिंतनाच्या दिवशी हारतुरे न आणता आरोग्य सेवेसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. या प्रसंगी डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष राजा माने, राज्य कार्यकारिणीचे महेश कुगांवकर, शामल खैरनार, केतन महामुनी, माऊली म्हेत्रे, पुणे जिल्हाध्यक्ष अजिंक्य स्वामी, पुणे शहराध्यक्ष महेश टीळे-पाटील, कार्याध्यक्ष विनायक बेदरकर या सर्व मान्यवरांनी कोथरूड जनसंपर्क कार्यालय येथे चंद्रकांत पाटील यांची भेट घेत अभिष्टचिंतनानिमित्त विठ्ठल रुख्मिणीची मूर्ती व महेश टीळे-पाटील यांनी लिहिलेले ‘महाराष्ट्राचे जायंट किलर’ हे पुस्तक देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, या प्रसंगी राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, प्रसिद्ध अभिनेते अभय चव्हाण, ट्रेटापॅकचे भगवान माने इ. मान्यवर देखील उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे मान्यवरांकडून अभिष्टचिंतन

पुणे-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा काल १० जून रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. पुणे जिल्ह्यातून सर्वच स्तरातून नामदार पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. शुक्रवारी रात्री कोथरूड मधील निवासस्थानी अनेक दिग्गज मान्यवरांनी नामदार पाटील यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. तर शनिवारी सकाळपासून कार्यकर्त्यांकडून नामदार पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नामदार चंद्रकांतदादा पाटील दरवर्षी आपला वाढदिवस पाश्चात्य संस्कृतीला फाटा देऊन सामाजिक बांधिलकी राखून साजरा करतात. यंदा त्यांनी आपला वाढदिवस आरोग्य सेवेसाठी समर्पित केला होता. त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांनाही आवाहन केले होते की, वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ अथवा भेट वस्तू न देता, आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांच्या सेवेसाठी आर्थिक मदत करावी.

नामदार पाटील यांच्या आवाहनाला कार्यकर्त्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. भाजपाच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आरोग्य सेवेसाठी आर्थिक मदतीचे धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केले. तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून ही नामदार पाटील यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.

राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, आ. माधुरीताई मिसाळ, अश्विनी जगताप, भीमराव तापकीर, रविंद्र धनगेकर, भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, धीरज घाटे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, हेमंत रासने, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त सोहेल शर्मा, वाहतूक पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दीपक मानकर, वाहतूक पोलीस आयुक्त विजय मगर यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

तसेच आरोग्य सेवेसाठी मदतीचे धनादेश नामदार पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. या सर्वांचेही नामदार पाटील यांनी आभार मानले. तसेच जनसेवेसाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही यानिमित्ताने दिली.

‘कमवा आणि शिका’ योजनेच्या अंलमबजावणीसाठी लवकरच नवे धोरण-पालकमंत्री

पुणे: यशस्वी स्किल्स सोबत इतरही संस्थांना ‘कमवा आणि शिका योजना’ राबविता यावी यासाठी लवकरच धोरण आणले जाईल आणि त्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येईल. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव या योजनेला देण्याचा मानस आहे. यशस्वीने या योजनेचे आदर्श मॉडेल तयार करावे आणि उद्योगांनी योजना राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

हॉटेल जेडब्ल्यु मेरिएट येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि यशस्वी स्किल्स लि. तर्फे आयोजित ‘कमवा आणि शिका’ योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार राजेश टोपे, तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, यशस्वी ग्रुपचे चेअरमन विश्वेश कुलकर्णी, प्रतापराव पवार, राजेश पांडे, टाटा मोटर्सचे व्यवस्थापन सल्लागार गजेंद्र चंदेल आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात व्यवसायाभिमुख शिक्षणाला महत्व दिले आहे. जीवनाला उपयोगी पडणारे शिक्षण आणि कौशल्य शिक्षणावर भर या धोरणाचा गाभा आहे. मातृभाषेतून शिक्षण हा त्यातील तेवढाच महत्वाचा भाग आहे. विषयाची समज येण्यासाठी आणि संशोधनाच्यादृष्टीनेही मातृभाषेतील शिक्षणाला महत्व आहे. देशात पाश्चात्य देशांच्या तुलनेत संशोधनाचे प्रमाण कमी असून ते वाढविण्याची गरज आहे. म्हणून शासनाने नवीन शैक्षणिक धोरणाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे.

शासनाने कौशल्य विकास विद्यापीठ स्थापनेचा निर्णय घेतला. या विद्यापीठाच्या माध्यमातून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम राबविण्याचा प्रयत्न आहे. तसेच राज्यातील शिक्षण संस्थांनी कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम सुरू करावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत. पुढील वर्षापासून कौशल्य विकासाला चार क्रेडीट पॉइंट ठेवण्यात येणार असून ते पदवी मिळविण्यासाठी बंधनकारक ठेवण्यात आले आहेत. तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांनी उद्योगांसमवेत बैठक घेऊन अभ्यासक्रमात आवश्यक बदल करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

माजी मंत्री श्री.टोपे म्हणाले, ‘कमवा आणि शिका’ योजनेला शासनाने अधिक व्यापक स्वरुप दिले आहे. एकीकडे सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या वाढते आहे, रोजगाराचा मोठा प्रश्न शिक्षण क्षेत्रासमोर उभा आहे. या आव्हानावर उपाय शोधणे गरजेचे होते. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण न घेतल्याने रोजगार मिळविता येत नाही ही दुसरी बाजू आहे. या दोन्ही प्रश्नांची सोडवणूक या योजनेच्या माध्यमातून करता येणे शक्य आहे. उद्योग जगतालादेखील स्पर्धात्मक युगात कमी खर्चात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे दोन्ही घटकांना या योजनेच्या माध्यमातून लाभ होणार आहे.

डॉ.मोहितकर म्हणाले, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी राज्यपातळीवर सुरू करण्यात आली आहे. ‘कमवा आणि शिका’ योजना सुरूवातीच्या काळात ५ अभ्यासक्रमासाठी सुरू केली होती. त्यात वाढ करून १९ अभ्यासक्रमांनी ही योजना सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या धोरणानुसार याचा अभ्यासक्रम निर्धारीत करण्यात येणार आहे. शिकत असतानाच उद्योगांना अपेक्षित अभ्यासक्रमाची पदविका विद्यार्थ्यांना मिळविता येणार आहे. उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन आणखी अभ्यासक्रमाची भर घालण्याची शासनाची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थी आणि उद्योग अशा दोघांनी या योजनेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. उद्योगांनी या विद्यार्थ्यांची नीट काळजी घेऊन त्यांच्या प्रगतीला हातभार लावावा. या योजनेबाबत जागरुकता आणण्याचा प्रयत्न करावा. या योजनेच्या माध्यमातून चांगले व्यक्तिमत्व तयार होतील, असेही ते म्हणाले.

श्री.पवार म्हणाले, युवकांमधील गुणवत्तेचा शोध घेऊन त्यांना प्रशिक्षण देणे गरजचे आहे. देशाची प्रगती साधण्याची क्षमता युवकांमध्ये निर्माण करण्यासाठी असे उपक्रम आवश्यक आहेत. समजाच्या प्रगतीसाठी अशा उपक्रमात शासन आणि उद्योगांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे.

श्री.चंदेल म्हणाले, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून जीवन कौशल्ये देण्यात आली तर ते चांगल्या उत्पादनाचा विचार करू शकतील आणि जीवनात यशस्वी होतील. उद्योगांसाठी ही एक चांगली संधी असून शासनाच्या प्रयत्नांना उद्योगांनी समाजाप्रती जबाबदारी म्हणून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कामगार विषयक कायद्याचे तज्ज्ञ ॲड.आदित्य जोशी यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. शासनाने योजना आखताना विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार केला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आठव्या संशोधन पुस्तिकेचे आणि न्यूज लेटरच्या पुणे चॅप्टर १३ व्या आवृत्तीचे प्रकाशन पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.

तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले दर्शन 

नांदेड : केंद्रीय गृह  व  सहकार मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे जाऊन गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले.

तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने त्यांचा पारंपरिक पद्धतीने केसरी चोला, पगडी, शिरोपा देवून सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे मुख्य प्रशासक डॉ. पी. सी. पसरीचा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान केंद्रीय मंत्री श्री. शाह यांचे काल दुपारी येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनीही त्यांचे स्वागत केले.

यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार प्रविण दरेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. एस. एम. महावरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले, मनपा आयुक्त महेश डोईफोडे, संजय कोडगे, व्यंकटराव गोजेगावकर, चैतन्यबापू देशमुख, संतुक हंबर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तुळजाभवानी मातेच्या खजिन्यात शनिवारी ३५४ हिरे

तुळजापूर‎-तुळजाभवानी मातेच्या खजिन्यात शनिवारी ३५४ हिरे आढळून आले ‎ ‎ आहेत. या शिवाय एक रत्नजडित ‎ ‎ मंगळसूत्र ही आढळले. आतापर्यंत ‎ ‎ मातेला भाविकांनी वाहिलेल्या तसेच ‎ ‎ मोजणी झालेल्या २०७ किलो ४८०‎ ग्रॅम सोन्याचे वजन करण्यात आले‎ आहे. या सोन्याची प्रत्येकी पाच‎ किलोचे पाकिटे करून तीन‎ पेट्यामध्ये भरून ठेवत त्या सील‎ करण्यात आल्या आहेत.‎गेल्या चार दिवसांपासून देवीला‎ भाविकांनी वाहिलेल्या‎ सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मोजणी‎ करण्यात येत आहेत. चौथ्या दिवशी‎ सकाळी धार्मिक विभागाच्या‎ ‎ काउंटर पेटीत १८ जानेवारी ते ०९‎ जून २०२३ या कालावधीतील सोने -‎ चांदीची मोजणी करण्यात आली.‎ यामध्ये सोन्याची ४५६ पाकिटे व‎ चांदीची २५२ पाकिटाची मोजणी‎ करण्यात आली. यामध्ये ७ किलो‎ २७० ग्रॅम सोन्याचे वजन भरले.‎ रविवारी मोजणी बंद राहणार असून‎ सोमवारी पुन्हा मोजणीस प्रारंभ‎ होणार आहे.‎

२९.३६० कॅरेटचे ३५४ हिरे आढळून आले आहेत. त्याच बरोबर‎ रत्नजडित मंगळसूत्र मिळाले असून ते ४.८९ कॅरेटचे आहेत.‎ याची किंमत अद्याप ठरली नसून यासाठी सोलापूर येथील‎ जाणकारास मूल्यनिर्धारण करण्यासाठी बोलावण्यात येणार‎ असल्याची माहिती मिळाली.‎

पंढरीच्या वारकऱ्यांची सेवा पांडुरंगाच्या सेवेसमान

‘सिंबायोसिस’ आणि सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने फिरता वारकरी दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ

पुणे : “ज्ञानोबा-तुकोबाची पालखी खांद्यावर घेऊन टाळ-मृदूंगाच्या नादात, विठू नामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला गेल्या २३ वर्षांपासून मिळत आहे. पायी वारीत चालून थकलेल्या, शीणलेल्या वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्याचा हा उपक्रम अव्याहतपणे सुरु राहावा,” अशी भावना ‘सिंबायोसिस’चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केली.
सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त फिरता वारकरी दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ शनिवारी झाला.
सेनापती बापट रस्त्यावरील ‘सिंबायोसिस’च्या आवारात झालेल्या या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ विचारवंत उल्हासदादा पवार, पुणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, ‘सिंबायोसिस’च्या विश्वस्त संजीवनी मुजुमदार, सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक माजी नगरसेवक ऍड. अविनाश साळवे, सिंबायोसिस’च्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर,  महापालिकेचे आरोग्य प्रमुख भगवान पवार, शांतीलाल भटेवरा, ऍड. प्रतापसिंह परदेशी, अक्षय साळवे, निवेदिता एकबोटे, राधिका धिंग्रा आदी उपस्थित होते.
डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, “राज्यभरातून वारकरी आळंदी व देहूमध्ये दाखल झाले आहेत. पंढरीच्या दिशेने चालताना त्यांची सेवा करण्याची संधी हा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. परदेशातून, परप्रांतातून आलेल्या विद्यार्थ्यांना हा अनुभव समृद्ध करणारा असतो.”


कुणाल खेमनार म्हणाले, “सकारात्मक ऊर्जा देणारा हा उपक्रम अविरतपणे सुरु आहे. वारकरी सेवेचे हे व्रत इतरांसाठीही प्रेरक आहे. वारकऱ्यांचे दुःख हलके करण्याचे, त्यांना वारीत चालताना अडचणी येऊ नयेत, यासाठी औषधे व आरोग्य सेवा देण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे.”

उल्हासदादा पवार म्हणाले, “वारी हा विचार, विवेक व वैराग्य याचा त्रिवेणी संगम आहे. या संगमात चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा ईश्वरभक्तीची अनुभूती देते. हे पुण्याचे काम या दोन्ही संस्था एकत्रितपणे गेली २३ वर्षे करत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे.”
दहा ऍम्ब्युलन्स, ५ दुचाकी देणार सेवा“संतसेवेचा हा उपक्रम २००१ मध्ये एक अँब्युलंसपासून सुरु केला. यंदा १० सुसज्ज मोठ्या अँब्युलंस, पाच दुचाकी अँब्युलंस व ३०० हुन अधिक डॉक्टर्स, नर्स आणि स्वयंसेवकांची टीम देहभान हरपून यामध्ये काम करते. वेदनाशामक गोळ्या, औषधे, प्रथमोपचार यासह तातडीची आरोग्य सेवा व आपत्कालीन सेवेसाठी ही सज्ज असते. पुण्यापासून जेजुरीपर्यंत हा फिरत वारकरी दवाखाना कार्यरत असेल. ही वारकरी आरोग्य सेवा अव्याहतपणे शेकडो वर्ष चालेल, असा विश्वास देतो,” असे ऍड. अविनाश साळवे प्रास्ताविकात सांगितले.

भाजपकडून पानशेत पुरग्रस्तांवर नऊ वर्षांपासून अन्यायच,निवडणुकीच्या भितीपोटी काढला आदेश – मोहन जोशी

पुणे : “पानशेत पूरग्रस्तांना ते राहात असलेल्या जागा त्यांच्या मालकीची करुन देण्यासाठी काँग्रेस पक्षाने २०१४ मध्ये निर्णय घेतला होता. परंतु, भाजप सरकारने ९ वर्षे त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे पानशेत पुरग्रस्तांवर भाजप सरकारने अन्यायच केला आहे.” अशी टिका प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली.

याविषयी जोशी म्हणाले, “पानशेत पुरग्रस्तांचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे. पुरग्रस्त राहात असलेली घरे त्यांच्या मालकी हक्काने देण्यासाठीचा प्रश्न होता. काँग्रेस पक्षाने या प्रश्नाची दखल घेत पाठपुरावा केला होता. त्यामुळे विकास देशमुख हे जिल्हाधिकारी असताना पुरग्रस्तांच्या बैठ्या घरांमधील रहिवाशांना जागेचा मालकी हक्क देण्याचा निर्णय घेण्यात आला होता व तशी प्रमाणपत्रे देखील देण्यात आली होती. त्यानंतर पुरग्रस्त १०३ सोसायट्यांना देखील मालकी हक्क मिळावा, त्यांच्यासंबंधीच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यात याव्यात, यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे २०१४ मध्ये तत्कालीन महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुरग्रस्त सोसायट्यांमधील रहिवाशांना जागा त्यांच्या मालकी हक्काने देण्याचा निर्णय घेतला होता.” असे मोहन जोशी म्हणाले.

पुरग्रस्तांवर भाजपने अन्याय केला असल्याची टिका करत मोहन जोशी पुढे म्हणाले, “२०१४ मध्ये राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर भाजप सरकारने पानशेत पुरग्रस्तांसंबंधीच्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे गरजेचे होते. मात्र तसे घडले नाही. नऊ वर्ष भाजप सरकारने पानशेत पुरग्रस्तांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार केला आहे. नऊ वर्ष निर्णयाची अंमलबजावणी न करता पुरग्रस्तांवर अन्याय केला आहे. कसबा विधानसभा निवडणूकीमध्ये काँग्रेस विजयी झाल्यामुळे भाजपला आपली चुक कळली आहे, त्यामुळे भविष्यातील निवडणुकांमध्ये आपल्याला पुरग्रस्तांचा चांगलाच फटका बसू शकतो, हे लक्षात आल्यामुळेच त्यांनी आता पुरग्रस्तांबाबत तातडीने आदेश दिले आहेत. मात्र अशा प्रकारे भाजपने नऊ वर्ष पुरग्रस्तांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचा केलेला प्रकार दुर्दैवी आहे.” असे मोहन जोशी म्हणाले.

याची पार्श्वभूमी सांगताना मोहन जोशी म्हणाले की, पुण्यात पानशेत धरण फुटण्याची घटना १२ जुलै १९६१ या दिवशी घडली. त्यामुळे आलेल्या पुरामध्ये पुण्याच्या मध्यवर्ती भागातील हजारो कुटुंबीयांची घरे, दुकाने पुराच्या पाण्यात गेली. त्यामुळे तत्कालीन सरकारने पुरग्रस्तांसाठी दत्तवाडी, राजेंद्रनगर, पर्वती दर्शन, सहकारनगर, शिवदर्शन, एरंडवणे, जनवाडी, गोखलेनगर, महर्षीनगर अशा ठिकाणी घरे बांधून दिली होती. संबंधित घरे ९९ वर्षांच्या कराराने भाडेतत्वावर देण्यात आली होती. मात्र हि घरे मालकी हक्काने मिळावीत यासाठी पुरग्रस्त नागरीक लढा देत होते. आता काँग्रेसने घेतलेल्या निर्णयाची भाजप सरकारने तब्बल ९ वर्षांनी अंमलबजावणी केली हेही नसे थोडके! असे मोहन जोशी शेवटी म्हणाले.