Home Blog Page 1499

आरोग्यवारी ही माणसातल्या ईश्वराची सेवा-पालकमंत्री

पुणे, दि.१०: संतांनी माणसातला देव ओळखण्याचा संदेश मानवजातीला दिला असून आरोग्यवारीच्या माध्यमातून माणसातल्या ईश्वराची सेवा घडते, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

निवडुंग विठोबा मंदिर येथे राज्य महिला आयोग आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्यवारी अभियानाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार रविंद्र धंगेकर, मनपा अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, महिला आयोगाच्या सदस्य संगिता चव्हाण, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, राज्य महिला आयोगाने अतिशय संवेदनशीलतेने हा उपक्रम सुरू केला आहे. मासिक पाळीसारख्या विषयाकडे बघण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनामुळे याबाबतची समस्या मांडताना मनात संकोच असतो. त्यामुळे महिलांची ही समस्या लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या सहकार्याने सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. समाजाच्या सहकार्याने शहरात अनेक ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणारे यंत्र बसविण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

पुणे शहरात जागा उपलब्ध झाल्यास सामाजिक उत्तरदायित्व निधीतून तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात येईल. महिलांच्या सुरक्षेच्या विषयावर लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले. वारीत स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवेचे त्यांनी विशेष कौतुक केले.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या, साधुसंतांच्या विचारधारा हे महाराष्ट्राचे वैभव आहे. पंढरपूर वारीच्या निमित्ताने हा विचार सर्वत्र पोहोचतो. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या महिलांची संख्या वाढते आहे. वारीदरम्यान महिलांना २३ ते २४ दिवस चालावे लागते. या कालावधीत त्यांना एकदा तरी मासिक पाळीला सामोरे जावे लागते. त्यांची ही समस्या लक्षात घेऊन आरोग्यवारी अभियान सुरू करण्यात आले आहे.

वारी दरम्यान महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनची व्यवस्था करण्यात आली आहे. स्तनदा मातांसाठी वारी मार्गावर हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. महिलांसाठी स्वतंत्र डॉक्टर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी ‘१०९१’ टोल फ्री क्रमांक आणि पिवळ्या रंगाच्या दुचाकीवर मदतीसाठी दूतांची व्यवस्था केली आहे. महिला वारकऱ्यांच्या हस्ते १५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. महिलांच्या आरोग्यासोबत त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपा ठाकूर यांनी प्रास्ताविकात आरोग्यवारी अभियानाची माहिती दिली. वारी सोहळ्यादरम्यान महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते आरोग्यवारी अभियान आणि महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कक्षाचे उदघाटन करण्यात आले.
0000

पुणे

पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त रामोड यांना १३ जूनपर्यंत कोठडी; घर, कार्यालयातून ६ कोटी ६४ लाख रुपये जप्त

पुणे : पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए एस वाघमारे यांनी १३जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. सीबीआयने तपासादरम्यान घर व कार्यालयातून ६ कोटी ६४ लाखांची रोकड जप्त केली आहे.त्यांच्या कार्यालयालयात १ सीलबंद आयफोन आढळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे. तक्रादार व आरोपी यांमध्ये झालेले संभाषण रेकॉर्ड झाले आहे.

त्यामध्ये आरोपीने पैसे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहे. चौकशीसाठी रामोड सहकार्य करत नसून उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी सरकारी वकील अभय अरीकर यांनी ५ दिवसांची सीबीआय कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने मान्य करत तीन दिवसांची कोठडी सुनावली. सीबीआयचे अतिरिक्त अधिक्षक आय बी पेंढारी यांनी त्याला न्यायालयात हजर केले.

सीबीआयचे वकील अभय अरिकर यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, आरोपींकडे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील महामार्ग लगत भूसंपादन मोबदला देण्याचा अधिकार होता. केंद्र सरकारने 2016साली आळंदी पंढरपूर महामार्ग प्रस्तावित केला होता. या महामार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी तक्रारदार शेतकरी यांची जमीन जाणार होती त्या बदल्यात सरकारने देऊ केलेल्या मोबदल्यापेक्षा अधिक रक्कम मिळावी यासाठी संबंधित शेतकऱ्याने अधिक रक्कम मिळावी याकरीता त्यांनी लवादकडे दाद मागितली होती.

त्याचा गैरफायदा घेत डॉ. रामोडनी संबंधित प्रकरणाची लावदामार्फत सुनावणी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली पण 21 एप्रिल 2023 रोजी प्रकरण सुनावणीस घेण्यात आले. तक्रारदार यांना अधिकचा सव्वा कोटी रुपयांचा मोबदला देण्याचे निश्चित केले.मात्र, यापैकी दहा टक्के रक्कम म्हणजेच दहा लाख रुपये द्यावे लागतील असे सांगण्यात आले होते. त्यामुळे संबंधित रक्कम कमी करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्याच्या वकिलाने अतिरिक्त विभागीय आयुक्त यांच्याकडे केली होती. तडजोडीअंती आठ लाख रुपये देण्याचे निश्चित झाले होते.

मात्र, या संदर्भात शेतकऱ्यांच्या वकिलांनी सीबीआय एसीबीकडे लेखी तक्रार दाखल केली होती.त्यानुसार आरोपीला आठ लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. आरोपीकडे सीबीआयने चौकशी केली असता त्याने चौकशी सहकार्य न करता उडवाउडवीची उत्तरे दिलेली आहे.आरोपी डॉ. रामोड यांचे वतीने वकील सुधीर शाह यांनी प्रतिवाद केला.

बांधकामप्रकल्पाच्या प्रवेशद्वाराची कमान कोसळून 7 वर्षाचा मुलाचा मृत्यू

ठेकेदारासह दोन कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे-वाघोली परिसरात एका नवी बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पाची प्रवेशद्वाराची कमान कोसळून सात वर्षांच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या दुर्घटनेस जबाबदार ठरवून ठेकेदारासह दोन कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.

या घटनेत अर्णव मिथीलेश राय (वय- 7, सध्या रा. गुलमोहोर सोसायटी, वाघोली, नगर रस्ता,पुणे) असे मयत मुलाचे नाव आहे. अर्णवचे वडील मिथीलेश राय (वय- 36) यांनी याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ठेकेदार सिराज मुल्ला, कामगार दाजीज इबन खान, रामप्रवेश राधेशाम राय (रा. पोरवाल रस्ता, लोहगाव,पुणे) या आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे – अहमदनगर रस्त्यावरील वाघोलीतील नियोजित गुलमोहोर सोसायटीच्या आवारातील प्रवेशद्वार बांधकामाचे काम ठेकेदार सिराज मुल्ला याने घेतलेले आहे. प्रवेशद्वाराचे काम निकृष्ट केल्याने अचानक कमान कोसळली गेली. यावेळी कमानीचा काही भाग तेथे थांबलेला अर्णव राय याच्या अंगावर खेळत असताना कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता,उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे याबाबत पुढील तपास करत आहेत.

टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

पुणे, दि.१० : ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका… अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावेळी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

देहू येथील जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिरात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सपत्निक पादुकांचे पुजन आणि आरती केली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे, बारामती हाय-टेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार आदी पूजेला उपस्थित होते.

पूजेनंतर उपस्थित सर्वजण वारकऱ्यांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले. यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे, संतोष मोरे, विशाल मोरे, संस्थांचे विश्वस्त संजय मोरे, भानुदास मोरे, अजित मोरे आदी उपस्थित होते.

महापूजेनंतर पालखीने इनामदारवाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले.

मान्सून आला रे…48 तासांत जलधारा बरसण्याची शक्यता

Latest, VSCS Biparjoy at around 620 kms from Mumbai …
Good its sufficiently far off from the coast.
मुंबईपासून सुमारे 620 किलोमीटरवर VSCS बिपरजॉय… ते किनार्‍यापासून पुरेशा दूर आहे.

पुणे-केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने अखेर कर्नाटकात मुसंडी मारली असून, तो येत्या 48 तासांत महाराष्ट्रात येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.मान्सूनने आज पश्चिम किनारपट्टीवरच्या कर्नाटकातल्या कारवारपर्यंत मजल मारली आहे.येणाऱ्या दोन दिवसांत गोवा आणि महाराष्ट्राचा काही भाग व्यापण्याची शक्यता वर्तवली जातेय.

यंदा मान्सूनची गाडी केरळात लेट पोहचली. नियोजित वेळेपेक्षा आठवडाभराचा विलंब झाला. त्यामुळे दुष्काळाची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, आता लांबलेल्या मान्सूनने कर्नाटकचा काही भाग, बंगालच्या उपसागरात प्रवेश केला आहे. आता येणाऱ्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्राची किनारपट्टी, गोवा, अरबी समुद्राचा मध्य भाग मान्सूने व्यापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोकणात शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.पुण्यात पाचच्या सुमारापर्यंत आकाशात ढग नव्हते. मात्र, सायंकाळी ढगांनी गर्दी केली. गेल्या दोन-चार दिवसांपासून उष्णता वाढली होती.

यंदा देशभरात पाऊस कमी होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सोबत हवामान खात्याचीही ही अंतर्गत माहिती असल्याचे समजते. त्यात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, केरळ, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यांसह इतर चार केंद्र शासित प्रदेशामध्ये मान्सून गुंगारा देण्याची भीती आहे. मात्र, तूर्तास तरी मान्सून दाखल होण्याची आशा निर्माण झाली आहे. आता येणाऱ्या काळात तो कसा बरसणार याची उत्सुकता लागून आहे.

अक्षय भालेराव या युवकाची हत्या सामाजिक समतेच्या विचारांचा पराभव – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

नांदेड दि. १० : बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव या युवकाची हत्या अत्यंत दुर्देवी असून सामाजिक समतेच्या विचारांचा हा पराभव असल्याची खंत केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तिकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. अक्षयच्या पीडित कुटुंबियांची  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज भेट घेऊन सांत्वन केले. शासकीय तरतुदीनुसार केंद्र सरकारच्यावतीने पीडित कुटुंबियांना ८ लाख २५ हजार रुपयांची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली.

           केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले की, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या समाजसुधारक महापुरुषांचा सामाजिक समतेचा वारसा लाभला आहे. हा समृद्ध वारसा प्रत्येक नागरिकाने अधिक जबाबदारीने जपायला हवा.

जाहीर केलेल्या मदतीतील ४ लाख १२ हजार ५०० रुपयांचा धनादेश त्यांनी यावेळी पीडित कुटुंबियांकडे हस्तांतरीत केला. या भेटीनंतर त्यांनी नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हा प्रशासनाला निर्देशही दिले. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, समाज कल्याण अधिकारी बापु दासरी, सत्येंद्र आऊलवार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पीडित कुटुंबाला पुन्हा आत्मविश्वास देऊन उभे करणे हे सर्व समाजाचे कर्तव्य आहे. याचबरोबर जिल्हा प्रशासनानेही शासन स्तरावर उपलब्ध असलेल्या तरतुदीप्रमाणे सर्वतोपरी सहाय्य केले पाहिजे. आजही या गावात जे कुटुंब भयाच्या सावटाखाली राहत आहे त्यांची इतर ठिकाणी व्यवस्था होते का हे तपासून घेण्याची आवश्यकता असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी सांगितले. या गावात पिडित व भयाच्या सावटाखाली जर कोणी कुटुंब असतील तर त्यांचे पुनर्वसनही होणे गरजेचे आहे. यादृष्टीने सिडको, मनपाची घरे अथवा बाहेरगावी त्यांच्या निवाऱ्यासाठी नियमाप्रमाणे उपलब्धतेप्रमाणे ३३ बाय ३३ आकाराचा प्लॉट / जागा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या. प्लॉट / मनपाची घरे, सिडकोची घरे यापैकी ज्या ठिकाणी नियमाप्रमाणे जे शक्य असेल त्याबाबत जिल्हा प्रशासनाने तात्काळ निर्णय घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

समाजातील सर्वच घटकांचा विकास व्हावा, ही भूमिका सामाजिक न्याय विभागाचा राज्यमंत्री म्हणून असून कमी आर्थिक उत्पन्न असलेल्या गटातील मराठा समाजालाही आरक्षण मिळावे, ही भूमिका आम्ही घेतली आहे. सर्वांनाच समान विकासाची संधी मिळावी, ही त्यामागची भूमिका आहे. महाराष्ट्रात सामाजिक न्यायासाठी सर्व समाजात परस्पर न्यायाची असलेली भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असून सामाजिक सलोखा व एकात्मता वाढवण्यासाठी सर्वांनीच अधिक जबाबदार भूमिका घेतली पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी व्यक्त केली.

लोकाग्रहास्तव सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती- शरद पवार

नवी दिल्ली:राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निर्णयाबद्दल माहिती देताना सांगितले की, खासदार सुप्रिया सुळे यांच्या पक्षाची राष्ट्रीय पातळीवरची जबाबदारी सोपविण्यात यावी अशी लोकांची मागणी होती. लोकाग्रहास्तव खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्याध्य़क्षपदी नियुक्ती करण्यात आली. सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांच्या खांद्यावर महाराष्ट्रासह, हरियाणा आणि पंजाब या राज्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये पक्षाची ताकद वाढावी म्हणून हा बदल करण्यात आल्याचे पवार म्हणाले. लोकांना परिवर्तन हवं आहे, असेही ते म्हणाले. शरद पवार यांनीयांनी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांना उत्तरे दिली .पक्षात एकाच वेळी दोन कार्याध्यक्ष का नेमले गेले, असा सवाल शरद पवार यांना पत्रकारांनी विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना पवार म्हणाले की, ‘देशाचा मोठा विस्तार लक्षात घेऊन दोन कार्यकारी अध्यक्ष नेमले गेले आहेत. तसेच ही निवड करताना कुठला निकष लावला गेला असाही प्रश्न त्यांना विचारला गेला. त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, अनेक लोकांची तशी मागणी होती म्हणूनच दोन कार्याध्यक्ष निवडले. अजित पवार नाराज नाहीत, असे स्पष्ट करत त्यांच्यावर राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले आहे.

सुप्रियांसह नव्या पदाधिकाऱ्यांचे अजित पवारांकडून अभिनंदन

पुणे – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्याध्यक्ष पदावर निवड केल्यावर तातडीने अजित पवार यांनी सुप्रिया यांच्या सह पटेल आणि सर्वांचे स्वागत आणि अभिनंदन करत शुभेछ्या दिल्या आहेत .दिल्लीतील कार्यक्रमातून निघून गेल्यानंतर अजित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यात अजित पवार म्हणाले की, 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…’ हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन!

सुप्रिया सुळे- प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदावर:महाराष्ट्राची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे

नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा या आधी केली होती. त्यानंतर नाट्य घडले होते. त्याचवेळी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे चर्चेत होती. अखेर दोन कार्यकारी अध्यक्ष निवडण्यात आले असून यात सुप्रिया सुळे यांचा देखील समावेश आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाब या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

सुप्रिया सुळे यांच्याप्रमाणे प्रफुल्ल पटेल यांना देखील कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पटेल आधीपासूनच राष्ट्रीय कार्यकारीणत सक्रिय आहेत. मी सुरुवातीपासून काम करत आलो आहोत, त्यामुळे माझ्यासाठी ही जबाबदारी मोठी नसल्याचे पटेल यांनी म्हटले आहे. हे पद जरी नवीन असले तरी माझ्यासाठी हे काम तेच जुने असल्याचे पटेल म्हणाले.

देशात बदलायचे एक वातावरण तयार झाला आहे. नऊ वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टी सत्तेत आले तेव्हा त्यांनी दिलेले सर्व आश्वासन पूर्ण होताना दिसत नाहीये. त्यामुळे देशातील जनता नाराज असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. यामुळे अनेक राज्यात बदलाची स्थिती असल्याचेही ते म्हणाले.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने लाच देऊन मध्य प्रदेश मधील कमलनाथ यांच्या सरकारकडून सत्ता ताब्यात घेतली, असा आरोप शरद पवार यांनी केला. त्यामुळे विरोधी पक्षातील लोक एकत्र येऊन भाजपचा सामना केल्यास देशात बदल होईल, असा मला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

देशातील जनता परिवर्तनासाठी तयार आहे. मात्र, त्यासाठी सर्वच पक्षाने एकत्र येऊन एखादा कॉमन मिनिमम प्रोग्राम आखण्याची आवश्यकता असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. देशभरात आपण लोकांसमोर असा कार्यक्रम ठेवावा आणि त्यानंतर आपल्याला नक्कीच जनता संधी देईल, असे मत पवारांनी व्यक्त केले.

तरुणांनी आपल्या कौशल्याचा समाजासाठी वापर करायला हवा -ज्येष्ठ कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. शैलेश पुणतांबेकर

पुणे : उच्च शिक्षण घेऊन परदेशी जावे आणि नावलौकिक मिळवावा, अशी अनेक तरुणांची इच्छा असते. माझीही तशीच इच्छा होती, परंतु आपल्या कौशल्याचा आपल्या लोकांना विशेषतः समाजातील गरजू लोकांना उपयोग व्हावा यासाठी मी भारतातच राहिलो. आपल्या कौशल्याचा केवळ पैसा आणि प्रसिद्धीसाठी वापर न होता तो समाजासाठी वापर व्हायला हवा तरच खऱ्या अर्थाने समाजसेवा घडेल, अशी भावना ज्येष्ठ कर्करोग शल्यचिकित्सक डॉ शैलेश पुणतांबेकर यांनी व्यक्त केली.

रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाउन तर्फे सर्वोत्कृष्ट व्यावसायिक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन एरंडवण्यातील सेवासदन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय फळणीकर, क्लबच्या अध्यक्षा माधुरी कुलकर्णी, सचिव वैशाली चिंचोरे, संचालक स्मिता शहा आदी यावेळी उपस्थित होते. दगडखाण कामगारांसाठी काम करणाऱ्या संतुलन संस्थेच्या पल्लवी रेगे आणि डॉ. शैलेश पुणतांबेकर यांना यावेळी सर्वोत्कृष्ट सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. शैलेश पुणतांबेकर म्हणाले, तुम्ही कुठे जन्म घेता? कोठे शिक्षण घेता? यापेक्षा तुमचे स्वप्न काय आणि त्यासाठी तुम्ही किती कष्ट घेता/ हे महत्त्वाचे आहे. आपण घेतलेले शिक्षण आणि त्यातून मिळालेले कौशल्य याचा आपण समाजासाठी किती उपयोग करतो यावरून आपण माणूस म्हणून जगण्यासाठी किती योग्य आहोत, हे ठरते. माझ्या शिक्षणाचा माझ्या देशातील सर्वसामान्य गरजू लोकांना उपयोग झाला हे मी माझे सुदैव समजतो.

विजय फळणीकर म्हणाले समाजामध्ये वेदना देणारे अनेक लोक आहेत. परंतु त्या वेदनेवर फुंकर घालणारे अगदी कमी लोक आहेत. फुंकर घालतानाही आपल्याला होणारे चटके सहन करत समाजासाठी योगदान देणारे लोक हे खऱ्या अर्थाने समाज घडवत असतात. आपण समाजासाठी काही केले तर समाजही त्या गोष्टीची जाणीव ठेवतो आणि त्या कामासाठी समाजही आपल्याला मदत करतो. त्यामुळे सामाजिक काम करताना जिद्द कायम ठेवली पाहिजे आणि समाजातील चांगल्या गोष्टींवर कायम विश्वास असला पाहिजे.

पल्लवी रेगे म्हणाल्या, शहरापासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या दगडखाण कामगारांमध्ये आणि शहरातील लोकांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. दगडखाण कामगार हे आजही मूलभूत गरजांसाठी झगडत आहेत. समाजातील लोकांनी त्यांना माणूस म्हणून स्वीकारावे आणि त्यांच्या विकासासाठी मदत करावी, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असेही त्या म्हणाल्या. डॉ. शुभदा जठार यांनी सूत्रसंचालन केले. माधुरी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले

 सनी लिओनीचा ” केनेडी ” चित्रपट सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित होणार !

सनीच्या केनेडी ची सिडनी वारी ! 
जिच्या फॅशन ने कान्स फेस्टिवल मध्ये अभूतपूर्व यश आणि कौतुक मिळवलं अशी अभिनेत्री सनी लिओनी ! सनी दरवर्षी विविध भूमिका साकारत असते जगभरात तिच्या कामाच्या चर्चा होत असताना ती तिचा आगामी चित्रपट केनेडी आता सिडनी फिल्म फेस्टिवल मध्ये जाऊन पोहचला आहे. केनेडी मध्ये  सनी चार्लीची भूमिका करत आहे जी भूमिका नक्कीच कमालीची आहे. 
या चित्रपटाची नुकतीच आदरणीय ज्युरींनी कान्स चित्रपट महोत्सवात मिडनाईट स्क्रीनिंगसाठी निवड केली होती. मध्यरात्रीच्या प्रदर्शनासाठी निवडलेला हा एकमेव भारतीय चित्रपट होता. या चित्रपटाने सात मिनिटांची स्टँडिंग ओव्हेशन देखील मिळवला. सनी लिओनीच्या चार्लीमध्ये केलेल्या भूमिकेचं कौतुक होतंय. कान्स पर्यंत मर्यादित न राहता हा चित्रपट  सिडनी फिल्म फेस्टिवल मध्ये दाखवला जाणार आहे. सिडनी फिल्म फेस्टीवल १४ आणि १७ जून रोजी होणार आहे. 
सिडनी फिल्म फेस्टिव्हलबद्दल अधिक बोलताना सनी सांगते ” कान्स फिल्म फेस्टिव्हल खूप यशस्वी ठरला आणि मी या साठी खूप कृतज्ञ आहे. हा चित्रपट आता  सिडनी फिल्म फेस्टिव्हल मध्ये दाखवला जाणार आहे. अनुराग सर आणि संपूर्ण टीमचे आभार मानते की यासारखा उत्तम चित्रपट मला करायला मिळाला.
केनेडीचे दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केले असून त्यात राहुल भट्ट सहकलाकार आहेत. केनेडी च्या सोबतीने सनी कडे अजून कमालीचे प्रकल्प आहेत.

महावितरणचा वर्धापनदिन; विविध कार्यक्रमांतून कर्मचारी व कुटुंबियांना मिळाली नवी ऊर्जा

पुणे, दि. १० जून २०२३: महावितरणच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त पुणे परिमंडलामध्ये कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित विविध कार्यक्रमांचा, स्पर्धांचा तसेच पाच दिवसीय सौर रथयात्रेचा समारोप शुक्रवारी (दि. ९) उत्साहात झाला. ऐरवी धकाधकीच्या वीजक्षेत्रात अविश्रांत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबिय व बालगोपाळांना विविध कार्यक्रमातून नवी ऊर्जा मिळाली.

येथील लोकशाहिर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात आयोजित समारोप कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता सर्वश्री अरविंद बुलबुले, युवराज जरग, संजीव राठोड, डॉ. सुरेश वानखेडे उपस्थित होते.

महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी पुणे परिमंडल अंतर्गत पुणे, चिंचवड व नारायणगाव येथे आयोजित कार्यक्रमांत सुमारे २२०० कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय सहभागी झाले होते. या कार्यक्रमांत महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’, रांगोळी स्पर्धा, बालकांसाठी चित्रकला स्पर्धा, जादूचे प्रयोग, पुरुषांसाठी संगीतखूर्ची, संगीतरजनी पथनाट्ये आदींचे तसेच तणावमुक्तीसाठी माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर व उपकार्यकारी अभियंता डॉ. चिदानंद फाळके (नाशिक) यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. तसेच गणेशखिंड मंडलमधील महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध ठिकाणी ‘ग्राहकसेवा हे ध्येय महावितरणचे’ या पथनाट्याचे सादरीकरण केले. विशेष म्हणजे या पथनाट्याची ध्वनिचित्रफित महावितरणच्या मुख्यालयातील वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आली.

समारोपीय कार्यक्रमात प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे व मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस प्रदान करण्यात आले. पथनाट्यातील सर्व महिला कलावतांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेता व खोखोपटू प्रतीक वाईकर, क्रिकेटपटू अजय चव्हाण, धावपटू गुलाबसिंग वसावे, पॉवर लिफ्टर मनीष कोंड्रा, जनसंपर्क अधिकारी श्री. निशिकांत राऊत यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

दरम्यान दि. ३ व ४ जून रोजी पद्मावती क्रीडांगणावर आयोजित पुरुष व महिला क्रिकेट स्पर्धेत एकूण १७ संघांनी भाग घेतला. स्पर्धेचे विजेतेपद राजगुरुनगर विभाग (पुरुष) व गणेशखिंड मंडल (महिला) संघाने पटकावले तर मंचर विभाग (पुरुष) व रास्तापेठ मंडल (महिला) संघाला उपविजेतेपद मिळाले. परिमंडलस्तरीय रांगोळी स्पर्धेत प्रथम- स्नेहा कोल्हे, द्वितीय- सुजाता शिरोडे व तृतीय- रुपाली शिवतारे तर माधुरी तिजारे, तेजश्री वाघमारे, शिवकन्या पारधे, जयश्री निकाळजे यांना उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले. बालचित्रकार स्पर्धेत प्रथम- अलफिया पिंजारी, द्वितीय- अर्णव खमितकर, तृतीय- ओवी गोगावले तर विवान सोनवणे, वैभवी परदेशी, आरोही परदेशी, आर्यन साबळे, अमन पिंजारी व पार्थ काळूमाळी यांना उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले.

समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता भागवत थेटे यांनी केले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन श्री. संतोष गहेरवार, भक्ती जोशी, कैलास कांबळे यांनी केले तर कार्यकारी अभियंता भाऊसाहेब सावंत यांनी आभार मानले. आयोजनासाठी सहायक महाव्यवस्थापक ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन) व माधुरी राऊत (वित्त व लेखा), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटनी यांच्यासह मंडलनिहाय स्थानिक समित्यांनी पुढाकार घेतला.

पाच दिवसीय सौर रथयात्रेचा समारोप- छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प, मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनसह विविध योजना व ग्राहकसेवांची माहिती देणाऱ्या पाच दिवसीय सौर रथयात्रेचा शुक्रवारी समारोप करण्यात आला. या सौर रथयात्रेने शहरी व ग्रामीण भागातील सुमारे ७० ठिकाणी जाऊन विविध माहिती दिली. संबंधित अभियंता व कर्मचाऱ्यांनी सुमारे ३५ हजार ग्राहकांशी थेट संवाद साधला व त्यांना विविध योजनांचे माहिती पत्रक दिले. समारोपीय कार्यक्रमात सौर रथयात्रेला सहकार्य करणाऱ्या ‘मास्मा’चे अध्यक्ष रोहन उपासनी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पुण्यात होणाऱ्या जी-20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर सायकल फेरीचे आयोजन

पुणे-जून महिन्यात पुण्यामध्ये G-20 अंतर्गत दोन बैठका होत आहेत, त्यानिमित्त पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्या वतीने – सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते.भारताकडे G20 परिषदेचे यंदा असलेले अध्यक्षपद, याबद्दलची जनजागृती व “सायकल चालवा पर्यावरण वाचवा” हा संदेश घेऊन सायकल स्वार आज पुणे शहरात फिरले.

पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) विकास ढाकणे यांनी सायकल फेरीला झेंडा दाखवून सुरुवात करून दिली.


सुमारे 2200 सायकल प्रेमींनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुणे मनपा भवन, मॉडर्न कॅफे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिवार वाडा मार्गे पुन्हा मनपा भवन या मार्गाने सर्व सायकल वीरांनी शहरात चक्कर मारली. अतिशय उत्साहवर्धक वातावरणात विविध वयोगटातील स्त्री पुरुष या फेरीमध्ये सहभागी झाले होते. लहान मुलांचा सहभाग देखील लक्षणीय होता. सर्व सहभागी सायकल स्वारांना G-20 स्मृतीपदके देण्यात आली.

फेरीचे नेतृत्व सुरेश परदेशी, मुख्य समन्वयक पुणे मनपा सायकल क्लब, यांनी केले; तसेच महिला गटाचे नेतृत्व नेहा भावसार यांनी केले.याप्रसंगी क्रीडा विभाग उपायुक्त चेतना केरुरे, अतिक्रमण विभाग उपायुक्त माधव जगताप, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे इत्यादी अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथील 18 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू !

महाराष्ट्रातील एकूण 114 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाची महत्त्वपूर्ण घोषणा !

मुंबई- जळगाव, अकोला, धुळे, नागपूर, नाशिक, अमरावती, अहिल्यानगर (नगर) यांसह कोकण विभागातील मिळून महाराष्ट्रातील एकूण 114 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. यामध्ये आज मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील 18 मंदिरांचा समावेश आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली. 9 जून या दिवशी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मुंबईमधील श्री शीतलादेवी मंदिरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जीवदानी मंदिराचे अध्यक्ष श्री. प्रदीप तेंडोलकर, कडाव गणपती मंदिराचे विश्वस्त (कर्जत) श्री. विनायक उपाध्ये, केरलीय क्षेत्रपरिपालन समितीचे आचार्य पी.पी. एम्. नायर हे उपस्थित होते. वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार्‍या मंदिरांच्या नावांची घोषणा या वेळी श्री. सुनील घनवट यांनी केली.

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने 7 जून या दिवशी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांतील मंदिरांच्या ट्रस्टींची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उपस्थित सर्व मंदिरांच्या ट्रस्टींनी मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याला ठराव एकमताने संमत केला. वर्ष 2020 मध्ये महाराष्ट्र शासनाने मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये वस्त्रसंहिता लागू केली. यामध्ये ‘जीन्स पँट’, ‘टी-शर्ट’, भडक रंगांचे कपडे यांवर बंदी घालण्यात आली आहे. ही वस्त्रसंहिता लागू करण्यामागे जनमानसांत शासकीय प्रतिमा बिघडू नये, हा सरकारचा हेतू होता. देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खाजगी आस्थापने, शाळा-महाविद्यालय, न्यायालय, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे. त्याप्रमाणे मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता असावी, असे श्री. सुनील घनवट यांनी म्हटले.

काहीजण मंदिरांमध्ये अंगप्रदर्शन करणारी उत्तेजक, अशोभनीय, असभ्य, फाटलेल्या जीन्स आणि तोकड्या कपड्यांमध्ये येतात. सात्त्विक वेशभूषा परिधान करून मंदिरात आल्यावर भक्तांना मंदिरातील चैतन्याचा लाभ होतो, तसेच मंदिरातील पावित्र्य, मांगल्य, परंपरा आणि संस्कृती टिकून रहाते, अशी हिंदु धर्मांची शिकवण आहे. यासाठीच मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय मंदिर विश्वस्तांनी स्वयंस्फूर्तीने घेतला आहे. हा केवळ प्रारंभ आहे. भविष्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील आणखीही काही मंदिरे वस्त्रसंहिता लागू करणार असल्याचे जीएस्बी टेंम्पल ट्रस्टचे मानद चिटणीस आणि कायम विश्वस्त श्री. शशांक गुळगुळे यांनी सांगितले.

आतापर्यंत 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले उज्जैनचे श्री महाकालेश्वर मंदिर, महाराष्ट्रातील श्री घृष्णेश्वर मंदिर, अंमळनेर येथील श्रीदेव मंगळग्रह मंदिर, वाराणसीचे श्री काशी-विश्वेश्वर मंदिर, आंध्रप्रदेशचे श्री तिरुपती बालाजी मंदिर, केरळचे विख्यात श्री पद्मानाभस्वामी मंदिर, कन्याकुमारीचे श्री माता मंदिर अशा काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून सात्त्विक वस्त्रसंहिता लागू आहे. गोव्यातील बहुतांश मंदिरांसह ‘बेसिलिका ऑफ बॉर्न जीसस’ आणि ‘सी कैथ्रेडल या मोठ्या चर्चमध्येही वस्त्रसंहिता लागू आहे. सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर यांनी मंदिरामध्ये सात्त्विक पोषाख परिधान केल्यामुळे मंदिरातील पावित्र्याचा लाभ होत असल्याचे म्हटले.

या वेळी जीएस्बी टेंम्पल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ऋत्विक औरंगाबादकर, खजिनदार सौ. कल्पना प्रभू, श्री शीतलादेवी आणि मुरलीधर देवस्थान यांचे पालक विश्वस्त श्री. अनिल परूळकर, श्री भुलेश्वर आणि श्री बालाजी रामजी देवस्थानचे पालक विश्वस्त श्री. दीपक वालावलकर, माहीम येथील श्री दत्त मंदिराचे पुजारी श्री. किशोर सारंगुल, श्री वाळकेश्वर मंदिराचे पदाधिकारी श्री. पंकज सोलंकी हे उपस्थित होते.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती

 मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिपत्याखालील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान नि वाहन चालक (गट क) आणि चपराशी (गट ड) संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरीता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://stateexcise.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ३० मे २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेतील जवान संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून ही भरती प्रक्रिया व वाढीव पदे व त्या अनुषंगाने संभाव्य रिक्त पदे विचारात घेवून एकत्रितपणे भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेस तात्पुरत्या स्वरूपात शासन निर्देशान्वये स्थगिती देण्यात येत आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

या भरती प्रक्रियेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत ते अर्ज ग्राह्य धरले जातील. मात्र, अर्जामध्ये तांत्रिक दुरुस्ती करणे गरजेचे असल्यास तशा सूचना यथावकाश कळविण्यात येतील. तसेच भरती प्रक्रियेची सुधारित जाहिरात सुद्धा यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असेही सहआयुक्त श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.