पुणे, दि. १० जून २०२३: महावितरणच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त पुणे परिमंडलामध्ये कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित विविध कार्यक्रमांचा, स्पर्धांचा तसेच पाच दिवसीय सौर रथयात्रेचा समारोप शुक्रवारी (दि. ९) उत्साहात झाला. ऐरवी धकाधकीच्या वीजक्षेत्रात अविश्रांत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबिय व बालगोपाळांना विविध कार्यक्रमातून नवी ऊर्जा मिळाली.
येथील लोकशाहिर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात आयोजित समारोप कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता सर्वश्री अरविंद बुलबुले, युवराज जरग, संजीव राठोड, डॉ. सुरेश वानखेडे उपस्थित होते.
महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी पुणे परिमंडल अंतर्गत पुणे, चिंचवड व नारायणगाव येथे आयोजित कार्यक्रमांत सुमारे २२०० कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय सहभागी झाले होते. या कार्यक्रमांत महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’, रांगोळी स्पर्धा, बालकांसाठी चित्रकला स्पर्धा, जादूचे प्रयोग, पुरुषांसाठी संगीतखूर्ची, संगीतरजनी पथनाट्ये आदींचे तसेच तणावमुक्तीसाठी माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर व उपकार्यकारी अभियंता डॉ. चिदानंद फाळके (नाशिक) यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. तसेच गणेशखिंड मंडलमधील महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध ठिकाणी ‘ग्राहकसेवा हे ध्येय महावितरणचे’ या पथनाट्याचे सादरीकरण केले. विशेष म्हणजे या पथनाट्याची ध्वनिचित्रफित महावितरणच्या मुख्यालयातील वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आली.
समारोपीय कार्यक्रमात प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे व मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस प्रदान करण्यात आले. पथनाट्यातील सर्व महिला कलावतांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेता व खोखोपटू प्रतीक वाईकर, क्रिकेटपटू अजय चव्हाण, धावपटू गुलाबसिंग वसावे, पॉवर लिफ्टर मनीष कोंड्रा, जनसंपर्क अधिकारी श्री. निशिकांत राऊत यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
दरम्यान दि. ३ व ४ जून रोजी पद्मावती क्रीडांगणावर आयोजित पुरुष व महिला क्रिकेट स्पर्धेत एकूण १७ संघांनी भाग घेतला. स्पर्धेचे विजेतेपद राजगुरुनगर विभाग (पुरुष) व गणेशखिंड मंडल (महिला) संघाने पटकावले तर मंचर विभाग (पुरुष) व रास्तापेठ मंडल (महिला) संघाला उपविजेतेपद मिळाले. परिमंडलस्तरीय रांगोळी स्पर्धेत प्रथम- स्नेहा कोल्हे, द्वितीय- सुजाता शिरोडे व तृतीय- रुपाली शिवतारे तर माधुरी तिजारे, तेजश्री वाघमारे, शिवकन्या पारधे, जयश्री निकाळजे यांना उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले. बालचित्रकार स्पर्धेत प्रथम- अलफिया पिंजारी, द्वितीय- अर्णव खमितकर, तृतीय- ओवी गोगावले तर विवान सोनवणे, वैभवी परदेशी, आरोही परदेशी, आर्यन साबळे, अमन पिंजारी व पार्थ काळूमाळी यांना उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले.
समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता भागवत थेटे यांनी केले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन श्री. संतोष गहेरवार, भक्ती जोशी, कैलास कांबळे यांनी केले तर कार्यकारी अभियंता भाऊसाहेब सावंत यांनी आभार मानले. आयोजनासाठी सहायक महाव्यवस्थापक ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन) व माधुरी राऊत (वित्त व लेखा), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटनी यांच्यासह मंडलनिहाय स्थानिक समित्यांनी पुढाकार घेतला.
पाच दिवसीय सौर रथयात्रेचा समारोप- छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प, मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनसह विविध योजना व ग्राहकसेवांची माहिती देणाऱ्या पाच दिवसीय सौर रथयात्रेचा शुक्रवारी समारोप करण्यात आला. या सौर रथयात्रेने शहरी व ग्रामीण भागातील सुमारे ७० ठिकाणी जाऊन विविध माहिती दिली. संबंधित अभियंता व कर्मचाऱ्यांनी सुमारे ३५ हजार ग्राहकांशी थेट संवाद साधला व त्यांना विविध योजनांचे माहिती पत्रक दिले. समारोपीय कार्यक्रमात सौर रथयात्रेला सहकार्य करणाऱ्या ‘मास्मा’चे अध्यक्ष रोहन उपासनी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.