तुळजापूर-तुळजाभवानी मातेच्या खजिन्यात शनिवारी ३५४ हिरे आढळून आले आहेत. या शिवाय एक रत्नजडित मंगळसूत्र ही आढळले. आतापर्यंत मातेला भाविकांनी वाहिलेल्या तसेच मोजणी झालेल्या २०७ किलो ४८० ग्रॅम सोन्याचे वजन करण्यात आले आहे. या सोन्याची प्रत्येकी पाच किलोचे पाकिटे करून तीन पेट्यामध्ये भरून ठेवत त्या सील करण्यात आल्या आहेत.गेल्या चार दिवसांपासून देवीला भाविकांनी वाहिलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मोजणी करण्यात येत आहेत. चौथ्या दिवशी सकाळी धार्मिक विभागाच्या काउंटर पेटीत १८ जानेवारी ते ०९ जून २०२३ या कालावधीतील सोने - चांदीची मोजणी करण्यात आली. यामध्ये सोन्याची ४५६ पाकिटे व चांदीची २५२ पाकिटाची मोजणी करण्यात आली. यामध्ये ७ किलो २७० ग्रॅम सोन्याचे वजन भरले. रविवारी मोजणी बंद राहणार असून सोमवारी पुन्हा मोजणीस प्रारंभ होणार आहे.
२९.३६० कॅरेटचे ३५४ हिरे आढळून आले आहेत. त्याच बरोबर रत्नजडित मंगळसूत्र मिळाले असून ते ४.८९ कॅरेटचे आहेत. याची किंमत अद्याप ठरली नसून यासाठी सोलापूर येथील जाणकारास मूल्यनिर्धारण करण्यासाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.