नवी दिल्ली– आंतरराष्ट्रीय सायकलीस्ट पुजा दानाेळे आणि संज्ञा पाटीलने आपला दबदबा कायम ठेवताना पाचव्या सत्रातील खेलाे इंडिया युथ गेम्समध्ये पदकांचा डबल धमाका उडवला. सुवर्णपदक विजेत्या पुजाने शुक्रवारी महिलांच्या २ किमी वैयक्तिक परसुटमध्ये राैप्यपदक पटकावले. यासह तिने यंदाच्या स्पर्धेत दुसरे पदक जिंकले. तसेच राैप्यपदक विजेत्या संज्ञाने स्प्रिंट प्रकारात राैप्यपदकाचा बहुमान पटकावला. यासह तिच्या नावे सलग दुसऱ्या राैप्यपदकाची नाेंद झाली. यादरम्यान विवान सप्रु हा पुरुषांच्या ३ किमी वैयक्तिक परसुटमध्ये राैप्यपदकाचा मानकरी ठरला. महाराष्ट्राचे हे तिन्ही सायकलिस्ट दिल्लीच्या वेलाेड्रॅमवर पदकाचे मानकरी ठरले आहेत. मुख्य प्रशिक्षक दिपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पदकांचा बहुमान मिळवला.
कोल्हापूरच्या अनिकेत मानेने उंच उडीत कास्यपदक जिंकले
भोपाळ– ईशा जाधव हिने मिळवलेल्या सुवर्णपदकासह महाराष्ट्राने ॲथलेटिक्स मध्ये चार पदकांची कमाई केली. शिवम लोहोकरे याने भालाफेकीत रौप्य पदक तर ऋषिप्रसाद देसाई याने 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक पटकाविले. अनिकेत माने याने उंच उडीत कांस्यपदक पटकाविले.
वसई येथील खेळाडू ईशा हिने खेला इंडिया स्पर्धेतील पदार्पणातच सोनेरी कामगिरी करत नेत्रदीपक यश संपादन केले. तिने चारशे मीटर्स धावण्याची शर्यत ५५.९५ सेकंदात पार केले. यापूर्वी तिने राष्ट्रीय युवा स्पर्धेत सुवर्णपदक तर आशियाई युवा स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. ती विरार येथे संदीप सिंग लठवाल यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज चार तास सराव करीत आहे.
अनिकेतची पदकांची हॅट्ट्रिक कोल्हापूरचा अनिकेत माने याने उंच उडीत कास्यपदक जिंकून खेलो इंडिया स्पर्धेतील स्वतःची पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली. 2021 मध्ये झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत त्याला कास्य पदक मिळालं तर गतवर्षी त्याने सुवर्ण कामगिरी केली होती. यंदा फारसा सराव नसतानाही त्याने तिसरे पदक जिंकले. त्याने १.९८ मीटर्स पर्यंत उडी मारली. अनिकेत याचे वडील सुभाष हे स्वतः उंच उडीतील माजी राष्ट्रीय खेळाडू असल्यामुळे त्याला या क्रीडा प्रकाराचे बाळकडू आपल्या वडिलांकडूनच मिळाले आहे. अनिकेत याला दोन महिन्यांपूर्वी पाठीच्या दुखण्याचा त्रास होत होता. येथील स्पर्धेतील सहभागाबाबत तो शासंक होता. महाराष्ट्राला या खेळात पदक मिळवण्याच्या जिद्दीने त्याने सराव केला आणि कौतुकास्पद कामगिरी यापूर्वी त्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली आहेत.
भालाफेकीत शिवमला रौप्य भालाफेकी मध्ये शिवम लोहोकरे याने रौप्य पदक पटकाविले. त्याने ६७.६२ मीटर्स पर्यंत भालाफेक केली. तो पुण्यामध्ये आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट येथे सराव करीत आहे. या स्पर्धेत त्यांना प्रथमच भाग घेतला होता. आयत्यावेळी या स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती तरीही त्याने जिद्दीने येथे चांगली कामगिरी करीत महाराष्ट्राच्या पदक तालिकेत आणखी एक पदकाची भर घातली.
ऋषीप्रसादची रूपेरी कामगिरी महाराष्ट्राच्या ऋषी प्रसाद देसाई याने शंभर मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक पटकाविले. त्याने हे अंतर १०.६७ सेकंदात पार केले. चुरशीने झालेल्या शर्यतीत त्याने सुवर्णपदक जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र त्याला निसटता पराभव स्वीकारावा लागला आणि रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
भोपाळ- महाराष्ट्राच्या उमर अन्वर शेख, उस्मान अन्सारी, कुणाल घोरपडे व देविका घोरपडे यांनी अंतिम फेरीत स्थान मिळवित मुष्टीयुद्धांमध्ये सुवर्ण पदकाच्या आशा कायम राखल्या. महाराष्ट्राच्या आर्या बारटक्के व वैष्णवी वाघमारे यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
तात्या टोपे क्रीडा नगरी सुरु असलेल्या या स्पर्धेतील ४८ किलो गटात शेख याने चुरशीच्या लढतीनंतर हरियाणाच्या विश्वेश कुमार याला पराभूत केले. ही लढत शेवटपर्यंत रंगतदार झाली आणि त्यामध्ये शेख याने चांगला संयम दाखवीत विजयश्री खेचून आणली. ५१ किलो गटात उस्मान अन्सारी याला मध्यप्रदेशच्या अनुराग कुमार याच्या विरुद्ध लढत मिळवताना फारशी अडचण आली नाही. खरंतर प्रेक्षकांचा अनुराग याला सतत पाठिंबा मिळत होता तरीही जिद्दीने खेळ करीत उस्मान याने ही लढत जिंकली. ६७ किलो गटातही महाराष्ट्राच्या कुणाल घोरपडे याने स्थानिक खेळाडू प्रशंसन कुमार याला सहज पराभूत केले. प्रशासन हा मध्य प्रदेश हा खेळाडू असल्यामुळे त्यालाही प्रेक्षकांचा सातत्याने पाठिंबा मिळत होता मात्र कुणाल याने त्याकडे दुर्लक्ष करीत शानदार विजय मिळवला. कुणाल हा औरंगाबाद येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात सराव करीत आहे.
देविकाचा एकतर्फी विजय जागतिक कनिष्ठ गट सुवर्णपदक विजेते खेळाडू देविका घोरपडे हिने अपेक्षेप्रमाणे येथेही विजयी घोडदौड कायम राखली. तिने आंध्र प्रदेशच्या मेहरून्निसा बेगम हिला पहिल्या तीन मिनिटातच निष्प्रभ करीत एकतर्फी विजय मिळविला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. पंचांनी या लढतीमधील पहिल्याच फेरीत देविका हिला विजयी घोषित केले. देविका ही ऑलिंपिकपटू मनोज पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. ५७ किलो गटात सातारा येथील खेळाडू आर्या हिला अटीतटीच्या लढतीत उत्तर प्रदेशच्या अनामिका यादव हिच्या विरुद्ध निसटता पराभव स्वीकारावा लागला. आर्या हिने बारावी परीक्षेत ८७ टक्के गुण मिळवले असून तिला सैन्य दलातच करिअर करायचे आहे. ती राजधानी बॉक्सिंग क्लब येथे अमित संगवान यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. पुण्याची खेळाडू वैष्णवी हिला ६० किलो गटात मणिपूरच्या टी.कुंजुराणी देवी हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. वैष्णवी ही माजी ऑलिम्पिकपटू मनोज पिंगळे यांच्या अकादमी सराव करीत आहे. आर्या व वैष्णवी यांचे खेलो इंडियातील हे पहिलेच पदक आहे.
पुणे दि. ३: पुणे महानगरपालिकेचे सिंहगड क्षेत्रीय कार्यालय, साई जनसेवा प्रतिष्ठान आणि ग्रीन व्हिजन मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ओल्या कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या टेरेस गार्डनचे उद्धाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला आमदार भीमराव तापकीर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, उपायुक्त आशा राऊत, वनराई संस्थेचे रविंद्र धारीया,ग्रीन व्हिजन मॅनेजमेंटच्या गीता मेहेरकर, सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले, वेगवेगळ्या पद्धतीने कचऱ्याचे निर्मुलन करत स्वच्छ भारताच्या दिशेने आपण वेगाने वाटचाल करत आहे. या स्पर्धेतील पुणे शहराची कामगिरी अधिकाधिक उंचाविण्याची गरज आहे. एक सोसायटी म्हणजे एक गाव असे मानून विभागवार स्वच्छतेसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. ओला आणि सुका कचरा जिरविण्यासाठीची पुस्तिका नागरिकांपर्यंत पोहोचवावी आणि कचऱ्याचा उत्तम उपयोग होऊ शकतो हे त्यांना पटवून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
महानगरपालिकांच्या सर्व इमारतींवर असे प्रकल्प सुरू करावे आणि लोकप्रतिनिधींदेखील अशा अभिनव उपक्रमांसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. पुणे महानगरपालिकेने राबविलेला उपक्रम स्तुत्य असून याद्वारे नागरिकांनाही पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचे प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
असा आहे प्रकल्प ओला कचरा सहज जिरविण्यासाठी व त्यापासून नागरिकांना फायदा मिळावा यासाठी सिंहगड क्षेत्रिय कार्यालयाच्या छतावर ‘टेरेस गार्डन’ हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पात तीस लिटरच्या 100 बकेटमध्ये रोज तीनशे किलो ओला कचरा जिरवला जात आहे.
दररोजचा ओला कचरा पुणे महापालिकेचे कर्मचारी आणि वडगाव येथील भाजी मार्केट मधील उरलेला भाजीपाला, फुलांचा कचरा आणून देतात. बकेटमध्ये कचरा जिरवताना बकेटला तळाला सात ते आठ होल्स करण्यात आले आहेत, बकेट मध्ये तळाला विटांचे तुकडे , त्यावर नारळाच्या शेंड्या, बायोकल्चर व ओला कचरा पुन्हा बायोकल्चर ओला कचरा व त्यामध्ये रोप असे थर देऊन भरण्यात आले आहेत.
या बगीच्यात फळझाडे, फुल झाडे, तुळसही लावण्यात आली आहे. बकेटमध्ये दीड वर्षापर्यंत ओला कचरा जिरला जाऊ शकतो आणि त्यात जमा झालेले खत काढून रोप पुन्हा लावता येऊ शकते. अशा प्रकल्पामुळे नागरिकांना घरगुती अथवा सोसायटी पातळीवर ओला कचरा जिरवणे सोपे असून सहज शक्य आहे. मोठ्या सोसायट्यानी इमारतीच्या टेरेसवर असा प्रकल्प केला तर त्यांचा ओला कचरा घरच्या घरी जिरविण्यासाठी मोठी मदत होईल.
पुणे दि. ३: जिल्ह्यात २०५- चिंचवड आणि २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून या दोन्ही मदारसंघाच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. उमेदवार, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.
स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा आणि वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घेण्यात यावी. प्रस्तावित सभेसाठी ध्वनिवर्धकाचा वापर करण्याची आणि अशा इतर कोणत्याही सुविधांसाठी परवानगी मिळवावी. मिरवणूक सुरु होण्याची वेळ आणि जागा. ती जेथून जाणार असेल तो मार्ग आणि ती जेथे संपणार असेल ती वेळ आणि जागा अगोदर निश्चित करण्यात येऊन त्यासाठी पोलीस प्राधिकाऱ्यांकडून आगाऊ परवानगी घेण्यात यावी.
मिरवणूक जेथून जाणार असेल त्या भागांमध्ये कोणताही निर्बंधक आदेश जारी असल्यास, त्याबाबत खात्री करून घेत त्याचे पूर्णपणे अनुपालन करण्यात यावे. त्याचप्रमाणे वाहतूक विनियम आणि इतर निर्बंधांचेही अनुपालन करण्यात यावे. मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकारपत्र मिळविलेल्या उमेदवार व त्यांच्या निवडणूक मतदार प्रतिनिधींना मतदान कक्षात प्रवेश करता येईल, इतर व्यक्ती कितीही उच्चपदस्थ असली तरी तिला असा प्रवेश करता येणार नाही.
सत्ताधारी पक्ष/ शासन यांनी केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राज्यकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात प्रकाशित अथवा प्रसारित करण्यास प्रतिबंध आहे. शासकीय कामाची निवडणूक मोहीम/ निवडणूक प्रचार कार्यासोबत सरमिसळ करू नये. मतदाराला पैशाचे किंवा अन्य कशाचेही प्रलोभन दाखवू नये. मतदाराच्या जातीय समूह भावनांना आवाहन करू नये. देवळे, मशिदी, चर्च, गुरुद्वार किंवा इतर कोणत्याही प्रार्थनास्थळांचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणे, भितीपत्रके, यांच्यासह निवडणूक प्रचाराची जागा म्हणून केला जाणार नाही.
मतदारांना लाच देणे, मतदारांवर गैरवाजवी दडपण, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, तोतयेगिरी, मतदान केंद्रापासून १०० मीटरच्या आत प्रचार करणे, मतदान समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच्या ४८ तासांत सार्वजनिक सभा घेणे. आणि मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे यांसारख्या भ्रष्ट आणि निवडणूक अपराध समजल्या जाणाऱ्या गोष्टींना मनाई आहे.
स्थानिक कायद्यांच्या अधीन राहून, कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, आवार भिंत, वाहने इत्यादींच्या मालकाच्या विशिष्ट परवानगीशिवाय (जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याला दाखविण्यासाठी व त्यांच्याकडे जमा करण्याकरिता), ध्वजदंड उभारण्यासाठी निशाण्या लावण्यासाठी, सूचना चिकटविण्यासाठी, घोषणा लिहिण्यासाठी कोणीही वापर करणार नाही. एका जागी लावलेल्या किंवा चालल्या वाहनावर बसविलेल्या ध्वनिवर्धकांचा वापर सकाळी ६ पुर्वी व रात्री १० नंतर करता येणार नाही.
संबंधित प्राधिकाऱ्याच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय, सार्वजनिक सभा आणि मिरवणुका यांच्या मध्येही ध्वनिवर्धकाचा वापर करण्यात येऊ नये. सर्वसाधारणपणे अशा सभा/ मिरवणुका रात्री १० नंतर चालू ठेऊ नये. त्याशिवाय ध्वनिवर्धकाचा वापर स्थानिक कायदे, त्या जागेच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रत्यक्ष ज्ञान आणि हवामानाची स्थिती, सणासुदीचा मोसम इत्यादीसारख्या परिस्थितीच्या अधीन असेल.
शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी नियोजन करा-राजेश देशमुख
पुणे दि.३: शिवनेरी गडावरील शिवजयंती सोहळ्यासाठी प्रशासनातर्फे सूक्ष्म नियोजन करण्यात येत असून सोहळा उत्साहात आणि चांगल्यारितीने साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देखमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात किल्ले शिवनेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याबाबत आयोजित आढावा बैठाकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार अतुल बेनके, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर आदी उपस्थित होते.
डॉ.देशमुख म्हणाले, गडाच्या पायथ्याशी वाहनतळाची योग्य व्यवस्था करण्यात यावी. यावर्षी अधिक शिवभक्त येण्याची शक्यता लक्षात घेता वाहनतळाची जागा वाढविण्याचा प्रयत्न करावा. परिसरात पुरेशा प्रमाणात उजेड राहील यादृष्टीने दिव्यांची सुविधा करावी. वन आणि पुरातत्व विभागाने कायमस्वरूपी विद्युत व्यवस्था करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. परिसरात स्वच्छता राहील याकडे विशेष लक्ष द्यावे.
पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची संख्या वाढवावी आणि आरोग्य विभागामार्फत पाण्याची तपासणी करावी. आरोग्य पथकासह रुग्णवाहिकांची व्यवस्था करावी. राज्य परिवहन महामंडळाने आवश्यकतेनुसार बसेसची व्यवस्था करावी. महिला व शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांनी समन्वयाने वेळेत आवश्यक नियोजन पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले.
आमदार बेनके म्हणाले, यावर्षी गर्दी अधिक होणार असल्याने वाहनतळांची संख्या वाढविण्यात यावी आणि वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात यावे.
पोलीस अधीक्षक यांनी पोलिसांच्यावतीने करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली.
यावर्षी राज्य परिवहन महामंडळातर्फे २५ बसेसची सुविधा करण्यात आली असून १० आरोग्य पथके नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीत शिवप्रेमींनी सोहळ्याच्या नियोजनाच्यादृष्टीने उपयुक्त सूचना मांडल्या. बैठकीला आशाताई बुचके, सोहळ्याशी संबंधित विविध संस्थांचे प्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पुणे दि. ३: जिल्ह्यात २०५- चिंचवड आणि २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम सुरू असून त्यानुसार मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत नामनिर्देशपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. दरम्यान या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.
मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ९ नोव्हेंबर २०२२ पासून राबवण्यात आला. यानुसार ५ जानेवारी २०२३ रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार २०५- चिंचवड विधानसभा मतदार संघात ३ लाख १ हजार ६४८ पुरुष, २ लाख ६४ हजार ७३२ स्त्री आणि ३५ तृतीयपंथी याप्रमाणे एकूण ५ लाख ६६ हजार ४१५ मतदार संख्या आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत ४८ हजार १०६ ची वाढ झाली आहे.
२१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात १ लाख ३६ हजार ८७३ पुरुष, १ लाख ३८ हजार ५५० स्त्री आणि ५ तृतीयपंथी याप्रमाणे २ लाख ७५ हजार ४२८ याप्रमाणे मतदार संख्या आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत १५ हजार २५५ ची घट झाली आहे.
अंतिम मतदार यादीतील मतदारसंख्येच्या आधारे २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी २७० मतदान केंद्रे तर २०५- चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी ५१० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली.
मुंबई-कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोट निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची अधिकृत घोषणा उद्या करण्यात येणार आहे असे स्पष्ट करताना कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी शिवेसेनेचे सुभाष देसाई , राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांना पेढे वाटप केले यावेळी जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपच्या वतीने आम्हाला निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी संपर्क करण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीबाबत ‘मविआ’ची आज बैठक झाली. ”दोन्ही पोटनिवडणूक एकत्रित लढण्यावर आम्ही ठाम आहोत. आता केवळ वरिष्ठांशी सल्लामसलत करून अंतीम निर्णय उद्या घोषित करू अशी माहिती संयुक्त पत्रकार परिषदेत मविआच्या नेत्यांनी आज दिली. या पत्रकार परिषदेला तसेच शिवसेनेतर्फे सुभाष देसाई, राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे जयंत पाटील आणि काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती होती.
पुणे- कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी , शिवसेना यांनी जरी महाविकास आघाडीच्या वतीने दंड थोपटले असले तरी कसबा कॉंग्रेसला सोडला जाईल आणि कॉंग्रेसच्या वतीने धंगेकर किंवा दाभेकर यांच्यातील एकाला उमेदवारी मिळेल अशी शक्यता आज मुंबईतील कॉंग्रेसच्या गोटातून वर्तविण्यात आली .भाजपा आज रात्री उशिरा आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार असल्याने ती झाल्यावर कदाचित दाभेकर किंवा धंगेकर यांचातील शर्यतीत सुद्धा कोण पुढे राहिले हे स्पष्ट होईल असे दिसते आहे.
कॉंग्रेसच्या वतीने अगदी शहर अध्यक्ष अरविंद शिंदे आणि माजी महापौर कमल व्यवहारे, नीता परदेशी ,गोपाल तिवारी यांच्यासह अगदी १६ जणांनी इच्छुक म्हणून नावे नोंदविली होती आणि मुलाखती देखील दिल्या होत्या . मात्र यातील केवळ धंगेकर आणि दाभेकर हे दोघेच निवडणूक लढविण्यासाठी गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. जरी प्रदेश कॉंग्रेसच्या कमिटीने ३ नावे दिल्लीतील वरिष्ठांना पाठविली असली तरी दाभेकर आणि धंगेकर यांच्यातच उमेदवारीसाठी खरी शर्यत असणार आहे या पूर्वीच्या निवडणुकांत भाजप विरोधी मते विभागली जात होती .या मतांची बेरीज केली तरी भारतीय जनता पक्ष अल्पमतात असल्याचे कोणालाही लक्षात येऊ शकते, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले .तर आजपर्यंत भाजपच्या खांद्यावर शिवसेनेचा ठाकरेंचा हाथ होता आता भाजपा एकाकी आहे असे शिवसेनाप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले .राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची यापूर्वीही आघाडी होतीच . मात्र कॉंग्रेसला हा मतदार संघ आता प्रथा परंपरे प्रमाणे सोडला आणि सहयोगी पक्षाने जर मनापासून साथ दिली तर कॉंग्रेसचा येथे निश्चित विजय होईल असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी , रमेश बागवे , अरविंद शिंदे यांनी म्हटले आहे.शिवाय भाजपचे खासदार गिरीश बापट यावेळी सक्रियतेने उतरू शकले नाहीत तर त्याचा मोठा फटका भाजपाला बसणार आहे असाही दावा केला जातो आहे.
पुणे -आ. मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेली कसबा विधानसभेची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाइं (आठवले गट), शिवसंग्राम, रासप, रयत क्रांती आदींसह महायुतीतील सर्व घटक पक्ष पूर्ण ताकदीने लढवायचा निर्धार आज करण्यात आला. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा सहयोगी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह बैठक आज संपन्न झाली.
या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, बाळासाहेबांची शिवसेनाचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे, प्रदेश सचिव किरण साळी, संपर्कप्रमुख अजय भोसले, लीनापानसरे, पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश कोंडे, रिपाइं आठवले गट शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, डॉ. सिद्धार्थ धेंडे, ॲड. मंदार जोशी, बाळासाहेब जानराव, शिवसंग्रामचे भारत लगड, कालिंदी गोडांबे, पतितपावन संघटनेचे स्वप्नील नाईक, राजाभाऊ पाटील, दिनेश भिलारे, मनोज नायर, श्रीकांत शिळीमकर भाजपा नेते शैलेश टिळक, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, गणेश बिडकर, धीरज घाटे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, भाजपा कसबा मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे, महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी पांडे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कसबा विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा परंपरागत मतदारसंघ आहे. आ. मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी; यासाठी सर्वांची भूमिका आहे. मात्र, तरीही गाफिल न राहता ही निवडणूक भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाइं (आठवले गट), शिवसंग्राम, रासप, रयत क्रांती यांच्यासह सहयोगी घटक पक्ष सर्वजण पूर्ण ताकदीने लढवणार आहेत.
नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पोट निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा पक्षाची राष्ट्रीय निवड समिती करेल. त्यामुळे महायुतीच्या सर्व पक्षांचे कार्यकर्ते यासाठी कामाला लागले आहेत. सोमवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी दोन्ही मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.
बिनविरोध निवडणुकीसंदर्भात विचारले असता नामदार पाटील म्हणाले की, कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा आहे. त्यासाठी पक्षाच्या नेत्या आ. माधुराताई मिसाळ यांनी सर्वच विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांशी संपर्क साधला आहे. दोन्ही जागा बिनविरोध करण्यासाठी पत्र देखील पाठवले आहे. त्या पत्रांच्या उत्तराची आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत. तसेच राज्य स्तरीय नेते देखील सर्व प्रमुख नेत्यांच्या संपर्कात असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्याकडे महायुतीतील सर्वच घटक पक्ष आणि विविध ज्ञाती संस्थांशी संपर्कासाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केली.
पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत रंगला भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध कथक नर्तक पं.नंदकिशोर कपोते यांना भारत सरकार चा मानाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने रविन्द्र नाट्य मंदिर, मुंबई येथे सांस्कृतिक मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शाल, मानपत्र व रूपये एक लाख देऊन गौरव करण्यात आला.
सेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई –सांस्कृतिक क्षेत्र असे एकच क्षेत्र आहे जिथे कलाकारांनी सादर केलेल्या कलेतून उपस्थित प्रेक्षकांना उर्जा आणि उत्साह मिळतो. आज गौरविण्यात आलेल्या कलाकारांनी वर्षानुवर्षे सेवाभावी वृत्तीने काम करुन कलेची उपासना केली. या अशा कलाकारांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार आणि संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण आज संध्याकाळी सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रभादेवी येथील पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे झाले. या कार्यक्रमास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभिषण चवरे यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, महाराष्ट्रात विविध क्षेत्रात काम करुन महाराष्ट्राला पुढे नेणारे कलाकारच आपले कोहिनूर असून महाराष्ट्र ही अशा कोहिनूरची खाण आहे. आतापर्यंत ४८ भारतरत्न दिले असून यापैकी १० भारतरत्न महाराष्ट्राला मिळाले आहेत. दरवर्षी देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारामध्ये १० टक्के पुरस्कार महाराष्ट्राला मिळतात यावरुन महाराष्ट्रात असलेल्या सांस्कृतिक वैभवाची प्रचिती येते. नुकतेच राज्य शासनाने ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत म्हणून स्वीकारले असून या गीतामध्ये सांगितल्याप्रमाणे ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र आपल्या कलेच्या माध्यमातून सिद्ध करेल. सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून काम करताना साहित्य, रंगभूमी, कला, चित्रपट यामुळे प्रेक्षकांना समाधान कसे मिळेल याकडे लक्ष देत आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्र सांस्कृतिक क्षेत्रात आघाडीवर कसा येईल याकडे लक्ष देण्यात येत असून आपल्यापैकी कोणाकडे काही याबाबत सूचना असल्यास कळवाव्यात.
प्रास्ताविक करताना श्री. खारगे यांनी येणाऱ्या काळात सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध क्षेत्रातील कला आणि कलाकारांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. यावर्षी या विभागामार्फत विविध उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
साहित्य संमेलनासाठी ५० लाख नाही, तर २ कोटी रुपये अनुदान
मंत्री श्री. केसरकर यावेळी म्हणाले की, कला आणि साहित्य यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून हे राज्य शासन प्रयत्न करत आहे. उद्यापासून साहित्य संमेलन सुरु होत असून या संमेलनासाठी ५० लाख ऐवजी २ कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे. याशिवाय येणाऱ्या काळात मुंबईत मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे. याच ठिकाणी ५०० आसनी ॲम्पी थिएटर असणार आहे. नवी मुंबई येथील जागेत मुंबईत येणाऱ्या साहित्यिकांची निवासाची सोय केली जाणार आहे. यशिवाय वाई येथे विश्वकोश इमारत उभारण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग येथे यापूर्वी ३ नाट्यगृह बांधण्याचे काम पूर्ण झाले असून चौथ्या नाट्यगृहाचे भूमीपूजन लवकरच केले जाईल.
रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार आणि संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारांचे स्वरुप ५ लाख रुपये रोख, मानचित्र, सन्मानपत्र असे आहे. याच कार्यक्रमात संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त कलाकारांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. १ लाख रुपये रोख, मानचित्र, सन्मानपत्र देऊन यावेळी मान्यवरांना गौरविण्यात आले. 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्काराचे वितरण
सन 2020 चा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार पद्मभूषण डॉ.एन. राजम यांना प्रदान करण्यात आला. सन 2021 चा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार पं. शिवकुमार शर्मा यांना जाहीर करण्यात आला होता. पद्मविभूषण पंडित शिवकुमार यांचे निधन झाल्याने त्यांच्या पत्नी मनोरमा शर्मा आणि मुलगा राहुल शर्मा यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्काराचे वितरण
सन 2019-20 चा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार रत्नाकर मतकरी यांना जाहीर झाला होता. पुरस्कार त्यांच्या पत्नी प्रतिभा रत्नाकर मतकरी यांनी स्वीकारला. सन 2020-21 सालाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार दत्ता भगत यांना, तर सन 2021-22 चा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री सतीश आळेकर यांना प्रदान करण्यात आला.
संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण
सन 2019-20 सालाचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मधुवंती दांडेकर यांना,सन 2020-21 सालाचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार दीप्ती भोगले यांना तर सन 2021-22 सालाचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार सुधीर ठाकूर यांना आज सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
याशिवाय संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त कलाकारांचा सत्कारही यावेळी सन्मान करण्यात आला.सन 2019 साठी दिग्दर्शनासाठी कुमार सोहोनी, लोकसंगीतासाठी पांडुरंग घोटकर, वादय निर्माणासाठी माजिद गुलाबसाहेब सतारमेकर यांचा सत्कार करण्यात आला. सन 2020 साठी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी वि. आरती अंकलीकर-टिकेकर, अभिनयासाठी प्रशांत दामले, कळसुत्री बाहुल्यांसाठी मीना नाईक, समग्र योगदान- कथकसाठी डॉ. नंदकिशोर कपोते, ओडिसी नृत्यासाइी पं.रवींद्र अतिबुध्दी, सुगम संगीतासाठी अनुप जलोटा आणि कॉन्टेम्पररी नृत्यासाठी भूषण लकींद्रा यांचा सत्कार करण्यात आला.सन 2021 साठी हिंदुस्थानी शास्त्रीय गायन-धृपदसाठी पं.उदय भवाळकर, कथक नृत्यासाठी शमा भाटे, व्हायोलिनसाठी डॉ. संगीता शंकर यांचा सत्कार करण्यात आला.याशिवाय लोककलेसाठी डॉ. प्रभाकर भानुदास मांडे, सितारसाठी पं. शंकर कृष्णाजी अभ्यंकर, कथकसाठी डॉ. पद्मा शर्मा, संगीतासाठी उस्मान अब्दुल करीम खान, तारपा लोकसंगीतासाठी भिकल्या लडक्या धिंडा आणि तमाशा लोकनाट्यासाठी डॉ. हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर या अमृत पुरकारप्राप्त मान्यवरांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव
पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे. आज 2 फेब्रुवारी रोजी बेगम परवीन सुलताना आणि पं. जयतीर्थ मेवुंडी यांचे गायन झाले. शुक्रवार 3 फेब्रुवारी रोजी आरती अंकलीकर, सानिया पाटणकर, विराज जोशी यांचे गायन होणार आहे. तर पं. उद्धव आपेगांवकर आणि पं. पुष्कराज कोष्टी यांचे वादन होणार आहे. शनिवारी 4 फेब्रुवारी रोजी पं. राजा काळे, डॉ. आशिष रानडे आणि पं. कैवल्यकुमार गुरव यांचे गायन, तर वि. कला रामनाथ यांचे वादन होणार आहे. सन 2019-20 चा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मधुवंती दांडेकर यांना, सन 2020-21 चा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार दीप्ती भोगले यांना, तर सन 2021-22 चा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार सुधीर ठाकूर यांना प्रदान करण्यात आला. याशिवाय संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त कलाकारांचा सत्कारही यावेळी सन्मान करण्यात आला. सन 2019 साठी दिग्दर्शनासाठी कुमार सोहोनी, लोकसंगीतासाठी पांडुरंग घोटकर, वाद्य निर्माणासाठी माजिद गुलाबसाहेब सतारमेकर यांचा सत्कार करण्यात आला. सन 2020 साठी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी आरती अंकलीकर-टिकेकर, अभिनयासाठी प्रशांत दामले, कळसूत्री बाहुल्यांसाठी मीना नाईक, समग्र योगदान- कथकसाठी डॉ. नंदकिशोर कपोते, ओडिसी नृत्यासाठी पं.रवींद्र अतिबुध्दी, सुगम संगीतासाठी अनुप जलोटा आणि कॉन्टेम्पररी नृत्यासाठी भूषण लकिंद्रा यांचा सत्कार करण्यात आला. सन 2021 साठी हिंदुस्थानी शास्त्रीय गायन-धृपदसाठी पं.उदय भवाळकर, कथ्थक नृत्यासाठी शमा भाटे, व्हायोलिनसाठी डॉ. संगीता शंकर यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय लोककलेसाठी डॉ. प्रभाकर भानुदास मांडे, सितारसाठी पं. शंकर कृष्णाजी अभ्यंकर, कथ्थकसाठी डॉ. पद्मा शर्मा, संगीतासाठी उस्मान अब्दुल करीम खान, तारपा लोकसंगीतासाठी भिकल्या लडक्या धिंडा आणि तमाशा लोकनाट्यासाठी डॉ. हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर या अमृत पुरकारप्राप्त मान्यवरांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
केंद्रीय अन्न तसेच सार्वजनिक वितरण विभागाच्या सचिवांनी आज नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत खुल्या बाजारातील विक्री योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला. खाद्य अर्थव्यवस्थेत दिसून येणाऱ्या वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्राहकांना देशातील विविध दुकानांच्या माध्यमातून 29.50 रुपये प्रतिकिलो दराने गव्हाच्या पिठाचा पुरवठा करण्यासंदर्भात झालेल्या प्रगतीचा त्यांनी विशेषत्वाने आढावा घेतला.
भारतीय अन्न महामंडळ(एफसीआय), केंद्रीय भांडार, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ(नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनएफसीसी) या संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या या बैठकीत केंद्रीय अन्न तसेच सार्वजनिक वितरण विभाग सचिव संजीव चोप्रा यांनी असा निर्णय घेतला की या सर्व संस्था एफसीआयच्या डेपोतून 3 लाख टनापर्यंत गव्हाची उचल करतील आणि त्याचे पिठात रुपांतर केल्यानंतर हे पीठ देशातील विविध किरकोळ विक्रीची दुकाने, फिरत्या विक्री वाहनांच्या माध्यमातून 29.50 रुपये प्रतिकिलो दराने ग्राहकांना त्याची विक्री करतील.
या सर्व संस्थांनी ग्राहकांना “भारत आटा” किंवा “इतर कोणत्याही समर्पक नावाने” तसेच ठळक अक्षरात कमाल किरकोळ किंमत 29.50 रुपये प्रतिकिलो असा उल्लेख असलेले गव्हाचे पीठ विकण्याचे मान्य केले. केंद्रीय भांडार दुकानांनी आजपासूनच 29.50 रुपये प्रतिकिलो दराने गव्हाच्या पिठाची विक्री सुरु केली आहे मात्र एनसीसीएफ आणि नाफेड या संस्था 6 फेब्रुवारी 2023 पासून सदर दराने गव्हाच्या पिठाची विक्री सुरु करतील.
तसेच ग्राहकांना 29.50 रुपये प्रतिकिलो दराने गव्हाच्या पिठाची विक्री करण्याबाबत संबंधित राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांच्या शिफारसीनुसार, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांचे कोणतेही महामंडळ/सहकारी संस्था/महासंघ/स्वयंसहाय्यता गट यांना देखील केंद्र सरकारकडून 23.50 रुपये प्रतिकिलो दराने गव्हाचे वितरण करण्यात येईल.
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीने 25 जानेवारी 2023 रोजी अत्यावश्यक वर्गात मोडणाऱ्या वस्तूंच्या किंमतींचा आढावा घेतला आणि खुल्या बाजारातील विक्री योजनेच्या माध्यमातून एफसीआयकडील 30 लाख टन गव्हाचा साठा विक्रीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला.
एफसीआयच्या नेहमीच्या प्रक्रियेनुसार, ई-लिलावाच्या माध्यमातून व्यापारी, पीठ गिरण्या इत्यादींना 25 लाख टन गहू वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लिलावाची बोली लावणाऱ्या प्रत्येक अर्जदाराला प्रती विभाग प्रती लिलाव जास्तीतजास्त 3000 टन गव्हासाठी ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येईल. लिलाव न करता, राज्य सरकारांना 10,000 टन गहू प्रती राज्य या प्रमाणात 2 लाख टन गव्हाचे वितरण करण्यात येईल.तसेच केंद्रीय भांडार/एनसीसीएफ/नाफेड यांसारखे सरकारचे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/सहकारी संस्था/महामंडळे यांना कोणत्याही लिलावाविना, 3 लाख टन गहू दिला जाईल.अर्थात, यासाठी, या संस्थांनी गव्हाचे पिठात रुपांतर करून ते पीठ 29.50 रुपये प्रती किलो पेक्षा अधिक कमाल किरकोळ किंमत न आकारता, जनतेला विकणे अनिवार्य आहे.
यानुसार, डीएफपीडीने केंद्रीय भांडार/एनसीसीएफ/नाफेड यांना मागणीनुसार 2.5 लाख टन गव्हाचा पुरवठा केला असून 27 जानेवारी 2023 रोजी केंद्रीय भांडार आणि नाफेड यांना प्रत्येकी 1 लाख टन तर एनसीसीएफला 50000 टन गव्हाचा पुरवठा करण्यात आला आहे.
मुंबई- भाजपलानागपूर, अमरावतीत नाराजीचा फटका बसला असे सांगून भाजपने दुसऱ्यांची घरे फोडल्याने त्यांना फटका बसला आहे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. अपक्ष आमदार सत्यजित तांबेंबाबत आता हायकमांड निर्णय घेतील. मात्र, भाजपला दुसऱ्याची घरे फोडून आनंद होत आहे. आमचे तांबे कुटुुंबियांसोबत आमचे काही वैर नाही. भाजपकडून सर्व गोष्टी ठरवून केल्या आहेत, आम्हाला केवळ सुधीर तांबेंनी फार्म भरताना घेतलेल्या भूमिकेला विरोध आहे, असा टोलाही यावेळी नाना पटोले यांनी लगावला आहे.
काँग्रेसचे केवळ भाजपविरोधात मोट बांधणे हे ध्येय आहे. नागपूर आणि अमरावतीमध्ये भाजपला अंतर्गत नाराजीचा फटका दुसऱ्यांची घरे फोडल्याने बसला आहे, असा दावा पटोलेंनी केला आहे. तर भाजपा दुसऱ्यांचे घर फोडते. दुसऱ्यांचे घर फोडताना ते हसत आहेत. जेव्हा त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना समजेल, असे सूचक विधान मी केले होते. आज अमरावती नागपूर अशा दोन्ही विभागांमध्ये भाजपच्या अनेक नेत्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. नागपूर आणि अमरावती येथे भाजपचे सिटींग आमदार होते. तरीही त्यांच्या दोन्ही जागा पडल्या. दुसऱ्याच्या घरात आग लावणाऱ्यांना जनतेनी जागा दाखविली, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.
सुधीर तांबे यांनी ऐनवेळी पक्षाशी विश्वासघात केला
नाना पटोले म्हणाले की, सुधीर तांबे यांच्याशी बोलणे झाले होते., ते लढायला तयार होते. त्यांना कंटीन्यू करतो म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला धन्यवाद दिले , त्यांना त्यांच्या मुलाला लढवायचे असते तर त्यांनी ते सांगितले असते, त्यांच्या मुलाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेता आली असती. पण, सुधीर तांबे यांनी ऐनवेळी पक्षाशी विश्वासघात केला, असा आरोप पटोले यांनी केला आहे. तर त्यांच्या घरच्या वादात पडायचे नसल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले आहे. पुढच्या काळात नाशिकमधून मी काँग्रेसचे पन्नास आमदार निर्माण करेन. तशी रणनीती आम्ही तयारी केली आहे. त्या रणनीतीमध्ये आम्हाला यश येईल,” असेही नाना पटोले यांनी सांगितले.
पुणे: कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्या निवडणुकीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा दिल्ली येथून आज संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे. तसेच सहा तारखेला उमेदवार अर्ज दाखल केला जाणार आहे. अशी माहिती भाजपचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणुक होत आहे. ही निवडणुक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय आठवले गट यांच्या सह विविध संघटना आणि कसबा विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांची बैठक झाली.त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले कि,’ कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीबाबत आजपर्यंत अनेक वेळा बैठका झाल्या आहेत. या दोन्ही निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे. यासाठी भाजपकडून सर्व पक्षाच्या नेत्यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. तसेच या करीता राजकीय रणनीतीकार म्हणून आमदार माधुरी मिसाळ यांची सर्व पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा करण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. त्या सर्व नेत्यांशी संवाद साधत आहे. त्याच दरम्यान आमच्याकडून केंद्रीय समितीकडे इच्छुक उमेदवारांची नाव पाठविण्यात आली असून आज संध्याकाळपर्यंत नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत गाफिल राहाता कामा नये. त्या दृष्टीने आम्ही निवडणुकीची तयारी केल्याचं त्यांनी सांगितले.
माझी नेमणूक करायला नारायण राणे हे काय शिवसेना प्रमुख होते का?
मुंबई- नारायण राणे यांनी माफी मागावी नाहीतर खटला दाखल करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून नारायण राणे यांना नोटीस पाठवली असल्याचं स्पष्ट केलं आहे. नारायण राणे यांनी आपल्यावर केलेले आरोप खोटे आहेत असंही म्हटलं आहे. तसंच नारायण राणे यांनी माफी मागितली नाही तर मी एकटाच नाही तर ज्या शिवसेनेच्या नेत्यांविरोधात ते बोलले आहेत ते सगळे नोटीस पाठवणार आहेत असंही म्हटलं आहे.
नारायण राणे सार्वजनिक मंचावरून तसेच माध्यमातून माझ्याविषयी आणि शिवसेने बाबत बिनबुडाचे आरोप करीत असतात.हे आरोप त्यांनी सिध्द करावेत. अन्यथा माफी मागावी.माझे वकील सार्थक शेट्टी यांच्या मार्फत मी त्यांना कायदेशीर कारवाई बाबत नोटीस बजावली आहे. कर नाही तर डर कशाला?
नारायण राणे म्हणतात 2004 साली त्यांनी मला खासदार केले. माझी नेमणूक करण्यासाठी नारायण राणे हे शिवसेना प्रमुख होते का? असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राणे यांना विचारला आहे. नारायण राणे यांनी माफी मागितली नाही तर न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत म्हणाले, आता ती वेळ आली आहे. कायदेशीर लढाई लढू. नारायण राणे म्हणाले की, 2004 साली त्यांनी मला खासदार केले. माझी नेमणूक करण्यासाठी नारायण राणे हे शिवसेना प्रमुख होते का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यावेळी काय करत होते? आता नारायण राणेंनी बाळासाहेबांची शिवसेनाप्रमुख म्हणून मीच निवड केली हे सांगणे बाकी आहे. अशी टीका संजय राऊत यांनी केली.संजय राऊत म्हणाले, राणे खोट बोलत आहेत. त्यांनी मतदार यादीतील माझा फॉर्म पाहावा. मला आता त्याविषयी काही बोलायचे नाही. त्यांनी माफी मागितली नाही तर न्यायालयात खटला दाखल करणार आहे. शिवसेनेचे सर्वच नेते असे खटले दाखल करणार आहे. त्यांनी जे आरोप केलेत, ते सिद्ध करावे. तुम्ही केंद्रात मंत्री आहात देश लुटला गेलाय. त्यावर हे बोलताय का?