Home Blog Page 1429

माणच्या दुष्काळी भागात फुलतेय सफरचंदाची बाग

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन शेतकरी आर्थिक स्थैर्य तर प्राप्त करू शकतोच, पण, त्याचबरोबर शेतीमध्ये नवनवीन प्रयोग यशस्वी करून इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. असेच एक चांगले उदाहरण उभे केले आहे माण तालुक्यातील टाकेवाडीचे प्रगतशील शेतकरी जालंदर जगन्नाथ दडस यांनी.

सातारा जिल्ह्यातील माण हा दुष्काळी प्रदेश म्हणूनच ओळखला जातो. पाणी फौन्डेशनच्या माध्यमातून येथे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आले आहे. तसेच सिंचनाच्या अनेक योजना राबवून या भागात आता पाणी आले आहे. तरीही नैसर्गिक पाऊस हा कमीच असल्याने पाण्याची उपलब्धताही मर्यादीतच आहे. या सर्वावर मात करत जालंदर दडस यांनी माण सारख्या दुष्काळी भागात बाग फुलवली आहे आणि तीही चक्क सफरचंदाची. ऐकूण आश्चर्य वाटले ना. पण, हे खरं आहे. सिमला, काश्मिर सारख्या थंड हवेतील पीक अशी ओळख असलेले सफरचंद आता माण तालुक्यातील डोंगर रांगावरही घेता येते हे श्री. दडस यांनी दाखवून दिले आहे.

टाकेवाडीचे जालंदर जगन्नाथ दडस यांनी 10 वी नंतर सातारा येथून आयटीआय केले. त्यानंतर पुणे येथे एनसीपीसी केले. सुरुवातीला बजाज ॲटो पुणे येथे इलेक्ट्रिशियन म्हणून काम केले. पण, तिथे त्यांचे मन फारसे रमले नाही. म्हणून ते आपल्या गावी परत आले आणि शेतीकडे त्यांनी लक्ष देण्यास सुरुवात केली. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याचे त्यांनी ठरवले. त्यांच्या या ध्येयाला जिल्हा परिषद व कृषि विभाग यांचीही चांगली साथ मिळाली.

शेतीत प्रयोग करायचे तर अनेक सुविधा उभे करणे ही गरज असते. या सुविधा उभारण्यासाठी त्यांनी शासनाच्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये त्यांना ठिबक सिंचनासाठी 1 लाख रुपयांचे अनुदान मिळाले. त्यासोबतच विहीरीसाठी दीड लाख, 10 गुंठ्यात उभारण्यात आलेल्या शेडनेट साठी दीड लाख, पॅकिंगहाऊससाठी दीड लाख तर गांडूळ खत प्रकल्पासाठी 20 हजार आणि नॅरेफसाठी 20 हजार रुपये असे अनुदान त्यांना मिळाले. या शासनाच्या विविध योजना एकत्रित करून त्यांनी शेतीमध्ये फळबाग लागवड केली.

सुरुवातीस डाळिंब, सिताफळ यांची बाग केली. त्याचबरोबर भाजीपालाही घेत असत. सांगली येथील वन विभागाच्या प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी त्यांच्या शेतामध्ये भेट देण्यासाठी आले असता त्यांनी या भागामध्ये सफरचंदाची शेती होऊ शकते असे सांगितले. त्यांच्या या सूचनेनुसार श्री. दडस यांनी धोका पत्करण्याचे ठरवले. धोका अशासाठी की एक तर सफरचंद हे थंड हवेतील फळ, त्यात माण तालुक्यातील हवा ही उष्ण आणि कोरडी. त्यामुळे हा एक प्रकारचा धोका पत्करणेच होते. पण, त्यांनी मनावर घेतले आणि सुरुवातील 8 गुंठे क्षेत्रावर त्यांनी सफरचंदाची सिडलिंग राफ्टिंगद्वारे लागवड केली.

तिसऱ्या वर्षी सफरचंदाचे उत्पादन निघाले. 8 गुंठ्यामध्ये त्यांना 400 ते 500 किलो फळ मिळाले. सरासरी 130 रुपये किलो दराने त्याची विक्री करण्यात आली. त्यातून त्यांना सुमारे साडे पाच ते सहा लाखांचे उत्पन्न मिळाले. यातून त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी 30 गुंठ्यात सफरचंदाची बाग तयार केली. त्यामध्ये अण्णा, हरमन, डोरस्ट गोल्डन या जातीच्या सफरचंदाची लागवड केली. त्यामध्ये 13 गुंठ्यांमध्ये एम-9. एम-7, एम – 111 या जातींची हॉलंड आणि इटलीमधून मागवलेली रोपे लावली आहेत. तसेच 5 ते 6 गुंठ्यात त्यांनी नर्सरीही सुरु केली आहे.

मे ते जून मध्ये फळ काढणीसाठी येतात. यंदाच्या वर्षी या बागेतील सर्वच्या सर्व 800 झाडांना फळधारणा होणार असल्याचे श्री. दडस यांनी सांगितले. तिसऱ्या वर्षी एका झाडाला 15 किलो फळ येते. तर चौथ्या व पाचव्या वर्षापासून किमान 40 ते 50 किलो फळ एका झाडापासून मिळते असेही श्री. दडस यांनी सांगितले. तसेच जमीन गाळाची व निचऱ्याची असावी लागते. त्यामुळे फळ धारणा चांगली होते. सध्या त्यांच्या शेतामध्ये सिंगल लिडर पद्धतीने वाढलेली झाडे आहेत. त्यामुळे  उत्पादन चांगले मिळतेच शिवाय झाडाचे आयुष्यही वाढत असल्याचे ते म्हणाले. पुढील वर्षाच्या हंगामामध्ये किमान 35 ते 36 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या शिवाय शेतामध्ये डांळिंबाची दीड एकरात 850, सिताफळाची दीड एकरात 700 झाडांबरोबरच आंबा, नारळ, अंजिर, जांभूळ, रामफळ अशी फळझाडे लावली आहेत.  संपूर्ण शेती ही सेंद्रीय पद्धतीने करत असल्याचेही श्री. दडस यांनी सांगितले.

या संपूर्ण प्रकल्पामध्ये शासकीय योजनांची व शासनाच्या व जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाची सर्वात मोठी मदत झाल्याचे श्री. दडस आवर्जून सांगतात. ज्या ज्या वेळी अडचण आली त्या त्या वेळी कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी योग्य मार्गदर्शन केल्याचे सांगून शासन राबवत असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळाल्यामुळे शेतीमध्ये विविध प्रयोग करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना  त्यांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे श्री. दडस यांना जिल्हा परिषदेचा सेंद्रीय शेतीसाठीचा डॉ.जे.के.बसू सेंद्रिय व अधुनिक शेती पुरस्कार 2022-23 देऊन सन्मानित करण्यात आले आहे. माण सारख्या दुष्काळी भागात विविध शासकीय योनजा राबवून शेतीमध्ये चांगले प्रयोग करून जालंदर दडस यांनी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ हा मंत्र दिला असल्याचे दिसून येते.

हेमंतकुमार चव्हाण

माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, सातारा

कानात ब्ल्यूटूथ, शर्टवर कॅमेरा बसवून पोलिस भरती परीक्षेत काॅपी, १० जणांना पुण्यात अटक

पुणे-राज्य राखीव दलाच्या पोलिस शिपाई भरती परीक्षेत ‘हायटेक’ काॅपीबहाद्दरांच्या रॅकेटचा पर्दाफाश पुण्यात रविवारी करण्यात आला. या उमेदवारांनी कानात लिंबोळीच्या आकाराचे ब्ल्यूटूथ उपकरण आणि शर्टच्या बटणावर छोटासा स्पाय कॅमेरा लावून कॉपी करण्याचा प्रयत्न केला. परंतु परीक्षेसाठी नियुक्त भरारी पथकाला याची आधीच कुणकुण लागल्याने छत्रपती संभाजीनगरातील ४ उमेदवारांसह एकूण १० जणांना पोलिसांनी परीक्षा देतानाच रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी आरोपींवर अहमदनगर येथील राज्य राखीव पोलिस दल गटाचे पोलिस उपनिरीक्षक अजित कुंभार यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.योगेश रामसिंग गुसिंगे (१९, रा. बोरसर, ता. वैजापूर,), सागर संजय सुलाने (१९, रा. गोकुळवाडी, ता. गंगापूर, संभाजीनगर), योगेश सूर्यभान जाधव (२५, रा. शिवगड तांडा, ता. पैठण,), लखन उदलसिंग नायमने (२१, रा. काद्राबाद, सर्व जिल्हा छत्रपती संभाजीनगर) आरोपींचे साथीदार : प्रीतम गुसिंगे, अर्जुन राजपूत, अण्णा व इतर. भरारी पथकाने एकूण १० जणांना अटक केली.

राज्य राखीव दलाने राज्यभरातील सर्व अधिकाऱ्यांचे भरारी पथक नेमून या परीक्षेवर देखरेख केली होती.राज्य राखीव दल क्रमांक १९ ची पोलिस शिपाई भरती परीक्षा रविवारी पुण्यातील सिंहगड कॉलेज कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातून सुमारे ८५०० उमेदवारांनी ही परीक्षा दिली. पोलिस, आरोग्य, शिक्षक भरती परीक्षांमधील घोटाळे उघडकीस आले असल्याने राज्य राखीव पोलिस दलाने आधीच तयारी केली होती. गैरव्यवहार करणाऱ्या आरोपींचा माग काढून त्यांची यादी तयार केली. त्यातून १०० संशयितांची नावे काढून त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले होते. संशयित उमेदवारांची अंगझडती घेण्यात आली. त्यांच्या कानाची पेन्सिल टॉर्चने तपासणी करून चिमट्याने कानातील लिंबोळीच्या आकाराचे ब्ल्यूटूथ उपकरण काढण्यात आले. आराेपींनी काळ्या रंगाचे शर्ट व बनियन घातले होते. कानाच्या आतील बाजूस बारीक लिंबोळीच्या आकाराचे ब्ल्यूटूथ उपकरण घातले. खिशात एटीएम कार्डसारखे उपकरण ठेवले होते. त्यात एक सिमकार्ड बसवले होते ते ब्लूटूथशी कनेक्ट होते. शर्टच्या बटणावर स्पाय कॅमेरा लावलेला होता. ब्ल्यूटूथ उपकरण सहजासहजी कुणाला दिसत नाही.

प्रश्नपत्रिका हातात पडताच स्पाय कॅमेऱ्याने पेपरचे स्कॅन करून ते फोटो ऑटोमॅटिकली परीक्षा केंद्राबाहेर असलेल्या साथीदारांकडे ई-मेलवर जात होते. त्यानंतर इतर साथीदार प्रश्नांची उत्तरे शोधून लगेच संबंधित परीक्षार्थींना ब्ल्यूटूथवर पटापट उत्तरे सांगत होते. परीक्षार्थी योग्य उत्तरांवर खुणा करून ते ओआरएम शीट फाडून टाकत होते. हे सर्व करताना परीक्षा केंद्राबाहेर ठेवलेल्या बॅगेतील मोबाइल फोनही सुरूच ठेवले जात होते.

उमेदवार परीक्षा देत असताना प्रीतम गुसिंगे, अर्जुन राजपूत, अण्णा व इतर बाहेर घुटमळत होते. त्यांच्याकडेही एक सिमकार्ड, मोबाइल, जीएसएम बॉक्स, कॅप, कानात बसणारे उपकरण होते. अर्जुन हा त्याच्याकडील साहित्याच्या आधारे प्रश्नांची उत्तरे देणार होता. विशेष म्हणजे डिजिटल उपकरणे वापरण्यास बंदी असूनही उमेदवारांनी हे उद्योग केले.

रोहित टिळकांचा भाजपा प्रवेश निश्चित ? लोकसभा कि विधानसभा या प्रश्नावर खल..?

पुणे- कॉंग्रेस कडून वारंवार कसबा विधानसभा निवडणूक लढलेले आणि पराभूत झालेले रोहित टिळकांचा आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश होणार असल्याच्या वृत्ताने पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित टिळक यांचे नाव वरिष्ठ पातळीवरूनच सुचविले गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराची घोषणा झाल्याचा क्रम दाखविला जातो आहे.मात्र टिळक यांनी भाजपात जाऊन हातून निसटलेला कसबा विधानसभेचा गड खेचून आणायचा कि लोकसभा लढवून भाजपचा नवा चेहरा म्हणून पुढे यायचे यावर वरिष्ठ स्तरावर खल होत असावा असा सूत्रांचाही अंदाज आहे.

देशात भाजपाची म्हणजेच मोदी शहा यांची सत्ता आल्यावर अन्य पक्षातील काही नेत्यांमध्ये प्रचंड चलबिचल सुरु झाली,हर्षवर्धन पाटील कॉंग्रेसचे नेते होता होता भाजपात पोहोचले,असे म्हणतात कि विश्वजित कदमांनी गेल्या लोकसभेतच कॉंग्रेसची उमेदवारी लढूनच भाजपला साथ दिली.आता कॉंग्रेसच्या सहयोगी पक्षांतही फुट पडली आहे.शिवसेना,राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची २/२ शकले झाली आहेत.शहर पातळीवर देखील त्याचा मोठा प्रभाव पडला आहे.पुण्यात एकनाथ शिंदे यांचा ग्रुप भरारी घेत असताना पुण्याच्या नीलम गोऱ्हे यांनी देखील ठाकरेंची साथ सोडून शिंदे यांच्या समूहात असल्याचे दाखवून दिले आहे.शिवसेनेचे जुने जाणते नेते गडप आहेत.तसेच राष्ट्रवादी मध्ये देखील शहर अध्यक्ष प्रशांत जगताप वगळले तर कोणी विरोधक फारसे सक्रीय नसल्याचे दिसत आहे.या उलट अजित पवारांच्या पाठीशी नूतन अध्यक्ष दीपक मानकर यांनी राष्ट्रवादीतील मोठी फळी उभी केली आहे. तशीच नाना भानगिरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी सेना उभी करायचे यतन सुरूच ठेवले आहेत.अशा अवस्थेतच शहर कॉंग्रेस मध्ये कोणाचा पायपुस कोणाला नाही अशी स्थिती आहे.प्रभारी शहर अध्यक्ष आणि माजी शहर अध्यक्ष यांच्यात मोठी दरी निर्माण झालेली आहे आणि आबा बागुलांच्या सारखे ज्येष्ठ नेते एकाच जागेवर अडकवून ठेवल्याने या राजकारणापासून अलिप्त राहिलेले दिसत आहेत.एकीकडे विविध राज्यात कॉंग्रेसला चांगले यश मिळत असताना पुणे शहर कॉंग्रेस मध्ये मात्र एकमेकंचे पाय खेचण्याची आणि मीच कसा मोठा नेता हे कार्यकर्त्यांचा संच न सांभाळता एकेकटे पुढे होऊन दर्शविण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. निष्ठावंत म्हणणरे स्थानिक नेते असणारे देखील नेहमीप्रमाणे प्रादेशिक आणि राष्ट्रीय नेत्यांच्या पुढे मागे फिरत जी जी करत आपल्याच पोळीवर तूप ओढण्यात मश्गुल राहत असल्याचे दिसून येत आहे.अशा परिस्थितीत जयंतराव टिळकांच्या पासून रोहित टिळकांपर्यंत कॉंग्रेस बरोबर राहिलेला युवा वर्ग देखील खचला आहे.त्याचीच परिणीती म्हणून रोहित टिळक भाजपकडे ओढले जात असावेत असे हि सूत्रांचे म्हणणे आहे.भाजपमध्ये संधी मिळू शकते,वाव मिळू शकतो अशा आशा त्यांच्या पल्लवित होत असाव्यात असा दावा केला जातोय.तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर नाही मात्र वरिष्ठ पातळीवरून रोहित टिळकांच्या नावाचा विचार झालेला दिसतो आहे.एकूणच राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही मात्र लोकसभा टिळकांना अवघड जाईल म्हणून विधानसभाच त्यांच्यावर सोपवून स्थानिक राजकारण हि सांभाळण्यात येईल असेही बोलले जाते आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय रोहित टिळक यांनी जाहीर केल्यावर शहर कॉंग्रेस मधील पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि कारवाईची मागणीही केली होती. मात्र आजवर याबात कुठेही वरिष्ठ पातळीवर हालचाल दिसून आलेली नाही.मात्र या पुरस्कार समारंभानंतर टिळक यांना कॉंग्रेस पक्षात कसे स्थान मिळेल याबाबत देखील शंका आहेच या सर्व परिस्थितीची देखील या राजकारणाला जोड दिली जाते आहे.

विश्वकल्याणासाठी सारसबाग गणपती मंदिरात विष्णू याग व विष्णुसहस्रनाम पठण 

गीता फाउंडेशन मिरज अंतर्गत पुणे श्रीनिवास ग्रुप आयोजित ; अधिक मास निमित्त विष्णू यागाचे आयोजन, तब्बल सातशे भाविकांचा सहभाग
पुणे : विश्व कल्याणाकरिता, समाजाच्या उत्तम आरोग्याकरीता गीता फाउंडेशन मिरज अंतर्गत पुणे श्रीनिवास ग्रुपच्यावतीने अधिक मास निमित्त विष्णू यागाचे आयोजन करण्यात आले. विविध प्रकारच्या धार्मिक विधींनी यज्ञाला प्रारंभ झाला. तब्बल सातशे भाविक सहभागी होत यावेळी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करण्यात आले.

सारसबागेतील गणपती मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुण्यातील श्रीनिवास ग्रुपच्या विद्या बेळंबे, सुमित्रा चव्हाण, श्रद्धा देवकर, शैलजा मोरे, वंदना साठे, उज्वल धर्माधिकारी व इतर सहकारी उपस्थित होते. सलग सहा तास याग सुरू होता. गणपती मंदिरातील मंडपात होमकुंड साकारण्यात आले होते.

भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांची उपासना करून जगाच्या कल्याणा करिता व समाजाचे आरोग्या चांगले राहण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच भगवान विष्णूांच्या नामाचा जप करण्यासाठी हजारो भाविक सहभागी झाले होते. यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

समाज माध्यमातून आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २४ : समाज माध्यमातून महामानवांबाबत आक्षेपार्ह लिखाण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई होण्यासाठी राज्य शासन लवकरच उच्चस्तरीय समिती  नेमणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ व ‘हिंदू पोस्ट’ ही संकेतस्थळे तत्काळ बंद करून संकेतस्थळ चालविणाऱ्या व लिखाण प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याबाबत विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या कार्याविषयी खोट्या माहितीच्या आधारे चुकीची मांडणी करून  समाजाच्या भावना दुखावणारा अपमानास्पद लेख इंडिक टेल्स व ‘हिंदू पोस्ट’ या संकेतस्थळ आणि bhardwajspeaks या ट्व‍िटर अकाऊंटधारकाने प्रसारित केला असल्याची बाब ३१ मे २०२३ रोजी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने निदर्शनास आली आहे. संबंधित पोस्ट व मजकूर लिहिणाऱ्या व प्रसारित करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, यातील आरोपीचा शोध घेण्याकरीता संबंधित संकेतस्थळ व ट्व‍िटरला पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

कायद्यात असलेली जास्तीत जास्त शिक्षा आरोपीला होईल, अशी तरतूद करणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रज्ञा सातव यांनी सहभाग घेतला.

देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्चशिक्षणाची संधी : शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 24 : देशातील एआयआयएमएस (AIIMS), आयआयएम (IIM), आयआयआयटी (IIIT), एन‌आटी (NIT), आयआयएससी (IISc), आयआयएसइआर (IISER)  या शैक्षणिक संस्थांसह केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील मान्यताप्राप्त नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती/नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यासाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना समाज कल्याण विभागाकडून राबविली जाते. या योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

राज्यातील १०० अनुसूचित जातीच्या /नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.  राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्याच्या उद्देशाने विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळनिहाय १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांस संबंधित विद्यापीठ/ संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क, नोंदणी शुल्क, जिमखाना, ग्रंथालय, संगणक इत्यादी शुल्क संबंधित विद्यापीठ/ शैक्षणिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅक खात्यात जमा करण्यात येते. वसतिगृह व भोजन शुल्क याचा देखील संस्था आकारणीनुसार खर्च देण्यात येणार आहे. तसेच पुस्तकांसाठी ५ हजार रुपये व इतर शैक्षणिक खर्चासाठी ५ हजार रुपये असे दहा हजार रुपये दोन टप्प्यात अदा केले जाणार आहे.

या योजनेविषयी आधिक माहिती, जाहिरात, अर्ज व नियमावली शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जलद दुवे रोजगार या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली आहे. या संकेतस्थळावरुन विहित अर्जाचा नमुना डाऊनलोड करुन तो परिपूर्ण भरुन कागदपत्रांसह १४ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, ३ चर्च पथ, पुणे येथे करावा. पदवी /पदव्युतर पदवी/ पदव्युतर पदविका पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ देय असणार आहे. राज्यातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती समाजकल्याण आयुक्त श्री. बकोरिया यांनी दिली आहे.

“नदी सुशोभीकरण प्रकल्पाच्या” नावाखाली निसर्गावर हल्ला

रिव्हर-वॉकद्वारे नदी सुशोभीकरण प्रकल्पाचे अंतरंग समजवले

पुणे (प्रतिनिधी): जागतिक हवामान बदलामुळे पावसाचा वाढलेला जोर, अतीवृष्टी व ढगफूटीच्या घटना वाढत आहेत. अशा परिस्थितीमध्ये नदीपात्रावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण – काठावर बांधकाम किंवा बराज बांधणे हे पुणे शहरासाठी पूराचा धोका वाढवणे होय. याबाबत शासकीय अहवालात नोंद असूनही पुणे महानगर पालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि “नदी सुशोभीकरण प्रकल्पाच्या” नावाखाली नदी पात्रामध्ये बांधकाम करत आहे, असे परखड मत वास्तुविशारद आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सारंग यादवडकर यांनी मांडले.
निमित्त होते लोकायत आयोजित रिव्हर-वॉकचे हा रिव्हर-वॉक रविवार २३ जुलै रोजी सकाळी ७:३० वा बंड-गार्डन नजिकच्या नदी पात्राला आयोजित करण्यात आला.
उत्तर भारतातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील नद्या आणि नदीकाठ विकास प्रकल्प (RFD) हा पुणेकर म्हणून सर्वांनी समजून घेणं महत्वाचं आहे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केलं असं संयोजक रुषल हिना यांनी सांगितले
लोकायतच्या समन्वयिका श्रद्धा म्हणाल्या कि आम्ही आमच्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी व पुणेकरांच्या हितासाठी या प्रकल्पामुळे नक्की काय परिणाम होणार आहेत हे सांगण्यासाठी नदीकाठच्या विविध वस्त्या व सोसायटीमध्ये जनजागृती अभियान राबवणार आहोत
गेल्या काही वर्षांत देशातील महानगरांमध्ये आलेले पूर व देशाच्या राजधानीमध्ये गेल्या आठवड्यात आलेला पूरही अशाच प्रकारच्या अतिक्रमणाचा परिणाम आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. पुणेकर नागरिकांनी शासनावर, राज्यकर्त्यांवर दबाव टाकून हे घातक प्रकल्प थांबवायला हवेत याबद्दल नागरिकांनी एकमत व्यक्त केले. ५० पेक्षा अधिक नागरिक त्यात सहभागी झाले. यावेळी पुणे रिव्हर रिव्हायवलचे कार्यकर्तेही उपस्थित होते. आम्हाला शाश्वत विकास हवा आहे म्हणूनच आम्ही सर्व जण येत्या ९ ऑगस्टला या प्रकल्पाच्या निषेधार्थ पुणे महानगरपालिकेला सकाळी १० वाजता घेराव घालणार आहोत व इतरांनही यात सहभागी करून घेणार असा निर्धार रिव्हर-वॉकचे शेवटी सर्वांनी केला

शेतकऱ्यांसाठी डिजिटल मीडियाचा महाराष्ट्रातील पहिला उपक्रम – आ. राजेंद्र राऊत

बार्शी:- निसर्गामध्ये होणारे बदल, पावसाचा अवेळीपणा, अपुरा पाऊस, बियाणे, खते, औषधाचे वाढते दर यामुळे शेतकरी अगोदरच अडचणीमध्ये सापडलेला आहे. बळीराजाला संकटातून बाहेर काढण्यासाठी, शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या हेतूने, मोदी सरकारने प्रधानमंत्री खरीप हंगाम पिकाविमा 2023 या योजनेसाठी नाममात्र 1 रुपया नोंदणी फी आकारणी केली आहे. जास्तीतजास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा, यासाठी पीकविमा नोंदणी आवश्यक आहे. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने, शासनाच्या योजना शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोचवून, शेतकऱ्यांसाठी मोफत पीकविमा नोंदणी शिबिराचा उपक्रम स्तुत्य असून, बार्शी तालुक्यातील आगळगाव येथे घेण्यात येत असलेला हा उपक्रम महाराष्ट्र राज्यातील पहिलाच उपक्रम असल्याचे प्रतिपादन यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात आगळगावचे ग्रामदैवत श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री भगवंत यांचे पूजन करून तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांनी कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये म्हटले कि, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना राज्यभर कार्यरत असून, चांदा ते बांदा पर्यंत साडेपाच हजार डिजिटल चॅनल या संघटनेमध्ये समाविष्ट झालेले आहेत. बार्शीमध्ये उदयास आलेली राज्यातील पाहिली डिजिटल मिडिया संघटना आगामी काळामध्ये रोल मॉडेल म्हणून देशामध्ये दिशादर्शक ठरेल. संघटनेच्या माध्यमातून फक्त पत्रकारिता न करता, सामाजिक भावनेतून राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 10 व्यक्तींचा सन्मान, मुंबई येथील सह्याद्री अतिथीग्रह येथे तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे व अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला होता. आजच्या आगळगाव येथील उपक्रमानिमित्त तीच परंपरा चालू ठेवली असून, सामाजिक बांधिलकी म्हणून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून, बार्शी तालुका कार्यकारिणी ने राबविलेल्या या उपक्रमाचे अनुकरण करून राज्यामध्ये विविध तालुक्यांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली असल्याचेही यावेळी त्यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रधानमंत्री खरीप पिक विमा नोंदणी शिबिरामधील शेतकऱ्यांची मोफत नोंदणी करून त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पीकविमा नोंदणी पावती देण्यात आली. या शिबिरासाठी आगळगाव परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, जेष्ठ संपादक, माध्यम तज्ञ राजा माने हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, आगळगावच्या सरपंच पुतळा गरड, उपसरपंच वैभव उकिरडे, तलाठी ताले भाऊसाहेब, शरद उकिरडे, बबनराव गायकवाड, संघटनेचे राज्य संघटक मुरलीधर चव्हाण, राज्य कोषाध्यक्ष अमित इंगोले, राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष सूर्यवंशी, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विजय कोरे, जिल्हा सचिव विनोद ननवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धिरज शेळके यांनी केले तर उपस्थितांचे आभार विक्रांत पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे बार्शी तालुका कार्यकारिणी अध्यक्ष दिनेश मेटकरी, उपाध्यक्ष अमीन गोरे, सचिव धिरज शेळके, खजिनदार विक्रांत पवार, सदस्य भैरवनाथ चौधरी, विकी गोंदकर, राजेश खराडे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी आगळगाव ग्रामपंचायत, कृषी विभागाचे अधिकारी, कृषी सहाय्यक तसेच आबा फाऊंडेशनचे सदस्य, संघवी ऍग्रो सर्व्हिसेस व मधुबन नर्सरी यांचे विशेष सहकार्य लाभले.

निधी वाटपामध्ये कोणत्याही मतदारसंघावर अन्याय होणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २४ : राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी लोकप्रतिनिधींना आवश्यकतेनुसार निधीचे वितरण करण्यात येते. यामध्ये कोणत्याही मतदारसंघावर अन्याय होणार नाही, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषद सदस्यांना देण्यात येणाऱ्या विकास निधीमध्ये समान वाटपाबाबत धोरण आणणार का याबाबत नियम 289 अन्वये प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी कोणत्याही मतदारसंघावर अन्याय होणार नाही, असे सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्याचा अर्थसंकल्प तयार करताना प्रत्येक विभागाकडून प्रस्ताव मागविले जातात. त्यानुसार आर्थिक धोरण समितीच्या बैठकीत निधीची उपलब्धता विचारात घेऊन अर्थसंकल्प अंतिम केले जाते. यापूर्वीच्या काही योजनांना स्थगिती देण्यात आली होती. प्राधान्य लक्षात घेऊन काही कामांवरील स्थगिती उठविण्यात आली असल्याचे त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले. विधान परिषदेतील सदस्यांमध्ये निधीचे असमान वितरण झाले असल्यास कोणत्याही मतदारसंघावर अन्याय होणार नाही यादृष्टीने विकास कामांची आवश्यकता आणि गुणवत्ता लक्षात घेऊन निधीचे वाटप करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, सचिन अहीर यांनी सहभाग घेतला.

गोदरेज कॅपिटलतर्फे एमएसएमईजना सक्षम करण्यासाठी ३१ बाजारपेठांत विनातारण व्यावसायिक कर्ज सुविधा लाँच

मुंबई – गोदरेज कॅपिटल या गोदरेज समूहाच्या आर्थिक सेवा विभागाने मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्रायजेससाठी (एमएसएमईज) खास तयार करण्यात आलेली विनातारण कर्ज सुविधा लाँच केली आहे. कर्ज मिळवण्यात या व्यवसायांना येणारी आव्हाने आणि त्यांची कॅश फ्लो व्यवस्थापनाची गरज लक्षात घेत गोदरेज कॅपिटलने परतफेडीचे नाविन्यपूर्ण आणि लवचिक पर्यायही उपलब्ध केले आहेत.

या कर्जामध्ये इतर लाभही मिळणार असून त्यात पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया, जलद मंजुरी आणि वितरण, ६० महिन्यांपर्यंतचा दीर्घ कालावधी तसेच परतफेडीसाठी दिला जाणारा या क्षेत्रात पहिल्यांदाच सुरू करण्यात आलेला रिवॉर्ड प्रोग्रॅम यांचा समावेश आहे.

भारताच्या आर्थिक विकासासाठी एमएसएमईज अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यांच्यामुळे रोजगार भरती, नाविन्य आणि एकंदर समृद्धीसाठी योगदान दिले जाते. मात्र, या व्यवसायांना खूपदा वित्तपुरवठ्याचे तातडीने आणि लवचिक पर्याय हवे असतात. तारणाचा अभाव आणि हंगामी व्यवसायाचे चक्र यांमुळे त्यांचा विकास आणि विस्ताराच्या मार्गात अडथळे येतात. त्यासाठी गोदरेज कॅपिटलतर्फे कर्जाचे लवचिक पर्याय उपलब्ध करत एमएसएमईजना त्यांच्या व्यावसायिक चक्राशी सुसंगत पद्धतीने कर्ज फेडण्याची मुभा दिली जाणार आहे.

गोदरेज कॅपिटलतर्फे मुंबई, बेंगळुरू, दिल्ली- एनसीआर, पुणे, अहमदाबाद, सुरत, इंदौर, चेन्नई, हैद्राबाद, जयपूर, चंदीगढ, अल्वार, बडोदा, कोईम्बतू, जालंधर, जोधपूर, कांचीपुरम, मंगलोर, सालेम, लुधियाना, म्हैसूर, नागपूर, नाशिक, राजकोट, उदयपूर, वापी, विजयवाडा, रंगारेड्डी, विशाखापट्टणम आणि ठाणे इत्यादी ठिकाणी व्यावसायिक कर्ज उपलब्ध केले जाणार आहे.

‘एमएसएमईजना येणारी आव्हाने आणि आर्थिक विकासातील त्यांची महत्त्वाची भूमिका यांची आम्हाला जाण आहे. तारणाशिवाय व्यावसायिक कर्ज देणारी उत्पादन श्रेणी विस्तारताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही आमचे भौगोलिक अस्तित्व विस्तारले असून आता हे व्यावसायिक कर्ज ३१ बाजारपेठांत उपलब्ध होणार आहे. एमएसएमईजसाठी पसंतीची कर्जपुरवठादार कंपनी बनण्याचे आमचे ध्येय आहे व त्यासाठी नाविन्यपूर्ण, लवचिक आणि व्यवसाय मालकाच्या कॅश फ्लोसाठी पूरक उत्पादने तयार करण्यासाठी बांधील आहोत.’

गोदरेज कॅपिटलने नुकताच निर्माणण हा नवा डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच करत एमएसएमई मालकांना त्यांचा व्यवसाय विस्तारण्यासाठी सर्वसमावेशक संधी मिळवून दिली आहे. कंपनीने सुरुवातीला अमेझॉन ग्लोबल सेलिंग, ऑनस्युरिटी, झॉल्विट आणि एमएसएमईएक्स यांच्याशी भागिदारी करत बाजारपेठेतील व्याप्ती वाढवली. त्याचप्रमाणे कायदेशीर व पालन प्रक्रिया सुलभ करणे, कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपणे आणि छोट्या व्यवसायांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे यासाठीही कंपनी कार्यरत आहे.

नोव्हेंबर २०२० मध्ये व्यवसाय सुरू केल्यापासून गोदरेज कॅपिटलने गृहक्षेत्र, एसएमई आणि एमएसएमई कर्ज क्षेत्रात ६५०० कोटी रुपयांची बॅलन्सशीट तयार केली आहे.

गिर्यारोहकांचा केंद्र व राज्य सरकारने सन्मान करून प्रोत्साहन द्यावे – खा. छत्रपती युवराज संभाजीराजे

“सागरमाथा : गाथा एव्हरेस्टच्या विजयाची” या एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांच्या पुस्तकाचे खा. छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते प्रकाशन.

पुणे- एव्हरेस्टसारख्या शिखरावर चढाई करणे ही एक प्रकारची लढाईच आहे. कसलेल्या गिर्यारोहकांची जन्म मरणाची ही कसोटी असते, त्यामध्ये यशस्वी झालेल्या गिर्यारोहकांचा केंद्र व राज्य सरकारने सन्मान करून त्यांना प्रोत्साहन द्यावे यासाठी आपण सरकार दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी केले.
खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते चऱ्होली येथे रविवारी एव्हरेस्टवीर श्रीहरी अशोक तापकीर यांच्या “सागरमाथा – गाथा एव्हरेस्टच्या विजयाची” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ गिर्यारोहक ऋषीकेश यादव, महाराष्ट्रातील पहिले एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण, ज्ञान आशा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अमित आंद्रे, ज्ञानेश्वर तापकीर, माजी महापौर नितिन काळजे, साहित्यिक व कामगार नेते अरूण बोऱ्हाडे आदी यावेळी उपस्थित होते.
उपस्थितांशी संवाद साधताना खा. छत्रपती युवराज संभाजीराजे म्हणाले की, या साहसी क्रीडा प्रकारची शासकीय पातळीवर दखल घेतली जात नाही, हीच मोठी खंत आहे. वास्तविक गिर्यारोहण हे सामान्य व्यक्तीच्या कुवतीचे नाही. एव्हरेस्ट शिखरावर जाऊन भारताचा राष्ट्रध्वज उंचावणाऱ्या या खेळाडूंचा यथोचित सन्मान केंद्र व राज्य सरकारने करायला हवा. एवढेच नाही तर, त्यांना प्रोत्साहन देण्याची कायमस्वरूपी योजना असायला हवी. यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करू. भारतातील इतर राज्यामध्ये एव्हरेस्टवीर अथवा इतर मोहिमवीर गिर्यारोहकांना भरीव आर्थिक मदत देण्यात येते, ती व्यवस्था महाराष्ट्रात नसावी, उलट शासनाने या साहसी खेळाचा समावेश पर्यटनामध्ये केला आहे याविषयी आश्चर्य व्यक्त करून खा. संभाजीराजे यांनी यासाठी आपण गिर्यारोहकांच्या पाठीशी सदैव उभा राहीन, असे स्पष्ट केले. सागरमाथा हे पुस्तक हे केवळ गिर्यारोहकांनाच नव्हे तर आव्हानात्मक काम करणाऱ्या प्रत्येकाला मार्गदर्शक ठरेल असेही ते म्हणाले.
यावेळी सागरमाथा गिर्यारोहण संस्थेचे आणि ज्ञान आशा फाउंडेशनच्या संकेतस्थळांचे खा. संभाजीराजे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी बोलताना महाराष्ट्रातील पहिले गिर्यारोहक सुरेंद्र चव्हाण यांनी श्रीहरी चे कौतुक करताना सामान्य शेतकरी कुटुंबातील हा युवक जिद्द, चिकाटी आणि प्रखर आत्मविश्वास याच्या बळावर जगातील सर्वोच्च शिखरावर चढाई करून थांबला नाही, तर आपल्या अनुभवाची शिदोरी नवीन गिर्यारोहकांना देत राहिला, असे गौरवउद्गार काढले. यावेळी अध्यक्ष हृषिकेश यादव यांनी श्रीहरी तापकीर यांच्या पुस्तकातून प्रत्येक युवकाला जीवनातील कठीण प्रसंगाला धैर्याने सामोरे जाण्याचे मानसिक बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
श्रीहरी तापकीर, नितीन काळजे, ज्ञानेश्वर तापकीर, अमित आंद्रे यांनीही मनोगत व्यक्त केले.
सागरमाथा गिर्यारोहण संस्था आणि ज्ञान – आशा फाउंडेशन या संस्थांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण, शरद कुलकर्णी, किशोर धनकुडे, भगवान चवले, लहू उघडे आणि सुविधा कडलग या गिर्यारोहकांचा सन्मान करण्यात आला. तसेच दिवंगत गिर्यारोहक रमेश गुळवे आणि श्रीहरी तापकीर यांच्या माता पित्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास गिर्यारोहण क्षेत्रातील मान्यवरांसह ज्ञानेश्वर मोळक, बी. आर. मेहता, बाळासाहेब पाटील, विनायक खोत, निलेश गावडे, ब. हि. चिंचवडे, यश मस्करे, विलास मडेगिरी, विनया तापकीर, सुवर्णा बुर्डे, सचिन तापकीर, कुणाल तापकीर, संदीप तापकीर, सागरमाथा संस्थेचे अध्यक्ष प्रवीण हरपळे, सुमित दाभाडे, पांडुरंग शिंदे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक अरुण बोऱ्हाडे, सूत्र संचालन नाना शिवले आणि प्रशांत पवार यांनी आभार मानले.

पुराचे पाणी घरात घुसुन झालेल्या नुकसानीबद्दलपाच हजारांऐवजी प्रतिकुटुंब दहा हजारांची मदत-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधीमंडळात घोषणा

पुरग्रस्त अधिकृत दुकाने आणि टपरीधारकांनाही
निकषांच्या पलिकडे जावून गेल्यावर्षीप्रमाणे मदत

मुंबई, दि. 24 :- पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीमध्ये यंदा वाढ करण्यात आली असून पूरग्रस्तांना यंदा पाच हजार रुपयांऐवजी प्रतिकुटुंब दहा हजार रुपयांची मदत केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत आणि विधान परिषेदतही केली.

राज्य आपत्ती प्रतिसाद मदतनिधीच्या निकषांमध्ये दुकानांसाठी मदत अनुज्ञेय नसली तरी, अधिकृत दुकाने आणि टपरीधारकांनाही नुकसानीपोटी मगील वर्षाप्रमाणे मदत दिली जाईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात स्पष्ट केले. उद्या (25 जुलै रोजी) राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून संपूर्ण राज्यातील अतिवृष्टी आणि पुरस्थितीचा आढावा घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यानी स्पष्ट केले.

राज्यात सुरु असलेल्या अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांच्या पाठींशी राज्य सरकार भक्कमपणे उभे असून बाधितांना मदत करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात निवेदन केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, गेल्यावर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर, गोगलगायींचा प्रादुर्भाव, सततचा पाऊस यामुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईकरता 8 हजार 677 कोटी तर यंदा मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवेळी पावसाने झालेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईसाठी 513 कोटींचा निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. गेल्यावर्षी सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईसाठी 1500 कोटी मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. डीबीटी प्रणालीमार्फत 600 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांनी संगणकीय प्रणालीमध्ये मंजूर केली असून ती लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल.

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिमसह अनेक जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

धोकादायक परिस्थिती असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. पुरस्थितीमूळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तातडीने द्यावी. शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत. ज्या ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या असतील त्या ठिकाणी देखिल पंचनामे त्वरित सुरु करावेत. बाधित व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप तातडीने, त्याच दिवशी होईल याकरीता प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानांना पुरेसा धान्याचा पुरवठा करावा. ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते त्यांना सध्याच्या दराने पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी. रोगराई पसरु नये याकरीता स्वच्छता करणे, औषध फवारणी करणे यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात. ज्या ठिकाणी पाणी दुषित झाले आहे, त्याठिकाणी स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यकतेनुसार विहिरी अधिग्रहित कराव्यात. गरज असेल त्या ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. ज्याठिकाणी अतिवृष्टीमुळे रस्त्यांची हानी झाल्याने गावांचा संपर्क तुटलेला आहे, अशा रस्त्यांची बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी. पुरामूळे ज्या शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य खराब झाले आहे त्यांना शिक्षण विभागाने शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन द्यावे, आदी सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

प्रधानमंत्री कृषी विमा योजनेची नोंदणी मुदत वाढविण्याची सुधीर मुनगंटीवार यांची केंद्राकडे मागणी

0

मुंबई, दि. 24 जुलै 2023 ;

चंद्रपूरसह राज्यात अनेक भागात झालेल्या आणि अजूनही काही भागात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री कृषी विमा योजनेच्या नोंदणीची मुदत वाढवावी अशी मागणी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र शासनास पत्र लिहून केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. इंटरनेट, दूरध्वनी सेवा, विज पुरवठाही अतिवृष्टी आणि पुरामुळे खंडित झाले आहेत. अशा परिस्थितीत सध्याच्या विहित मुदतीत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी विमा योजनेची नोंदणी करता येणे शक्य होणार नाही. केवळ चंद्रपुरातच नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे अशीच परिस्थिती निर्माण झाली असल्याने, केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी विमा योजनेची नोंदणी मुदत वाढविण्याची आवश्यकता आहे, असे ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय कृषी खात्यास लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री कृषी विमा योजनेच्या सुरक्षाकवचावर अवलंबून असतो. या योजनेची व्यापकता आणि लेकप्रियता लक्षात घेता केंद्राने राज्यातील नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर योग्य तो निर्णय तातडीने घेण्याची विनंती ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी या पत्राद्वारे केली आहे.

वजन, मापे, मानकांची पडताळणी करून घेण्याचे आवाहन

पुणे, दि. २४: सामान्य ग्राहकांना अचूक वजन व मापाने वस्तू अथवा सेवा देण्याच्या दृष्टीने सर्व व्यापारी, औद्योगिक प्रतिष्ठान तसेच इतर वजने, मापे वापरकर्त्यांनी त्यांच्याकडील वजने, मापे व मानकांची पडताळणी व मुद्रांकन करून घ्यावे, असे आवाहन उप नियंत्रक वैध मापन शाखा पुणे यांनी केले आहे.

वैधमापन शास्त्र यंत्रणेमार्फत वजने, मापे व मानके यांची पडताळणी व मुद्रांकनाची कामे केली जातात. काही वजने वा मापे यांचे उपयोगकर्ते हे त्यांच्याकडील वजन व माप यांची पडताळणी व मुद्रांकन करून न घेता वापर करत असल्याचे यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे. अशा उपयोगकर्त्यांची माहिती संकलित करण्याकरिता वजने व मापे यांची दुरुस्ती करणाऱ्या परवानाधारकांना प्राधिकार पत्रे देऊन विहित नमुन्याप्रमाणे सर्वेक्षण करण्याकरीता वैधमापन शास्त्र यंत्रणेने प्राधिकृत केले आहे.

वजने, मापे पडताळणी व मुद्रांकन न करता वापरात आहेत अशा उपयोगकर्त्यांनी जवळच्या वैधमापन शास्त्र यंत्रणेच्या कार्यालयामध्ये संपर्क करून, वजने मापे पडताळणी व मुद्रांकन करून घ्यावे. तसेच सर्वेक्षणाकरता प्राधिकार पत्र घेऊन येणाऱ्या परवानाधारकास सहकार्य करावे, असेही सह नियंत्रक वैध मापन शास्त्र यांनी कळविले आहे.
0000

संघ लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी महाज्योतीमार्फत आर्थिक साहाय्य

पुणे, दि. २४: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्योती) संघ लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा उतीर्ण झालेल्या ३१४ विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये आर्थिक साहाय्य वितरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संस्थेने दिली आहे.

संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचा निकाल १२ जून रोजी जाहीर झाला असून महाज्योतीमार्फत इतर मागासवर्ग, विमुक्त भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून एकरकमी ५० हजार रुपये अर्थसहाय्याकरिता १६ जून ते ८ जुलै या कालावधीत अर्ज मागविण्यात आले होते. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी ३५६ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ३१४ विद्यार्थी या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. यापैकी २९८ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे एकूण १ कोटी ४९ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र विद्यार्थ्यांनी बँक तपशील सादर केल्यावर त्यांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात येईल.

संघ लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा १५ सप्टेंबर रोजी होणार असून संबंधित विद्यार्थ्यांना वितरीत केलेल्या अर्थसहाय्याचा या परीक्षेच्या तयारीसाठी लाभ होणार आहे, अशी माहितीही महाज्योतीचे प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे यांनी दिली आहे.