Home Blog Page 1428

पुणे,नाशिक,अहमदनगर येथील कुटुंब न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रात वाढ

मुंबई, दि. २५ : नाशिक, अहमदनगर व पुणे येथील महापालिका क्षेत्रासाठी स्थापन केलेल्या कुटुंब न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

उच्च न्यायालयाशी विचारविनिमय करून कुटुंब न्यायालय अधिनियम १९८४ च्या कलम ३ च्या पोट कलम (१) व (२) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून राज्य शासनाने काही शहरांच्या कुटुंब न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात वाढ केली आहे. यात नाशिक, अहमदनगर आणि पुणे शहरांच्या कुटुंब न्यायालयांचा समावेश आहे.

नाशिक येथील कुटुंब न्यायालयाचे अधिकार क्षेत्र देवळाली छावणी क्षेत्राच्या स्थानिक सीमांपर्यंत वाढविण्यात आले आहे. अहमदनगर येथील कुटुंब न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या स्थानिक सीमा अहमदनगर छावणी मंडळाच्या संपूर्ण क्षेत्रापर्यंत विस्तारित करण्यात आल्या आहेत.

तसेच पुणे महापालिका क्षेत्र व पुणे खडकी छावणी क्षेत्राचा समावेश असलेल्या  क्षेत्राकरिता पुणे येथे कुटुंब न्यायालय स्थापन केले आहे. या कुटुंब न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात वाढ करून ते देहूरोड छावणी क्षेत्राच्या स्थानिक सीमापर्यंत वाढविण्यात आले आहे, असे शासनाने एका अधिसूचनेद्वारे कळविले आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बस मालकांकडून १ कोटी ८३ लाख रुपयांचा दंड वसूल

परिवहन विभागाच्या वायूवेग पथकांमार्फत १४१६१ खासगी बसची तपासणी

मुंबई, दि. २५ : राज्य शासनाने विहित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी कंत्राटी प्रवासी बसची व अन्य गुन्ह्याबाबत तपासणीची मोहीम राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या माध्यमातून राबविण्यात आली. या मोहिमेत १४ हजार १६१ खासगी बसची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४,२७७ खासगी बस विविध गुन्ह्यांचे उल्लंघन करताना आढळून आल्या आहेत. त्यांच्या तपासणीसाठी प्रतिवेदने निर्गमित करण्यात आली आहेत, अशी माहिती मुंबई पूर्वचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

राज्य शासनाने २७ एप्रिल २०१८ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या- त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्य:स्थितीचे भाडेदर विचारात घेवून खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति किलोमीटर भाडेदराच्या ५० टक्के पेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर निश्चित केले आहेत.

शासनाने विहित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी कंत्राटी प्रवासी बसची व अन्य गुन्ह्यांबाबत तपासणीसाठी सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना १६ मे ते ३० जून २०२३ या कालावधीत विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या मोहिमेमध्ये बसची तपासणी करताना विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणे, टप्पा वाहतूक, प्रवासी बसमधून अवैधरित्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र वैध नसणे, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाइट, वायपर आदी वाहनांमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, मोटार वाहन कर भरल्याची खात्री करणे, जादा भाडे आकारणे, अग्निशमन यंत्रणा कार्यरत असणे, आपत्कालिन निर्गमन दरवाजा आणि इतर दरवाजे कार्यरत स्थितीत असल्याबाबतची तपासणी करण्यात आली.

परिवहन विभागातील सर्व परिवहन कार्यालयातील वायूवेग पथकांमार्फत ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. विशेष तपासणी मोहिमेत खासगी कंत्राटी बससंबंधी विविध गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्या बसवर कारवाई करण्यात आली.  राज्यभरातील सर्व कार्यालयातील वायूवेग पथकांमार्फत १४,१६१ खासगी बसची तपासणी करण्यात आली. यापैकी ४,२७७ खासगी बस या विविध गुन्ह्यांचे उल्लंघन करताना आढळल्या आहेत. यासर्व ४,२७७ दोषी बस मालकांना तपासणी प्रतिवेदने निर्गमित करुन प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. तपासणी दरम्यान रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाइट, वायपर इत्यादी गुन्ह्यांसाठी सर्वाधिक १,७०२ बस अशा प्रकारच्या गुन्हा करताना आढळून आल्या. त्यानंतर विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणाऱ्या ८९० बसविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. योग्यता प्रमाणपत्र वैध नसलेल्या ५७० खासगी बसवर कारवाई करण्यात आली. ५१४ बसमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे आढळून आले. मोटार वाहन कर न भरता ४८५ बस आढळून आल्या. आपत्कालिन दरवाजा कार्यरत स्थितीत नसणाऱ्या २९३ बस आढळून आल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. तसेच खासगी बसमधून अवैधरित्या व्यावसायिक पद्धतीने माल वाहतूक करणाऱ्या २२७ खासगी बसवर कारवाई करण्यात आली. बसच्या आसन क्षमतापेक्षा जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या १४७ बसवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच खासगी बसला वेग नियंत्रक बसविणे व ते कार्यरत असणे आवश्यक असताना वेग नियंत्रक नसणारी ७२ वाहने तपासणीमध्ये आढळून आली आहेत.

खडकवासल्यातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु

पुणे-खडकवासला धरण मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता वाजता ९१.८१ टक्के भरले होते. खडकवासला धरणात पावसाचा जोर सध्या कायम आहे.परिणामी आज रात्री 8 वाजता ४२८ क्युसेकने पाणी मुठा नदीत सोडण्यास सुरुवात झाली .यावेळी पानशेत धरण ६७.८८ टक्के भरले होते तर टेमघर ४५.२३ आणि वरसगाव ६१.४० टक्के भरले होते .एकूण चारही धरणात मिळून 63.77% टक्के पाणी साठा झाला आहे. गेल्या वर्षी मात्र आजच्या दिवशी चारही धरणात मिळून ७१. ५६ टक्के एवढा पाणी साठा होता .

विसर्ग वाढवून रात्री. ०९:०० वा. 856 क्यूसेक्स करण्यात आला आहे.

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 856 क्युसेक्स विसर्ग वाढवून रात्री. 10:00 वा. 1712 क्यूसेक्स करण्यात आला आहे.

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 1712 क्युसेक्स विसर्ग वाढवून रात्री. 11:00 वा. 3424 क्यूसेक्स करण्यात येत आहे.

पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे

आदर्श माता पुरस्काराने जयश्री बागुल सन्मानित

‘इंटरनेट,’एआय’च्या जमान्यात कौटुंबिक आपलेपणा वाढविण्याची नवी जबाबदारी आता प्रत्येक आईवर’

पुणे –
सद्यस्थितीत विविध दूरचित्रवाहिन्या पाठोपाठ मोबाईल, इंटरनेट ,व्हाट्सअप ,इंस्टाग्राम, ट्विटरच्या जगात मुलं पालकांपासून दूर जात आहे. त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात पालक आणि मुलं यांच्यातील अंतर अधिक वाढणार आहे. त्यामुळे कुटुंबातील सर्वांना एकत्र ठेवून कौटुंबिक आपलेपणा मुलांमध्ये वाढविण्याची नवी जबाबदारी आता प्रत्येक आईवर येऊन ठेपली असून कुटुंबातील संवाद हाच नात्यांमधील जिव्हाळा वाढवेल असे प्रतिपादन पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री आबा बागुल यांनी केले.
लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज, जय शंकर ज्येष्ठ नागरिक संघ आणि श्रीराम योग साधना,धनकवडी यांच्या संयुक्त विद्यमाने जयश्री आबा बागुल यांचा ज्योतीकुमार अग्रवाल यांच्या हस्ते आदर्श माता पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर पुणे महापालिकेच्या सहायक आयुक्त सुरेखा शिंदे, रविंद्र गोलार,भारती विद्यापीठ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शंकरराव पाटील, माजी नगरसेविका अश्विनी भागवत आदी उपस्थित होते.
यावेळी जयश्री बागुल म्हणाल्या कि, माझे पती माजी उपमहापौर आबा बागुल यांच्यासोबत प्रदीर्घ काळ सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक अशा अनेक क्षेत्रात मी काम करीत आहे. मात्र समाजासाठी वेळ देताना घराकडे व कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेत राहते. मुलांना लहान वयापासून वाढवताना आईने त्यांच्यावर केलेले संस्कार हेच अतिशय महत्वाचे असतात. प्रत्येक आई आपल्या मुलांवर चांगलेच संस्कार करते. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’ ही म्हण अतिशय सार्थ आहे. मी माझ्या मुलांचे संगोपन केले, त्यांच्यावर चांगले संस्कार केले.
आता सुना आणि नातवंड यांनी भरलेल्या ‘गोकुळा’त मी रमून जाते. अधून मधून वृद्धाश्रमाबद्दलच्या बातम्या ऐकू येतात तेव्हा वाईट वाटते. कोणतीच आई वृद्धाश्रमात जायला नको असे मला वाटते.असेही त्या म्हणाल्या.

शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित

पुणे, दि. २५: बियाणे, खते व कीटकनाशके लिंकींग, निकृष्ठ दर्जाचे बोगस निविष्ठांच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी ९८२२४४६६५५ हा व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून व्हाट्सॲप संदेशाद्वारे तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

कृषी आयुक्तालयस्तरावर तक्रार निवारण कक्षही स्थापन करण्यात आला असून हा कक्ष २४ X ७ कार्यरत आहे. तसेच शेतकरी आपली तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या इमेल पत्त्यावर देखील करु शकतात. तक्रार करणाऱ्या व्यक्तींची नावे गोपनीय ठेवण्यात येतील.

राज्याचे सरासरी पर्जन्यमान ४६३.८ मिमी असून या खरीप हंगामात २४ जुलै २०२३ पर्यंत प्रत्यक्षात ४५७.८ मिमी म्हणजे सरासरीच्या ९९ टक्के एवढा पाऊस पडला आहे. खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर असून २४ जुलै २०२३ अखेर प्रत्यक्षात ११४.६४ लाख हेक्टर क्षेत्रावर ८१ टक्के पेरणी झाली आहे. राज्यात पेरणीच्या कामाला वेग आला असून प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या तसेच भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत. २४ जुलै पर्यंत राज्यात सोयाबीन पिकाची ४४.०८ लाख हे. क्षेत्रावर, कापूस पिकाची ३९.८८ लाख हे. क्षेत्रावर, तूर पिकाची ९.६६ लाख हे. क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तसेच भात पिकाची ६.६९ लाख हे. क्षेत्रावर पुनर्लागवड झाली आहे.

चालू खरीप हंगामाकरीता १९.२१ लाख क्विंटल बियाणे गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार २१.७८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. राज्यात १९.३० लाख क्विंटल (१०० टक्के) बियाणे पुरवठा झाला आहे. बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करावे तसेच पावती व टॅग जपून ठेवावेत, असेही कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२३ असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक खते, कीटकनाशके किंवा बियाणे याबाबत तक्रार असल्यास ८४४६११७५००, ८४४६२२१७५० किंवा ८४४६३३१७५९ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. कृषिविषयक योजनांच्या माहितीसाठी १८००२३३४००० हा कृषी विभागाचा हेल्पलाईन क्रमांक असून शेतकरी बांधवांनी आवश्यकतेनुसार त्याचा वापर करण्याचे आवाहनही कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

सुप्रिया सुळेंनी लोकसभेत विचारले- आरोपींना पकडायला 77 दिवस का लागले? सरकारने काय केले?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मणिपूरमधील हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा मंगळवारी लोकसभेत उपस्थित केला. मणिपूरला निर्भय महिलांचा वारसा आहे हे आपण विसरता कामा नये. त्यांच्या सोबत उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. ‘बेटी बचेगी, तभी तो पढेगी’ हे विसरता कामा नये, असे सुळे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबूकवर पोस्ट टाकून माहिती दिली आहे.या पोस्ट मध्ये सुळे यांनी काय म्हटले आहे वाचा त्यांच्याच शब्दात …

लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत मणिपूर येथे महिलांवर होत असलेल्या अनन्वित अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला. देशभरात आरक्षण हा संघर्षाचा विषय झाला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका असो की मणिपूर येथील वांशिक हिंसाचार, यामागे आरक्षणाचाच मुद्दा आहे. मणिपूर येथील हिंसाचारात जून महिन्यात १४२ जणांचा मृत्यू झाल्याचा सरकारी आकडा आहे. जुलै संपत आला तरी हा हिंसाचार थांबवण्याचे नाव घेत नाही. जवळपास ५४ हजार लोक विस्थापित झाले असून अनेकांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. येथील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. देशाचा जगभरात गौरव वाढविणारी बॉक्सर मेरी कॉमच्या राज्यात महिलांप्रती झालेला हिंसाचार अतिशय गंभीर बाब आहे. महिलांना सरेआम गोळ्या मारल्या जात आहेत. त्यांच्यावर बलात्कार होत आहेत. महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यानंतर मणिपूर येथील हिंसाचाराबाबत सरकारला तातडीने कारवाई करावी लागली. सरकारने देखील हा व्हिडिओ जास्त पसरु नये यासाठी प्रयत्न केले. तपास यंत्रणांना देखील गुन्हे दाखल करुन आरोपींना गजाआड करण्यासाठी ७७ दिवस लागले. हा संघर्ष सोडविण्यासाठी केंद्र सरकारने नेमके काय प्रयत्न केले याबाबत स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. ज्या भागात वांशिक हिंसाचार उसळला आहे त्या भागातील महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तसेच तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारने योग्य नियोजन करण्याची गरज आहे. मणिपूरला निर्भय महिलांचा वारसा आहे हे आपण विसरता कामा नये. त्यांच्या सोबत उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. ‘बेटी बचेगी, तभी तो पढेगी’ हे विसरता कामा नये.

मणिपूर हिंसाचार:व्हायरल व्हिडिओप्रकरणी सातव्या आरोपीला अटक, उर्वरित आरोपींचा मणिपूर पोलिसांकडून शोध सुरू

मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्रावस्थेत धिंड काढल्याच्या घटनेतील सातव्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मणिपूर पोलिसांनी सांगितले की, आरोपीला सोमवारी संध्याकाळी थौबल येथून ताब्यात घेण्यात आले. 19 जुलै रोजी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 20 जुलै रोजी पहिली अटक करण्यात आली होती. या 7 आरोपींपैकी एक अल्पवयीन आहे. इतर आरोपींच्या अटकेसाठी पोलिस अनेक भागांत छापे टाकत आहेत

निधीवाटपात सावत्र वागणूक का देतात : यशोमती ठाकूर; तुम्ही चष्मा बदला मी भावाच्या नात्याने ओवाळणी देईन : अजित पवार

मुंबई-अधिवेशनात सुरू असलेल्या चर्चेच्या दरम्यान, निधीवाटपावरून विरोधकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगलेच धारेवर धरले. तर दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करत विरोधकांकडून सभागृहात गोंधळ घालण्यात आला. आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या की, आम्हाला सावत्र वागणूक दिली जात आहे. निधीवाटपात सावत्र वागणूक का देता? असा सवाल त्यांनी अजित पवार यांना विचारला. तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मी अजिबात सावत्र वागणूक देत नाही. यशोमती ताई तुम्ही चष्मा बदला, मी तुम्हाला भावाच्या नात्याने ओवाळणी देईल, असे म्हणत उत्तर दिले. त्यानंतर देखील सभागृहातील गोंधळ काही थांबला नाही.

कॉंग्रेस आमदारांकडून जोरदार विरोध केला गेला. त्यावर अजित पवार म्हणाले की, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, नाना पटोले यांचे काही मतं असू शकता. कारण ते देखील चार ते पाच लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करत आहेत. हे बोलत असताना पुन्हा विरोधकांडून सभागृहात जोरदार विरोध करत घोषणाबाजी केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील विरोधक बोलू देत नव्हते. त्यामुळे सभागृहात चांगलेच वातारवण तापलेले पाहायला मिळाले. त्यानंतर विरोधकांकडून सभागृहाचा त्याग करण्यात आला.

अजित पवार म्हणाले की, साधारण सभागृहाच्या भावना मुख्यमंत्र्यांना माहित असतात. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जी भूमिका मांडली त्यावर सकारात्मक भूमिका घेतली जाईल. सन 2023 -2024 या मधील 41,243 कोटी 20 लाख एकत्रित मागणी पुरवणी मागणीला मंजुरी द्यावी, अशी अजित पवार यांनी केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विविध नियमांचे वाचन करून अधिनियमांचा उल्लेख करत मागण्यांना मंजुरी दिली.

निधीवाटप, आम्ही काय पाप केले : नाना पटोले

निधीवाटप करताना सुरू असलेला दुजाभाव किती धक्कादायक आहे. आम्ही लोकप्रतिनिधी नाही का, आमच्यावर दुजाभाव का केला जातो, आम्ही काही पापं केले आहे का, असा सवाल करत कॉंग्रेसनेते नाना पटोले आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी सभागृहाचा त्याग केला. त्यांच्यासोबत कॉंग्रेस नेते देखील उपस्थित होते.

लोकसभेत मणिपूरवरून विरोधक आक्रमक:सरकार चर्चेस तयार; शहांचे दोन्ही सभागृहातील विरोधकांना पत्र

मणिपूरच्या मुद्द्यावर मंगळवारी लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. लोकसभेचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरू होताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. तीन मिनिटांनीच सभापतींनी सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केले. दरम्यान, मणिपूरवर चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे. त्यासाठी त्यांनी दोन्ही सभागृहातील विरोधी नेत्यांना पत्र देखील लिहिले आहे.

लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही तीच स्थिती कायम होती. खासदारांनी सभागृहात घोषणाबाजी केली आणि सभापतींच्या व्यासपीठाजवळ पोहोचून मणिपूरसाठी भारताचे पोस्टर दाखवले. यानंतर लोकसभेचे कामकाज पुन्हा 5 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

दुसरीकडे, राज्यसभेतही अशीच परिस्थिती होती. आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करावे लागले. काँग्रेस आणि आपसह विरोधी पक्षांनी मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत स्थगन प्रस्ताव मांडला होता.

राज्यसभेचे कामकाज तिसऱ्यांदा घोषणाबाजीने सुरू झाले. दोन तासांहून अधिक काळ ही कारवाई सुरू होती. या दरम्यान संविधान (अनुसूचित जमाती) आदेश (पाचवी सुधारणा) विधेयक 2022 मंजूर करण्यात आले आणि कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले.

लोकसभेचे कामकाज सायंकाळी 5 वाजता पुन्हा सुरू झाले. यावेळी अमित शहा यांनी सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचला. शहा यांनी कृषी आणि सहकार क्षेत्रावर भाष्य केले. विरोधकांनी मणिपूर-मणिपूर, शेम-शेम, जबाब दो-जवाब दो, वुई वॉन्ट जस्टिसच्या घोषणा दिल्या.

विरोधी खासदार पोस्टर घेऊन सभागृहात उभे राहिल्यावर शहा यांनी आणखी जोरात घोषणाबाजी करण्यास सांगितले. तुम्हाला ना दलितांबद्दल आस्था आहे ना सहकारात. त्यामुळे ते घोषणा देत आहेत. शहा सभागृहात विधाने करत राहिले आणि विरोधी खासदार गदारोळ करत राहिले.

विरोधी आघाडी भारत आणि भाजप संसदीय पक्षाची बैठक

तत्पूर्वी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांची आघाडी इंडियावर वक्तव्य केले. म्हणाले- सत्ता मिळवून देश तोडणारे ईस्ट इंडिया कंपनी, इंडियन मुजाहिदीन अशी नावे ठेवत आहेत.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. ते म्हणाले- आम्ही मणिपूरबद्दल बोलत आहोत आणि पंतप्रधान इंडियाची तुलना ईस्ट इंडिया कंपनीशी करत आहेत. तुम्ही मणिपूरबद्दल बोला ना?

रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची मंगळवारी सकाळी बैठक झाली. एजन्सीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, विरोधक सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहेत.

 मिस्टर मोदी, तुम्हाला हवे ते म्हणा, आम्ही इंडिया आहोत – राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले की, “मोदीजी, तुम्हाला जे हवे ते म्हणा. आम्ही इंडिया आहोत. आम्ही मणिपूरच्या जखमा भरण्यास मदत करू. प्रत्येक स्त्री आणि मुलाचे अश्रू पुसून टाकू. तेथील लोकांमध्ये प्रेम आणि शांतता परत आणू. आम्ही मणिपूरमध्ये भारताची कल्पना पुन्हा उभारू.”

पंतप्रधान मोदी इंडियाची तुलना ईस्ट इंडियाशी करत आहेत – खरगे

राज्यसभेत खरगे म्हणाले की, मणिपूरमध्ये मुलींवर बलात्कार होत आहेत. तो हिंसेच्या आगीत जळत आहेत. आम्ही मणिपूरबद्दल बोलत आहोत आणि पंतप्रधान मोदी इंडियाची तुलना ईस्ट इंडिया कंपनीशी करत आहेत. तुम्ही मणिपूरबद्दल बोला ना?

तुम्ही संवेदनशील असाल तर लगेच चर्चा सुरू करा – गोयल

पीयूष गोयल यांनी खरगे यांना प्रत्युत्तर दिले – मणिपूरसोबतच राजस्थान, छत्तीसगड आणि बंगालमध्ये काय चालले आहे यावरही चर्चा व्हायला हवी. तुम्ही महिलांच्या बाबतीत संवेदनशील नाही. असती तर चर्चा सुरू झाली असती. सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणू नका. तुम्ही देशाचे भविष्य बिघडवत आहात हे सारा देश पाहत आहे. तुम्ही संवेदनशील असाल तर लगेच चर्चा सुरू करा.

आठवडे बाजारात शिबीरांचे आयोजन करुन जात पडताळणीसाठीचे अर्ज भरुन घ्या

समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या बार्टीला सूचना

पुणे, दि. २५: अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील नागरिकांना जात पडताळणी प्रमाणपत्र जलदगतीने मिळण्याच्यादृष्टीने बार्टीने राज्यातील आठवडी बाजारात जात पडताळणीचे अर्ज भरून घेण्यासाठी शिबिरे आयोजित करावीत, अशा सूचना राज्याचे समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केल्या.

समाज कल्याण आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर श्री. बकोरिया यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेस भेट देऊन कामकाज आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, स्नेहल भोसले, अनिल कारंडे, आरती भोसले, रवींद्र कदम, वृषाली शिंदे यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी श्री. बकोरिया म्हणाले, समाज कल्याण विभाग व बार्टी सयुक्तपणे अनुसूचित जातीच्या कल्याणार्थ कार्य करत आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्याच्यादृष्टीने केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षांच्या तयारीसाठी तसेच कौशल्य विभागामार्फत दर्जेदार पद्धतीचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे. बार्टी संस्थेचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे असे सांगून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर समाज कल्याण विभाग व बार्टीने एकत्रितपणे काम करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

समाज कल्याण आयुक्तांच्या निर्देशानुसार अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील नागरिकांना जात पडताळणी प्रमाणपत्र जलद गतीने मिळण्यासाठी राज्यातील आठवडी बाजारात शिबिरांचे आयोजन करण्यात येईल आणि जात पडताळणीची कामे निकाली काढण्यात येतील, असे श्री. वारे यांनी यावेळी सांगितले.

प्रस्ताविकात डॉ. चव्हाण म्हणाले, समाज कल्याण विभाग व बार्टीच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या घटकांना न्याय देण्यासाठी अधिकचे प्रयत्न केले जातील.
0000

२०२९ पर्यंत कॉंग्रेसला स्कोप नाही- चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -कॉंग्रेसची अवस्था वाईट आहे, कॉंग्रेसला विरोधी पक्ष नेता ठरविता येत नाही, त्यासाठी ब्लड टेस्ट करतील. त्या पक्षात प्रचंड असंतोष आहे. कॉंग्रेसमध्ये केव्हाही कोणताही स्फोट होऊ शकतो. २०२९ पर्यंत कॉंग्रेसला कोणताही स्कोप नाही हे त्यांना माहिती आहे.असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केला. ते म्हणाले, निवडणुकीच्या वेळी महायुतीमधील घटक पक्षाच्या उमेदवारांना भाजपा आपल्या उमेदवाराला जेवढी ताकद देईल त्यापेक्षाही अधिक ताकद महायुतीमधील घटक पक्षाच्या उमेदवाराला देईल, २०२४ मध्ये मोदीजी जेव्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतील त्यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील ४५ पेक्षा अधिक खासदार असतील.

रायगड, बारामती, शिरूर आणि शिर्डी यांच्यासह हातकंगणले, कोल्हापूर, माढा , सातारा या लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक आज त्यांनी पुणे येथे घेतली. पत्रकारांना त्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा बुथस्तरापर्यंत संपूर्ण कार्यक्रमाची रचना करीत आहोत. लोकसभा प्रवास योजनेत ५०० पेक्षा अधिक पदाधिकारी व त्यांची टीम काम करणार आहे. त्यासाठी संपर्क से समर्थन व नवमतदार नोंदणी केली जात आहे. राज्यातील व केंद्रातील मंत्री आगामी २ महिन्यात राज्याचा दौरा करतील. राजकीय व विकासात्मक तयारी केली जात आहे. जनतेपर्यंत सरकारच्या योजना पोहचविण्याचे काम केले जात आहे. अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर केली. तर आगामी वर्षभरात ५० हजार रुग्णमित्र तयार केले जातील. मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी मतदार साथ देत असल्याचे त्यांनी सांगितले.

• जागा वाटपाचा अधिकार केंद्रीय बोर्डाला
उपमुख्यमंत्री अजित पवार जेव्हा महायुतीमध्ये आले तेव्हा ते सर्व बाबींचा विचार करून आले आहेत. महायुतीवर शंका घेण्याचे कारण नाही, महायुती कमजोर होणार नाही यासाठी तिन्ही पक्ष काळजी घेत आहेत. जागा वाटपाचा संपूर्ण अधिकार हा केंद्रीय संसदीय बोर्डाला आहे. राज्यातील तिन्ही नेते व केंद्रीय संसदीय बोर्ड उमेदवार ठरवितील.

• महायुती वर्षानुवर्षे असेल
देशातील जनतेला मोदीजी पंतप्रधान म्हणून हवे आहेत, मोदीजीच्या नवभारताच्या संकल्पाला साथ देण्याकरिता मतदान केंद्रावर जाऊन मतदार कमळाचेच बटन दाबणार आहेत. आम्हीही त्यासाठी काम करीत आहोत. भाजपासोबतची महायुती वर्षानुवर्षे चालणार आहे. चिन्हाचा कोणताही वाद नाही असेही श्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

मदनदासजींनी दिलेल्या कार्यमंत्रानुसार कार्य पुढे नेऊया – सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत▪️

पुणे-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहसरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस मदनदास देवी यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.

आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला विचारांनी आणि आंतरिक स्नेहाने प्रेरित करून कोणत्या ना कोणत्या कामात सामाजिक कार्यात सक्रिय करण्याचे फार मोठे कार्य मदनदासजी यांनी केले. त्यांनी दिलेली शिकवण आचरणात आणून काम वाढविणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भगवत यांनी मदनदासजी देवी यांना मंगळवारी श्रद्धांजली अर्पण केली. मदनदासजींनी दिलेल्या कार्यमंत्रानुसार कार्य पुढे नेऊया, असेही ते म्हणाले.

ज्येष्ठ प्रचारक आणि संघाचे माजी सहसरकार्यवाह मदनदासजी देवी यांचे काल पहाटे बेंगळूर येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव आज सकाळी पुण्यात आणण्यात आले. रा.स्व. संघाच्या मोतीबाग येथील कार्यालयात ते अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर वैकुंठ स्मशान भूमी येथे मदनदासजी यांचे पुतणे राधेश्याम देवी यांनी अंतिम संस्कार केले.

याप्रसंगी झालेल्या श्रद्धांजली सभेमध्ये डॉ. भागवत बोलत होते. यावेळी सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाले, प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, , भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आदि उपस्थित होते.

मदनदासजी देवी व्यक्तीच्या मनाला स्पर्श करीत असत. जीवनाला योग्य दिशा देणारे ते पालक होते. संघटनेचे आणि मनुष्य जोडण्याचे काम करीत असताना खूप काही सहन करावे लागते. हे सोपे नाही. अशावेळी आंतरिक ज्वलन सहन करीत असताना देखील त्यांनी स्वतः स्थितप्रज्ञाप्रमाणे आयुष्य व्यतीत केले. जाताना देखील ते आनंददायी आणि आनंदी होते, असेही डॉ. भागवत यांनी सांगितले.
सरसंघचालक म्हणाले, मदनदासजी देवी यांच्या जाण्याने मनामध्ये संमिश्र भावना आहे. जन्ममृत्यू हा सृष्टीचा नियम आहे. जो हजारो-लाखो लोकांना आपुलकीने बांधतो अशा व्यक्तीच्या जाण्याचे दुःख सर्वव्यापी असते. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रातील मोठ्या जनसमुदायाला देखील दुःख झालेले आहे. त्यांनी केवळ संघटनेचे काम केले असे नाही तर मनुष्य जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. व्यक्तीच्या मनाला स्पर्श करण्याची कला त्यांना अवगत होती. ते कार्यकर्त्यांना आपले मानायचे, त्यांना सांभाळायचे. मी जेव्हा त्यांच्या संपर्कात आलो तेव्हा देखील हा अनुभव मी घेतला. बालवयातील शाखेच्या मित्रांपासून ते विविध संघटनांच्या प्रमुखांपर्यंतच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा निकटचा संपर्क होता. ते सर्वांची काळजी करायचे. प्रत्येकाची त्यांना संपूर्ण माहिती असायची.

त्यांचा स्नेहस्पर्श झाला ही मी धान्यता मानतो. मदनदासजी संघटनेचे आणि विचारांचे पक्के होते. कार्यकर्त्यांनी केलल्या चुका ते स्नेहपूर्वक दुरुस्त करायचे. कोणत्याही व्यक्तीचे मूल्यांकन करताना व्यक्तीचे अवमूल्यन होणार नाही याची ते दक्षता घेत. यशवंतराव केळकर यांचा आदर्श घेऊन त्यांनी काम वाढविले. मनुष्याला मोह बिघडवतो. या सर्वांच्या पलीकडे जाऊन ध्येयाप्रती समर्पित कार्यकर्ते त्यांनी तयार केले. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे होते. त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. मात्र, माझ्या जाण्यानंतर हे काम न थांबवता आणखी वाढत जाईल ही शिकवण त्यांनी दिली आहे. आजारपणामुळे ते मागील काही वर्ष सक्रिय कामात नसले तरी देखील त्यांच्यामध्ये एकटेपणा आलेला नव्हता. ते अतिशय स्थितप्रज्ञ होते. अंतिम क्षणी देखील ते हसतमुख होते. ध्येयाप्रती असलेल्या क्रियाशील समर्पणातून आलेली ही प्रसन्नता होती, असे डॉ. भागवत म्हणाले. कार्याचा जो मंत्र त्यांनी आम्हाला शिकवला त्यानुसार पुढे जात राहणे, ही त्यांना श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

संघटनेचे तत्वज्ञान रुजवले- मराठे
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची वैचारिक बैठक तयार करण्याचे आणि संघटनेचे तत्वज्ञान उत्तमप्रकारे कार्यकर्त्यांमध्ये रुजवण्याचे अत्यंत महत्तपूर्ण काम मदनदासजी यांनी केले. संघटनेला त्यांनी वैचारिक अधिष्ठान दिले. कार्यकर्त्यांबरोबर त्यांचे संबंध हे पारिवारिक स्वरूपाचे होते. कार्यकर्त्याच्या केवळ संघटनेतील कामाची नाही, तर त्याच्या संपूर्ण जीवनाची ते काळजी घेत असत, असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी यावेळी सांगितले. अत्यंत तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रेमळ स्वभाव आणि आत्मियता या त्यांच्या गुणांमुळे त्यांच्या प्रेरणेने देशात हजारो कार्यकर्ते तयार केले, असेही मराठे म्हणाले.

साऱ्यांचे सहकारी- नड्डा
देशातील हजारो कार्यकर्त्यांना मदनदासजींनी कार्याची दृष्टी दिली, त्यांना जीवनदिशा दिली, त्यांच्यावर संस्कार केले आणि जीवनाला उद्देश दिला, अशा शब्दांत जे. पी. नड्डा यांनी मदनदासजींच्या कार्याचे वर्णन केले. साऱ्या युवकांना ते आपले वरिष्ठ सहकारी आहेत, असेच नेहमी वाटत असे. त्यांचे मार्गदर्शन ज्याला घ्यायचे असेल त्याच्यासाठी ते सदैव सहजतेने उपलब्ध होत असत. संघटनेसमोर अनेक अडचणी असतानाही संघटनेचा विचार कसा पुढे नेता येऊ शकतो, हे आम्ही त्यांच्याकडे पाहून शिकलो, असेही नड्डा म्हणाले. संघटनशास्त्राचा त्यांचा सखोल अभ्यास होता. प्रवास कसा करायचा, बैठक कशी घ्यायची, वार्तालाप कसा करायचा अशा अनेक गोष्टींचे धडे ते कार्यकर्त्यांना देत असत. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत राहणे आणि तो मार्ग अधिक सुदृढ करणे, ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही नड्डा यांनी सांगितले.

मोतीबाग येथे अंत्यदर्शन
संघ कार्यालयात सरसंघचालक व सरकार्यवाहांची आदरांजली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदासजी देवी यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी मंगळवारी सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते उच्चपदस्थ मंत्र्यांपर्यंत सर्व स्तरातील शेकडो नागरिकांची उपस्थिती राहिली. अंत्यसंस्कारासाठी वैकुंठ स्मशानभूमीत नेण्यापूर्वी त्यांचे पार्थिव शहरातील मोतीबाग संघ कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अनेक दशकांपासून त्यांचे जवळचे सहकारी असलेल्यांपासून ते ज्यांना त्यांनी दीर्घकाळ मार्गदर्शन केले असे कार्यकर्ते, तसेच रा. स्व. संघ आणि संबंधित संघटनांचे वरिष्ठ पदाधिकारीही त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आले. त्यांनी स्व. मदनदासजी यांच्या शोकग्रस्त कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी मदनदासजी देवी यांचे भाऊ खुशालदास देवी, भगिनी आणि कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते. स्व. मदनदासजी यांना श्रद्धांजली अर्पण करणाऱ्यांमध्ये सरसंघचालक मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाले, रा. स्व. संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेशजी सोनी व अनिरुद्ध देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, माजी प्रांत कार्यवाह विनायकराव थोरात, अभाविपचे अखिल भारतीय संघटन मंत्री आशिष चौहान, सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, ज्येष्ठ कार्यकर्त्या गीताताई गुंडे, गिरीश प्रभुणे आदींचा समावेश होता. श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित असलेल्या नेत्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि हे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे प्रमुख होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,कुलगुरू गोसावी, यांनीही त्यांना आदरांजली वाहिली.

पुणे, मुंबई, दिल्लीत श्रद्धांजली सभा
मदनदासजी देवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ३१ जुलै रोजी दिल्लीत, ७ ऑगस्ट रोजी पुण्यात आणि ८ ऑगस्ट रोजी मुंबईत श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातील मोतीबाग येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहसरकार्यवाह मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

पुणे, दि.२५ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व माजी सह सरकार्यवाह स्व. मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे मोतीबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयात अंत्यदर्शन घेतले व पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, संघाचे सर संघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही स्व. देवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.

यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, खासदार जे.पी.नड्डा, प्रकाश जावडेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, सिद्धार्थ शिरोळे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे शहरातील मोतीबाग येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहसरकार्यवाह मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

महापालिका सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांना यंदाचा ‘सावित्री’ पुरस्कार जाहीर

पुणे-‘सावित्री फोरम’तर्फे पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आरोग्यअधिकारी डॉ. वैशाली जाधव यांना स्त्री भ्रूण हत्या विरोधी कार्य केल्याबद्दल ‘सावित्री’ पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याबरोबरच ७५ विद्यार्थिनींना एकूण सुमारे 1 लाख रुपयांची शैक्षणिक मदतही देण्यात येणार आहे. ज्येष्ठ लेखिका सौ. वर्षा गजेंद्रगडकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवार दि. २८ जुलै रोजी सायं 5 वाजता जवाहरलाल नेहरु ऑडिटोरियम, घोले रोड, पुणे येथे संपन्न होईल अशी माहिती सावित्री फोरमच्या सचिव संयोगिता कुदळे यांनी दिली.

त्या म्हणाल्या की, सन २०१५मध्ये ही संस्था नोंदणीकृत ट्रस्ट म्हणून स्थापन केली. तेव्हापासून दरवर्षी ७५ मुलींना सुमारे 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. सावित्री हा पुरस्कार यावर्षी पासून सुरु करण्यात आला आहे. सावित्री फोरमतर्फे महिलांच्या उन्नतीसाठी अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी सातत्याने केले जाते. आरोग्य शिबिरे, महिला उद्योजकांसाठी प्रदर्शन, सॅनिटरी पॅडचे वाटप, रक्तदान शिबिर, कपडे गोळा करून गडचिरोलीला पाठवणे, अनाथाश्रम व वृद्धाश्रमात खाऊ वाटप व करमणूकीचे कार्यक्रम, महिलाश्रम येथे कपडे, चादरी वाटप, दंत चिकित्सा शिबिर, मेकअप वर्कशॉप, सायबर क्राईम अवेयरनेस, आहार व आरोग्य, मॉकटेल सरबते बनवणे, राखी, आकाशकंदील, पॉट गार्डन बनवणे, व्याख्याने, फॅशन शो, रंगारंग कार्यक्रम, वार्षिक सहल असे अनेक उपक्रम सावित्री फोरमतर्फे दरवर्षी आयोजित केले जातात असे सचिव संयोगिता कुदळे यांनी सांगितले.

महावितरणकडून नवीन वीजजोडणी अवघ्या २४ ते ४८ तासांत मिळणार

पुणे, दि. २५ जुलै २०२३: पुणे परिमंडल अंतर्गत अस्तित्वात असलेल्या यंत्रणेमधून वीजभाराच्या मागणीसह वीजजोडणी देणे शक्य आहे अशा ठिकाणी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून फर्म कोटेशनच्या रकमेचा भरणा केल्यास तेथील ग्राहकांकडे महावितरणकडून शहरी भागात अवघ्या २४ तर ग्रामीण भागात ४८ तासांमध्ये नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात येणार आहे. याबाबतचे निर्देश मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी सर्व कार्यालयांना दिले आहेत.

नवीन वीजजोडण्या देण्यास महावितरणने मोठा वेग दिला असून पुणे परिमंडलामध्ये गेल्या एप्रिल ते जूनपर्यंतच्या केवळ तीन महिन्यांत ६० हजार ९७० नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वीजजोडण्यांना वेग देण्याची सूचना केली आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी याबाबतची कार्यवाही त्वरित करण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच पुरेशा प्रमाणात नवीन वीजमीटर देखील उपलब्ध करून दिले आहेत. वीजमीटरची उपलब्धता व नवीन वीजजोडण्यांबाबत संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांच्याकडून सातत्याने आढावा घेण्यात येत आहे.

त्यानुसार पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांचा समावेश आहे. या सर्व भागात अस्तित्वात असलेल्या वीजयंत्रणेमधून ग्राहकांच्या मागणीनुसार वीजभारासह नवीन वीजजोडणी देणे शक्य असल्यास शहरी भागात २४ तासांत तर ग्रामीण भागात ४८ तासांमध्ये नवीन वीजजोडणी देण्यात येणार आहे. नवीन वीजजोडणीच्या अर्जासाठी महावितरणने www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

नवीन वीजजोडणीचा अर्ज दाखल झाल्यानंतर जोडणीच्या ठिकाणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून तांत्रिक व्यवहार्यता तपासली जाते. त्यानंतर वीजजोडणीचे कोटेशन तयार करून संबंधित ग्राहकांना देण्यात येते. कोटेशनच्या रकमेचा भरणा केल्यानंतर संबंधित ग्राहकांना नवीन वीजजोडणी दिली जाते. सिंगल किंवा तीन फेजच्या नवीन एका वीजजोडणीसाठी २० किलोवॅट किंवा २७ एचपीच्या वीजभारापर्यंतची सर्व प्रक्रिया शाखा कार्यालयांकडून करण्यात येत आहे. त्यावरील ५० किलोवॅटपर्यंतच्या वीजजोडणीची प्रक्रिया उपविभाग कार्यालयांकडून केली जाते. 

मानवी अवयवांसह ऊती प्रत्यारोपणासाठी आयोग स्थापन करण्याबाबत लवकरच निर्णय – आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

मुंबई : मानवी अवयव आणि ऊतींचे प्रत्यारोपण करण्यासंदर्भात आरोग्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून आयोग स्थापन करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत दिली.

मानवी अवयव आणि ऊतींचे प्रत्यारोपण नियम 2014 या कायद्याअंतर्गत सुधारणा करून नवीन आयोग अथवा समिती स्थापन करण्यात यावी अशी लक्षवेधी विधानपरिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी विधानपरिषदेत मांडली. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रा.डॉ. सावंत बोलत होते.

त्यांनी सांगितले की, मानवी उपचाराकरिता तसेच मानवी अवयवांची व्यावसायिक विक्री होऊ नये याकरिता मानवी अवयव काढणे, जतन करणे, प्रत्यारोपण करण्याकरिता भारत सरकारने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ लागू केला आहे. हा केंद्र शासनाने दि. ४ फेब्रुवारी, १९९५ अन्वये  राज्यात लागू केलेला आहे. राज्यात हा कायदा प्रभावीपणे अंमलात आणण्याकरीता संचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना समुचित प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.

राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय, मुंबई यांच्याकडून राज्य प्रमाणिकरण समिती (Regional Authorization Committee) ची स्थापना करण्यात आली आहे. उर्वरीत महसूल विभागांकरिता मुंबई, पुणे, नागपूर, धुळे, औरंगाबाद व यवतमाळ अशा सहा स्वतंत्र विभागीय प्रमाणिकरण समिती स्थापन करण्यात आलेल्या आहेत. उपरोक्त समितीमार्फत अनरिलेटेड, परप्रांतातील, परदेशातील रिलेटेड अथवा अनरिलेटेड अवयव प्रत्यारोपणासाठी परवानगी दिली जाते. प्रमाणीकरण समिती व समुचित प्राधिकारी यांनी दिलेल्या निर्णयावर आक्षेप असेल, तर संबंधितांना राज्य शासनाकडे अपील करता येते. त्या अंतर्गत राज्य शासन आयोग नेमण्याबाबत कार्यवाही करेल, असेही  आरोग्यमंत्री प्रा.डॉ. सावंत यांनी सांगितले.