पुणे दि. ३: जिल्ह्यात २०५- चिंचवड आणि २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून या दोन्ही मदारसंघाच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. उमेदवार, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.
स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा आणि वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घेण्यात यावी. प्रस्तावित सभेसाठी ध्वनिवर्धकाचा वापर करण्याची आणि अशा इतर कोणत्याही सुविधांसाठी परवानगी मिळवावी. मिरवणूक सुरु होण्याची वेळ आणि जागा. ती जेथून जाणार असेल तो मार्ग आणि ती जेथे संपणार असेल ती वेळ आणि जागा अगोदर निश्चित करण्यात येऊन त्यासाठी पोलीस प्राधिकाऱ्यांकडून आगाऊ परवानगी घेण्यात यावी.
मिरवणूक जेथून जाणार असेल त्या भागांमध्ये कोणताही निर्बंधक आदेश जारी असल्यास, त्याबाबत खात्री करून घेत त्याचे पूर्णपणे अनुपालन करण्यात यावे. त्याचप्रमाणे वाहतूक विनियम आणि इतर निर्बंधांचेही अनुपालन करण्यात यावे. मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकारपत्र मिळविलेल्या उमेदवार व त्यांच्या निवडणूक मतदार प्रतिनिधींना मतदान कक्षात प्रवेश करता येईल, इतर व्यक्ती कितीही उच्चपदस्थ असली तरी तिला असा प्रवेश करता येणार नाही.
सत्ताधारी पक्ष/ शासन यांनी केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राज्यकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात प्रकाशित अथवा प्रसारित करण्यास प्रतिबंध आहे. शासकीय कामाची निवडणूक मोहीम/ निवडणूक प्रचार कार्यासोबत सरमिसळ करू नये. मतदाराला पैशाचे किंवा अन्य कशाचेही प्रलोभन दाखवू नये. मतदाराच्या जातीय समूह भावनांना आवाहन करू नये. देवळे, मशिदी, चर्च, गुरुद्वार किंवा इतर कोणत्याही प्रार्थनास्थळांचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणे, भितीपत्रके, यांच्यासह निवडणूक प्रचाराची जागा म्हणून केला जाणार नाही.
मतदारांना लाच देणे, मतदारांवर गैरवाजवी दडपण, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, तोतयेगिरी, मतदान केंद्रापासून १०० मीटरच्या आत प्रचार करणे, मतदान समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच्या ४८ तासांत सार्वजनिक सभा घेणे. आणि मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे यांसारख्या भ्रष्ट आणि निवडणूक अपराध समजल्या जाणाऱ्या गोष्टींना मनाई आहे.
स्थानिक कायद्यांच्या अधीन राहून, कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, आवार भिंत, वाहने इत्यादींच्या मालकाच्या विशिष्ट परवानगीशिवाय (जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याला दाखविण्यासाठी व त्यांच्याकडे जमा करण्याकरिता), ध्वजदंड उभारण्यासाठी निशाण्या लावण्यासाठी, सूचना चिकटविण्यासाठी, घोषणा लिहिण्यासाठी कोणीही वापर करणार नाही. एका जागी लावलेल्या किंवा चालल्या वाहनावर बसविलेल्या ध्वनिवर्धकांचा वापर सकाळी ६ पुर्वी व रात्री १० नंतर करता येणार नाही.
संबंधित प्राधिकाऱ्याच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय, सार्वजनिक सभा आणि मिरवणुका यांच्या मध्येही ध्वनिवर्धकाचा वापर करण्यात येऊ नये. सर्वसाधारणपणे अशा सभा/ मिरवणुका रात्री १० नंतर चालू ठेऊ नये. त्याशिवाय ध्वनिवर्धकाचा वापर स्थानिक कायदे, त्या जागेच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रत्यक्ष ज्ञान आणि हवामानाची स्थिती, सणासुदीचा मोसम इत्यादीसारख्या परिस्थितीच्या अधीन असेल.