शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी नियोजन करा-राजेश देशमुख
पुणे दि.३: शिवनेरी गडावरील शिवजयंती सोहळ्यासाठी प्रशासनातर्फे सूक्ष्म नियोजन करण्यात येत असून सोहळा उत्साहात आणि चांगल्यारितीने साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देखमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात किल्ले शिवनेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याबाबत आयोजित आढावा बैठाकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार अतुल बेनके, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर आदी उपस्थित होते.
डॉ.देशमुख म्हणाले, गडाच्या पायथ्याशी वाहनतळाची योग्य व्यवस्था करण्यात यावी. यावर्षी अधिक शिवभक्त येण्याची शक्यता लक्षात घेता वाहनतळाची जागा वाढविण्याचा प्रयत्न करावा. परिसरात पुरेशा प्रमाणात उजेड राहील यादृष्टीने दिव्यांची सुविधा करावी. वन आणि पुरातत्व विभागाने कायमस्वरूपी विद्युत व्यवस्था करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. परिसरात स्वच्छता राहील याकडे विशेष लक्ष द्यावे.
पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची संख्या वाढवावी आणि आरोग्य विभागामार्फत पाण्याची तपासणी करावी. आरोग्य पथकासह रुग्णवाहिकांची व्यवस्था करावी. राज्य परिवहन महामंडळाने आवश्यकतेनुसार बसेसची व्यवस्था करावी. महिला व शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांनी समन्वयाने वेळेत आवश्यक नियोजन पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले.
आमदार बेनके म्हणाले, यावर्षी गर्दी अधिक होणार असल्याने वाहनतळांची संख्या वाढविण्यात यावी आणि वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात यावे.
पोलीस अधीक्षक यांनी पोलिसांच्यावतीने करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली.
यावर्षी राज्य परिवहन महामंडळातर्फे २५ बसेसची सुविधा करण्यात आली असून १० आरोग्य पथके नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीत शिवप्रेमींनी सोहळ्याच्या नियोजनाच्यादृष्टीने उपयुक्त सूचना मांडल्या. बैठकीला आशाताई बुचके, सोहळ्याशी संबंधित विविध संस्थांचे प्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.