भोपाळ-
महाराष्ट्राच्या उमर अन्वर शेख, उस्मान अन्सारी, कुणाल घोरपडे व देविका घोरपडे यांनी अंतिम फेरीत स्थान मिळवित मुष्टीयुद्धांमध्ये सुवर्ण पदकाच्या आशा कायम राखल्या. महाराष्ट्राच्या आर्या बारटक्के व वैष्णवी वाघमारे यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
तात्या टोपे क्रीडा नगरी सुरु असलेल्या या स्पर्धेतील ४८ किलो गटात शेख याने चुरशीच्या लढतीनंतर हरियाणाच्या विश्वेश कुमार याला पराभूत केले. ही लढत शेवटपर्यंत रंगतदार झाली आणि त्यामध्ये शेख याने चांगला संयम दाखवीत विजयश्री खेचून आणली. ५१ किलो गटात उस्मान अन्सारी याला मध्यप्रदेशच्या अनुराग कुमार याच्या विरुद्ध लढत मिळवताना फारशी अडचण आली नाही. खरंतर प्रेक्षकांचा अनुराग याला सतत पाठिंबा मिळत होता तरीही जिद्दीने खेळ करीत उस्मान याने ही लढत जिंकली. ६७ किलो गटातही महाराष्ट्राच्या कुणाल घोरपडे याने स्थानिक खेळाडू प्रशंसन कुमार याला सहज पराभूत केले. प्रशासन हा मध्य प्रदेश हा खेळाडू असल्यामुळे त्यालाही प्रेक्षकांचा सातत्याने पाठिंबा मिळत होता मात्र कुणाल याने त्याकडे दुर्लक्ष करीत शानदार विजय मिळवला. कुणाल हा औरंगाबाद येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात सराव करीत आहे.
देविकाचा एकतर्फी विजय
जागतिक कनिष्ठ गट सुवर्णपदक विजेते खेळाडू देविका घोरपडे हिने अपेक्षेप्रमाणे येथेही विजयी घोडदौड कायम राखली. तिने आंध्र प्रदेशच्या मेहरून्निसा बेगम हिला पहिल्या तीन मिनिटातच निष्प्रभ करीत एकतर्फी विजय मिळविला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. पंचांनी या लढतीमधील पहिल्याच फेरीत देविका हिला विजयी घोषित केले. देविका ही ऑलिंपिकपटू मनोज पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. ५७ किलो गटात सातारा येथील खेळाडू आर्या हिला अटीतटीच्या लढतीत उत्तर प्रदेशच्या अनामिका यादव हिच्या विरुद्ध निसटता पराभव स्वीकारावा लागला. आर्या हिने बारावी परीक्षेत ८७ टक्के गुण मिळवले असून तिला सैन्य दलातच करिअर करायचे आहे. ती राजधानी बॉक्सिंग क्लब येथे अमित संगवान यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. पुण्याची खेळाडू वैष्णवी हिला ६० किलो गटात मणिपूरच्या टी.कुंजुराणी देवी हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. वैष्णवी ही माजी ऑलिम्पिकपटू मनोज पिंगळे यांच्या अकादमी सराव करीत आहे. आर्या व वैष्णवी यांचे खेलो इंडियातील हे पहिलेच पदक आहे.