Home Blog Page 1429

आळंदी येथे ८ फेब्रुवारी रोजी होणारा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार सोहळा’ पुढे ढकलला – सांस्कृतिक कार्य संचालनालयाची माहिती

मुंबई, दि. 4 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने ८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणारा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’ सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दिली आहे. वर्ष २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षाचे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार विविध मान्यवरांना प्रदान करण्याचा कार्यक्रम आळंदी येथे प्रस्तावित करण्यात आला होता.

पुरस्कार प्राप्त सन्माननीय बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नीचे दुःखद निधन झाल्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाहीत तर श्री बद्रीनाथ तनपुरे महाराज हे प्रकृती अस्वस्थपणामुळे व बाबा महाराज सातारकर यांच्यावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगराचा विचार करून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी कळवले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्री बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नीच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून या अपरिहार्य कारणामुळे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने हा कार्यक्रम पुढे ढकलला असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. पुरस्कार सोहळ्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

मुष्टीयुध्दामध्ये सोनेरी हॅट्ट्रिकसह महाराष्ट्राचा पदकांचा षटकार,तीन सुवर्ण, एक रौप्य, दोन कांस्य

मुलांच्या सांघिक विभागात महाराष्ट्राला तिसरे स्थान

भोपाळ-
कुणाल घोरपडे, उमर अन्वर शेख, देविका घोरपडे यांनी मिळविलेल्या सुवर्णपदकांसह महाराष्ट्राने मुष्टीयुद्धाच्या शेवटच्या दिवशी चार पदकांची कमाई करीत या खेळातील पदकांचा षटकार पूर्ण केला. महाराष्ट्राच्या उस्मान अन्सारी याला मात्र रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राला मुलांच्या सांघिक विभागात तिसरे स्थान मिळाले.

पुण्याची जागतिक युवा सुवर्णपदक विजेती खेळाडू देविका हिने ५२ किलो गटाच्या अंतिम फेरीत मध्य प्रदेश काफीकुमारी हिचा सहज पराभव केला. या लढतीच्या वेळी मध्य प्रदेशच्या खेळाडूला प्रेक्षकांचा सातत्याने पाठिंबा मिळत होता. ते ओरडून देविकाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु देविका हिने शांतपणे ही लढत खेळली आणि विजयश्री संपादन केली. ही लढत जिंकण्याचे मनोधैर्य देविका हिने उपांत्य फेरी जिंकल्यानंतरच व्यक्त केले होते.
मुलांच्या ४८ किलो गटात उमर शेख याने पंजाबच्या गोपी कुमार याचा दणदणीत पराभव केला. आक्रमक ठोसेबाजी व भक्कम बचाव असा दुहेरी तंत्राचा उपयोग करीत त्याने गोपी याला निष्प्रभ केले. ७१ किलो गटात कुणाल याच्यापुढे हरियाणाच्या साहिल चौहान याचे कडवे आव्हान होते. तथापि कुणाल याने सुरुवातीपासूनच कल्पकतेने ठोसेबाजी केली आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला रोखून धरले. उमर, कुणाल, देविका व कांस्यपदक विजेती वैष्णवी वाघमारे हे पुण्याचे चारही खेळाडू ऑलिंपिकपटू मनोज पिंगळे यांच्या अकादमीचे खेळाडू आहेत.‌
मुलांच्या ५१ किलो गटात उस्मान अन्सारी या मुंबईच्या खेळाडूला मणिपूरच्या एम जादूमनी सिंग यांच्याविरुद्ध निसटता पराभव स्वीकारावा लागला. उस्मान याने शेवटपर्यंत चांगली लढत दिली.‌

‘सुवर्णपदक जिंकण्याचा आत्मविश्वास होता’
या स्पर्धेमध्ये चिवट आव्हान असले तरी जिद्दीच्या जोरावर सुवर्णपदक जिंकण्याची आम्हाला खात्री होती असे देविका, कुणाल व उमर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले,” आमच्या प्रतिस्पर्ध्यांना चाहत्यांकडून सातत्याने प्रोत्साहन मिळत होते तरीही आम्ही शेवटपर्यंत संयम ठेवल्यामुळे ही सोनेरी कामगिरी करू शकलो. आमच्या या यशामध्ये राज्याचे क्रीडा संचालनालय, आमचे प्रशिक्षक व पालक यांनी दिलेल्या सहकार्याचा मोठा वाटा आहे. “
महाराष्ट्राच्या सर्व खेळाडूंना विजय दुबाळे व सनी गेहलावत यांचे मार्गदर्शन मिळाले होते.

निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा

पुणे, दि.४ :- निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नागरिकांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील २०५- चिंचवड व २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन, अवैध जाहिरात फलक, मतदारांना पैसे वाटप, दारु वाटप, भेट वस्तू किंवा आमिष दाखवणे, कोणत्याही प्रकारचे शस्त्र दाखवून धमकावणे आदी प्रकारच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने करता येतील. यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन ‘सी-व्हिजिल’ (cVIGIL) ॲप मोफत डाऊनलोड करता येते.

ॲप सुरु करुन त्यामध्ये छायाचित्र, व्हिडीओ किंवा ऑडिओ तयार करुन पोस्ट केल्यांनतर तक्रारीची नोंद होते. तक्रार नोंदवल्यानंतर पाच मिनीटामध्ये ही माहिती भरारी पथकाला पाठवली जाते. भरारी पथकाकडून तातडीने याबाबत चौकशी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांना अहवाल सादर केला जातो आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तातडीने त्याच्यावर कारवाई करतात तक्रारीचे स्वरुप व संख्येनुसार हा वेळ कमी-अधिक होतो.

तक्रारीचे निरसन झाल्यानंतर तक्रारदारास ॲपद्वारे संदेश जातो. याशिवाय आचारसंहिता कक्षाकडे देखील आचारसंहिता भंगा बाबत तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात, अशी माहिती उप जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली

पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून नोंद झालेल्या ५२ तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे, अशी माहितीही श्री. इथापे यांनी दिली.
0000

मुंबईत रविवारपासून राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धांचे आयोजन

मुंबई, दि. 4 :  राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धेस उद्या, रविवार दि. ५ फेब्रुवारी २०२३ पासून सुरुवात होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या श्रमिक जिमखाना, लोअर परेल येथे आमदार अजय चौधरी, कामगार विभागाचे अवर सचिव दिलीप वणिरे, सोफिटेल रिसॉर्ट अँड हॉटेलचे संचालक सलील देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चंद्रमोरे व कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. ५ ते ७ फेब्रुवारीदरम्यान दररोज संध्याकाळी कुस्त्यांचे सामने खेळवले जातील. सामने मॅटवर खेळवले जाणार असून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमांप्रमाणे व मुंबई शहर तालीम संघाच्या सहकार्याने ही स्पर्धा होत आहे.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने कामगारांसाठी कामगार केसरी आणि कामगार पाल्यांसाठी कुमार केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यासह विविध पाच वजनी गटातील सामने यावेळी खेळवले जाणार आहेत. कामगार केसरी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु. 75 हजार, द्वितीय रु. 50 हजार, तृतीय रु. 35 हजार व उत्तेजनार्थ रु. 20 हजार आहे. तर कुमार केसरी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु. 50 हजार, द्वितीय रु. 35 हजार, तृतीय रु. 20 हजार व उत्तेजनार्थ रु. 10 हजार आहे. तसेच वजनी गटात रु. 10 हजार ते 25 हजारांची पारितोषिके दिली जातील.

बजाज ऑटो वाळूंज, कुंभी कासारी सह. साखर कारखाना कोल्हापूर, वडगांव यंत्रमाग वस्त्रोद्योग, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना सोलापूर, विमा साखर डिस्टिलरीज सोलापूर, क्रांती अग्रणी साखर कारखाना कुंडल आदी कंपन्यांच्या 106  हून अधिक नामांकित पैलवानांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने स्पर्धेस उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

जगताप कुटुंबाला न्याय अन टिळकांवर मात्र अन्याय ..हे कसले तत्व ?हिंदु महासंघ देणार रासनेंना आव्हान ?

पुणे- स्वर्गवासी झालेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबाला न्याय दिलात , परंपरा तिथे पाळूनच त्यांच्या अश्विनी लक्षमण जगताप यांना उमेदवारी भाजपने दिली मात्र तोच न्याय आणि परंपरा कसब्याच्या बाबतीत का पाळला गेला नाही असा सवाल भाजपच्या नेतृत्वाला विचारला जातो आहे .आधी मेधा कुलकर्णींना डावलले , नंतर देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद टाळले आणि आत्ता टिळक कुटुंबीय यांना संधी नाकारणे म्हणजे कुठेतरी बोचत राहतंय अशी प्रतिक्रिया ब्राम्हण समाजाच्या संघटनेतील काही नेत्यांनी दिली आहे.
भाजप ला काही जातींची केवळ मते हवी असतात.. त्या जाती नकोच असतात,पक्षाचे काम करण हे जेव्हा हेटाळणी च असायचे, लोक चिडवायचे तेव्हा ज्यांनी पक्ष वाढवला आज त्यांनाच खड्यात ढकलल जात आहे,खुल्या प्रवर्गाचा आवाज दाबण्याचा आज पुन्हा प्रयत्न झाला आहे,सर्वच जातींना योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे याच भावनेतूनआम्ही हिंदु महासंघ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.कसबा मतदार संघ निवडणूक लढवण्या बाबत लवकरच निर्णय घेऊ असेही त्यांनी म्हटले आहे.

भारतीय अर्थव्यवस्था संतुलित:खासदार जयंत सिन्हा

पुणे, दि. 4 – कोरोना, रशिया-युक्रेनचे युद्ध, वाढती महागाई, चीनमधील ताळेबंदी अशा जागतिक महासंकटात अमेरिका, चीनसह युरोपीय देशांची अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली असताना भारतीय अर्थव्यवस्था संतुलित, स्थिरता देणारी, गतीमान, महागाईचा दर कमी करणारी आणि उच्च दर्जाच्या रोजगारांच्या संधी निर्माण करून देणारी असल्याचा विश्वास मत माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी व्यक्त केला.

बीजेपी इन्फ्रास्क्चर आणि बीजेपी बीझनेस सेल यांच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्प 2023 या विषयावरील चर्चा सत्रानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परीषदेत सिन्हा बोलत होते. शहर भाजपचे संघटन चिटणीस, दीपक नागरपुरे, मंदार देवगावकर, अमृता देवगावकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

सिन्हा पुढे म्हणाले, ”सध्या भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पनाच्या (जीडीपी) 7 टक्के इतका आहे. जागतिक मंदीचे संकट लक्षात घेवून, पुढील सहा महिन्यांत तो साडे सहा टक्क्यांवर येईल असा अंदाज व्यक्त केला जातो. मात्र वेगाने वाढत असलेल्या भारतीय अर्थ व्यवस्थेचा विचार करता हा दर आठपर्यंतही जाऊ शकतो.”

सिन्हा म्हणाले, ”अमृत काळातील हा अर्थसंकल्प देशाला स्थैर्य देणारा आहे. शिक्षण, संशोधन, विज्ञान, आरोग्य आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कराचे सुलभीकरण करण्यात आले आहे. प्राप्तीकर आकारण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कर प्रणालीचा नागरिकांना फायदा होणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प सर्व घटकांसाठी संतुलित आणि देशाला प्रगतिपथावर नेणारा आहे. शेती, सहकार, वंचित, शोषित, आदिवासी, युवक, लघु व मध्यम उद्योग, हरित विकास, आर्थिक क्षेत्र, रेल्वे महामार्गासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.”

इमारतींची वाढती उंची आणि शाश्वत विकास या विषयावर विचारमंथन

पुणे :’सोसायटी ऑफ हिटिंग ,रेफ्रिजरेटिंग अँड एयर कंडिशनिंग इंजिनियर्स ‘च्या वतीने ‘सस्टेनेबिलिटी इन हाय राईझ’ विषयावर ग्रीन कॉन्क्लेव्ह चे आयोजन करण्यात आले होते. सुझलॉन वन अर्थ(केशवनगर,हडपसर) येथे ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात ही कॉन्क्लेव्ह झाली. ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे महासंचालक प्रशांत गिरबाने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पुण्यात ३० मजली,५५ मजली उंच इमारतींची बांधकामे चर्चेत आहेत. आहे.निवासी इमारती,व्यावसायिक इमारती किंवा दोन्हीही असलेल्या इमारती स्मार्ट सिटी आणि इतर भागात आकाराला येणार आहेत. पुण्याची क्षितिजे उंचावणाऱ्या या इमारतींच्या बांधकामामुळे शाश्वत विकासाबाबत चर्चा घडवून आणण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली . आर्किटेक्ट,सल्लागार,अभियंते ,नागरिक प्रतिनिधी असे ३०० जण या परिषदेत सहभागी होते. या एक दिवसीय कॉन्क्लेव्ह मध्ये पंकज धारकर,एन एस चंद्रशेखर,आनंद चोरडिया,चेतन सिंग सोळंकी हे पाहुणे म्हणून उपस्थित होते.डॉ केरी चॅन,केन यिंग,डॉ हरिहरन,मिली मुजुमदार,अनुजा सावंत,अरविंद सुरंगे यांनी मार्गदर्शन केले. सानिका पागे यांनी सूत्रसंचालन केले. ‘सोसायटी ऑफ हिटिंग ,रेफ्रिजरेटिंग अँड एयर कंडिशनिंग इंजिनियर्स ‘च्या पुणे चॅप्टर चे अध्यक्ष वीरेंद्र बोराडे,कॉन्क्लेव्ह च्या निमंत्रक, अंशुल गुजराथी, कर्नल सुनील नरूला यांनी स्वागत केले.

यावेळी अरविंद सुरंगे,अमोल उंबरजे, सुभाष खनाडे,विशाल पवार, उल्हास वटपाल, अभिजीत पवार, केतन चौधरी दीपक वाणी, नंदकिशोर मातोडे, अरुण चिंचोरे, रितेश खेरा, सुजल शाह, सिध्दांत जैन,आशुतोष जोशी,अमित गुळवडे,नंदकिशोर कोतकर,विमल चावडा,चेतन ठाकूर,सिम्पल जैन, देविका मुथा, सानिका इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्बन न्यूट्रल शहरांसाठी स्वयंप्रेरणेने प्रयत्न व्हावेत : प्रशांत गिरबाने

प्रशांत गिरबाने म्हणाले, ‘कार्बन न्यूट्रल पुण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत. त्यासाठी सक्ती करण्याची वेळ येता कामा नये.जागृती घडवून स्वयंप्रेरणेने हे काम झाले पाहिजे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज योगदान देईल.

एन.एस. चंद्रशेखर म्हणाले, ‘लोकसंखा, शहरांप्रमाणे रिएल इस्टेट मार्केट वाढत आहे. ३० टक्के जीडीपीमध्ये या क्षेत्राचा वाटा आहे. कार्बन उत्सर्जन देखील वाढत आहे. वीजेचा वापर कमी केला पाहिजे.आपल्या इमारती मुळे परिसंस्थेवर परिणाम होऊ देता कामा नये. आम्ही आमच्या सदस्यांना उर्जा वापरात स्वावलंबी होण्याचा आग्रह धरत आहोत. पुढील पिढयांना चांगल्या गोष्टी , पर्यावरणपूरक विकास दिला पाहिजे.पृथ्वी -पर्यावरण – परिवर्तन ही शाश्वत विकासाची त्रिसूत्री ठरली पाहिजे.

डिकार्बनायझेशन बद्दल बोलताना मिली मुजुमदार म्हणाल्या, ‘ भारत हा कार्बन उत्सर्जनाबाबत जगात तिसऱ्या कमांकावर आहे. ५७ टक्के उत्सर्जन वीज वापर, उष्णता यामुळे होते. २४ टक्के उत्सर्जन इंधन जाळल्याने तर १८ टक्के बांधकामात सिमेंट -लोखंड वापरल्याने होते. त्यावर पर्यावरणस्नेही उपाययोजना केल्या पाहिजेत. बांधकाम साहित्य, वातानुकूलन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, जमेल तिथे पुनर्वापर या मुद्दयांचा विचार केला पाहिजे.

एसिया पॅसिफिक ग्रीन बिल्डींग कौन्सिल चे अध्यक्ष कॅरी चॅन यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले.

इमारतींची वाढती उंची आणि शाश्वत विकास या विषयावर विचारमंथन

डी कार्बनायझेशन ,एयर क्वालिटी,हेल्थ,प्रॉडक्टिव्हिटी अँड सस्टेनेबिलिटी’ ,स्टेकहोल्डर्स इंटरव्हेन्शन फॉर हाय राईज’,इश्युज अँड रिझॉल्युशन्स -सर्व्हिसेस इन हाय राईज’,’पावरिंग सस्टेनेबल इंडिया विथ ग्रीन फायनान्स’ अशा विषयावर चर्चासत्रे या परिषदेत आयोजित करण्यात आली होती.

मान्यवरांचा गौरव :

आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या मान्यवरांचा यावेळी विविध पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. आनंद चोरडिया(अर्थ अवॉर्ड),सुभाष देशपांडे(वॉटर अवॉर्ड),पंकज धारकर(फायर अवॉर्ड),एन एस चंद्रशेखर(विंड अवॉर्ड),विश्वास कुलकर्णी(स्पेस अवॉर्ड),प्रदीप भार्गव (इलेमंट ऑफ सस्टेनेबिलिटी अवॉर्ड),चेतन सोळंकी(एलेमेंट ऑफ एनर्जी),शीतल भिलकर(वूमन आयकॉन अवॉर्ड) यांचा त्यात समावेश आहे.ख्रिस्तोफर बेनिंजर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

फॅब्रिक सॉक्स,विप्रो,ग्राउंड ११ आर्किटेक्टस,असाही इंडिया ग्लास लि.,७५ एफ, गेब्रिट,चतुर प्रेमानंद वासवानी,प्रोलिट ऑटोग्लो यांच्या सहकार्याने ही कॉन्क्लेव्ह पार पडली. आर्किटेक्ट,इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन, एफ एस ए आय,जीबीसी आय,इन्फ्रा,ऑसम,इसले,सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह्ज या संस्थांनी संयोजनात सहकार्य केले.

20 वर्षे बरोबरीने काम करणाऱ्या मुक्ताताईंच्या सहकार्‍यांनी जाणीव ठेवायला पाहिजे होती..म्हणाले ,शैलेश टिळक

परंपरेनुसार आमच्या घरातच उमेदवारी मिळेल असं वाटलं होतं पण …

आम्ही पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. मात्र फक्त देवेंद्र फडणवीसांची भेट राहिली होती

पुणे-एखाद्या विद्यमान आमदारांच्या निधनाने पोटनिवडणुकीत त्यांच्या घरातील कोणाला उमेदवारी देण्याची परंपरा आहे त्यानुसार आम्हाला उमेदवारी मिळेल असं वाटलं होतं पण कसब्यात तसं झाले नाही ,परंपरागत उमेदवारीसाठी आम्ही पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. मात्र फक्त देवेंद्र फडणवीसांची भेट राहिली होती. ती भेट घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसच घरी आले होते,आमच्या कुटुंबातील कोणाला उमेदवारी दिली नाही पण आम्ही पक्षाच्या आदेशाचं आम्ही पालन करू अशा आशयाची विधाने स्वर्गीय मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी काही माध्यमांशी बोलताना केल्याने हेमंत रासने यांच्या उमेदवारीवर मनापासून ते समाधानी नसल्याचेच दिसून आले आहे . 20 वर्षे बरोबरीने काम करणाऱ्या पुणे शहरातील मुक्ताताईंच्या सहकार्‍यांनी जाणीव ठेवायला पाहिजे होती. इतरांनी उमेदवारी मागितली नसती तर मुक्ता टिळकांना ती खरी श्रद्धांजली लाभली असतीअसेही टिळक यांनी म्हटले आहे.

शैलेश टिळक म्हणाले की, मुक्ता टिळकांच्या निधनानंतर पोट निवडणूक जाहीर झाल्यावर आम्ही घरात उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. कारण मुक्ता टिळकांच्या अकाली जाण्याने त्यांची अनेक कामं अर्धवट राहिली आहेत. त्यांनी सुरू केलेल्या योजना होत्या. त्या पूर्ण करण्यासाठी घरातील व्यक्तीला उमेदवारी मिळावी, असं आम्ही म्हटलं होतं. त्यासाठी आम्ही पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. मात्र फक्त देवेंद्र फडणवीसांची भेट राहिली होती. ती भेट घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसच घरी आले होते, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. 

ते पुढे म्हणाले होते की, मुक्ता टिळकांच्या निधनानंतर ते अंत्यसंस्कारानंतर घरी आले नव्हते. त्यामुळे ते भेटीसाठी घरी आले असावेत, असा अंदाज शैलेश टिळकांनी व्यक्त केला होता. पोटनिवडणुकीसंदर्भात त्यांनी स्पष्ट संकेत दिले नाहीत. सर्व दृष्टीने विचार करुन आम्ही काही नावं वर पाठवली आहेत. त्यावर दिल्लीवरुन यासंदर्भात निर्णय होईल, अशा चर्चा देवेंद्र फडणवीसांशी झाली असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

पोटनिवडणुकीची तयारी म्हणून उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यासाठी लागत असणारे कागदपत्र आणि उमेदवारी अर्जाचा योग्य अभ्यास करण्यासाठी लवकर घेतला. त्यामुळे उमेदवारी आम्हालाच मिळेल असा त्याचा अर्थ होत नसल्याचंही ते म्हणाले होते. साधारण जेव्हा एखाद्याचं निधन होतं तेव्हा त्याच्या घरातील व्यक्तीचा उमेदवारीसाठी विचार केला जातो. त्यामुळे परंपरेनुसार असाच विचार यावेळीदेखील होईल असं वाटत असल्याचं ते म्हणाले होते. आमच्या कुटुंबातील कोणाला उमेदवारी दिली नाही तर पक्षाच्या आदेशाचं आम्ही पालन करू, असं स्पष्ट केलं होतं.

कुणाल टिळक यांनी भाजप प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते म्हणाले की माझ्या सारख्या तरुणाला संधी दिली त्याबद्दल मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा आभारी आहे. या मोठ्या पदासाठी पक्षश्रेष्ठींनी माझा विचार केला. त्यामुळे मी समाधानी आहे, असं ते म्हणाले. 

मुंबईत अग्निशमन दलाच्या भरतीत प्रचंड गोंधळ; संतापलेल्या 2 हजार मुलींवर लाठीचार्ज

मुंबई-

मुंबईमध्ये दहिसर परिसरात अग्निशमन दलाच्या भरतीवेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला आहे. गोपीनाथ मुंडे शक्ती मैदानावर ही भरती प्रक्रिया सुरू असून राज्यभरातून महिला उमेदवार भरतीसाठी आल्या.मात्र, भरतीमध्ये अपात्र ठरवलेल्या महिला उमेदवार संतापल्याने वातावरण शांत करण्यासाठी त्यांच्यावर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.मुंबईतील गोपीनाथ मुंडे शक्ती मैदानावर अग्निशमन दलाच्या भरतीसाठी महाराष्ट्रभरातून महिला उमेदवार आल्या. यावेळी भरतीसाठी 162 सेंटिमीटर उंचीची अट ठेवण्यात आली. मात्र, त्यापेक्षा जास्त उंची असल्याचे सांगत अपात्र ठरलेल्या महिला उमेदवारांना आपला राग अनावर झाला, आणि त्यांनी मैदानाच्या परिसरातच घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली.

अग्निशमन दलाने घालून दिलेल्या उंचीच्या नियमापेक्षा अधिक उंची असूनही या तरुणींना डावलण्यात आल्याचे या तरुणींचे म्हणणे आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून महिला उमेदवारांना पाठिंबा देण्यात आला असून ही भरती प्रक्रिया रद्द केली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातून आलेल्या तरुणींनी या भरती प्रक्रियेवर आरोप केले आहेत. यात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही तरुणींनी केला आहे. गेली 2 दिवस आम्ही इथे आलो आहोत, आम्ही शेतकऱ्यांच्या मुली आहोत, आम्हाला उंची असून डावलण्यात येत असल्याचा आरोप मुलींनी केला आहे. तर हा आमच्यावर अन्याय असून ही भरती प्रक्रियाच रद्द करावे अशी पोलिसांकडून ही भरती प्रक्रिया राबवा, अशी मागणी या तरुणींनी केली आहे.

टिळकांच्या घरात मानाचे स्थान दिले जाईल – मंत्री चंद्रकांत पाटील

भाजपाकडून मुक्ता टिळकांच्या कुटुंबाहेरील व्यक्तीला उमेदवारी

पुणे- “शुक्रवारी रात्री मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी टिळकवाड्यात जाऊन शैलेंद्र टिळक आणि कुणाल टिळक यांची भेट घेतली. यावेळी दोघांशीही चर्चा करून भारतीय जनता पार्टी त्यांना सन्मानाचं स्थान देईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे . दोघांनीही आम्ही पक्षाबरोबर एकनिष्ठ राहणार आहोत, असे सांगितले आहे”, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी भाजपाने पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, भाजपाने टिळकांच्या कुटुंबाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, याबाबतचंद्रकात पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, उमेदवारीवरून जगताप कुटुंबियांमध्ये वाद असल्याची चर्चा होती. याबाबत विचारलं असता, “जगताप कुटुंबियांमध्ये उमेदवारीवरून कोणताही वाद नाही”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. “लोकांनी यााबाबत अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मण जगताप यांचा मुलगा वयाने लहान आहे, पण त्याने काल समजदारीची भूमिका घेतली आणि आमच्या कुटंबात कोणताही वाद नसल्याचे म्हटलं. मी नेहमी सांगतिलं आहे की जर अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाली तर, शंकर जगताप हे निवडणुकीचे प्रमुख असतील. आज मी पुण्याचा पालकमंत्री म्हणून शंकर जगताप यांना निवडणुकीचे प्रमुख घोषित करतो”, असेही ते म्हणाले.

कसब्यात हेमंत रासनेंना भाजपची उमेदवारी ‘छप्पर फाडके’

पुणे- महापालिकेच्या स्थायी समितीवर ३ वेळा स्थायी समिती अध्यक्षपदाची संधी दिल्यानंतर आता भाजपाने पुन्हा हेमंत रासने यांना कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे . यामुळे भाजप जिसे देता है, छप्पर फाडके देता है .. हा मेसेज तर पुण्यात गेलाच पण त्याबरोबरच कसब्यात प्रथमच ब्राम्हण समाजाच्या उमेदवारांना डावलल्याने भाजपा मध्ये सुप्त चर्चा सुरु झाली आहे. हा एकच मतदार संघ या समाजासाठी सोडण्यात येत होता .जो भाजपचा बालेकिल्ला देखील मानला जात आहे.

दरम्यान भाजपाने छप्पर फाडके देण्याची हि परंपरा आजची नसून गेल्या ५ वर्षात मोहोळ आणि रासन यांच्यावर अशीच पदांची बरसात केली आहे याकडेही लक्ष वेधले जाते आहे.तर दुसरीकडे विरोधकांच्या ब्राम्हणविरोधी टीकेला लगाम बसावा म्हणून देखील हे पाउल महत्वाचे ठरेल असाही सूर आहे. आणि कदाचित बिनविरोध निवडणूक व्हावी या दृष्टीने हा निर्णय घेतला असावा असेही काहींना वाटते आहे.दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यावर रासने यांच्यावर एकीकडे अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे तर दुसरीकडे कुजबुज सुरु झाली आहे .

दरम्यान चिंचवडची उमेदवारी देताना मात्र भाजपाने परंपरा पाळली आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने परंपरागत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. 

आर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि. ३: जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हींगने अनेक गावांमध्ये जाऊन तिथला दुष्काळ दूर केला, शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवले. शेतकऱ्याच्या डोळ्यातले पाणी पुसून त्याच्या शेतीला पाणी मिळवून देण्याचे हे अतुलनीय कार्य आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

कोथरूड येथे आयोजित भक्ती उत्सव-महासत्संग कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, गुरूदेव श्री श्री रविशंकर, आमदार भीमराव तापकीर, शहाजी बापू पाटील, उद्योजक अनिरुद्ध देशपांडे, सूर्यकांत काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विशाल गोखले आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातून अनेक लोकांचे जीवन सुधारत असताना सामाजिक दायित्वही गुरूदेवांनी आपल्याला शिकवले. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे आणि महाराष्ट्रातील १७ नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे कार्य आर्ट ऑफ लिव्हींगच्या स्वयंसेवकांनी केले. जलयुक्त शिवार योजनेच्या कामात चांगले काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांमध्ये आर्ट ऑफ लिव्हींग अग्रेसर होती.

गुरूदेव भारतीय संस्कृतीचे संदेशवाहक
गुरूदेव श्री श्री रविशंकर यांनी संपूर्ण भारतात आणि जगातील अनेक देशात भारतीय संस्कृती आणि भारतीय अध्यात्म लोकांमध्ये जागृत केले आणि त्यांच्या रुपाने भारतीय संस्कृतीचे संदेश वाहक पहायला मिळाले. जागतिक शांती परिषदेच्या माध्यमातून जगातल्या सर्व धर्मांना एकत्र करण्याचे कार्य गुरूदेवांनी केले. हे करत असताना भारतीय विचारांचे श्रेष्ठत्व स्वामी विवेकानंद यांच्यानंतर जगाला पटवून देण्याचे कार्य गुरूदेवांनी केले.

विज्ञानासह अध्यात्म हा श्री श्री रविशंकर यांच्या विचारांचा गाभा आहे. या विचारांमुळेच जगाच्या पाठीवर अस्तित्वात असलेली अत्यंत प्राचीन सभ्यता म्हणून भारताकडे पाहिले जाते, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

अथर्वशिर्ष पठणाचा विक्रम पुण्यात झाल्याचे नमूद करून पुणे हे बुद्धी अणि विद्येचे माहेरघर असल्याने इथेच अथर्वशिर्षाचे पठण होणे स्वाभाविक आहे आणि अथर्वशिर्ष पठणाचा विक्रम पुण्यातच होऊ शकतो, असेही श्री.फडणवीस म्हणाले.

यावेळी श्री श्री रविशंकर म्हणाले, पुणे शहरात आणि महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तीचा सोहळा साजरा होतो. तीक्ष्ण बुद्धी आणि कोमल भाव ही भारतीय संस्कृतीची देणगी आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान आवश्यक असल्याचे जगातील सर्व देशांनी मान्य केले आहे. आयुर्वेद, योग, ध्यान, आध्यात्मिक ज्ञान ही भारताची श्रेष्ठ संपत्ती आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला सामुहिक अथर्वशिर्ष पठणाचा जागतिक विक्रम करण्यात आला. या विक्रमाचे प्रमाणपत्र एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसच्या डॉ.चित्रा आणि वर्ड बुक ऑफ लंडनचे डॉ.दीपक हरके यांच्या हस्ते गुरूदेव श्री श्री रविशंकर यांना प्रदान करण्यात आले.
000

टेबल टेनिस मध्ये तनिषा कोटेचा विजेती, जश मोदी याला कांस्यपदक

0

इंदूर
तनिषा कोटेचा हिने चुरशीच्या लढतीत दिल्लीच्या लक्षिता नारंग हिचा ४-२ अशा गेम्सने पराभव केला आणि टेबल टेनिस मधील महिलांच्या गटात विजेतेपद पटकावले. दुहेरीत तिला रौप्य पदक मिळाले होते. मुलांच्या एकेरीत जश मोदी याला कांस्यपदक मिळाले.

तनिषा हिने लक्षिता हिच्यावर ११-४,१४-१२,११-६, ९-११,१०-१२,११-४ असा विजय मिळवला. तिने काउंटर ॲटॅक पद्धतीचा सुरेख खेळ केला. लक्षिता हिने चौथी व पाचवी गेम घेत सामन्यातील उत्कंठा वाढवली तथापि सहाव्या गेम मध्ये तनिषा हिने आपल्या खेळावर नियंत्रण ठेवीत लक्षिताचे आव्हान परतविले आणि सुवर्णपदकावर आपली मोहोर नोंदविली.
मोदी याला कांस्यपदक मिळविताना आदर्श छेत्री याच्याकडून चिवट लढत मिळाली. हा सामना ४-२ असा घेत मोदी याने कांस्यपदक पटकावले. तो पुण्यात सन्मय परांजपे यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे.‌
या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या खेळाडूंना ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू सुनील बाब्रस यांचे मार्गदर्शन लाभले होते.

सायकलीस्ट पुजा, संज्ञाचा पदकाचा डबल धमाका

सायकलिंग संघाला दुसऱ्या दिवशी ३ राैप्यपदके

नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय सायकलीस्ट पुजा दानाेळे आणि संज्ञा पाटीलने आपला दबदबा कायम ठेवताना पाचव्या सत्रातील खेलाे इंडिया युथ गेम्समध्ये पदकांचा डबल धमाका उडवला. सुवर्णपदक विजेत्या पुजाने शुक्रवारी महिलांच्या २ किमी वैयक्तिक परसुटमध्ये राैप्यपदक पटकावले. यासह तिने यंदाच्या स्पर्धेत दुसरे पदक जिंकले. तसेच राैप्यपदक विजेत्या संज्ञाने स्प्रिंट प्रकारात राैप्यपदकाचा बहुमान पटकावला. यासह तिच्या नावे सलग दुसऱ्या राैप्यपदकाची नाेंद झाली. यादरम्यान विवान सप्रु हा पुरुषांच्या ३ किमी वैयक्तिक परसुटमध्ये राैप्यपदकाचा मानकरी ठरला. महाराष्ट्राचे हे तिन्ही सायकलिस्ट दिल्लीच्या वेलाेड्रॅमवर पदकाचे मानकरी ठरले आहेत. मुख्य प्रशिक्षक दिपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पदकांचा बहुमान मिळवला.

ईशा जाधवच्या सुवर्णपदकासह महाराष्ट्राचा ॲथलेटिक्स मध्ये पदकांचा चौकार

कोल्हापूरच्या अनिकेत मानेने उंच उडीत कास्यपदक जिंकले

भोपाळ
ईशा जाधव हिने मिळवलेल्या सुवर्णपदकासह महाराष्ट्राने ॲथलेटिक्स मध्ये चार पदकांची कमाई केली. शिवम लोहोकरे याने भालाफेकीत रौप्य पदक तर ऋषिप्रसाद देसाई याने 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक पटकाविले. अनिकेत माने याने उंच उडीत कांस्यपदक पटकाविले.

वसई येथील खेळाडू ईशा हिने खेला इंडिया स्पर्धेतील पदार्पणातच सोनेरी कामगिरी करत नेत्रदीपक यश संपादन केले. तिने चारशे मीटर्स धावण्याची शर्यत ५५.९५ सेकंदात पार केले. यापूर्वी तिने राष्ट्रीय युवा स्पर्धेत सुवर्णपदक तर आशियाई युवा स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. ती विरार येथे संदीप सिंग लठवाल यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज चार तास सराव करीत आहे.

अनिकेतची पदकांची हॅट्ट्रिक
कोल्हापूरचा अनिकेत माने याने उंच उडीत कास्यपदक जिंकून खेलो इंडिया स्पर्धेतील स्वतःची पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली. 2021 मध्ये झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत त्याला कास्य पदक मिळालं तर गतवर्षी त्याने सुवर्ण कामगिरी केली होती. यंदा फारसा सराव नसतानाही त्याने तिसरे पदक जिंकले. त्याने १.९८ मीटर्स पर्यंत उडी मारली.
अनिकेत याचे वडील सुभाष हे स्वतः उंच उडीतील माजी राष्ट्रीय खेळाडू असल्यामुळे त्याला या क्रीडा प्रकाराचे बाळकडू आपल्या वडिलांकडूनच मिळाले आहे. अनिकेत याला दोन महिन्यांपूर्वी पाठीच्या दुखण्याचा त्रास होत होता. येथील स्पर्धेतील सहभागाबाबत तो शासंक होता. महाराष्ट्राला या खेळात पदक मिळवण्याच्या जिद्दीने त्याने सराव केला आणि कौतुकास्पद कामगिरी यापूर्वी त्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली आहेत.‌

भालाफेकीत शिवमला रौप्य
भालाफेकी मध्ये शिवम लोहोकरे याने रौप्य पदक पटकाविले. त्याने ६७.६२ मीटर्स पर्यंत भालाफेक केली. तो पुण्यामध्ये आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट येथे सराव करीत आहे.‌ या स्पर्धेत त्यांना प्रथमच भाग घेतला होता. आयत्यावेळी या स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती तरीही त्याने जिद्दीने येथे चांगली कामगिरी करीत महाराष्ट्राच्या पदक तालिकेत आणखी एक पदकाची भर घातली.‌

ऋषीप्रसादची रूपेरी कामगिरी
महाराष्ट्राच्या ऋषी प्रसाद देसाई याने शंभर मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक पटकाविले. त्याने हे अंतर १०.६७ सेकंदात पार केले. चुरशीने झालेल्या शर्यतीत त्याने सुवर्णपदक जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र त्याला निसटता पराभव स्वीकारावा लागला आणि रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.