भाजपाकडून मुक्ता टिळकांच्या कुटुंबाहेरील व्यक्तीला उमेदवारी
पुणे- “शुक्रवारी रात्री मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी टिळकवाड्यात जाऊन शैलेंद्र टिळक आणि कुणाल टिळक यांची भेट घेतली. यावेळी दोघांशीही चर्चा करून भारतीय जनता पार्टी त्यांना सन्मानाचं स्थान देईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे . दोघांनीही आम्ही पक्षाबरोबर एकनिष्ठ राहणार आहोत, असे सांगितले आहे”, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी भाजपाने पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, भाजपाने टिळकांच्या कुटुंबाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, याबाबतचंद्रकात पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, उमेदवारीवरून जगताप कुटुंबियांमध्ये वाद असल्याची चर्चा होती. याबाबत विचारलं असता, “जगताप कुटुंबियांमध्ये उमेदवारीवरून कोणताही वाद नाही”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. “लोकांनी यााबाबत अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मण जगताप यांचा मुलगा वयाने लहान आहे, पण त्याने काल समजदारीची भूमिका घेतली आणि आमच्या कुटंबात कोणताही वाद नसल्याचे म्हटलं. मी नेहमी सांगतिलं आहे की जर अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाली तर, शंकर जगताप हे निवडणुकीचे प्रमुख असतील. आज मी पुण्याचा पालकमंत्री म्हणून शंकर जगताप यांना निवडणुकीचे प्रमुख घोषित करतो”, असेही ते म्हणाले.