Home Blog Page 1419

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग सांडभोर,तर सरचिटणीसपदी सुकृत मोकाशी

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणुकीत (२०२३-२०२४) अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे वरिष्ठ पत्रकार पांडुरंग सांडभोर यांची तर सरचिटणीसपदी सुकृत मोकाशी ( तरुण भारत ) व खजिनदार पदी अंजली खमितकर (दै. प्रभात) यांची निवड झाली आहे.

निवड झालेल्या पदाधिकारी

अध्यक्ष : पांडुरंग सांडभोर (दै. पुढारी)
उपाध्यक्ष : उमेश शेळके (दै. सकाळ )
स्वप्निल शिंदे (दै. महाराष्ट्र टाईम्स)
सरचिटणीस : सुकृत मोकाशी (तरुण भारत)
खजिनदार : अंजली खमितकर (दै. प्रभात)
चिटणीस : पूनम काटे – कलापुरे (दै. राष्ट्र संचार )
प्रज्ञा केळकर – सिंग (दै. पुढारी )
कार्यकारिणी सदस्य
हर्ष दुधे (दै. महाराष्ट्र टाईम्स)
वरद पाठक (दै. महाराष्ट्र टाईम्स)
विक्रांत बेंगाळे (दै. आज का आनंद)
शहाजी जाधव (दै. सकाळ )
श्रद्धा सिदीड (दै. महाराष्ट्र टाईम्स)
विनय पुराणिक (दै. पुण्यनगरी )
गणेश राख (दै.सामना )
संभाजी सोनकांबळे (दै.लोकमत)
शंकर कवडे (दै. पुढारी )
भाग्यश्री जाधव (दै. पुढारी )

अॅड. प्रताप परदेशी, अॅड. स्वप्नील जोशी, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहिले होते.

वीज बिल रोखीत भरण्यावर १ ऑगस्टपासून कमाल मर्यादा,ऑनलाइन वीज बिल भरण्याचे महावितरणकडून आवाहन

मुंबई.: विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार १ ऑगस्ट २०२३ पासून महावितरणच्या वीजबिल रोखीत भरण्यावर कमाल मर्यादा राहणार असून त्यामुळे सुरक्षित व सुविधाजनक असणाऱ्या ऑनलाइन पध्दतीने वीजदेयकाचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

      महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यांनी ३१ मार्च २०२३  नुसार दिलेल्या आदेशान्वये १ ऑगस्ट २०२३  पासून महावितरणच्या रोखीत वीजबिल भरण्याच्या कमाल रकमेवर मर्यादा राहणार आहे. महावतिरणचे सर्व ग्राहक (लघुदाब कृषी वर्गवारी सोडून) यांना दरमहा कमाल मर्यादेत केवळ ५ हजार रुपयांपर्यंतचे वीजबील भरता येणार आहे. तसेच लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहकांना वीजबिल रोखीत भरण्यासाठीची दरमहा कमाल मर्यादा १० हजार एवढी राहणार आहे.

      महावितरणच्या वतीने वीजग्राहकांना www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने  विनामर्यादा वीजदेयकाचा भरणा करता येवू शकतो. या प्रणालीची कार्यपध्दती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पध्दतीत ग्राहक वीजदेयकाचा भरणा क्रेडिट/डेबिटकार्ड, नेटबँकींग व युपीआय इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत करू शकतो. तसेच भारत बिल पेमेंट (BBPS) मार्फत देखील वीज बिल भरणा करता येऊ शकतो. या व्यतिरिक्त महावितरणने रु.५,०००/- पेक्षा जास्त बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना RTGS/NEFT द्वारे देयक भरण्याची  सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी लागणारी आवश्यक ग्राहक निहाय बँकेच्या माहितीचा तपशिल वीजबिलावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

      क्रेडिट कार्ड वगळता इतर सर्व पध्दतीने वीजबिल भरणा निशुल्क आहे. तसेच ऑनलाईन पध्दतीने देयकाचा भरणा केल्यास बिल रकमेच्या ०.२५ टक्के (जास्तीत जास्त रु. ५००/-) इतकी सवलत देखील देण्यात आलेली आहे. ऑनलाईन पध्दतीने वीजदेयकाचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून  या पध्दतीस रिझर्व बँकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा २००७ च्या तरतूदी लागू आहेत. सद्यस्थितीत  महावितरणचे ११० लाख ग्राहक (६५ टक्के) ऑनलाईन सुविधेचा लाभ घेत असून यातून दरमहा महावितरणला साधारणत: २२५० कोटी महसूलाची वसूली होते.

      ऑनलाईन पध्दतीने भरणा केल्यास ग्राहकास त्वरित त्याच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर  SMS  द्वारे पोच मिळते तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावर Paymnt History तपासल्यास भरणा तपशील व पावती उपलब्ध्द होते. ऑनलाइन वीज बिल भरणा पध्दत अत्यंत सुरक्षित असून यासंदर्भात काही तक्रार अथवा शंका असल्यास ग्राहक helpdesk_pg@mahadiscom.in या ई-मेल आयडीवर महावितरणशी संपर्क साधू शकतात. रांगेत वेळ वाया न घालवता महावितरणने उपलब्ध करुन दिलेल्या निशुल्क ऑनलाईन भरणा सेवांचा वीज ग्राहकांनी फायदा घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

क्रांतिवीर लहुजी वस्ताद प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांचा गौरव

कौशल्याभिमुख शिक्षण घेण्यावर भर द्यायला हवा-विवेक वेलणकर यांचे प्रतिपादन
पुणे : “आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारायचे असेल, तर कुशल मनुष्यबळाची मोठी गरज आहे. तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक संधी खुणावत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणासोबत कौशल्याभिमुख शिक्षण घेण्याला अधिक प्राधान्य द्यायला हवे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते व सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केले.

क्रांतिवीर लहुजी वस्ताद प्रतिष्ठान, पुणे आयोजित ३३ व्या हिंदू मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात विवेक वेलणकर बोलत होते. बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात क्रांतिवीर लहुजी वस्ताद प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, क्रांतिवीर लहुजी यांचे वंशज किसन जाधव, ठाणे जनता सहकारी बँकेचे उपसरव्यवस्थापक राजीव कुमार मिश्रा, मातंग विकास संस्थेचे अध्यक्ष राजेश रासगे, रामोशी समाजाचे नेते सुनील जाधव, मॉडर्न शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी काळे, डॉ. नंदकिशोर एकबोटे, अशोक लोखंडे आदी उपस्थित होते. सुहास पासलकर, हरिश्चंद्र कोंढरे, मंगेश नलावडे, अभिजित पतंगे, राजेंद्र जाधव, दीपक पाटील, प्रा. शांताराम पिंगळे, पराग शिवदास, राजू पाटील यांनी कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन केले.
क्रांतिवीर लहुजी वस्ताद पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते राजेश रासगे, पूजनीय गोळवलकर गुरुजी पुरस्कार विद्यार्थिनी सोनाली खैरे (सन्मानचिन्ह, श्रीफळ, उपरणे व प्रत्येकी रोख ११ हजार रुपये), वंदनीय लालबहादूर शास्त्री पुरस्कार विद्यार्थी ओंकार खाडे (सन्मानचिन्ह, श्रीफळ, उपरणे व रोख ५ हजार रुपये) यांना प्रदान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पारितोषिक अस्मिता चंदनशिवे, आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक पारितोषिक ईश्वर आखाडे, संत रोहिदास पारितोषिक सुजाता खडसे व स्वातंत्र्यवीर सावरकर पारितोषिक स्मिता वाघमारे या विद्यार्थ्यांना देण्यात आले. तसेच ८००-९०० मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा यावेळी प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
विवेक वेलणकर म्हणाले, “दहावी आणि बारावीचा टप्पा महत्त्वाचा असतो. व्यावसायिक अभ्यासक्रम शिकण्यावर भर दिला पाहिजे. आपल्यातील क्षमता, कला ओळखून करिअरची दिशा ठरवली पाहिजे. आयटीआय, डिप्लोमा, व्होकेशनल कोर्स, नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, फार्मसी असे जगभरात मोठी मागणी असणाऱ्या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी आहेत. त्या समजून घेत आवश्यक शिक्षण घेतले, तर नोकरी व व्यवसायाच्या अनेक वाटा आपल्याला मिळतील.”

प्रास्ताविकात मिलिंद एकबोटे म्हणाले, “अनेक हालअपेष्टा सहन करूनही ज्यांनी हिंदू धर्म सोडला नाही, त्या दलित बांधवाचे आमच्यावर उपकार आहेत, हा गोळवलकर गुरुजींचा विचार घेऊन आम्ही गेली ३३ वर्षे हा कार्यक्रम घेत आहोत. हिंदू समाजातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत हे यश मिळवलेले असते. दलित, उपेक्षित नाहीत, तर हे प्रगतीशील बांधव आहेत. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी योगदान देणाऱ्या लहुजी साळवे, उमाजी नाईक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श ठेवून चांगले शिकावे व राष्ट्र कार्यात योगदान द्यावे.”

राजीव कुमार मिश्रा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. करिअरच्या विविध संधी त्यांनी सांगितल्या. तसेच अभ्यासातील सातत्य, चिकाटी आणि प्रामाणिकपणा तुम्हाला यश मिळवून देते, असे नमूद केले. रोहिणी काळे, राजेश रासगे, सुनील जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दीपक पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शांताराम पिंगळे यांनी आभार मानले.

ठाणे-नाशिक महामार्गाच्या आठ पदरीकरणाचे काम युद्धपातळीवर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मास्टिक पद्धतीने तातडीने खड्डे बुजवून वाहतूक कोंडी टाळण्याच्या सूचना

        ठाणे, दि. 30 :-  ठाणे -नाशिक महामार्गावर पडघ्यापर्यंत वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आठ पदरी रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच लहान वाहनांना रस्ता मिळावा, यासाठी अवजड वाहने डाव्या बाजूने चालविण्यासंदर्भात सूचना देण्याचे निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. तसेच या मार्गावरील खड्डे तातडीने मास्टिकने भरण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळीच ठाणे- नाशिक महामार्गावरील खारेगाव ते पडघा, खडवली फाटा या रस्त्याची पाहणी केली. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी होण्याची कारणे पाहण्यासाठी तसेच रस्त्यावरील खड्ड्यांसंदर्भात यापूर्वी मंत्रालयात मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून या महामार्गाची पाहणी केली. ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होत आहे, अशा सर्व ठिकाणी त्यांनी पाहणी करून हे खड्डे तत्काळ मास्टिक पद्धतीने बुजविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री महोदयांनी आज या मार्गाची पाहणी केली. ठाणे नाशिक महामार्गावरील पडघा पर्यंतच्या रस्त्याचे आठपदरीकरण करण्याचे काम सुरू आहे. हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे. तसेच ज्या ठिकाणी पंक्चर आहेत किंवा कट आहेत, ते बंद करण्याच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिल्या. तसेच रस्ता ओलांडून गावात जाण्यासाठी असलेल्या ठिकाणी हाईट बॅरिअर लावून मोठी वाहने त्या ठिकाणाहून वळणार नाहीत याची दक्षता घ्यावी. रस्त्याच्या डाव्या बाजूनेच अवजड वाहने चालविण्यात यावीत, जेणेकरून लहान वाहने व रुग्णवाहिकांना एका बाजूने रस्ता मोकळा मिळेल, यासाठी वाहन चालकांना सूचना देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिले आहे. मोठ्या प्रमाणात अवजड वाहने रस्त्यावर आल्यास ही वाहने थांबविण्यासाठी काही ठिकाणी तात्पुरत्या पार्किंगची सुविधा करण्यात यावी, त्या ठिकाणी वाहनचालकांसाठी शिवभोजन थाळी केंद्र सुरू करावे तसेच इतर सुविधा पुरविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राजनोली व माणकोली येथील उड्डाणपुलाखालील रस्ते व्यवस्थित करून घ्यावेत, जेणेकरून गर्दीच्या काळात या ठिकाणी अवजड वाहने थांबविता येतील. तसेच माणकोली येथील वाहतुकीस अडथळा येणारी दुकाने, गाळे तेथून हटविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

ठाणे ग्रामीण पोलीसांच्या मुख्यालयासाठी निश्चित केलेल्या सापे येथील जागेचीही पाहणी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केली. तसेच काही दिवसांपूर्वी पडघ्यातील खडवली फाटा येथे अपघात झाला होता. त्या स्थळाची पाहणीही मुख्यमंत्री महोदयांनी केली. जीप व कंटेनरचा अपघात दुर्देवी असून असे अपघात घडू नयेत, यासाठी खबरदारी घेण्यात यावी. या ठिकाणी सेवा रस्ता (Service Road) तातडीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिली. भिवंडी येथे आरोग्य उपकेंद्र उभारण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून आरोग्य विभागाकडून त्यासाठी निधी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार शांताराम मोरे, प्रकाश पाटील, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, एमएसआरडीएचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांच्यासह एमएमआरडीए, एमएसआरडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य महामार्ग पोलीस, ठाणे शहर व ग्रामीण पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे महापालिका आयुक्तांना निर्देश

            आज पावसाने उसंत घेतल्याने मुंबई शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना दूरध्वनीवरून दिले. तसेच मुंबई व परिसरातील रेल्वे स्थानकांजवळचे रस्ते, रेल्वे मार्गावर पाणी साचणारी ठिकाणे आदी तातडीने स्वच्छ करून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री महोदयांनी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना दिले. तसेच एमएमआरडीच्या अखत्यारित येत असलेल्या रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या सूचनाही एमएमआरडीए आयुक्तांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.

 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने पुण्यात पंतप्रधानांना सन्मानित करण्यात येणार

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान सकाळी 11 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन   पूजाअर्चा करणार आहेत. सकाळी 11.45 वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्यानंतर, दुपारी 12:45 वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.

पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पुणे मेट्रो टप्पा 1 च्या कार्य पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांच्या सेवेचे लोकार्पण करणार आहेत. हे विभाग फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानकापर्यंत आहेत. 2016 मध्ये पंतप्रधानांच्याच हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. मेट्रो रेल्वेचे हे नवीन विभाग पुणे शहरातील शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्थानक यांसारखी महत्त्वाची ठिकाणे जोडतील. देशभरातील नागरिकांना आधुनिक आणि पर्यावरणस्नेही गतिमान शहरी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला साकार करण्याच्या दिशेने हे लोकार्पण एक महत्त्वाचे पाऊल आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेत मेट्रो रेल्वे मार्गावरील काही मेट्रो स्थानकांची रचना करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक आणि डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकांची रचना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी परिधान केलेल्या पगडी सारखी म्हणजेच ज्याला “मावळा पगडी” देखील म्हटले जाते, या सारखी आहे. शिवाजी नगर भूमिगत मेट्रो स्थानकाची एक विशिष्ट रचना आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची आठवण करून देते.

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिवाणी न्यायालय मेट्रो स्थानक. हे देशातील सर्वात खोलवर असलेल्या मेट्रो स्थानकांपैकी पैकी एक आहे, ज्याचा सर्वात खोल बिंदू 33.1 मीटर आहे. सूर्यप्रकाश थेट फलाटावर पडेल अशा पद्धतीने या स्थानकाचे छत बनवण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) अंतर्गत कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. सुमारे 300 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या या संयंत्राच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 2.5 लाख मेट्रिक टन कचरा वापरून वीज निर्मिती केली जाईल.

सर्वांसाठी घरे या उद्दिष्टपूर्तीच्या ध्येयाकडे वाटचाल करत, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेली 1280 हून अधिक घरे पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरीत करण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेली 2650 हून अधिक घरे देखील पंतप्रधान हस्तांतरित करणार आहेत. त्यांनतर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणार्‍या सुमारे 1190 घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या 6400 हून अधिक घरांची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

पंतप्रधानांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. लोकमान्य टिळकांच्या परंपरेचा सन्मान म्हणून दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचा आरंभ टिळक स्मारक संस्थेने 1983 मध्ये केला. देशाची प्रगती आणि विकास यासाठी कार्य केलेल्या तसेच त्या बाबतीत उल्लेखनीय आणि विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी म्हणजे 1 ऑगस्टला दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो.

पंतप्रधान या पुरस्काराचे 41 वे मानकरी असतील. हा पुरस्कार मिळालेल्या दिगजांमध्ये डॉक्टर शंकर दयाळ शर्मा, प्रणव मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, एन आर नारायण मूर्ती, डॉ. ई‌. श्रीधरन या व्यक्तींचा समावेश आहे.

महापालिकेत गेल्या पाच वर्षात अडीच हजार कोटीचा गफला..हिम्मत असेल तर करा सीबीआय चौकशी -संजय मोरे

पुणे- आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय अशी पुणे महानगरपालिकेची अवस्था झाली आहे, गेली काही महिने हवी तिथे बदली , थेट वरून करविण्याचा घाट घालून एक माजी लोकप्रतिनिधी करोडोची माया गोळा करत असल्याची महापालिकेत चर्चा असतानाच आता पाच वर्ष भाजपा आणि प्रशासन यांनी रस्त्यांच्या कामात देखील घोटाळे केल्याच्या चर्चेला उत आला आहे. ..कागदोपत्री रस्ते अन प्रत्यक्षात बिलांच्या रकमा मात्र खिशात असा प्रकार झाल्याचा आरोप आता उघड उघड होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे शहर अध्यक्ष संजय मोरे यांनी देखील पाच वर्षात झालेले रस्ते , रस्ते दुरुस्तीची कामे तसेच सल्लागारांच्या नेमणुका आणि त्यांचा कारभार याबाबत सीबीआय चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे कि,’ पुणे महानगरपालिकेने पाच वर्षांमध्ये अडीच हजार कोटी रुपये सिमेंट काँक्रिट व डांबरी रस्ते करण्यावर खर्च केले. तरीदेखील पुणे शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांच साम्राज्य दिसतच आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पैसे उकळण्याचे नवीन फॅड आलय, तज्ञ सल्लागार नेमायचा आणि त्या सल्लागारांनी आपली फी घ्यायची आणि महानगरपालिकेच्या कामाकडे दुर्लक्ष करायचं. अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराच्या हातात हात घालायचा ही पद्धत चालू झाली आहे. सल्लागाराला आपण बिलाच्या अडीच टक्के फी देतो कामाचा दर्जा तपासणीचे काम त्याचेच आहे ते फक्त कागदांवर सह्या करतात प्रत्यक्ष साइटवर सल्लागार कधीच फिरकत नाहीत. इस्टिमेट तयार करताना PWD चा DSR वापरतात तो बाजार भावाने प्रमाणेच असतो, तरीदेखील चाळीस टक्के पर्यंत टेंडर बिलो गेल्यावर कामाचा दर्जा कसा काय राहणार ?
इस्टिमेट कमिटी त्या रस्त्याची मेंटेनन्सची जबाबदारी पाच वर्षांसाठी काम केलेल्या ठेकेदारावर टाकते त्यासाठी त्याला पैसेही वाढवून दिले जातात. परंतु पावसाळ्यात व इतर वेळेस जसे खड्डे पडतात तसे महानगरपालिकाच खड्डे बुजवते आणि कॉन्ट्रॅक्टर हा नामानिराळा राहतो, ही महानगरपालिकेची कार्यपद्धती राहिली आहे. मुळात कामाची आवश्यकता आहे का? हे बघायचं काम वित्तीय समितीच आहे परंतु त्याकडे सुद्धा दुर्लक्ष होतं. प्रशासन काय काम करत आहे. त्यांच्यावर लोकप्रतिनिधींचा अंकुश आहे का नाही ? असा प्रश्न पुणेकर म्हणून आमच्या मनात येतो. काही जण असं सांगतात की सल्लागार, कॉन्ट्रॅक्टर, नगरसेवक आणि अधिकारी हे सगळे एकत्रच असतात, अशा पद्धतीचे हे सगळं कामकाज चालू आहे.काही ठिकाणी काम न करता बिल काढली गेली आहेत. अशी देखील चर्चा खाजगी मध्ये लोक करतात, तसेच वर्तमानपत्रातूनही वाचायला मिळते. भाजपने खड्ड्यात पुणेकरांचे पैसे घालवले आणि आता प्रशासनाने दोघेही सपशेल फेल झाले आहेत. एवढ्या अडीच हजार कोटी रुपयात शहरातील सर्व रस्त्यांचे चांगल्या दर्जाचे डांबरीकरण झाले असते. अंगाला राख फासून काम करा अस आमच म्हणण नाही किमान ओरबाडू नका.पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप आणि प्रशासन काळातील रस्त्यांच्या टेंडरची सीबीआय चौकशी व्हावी ही आमची आग्रहाची मागणी आहे.

बोधीवृक्ष स्थापना महोत्सवाच्या दृष्टीने सुत्रबद्ध नियोजन करण्यात यावे : मंत्री छगन भुजबळ

नाशिक : नाशिक शहरात त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्धस्माकराच्या परिसरात येत्या ऑक्टोबर महिन्यात  श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे. या बोधीवृक्ष स्थापना महोत्सवासाठी देशभरातून उपासक येणार असल्याने त्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधांचे सुत्रबद्ध नियोजन करण्यात यावे. अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ  यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

आज मंत्री छगन भुजबळ यांनी त्रिरश्मी बुद्ध लेणी बोधीवृक्ष स्थापनेचे नियोजित स्थळ व सभा ठिकाण यांची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त अकुंश शिंदे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता एस. आर. वंजारी, शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भदन्त सुगत, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, येत्या नोव्हेंबर महिन्यात देशव्यापी बोधीवृक्ष स्थापना महोत्सव नाशिक शहरात या ठिकाणी महिनाभर होणार आहे. या महोत्सवास श्रीलंका, थायलंड, कोरिया, ब्रम्हदेश, मलेशिया, जापान, तैवान, व्हिएतनाम व कंबोडिया या देशातील भन्ते व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यादृष्टीने बुद्धस्मारक परिसरात वाहन व्यवस्था, येणाऱ्या बौद्ध उपासकांची निवास, भोजन व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था व इतर सोयी-सुविधांचे नियोजन करण्यात यावे. तसेच सभेचे नियोजित स्थळी खड्डेभरणी, सपाटीकरण व इतर तांत्रिक अनुषंगिक बाबींची पूर्तता करण्याबाबतच्या सूचना मंत्री श्री.भुजबळ यांनी उपस्थित अधिकारी व अभियंता यांना दिल्या.

बोधीवृक्षाचे ऐतिहासिक महत्त्व असून इ.स.पूर्व 2566 वर्षांपूवी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना निरंजना नदीच्या काठावार बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले. त्यामुळे हे बोधीवृक्ष अतिपूजनीय आहे. पुढे सम्राट अशोक यांच्या मुलांनी या बोधीवृक्षाची फांदी श्रीलंकेच्या देवानामप्रिय तिरस यांच्या हस्ते अनुराधापूर येथे स्थापित केली. याच बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण नाशिक शहरात करण्यात येणार असल्याने शहराच्या ऐतिहासिक महत्वात भर पडणार असल्याची माहिती शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भदन्त सुगत यांनी यावेळी दिली.

मुंबई उपनगरातील रस्त्यांचे दोन वर्षांच्या आत काँक्रीटीकरण करणार : पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि.३० : अंधेरी येथील गोखले पुलाच्या पहिल्या गर्डरसाठी साहित्य पुरविण्यात आले असून, पुलाचे बांधकाम गतीने पूर्ण करा.  सततच्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडून नागरिकांना वाहतूक कोंडींचा सामना करावा लागत आहे,  यासाठी  तातडीने खड्डे भरावेत.  नागरिकांना दर्जेदार रस्ते मिळावेत यासाठी मुंबई उपनगरातील सर्व रस्त्यांचे दोन वर्षांच्या आत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काँक्रीटीकरण करण्याच्या सूचना  मुंबई  उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्या.

मुंबई उपनगर मधील के पश्चिम वॉर्ड, के पूर्व वॉर्ड व एल वॉर्ड येथील इर्ला मार्ग जंक्शन, व्ही. एम. मार्ग आणि एस. व्ही. मार्ग जंक्शन,सहार मार्ग जंक्शन, साकीनाका जंक्शन, कांजूरगाव इत्यादी ठिकाणी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रस्त्यांची पाहणी केली. यावेळी ते  बोलत होते.  स्थानिक लोकप्रतिनिधी, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलारासु, उपायुक्त रस्ते संजय महाले, प्रमुख अभियंता (रस्ते) मनीषकुमार पटेल आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.लोढा यांनी अंधेरी येथील साकीनाका रोड, सागर हॉटेल आणि गुलमोहर रोड येथे अधिकाऱ्यांसमवेत रस्त्यांची पाहणी करून ज्या ठिकाणी तातडीने दुरूस्ती करणे आवश्यक आहे असे खड्डे कोणताही विलंब न करता भरले जावेत अशा सूचना अधिकाऱ्‍यांना केल्या. तसेच यावर्षी महापालिकेने केलेल्या चोख व्यवस्थेमुळे सब-वेमध्ये पाणी भरण्याची समस्या कमी झाली असल्याबद्दल पालिका प्रशासनाचे आभार मानले. पश्चिम उपनगरांमध्ये पावसामुळे रस्त्यांवर तयार झालेले खड्डे भरण्यासाठी रॅपिड हार्डनिंग काँक्रिट, मास्टीक अस्फाल्ट तंत्रज्ञान वापरून सुरू असलेल्या कामांची पाहणी  पालकमंत्री श्री. लोढा यांनी केली.

छतावरील सौर ऊर्जा निर्मिती योजनेसाठी पुणे परिमंडलाचा राष्ट्रीयस्तरावर गौरव

महावितरण तब्बल सहा पुरस्कारांचे मानकरी

पुणे, दि. ३० जुलै २०२३: राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात छतावरील सौर ऊर्जा निर्मिती योजनेच्या अंमलबजावणीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महावितरणला राष्ट्रीयस्तरावरील सहा पुरस्कारांनी शनिवारी (दि. २९) गौरवण्यात आले.

पणजी (गोवा) येथील कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री ना. श्री. प्रमोद सावंत यांच्याहस्ते महावितरणचे संचालक (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे, पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी पुरस्कार स्वीकारले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्री. भगवंत खुबा, गोव्याचे ऊर्जामंत्री ना. श्री. सुदीन ढवळीकर, ‘एआयआरईए’चे अध्यक्ष श्री. साकेत सुरी उपस्थित होते. या कार्यक्रमात केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्री. खुबा यांनी महावितरणच्या ‘सौर’ योजनेतील कामगिरीचे विशेष कौतुक केले.

छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ‘नॅशनल पोर्टल फॉर रूफटॉप सोलर’ या वेबपोर्टलचे उद्घाटन मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्याहस्ते मागीलवर्षी झाले होते. या वेबपोर्टलच्या वर्षपूर्तीनिमित्त पणजी जिमखाना येथे केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनच्या (एआयआरईए) वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात छतावरील सौर ऊर्जा योजनेच्या सुलभ व लोकाभिमुख अंमलबजावणीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामांसाठी महावितरणचे संचालक (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या योजनेच्या ग्राहक प्रबोधन व जनजागरणासाठी विविध माध्यमांद्वारे केलेल्या कामाची दखल घेत पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. योजनेसंबंधी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. दीपक कुमठेकर, नागपूर परिमडंलाचे मुख्य अभियंता श्री. दिलीप दोडके, महावितरण विशेष प्रकल्प कक्षाचे मुख्य अभियंता श्री. चंद्रमणी मिश्रा, कार्यकारी अभियंता श्री. शरद बंड यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पुणे परिमंडल अंतर्गत छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या जनजागरणासाठी सातत्याने विविध उपक्रम घेण्यात येत आहे. त्यासाठी उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटनी समन्वयक म्हणून काम पाहत आहे. दृकश्राव्य माहितीपट, प्रदर्शनी, सौर ऊर्जारथ, ग्राहकसंवाद मोहीम व माहितीपत्रकांचे वितरण, प्रात्यक्षिक, समाजमाध्यमे तसेच प्रसारमाध्यमांद्वारे योजनेबाबत प्रबोधन व जनजागरण सुरु आहे. त्याची दखल या पुरस्काराच्या निमित्ताने राष्ट्रीयस्तरावर घेण्यात आली आहे. सौर योजनेच्या वेगवान व प्रभावी अंमलबजावणीसाठी पुणे परिमंडलातील अभियंता, तांत्रिक कर्मचाऱ्यांसह एजन्सीजच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे पुणे परिमंडलामध्ये सध्या १० हजार २०० पेक्षा अधिक ग्राहकांकडील २५४ मेगावॅट क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. तर आणखी ३ हजार ५०० पेक्षा अधिक ग्राहकांकडे ९६ मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पांचे काम सुरु आहे.

मनोगत : राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल– छतावरील सौर ऊर्जा योजना अधिकाधिक लोकाभिमुख व वेगाने कार्यान्वित करण्यासाठी सातत्याने उपक्रम सुरु आहे. त्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाला हा पुणे परिमंडलाच्या सांघिक कामगिरीचा गौरव आहे. या कामगिरीमध्ये प्रसिद्धी माध्यमांचा देखील मोलाचा वाटा आहे.

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक पुणे केंद्राच्या वतीने शिक्षक पुरस्कार आणि विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य

पुणे : आज भारतात अनेक अडचणी आहेत. भारतात काय राहिले आहे असा विचार केला तर भारतात चांगले शिक्षक आहेत. खूप काही चांगलं घडविण्याची ताकद आहे. विद्यार्थ्यांच्या ऊर्जेचे चांगल्या गोष्टींमध्ये रूपांतर करण्याचे काम शिक्षक करतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आले तरी शिक्षकांचे महत्त्व कमी होणार नाही. शिकवताना शिक्षकांची जी भावना असते ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही, त्यामुळे शिक्षकाला पर्याय नाही. शिक्षणाचे वृत्तीमध्ये रूपांतर होणे गरजेचे आहे. असे मत माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक पुणे केंद्राच्या वतीने शिक्षक पुरस्कार आणि विद्यार्थी आर्थिक सहाय्य कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार पेठेतील वरदश्री सभागृहात करण्यात आले होते. यावेळी केंद्रप्रमुख मकरंद माणकीकर, कार्यवाह विश्वनाथ भालेराव, मध्यवर्ती सदस्य अनिल शिदोरे, संयोगिता पागे, शैक्षणिक प्रमुख राजेंद्र देवधर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात संस्कृत शिक्षिका भाग्यश्री हर्षे, मराठी विषय शिक्षक यशवंत हरिभक्त, योग शिक्षिका लीना भुस्कुटे, विज्ञान शिक्षक हेमंत पाठक यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. संस्कृत आणि मराठी विषयात पीएचडी आणि पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील सन्मान करण्यात आला.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, आजच्या काळात समाजातील सर्व लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे समाजामध्ये फूट पाडण्याचे काम आधी इंग्रजांनी केले आता समाजातीलच काही लोक करत आहेत. देशावर भक्ती करायला शिक्षकांनी शिकवले पाहिजे.

आपली संस्कृती सोडून दुसऱ्यांच्या संस्कृतीचे अनुकरण करू नका. आपल्यावरची श्रद्धा हरवते तेव्हा दुसऱ्याचे आकर्षण वाटते आणि आपल्या गोष्टींचे विस्मरण होते. शेक्सपिअर वाचा पण कालिदास देखील वाचायलाच हवे, असेही त्यांनी सांगितले.

विश्वनाथ भालेराव यांनी स्वागत, मकरंद माणकीकर यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुजाता मवाळ यांनी आभार मानले.

बीपीसीएलची ईव्ही चार्जिंग सुविधा विस्तारण्यासाठी एथर एनर्जीशी भागिदारी 

मुंबई – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या उर्जा क्षेत्रातील नाविन्यपूर्ण मोबिलिटी सुविधा कंपनीने एथर एनर्जी या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक स्कूटर ब्रँडसह धोरणात्मक भागिदारी जाहीर केली आहे. भारतात सर्वात मोठे ईव्ही चार्जिंग नेटवर्क विस्तारण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. या भागिदारीमुळे एथर एनर्जीला बीपीसीएलची देशभरात पसरलेली २१,००० पेक्षा जास्त फ्युएल स्टेशन्स उपलब्ध होतील व तिथे एथरचे फास्ट- चार्जिंग ग्रिड बसवता येतील.

देशात दमदार आणि सर्वत्र चार्जिंग पायाभूत सुविधांचे नेटवर्क प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट एथर एनर्जीने ठेवले असून त्यांनी १०० शहरांत १४०० चार्जर्ससह भारतात सर्वात मोठे ईव्ही चार्जिंग नेटवर्क उभे केले आहे. बीपीसीएलसह भागिदारी करून एथर ग्रिडचा विस्तार करण्याचे ध्येय एथर एनर्जीने ठेवले आहे व त्याद्वारे एथर इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या देशभरातील पसरलेल्या ग्राहकांना सेवा देणे शक्य होईल. ग्राहकांना एथर अपवरून ही फास्ट चार्जर्स सहजपणे शोधून चार्जर उपलब्ध असल्याची माहिती पाहिजे तेव्हा आणि तत्काळ मिळवून त्यानुसार चार्जिंगचे नियोजन करता येईल.

या भागिदारीमुळे एथर एनर्जीचे मोठ्या शहरांतील नेटवर्क बळकट होईल तसेच जास्त वापर असलेल्या आंतरशहरी मार्गांवर चार्जिंगच्या सुविधा तयार करता येतील. सुरुवातीच्या टप्प्यात एथर एनर्जीने दिल्ली एनसीआरमधील चार ठिकाणी चार फास्ट चार्जर्स यशस्वीपणे बसवले आहेत. कंपनीने यावर्षाच्या अखेरीपर्यंत भारतातील बीपीसीएलच्या विविध ठिकाणी फास्ट चार्जर्सची संख्या १०० पर्यंत नेण्याचे ठरवले आहे.

देशात हरित उर्जेला चालना देण्यात बीपीसीएल आघाडीवर आहे. भारतात ७००० एनर्जी स्टेशन्सचे नेटवर्क तयार करत ईव्हीला मध्यवर्ती स्थान मिळवून देण्याचे आमचे ध्येय आहे. भारतात वैयक्तिक वापरासाठी दुचाकीला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्येही दुचाकीला आधी पसंती देण्यात आली. एथर एनर्जीसारख्या इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आणि नाविन्यपूर्णतेवर भर देणाऱ्या कंपनीशी भागिदारी ही आमच्या एनर्जी स्टेशन्सवर ग्राहकांना सर्वोत्तम ईव्ही चार्जिंग सुविधा मिळवून देण्याच्या दिशेने उचललेले धोरणात्मक पाऊल आहे. यामुळे ईव्ही क्षेत्रात नाविन्यपूर्ण सुविधा सहजपणे उपलब्ध होतील.

एथर एनर्जीचे प्रमुख व्यवसाय अधिकारी रवनीत फोकेला म्हणाले, ‘देशात इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्यासाठी दमदार चार्जिंग पायाभूत सुविधांचे नेटवर्क तयार करणे आवश्यक आहे. म्हणूनच एथर एनर्जीने भारतातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक व्हिइकल चार्जिंग नेटवर्क उभारण्यासाठी गुंतवणूक केली. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसह (बीपीसीएल)    भागिदारी केल्याने देशभरात चार्जिंग नेटवर्क उभारण्याच्या प्रयत्नांना आणखी चालना मिळेल. या भागिदारीमुळे बीपीसीएलच्या फ्युएल स्टेशन्सचे मोठे नेटवर्क आमच्यासाठी उपलब्ध होईल आणि ग्राहकांना फास्ट- चार्जिंग ग्रिड सोयीस्कर अंतरावर उपलब्ध होतील. ईव्हीचा वापर वाढेल तसा चार्जिंग सुविधा सहजपणे उपलब्ध करण्यासाठी अशाप्रकारच्या धोरणात्मक भागिदारी महत्त्वाच्या ठरतील.’

या भागिदारीविषयी बीपीसीएलच्या रिटेल नॉर्थचे प्रमुख राजीव दत्ता म्हणाले, ‘२०४० पर्यंत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी बीपीसीएल सातत्याने प्रयत्नशील आहे. आम्ही आमच्या ७००० पारंपरिक रिटेल दालनांचे एनर्जी स्टेशन्समध्ये रूपांतर करण्याच्या दिशेने आणखी जवळ जात आहोत. हा आमच्या शाश्वत उपक्रमांना प्राधान्य व पाठिंबा देण्याच्या सर्वसमावेशक डिकार्बनायझिंग धोरणाचा भाग आहे. ईव्ही वापरामध्ये इलेक्ट्रिक दुचाकी आघाडीवर आहेत आणि रिटेल दालनांमध्ये चार्जिंग पायाभूत सुविधा उपलब्ध करत ईव्हीचा वापर करू इच्छिणाऱ्यांना आत्मविश्वास व सोयीस्करपणा मिळवून देण्याचे आम्ही ठरवले आहे.’

एथर एनर्जी आणि बीपीसीएल यांच्यात करण्यात आलेली ही भागिदारी देशातील ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा क्षेत्रातील महत्त्वाची घटना आहे. दिल्ली एनसीआरपासून सुरुवात करत आम्ही नेटवर्क विस्तारण्यावर भर देत आहोत. लवकरच या सुविधा देशभरात उपलब्ध केल्या जाणार आहेत. आपल्या ग्राहकांना सोयीस्कर आणि सहजपणे चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एथर एनर्जी बांधील आहे.

पेट्रोल बंक्सचे इलेक्ट्रिकीकरण करण्यासाठी बीपीसीएल झटत असून हरित उर्जा उपायांचा अवलंब करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी व भारतात शाश्वत आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी योगदान देण्यासाठी कंपनी उत्सुक आहे.

महात्मा गांधी असोत किंवा स्वांतंत्र्य सावरकर असोत, कुणाच्या विरोधात बोललेलं खपवून घेणार नाहीत”-उपमुख्यमंत्री फडणवीस

“संभाजी भिडेंनी जे वक्तव्य केलंय त्याचं मी पूर्णपणे निषेध करतो. महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये महात्मा गांधी याच्यांकडे महानायक म्हणून पाहिलं जातं. महानायकांबाबत असं अनुचित वक्तव्य करणं चुकीचं आहे. माझं स्पष्ट मत आहे की अशा प्रकारचं वक्तव्य हे भिडे आणि कुणीही करु नये” असे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले.महापुरुषांविरोधात कुणीही वक्तव्य करु नये, असा सल्ला फडणवीस यांनी भिडेंना दिला आहे.

“अशा वक्तव्यांमुळे लोकांमध्ये संताप निर्माण होतो. लोकं महात्मा गांधी यांच्याबाबत बोललेलं कधीही सहन करणार नाही. याबाबत जी कारवाई करायची असेल ती राज्य सरकार करेल. महात्मा गांधी असोत किंवा स्वांतंत्र्य सावरकर असोत, कुणाच्या विरोधात बोललेलं खपवून घेणार नाहीत, जसे महात्मा गांधींबद्दल कोणी बोलले कि कॉंग्रेसचे लोक रस्त्यावर उतरतात तसे सावरकरांच्या विषयी राहुल गांधी बोलले कि त्यांचा हि निषेध करायला त्यांनी पुढे आले पाहिजे त्यावेळी मात्र ते मिंधे होतात असा प्रतिवार देखील फडणवीस यांनी केला .

त्या मनोहर भिड्याचं डोकं ठिकाणावर आहे काय?- छगन भुजबळ

नाशिक-त्या मनोहर भिड्याचं डोकं ठिकाणावर आहे काय?, असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केला. यावेळी त्यांनी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधत होते.

छगन भुजबळ म्हणाले की, संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल झाला ही चांगली गोष्ट आहे. खरे म्हणजे तो मनोहर भिडे. त्याच्यावर आम्हीही एक केस दाखल केली आहे. आमच्या बागेतील आंबे खाल्ल्यानंतर मुलगा होईल हे जे काही विधान आहे, त्यावर आमची केस आहे. पण कोर्टात ती केस पुढे पुढे ढकलली जात आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आम्ही कोर्टात गेलो. तारीखच लागत नाही. शेवटी काय सरकार फक्त केस करणार. पण केस केल्यावर ती पटकन वर आली पाहिजे. पण तारखावर तारखा पडत असतात. मला कधी कधी वाटतं त्यांचं डोकं ठिकाणावर आहे की नाही तेच समजत नाही. त्या मनोहर भिड्यांचं, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी भिडे गुरूंजीवर निशाणा साधला.

अशा लोकांवर कडक कारवाई करा
महात्मा फुलेंवर ते टीका करतात, पण महात्मा गांधींवरही ते टीका करतात. ज्या पद्धतीने अत्यंत गलिच्छ टीका करतात. माझी खात्री आहे, पंतप्रधान मोदी असतील किंवा अमित शाह असतील कुणालाही ते आवडणार नाही. महात्मा गांधींवरील टीका कुणीही सहन करणार नाही. महात्मा गांधींना आज अख्खं जग नमन करतं. मी अनेक ठिकाणी गेलो. क्वचित एखादा देश असेल तिथे महात्मा गांधींचा पुतळा नाही. जिथे तिथे महात्मा गांधींच्या विचारसरणीला मानलं जातं. आपलसं केलं जातं. अन् इकडे महात्मा गांधींवर गलिच्छ स्वरुपाच्या टीका केल्या जातात. अशा लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भुजबळ यांनी केली.

त्यांच्यासोबत जाणं आत्मघातकी
छगन भुजबळ म्हणाले की, भिडेंबरोबर जाणं हे आत्मघातकी आहे. राजकारणाच्या दृष्टीनेही. महात्मा गांधींना अशा रितीने बोललं तर देशातील जनता सहन करणार नाहीच पण गुजरातमधील कोणताही गुजराती बांधव हे सहन करणार नाही. मोदी आणि शहा देखील सहन करणार नाही, भिडेंवर कारवाई कडक होत नाही म्हणून ते वाट्टेल ते रोज रोज नवीन नवीन काही तरी बोलतात.

स्तुती नको, पण टीका तरी का?
आता पंडित नेहरूंबद्दल बोलले. नेहरूंचे देशासाठी काडीचंही योगदान नाही असं म्हणतात. अरे त्यांचे वडील देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. सर्व दिले त्यांनी या देशासाठी आणि स्वातंत्र्यासाठी. स्वत: साडे अकरा वर्ष नेहरु तुरंगात राहिले. देशाला स्वातंत्र्य मिळेल की नाही हे तेव्हा माहीत नव्हत. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल. फार फार त्यांची भलामण करू नका. त्यांची स्तुती करू नका. पण असले काही तरी आरोप करू नका. मला तरी ते आवडत नाही आणि पसंत नाही, असे ही भुजबळ म्हणाले.

संभाजी भिडे यांच्यावर कारवाईच्या मागणीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी, कराडमध्ये गुन्हा दाखल

सातारा-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचा फोन आणि इमेल आला आहे.याप्रकरणी कराड शहर पोलिस स्थानकामध्ये फोन करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मराठी वृत्तवाहिन्यांनी याबाबत वृत्त दिले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने करणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली होती.दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी धमकीचा मेल आला असून, यात चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.याबाबतची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्याचे काम सुरू असून, या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तसेच चव्हाण यांच्या पाटण कॉलनी येथील निवासस्थानी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे.संभाजी भिडे यांनी महात्मा गांधीजींच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल त्यांना अटकात करण्यात यावी,अशी मागणी चव्हाण यांनी विधिमंडळात केली होती.भिडे यांचे या वक्तव्याचे पडसाद राज्यात सर्वत्र उमटत आहेत. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या येथील निवासस्थानी अज्ञाताने धमकीचा मेल पाठवला असून त्यात चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर चव्हाण यांच्या कार्यालयाच्या वतीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात येत असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. चव्हाण यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या प्रकाराने राज्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

कोड आणि मानक शिखर परिषदेला उत्तम प्रतिसाद

पुणे – हिटिंग, वेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग (HVAC) उद्योगात कोड आणि मानके महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. एचव्हीएसी प्रणालींचे सुरक्षित, कार्यक्षम आणि पर्यावरणास जबाबदार डिझाइन, स्थापना, ऑपरेशन आणि देखभाल सुनिश्चित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम म्हणून काम करतात. या सर्व बाबींचे महत्व जाणून इशरे पुणे चॅप्टरच्या वतीने या परिषदेचे आयोजन केले. परिषदेमध्ये १३० पेक्षाही जास्त सभासदांनी सहभाग घेतला होता.द इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स (इशरे) च्या वतीने पहिल्या ‘कोड आणि मानक शिखर परिषद २०२३-२४’ चे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. या परिषदेचे उदघाटन श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी इशरे पुणे शाखेचे अध्यक्ष नंदकिशोर कोतकर यांनी मागील कार्यक्रमाचे तपशील आणि येणार्‍या काळात होणारे कार्यक्रम या बद्दल माहिती दिली, यावेळी चेतन ठाकूर, वीरेंद्र बोराडे, रितेश खेरा, अमित गुलवडे, विमल चावडा, डॉ. निलेश गायकवाड, सागर मुनीश्वर, अनुज गुप्ता, सुभाष खनाडे, विशाल पवार आणि रशिदा शेख उपस्थित होते. सुबोध मुरकेवार व सुजल शाह सेठ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आशुतोष जोशी यांनी आभार मानले.मंजुनाथ राव यांनी एचव्हीएसी मधील भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कोड आणि मानकांचे विहंगावलोकन करून मार्गदर्शन केले. खुशबू ज्योत्स्ना किंडो यांनी एअर कंडिशनिंगमध्ये भारतीय मानके व त्यांचे महत्व विशद केले. मधुरिमा माधव यांनी राष्ट्रीय बिल्डिंग कोडमधील एचव्हीएसी मानकांबद्दल माहिती दिली. विक्रम मूर्ती व डॉ. ज्योतिर्मय माथूर यांनी ASHRAE व AHRI मानकांबद्दल माहिती दिली. डॉ मनीष पांडे. मनोज खट्टी आणि निवेदिता जाधव यांनी कोड आणि मानक संदर्भातील विविध पैलू यांचे महत्व अधोरेखित करून सर्वांची मने जिंकली. एकंदरीत, कोड आणि मानके एक गंभीर फ्रेमवर्क म्हणून काम करतात ज्यामुळे एचव्हीएसी उद्योग, त्याचे भागधारक आणि सामान्य जनतेला फायदा होतो. एचव्हीएसी प्रणाली अधिक विश्वासार्ह, किफायतशीर आणि टिकाऊ बनवून सुरक्षितता, ऊर्जा कार्यक्षमता, पर्यावरणीय जबाबदारी आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देतात. एचव्हीएसी उद्योगातील व्यावसायिकांना त्यांच्या क्लायंटला सुरक्षित आणि उच्च-कार्यक्षम समाधाने वितरीत करण्यासाठी या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.विशाल पवार आणि रशिदा शेख यांनी परिषदेच्या निमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.