Home Blog Page 1420

लोकसभा निवडणुकीत भाजपला ३६५ जागा मिळतील-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला येत्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या ३६५ जागांवर विजय मिळेल, अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (ता.२९) येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष धीरज घाटे यांचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात ते बोलत होते.

यावेळी माजी खासदार संजय काकडे, अमर साबळे, प्रदीप रावत, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, माजी आमदार योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, संदीप खर्डेकर पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे, धीरज घाटे, रवी अनासपुरे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.पाटील पुढे म्हणाले, ‘‘दर तीन वर्षांनी पक्षात बूथ प्रमुख ते राष्ट्रीय अध्यक्ष पदापर्यंतच्या सर्व पदाधिकारी निवडीची प्रक्रिया ही केवळ भाजपमध्येच केली जात आहे. अन्य कोणत्याही पक्षात भाजपसारखी पदाधिकारी निवडीची पद्धत रूढ नाही.यानुसार भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोरोना संसर्गाच्या काळात राज्यात भाजपचे सरकार सत्तेत नव्हेत. तरीसुद्धा अशा काळात पक्षाचे कार्यकर्ते टिकवून ठेवण्याचे काम जगदीश मुळीक यांनी केले. शिवाय घाटे हे सामान्य घरातून आलेले कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांना संघर्ष नवा नाही.’’पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वासाने मोठी जबाबदारी टाकली आहे. मुळात मी गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणून राजकारणास सुरवात केलेली आहे. त्यामुळे सातत्याने आक्रमक विचाराने विविध आंदोलने केल्याचे घाटे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. यावेळी संजय काकडे, मुरलीधर मोहोळ यांचीही भाषणे झाली. राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले.

महापालिका आयुक्त काम करणार नसतील तर त्यांना बदलावे लागेल – माजी खासदार संजय काकडे यांनी दिले संकेत

लोकसभेच्या ३६५ जागांवर विजय मिळेल-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : शहरातील नगरसेवकांनी सुचविलेली नागरी हिताची कामे महापालिका आयुक्त करणार नसतील तर त्यांना बदलले पाहिजे असे स्पष्ट संकेत माजी खासदार संजय काकडे यांनी येथे काल भाजपच्या एका कार्यक्रमातून दिले,आणि ९८ नगरसेवकांपैकी किती नगरसेवक कार्यक्रमाला उपस्थित आहेत,किती नगरसेवक आयुक्तांच्या कामाबाबत समाधानी आहेत याची माहिती पालकमंत्री आणि भाजपा शहर अध्यक्ष यांनी घ्यावी असेही त्यांनी म्हटले आहे.शहर पातळीवर या सर्व नगरसेवकांची दरमहा बैठक व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष धीरज घाटे यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला.या सत्कार समारंभात ते बोलत होते.यावेळी माजी खासदार अमर साबळे,प्रदीप रावत,आमदार भीमराव तापकीर,सिद्धार्थ शिरोळे,सुनील कांबळे,माजी आमदार योगेश टिळेकर,जगदीश मुळीक,पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ,संदीप खर्डेकर,राजेश पांडे,रवी अनासपुरे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला येत्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या ३६५ जागांवर विजय मिळेल,अशी अपेक्षा यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलताना व्यक्त केली.

पाटील पुढे म्हणाले,‘‘दर तीन वर्षांनी पक्षात बूथ प्रमुख ते राष्ट्रीय अध्यक्ष पदापर्यंतच्या सर्व पदाधिकारी निवडीची प्रक्रिया ही केवळ भाजपमध्येच केली जात आहे.अन्य कोणत्याही पक्षात भाजपसारखी पदाधिकारी निवडीची पद्धत रूढ नाही.यानुसार भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोरोना संसर्गाच्या काळात राज्यात भाजपचे सरकार सत्तेत नव्हेत.तरीसुद्धा अशा काळात पक्षाचे कार्यकर्ते टिकवून ठेवण्याचे काम जगदीश मुळीक यांनी केले.शिवाय घाटे हे सामान्य घरातून आलेले कार्यकर्ते आहेत.त्यामुळे त्यांना संघर्ष नवा नाही.’’क्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वासाने मोठी जबाबदारी टाकली आहे. मुळात मी गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणून राजकारणास सुरवात केलेली आहे.त्यामुळे सातत्याने आक्रमक विचाराने विविध आंदोलने केल्याचे घाटे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.यावेळी मुरलीधर मोहोळ यांचीही भाषणे झाली.राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले.

भिडे गुरुजी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आंदोलन..

पुणे-संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याच्या प्रकरणी महाराष्ट्राच्या गृह विभागाने तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करत, त्यांना अटक करावी. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने येथे आंदोलन केले.या आंदोलन प्रसंगी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप , अंकुश काकडे, रवींद्र मालवदकर, सुषमा सातपुते, किशोर कांबले, मृणाल वाणी, तन्वीर शैख़ , आजिंक्य पालकर, आशीष माने, शेखर धावड़े, गणेश नलावडे, सानिया झुंझारराव, उदय महाले आणि सर्व सेल अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशांत जगताप यावेळी म्हणाले कि,’ वारंवार समाजातील तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्य करत तरुणांची माथी भडकविणाऱ्या मनोहर भिडे नामक व्यक्तीने पुन्हा एकदा मुक्ताफळे उधळली आहेत.देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व त्यांच्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा हा घाणेरडा प्रकार आहे. या देशात गेल्या नऊ वर्षात अनेक व्यक्तींवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले असले, तरी देशाच्या राष्ट्रपित्यावर अवमानकारक शब्दांमध्ये वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर कुठलाही गुन्हा दाखल होत नाही, हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. विशेषतः गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी देशातील सर्वच महापुरुषांबद्दल अशा प्रकारची वक्तव्य केली आहेत.भाजप सरकारच्या काळात जर सातत्याने आपल्या महापुरुषांचा अवमान होणार असेल या पुढील काळात नागरिकांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घेणे गरजेचे आहे.

संभाजी भिडेंची ‘राष्ट्र द्रोही वक्तव्ये’ सत्ताधाऱ्यांच्या आशिर्वादाने..! काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी

पुणे दि २९ –
‘तिरंगा राष्ट्र ध्वजाच्या निमित्ताने ‘संविधान प्रणीत प्रजासत्ताक भारताचा, स्वातंत्र्य दिनाचा व आता राष्ट्रपिता महात्मा गांधींचा’ सतत अवमान करणाऱ्या संभाजी ऊर्फ मनु भिडे या विकृत प्रवृत्तीचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तीव्र निषेध करीत असून, ही विकृत प्रवृतीचे भाजप समर्थन करीत नाही, हे सिध्द करण्यासाठी संघ व भाजप ने ‘मनोहर भिडेंच्या राष्ट्रीय ध्वज – तिरंगा व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विषयी केलेल्या निंदनीय वक्तव्यांचा तातडीने निषेध करावा.. अन्यथा अशा विकृत व देशद्रोही पैदाईश आपल्या आहेत असे देशवासियांना मानावे लागेल अशी प्रखर टिका काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली..!
“महात्मा गांधींच्या अहींसेच्या तत्वावर व नेतृत्वावर विश्वास ठेवुन, जीवन झोकुन देऊन हजारो स्वातंत्र्य सैनीकांच्या शहीदत्वातुन, नेहरू, पटेल, आझाद, बोस आदींच्या प्रदीर्घ संघर्षातुन मिळालेल्या ‘स्वातंत्र्याची व स्वातंत्र्य दिनाची’ निर्भत्सना करीत, १५ ॲागस्ट स्वातंत्र्यदिनी ‘दुखवटा पाळण्याचे’(?) अघटित व देश विरोधी आवाहन नुकतेच मनोहर उर्फ संभाजी भिडें नी केले होते..!
त्या नंतर पुनश्च देशाचे श्रध्दास्थान असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीवर तथ्यहीन, खोटे व विकृतजन्य आरोप व शिंतोडे ऊडवणाऱ्या कथित संभाजी ऊर्फ मनु भिडे यांचेवर राज्यातील भाजप नेतृत्वाच्या दावणीला बांधलेले तीन अर्धवट चाकांचे त्रिकुट सरकार’ हे भिडे प्रवृत्तीला पाठीशी घालत आहेत काय (?) असा संतप्त सवाल करून, त्रिकुट सरकारने तातडीने कारवाई करावी व निषेध ही करावा.. अन्यथा ‘भाजप नेतृत्वाच्या’ अधीन राज्यातील त्रिकुट सरकार देशद्रोही कृत्यात सामील आहे, असेच समजण्यात येईल असा इशारा देखील महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस तर्फे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिला..

मनसेचे “खड्डे पेटवा” आंदोलन ..

पुणे-संपूर्ण शहरात खड्डयांचे साम्राज्य पसरले असून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कसबा मनसे तर्फे प्रभाग क्र. 15 आणि 18 मध्ये चिंचेची तालीम , सुभाष नगर, शितलादेवी चौक या परिसरातील पडलेल्या खड्डया मुळे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी भर पावसात ” खड्डे पेटवा “आंदोलन करण्यात आले .
येथे खड्ड्यांना हार फुले वाहून ” अच्छे दिन ” ला श्रद्धांजली वाहण्यात आली कारण याच अच्छे दिन वाल्यांनी स्मार्ट सिटी चे स्वप्न दाखवून जनतेला खड्डयात घातले आहे .
कसबा विभाग महाराष्ट्र नवनिर्माण सेना कसबा विभाग यांच्या वतीने आज प्रभाग 15 आणि प्रभाग अठरा येथे खराब रस्ते, खड्डेमयरोड आणि मोठ्या प्रमाणावर 165 खचलेले ड्रेनेज चेंबर आणि पावसाळी चेंबर याच्या विरोधात आज भर पावसात प्रभाग १५ येथील सुभाष नगर , चिंचेची तालीम व प्रभाग १८ येथील राम मंदिर, सत्यवान मारुती, शितळा देवी चौक , काचे आळी, बलवार आळी जैन मंदिर , नेहरू चौक तसेच राष्ट्रभूषण चौक ते पानघंटी चौक येथील खचलेले चेबर विरोधात आंदोलन झाले . हेच का ते अच्छे दिन ??
याचा निषेध करण्यासाठी मनसे तर्फे अभिनव असे ” खड्डे पेटवा” आंदोलन केले व तात्काळ सदर भागातील तसेच पुणे शहरातील खड्डे दुरुस्ती करावी अन्यथा महापालिका मध्ये असेच उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला .

या आंदोलनाचे मार्गदर्शक शहर अध्यक्ष साईनाथ बाबर , उपशहर अध्यक्ष आशिष देवधर,शहर संघटक प्रल्हाद गवळी,विभाग अध्यक्ष गणेश भोकरे ,शहर सचिव रवि सहाणे,विभाग सचिव वसंत खुटवड व नियोजन उपविभाग अध्यक्ष संग्राम तळेकर विशाल ओदेल, अमित चौधरी यांनी केले

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत राज्याच्या सर्व नागरिकांना आता 5 लाखाचे आरोग्य संरक्षण कवच

मुंबई, दि. 29 : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार असून या योजनेंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष दीड लक्ष रूपयांवरून 5 लक्ष रूपये एवढे करण्याचा निर्णय 28 जून,2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार एकत्रित योजना अंमलबजावणीचा शासन निर्णय दिनांक 28 जुलै, 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

शासन निर्णयाचे लाभ व वैशिष्ट्ये :

• राज्यात यापूर्वी केशरी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र यापुढे राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र प्राप्त नागरिकांना आरोग्य संरक्षणाचे कवच प्राप्त झाले आहे. अशाप्रकारे केंद्र व राज्याची एकत्रित योजना राबविणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झाला आहे.

• आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष 5 लक्ष रूपये आहे. आता महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गतही आरोग्य संरक्षण प्रती कुटूंब प्रती वर्ष 5 लक्ष रूपये एवढे करण्यात आले आहे.

• आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे दोन्ही योजनांमध्ये समाविष्ट उपचारांचा लाभ लाभार्थ्याला मिळणार आहे. तसेच दोन्ही योजनांच्या अंगीकृत रूग्णालयांमध्ये उपचार घेता येणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 996, तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 1209 उपचार आहेत. यापैकी मागणी नसलेले 181 उपचार वगळण्यात आले आहे, तर मागणी असलेले 328 उपचारांचा समावेश नव्याने करण्यात येत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत उपचारांची संख्या 147 ने वाढून 1356 एवढी झाली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत पण 1356 एवढे उपचार समाविष्ट करण्यात येत आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत उपचारांची संख्या 360 ने वाढविण्यात येत आहे. या 1356 उपचारांपैकी 119 उपचार केवळ शासकीय रुग्णालयांसाठी राखीव राहतील.महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत रूग्णालयांची संख्या 1000 एवढी आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना ही याआधीच महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागात लागू करून सीमेलगतच्या महाराष्ट्र राज्यातील 8 जिल्ह्यांत 140 व कर्नाटक राज्यातील 10 अतिरिक्त रूग्णालये अंगीकृत करण्याचा निर्णय झाला आहे. याव्यतिरिक्त 200 रूग्णालये अंगीकृत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता अंगीकृत रुग्णालयांची संख्या 1350 होईल. यामध्ये सर्व शासकीय रुग्णालय अंगीकृत करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त यापुढे मागास भागात नव्याने सुरू होणारी सर्व रुग्णालये, अशा रुग्णालयांची ईच्छा असल्यास या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत करण्यात येतील.

• मूत्रपिंड शस्त्रक्रीयेसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचार खर्च मर्यादा प्रती रूग्ण 2.5 लक्ष एवढी मर्यादा आहे. ती आता 4.5 लक्ष रूपये एवढी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

• स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेच्या 14 ऑक्टोंबर 2020 च्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये सुधारणा करून रस्ते अपघातासाठीची उपचारांची संख्या 74 वरून 184 अशी वाढविण्यात आली आहे. उपचाराच्या खर्च मर्यादेत 30 हजार रूपयांवरून प्रती रूग्ण प्रती अपघात 1 लक्ष रूपये अशी वाढ करण्यात आली आहे. या योजनेचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला आहे. यामध्ये राज्याच्या भौगोलिक क्षेत्रातील रस्ते अपघातात जखमी झालेल्या, राज्यातील व देशातील रूग्णांचा समावेश करण्यात आला आहे.

न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई, दि. 29 : अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली.

राजभवन येथे शनिवारी (दि. 29 जुलै) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. उपाध्याय यांना पदाची शपथ दिली.

शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, न्या. उपाध्याय यांचे कुटुंबिय, लोकायुक्त विद्यासागर कानडे, राज्य मानवाधिकार आयुक्त न्या. के के तातेड, राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान, मुंबई व अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश व वकील उपस्थित होते.

सुरुवातीला राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी न्या. उपाध्याय यांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रपतींची अधिसूचना वाचून दाखवली. राष्ट्रगीत व राज्यगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात झाली व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांचा जन्म दिनांक 16 जून 1965 रोजी झाला. न्या. उपाध्याय यांनी 1991 मध्ये लखनौ विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आणि 11 मे 1991 रोजी वकील म्हणून नोंदणी केली. त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात नागरी आणि घटनात्मक बाजूने कामकाज पहिले. दिनांक 21 नोव्हेंबर 2011 रोजी त्यांना अतिरिक्त न्यायाधीश पदावर बढती मिळाली आणि 6 ऑगस्ट 2013 रोजी त्यांची न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली.

सोमवारपासून पुणे शहराची पाणी कपात रद्द करण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

पुणे, दि.२९: खडकवासला प्रकल्प क्षेत्रात पुरेसा पाऊस झाल्याने आणि प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने पुणे शहरासाठी प्रत्येक आठवड्यात करण्यात येणारी पाणी कपात येत्या सोमवारपासून रद्द करण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

यासंबंधाने शासकीय विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीस महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रसन्न जोशी, कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे, महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते.

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा २१.६२ टीएमसी असून गतवर्षी याच कालावधीत हा साठा २१.४२ टीएमसी होता. वर्षभरात पिण्याचे पाणी व शेतीसाठी साधारण ३० टीएमसी पाण्याची आवश्यकता असते अशी माहिती यावेळी देण्यात आली.

शेतीसाठी लागणारे पाणीही देण्यात यावे आणि धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले तलावही भरण्यात यावेत. येत्या काळात पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पुढील आढावा घेण्यात यावा असे निर्देशही श्री.पाटील यांनी दिले.

संभाजी भिडेच्या माध्यमातून मणिपूरसारखा महाराष्ट्र पेटवायचा आहे का ? : नाना पटोले.

महात्मा गांधींचा अपमान करणाऱ्या भिडेविरोधात काँग्रेसचा राज्यभर आक्रोश

मुंबई, दि. २९ जुलै

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडेने अत्यंत अश्लाघ्य भाषा वापरून अकलेचे तारे तोडले आहेत. संभाजी भिडे सातत्याने महापुरुषांबद्दल अवमानकारक विधाने करत असतो पण भाजपा सरकार त्याविरोधात कारवाई करत नाही. भाजपाला संभाजी भिडेच्या माध्यमातून मणिपूरसारखा महाराष्ट्र पेटवायचा आहे का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक लिखाण केल्याचा मुद्दा विधानसभेत चर्चेत आला त्यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रवृत्तींच्या फक्त मुसक्या आवळून चालणार नाही तर अशांना फाशी लावली पाहिजे असे म्हटले होते. देवेंद्र फडणवीस आता संभाजी भिडेला फाशी देणार का? हा सवाल आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातही संभाजी भिडेचा हात होता पण अजून तो मोकाटच आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार संभाजी भिडेवर एवढे मेहबानी कशासाठी दाखवत आहे ?. संभाजी भिडे, भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे संबंध सर्वांना माहित आहेत, भारतीय जनता पक्षाने भिडे संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी.
मुजोर संभाजी भिडेला अटक करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने अधिवेशनात लावून धरली आहे. राज्य सरकारने भिडेला अटक करुन कडक शिक्षा ठोठावण्याची काँग्रेस प्रतिक्षा करत आहे. अधिवेशनाला चार दिवसांची सुट्टी आहे पण कारवाई झाली नाहीतर सुट्टीनंतर अधिवेशनात काँग्रेस पक्ष संभाजी भिडे प्रश्नी सरकारला धारेवर धरेल. जोपर्यंत संभाजी भिडेला अटक करुन कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही, असा इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा संभाजी भिडेने अवमान केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाने राज्यभर तीव्र आंदोलन केले. ठिकठिकाणी संभाजी भिडेचा पुतळा जाळून व प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. अमरावतीमध्ये माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. धुळ्यात प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शाम सनेर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पुणे, सातारा, शिंदेवाही, बुलढाणा, य़वतमाळ, मोताळा, जळगाव जामोद सह राज्यभर आंदोलन करण्यात आले.

केसरकरजी, कर्नाटकात ५५ दिवसांनंतरही विरोधी पक्षनेता नाही,मोदींना देश व शिंदेंना महाराष्ट्र चालवता येतो का? ते आधी पहा.

मुंबई, दि. २९ जुलै
काँग्रेसला विरोधी पक्षनेता निवडता येत नाही ते देश काय चालवणार? हे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरांचे विधान बालिश व अत्यंत हास्यास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश चालवता येत नाही व एकनाथ शिंदेंना महाराष्ट्र चालवत येत नाही हे जनतेला समजले आहे. काँग्रेसने ६० वर्षांपेक्षा जास्त केंद्रातील व विविध राज्यात सरकारे चालवली आहेत, त्यामुळे देश कसा चालवायचा, हे केसरकर सारख्यांनी काँग्रेसला शिकवू नये, असा टोला प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी लगावला आहे.
मंत्री दिपक केसरकर यांचा समाचार घेताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, केसरकर शिक्षणमंत्री असून किती अशिक्षित आहात हे त्यांनी त्यांच्या विधानातून दाखवून दिले आहे. कर्नाटकमध्ये सत्ताबदल होऊन ५५ दिवस झाले तरी अजूनही भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्षनेता निवडता आलेला नाही, मग पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचे? महाराष्ट्रातील मविआचे सरकार पाडून गद्दारांचे सरकार आल्यानंतर ४० दिवस या सरकारला मंत्रीमंडळ विस्तार करता आला नाही. शिंदे सरकारला एक वर्ष झाले तरी अजून राज्यातील सर्व जिल्ह्यांना पालकमंत्री नेमता आले नाहीत, एका-एका मंत्र्यांकडे सहा-सहा जिल्ह्यांचा प्रभार आहे. शिंदे गटाला महाराष्ट्र चालवता येत नाही आणि नरेंद्र मोदींना देश चालवता येत नाही हे जनतेने पुरते ओळखले आहे, त्यामुळे मनातल्या भितीमुळे केसरकरांचे शब्द बाहेर आले आहेत, असे लोंढे म्हणाले.

मनोहर भिडे यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा- अरविंद शिंदे

पुणे- अमरावती येथे मनोहर भिडे यांनी आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत अपमानकारक विधाने करून त्यांचा अपमान केला. मनोहर भिडे सारखी व्यक्ती राष्ट्रपित्याबद्दल टिकाटिप्पणी करतो ही गोष्ट संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी आहे. सर्वधर्मसमभाव ही आपल्या देशाची खरी ओळख आहे, पण ही ओळख पुसण्याचा मनोहर भिडे सारख्या मनुवादी प्रवृत्तीचा प्रयत्न आहे. या मनुवादी मनोहर भिडेच्या निषेधार्थ आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कसबा पेठ येथील फडके हौद चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले.

     यावेळी निषेध व्यक्त करताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. मनोहर भिडे वारंवार असं बोलतो, त्याला पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. मनोहर भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे हे ओळखले पाहिजे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी तो वारंवार अशी विधाने करतो ? पुरोगामी विचार संपवण्यासाठी एक यंत्रणा काम करते, महापुरुष हे सर्वकालीन असतात, त्यांच्या विचारांचे आणि कृतीचे समाजाच्या उभारणीत मोठे योगदान असते. असे असताना हा सततचा खोडसाळपणा सरकारने सहन करू नये.  महापुरूषांच्या विषयी या विकृत भिडेने अत्यंत अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ संभाजी भिडेवर गुन्हा दाखल करून त्वरीत कठोर कारवाई करावी.’’

     या आंदोलनामध्ये माजी महापौर कमल व्यवहारे, अजित दरेकर, संगीता तिवारी, लता राजगुरू, रफिक शेख, रजनी त्रिभुवन, मेहबुब नदाफ, सुनिल शिंदे, सुजित यादव, हनुमंत पवार, बळीराम डोळे, अक्षय माने, रविंद्र माझिरे, बुवा नलावडे, जयसिंग भोसले, प्रियंका रणपिसे, रमेश सकट, रमेश सोनकांबळे, रवि आरडे, संतोष पाटोळे, विशाल जाधव, विकी खन्ना, भगवान कडू, विनोद रणपिसे, प्रकाश पवार, अभिजीत गोरे, आशितोष शिंदे, योगेश भोकरे, युवराज मदगे, अनुसया गायकवाड, छाया जाधव, उषा राजगुरू, सुंदरा ओव्हाळ, निलिनी दोरगे, पपिता सोनावणे, सिमा सावंत, वैशाली रेड्डी, शिवानी माने, मिलिंद अहिर, नरसिंह अंदोली, मयुर भोकरे, अमित मोरे, राज गेलोत, देवीदास लोणकर, सचिन भोसले, अनिल पवार, हरिदास अडसूळ आदी सहभागी झाले होते.  

मेट्रोने प्रवास करा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पुणेकरांना आवाहन

पुणे, दि.२९: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल मार्गिकेचे लोकार्पण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रुबी हॉल, सिव्हिल कोर्ट आणि शिवाजी नगर मेट्रो स्थानकांची पाहणी केली आणि रुबी हॉल स्थानक ते शिवाजी नगर मेट्रो स्थानकादरम्यान प्रवासदेखील केला.यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांच्यासह मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे आदी उपस्थित होते.

मेट्रोने प्रवास करण्याचे आवाहन
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, या दोन मार्गांमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर जोडले जाणार असून पुणे शहरातील महत्वाच्या ठिकाणी प्रवासदेखील सुलभ होणार आहे. नवीन मार्ग शिवाजी नगर, सिव्हिल कोर्ट, आरटीओ, पुणे रेल्वेस्टेशन, पीएमसी, संभाजी उद्यान, डेक्कन इत्यादी महत्वाच्या भागांना जोडत असल्याने पुणेकर नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

मेट्रो मार्गामुळे पुणेकरांना प्रवासाचा चांगला पर्याय उपलब्ध होणार असून शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल. नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत प्रवास करण्यासाठी इलेक्ट्रिक बस आणि पार्किंगची सुविधादेखील असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मेट्रोद्वारे प्रवास करावा, असे आवाहन त्यांनी केले.श्री. पाटील यांनी मेट्रो चालविणाऱ्या महिला चालकाशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले.

असा आहे मेट्रो मार्ग
पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट या ६.९ किलोमीटरच्या मार्गिकेवर ४ स्थानके आहेत, तर गरवारे कॉलेज ते रुबी हॉल या ४.७ किलोमीटरच्या मार्गिकेवर ७ स्थानके आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण २१ स्थानकांसह २३.६६ किमी लांबीचा मेट्रो मार्ग पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांनी कमी होणार आहे. डेक्कन, शिवाजीनगर आणि पुणे महानगरपालिका येथे पीएमपीएमएल सेवेबरोबर समन्वय साधण्यात येणार आहे.
000

म्हातोबानगरमधील नागरिकांना मोठा दिलासा

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नातून तात्पुरता रस्ता उपलब्ध

पुणे – कोथरूड मधील म्हातोबानगर रस्त्याचे काम गेली अनेक वर्ष रखडले होते. मात्र, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नामुळे इथल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, नामदार पाटील यांच्या प्रयत्नातून इथल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात रस्ता तयार करुन देण्यात आला आहे. त्यामुळे इथले नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

कोथरूड मधील म्हातोबानगर रस्त्याचे काम गेली अनेक वर्ष रखडले होते. मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता सुस्थितीत नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात इथल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे इथल्या नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी यंदा लोकसहभागातून तात्पुरत्या स्वरूपात रस्ता तयार करुन देण्यात आला आहे, यामुळे इथले नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

 स्मशान फंड कमिटीतर्फे वैकुंठ स्मशानभूमीला जेटींग मशीन प्रदान

स्मशानभूमीतील स्वच्छतेकरीता कायमस्वरुपी मशीन
पुणे :  वैकुंठ स्मशानभूमीचा परिसर मोठा आहे. अंत्यविधी झाल्यानंतर तेल, तुप, फुले याचा पसारा होतो. तेल, तूप हे केवळ पाण्याने निघत नाही. जेटींग मशीनने स्वच्छता करणे हे सोईचे होते. यासाठी वैकुंठ स्मशानभूमीत काॅन्ट्रॅक्टवर काही तासांसाठी हे मशीन आणले जात होते. परंतु  स्मशान फंड कमिटीतर्फे वैकुंठ स्मशानभूमीसाठी कायमस्वरुपी हे मशीन देण्यात आले. सात लाख पन्नास हजाराचे मशीन महानगरपालिकेला सुपूर्त करण्यात आले. 
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, महानगरपालिकेचे मुख्य अभियंता हितेंद्र कुरणे, गणेश उगाळे, राजेंद्र शिपेकर, इंद्रजीत कर्वे, स्मशान फंड कमिटीचे बाळासाहेब साने, संजय गोखले, सुनील नेवरेकर, अॅड. सागर कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी वाहन चावी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आली.
आनंद सराफ म्हणाले, शहराची स्वच्छता आणि आरोग्य जपणा-या श्रमजीवींची उपेक्षा करु नये. त्यांच्या कार्याची उचित दखल घेतली पाहिजे. ते करत असलेले कार्य समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान वेळोवेळी करायला हवा. प्रशासन आणि नागरिकांच्या सामंजस्यातून अनेक सोयीसुविधा सुलभतेने साकारतील अशी आशा कुरणे यांनी व्यक्त केली.
 बाळासाहेब साने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सुनील नेवरेकर यांनी आभार मानले.

विद्यार्थीप्रिय शिक्षक, ज्येष्ठ पत्रकार जोसेफ पिंटो यांचे निधन

पुणे, ता. २९ : ज्येष्ठ पत्रकार आणि वृत्तपत्र विद्या क्षेत्रातील ख्यातनाम प्राध्यापक, विद्यार्थीप्रिय शिक्षक जोसेफ पिंटो यांचे अल्पशा आजाराने शनिवारी पहाटे पुण्यात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे दोन भाऊ व एक बहीण, तसेच पत्नी व कन्या, जावई असा परिवार आहे.
दीपक फर्टिलायझर्समध्ये काही काळ वरिष्ठ पदावर नोकरी केल्यानंतर ज्यो पिंटो यांनी वृत्तपत्र क्षेत्रात आपला ठसा उमटविला. सुरुवातीला संडे ऑब्झर्व्हर या दैनिकात काम केल्यानंतर त्यांनी गोमंतक टाईम्स व महाराष्ट्र हेरॉल्ड या दैनिकांमध्ये मुख्य संपादक म्हणून काम केले. 
संपादकीय क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या पिंटो यांनी वृत्तपत्र विद्या क्षेत्रात ज्ञानदानाचेही कार्य केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागासह (रानडे इन्स्टिट्यूट), सिंबायोसिस महाविद्यालय, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, नानासाहेब परुळेकर महाविद्यालय इत्यादी अनेक वृत्तपत्र विद्या महाविद्यालयांमध्ये शिस्तप्रिय परंतु अतिशय लोकप्रिय शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले विद्यार्थी वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये आणि वृत्तवाहिन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर काम करत आहेत. 
पिंटो यांनी स्वतःच्या महाविद्यालयीन जीवनापासूनच लोकविज्ञान संघटना या संस्थेमार्फत सामाजिक कार्य केले. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी वृत्तपत्र क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ पत्रकार, त्यांचे विद्यार्थी व स्नेहीजन उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागासह पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठान यांच्या वतीने पिंटो यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.