स्मशानभूमीतील स्वच्छतेकरीता कायमस्वरुपी मशीन
पुणे : वैकुंठ स्मशानभूमीचा परिसर मोठा आहे. अंत्यविधी झाल्यानंतर तेल, तुप, फुले याचा पसारा होतो. तेल, तूप हे केवळ पाण्याने निघत नाही. जेटींग मशीनने स्वच्छता करणे हे सोईचे होते. यासाठी वैकुंठ स्मशानभूमीत काॅन्ट्रॅक्टवर काही तासांसाठी हे मशीन आणले जात होते. परंतु स्मशान फंड कमिटीतर्फे वैकुंठ स्मशानभूमीसाठी कायमस्वरुपी हे मशीन देण्यात आले. सात लाख पन्नास हजाराचे मशीन महानगरपालिकेला सुपूर्त करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, महानगरपालिकेचे मुख्य अभियंता हितेंद्र कुरणे, गणेश उगाळे, राजेंद्र शिपेकर, इंद्रजीत कर्वे, स्मशान फंड कमिटीचे बाळासाहेब साने, संजय गोखले, सुनील नेवरेकर, अॅड. सागर कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी वाहन चावी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आली.
आनंद सराफ म्हणाले, शहराची स्वच्छता आणि आरोग्य जपणा-या श्रमजीवींची उपेक्षा करु नये. त्यांच्या कार्याची उचित दखल घेतली पाहिजे. ते करत असलेले कार्य समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान वेळोवेळी करायला हवा. प्रशासन आणि नागरिकांच्या सामंजस्यातून अनेक सोयीसुविधा सुलभतेने साकारतील अशी आशा कुरणे यांनी व्यक्त केली.
बाळासाहेब साने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सुनील नेवरेकर यांनी आभार मानले.