Home Blog Page 1421

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

अलिबाग,दि.29 :- मागणाव तालुक्यात महावितरण विभागाच्या वीज संदर्भात असलेल्या समस्या व इतर विभागांच्या कामकाजाचा आढावा यासंदर्भात शासकीय विश्रामगृह येथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.  या बैठकीत त्यांनी तालुक्याचे महावितरण संदर्भातील सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात यावेत, असे निर्देश महावितरण अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी तहसिलदार विकास गारुडकर, गटविकास अधिकारी संदिप जठार, महावितरण अधीक्षक अभियंता पेण श्री.मुलाणी, कार्यकारी अभियंता रोहा प्रदीप डाळू, उपकार्यकारी अभियंता माणगांव सागर बामणकर, प्रभारी कार्यकारी अभियंता गोरेगाव, चंद्रकांत केंद्रे, नगर पंचायत मुख्याधिकारी संतोष माळी उपस्थित होते.

या बैठकीत वारक नळपाणी पुरवठा योजना, व्होल्टेज प्रश्न, विघवली हायस्कूल विद्युत पोल शिफ्टिंग, ढालघर फाटा नवीन डी. पी. बसविणे, सेल्फी पॉईंट जंक्शन बॉक्स प्रश्न, काकल, गौळवाडी पथदिवे प्रश्न, माणगांव शहरात चक्रीवादळात तात्पुरती केलेली कामे सुरळीत कायमची करणे, चिंचवली, सोन्याची वाडी विद्युत प्रश्न, वाढीव वीज बिल प्रश्न, वडवली कोंड विद्युत प्रश्न ई. विभागातील अनेक विद्युत पुरवठा व अन्य समस्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच येणाऱ्या काळात माणगांव शहरातील व अन्य काही ठिकाणी भूमिगत लाईन व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच सध्या पावसाळी दिवस असल्याने जनतेला कोणताही त्रास होणार, नाही या दृष्टिकोनातून लवकरात लवकर समस्या सोडवून महावितरण कंपनीमार्फत योग्य सेवा पुरवण्यात यावी. लाईट बिलाचे प्रश्न हे त्या त्या विभागात सोडविण्यात यावेत, त्यासाठी जनतेला विभाग कार्यालयात यायला लावू नये याची खबरदारी घ्यावी. बंद असलेल्या लाईटचे सब स्टेशन चालू करता येईल का याबाबत चर्चा करण्यात आली.   तसेच यासाठी निधीची आवश्यकता असल्यास तो उपलब्ध करून दिला जाईल.

” मी जग बदलण्याचा प्रयत्न करत राहीन” सोनू सूदने उघड केलं एक सत्य ! 

सामान्य माणसाला सशक्त करण्यासाठी सोनू करतोय प्रयत्न ! 

कोविड-19 महामारीच्या जेव्हा कोणाला आशा नव्हत्या तेव्हा अभिनेता सोनू सूद – एक अभिनेता, एक मानवतावादी आणि सामान्य माणसाचा खरा ‘मसिहा’ ठरला. आणि खऱ्या अर्थाने एक प्रकाशाचा  किरण उदयास आला. संकटकाळात लोकांना मदत करण्याच्या त्यांच्या निस्वार्थ प्रयत्नांनी लाखो लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले. एवढं असून ही सोनू नेहमीच नम्र राहतो आणि सतत समाजाची सेवा करतो. 
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, ‘मसीहा’ ही पदवी बहाल केल्याबद्दल विचारले असता, सोनू सूदने नम्रपणे उत्तर दिले, “मी एक पुस्तकही लिहिले होते – आय अॅम नो मसिहा – कारण ते थोडेसे लाजिरवाणे वाटते. मला असे वाटते की सामान्य माणसाशी जोडले जाणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मी लोकांना सांगतो की मी त्यांच्यापैकी फक्त एक आहे आणि मला आयुष्यभर तसच  राहायचे आहे.”
“संपूर्ण जग ‘आशा’ आणि ‘प्रयत्नांवर’ अवलंबून आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आशा असते की तुम्ही त्यांचे जीवन बदलू शकाल आणि तुम्ही तसे करण्याचा प्रयत्न करता आणि प्रत्यक्षात तसे करता तेव्हा मला वाटते की ही सर्वात समाधानकारक भावना आहे असं सोनू ने व्यक्त केले. जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकण्याचे सोनू सूद हा गेम चेंजर बनला आहे.  माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी जग बदलण्याचा प्रयत्न करत राहीन अस सोनू सांगतोय. 
सोनू सूदचा प्रभाव मानवतावादी प्रयत्नांच्या पलीकडे पसरलेला आहे आणि अलीकडे तो MTV रोडीज 19 चे होस्ट म्हणून आपल्या करिष्माई उपस्थितीने प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. चाहते त्याच्या आगामी अॅक्शन-पॅक्ड चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. फतेह हा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे अस समजतंय !

पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यात काळे झेंडे दाखवून करणार निषेध आंदोलन:ज्येष्ठ विचारवंत बाबा आढाव करणार नेतृत्व

पुणे : परदेश दौरे करायला पंतप्रधानांकडे वेळ आहे, पण जळणाऱ्या मणिपूरला भेट देण्यासाठी वेळ नाही. चार महिन्यांपासून देशातले हे राज्य हिंसाचार, अत्याचाराने जळते आहे, पण पंतप्रधानांना त्याविषयी संसदेत निवेदन करण्याइतकीही संवेदनशीलता नाही. अशा परिस्थितीत, एका संस्थेचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात येणाऱ्या पंतप्रधान मोदी यांना काळे झेंडे दाखवून तीव्र निषेधाचे आंदोलन करण्याचा निर्णय इंडिया फ्रंट, पुणे तर्फे घेण्यात आला आहे. १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता इंडिया फ्रंट, पुणे चे सर्व सहकारी पक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक , जेष्ठ समाजनेते डॉ. बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करून विरोध दर्शवणार आहेत, अशी माहिती प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

यावेळी इंडिया फ्रंट, पुणे चे समविचारी असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (शरद पवार गट),  माजी आमदार जयदेव गायकवाड,शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी आमदार रमेश बागवे, कम्यूनिस्ट पक्षाचे कॉम्रेड अजीत अभ्यंकर, तसेच नितीन पवार, लता भिसे, मेधा थत्ते, दत्ता पाकिरे, अनिस अहमद, संदीप बर्वे ,इब्राहीम खान,दीपक पाटील, सुरेखा गाडे  आदी उपस्थित होते.

प्रशांत जगताप म्हणाले,‘मणिपूर जळत असताना, पंतप्रधान वाजतगाजत पुरस्कार स्वीकारतात, हे दुर्देवी आहे. देशातले एक राज्य अराजक अनुभवत असताना, पंतप्रधानांना तिथे जावेसे वाटत नाही, याचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही ‘प्राईम मिनिस्टर गो टू मणिपूर, आन्सर टू पार्लमेंट’ असा हॅशटॅग चालवणार आहोत. या पुरस्कार स्वीकारण्याच्या निमित्ताने पंतप्रधानांचा खरा चेहेरा सर्वांसमोर आला आहे. आम्ही इंडिया फ्रंटच्या रूपाने सर्वजण मणिपूरसोबत आहोत,’.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले कि पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन कि बात’ मध्ये बोलतात, एकटेच बोलतात मात्र संसदेत बोलत नाही ही अधोगती आहे .

अजित अभ्यंकर यांनी ‘कष्टकरी आणि कामगारवर्ग मोदींविरोधी आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले. ‘कामगार कायदे उध्वस्त करून, साऱ्यांना कॉर्पोरेट्सच्या ताब्यात देण्याचा कंत्राटी उद्योग चालू देणार नाही. कामगार संघटना संयुक्त कृती समिती थेट रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी होईल, असे ते म्हणाले,

लता भिसे सोनावणे यांनी मोदी यांनी देशातील नागरिकांचे संविधानिक हक्कच मोडीत काढल्याची टीका केली. विद्वेषाचे राजकारण करणाऱ्यांचा आम्ही रस्त्यावर उतरून निषेध करणार आहोत. ९३ वर्षांच्या ज्येष्ठ विचारवंत बाबा आढावांना रस्त्यावर उतरावे लागावे, ही नामुष्की मोदींनी आणली आहे, असे त्या म्हणाल्या. मेधा थत्ते म्हणाल्या,‘मणिपूरमध्ये अत्याचार सुरू असताना पंतप्रधान आणि गृहमंत्री काय करत होते, हा प्रश्न सर्वांनी त्यांना विचारला पाहिजे.

यावेळी प्रमुख इंडिया फ्रंट पुणेचे अनेक पधादिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राहुल गांधींचे लग्न कधी करणार? शेतकरी महिलांचा थेट प्रश्न; सोनिया म्हणाल्या – तुम्हीच मुलगी बघा ना..!

सोनीपतमधील शेतकरी महिलांनी प्रियंका गांधींच्या घरी गांधी कुटुंबांसोबत भेट घेतल्याचा व्हिडिओ राहुल गांधींनी शुक्रवारी शेअर केला. या व्हिडिओत सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधींनी या महिलांसोबत संवाद साधत त्यांच्यासोबत जेवणही केले. यावेळी एका शेतकरी महिलेने सोनिया गांधींना राहुल यांच्या लग्नाबद्दल विचारणा केली असता सोनिया त्यांना तुम्ही मुलगी बघा असे म्हणाल्या. यानंतर सर्वजण हसायला लागतात. या भेटीचा अकरा मिनिटांचा व्हिडिओ राहुल गांधींच्या यूट्युब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे.

राहुल यांनी ट्विटरवर व्हिडिओचा छोटा भाग शेअर करताना लिहिले आहे, ‘आई, प्रियंका आणि माझ्यासाठी एक संस्मरणीय दिवस काही खास पाहुण्यांसोबत. सोनीपतच्या शेतकरी बहिणींचे दिल्ली दर्शन, त्यांच्यासोबत जेवण आणि खूप मजेशीर गप्पागोष्टी. सोबत मिळालेल्या अनमोल भेटवस्तू- देशी तूप, गोड लस्सी, घरचे लोणचे आणि खूप प्रेम.’

राहुल गांधींनी अलिकडेच हरियाणातून जात असताना या शेतकरी महिलांची भेट घेत त्यांच्यासोबत शेतात भात लावणीही केली होती आणि तेव्हाच त्यांच्यासोबत जेवताना त्यांनी या महिलांना त्यांच्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले होते.

राहुल गांधी 8 जुलै रोजी मदिना गावात आले होते. यादरम्यान एका महिलेने बोलताना आम्हाला दिल्ली दाखवा, तुमचे घर दाखवा असे म्हटले होते. यानंतर राहुल यांनी प्रियंका गांधींना फोन लावला होता. यानंतर प्रियंका गांधींनी या महिलांना घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. या निमंत्रणावरून सुमारे 43 महिला 14 जुलै रोजी त्यांच्या घरी आल्या.

यावेळी महिलांनी सोनियांसोबत नृत्यही केले. काँग्रेस नेत्या रुचिरा चतुर्वेदींनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात या महिला सोनियांचा हात धरून त्यांच्यासोबत नृत्य करताना दिसत आहेत.

पाटणा येथे विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत आरजेडीचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू यादव यांनी राहुल गांधींना म्हटले, महात्माजी आता लग्न करा. दाढी वाढवून कुठे फिरत आहात? आमचे ऐका, निदान लग्न तरी करा. तुमची आई सांगायची, तो माझे ऐकत नाही, तुम्ही त्याचे लग्न लावून द्या.

अजून वेळ गेलेली नाही. लग्न करा, आम्ही वरातीत येऊ. तुमचे वय कुठे गेले? तुम्ही दाढी वाढवली आहे, आता ती कापून घ्या. हे नितीशजींचे मत आहे, दाढी लहान करा, असेही लालू म्हणाले

संभाजी भिडेंविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल, महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी काँग्रेसची तक्रार

अमरावती-शिवप्रतिष्ठानचे मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्याविरोधात अमरावतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल निंदाजनक वक्तव्य केल्याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाकडून याबाबत शुक्रवारी तक्रार नोंदवण्यात आली होती.अमरावतीमधील एका कार्यक्रमात गांधीजींचे वडील हे मुसलमान जमीनदार होते, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले होते. ​​​​​​भिडेंच्या या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. ​राष्ट्रपित्याबद्दल निंदाजनक विधाने केल्यामुळे काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे गुरुजी यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे.

महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या अवमानजनक वक्तव्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देऊन केली आहे. यासंदर्भात तक्रार दाखल करताना नंदकिशोर कुयटे यांनी सांगितले की, महात्मा गांधी यांच्याबद्दल भिडे यांच्या लाजिरवाण्या वक्तव्यामुळे सर्वसामान्य जनमानसांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच, संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत पोलिसांनी आपल्याकडे पुरावेही मागितल्याचे कुयटे यांनी सांगितले आहे.

संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्याबद्दल त्यांना पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्वरित अटक करावी, अशी मागणी केली. बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचे काँग्रेस प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे यांनी सांगितले.

मुंबईत होणाऱ्या ‘इंडिया’च्या बैठकीसाठी काँग्रेस सज्ज:- नाना पटोले

काँग्रेस नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी चर्चा.

मुंबई, दि. २८ जुलै
देशपातळीवर विरोधी पक्षांची मजबूत एकजूट झालेली असून इंडिया या नावाने ही आघाडी ओळखली जाते. इंडियाची तिसरी बैठक मुंबईत होणार असून या बैठकीच्या तयारीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. मुंबईतील बैठकीसंदर्भात शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. मुंबईतील बैठकीसाठी तयारी सुरु असून काँग्रेस पक्ष या बैठकीसाठी सज्ज आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यंनी दिली.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, आ. शशिकांत शिंदे, आ. संग्राम थोपटे, आ. रोहित पवार आ. सुनिल भुसारा आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, इंडियाची पहिली बैठक पाटण्यात झाली तर दुसरी बैठक बेंगलुरु येथे नुकतीच पार पडली. या दोन्ही बैठकांना शरद पवार उपस्थित होते. तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीला देशभरातून जवळपास १०० महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. यात काही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, विविध पक्षांचे वरिष्ठ नेते असणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी शरद पवार यांनी फोनवरून चर्चा केली. मुंबईत होणारी इंडियाची बैठक यशस्वी करण्यावर महाविकास आघाडी म्हणून आमचा सर्वांचा भर आहे.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी मजबूत आहे. पावसामुळे मविआच्या सभा थांबलेल्या आहेत. पावसाळा संपताच या सभा पुन्हा सुरु होणार आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षही राज्यभर सभा घेणार आहे. या बैठकीत जागा वाटपासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसंदर्भात चार -पाच बैठका घेतलेल्या आहेत. तीन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा होईल तेव्हा जागा वाटप व उमेदवार निश्चित करण्यावर चर्चा होईल, असेही नाना पटोले म्हणाले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच पुण्यात टेकडी फोड-शिवसेना आक्रमक

पुणे- हिंगणे खुर्द भागात बीडीपी झोन असताना रस्ता बनविण्यासाठी तळजाई टेकडीचा भाग फोडून जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म विभागाने दिलेल्या पत्राद्वारे जागा मालक आणि विकासकांनी नैसर्गिक नाला बुजवत त्या जागी रस्ता तयार केला आहे. भूमाफियांकडून या परिसराचे सपाटीकरण जोरात सुरु असल्यामुळे हा भाग धोकादायक झालेला असून येथे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. माळीण, इर्शाळवाडीसारखी दुर्घटना याठिकाणी घडण्याची भीती व्यक्त करत यासंदर्भात शिवसेनेचे प्रसिद्धीप्रमुख व पर्यावरणप्रेमी अनंत घरत यांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले. त्यानंतर घरत यांनी महापालिकेकडून माहिती घेतली असता हा पत्रव्यवहार समोर आला. त्यामुळे या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले हे पत्र तत्काळ रद्द करावे अशी मागणी घरत यांनी केली आहे .

अनंत घरत म्हणाले की, यासंदर्भात बांधकाम विभागाकडून आम्हास मिळालेल्या माहितीनुसार झोन 2 चे अधिकारी यांनी सदर टेकडी फोड ची पाहणी केली असताना विकासकांकडून त्यांना जिल्हाधिकारी यांचे रस्ता बनविण्यासाठी चे पत्र दाखविण्यात आले. त्यामुळे कारवाईत अडथळा निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आशीर्वादानेच तळजाई टेकडीचा हिंगणे खुर्द चा भाग फोडण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच नैसर्गिक नाला बुजविण्याबरोबर अनधिकृत प्लॉटिंग करण्याचे धाडस जागा मालक आणि विकसक करत आहेत. या विरोधात आम्ही जिल्हाधिऱ्यांना तक्रारी आणि पत्रव्यवहार केला आहे. प्रशासनाला या प्रकरणाचे गांभीर्य नसल्यास वेळप्रसंगी आंदोलन करू तसेच न्यायालयात जाणार असल्याचे घरत म्हणाले. 

परदेशी शिष्यवृत्तीसाठी अनुसूचित जमाती प्रर्वगातील विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. २८: पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली या जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रर्वगातील विद्यार्थ्यांनी परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षणाकरिता सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी १५ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाकडून करण्यात आले आहे.

राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे यासाठी आदिवासी विकास विभागाकडून आयुक्तालय स्तरावर परदेशी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. एमबीए, वैद्यकीय अभ्यासक्रम, बी. टेक, विज्ञान, कृषी व इतर विषयांचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येते. योजनेच्या लाभासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे कौटुंबिक कमाल उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यंत असावे.

परदेशी शिष्यवृत्तीचे विहित नमुन्यातील अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव यांच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे (दूरध्वनी क्र. 02133-244266) या कार्यालयात संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असेही प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे, दि. २८: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजनांच्या लाभासाठी https://www.msobcfdc.org किंवा https://msobcfdc.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महामंडळाकडून इतर मागासवर्गीय प्रवर्गांतील व्यक्तींसाठी २० टक्के बीज भांडवल कर्ज, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना तसेच थेट कर्ज व्याज परतावा (एक लाख रुपयांपर्यंत) अशा विविध योजना राबविण्यात येतात.

२०२३-२०२४ आर्थिक वर्षासाठी पुणे जिल्ह्यात २० टक्के बीज भांडवल कर्ज ४७ लाभार्थ्यांना (एकूण २७ लाख ६५ हजार रुपये), वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ १२२ लाभार्थ्यांना (एकूण उद्दिष्ट १ कोटी ३५ लाख ६६ हजार रुपये) , गट कर्ज व्याज परताव्याचा १३ लाभार्थ्यांना (एकूण ७० लाख ८५ हजार रुपये), शैक्षणिक कर्ज व्याज परताव्याचा १२ लाभार्थ्यांना (एकूण १८ लाख रुपये) व महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेचा १४ हजार ४४४ लाभार्थ्यांना (एकूण १ कोटी ९५ लाख रुपये) लाभ देण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या योजनांसाठी बँकेकडून कर्ज वितरीत करण्यात येत असून महामंडळाकडून १२ टक्क्यापर्यंत व्याज परतावा रक्कम दिली जाते.

कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेचा ३३३ लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. तर थेट कर्ज व्याज परतावा (१ लाख रुपयांपर्यंत) योजनेचा १२० लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट असून या योजनेसाठी संपूर्ण कर्ज महामंडळाकडून वितरीत केले जाते. याप्रमाणे एकूण १५ हजार ९१ लाभार्थ्यांना एकूण ६ कोटी २३ लाख १६ हजार रुपये इतका आर्थिक लाभ या योजनांच्या माध्यमातून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

योजनांच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारत क्र. बी, स.नं. १०४/१०५, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, पोलीस चौकी समोर, विश्रांतवाडी, येरवडा पुणे येथे समक्ष किंवा कार्यालयाचा दूरध्वनी ०२०-२९५२३०५९ किंवा dmobcpune@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहनही महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
0000

मनाचे सामर्थ्य वैज्ञानिक प्रगतीपेक्षा मोठे- प्रसिद्ध लेखिका वर्षा गजेंद्रगडकर

डॉ. वैशाली जाधव यांना सावित्री पुरस्कार प्रदान

पुणे : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे भान जरूर आत्मसात करा, पण मनाचे सामर्थ्य या सर्वांपेक्षा मोठे आहे, हे विसरू नका, असा सल्ला प्रसिद्ध लेखिका वर्षा गजेंद्रगडकर यांनी शुक्रवारी येथे विद्यार्थिनींना दिला. ‘मनाचे सामर्थ्य हे शस्त्र आहे. ते सतत धारदार ठेवा. आपल्या ध्येयाचे शिखर त्यातूनच आपण गाठू शकतो, असेही त्या म्हणाल्या.
सावित्री फोरम आयोजित ‘विद्यानिधी’ उपक्रम आणि ‘सावित्री पुरस्कार’ प्रदान सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी गजेंद्रगडकर यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांना पहिला  ‘सावित्री पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे ‘विद्यानिधी’ उपक्रमांतर्गत पुण्यातील व आसपासच्या ग्रामीण भागांतील इयत्ता आठवी ते दहावीच्या हुशार पण गरजू अशा ७५ विद्यार्थिनींना शैक्षणिक १ लाख रु.  मदतनिधीचे वाटप करण्यात आले.
गजेंद्रगडकर म्हणाल्या,‘ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्त्री शिक्षणासाठी योगदान दिले. आता काळ बदलला असला तरी विद्येचे महत्त्व अबाधित आहे, हे जाणून खूप शिका. विद्या आर्थिक दृष्ट्या सक्षम करतेच, पण ती माणूस घडवते. खंबीर बनवते. विचारांच्या कक्षा रुंदावते’.
डॉ. जाधव म्हणाल्या,‘ज्यांनी स्त्रियांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचले त्या सावित्रीबाईंच्या नावाचा पुरस्कार आनंददायी आहे, पण जबाबदारी वाढवणारा आहे, याची जाणीव आहे. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करत असताना, मला मोठा संघर्ष करावा लागला आहे. पण या पुरस्काराने पाठबळ दिले आहे. आत्मविश्वास दिला आहे. वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा काही वेळा गैरवापर होत असल्याचे गर्भलिंगनिदान तंत्रज्ञानाने समोर आणले. लिंगनिदान चाचणी स्त्री गर्भाच्या जिवावर उठल्याचे दिसून आले. तेव्हा त्याला प्रतिबंध करण्यासाठी कायदा लागू झाला. मात्र, समाजाचा समतोल राखण्यासाठी आपली मानसिकता बदलण्याची नितांत गरज आहे,’.
प्रारंभी दीपप्रज्वलन आणि प्रेरणागीत सादर करण्यात आले. फोरमच्या अध्यक्षा मोनाली कोद्रे यांनी प्रास्ताविक केले. दीपाली पांढरे यांनी आभार मानले. संयोगिता कुदळे आणि गायत्री लडकत यांनी सूत्रसंचालन केले. उत्तराधार्त सावित्री फोरम आयोजित ‘उत्सवरंग’ हा विशेष नृत्यसंरचनांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
गुढीपाडवा, आषाढी वारी, श्रावणातले सण, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, संक्रांत, होळी अशा अनेकविध सणांची माहिती, सांस्कृतिक महत्त्व सांगण्याबरोबरच त्यावर आधारित नृत्यरचना सादर करण्यात आल्या. उत्सवरंग या कार्यक्रमाची संकल्पना, नृत्यरचना आणि सूत्रसंचालक सुप्रिया ताम्हाणे यांचे होते.

रस्त्याच्या २१०० कोटीचा हिशेब पारदर्शकपणे जनतेपुढे सादर करा- माजी नगरसेवकांची मागणी

पुणे- गेल्या ५ /६ वर्षात रस्ते करणे , रस्ते दुरुस्त करणे आणि एकूणच रस्ते विषयक च्या कामावर केलेल्या २१०० ते २९०० कोटी रुपयांची तपशीलवार माहिती पारदर्शक पणे वेबसाईट वर अपलोड करून जनतेपुढे मांडावी म्हणजे जनतेलाही कळेल खरेच हे रस्ते महापालिकेने दुरुस्त किंवा तयार केलेत कि नाही.असा मुद्दा घेऊन आता भाजपाचे माजी नगरसेवक उज्वल केसकर,सुहास कुलकर्णी तसेच प्रशांत बधे आता पुढे आले आहेत या तिघांनी या संदर्भात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांना जाहीर आवाहन केले आहे.

त्यांनी असे म्हटले आहेकी,’आज पुण्यातली रस्त्यांची अवस्था बघितली तर हे 2100 कोटी रुपये कुठे खर्च झालेत का खर्च झालेच नाहीत? का त्यात काही काम न करता बिल काढली गेली. याबाबत पुणेकर नागरिक शंका उपस्थित करत आहेत. आम्ही कार्यकर्ते म्हणून आमच्या मनामध्ये शंका आहे कि मनपाच्या बजेट पुस्तकामधील
खालील तक्ता बघितला तर
2017-18 मध्ये जवळपास 423 कोटी
2018-19 मध्ये 438 कोटी
2019-20 मध्ये 305 कोटी
2020-21 मध्ये 453 कोटी
2021-22 मध्ये 361 कोटी
2022-23 मध्ये 200 कोटी
तसेच वार्ड व प्रभागासाठी अंदाजे 176 कोटी रूपये रस्त्यासाठी व 300 कोटी रुपये मेंटेनन्स साठी पाच वर्षात असा खर्च झालेला आहे.रस्त्याची कामे झाली का नाही झाली याची तपासणी त्रयस्त यंत्रणेमार्फत केली पाहिजे आणि पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर प्रत्येक वर्षी जे रस्ते डांबरीकरण केले तसेच सिमेंट काँक्रिटचे केलेत त्यांची यादी देखील प्रसिद्ध केली पाहिजे तसेच प्रत्येक प्रभागाने मेंटेनन्स साठी काय काम केले त्याचा देखील तपशील जाहीर केला पाहिजे.

वरील सर्व माहिती ही महानगरपालिकेच्या मुख्य लेखापालांच्या ऑफिसमध्ये उपलब्ध असेल तसेच रोड डिपार्टमेंटकडे आणि वॉर्ड ऑफिसच्या वार्ड ऑफिसरकडे देखील उपलब्ध आहे तर पुढच्या दहा दिवसांमध्ये आपण आदेश देऊन ही माहिती संकलित करून महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करावी म्हणजे दुध का दुध आणि पाणी का पाणी होऊन जन्तेलाखरे काय ते समजेल .

अमेरिकेला प्रायोगिक तत्वावर डाळिंबांची निर्यात

पुणे, दि. २८: कृषी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा), राष्ट्रीय पीक संरक्षण संस्था (एनपीपीओ), महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर आणि आय.एन.आय फार्म प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी पणन मंडळाच्या वाशी (नवी मुंबई) येथील विकिरण सुविधा केंद्रावरुन अपेडाच्या महाव्यवस्थापक विनिता सुधांशू यांच्या हस्ते प्रायोगिक तत्त्वावर अमेरिकेला डाळिंब निर्यातीचा शुभारंभ करण्यात आला. या निर्यातीनंतर अमेरिकेतील मोठी बाजारपेठ खुली होईल असा विश्वास श्रीमती सुधांशू यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाला अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव, संचालक तरुण बजाज, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरचे डॉ. आर. ए. मराठे, अपेडाचे सरव्यवस्थापक यु. के. वत्स, प्लॅंट प्रोटेक्शन ॲडवायजर जे. पी. सिंग, विकिरण सुविधा केंद्राचे प्रमुख सतिश वाघमोडे आदिंसह अधिकारी व निर्यातदार उपस्थित होते.

डाळिंबाच्या दाण्यामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अमेरिका देशाने भारतातून डाळिंबाची आयात करण्यास २०१७-१८ मध्ये बंदी घातली होती. अपेडा व एन.पी.पी.ओ. भारत सरकार यांनी संयुक्तरित्या अमेरिकेच्या कृषी विभागाशी वारंवार चर्चा केली असता मानकांच्या आधारे २०२२ मध्ये निर्यात बंदी उठविण्यात आली.

डाळिंब फळाविषयी निश्चित केलेल्या मानकानुसारच्या महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे भाजीपाला प्रक्रिया केंद्र, वाशी, नवी मुंबई येथील सुविधा केंद्रावरुन डाळिंबाचे १५० खोके (४५० किलो) अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे हवाईमार्गे पाठविण्यात आल्याची माहिती उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी यांनी दिली आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरु

मुंबई –

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरु झाली असून या बैठकीत नेमके कोणत्या विषयावर काय निर्णय घेतले जातात काय चर्चा होणार आहे याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, आ. शशिकांत शिंदे, आ. रोहित पवार आ. सुनिल भुसारा उपस्थित आहेत

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील दिंडोशीच्या घरकुल लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी आमदारांची समिती स्थापन करण्याचा निर्णय

मुंबई, दि 28: वन जमिनीवरील म्हाडाची घरे पूर्ण करण्यासाठी अक्षम्य दिरंगाई करणाऱ्या आणि घरकुल लाभार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या डीबी रियालिटीस या कंपनी ची निविदा शर्ती-अटी तपासून तात्काळ रद्द करण्याच्या सूचना व शिफारस वन विभाग झोपडपट्टी पुनर्विकास विभागाला देईल अशी घोषणा वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधान परिषदेत केली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील दिंडोशी येथील वन जमिनीवर घरे मिळण्यापासून अनेक कुटुंब वंचित असल्यासंदर्भात आ. राजहंस सिंह आणि आ. प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी च्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता; त्या प्रश्नाला ना. मुनगंटीवार यांनी सविस्तर उत्तर दिले.
ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की , गरजूंना हक्काचे घर मिळावे हा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिला आहे. पण दुर्दैवाने याकडे दुर्लक्ष होत॑ गेले त्याचा परिणाम अतिक्रमण वाढणे यात होतो. ही बाब लक्षात घेवूनच पंतप्रधान विश्वगौरव श्री नरेंद्र मोदी यांनी देशात ३ कोटी २२ लक्ष घरे बांधली; नुकत्याच केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी बांधवांसाठी १० लक्ष घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकार गरिबांना घरे देण्याच्या बाबतीत गंभीर आहे; परंतु वन विभाग हा घरे बांधण्याचे काम करीत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. वन जमिनीवर अतिक्रमण करणे किंवा अनुमती देणे याला न्यायालयाची परवानगी नाही हे आवर्जुन लक्षात ठेवले पाहिजे. यासंदर्भात केंद्र सरकारच्या पुनर्विलोकन समितीला राज्य सरकार कडून काही ज्यांची घरे आहेत त्यांना पट्टे देता येतील का अशी सूचना किंवा मागणी करण्यात येईल असे ना सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात सांगितले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील दिंडोशी च्या घराचा प्रश्न खूप जुना आहे. तेथील पुर्वसनाचा पहिला टप्पा सुमेर कार्पोरेशन या कंपनीने २६/११/२००२ ला काम पूर्ण करुन ११ हजार ३८५ घरे वाटण्यात आली. दुसऱ्या टप्याचे काम डीबी रियालिटीस या कंपनीला “झोपू” ने दिले. परंतु गेल्या १५ वर्षांपासून हे काम पूर्ण झाले नसून अनेक कुटुंब चिंतेत आहेत ही बाब गंभीर असून या कंपनीकडून झालेले दुर्लक्ष, अनियमितता लक्षात घेवून निविदा रद्द करता येईल का अशी सूचना वन विभाग करेल असे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
या संदर्भातील इतर महत्वाचे विषय ज्यामध्ये नगरी सुविधा त्या कुटुंबांना मिळाव्यात व तत्सम बाबींना न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यासह विधानसभा व विधान परिषद सदस्यांची एक बैठक घेण्याचे तसेच समिती स्थापन करुन सूचना मागवून हा प्रश्न कायम संपुष्टात यावा यासाठी प्रयत्न करेन असे आश्वासन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.