नाशिक-त्या मनोहर भिड्याचं डोकं ठिकाणावर आहे काय?, असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केला. यावेळी त्यांनी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधत होते.
छगन भुजबळ म्हणाले की, संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल झाला ही चांगली गोष्ट आहे. खरे म्हणजे तो मनोहर भिडे. त्याच्यावर आम्हीही एक केस दाखल केली आहे. आमच्या बागेतील आंबे खाल्ल्यानंतर मुलगा होईल हे जे काही विधान आहे, त्यावर आमची केस आहे. पण कोर्टात ती केस पुढे पुढे ढकलली जात आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आम्ही कोर्टात गेलो. तारीखच लागत नाही. शेवटी काय सरकार फक्त केस करणार. पण केस केल्यावर ती पटकन वर आली पाहिजे. पण तारखावर तारखा पडत असतात. मला कधी कधी वाटतं त्यांचं डोकं ठिकाणावर आहे की नाही तेच समजत नाही. त्या मनोहर भिड्यांचं, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी भिडे गुरूंजीवर निशाणा साधला.
अशा लोकांवर कडक कारवाई करा
महात्मा फुलेंवर ते टीका करतात, पण महात्मा गांधींवरही ते टीका करतात. ज्या पद्धतीने अत्यंत गलिच्छ टीका करतात. माझी खात्री आहे, पंतप्रधान मोदी असतील किंवा अमित शाह असतील कुणालाही ते आवडणार नाही. महात्मा गांधींवरील टीका कुणीही सहन करणार नाही. महात्मा गांधींना आज अख्खं जग नमन करतं. मी अनेक ठिकाणी गेलो. क्वचित एखादा देश असेल तिथे महात्मा गांधींचा पुतळा नाही. जिथे तिथे महात्मा गांधींच्या विचारसरणीला मानलं जातं. आपलसं केलं जातं. अन् इकडे महात्मा गांधींवर गलिच्छ स्वरुपाच्या टीका केल्या जातात. अशा लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भुजबळ यांनी केली.
त्यांच्यासोबत जाणं आत्मघातकी
छगन भुजबळ म्हणाले की, भिडेंबरोबर जाणं हे आत्मघातकी आहे. राजकारणाच्या दृष्टीनेही. महात्मा गांधींना अशा रितीने बोललं तर देशातील जनता सहन करणार नाहीच पण गुजरातमधील कोणताही गुजराती बांधव हे सहन करणार नाही. मोदी आणि शहा देखील सहन करणार नाही, भिडेंवर कारवाई कडक होत नाही म्हणून ते वाट्टेल ते रोज रोज नवीन नवीन काही तरी बोलतात.
स्तुती नको, पण टीका तरी का?
आता पंडित नेहरूंबद्दल बोलले. नेहरूंचे देशासाठी काडीचंही योगदान नाही असं म्हणतात. अरे त्यांचे वडील देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. सर्व दिले त्यांनी या देशासाठी आणि स्वातंत्र्यासाठी. स्वत: साडे अकरा वर्ष नेहरु तुरंगात राहिले. देशाला स्वातंत्र्य मिळेल की नाही हे तेव्हा माहीत नव्हत. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल. फार फार त्यांची भलामण करू नका. त्यांची स्तुती करू नका. पण असले काही तरी आरोप करू नका. मला तरी ते आवडत नाही आणि पसंत नाही, असे ही भुजबळ म्हणाले.