पुणे,दि.२० :- जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षाला महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी भेट दिली. माध्यम कक्षाच्या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.राजेश देशमुख, निवडणूक उपजिल्हाधिकारी आरती भोसले, माध्यम संनियंत्रण समन्वयक डॉ.पुरुषेात्तम पाटोदकर, प्रसिद्धी समन्वयक डॉ.किरण मोघे, निवडणूक तहसीलदार रुपाली रेडेकर, सहायक संचालक जयंत कर्पे उपस्थित होते.
माध्यम कक्षाद्वारे पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, समाज माध्यमे आदींवरील निवडणूक विषयक मजकूर, विविध माध्यमातील निवडणूक विषयक वृत्तांच्या नोंदी, निवडणूक विषयक बातम्यांना मिळालेली प्रसिद्धी, समाज माध्यमातील निवडणूक विषयक मजकूर आदींचे श्री.देशपांडे यांनी अवलोकन केले आणि त्याविषयी माहिती घेतली.
इलेक्ट्रॉनिक माध्यमामधील निवडणूक विषयक मजकूरावर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या यंत्रणेची त्यांनी पाहणी केली व त्याविषयी समाधान व्यक्त केले. माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीमार्फत प्रमाणिकरण करण्यात आलेल्या प्रकरणांची माहिती यावेळी डॉ.पाटोदकर यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिली. प्रसृत करण्यात आलेल्या बातम्या आणि वृत्तपत्रातून मिळालेली प्रसिद्धी याची माहिती डॉ.मोघे यांनी दिली. माध्यम कक्षात नियुक्त अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते 000
पुणे,दि.२०: प्रत्येक निवडणूक प्रक्रियेत नवा अनुभव येत असल्याने चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पोटनिवडणूकीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार, विनयकुमार चौबे, निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले, स्नेहा किसवे-देवकाते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले उपस्थित होते.
श्री.देशपांडे म्हणाले, निवडणुकीसाठी चांगली तयारी झाली आहे. दोन्ही मतदारसंघावर प्रशासनाने चांगले लक्ष केंद्रित केले आहे. सर्वसमावेशक मतदानाच्यादृष्टीने ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना पोस्टल मतदानाची सुविधा देण्यात यावी. अशी सुविधा देताना निवडणूक नियमांचे कटाक्षाने पालन करावे. निवडणूक कर्मचाऱ्यांच्या मतदानाची योग्य व्यवस्था करण्यात यावी. मतदान केंद्रप्रमुखांच्या प्रशिक्षणात मतदानाच्यावेळी येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करावे. निवडणुकीत सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी सादारीकरणाद्वारे निवडणूक तयारीची माहिती दिली. राज्यात प्रथमच घरोघरी मतदार मार्गदर्शिका वितरित करण्यात येणार आहे. चिंचवड मतदारसंघात ६० हजार आणि कसबा पेठ मतदारसंघात ३१ हजार मतदारचिठ्ठीचे वाटप करण्यात आले आहे. चिंचवड मतदारसंघात ५१ मतदान केंद्रावर तर कसबा पेठ मतदारसंघातील २७ मतदान केंद्रांवर मतदानाचे वेळी वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. मतदानासंदर्भातील सर्व तयारी पूर्ण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस उपायुक्त आर. राजा आणि काकासाहेब डोळे यांनी निवडणूकीसाठी करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती दिली.
मुंबई-शिवसेनेच्या 56 आमदारांना प्रतोदांनी दिलेला व्हीप पाळावा लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे आमदार संजय शिरसाठ यांनी म्हटले आहे. तर संजय राऊत यांना अपात्र करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा इशाराच शिरसाठ यांनी दिला आहे.
शिवसेनेच्या 56 आमदारांनी अधिवेशनाला उपस्थिती असावी, प्रतोदांच्या सूचनेचे शिवसेनेचे सर्व आमदारांनी पालन करावे, 56 आमदारांना व्हीप लागू राहणार असल्याचेही आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. पक्ष निधीसाठी आमची लढाई नाही, तर शिवसेना भवन हे आमच्यासाठी मंदिर असून त्यावर आम्ही हक्क सांगणार नाही, असे आमदार संजय शिरसाठ यांनी म्हटले आहे.
शिवसेना आमदार संजय शिरसाठ म्हणाले की, ही लढाई काही पार्टी फंड किंवा शिवसेना भवन मिळविण्यासाठी नव्हते. पक्षाचे चिन्ह आणि नाव महत्त्वाचे होते. त्यामुळे आम्ही पक्षकार्यालयातील बैठक घेतली आहे. तर शिवसेना भवनवर आम्ही हक्क सांगणार नाही असे आम्ही आधीच जाहीर केले होते. कुणाला ती संपत्ती वाटत असली तरी ते आमच्यासाठी मंदिर आहे. तिथून आम्ही जेव्हाही जाऊ तेव्हा त्यास नमन करू असे संजय शिरसाट यांनी म्हटलंय. शिरसाठ म्हणाले की, ज्यांना पैशाचा लोभ आहे त्यांनी ते करावे, त्यांच्याशी आमचे ते देणेघेणे नाही. एकीकडे शिवसैनिकांना पाळीव कुत्रा जो संबोधतो त्यांचे ते काम आहे असा टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला आहे. शिवसेनेच्या शाखेच्या जागा काही कुणी विकत घेतल्या नाही, ज्या शिवाई ट्रस्टच्या मालकीच्या संपत्ती आहे ती त्यांचीच राहणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. संजय शिरसाठ म्हणाले की, संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली आहे, हे त्यांना माहिती नाही. त्यांच्या निलंबनासाठी आम्ही आजच्या बैठकीत चर्चा केली आहे, त्यावर निश्चित कारवाई करण्यासाठी आम्ही करणार असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर संजय राऊतांवर बोलून स्वत: वर चिखल उडवून घेणार नाही. हत्ती चले बाजार तर कुत्ते भोके हजार असा टोला संजय राऊत यांना टोला लगावला आहे. कुत्रा पिसाळला तर त्यांला जाऊन आपण चावत नाही, त्यांला काही तरी औषध देऊन शांत करू असा इशारा दिला आहे.
चहा पाण्याच्या कार्यक्रमाला देखील 56 आमदारांनी उपस्थित राहायला हवे.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक् म्हणाले की, चहा पाण्याच्या कार्यक्रमाला देखील 56 आमदारांनी उपस्थित राहायला हवे.. तर जिल्हा निहाय प्रतोदांची निवड देखील होणार आहे. शिवसेनेच्या 56 आमदारांनी पूर्णवेळ अधिवेशनाला उपस्थित रहावे जे आमदार प्रतोदांच्या व्हीपचे पालन करणार नाही त्याच्यावर कारवाई होऊ शकते असा इशाराही त्यांनी दिला आहे. हे कार्यालय शिवसेनेचेच होते त्यातूनच आम्ही आजपासून काम करायला सुरूवात केली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णय आहे. 56 आमदारांना प्रतोदांनी व्हीप दिला जाणार आहे. त्यांचे उल्लघन कुणी करणार नाही असे प्रताप सरनाईक म्हणाले.
नवी दिल्ली-केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण शिंदे गटाला कायमस्वरुपी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेत नेमके काय म्हटले आहे? 5 महत्त्वाचे मुद्दे.
1) शिवसेना कार्यकारिणीची निवड लोकशाही मार्गाने
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या कार्यकारिणीची निवड लोकशाही मार्गाने झाली नाही, असा ठपका ठेवत शिवसेनेची घटनाच नियमबाह्रय ठरवली आहे. यावर याचिकेत म्हटले आहे की, 4 एप्रिल 2018 रोजी शिवसेनेच्या कार्यकारिणीचीच निवड करण्यात आली. शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निवडणूक नियमांप्रमाणे घेतली होती. त्याचा व्हिडिओ पुरावा व मतदानाच्या प्रक्रियेबाबतचे सर्व कागदपत्रे आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगासमोर दाखल केले होते. मात्र, निवडणूक आयोगाने या पुराव्यांची दखल न घेताच कार्यकारिणीची निवड लोकशाही मार्गाने झाली नसल्याचे म्हणत तिला रद्द केले.
2) शिंदे व ठाकरेंसाठी वेगवेगळी घटना नाही
2018मध्ये शिवसेनेच्या घटनेत एकतर्फी बदल करण्यात आला, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे. यावर याचिकेत ठाकरे गटाने म्हटले आहे की, कार्यकारिणीची लोकशाही पद्धतीने निवड केल्यानंतर त्यांच्या संमतीनेच घटनेत पक्षप्रमुख हे पद तयार करण्यात आले. तरीही, लोकशाही पद्धतीने घटना बदलली नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तसेच, घटनेतील बदल नियमबाह्य असतील तर त्याच घटनेनुसार एकनाथ शिंदे यांना नेतेपद देण्यात आले होते. घटना नियमबाह्य असेल तर एकनाथ शिंदे यांची घटनेनुसार नेतेपदावर केलेली निवड निवडणूक आयोगाने योग्य कशी ठरवली? एकनाथ शिंदेंची नेतेपदी निवड योग्य असेल तर त्याच घटनेनुसार उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी घटना चुकीची कशी ठरू शकते?, असा सवाल याचिकेत केला आहे. उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यासाठी घटनेचा वेगवेगळा अर्थ लावता येणार नाही, असे याचिकेत म्हटले आहे.
3) पराभूत उमेदवारांची मते का नाही मोजली?
शिवसेना कुणाची? यावर निर्णय देताना निवडणूक आयोगाने आमदार, खासदारांच्या मताला महत्त्व दिले. बहुमताला महत्त्व असल्याचे आयोगाने म्हटले आहे. आपल्या निकालात आयोगाने म्हटले की, शिंदे गटाकडे 55 आमदारांचे मत आहे. तर, ठाकरे गटाच्या बाजूने केवळ 15 मते आहेत. यावर ठाकरे गटाने याचिकेत म्हटले आहे की, केंद्रीय निवडणूक आयोगाने केवळ निवडणुकीत जिंकलेल्या आमदार, खासदारांची मते ग्राह्य धरली आहेत. मात्र, निवडणुकीत जे उमेदवार पराभूत झालेत, त्यांची मते निवडणूक आयोगाने का मोजली नाहीत. या उमेदवारांनाही लाखोंच्या जनसंख्येने मते दिली आहेत. याशिवाय लाखो कार्यकर्ते अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. मात्र, या बाबींचा निवडणूक आयोगाने विचारच केला नाही. केवळ आमदार, खासदारांच्या बहुमताच्या आधारावर पक्ष कोणाचा हे ठरवता येणार नाही.
4) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना निकाल नको
शिवसेना नाव व पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय स्थगित करावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी ठाकरे गटाने याचिकेत केली आहे. याचिकेत ठाकरे गटाने म्हटले आहे की, बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्याआधीच केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष कोणाचा? यावर निकाल देणे चुकीचे आहे. उद्या आमदार अपात्र ठरल्यास यातून कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतात. त्यामुळे बंडखोर आमदारांच्या पात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतरच निवडणूक आयोगाने शिवसेना कुणाची? यावर निर्णय द्यावा. तोपर्यंत दिलेला निर्णय स्थगित करावा, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.
5) 1999च्या घटनेनुसार निर्णय दिला
याचिकेत शेवटी ठाकरे गटाने म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने शिवसेना कुणाची?, हा वाद मिटवला, पण त्याचा आधार पक्षाची 1999 ची घटना होती. मात्र, 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत दुरुस्ती केली होती. 2018 च्या घटनेनुसार शिवसेनेचा अध्यक्ष पक्षात सर्वोच्च असेल. पक्षातून कोणाची हकालपट्टी करणे, वार्षिक सभा घेणे किंवा पक्षात कोणाचाही समावेश करणे याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाध्यक्षांनाच आहे. 1999 च्या पक्ष घटनेनुसार पक्षप्रमुखांना असे कोणतेही अधिकार नव्हते. मात्र, निवडणूक आयोगाने 2018 ची घटनेनुसार निर्णयच दिला नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय पक्षपाती, चुकीचा व लोकशाहीविरोधी आहे.
शिंदे गटाचीही कॅव्हेट याचिका
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाकडून आव्हान दिले जाण्याची शक्यता गृहित धरून शिंदे गटाने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. आमचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देऊ नये, अशी विनंती शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधातील याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. यादरम्यान, ठाकरे व शिंदे गटात जोरदार खडाजंगी पाहायला मिळेल.
2024 नंतर देशात हुकूमशाही येईल;घरातील लोकांनी घात केला
मुंबई- निवडणूक आयोग बरखास्त करा. निवडणूक घेऊन निवडणूक आयुक्तांची निवड करावी, अशी मागणी सोमवारी उद्धव ठाकरे यांनी केली. निवडणूक आयोगाला निर्णय आमच्याविरोधात द्यायचा होता, तर शपथपत्रे का भरून घेतली, असा सवालही त्यांनी केला. निवडणूक आयोग म्हणजे सुलतान नाही, अशी तिखट टीका त्यांनी केली. तर देशात चोरांना राजप्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू असल्याचे म्हणतच भाजपने दगा दिला असेही त्यांनी म्हटले आहे.
देशात चोरांना राजप्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरणे हा संपूर्ण पूर्वनियोजित कट होता. जर आता आपण काही केले नाही तर 2024 ची निवडणूक ही लोकशाहीची शेवटची निवडणूक असेल असे ठाकरेंनी म्हटले आहे. ज्या निवडणूक आयुक्तांनी हा निर्णय दिला त्या तिघांमधील एका आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे, तेच वादग्रस्त असल्याचेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकारच्या मदतीने त्यांना पक्ष आणि चिन्ह मिळू शकले. मात्र, त्यांना ठाकरे नाव मिळणार नाही, ते चोरू शकणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. तर आता जर आवाज उठवला नाही तर येणाऱ्या काळात देशातील इतर पक्षांसोबत देखील हे होऊ शकते असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय अपेक्षित नव्हते, त्यांनी दिलेला निकाल अयोग्य आहे. आम्ही सुप्रीम कोर्टात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. घटनेनुसार बाहेर गेलेले सर्व आमदार अपात्र ठरवायला हवे होते. मात्र, केवळ गुंता वाढावा म्हणून निवडणूक आयोगाने घाईत हा निर्णय घेतल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.
उद्धव ठाकरे यापुढे म्हणाले की, शिंदे गटात लोक एकत्र बाहेर पडले नाही, सुरूवातील 16 आमदार बाहेर पडले, त्यावर आम्ही अपात्रतेची कारवाई संदर्भात तक्रार केली, यावर सुप्रीम कोर्टात् गेलो आहोत, त्यावर आधी निर्णय व्हायला हवा तर निवडणूक आयोगाविरोधात आम्ही कोर्टात गेलो असून तिथे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल् असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, घटनेनुसार तर 40 आमदार अपात्र ठरले पाहिजे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. निवडणूक आयोग बरखास्त करावा आणि लोकशाही मार्गाने निवडणूक आयोगांच्या आयुक्तांची निवड केली जावी असेही ठाकरेंनी म्हटले आहे. तर मला शरद पवार, ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांच्यासह फोनवरून चर्चा झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पक्षाच्या निधीवर डल्ला मारण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही असे सांगतानाच 2024 नंतर देशात हुकुमशाही येईल असा दावाही त्यांनी केला आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचा व्हीप आम्हाला लागू होणार नाही, कारण त्यांना वेगळा गट आणि आम्हाला वेगळा गट म्हणून मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. पालिकेतील कार्यालय शिंदेंच्या गटाला देणे हे गुन्हा ठरेल, कारण मनपात सध्या प्रशासक आहे. आमचे हत्यारे हे घरातीलच निघाले, असे म्हणतच त्यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घातली आहे. तर शिवधनुष्य हे शिंदे गटाला पेलणार नाही, लोकांना हे पटलेले नाही, मी राज्यभर सभा घेणार असल्याचे सांगतानाच एकनाथ शिंदेंनी माझ्या वडिलांचे नाव न वापरता आपल्या वडिलांचे नाव वापरण्याचे आव्हान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले आहे.
पुणे-. मुंबई – बंगळुरू महामार्गावरील नवले पुलावरून एका चोवीस वर्षीय तरुणीने खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहतूक पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने या महिलेचे प्राण वाचवण्यात यश आले. किरकोळ जखमी झालेल्या या महिलेवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पुणे बंगळुरू महामार्गावरील नवले पुलावरून एक तरुणी आरडाओरडा करत जात होती. काही वेळातच ही महिला नवले पुलावरून खाली उडी मारण्याच्या तयारीत होती. त्या ठिकाणी वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसांच्या लक्षात हा प्रकार आला. या तरुणीने उडी मारू नये यासाठी त्यांनी तिला समजावण्याचाही प्रयत्न केला. मात्र ती काही ऐकण्याच्या तयारीत नव्हती.त्यानंतर वाहतूक पोलिसांनी काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने सतरंजी धरून या महिलेला वाचवण्यासाठी ऑटोकाट प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळाने या महिलेने खाली उडी मारली देखील. त्याच वेळी खाली जमलेल्या नागरिकांनी सतरंजी आणि हाताच्या साह्याने या महिला पकडले. या संपूर्ण प्रकारात या महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे. तिच्यावर आता खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुणे- एखादा नगरसेवक एकदा महापालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष झाल्यावर आपल्या मतदार संघाचा कायापालट करतात. मात्र, भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी चार वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष होऊनही मतदार संघात काहीच कामे केली नाहीत. आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात काय काम केली, हे मतदारांसमोर मांडावे, असे आव्हान राज्यसभेच्या खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी केले.
कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ रविवारी काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अॅड. वंदना चव्हाण बोलत होत्या. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी उपस्थित होते.
अॅड. वंदना चव्हाण म्हणाल्या, महाविकास आघाडेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी नगरसेवक म्हणून चांगले काम केले आहे. ते तत्परतेने काम करणारे व सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारे लोकप्रतिनिधी म्हणून परिचीत आहेत. या उलट भाजचा उमेदवार आहे. त्यांचे उमेदवाराने चार वर्ष महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये काम केले आहे, त्यातील तीन वर्ष ते स्थायीचे सदस्य होते. या कालावधीत त्यांनी मतदार संघासाठी काहीच काम केले नाही. एक वर्ष अध्यक्षपद मिळाल्यावर अनेकजण कामाची चुणूक दाखवतात, मात्र रासनेंना चार वर्षात काही करता आले नाही. त्यांनी काय काम केले, असा प्रश्न नागरुकांना पडला आहे.
दुसरीकडे सत्तेवर आल्यावर भाजपने स्मार्ट सिटीची फसवी योजना आणली. या योजनेसाठी आमच्या नगरसेवकाने कामे केलेला बाणेरचा परिसर निवडला. स्मार्ट सिटीसाठी स्वारगेट किंवा स्टेशनचा परिसर निवडला असता तर स्मार्ट सिटीने काय काम केले, हे लोकांसमोर आले असते. मात्र आमच्या कामावर चमकोगिरी केली. तशाच प्रकारे नागरिकांना फसविणारी स्वच्छ भारत योजनाही भाजपने आणली. योजनेसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात, मात्र सर्वत्र कचरा तसाच दिसतो.
यासर्व गोष्टींवर महापालिकेतील सत्ताधारी म्हणून महापौर व स्थायी समितीच्या अध्यक्षांनी प्रशासनावर वचक ठेवायला हवा. मात्र तसे झाले नाही. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या काळात जेएनएनयु मधून शहरातील अनेक कामे झाली.
महापालिकेतील सत्ताधारी भाजपने शहरातील आरक्षित जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्ही तो प्रयत्न हाणून पाडला. भाजपच्या सत्ताकाळात महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळांची, ऐतिहासिक वास्तू व ठिकाणांचीही दुरावस्था झाली आहे. सार्वजनिक वाहतुकीचाही बोजवारा उडाला आहे. भाजपने मिळकतकराची ४० टक्के सूट काढून घेतली.
भाजपने आणलेला नदी सुशोभीकरण प्रकल्प कसबा विधानसभा मतदार संघासाठी घातक आहे. राडारोड्यामुळे नदीची वहनक्षमता कमी झाली आहे. त्यात आता या प्रकल्पामुळे वहनक्षमता आणखी कमी होणार आहे. महापौर व स्थायीच्या अध्यक्षांनी पुणेकरांचे हित पाहण्यापेक्षा वरिष्ठांची मरजी राखण्यास धन्यता मानली. त्यामुळे धंगेकर यांचा या निवडणुकीत विजय निश्चित आहे.
मेट्रो प्रकल्पाच्या बाजूला ४ एफएसआय देण्याचा निर्णय घेतला आहे. कसब्यात सर्वाधीक दाटीवाटीची घरे आहेत, मग येथे ४ एफएसआय कसा देणार, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. कोवीड काळात अजित दादांनी पालकमंत्री म्हणून चोख जबाबदारी पार पाडली. मात्र महापौर व स्थीच्या अध्यक्षांनी मनमाणी पद्धतीने काम केले, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही.
भाजप नेते ही पोटनिवडणुक स्थानिक प्रश्नावर लढवण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर मते मागत आहे. मात्र पुणेकरांच्या बचावासाठी येणार नाहीत, त्यामुळे पुणेकरांनीच आपला विचार करून मतदान करणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीवेळी १५ लाख खात्यात येणार, कोट्यावधी नोकऱ्यायावर नागरिकांची फसवणुक झाली आहे, हे विसरता कामा नये. मोदी यांचा करिष्मा आता राहिलेला नाही, त्यामुळे या पोट निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर प्रचंड मताने विजयी होणार आहेत, असा विश्वासही अॅड. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केसा.
नवी दिल्ली, दि. 19: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राजधानीत उत्साहात साजरी करण्यात आली. बाल शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवी पाळण्याने, ढोल-ताशांच्या गजराने आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या उत्स्फुर्त घोषणांनी महाराष्ट्र सदन दुमदुमले.
शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती दिल्लीच्या वतीने येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र सदनाच्या प्रवेश भागातील केंद्रीयस्थानी छत्रपती शिवाजी महाराजांची बैठी प्रतिमा विराजमान करण्यात आली. या ठिकाणी कोल्हापूर येथील छत्रपती परिवारातील युवराज शहाजी राजे छत्रपती यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेऊन शिवजन्माचा पाळणा गायला. यानंतर पालखी पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी निवासी आयुक्त डॉ. निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सदनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त डॉ.निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ.अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी व दिल्ली राजधानी क्षेत्र, हरियाणा, उत्तर प्रदेशातून या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
ढोल ताशांचे सादरीकरण ठरले आकर्षण
ढोल ताशांच्या गजराने सदनाचे वातावरण दुमदुमले. सोबतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने वातावरण निनादले. नाशिक येथील वादकांच्या ढोल पथकात सहभागी तरुणाईंचा उत्साह व सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
संसद भवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
संसद भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास अभिवादन करण्यात आले. यावेळी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
लोहगावस्थित सिव्हिल डिफेन्स संस्थेच्या मागण्या शासनाने मान्य केल्याची माहिती
मुंबई, दि.19 : भारतीय लष्कर, नौदल व वायुदल या तीनही भारतीय सैन्य दलाच्या पुणे येथील लोहगावस्थित सिव्हिल डिफेन्स गृहरचना संस्थेचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लावण्यात आला आहे. या संस्थेच्या मागण्या राज्य शासनाने मान्य केल्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे एकंदरीतच 15 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सैनिकांच्या मागण्यांबाबतचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्री श्री. विखे-पाटील यांनी अत्यंत कौशल्याने 5 महिन्यात सोडविला आहे.
केंद्र शासनाच्या तीनही संरक्षण दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या डिफेन्स पर्सनल को.ऑ. हौसिंग सोसायटीला सन 2003 मध्ये घरे बांधण्यासाठी पुणे जिल्ह्यातील लोहगाव तालुक्यात हवेली येथे 18 हजार 600 चौ.मी. जमीन वाटप करण्यात आली होती. या संस्थेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे काही महत्त्वपूर्ण गोष्टींसाठी पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार या गृहनिर्माण संस्थेच्या बांधकामाच्या जागेचा वापर, बांधकामास मुदतवाढ अशा अनुषंगिक मागण्याबाबत सकारात्मक विचार करून सरकारने लोहगावस्थित सिव्हिल डिफेन्स गृहरचना संस्थेचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लावला आहे.
देशाची अहोरात्र सेवा करणाऱ्या सैनिकांचा 15 वर्षांचा संघर्ष या निर्णयामुळे अखेर संपुष्टात आला आहे. डिफेन्स पर्सनल को.ऑ. हौसिंग सोसायटीच्या नावातही बदल करून सिव्हिल डिफेन्स गृहरचना संस्था मर्यादित असे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पूर्वी केवळ 200 निवासी क्षमता असलेल्या या जागेवर महानगरपालिकेच्या माध्यमातून 400 निवासी क्षमतेपर्यत वाढविता येण्याच्या आराखड्यास तत्त्वतः मंजूरीही मिळणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारतीय सैनिकांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहेत. त्यांच्या सुख-दु:खात ते नेहमी सहभागी होत असतात, दिवाळीही ते भारतीय सैनिकांसह साजरी करतात. त्यामुळे भारतीय सैन्य दलाच्या दृष्टीने ते हिताचे निर्णय घेत असल्याने, त्यांच्या “प्रथम राष्ट्र” विचारातून आणि प्रेरणेतून राज्यात हा एक महत्वपूर्ण निर्णय घेऊन सैन्यदलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचे काम आम्ही केल्याचे मंत्री श्री. विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा एक धोरणात्मक निर्णय घेतल्याचा अभिमान असल्याचे श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.
पुणे, दि.१९ : जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी पुढील दोन वर्षात १०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील; तसेच यावर्षीच्या हिंदवी स्वराज्य महोत्सवासारखे आयोजन यापुढे शिवजयंतीनिमित्त दरवर्षी करण्यात येईल, असे राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.
शिवजयंतीनिमित्त राज्य शासनाकडून आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सव अंतर्गत भव्य महाशिव आरतीचे जुन्नर येथे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार प्रवीण दरेकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य आशा बुचके आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. लोढा म्हणाले, यावर्षी शिवजयंतीला उत्साहाचे वातावरण आहे. जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी शिवकालीन गाव उभे करण्यात येईल. पर्यटन विभागाकडून येथे कायमस्वरूपी टेन्ट सिटी उभी करु, असेही ते म्हणाले.
यावेळी हातात दिवे, पणती घेऊन शिवनेरी किल्ल्याच्या दिशेने महाशिव आरती, शिव वंदना करण्यात आली. त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी आमदार श्री. दरेकर, ह.भ.प. पंकज महाराज गावडे, ह.भ.प. राणा महाराज वासकर यांनी मनोगत व्यक्त केले
कोल्हापूर येथील न्यू एज्युकेशन सोसायटीचा शतक महोत्सवी सांगता समारंभ व शतसंवत्सरी स्मरणिका प्रकाशन सोहळा संपन्न
कोल्हापूर, दि. 19 : शिक्षण संस्था विद्यादानाचे काम करुन उज्वल भावी पिढी घडवित असल्याने अशा शिक्षण संस्थांना शासन नेहमीच मदत व सहकार्य करते. याच भावनेतून न्यू एज्युकेशन सोसायटीची वरिष्ठ महाविद्यालय सुरु करण्याची मागणी विशेष बाब म्हणून मान्य केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.
न्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूरचा शतक महोत्सवी सांगता समारंभ व शतसंवत्सरी या स्मरणिकेचे प्रकाशन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि त्यांच्या पत्नी सोनलजी शाह, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सव समिती व सल्लागार नियामक मंडळाचे कार्याध्यक्ष विनोदकुमार लोहिया यांच्यासह संस्थेचे मान्यवर पदाधिकारी, माजी विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, कोल्हापूर येथील न्यू एज्युकेशन सोसायटीने गेल्या 100 वर्षात केलेले ज्ञानदानाचे काम कौतुकास्पद आहे. संस्थेची ज्ञानदानाची चळवळ अखंड तेवत रहावी यासाठी न्यू एज्युकेशन सोसायटीने नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित नवीन अभ्यासक्रम सुरू करुन विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची सोय उपलब्ध करून द्यावी, त्यास शासन स्तरावरुन आवश्यक ते सहकार्य केले जाईल. न्यू एज्युकेशन सोसायटीने चांगल्या नि:स्वार्थी भावनेने शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे काम केले असल्यामुळेच संस्थेने 100 वर्षाचा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे. संस्थेचे विद्यार्थी सर्व क्षेत्रात नावलौकीक मिळवित आहेत हे संस्थेच्या व भावी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अलौकिक आहे, असे त्यांनी म्हंटले.
विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेची भीती असू नये, यासाठी देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमामुळे आपणास लहानपणी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या ठिकाणी उपस्थित राहता आले. या कार्यक्रमामुळे लहाणपणीच्या आठवणी जाग्या झाल्या हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता, असे श्री. शिंदे यांनी सांगितले. मागील दोन वर्षात सर्व कार्यक्रम बंद होते, पण आता आपल्या शासनाने सर्व कार्यक्रम करण्यास मान्यता दिली असल्याने विविध सण, उत्सव, समारंभ आपण मोठ्या उत्साहाने व दिमाखात साजरे करत आहोत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच जीवनाचे लक्ष निर्धारित करुन हे लक्ष्य साध्य करण्यासाठी संकल्प करावेत. संकल्पाला कष्टाची जोड देवून यशाला गवसणी घाला, असा संदेश विद्यार्थ्यांना केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी यावेळी बोलताना दिला.
केंद्रीय गृह मंत्री श्री. शाह म्हणाले, शालेय जीवनात विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होत असतात. या संस्कारातूनच त्यांची चांगली जडण-घडण होते. यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच छोटे-छोटे संकल्प करावेत. एखादी गोष्ट सलग 21 दिवस केल्यास त्याची सवय लागते. हीच गोष्ट 90 दिवस केल्यास त्याची शैली बनते, यासाठी लहाणपणीच छोटे-छोटे संकल्प करुन त्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करा. शिक्षण, व्यायाम व योगाला जीवनात महत्वाचे स्थान द्या, असेही श्री. शाह यावेळी बोलतांना म्हणाले.
देशाने सर्व क्षेत्रात क्रांती केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश सर्व क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत आहे. पुढील 25 वर्षात देश जगात सर्व क्षेत्रात अव्वल असेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी यावेळी व्यक्त केला.
न्यू एज्युकेशन सोसायटीने 100 वर्षात ज्ञानदानाबरोबरच खेळ, क्रीडा यासह सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमठविला आहे. संस्थेने शिक्षण क्षेत्रात चांगले काम केले असून त्यांचे लाखो विद्यार्थी आज वेगवेळ्या क्षेत्रात काम करीत आहेत. संस्था समाजाप्रती चांगले काम करीत असून माझ्या पत्नीचे शिक्षण या संस्थेत झाले याचा आपणास अभिमान वाटतो. शतक महोत्सवी सांगता समारंभ व शतसंवत्सरी या स्मरणिका प्रकाशन सोहळ्यास आपणास निमंत्रित केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पत्नी सोनल शाह यांनी मनोगत व्यक्त केले. आपण ज्या शाळेत शिकलो, घडलो त्या शाळेच्या समारंभास आपणास उपस्थित राहता आले हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
न्यू एज्युकेशन सोसायटी शिक्षण संस्थेमार्फत सध्या १२ वी पर्यंतचे शिक्षण देण्यात येत आहे. संस्थेमार्फत कला, वाणिज्य, विज्ञान, कृषी, वैद्यकीय, विधी शाखेची वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याचा मानस असून यासाठी शासन स्तरावरून मदत मिळावी, अशी अपेक्षा दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सव समिती व सल्लागार नियामक मंडळाचे कार्याध्यक्ष विनोदकुमार लोहिया यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली.
वरळी नाक्यावर मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भव्य महाआरती
मुंबई कुठे चौकात ढोल ताशांचा गजर, दांडपट्टा, कुठे शिवकालीन नाण्यांचे, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, पोवाडे, तुतारी, भव्य मिरवणूका आणि ‘जय जय शिवराय’ या आरतीचा जयघोष…छत्रपती शिवाजी महाराज की जय…जय भवानी… जय शिवराय.. अशा घोषणांमध्ये अवघी मुंबई आज दुमदुमून गेली होती.
मुंबई भाजपातर्फे आज मुंबईत जवळपास ४१० ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. शहरात या निमित्ताने काढण्यात आलेल्या शोभायात्रा, मिरवणूका, भगव्या पताका, होर्डिंग, देखावे यामुळे मुंबईत आजचा दिवस छत्रपतींंच्या जयघोषात निनादून गेला होता.
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आज मुंबईतील २५ ठिकाणच्या जयंती उत्सवांना भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. यामध्ये सकाळी छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण दहिसर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आजच्या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनिषा चौधरी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. चारकोप, गोरेगाव, अंधेरी पूर्व येथील उत्सवात सहभागी झाले. तर अंधेरीचे माजी नगरसेवक अभिजित सामंत यांनी आयोजित केलेल्या लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धेचे बक्षिस वितरण आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सायन कोळीवाडा येथे आमदार तमिल सेलवन यांनी काढलेल्या भव्य शोभायात्रेत सहभागी झाले. आमदार प्रसाद लाड यांनी सायन येथे आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवासह माटुंगा ओबीसी सेलतर्फे आयोजित जयंती उत्सवात सहभागी झाले. भांडूप छत्रपती शिवाजी महाराज तलाव येथे शिवपुतळ्याची आरती करण्यात आली तर मुलुंड येथे माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्या तर्फे शिवकालीन नाण्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले त्यालाही आमदार ॲड. आशिष शेलार यांनी भेट दिली.
कुर्ला, वांद्रे येथे शिव आरती करण्यात आली तर खार येथे शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यासह लालबाग, काळाचौकी प्रभादेवी येथील उत्सवात ते सहभागी झाले. तर छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथील महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. वरळीला नाक्यावर भव्य शिव प्रतिमा उभारुन पोवाडा, लेझीम, ढोल पथकांसह ५० कलावंतांनी महाराष्ट्राच्या लोकधारेतील सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तर आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.
उत्तर मुंबईत दहिसर येथे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर व्याख्यान पार पडले. खा. पूनम महाजन यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. खा. मनोज कोटक मुलुंड पश्चिम येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. कुलाबा येथे आ. राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम घेण्यात आले. मुलुंड येथे आ. मिहीर कोटेचा यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. दहिसर येथे आ. मनीषा चौधरी यांच्या प्रयत्नाने शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कांदिवली येथे आ. अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत जयंती उत्सव पार पडला. बोरीवलीत आ. सुनील राणे यांनी प्रतिमा पूजन केले. चारकोप विधानसभेत आ. योगेश सागर यांच्या उपस्थितीत विविध उपक्रम राबविण्यात आले. अंधेरी येथे आ. अमित साटम यांनी प्रतिमा पूजन केले. घाटकोपर पूर्व विधानसभेत आ. पराग शाह यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी झाली. गोरेगाव विधानसभेत आ. विद्या ठाकूर यांनी शिवजयंती निमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन केले. आ. पराग अळवणी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत मागाठाणे येथे कार्यक्रम पार पडला. तसेच मुंबईत शिवजयंती निमित्त भाजपा मुंबईच्या वतीने अभिवादन करणारे ५० हून अधिक भव्य डिजिटल बॅनर लावण्यात आले होते.
कीर्तनकार ह.भ.प. वासुदेवबुवा बुरसे ; श्रीरामजी संस्थान तुळशीबागतर्फे भागवत एकादशीनिमित्त कीर्तन पुणे : सोळाव्या शतकात तीन महान सत्पुरुषांनी अलौकिक सामर्थ्याने हा महाराष्ट्र धर्म जगवला आणि जागवला. समर्थांनी महाराष्ट्राचा मेंदू तयार केला. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी महाराष्ट्राचे मन तयार केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राचे मनगट तयार केले. मन, मनगट आणि मेंदू याचे एकत्रिकरण झाले आणि महाराष्ट्रामध्ये हिंदवी साम्राज्य उभे राहिले. अशा या सत्पुरुषांच्या विचारांचे अनुकरण सर्वांनी केले पाहिजे, असे मत ह.भ.प. ज्येष्ठ कीर्तनकार वासुदेवबुवा बुरसे यांनी व्यक्त केले. श्रीरामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग राम मंदिरात भागवत एकादशीनिमित्त मंदिरात कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. वासुदेवबुवा बुरसे म्हणाले, समर्थांच्या व्यक्तिमत्वामध्ये भक्ती, शक्ती आणि युक्तीचा एक अनोखा संगम आहे. मानवी मूल्यांचे मोजमाप करताना समर्थ सांगतात विश्वातील प्रत्येक वस्तूही नाशवंत आहे. शरीर देखील नाशवंत असले तरी विचार हे अमर असतात. संत देहाने जरी निघून गेले तरी संतांचे विचार आजही समाजाची धारणा करतात. संतांच्या जीवनाचे अनुकरण करत असताना देव, देश, धर्म यासाठी मानवाने जगावे आणि मरावे ही शिकवण विसरू नये.
पुणे दि.१९: शिवसृष्टीची उभारणी हे अप्रतिम आणि अद्भूत कार्य आहे. लोकांना प्रेरणा देण्यासाठी ही शिवसृष्टी उभारण्यात येत असल्याने शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे नऱ्हे आंबेगाव येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीचा पहिला टप्पा ‘सरकारवाडा’चे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार शिवेंद्रराजे भोसले, नाना जाधव, डॉ.प्रविण दबडगाव, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम आदी उपस्थित होते.
शिवसृष्टीला भेट देताना कै.बाबासाहेब पुरंदरे यांची आठवण होते असे नमूद करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, शिवसृष्टीचा हा उपक्रम आपल्या सगळ्यांचा आहे. शिवसृष्टीचा पहिला टप्पा आज सुरू होत आहे. राज्य शासनाने यासाठी ५० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. आता या प्रकल्पाचे काम थांबणार नाही आणि अधिक वेगाने ते पूर्ण करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून देशाचा कारभार केला जात आहे. म्हणून शिवसृष्टीला निधी कमी पडू दिला जाणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज कुशल संघटक छत्रपतींचे जीवीतकार्य हा महाराष्ट्राचा अभिमान होता. शिवाजी महाराजांनी रयतेसाठी कार्य केले. ते कुशल संघटक, कुशल प्रशासक, कुशल निर्माते होते. दूरदृष्टी असलेले त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या कार्यातून आदर्श उभा केला आहे. त्यामुळे त्यांच्या जयंतीचा दिवस सोहळ्याच्या रुपात साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून सर्वसामान्य जनतेसाठी शासन कार्य करीत आहे. जनतेच्या कल्याणाचा ध्यास घेतलेला शिवाजी महाराजांसारखा दुसरा राजा झाला नाही. त्यांनी जगासमोर आदर्श राजा कसा असावा याचे उदाहरण आपल्या कार्यातून प्रस्तूत केले. इथे भेट देणाऱ्या प्रत्येकाला शिवाजी महाराजांची दूरदृष्टी कशी होती याचा प्रत्यय येईल.
कै.बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित स्थळांना भेट देऊन शिवरायांचा इतिहास जगभरात पोहोचवला. शिवाजी महाराजांनी बांधलेले गड-किल्ले आपले वैभव आहे. गड-किल्ल्यांवर त्यांनी केलेल्या सुविधा अद्भूत आहेत. ते जतन करण्याचे कार्य राज्य शासनाच्या माध्यमातून केले जाईल. इथे येणारा प्रत्येकजण ऊर्जा घेऊन जाईल आणि संस्कारकेंद्र म्हणून याची ओळख स्थापित होईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
शिवसृष्टी अशियातील सर्वात भव्य थीम पार्क होईल -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शिवसृष्टीचा प्रकल्प निर्धारीत वेळेत पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करून श्री.शाह म्हणाले, पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग साकारण्यात आले आहेत. इथे भेट देणारा शिवाजी महाराजांच्या जीवनातून मिळणारा संदेशही सोबत घेवून जाईल. शिवसृष्टी अशियातील सर्वात भव्य थीम पार्क होईल.
इतिहासातील सूक्ष्म बाबींना संशोधनपूर्वक मांडल्याने हा प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतिहास आणि तंत्रज्ञानाचा सुंदर समन्वय इथे दिसून येतो. इतिहासाला जीवंत रुपात साकारण्याचा हा प्रयत्न शिवाजी महाराजांच्या जीवनसंदेशाला नव्या पिढीपर्यंत पोहोचवेल. देशभरातील शिवभक्तांसाठी आणि जगभरातील इतिहास प्रेमींसाठी हे महत्वाचे स्थळ होईल.
छत्रपती शिवरायांचे कार्य देशभरातील जनतेला प्रेरित करणारे आहे. हे कार्य घरोघरी पोहोचविण्यात शिवशाहीर कै. बाबासाहेब पुरंदरे यांचे मोठे योगदान आहे. जगभरातील अधिकृत दस्तावेजाचे संकलन करून नव्या पिढीसाठी शिवचरित्राची रचना करून त्यांनी नव्या पिढीवर मोठे उपकार केले आहे. त्यांनी १२ हजारापेक्षा अधिक व्याख्याने आणि जाणता राजाचे १२०० पेक्षा अधिक प्रयोग करून शिवसृष्टीसाठी योगदान दिले. जाणता राजा महानाट्याच्या माध्यमातून युवकांवर देशभक्तीचे संस्कार प्रभाविपणे झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे देशाच्या इतिहासात मोठे योगदान छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्याची प्रेरणा सत्ता नव्हती, तर अत्यांचारांविरुद्ध संघर्ष करण्यासाठी, स्वधर्माप्रती निष्ठेसाठी, स्वभाषेला महत्वाचे स्थान देण्यासाठी आणि स्वराज्य स्थापनेसाठी त्यांचे जीवन होते. भारतावर कुणीही अत्याचार करू शकत नाही हा संदेश त्यांनी स्वराज्य स्थापना करून जगाला संदेश दिला. त्यांचा हा विचार त्यांच्या नंतरही प्रेरणादायी ठरेला दिसून येतो. १६८० नंतरही त्यांच्या कार्याला, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम, महाराणी ताराबाई, छत्रपती शाहू महाराज यांनी पुढे नेले. स्वराज्याची ही यात्रा अटक ते कटक आणि गुजरात ते बंगालपर्यंत पोहोचली आणि संपूर्ण भारताला प्रेरणा देण्याचे सामर्थ्य त्यांच्या विचारात होते.
स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषेसाठी शिवरायांचा आग्रह स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा यासाठी शिवाजी महाराज आग्रही होते. आपल्या संस्कृती आणि धर्मानुसार शासन चालावे असे प्रयत्न त्यांनी केले. स्वभाषेत राजव्यवहार कोष सर्वप्रथम तयार करण्याचे कार्य शिवछत्रपतींनी केले. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला. शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. स्वराज्यासोबत सुराज्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शासनाला आठ विभागात वर्गीकरण करून शासनाच्या कार्याला लिपीबद्ध करण्याचे कार्य केले. स्वराज्यासोबत सुराज्याची कल्पना त्यांनी अत्यंत सूक्ष्मपणे केली.
छत्रपती शिवाजी महाराज युद्धभूमीवर अग्रेसर राहून लढणारे साहसी योद्धा होते. एक कोटी सिंहांचे काळज त्यांच्याकडे होते हे अफजलखान वधाच्या प्रसंगावरून दिसून येते. उपभोगशून्य राजा कसा असावा याचे उदाहरण महाराजांनी आपल्यासमोर ठेवले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याचे कार्य केले. मराठी नौसेनेचे संस्थापक म्हणूनही त्यांचे कार्यही महत्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे केवळ राजाचे जीवन नसून एक विचार आहे. हा विचार शिवसृष्टीच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचेल, असा विश्वास श्री.शाह यांनी व्यक्त केला.
नवी पिढी शिवसृष्टी येथून राष्ट्रप्रेमाचे शिवतेज घेऊन जाईल-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, शिवसृष्टी प्रकल्प महाराजांचा इतिहास आणि महाराजांचे तेज पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी उपयुक्त आहे. आपला स्वाभीमान सतत तेवत रहावा आणि आपल्याला अध:कारातून प्रकाशाकडे कुणी नेले हे आपल्याला समजावे यासाठी बाबासाहेबांनी शिवसृष्टीची निर्मिती केली. पहिला टप्पा पाहिल्यावर नवी पिढी इथून राष्ट्रपेमाचे शिवतेज घेऊन जातील, आपल्या देशाविषयी काहीतरी करण्याची उर्मी त्यांच्या मनात निर्माण होईल, आपल्या संस्कृतीविषयी अभिमान त्यांच्या मनात निर्माण होईल.
बाबासाहेबांनी ५० वर्ष शिवसृष्टीचे स्वप्न आपल्या उराशी बाळगले. पहिला टप्पा पूर्ण होत असताना बाबासाहेबांनी आपल्यापर्यंत पोहोचविलेला अजरामर विचार पुढे नेऊन संपूर्ण शिवसृष्टी अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे. शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासन सर्व मदत करेल. शिवाजी महाराजांचा वारसा, त्यांचे व्यवस्थापन शास्त्र, पर्यावरण दृष्टी, जलनियोजन पुढील पिढीपर्यंत पेाहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
प्रास्ताविकात विश्वस्त श्री.कदम यांनी शिवसृष्टी प्रकल्पाविषयी माहिती दिली. शिवसृष्टी प्रकल्पाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत पर्यटन धोरण २०१६ अंतर्गत ‘मेगा टुरिझम प्रोजेक्ट’ म्हणून मान्यता मिळाली. पुढील वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
ऐतिहासिक वैभवाचे दर्शन घडविणारा सरकारवाडा शिवसृष्टी हा आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प असून त्याचा पहिला टप्पा असलेल्या सरकारवाडा या ठिकाणी कामकाजाचे ठिकाण, भव्य संशोधन ग्रंथालय, प्रदर्शनी दालन व बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात आले आहे. शिवाय याच ठिकाणी देवगिरी, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पन्हाळगड व विशाळगड या गड-किल्ल्यांची सफर घडविणारा ‘दुर्गवैभव’ हा भाग, शिव छत्रपतींच्या काळात वापरत असलेल्या शस्त्रांचे विशेष दालन ‘रणांगण’, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची माहिती देणारे दालन आणि महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका ही एका विशेष थिएटरच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभविता येईल.
सरकारवाडा मधील ‘दुर्गवैभव’ विभागात आजच्या तरुण पिढीला आपला जाज्वल्य इतिहास तितक्याच प्रभावीपणे समजावा, या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात अत्यंत महत्वाचे स्थान होते अशा काही किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करून त्या किल्ल्यांच्या मागे भव्य एलईडी स्क्रीनवर प्रोजेक्शनच्या सहाय्याने मॅपिंग केलेले असून यासाठी होलोग्राफी, ॲनिमेट्रोनिक्स, मोशन सिम्युलेशन, ३ डी प्रोजेक्शन, मॅपिंग अशा अत्याधुनिक पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. 0000
पुणे : जय भवानी जय शिवाजी चा जयघोष… ढोल ताशा ंचा गजर… लाठी काठींचे मर्दानी खेळ… विद्यार्थ्यांच्या हातांमध्ये फडकणारे भगवे झेंडे अशा उत्साहपूर्ण वातावरणात बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन कार्यरत असणाऱ्या श्री शिवाजी मराठा सोसायटीमध्ये शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी तब्बल १५०० विद्यार्थी पांरपारिक वेशात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताचे समुहगान केले.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, रवींद्र धंगेकर, श्री शिवाजी मराठा सोसायटीचे मानद सचिव अण्णा थोरात, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियमक मंडळ अधयक्ष सत्येंद्र कांचन, कारभारी मंडळ अध्यक्ष पद्माकर पवार, कमलताई व्यवहारे, बाळासाहेब गायकवाड, माधव पवार, शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे,आणि सर्व सन्माननीय मान्यवर, शाखाप्रमुख उपस्थित होते.
शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी मराठा सोसायटीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली.
श्री शिवाजी मराठा सोसायटी – बाजीराव रस्त्यामार्गे चितळे बंधू मिठाईवाले – महात्मा फुले मंडई – शिवाजी रोड मार्गे पुन्हा श्री शिवाजी मराठा सोसायटीमध्ये मिरवणूकीचा समारोप झाला.
जिजाऊ आणि बाल शिवरायाची मूर्ती असलेला फुलांनी सजलेला रथ मिरवणूकीत सहभागी झाला होता. मिरवणुकीत जयंत नगरकर यांचा नगारा, शिवगर्जना पथकाचे ढोल ताशा वादन आणि न्यू गंधर्व बँडने वादन केले. श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या सर्व शाखांचे विद्यार्थी आणि शिक्षक मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी पर्यावरण जागृती, राष्ट्रीय एकात्मता, स्वच्छ भारत संदेश विद्यार्थ्यांनी मिरवणूकीत दिला.
अण्णा थोरात म्हणाले, श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी साहसी खेळ सादर केले. शिवरायांचे नेतृत्वगुण, त्यांचे शौर्य स्वराज्यासाठी त्यांनी केलेले कार्य विद्यार्थ्यांना कळावे आणि त्यांनी ते अंगिकारावे यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.