पुणे-. मुंबई – बंगळुरू महामार्गावरील नवले पुलावरून एका चोवीस वर्षीय तरुणीने खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहतूक पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने या महिलेचे प्राण वाचवण्यात यश आले. किरकोळ जखमी झालेल्या या महिलेवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पुणे बंगळुरू महामार्गावरील नवले पुलावरून एक तरुणी आरडाओरडा करत जात होती. काही वेळातच ही महिला नवले पुलावरून खाली उडी मारण्याच्या तयारीत होती. त्या ठिकाणी वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसांच्या लक्षात हा प्रकार आला. या तरुणीने उडी मारू नये यासाठी त्यांनी तिला समजावण्याचाही प्रयत्न केला. मात्र ती काही ऐकण्याच्या तयारीत नव्हती.त्यानंतर वाहतूक पोलिसांनी काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने सतरंजी धरून या महिलेला वाचवण्यासाठी ऑटोकाट प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळाने या महिलेने खाली उडी मारली देखील. त्याच वेळी खाली जमलेल्या नागरिकांनी सतरंजी आणि हाताच्या साह्याने या महिला पकडले. या संपूर्ण प्रकारात या महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे. तिच्यावर आता खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.