Home Blog Page 1400

पंतप्रधानांना मणिपूर जाळायचे आहे, राहुल गांधींचे मोदींना उत्तर; संसदेतल्या भाषणाची ‘जोकबाजी’ म्हणत निर्भत्सना!

जिथे जिथे भारतमातेवर हल्ला होईल तिथे मी तुम्हाला लढण्यासाठी उभा दिसेन

पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने राहुल गांधींना जयराम म्हटले, तर राहुल यांनी त्यांना जय सियाराम म्हटले. पत्रकाराने विचारले – तुम्ही 37 मिनिटांचे भाषण केले. पण तुम्हाला टीव्हीवर 14 मिनिटेच दाखवले. या परंपरेकडे तुम्ही कसे पाहता? राहुल म्हणाले- कदाचित पंतप्रधानांना माझा चेहरा बघायचा नसेल. त्यांना माझा टीव्हीवरचा चेहरा आवडत नाही. पण मला माझे काम करावे लागेल. जिथे जिथे भारतमातेवर हल्ला होईल तिथे मी तुम्हाला लढण्यासाठी उभा दिसेन, असे राहुल म्हणाले.

पंतप्रधानांनी संसदेत 2 तास 13 मिनिटे भाषण केले. त्यात शेवटी फक्त दोन मिनिट ते मणिपूरवर बोलले. मणिपूर अनेक महिन्यांपासून जळत आहे. लोक मारले जात आहेत, बलात्कार होत आहेत लहान मुलांना मारले जात आहे. दुसरीकडे पंतप्रधान संसदेत हसून हसून बोलत होते. जोक करत होते, हसून बोलत होते. हे पंतप्रदानांना शोभत नाही, अशी टीका राहुल गांधींनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदींवर केली.

जर देशात हिंसाचार होत असेल तर भारताचे पंतप्रधान 2 तासं त्याची खिल्ली उडवू शकत नाहीत. विषय काँग्रेस किंवा मी नव्हतो तर विषय मणिपूर होता. मणिपूरमध्ये काय होत आहे, आणि त्याला लगेच का थांबवले जात नाही, हा विषय आहे, असे राहुल म्हणाले.

मी गेल्या अनेक वर्षांत अनेक संकटांमध्ये सगळ्या राज्यांमध्ये फिरलो आहे. गेल्या 19 वर्षांच्या अनुभवात मी मणिपूरमध्ये जे पाहिले आणि ऐकले तसे कधीही पाहिले ऐकले नव्हते. मी संसदेत म्हटलो की, पंतप्रधान अमित शहा यांनी मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली आहे. हे मी विनाकारण बोललो नव्हतो, ते पोकळ शब्द नव्हते, असेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींनी सांगितला अनुभव
मणिपूरमध्ये दौऱ्यासाठी गेलो तेव्हा आम्ही मेईतेई भागात गेलो तेव्हा आम्हाला स्पष्ट सांगितले होते की, तुमच्या सुरक्षा रक्षकांमध्ये कुकी असेल तर त्याला आणू नका, आम्ही त्याला गोळ्या घालू. आम्ही कुकींच्या भागात गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की, मेईतेईंना आणू नका आम्ही त्यांना गोळ्या घालू. त्यामुळे आम्हाला मेईतेई आणि कुकींना वेगळे करावे लागले. म्हणजे एक राज्य नाही, त्याचे विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे मी म्हटलो की, मणिपूरमध्ये हिंदुस्तानची हत्या भाजपने केली आहे, असा आरोप त्यांनी केला.

या सर्वानंतर जेव्हा मी पंतप्रधांना हसताना, जोक करताना पाहिले, तेव्हा मला प्रश्न पडला की ते असे कसे करू शकतात. पंतप्रधानांना जायचे नसतील तर जाऊ नये. त्यांची न जाण्याची कारणे आहेत, ती मी सांगू शकत नाही. पण त्यांना जायचे नसेल, तर किमान मणिपूरवर बोलायला तरी हवे, असे राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधानांचे भाषण देशाबद्दल नव्हते, स्वतःबद्दल होते
कालचे पंतप्रधानांचे भाषण भारताबद्दल नव्हते, ते नरेंद्र मोदींबद्दल होते. ते त्यांच्या राजकारणाबद्दल होते. पंतप्रधानांना स्वतःबद्दल सांगायचे आहे, ते 2024 मध्ये पंतप्रधान होतील, ही नंतरची गोष्ट आहे. हे त्यांनी सभेत सांगावे. पण संसदेत मणिपूरवर चर्चा होत होती. त्यावर ते काहीच बोलले नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

सरकार म्हणते की त्यांनी मणिपूरमधील यंत्रणा बदलून टाकली, मग त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा का देऊ नये?

मणिपूरमध्ये जी हजारो शस्त्रे लुटली गेली ती सरकार असतानाच लुटली गेली. जी हिंसा सुरू आहे, तशी हिंसा सुरूच राहावी, अशी अमित शहांची इच्छा आहे. तिथे जे घडत आहे ते मुख्यमंत्री असतानाच घडत आहे.

…मेधा कुलकर्णीं सहन करताहेत निष्ठेच्या यातना.. म्हणाल्या ,'”असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे”

पुणे- सत्ता आणि सत्तेचा मोह,माणसाला सारे काही विसरवितो,कळस डौलाने डोलतो आणि दूर दूरवरून चमकून दिसतो तेव्हा जर त्याला आपल्या तळाशी असलेल्या पायाचे विस्मरण झाले आणि गर्व चढला तर.आणि हाच पाया कमकुवत झाला तर …? पण निष्ठावंत असलेला पाया कधी कमकुवत न होता निष्ठेच्या यातना सहन करत राहतो अगदी तसेच पर्त्येक क्षेत्रात तसे होते जसे सध्या राजकीय क्षेत्रात देखील घडते आहे,पुण्याच्या भाजपा मध्ये तर बापट होते तोपर्यंत त्यांची चापट बसत परंतु आता तेही उरले नाहीत आता निष्ठेला..जन पळभर म्हणतील..हाय हाय..हे लक्षात घेऊन सारे सहन करावे लागेल.अगदी अशीच भावना आता माजी आमदार मेधा कुलकर्णीची भडभडून आली आहे.. आणि सोशल मिडीयातून व्यक्त देखील झाली आहे.उद्या होणाऱ्या चांदणी चौकाच्या नूतनीकरणाच्या निमित्ताने हा बांध फुटला आहे..चांदणी चौकाचा विषय त्यांनीच उपस्थित करून फडणवीस आणि गडकरी यांच्याकडे नेला होता,राष्ट्रीय पदावर असूनही मेधा यांना मध्यंतरी मोदी – शहा यांच्या कार्यक्रम समयी पासेस सुधा डावलेले होते..महापालिकेतील पदाधिकारी यांनी सुरु केलेल्या या भेदभावाच्या राजकारणाने कसबा तर हातातून गेलाच पण त्यानंतरही या पक्षाला जाग आलेली दिसत नाही हेच आता मेधा कुलकर्णी यांच्या पोस्ट वरून म्हणावे लागेल..नेमके मेधा कुलकर्णी यांनी काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात वाचा….

“असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे “माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही..पण आता दुःख मावत नाही मनात..वाटले बोलावे तुमच्याशी.चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले.चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय Nitin Gadkari जी आणि Devendra Fadnavis यांना आहे.पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, “तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला”.अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता.आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते..माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? मध्यंतरी आदरणीय मोदी जी, आदरणीय अमित शाह जी पुण्यात येऊन गेले.ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’ चे पास होते.मी राष्ट्रीय पदावर असून,विनंती करूनही मला दिला नाही.साधे कोथरूडच्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणी मध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे.गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे.त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत.देशापुढील आव्हाने,त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे. माझ्या बाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे.

‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ देखावा-सजावट स्पर्धेचे आयोजन

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी स्पर्धेत सहभागी व्हावे-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन

पुणे, दि. ११ : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ गणेशोत्सव देखावा-सजावट २०२३ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

दरवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मडळामध्ये गणेशाचे आगमन होते. याचाच एक भाग म्हणून राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे.

गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखावे साकार करून सामाजिक संदेश देतात. या स्पर्धेत मंडळांना देखावे व सजावटीद्वारे नागरिकांना मताधिकार बजावण्यासाठी मतदार नोंदणी, मताधिकार, लोकशाहीचे सक्षमीकरण आदी विषयावर प्रबोधन करता येईल. देखावे सजावटीसाठी ‘लोकशाही टिकवण्यासाठी मतदानाला पर्याय नाही!’, ‘मतदार यादीतला तरुणाईचा टक्का वाढावा म्हणून जनजागृती’, ‘आम्ही मतदान करणार कारण..’, ‘हक्क वंचितांचे मार्ग मताधिकाराचा’ आणि ‘शहरी मतदाराची अनास्था कारणे आणि उपाय’ आदी विषय घेता येतील.

याव्यतिरिक्त लोकशाही मतदार नोंदणी, मताधिकार यांचे महत्त्व अधोरेखित करुन मताधिकार हा १८ वर्षांवरील नागिराकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे, मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, मताधिकार बजावताना जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषाना बळी न पडता मताधिकार बजावणे यांसारख्या विषयावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देखावा-सजावटीतून जागृती करून लोकशाही समृद्ध करता येईल.

पाणी, सार्वजनिक स्वच्छता, खड्डेमुक्त रस्ते, चांगले शिक्षण व चागली घरे अशा अनेक सार्वजनिक सुविधा सर्व नागरिकाना विनासायास प्राप्त होणे हे सक्षम आणि सुदृढ लोकशाहीच लक्षण आहे. मात्र नागरिकाना या सुविधाची केवळ माहिती असून उपयोग नाही, तर या सुविधा मिळवून देण्याची जबाबदारी आपल्या लोकप्रतिनिधींवर आहे आणि ती पार पाडणाऱ्या लोकप्रतिनिधीची निवड करणेही तितकेच आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने कोणत्याही आमिषाना बळी न पडता आपल्या परिसराच्या कायमस्वरूपी विकासाला प्राधान्य देऊन मताधिकार बजावला पाहिजे. अशा सुजाण नागरिकांनी बजावलेल्या मताधिकारामुळेच लोकांनी लोकांची लोकासाठी चालवलेली लोकशाही व्यवस्था अस्तित्वात येईल. यासारखे संदेशही देखावे व सजावटीच्या माध्यमातून देता येतील.

बक्षिसांचे स्वरुप: प्रथम क्रमांकास १ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास ५१ हजार रुपये, तृतीय क्रमांकास २१ हजार रुपये तर उत्तेजनार्थ बक्षिसे १० हजार रुपयांची एकूण १० बक्षिसे राहतील.

स्पर्धेसाठी गूगल अर्ज आणि काही तांत्रिक नियमावली नंतर कळविण्यात येणार आहे. स्पर्धकांच्या संख्येनुसार आणि दर्जानुसार बक्षिसाच्या संख्येत आणि रकमेत बदल करण्याचा अधिकार आयोजक आणि परीक्षकांचा राहील, असेही उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मीनल कळसकर यांनी कळविले आहे.

प्रत्येक पुणेकराने आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी!पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

पुणे महापालिकेकडून पालकमंत्र्यांना राष्ट्रध्वज सुपूर्द

पुणे दि.११: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा ९ ऑगस्टपासून सर्व देशभर सुरू झाला असून, प्रत्येक पुणेकराने ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमांतर्गत आपल्या घरी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

पुणे महापालिकेकडून पालकमंत्री श्री. पाटील यांना आज राष्ट्रध्वज सुपूर्द करुन शहरात राष्ट्रध्वज वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापालिकेच्या कोथरुड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त केदार वझे, आरोग्य निरीक्षक गणेश साठे तसेच संदीप खर्डेकर, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राष्ट्र म्हणून एकत्रितपणे घरोघरी राष्ट्रध्वज फडकविणे हे राष्ट्र उभारणीसाठीच्या आपल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. लोकांच्या मनात देशभक्ती जागृत करणे आणि आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल अभिमानाची भावना वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

गेल्या वर्षी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना प्रत्येक घरी आपला राष्ट्रध्वज उभारुन स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करावे असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनानंतर गेल्यावर्षी प्रत्येक घरावर तिरंगा उभारला गेला. यंदा अमृतमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा आहे. त्यामुळे सर्व देशवासीयांनी आपल्या घरी पुन्हा तिरंगा उभारुन राष्ट्रध्वजाला मानवंदना द्यावी असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले आहे.

दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकींसाठी राखून ठेवता येणार

पुणे, दि. ११: पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचाकींसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक चारचाकींसाठी हवे असलेल्या वाहन मालकांनी विहित तीनपट शुल्कासह १४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे धनाकर्ष (डीडी) १७ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल.

दुचाकी वाहन मालकांनी आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असल्यास १७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे डीडी १८ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल.

अर्ज कार्यालयाच्या खासगी वाहन नोंदणी विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा. हा डीडी ‘आर.टी.ओ.,पुणे’ यांच्या नावे राष्ट्रीयकृत, अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर न केल्यास राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नाही. प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणेच्या कार्यक्षेत्रातील वाहनधारकांनीच अर्ज सादर करावेत, कार्यक्षेत्राबाहेरील अर्ज बाद ठरविण्यात येणार असल्याचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत पुणे विभागस्तरीय पुरस्कार जाहीर

सातारा जिल्ह्यातील बनवडी ग्रामपंचायतीला विभागात प्रथम

पुणे, दि.११:- स्वच्छतेच्या सवयी अंगीकारुन ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्याच्या उद्देशाने राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत सन २०२०-२१ व २०२१-२२ या दोन वर्षाचे विभागस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील बनवडी (ता.कराड) ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत विभागीय आयुक्त श्री. राव यांच्या अध्यक्षतेखालील विभागस्तरीय समितीने नुकतीच विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक मिळालेल्या ग्रामपंचायतींची तपासणी केली. या समितीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता श्री.राहणे, पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, विकास शाखेच्या सहाय्यक आयुक्त सोनाली घुले आणि विकास शाखेचे उपायुक्त विजय मुळीक यांचा समावेश होता. समितीने केलेल्या पडताळणीनुसार विभागस्तरीय पारितोषिकासाठी पुढीलप्रमाणे ग्रामपंचायती पात्र ठरल्या आहेत-

सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतीला विभागस्तरीय प्रथम पुरस्कार जाहीर झाला असून बक्षीसाची रक्कम रुपये दहा लाख आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आजरा तालुक्यातील वाटंगी आणि पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील काळेवाडी ग्रामपंचायतींना ८ लाख रुपयांच्या द्वितीय पुरस्कार विभागून जाहीर करण्यात आला असून सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे आणि खंबाळे ग्रामपंचायतींना तृतीय क्रमांकाचा ६ लाखांचा पुरस्कार विभागून जाहीर करण्यात आला आहे.

बनवडी ग्रामपंचायतीला स्व.वसंतराव नाईक पुरस्कार, वाटंगी ग्रामपंचायतीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार तसेच सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातील भोसे ग्रामपंचायतीला स्व.आबासाहेब खेडेकर असे प्रत्येकी तीस हजार रुपये रक्कमेचे विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.स्वच्छतेशी आणि ग्रामविकासाशी निगडीत क्षेत्रामध्ये भरीव काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर पुरस्कार देण्यात येतात. या अभियानांतर्गत पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घर, गाव व परिसर स्वच्छता, वैयक्तीक स्वच्छता व लोकसहभाग आणि वैयक्तीक व सामुहिक पुढाकारातून विकासासाठी राबविण्यात आलेले नाविन्यपूर्ण उपक्रम आदी बाबींची तपासणीच्या आधारे गुणांकन करण्यात येते. विभागस्तरावरील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायती राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरतात.

औरंगजेबाविषयी स्टेटस -येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे- एका तरुणाने इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर औरंगजेबाविषयी स्टेटस ठेवून धार्मिक भावना दुखावून समाजात तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित तरुणावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.याबाबत शुभम विठ्ठल रेणगुंठा (वय- 21 ,राहणार -येरवडा पुणे )याने इंस्टाग्राम धारक शाहरुख सय्यद याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार शुभम रेनगुंठा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट पाहत असताना, इंस्टाग्राम खात्यावर त्यांना शाहरुख सय्यद या तरुणानी औरंगजेब विषयी स्टेटस ठेवण्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड विधान कलम 295 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महिला पोलिस उपनिरीक्षक एस शेलार पुढील तपास करत आहे.

दहा महिला चालकांना ई-रिक्षा खरेदीसाठी लोकसहभागातून अर्थसहाय्य –पालकमंत्री

पुणे: दि.११: शहरात ई-रिक्षा घेणाऱ्या १० महिलांना ई-रिक्षासाठी मिळणारे अनुदान वगळून इतर रक्कम लोकसहभागातून उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

पुणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते नॅशनल क्लिन एअर प्रोग्राम अंतर्गत मिस्ट बेस्ड फाउंटन सिस्टिमचे उद्घाटन आणि इलेक्ट्रिक पॅसेंजर रिक्षांसाठी अनुदान वाटप करण्यात आले. मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नितीन शिंदे, ‘एआरएआय’चे जितेंद्र पुरोहित, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे, पर्यावरण विभागाचे उपायुक्त माधव जगताप आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, देशपातळीवर इलेक्ट्रिक रिक्षासाठी अनुदान देण्यात येत आहे. ई-रिक्षासाठी केंद्र शासनाचे आणि महानगरपालिकेचे मिळून एकत्रित १ लाख अनुदान मिळते. त्यामुळे साधारण एक रिक्षेसाठी चालकाला ३ लाख खर्च करावा लागेल, मात्र इंधनाची बचत होत असल्याने कुटुंबासाठी जास्त उत्पन्न मिळू शकेल. शहरातील प्रदूषण कमी करताना उत्पन्न वाढणार असल्याने रिक्षा चालकांनी इलेक्ट्रिक रिक्षेकडे वळावे. रिक्षा थांब्याजवळ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्याबाबत महानगरपालिकेने नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

शहरात मेट्रोचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यावर २ लाख नागरिक इतर वाहनाऐवजी मेट्रोचा पर्याय वापरातील. तिसऱ्या टप्प्यानंतर ही संख्या ४ लाखावर पोहोचेल त्यामुळे प्रदूषण आणखी कमी होईल. प्रवाशांना घरापासून मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी ई रिक्षाचा उपयोग होईल. रिक्षासोबत इतर वाहनांसाठीही सीएनजी आणि इलेक्ट्रिकचा वापर करणेही गरजेचे आहे, असे मत पालकमंत्र्यांनी व्यक्त केले.

शहरातील चौकात बसविलेल्या मिस्ट बेस्ड फाउंटनमुळे हवेतील धूलिकण कमी होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वासही श्री. पाटील यांनी व्यक्त केला.

श्री.ढाकणे म्हणाले, पुणे शहरातील लोकसंख्या ७० लाखापर्यंत पोहोचली असून ५५ लाख वाहनांची नोंदणी झाली आहे. बाहेरील वाहनेही मोठ्या प्रमाणात येत असल्याने प्रदूषण वाढते आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिका अनेक स्तरावर प्रयत्न करीत आहे. ई-रिक्षांना अनुदान, ई बसेसची वापर, मिस्ट बेस्ड फाउंटन अशा विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्री.जगताप म्हणाले, केंद्र शासनामार्फत नॅशनल क्लिन एअर प्रोग्राम तसेच १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत महानगरपालिकेला ३५० कोटींचा निधी उपलब्ध झाला असून महानगरपालिकेमार्फत प्रत्येक इलेक्ट्रिक पेसेंजर ऑटो रिक्षा मालकाला रक्कम २५ हजार रुपये प्रति रिक्षा अनुदान देण्यात आले आहे. शहरातील प्रमुख चौकातील प्रदूषण कमी करण्यासाठी १० ठिकाणी मिस्ट बेस्ड फाउंटन उभारण्यात येत असून एकूण ४० ठिकाणी असे कारंजे उभारण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.

ई- रिक्षा पंचायतीचे प्रतिनिधी नितीन पवार यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. ई-रिक्षेसाठी अनुदान देणारी पुणे ही देशातील पहिली महानगरपालिका आहे असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे प्रतिनिधी, रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी आणि रिक्षा मालक उपस्थित होते.

नवाब मलिक यांना प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना 2 महिन्यांसाठी जामीन मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना शुक्रवारी जामीन मिळाला. सर्वोच्च न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना 2 महिन्यांसाठी हा दिलासा दिला.

नवाब मलिक गत फेब्रुवारी 2022 पासून तुरुंगात होते. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. पण हाय कोर्टाने त्यांची याचिका धुडकावून लावली होती. त्याविरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. या सुनावणीत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्या जामिनावर कोणतीही हरकत घेतली नाही. त्यामुळे न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस व न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केला.

मलिक यांची एक किडनी निकामी

नवाब मलिक यांची एक किडनी निकामी झाली आहे. सध्या ते एकाच किडनीवर आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नवाब मलिक हे सध्या कुर्ला येथील क्रिटी केअर रूग्णालयामध्ये दाखल आहेत. मात्र किडनी ट्रान्सप्लांटसाठी त्यांना अन्य मोठ्या रूग्णालयात उपचार घ्यायचे आहेत, अशी माहिती त्यांनी कोर्टाला दिली होती.

नवाब मलिकांना अटक का झाली होती?

नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक झाली होती. मुंबईतील कुर्ला येथील भूखंड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इक्बाल कासकरच्या चौकशीत नवाब मलिक यांचे नाव समोर आले होते. 23 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. ईडीने या प्रकरणी अनेक ठिकाणी छापेमारी केली होती.

मलिक यांच्यावर हसिना पारकर यांच्याकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप

नवाब मलिकांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. यासाठी त्यांनी केवळ 55 लाख रुपये दिले होते, ज्याची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी आहे.

वैचारिक प्रदूषण दूर करण्यासाठी गांधी- आंबेडकर -लोहिया यांच्या विचारांची आवश्यकता : रघू ठाकूर

गांधी – लोहिया – आंबेडकर : संयुक्त विचारधारा’ विषयावरील व्याख्यानास प्रतिसा
पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या वतीने आयोजित ‘गांधी – लोहिया – आंबेडकर : संयुक्त विचारधारा’ या विषयावरील ज्येष्ठ समाजवादी विचारवंत रघु ठाकूर(मध्य प्रदेश) यांच्या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला.

हे व्याख्यान गुरूवार, १० ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता गांधी भवन, कोथरूड येथे झाले. युवक क्रांती दल संस्थापक,आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते.

नीलम पंडित यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले.डॉ. प्रवीण सप्तर्षी, डॉ. उर्मिला सप्तर्षी, विकास देशपांडे,जांबुवंत मनोहर, सचिन पांडुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

रघू ठाकूर म्हणाले, ‘गांधी,लोहिया, आंबेडकर यांचे विचार वेगळे नाहीत, एकच आहेत. समतेवर त्यांचे एकमत आहे. त्यांच्या विचारात अंतर असल्याचे सांगण्याचा प्रयत्न होतो. तो प्रयत्न चुकीचा आहे. गांधींजींच्या विरोधात अफवा पसरविण्याने काहीही साध्य होणार नाही. गांधी आणि डॉ.आंबेडकर यांच्याही विचारात अंतर नाही. कोणाच्याही जन्मापेक्षा त्या व्यक्तीने केलेल्या कर्मावर चर्चा झाली पाहिजे ‘.

चरखा, अहिंसा यामुळेच स्वातंत्र्य मिळाले आहे. सर्व भिंती ओलांडून देशाला एकत्र येण्याचे माध्यम मिळाले. मनातील भीती आणि दास्यत्वाची भावना घालवली.

राखीव जागांवरून डॉ.आंबेडकरांना जेवढी अपेक्षा होत्या, त्यापेक्षा अधिक जागा देण्यात गांधी यशस्वी झाले. गांधीजींना मने बदलून परिवर्तन आणू पाहत होते, तर डॉ.आंबेडकर, लोहिया यांना संघर्षातून परिवर्तन हवे होते.लोहिया हे विद्रोही व्यक्तीमत्व होते, असेही ठाकूर म्हणाले.

‘समाजवाद हा शब्द घटनेत वाढवला हे योग्य पाऊल होते. कारण समतेकडे आपला प्रवास करायचा होता. लोकशाही ही जीवनशैली आहे, ती जगून दाखवावी लागते.
गांधी, डॉ.आंबेडकर,लोहिया यांचे विचार कालसुसंगत आहेत. सध्याचे वैचारिक प्रदूषण दूर करण्यासाठी या विचारांची आवश्यकता आहे ‘ असे त्यांनी आवर्जून सांगीतले.

वृक्ष तोड प्रतिबंधक ,पर्यावरण हिताचा कायदा पुन्हा लागू करण्यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

पुणे :- महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाच्या हिताचा हेरिटेज ट्री आणि २०० हून अधिक वृक्षतोडीवर नियंत्रणासाठी कायदा अमलात आणला होता . महाराष्ट्र वृक्ष प्राधिकरण स्थापन करुन अवैद्य वृक्षतोडीवर आळा बसविणारा हा कायदा लोकप्रिय झाला होता .
आत्ताच्या त्रिकुट सरकारने विकासला विरोध म्हणून हा कायदा रद्द करुन वृक्ष तोडीचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थानाच दिले आहे यामुळे असंख्य वृक्षतोड होणार असून या विरोधात शिवसेना ( उद्भव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी पुणे कार्यालयावर आंदोलन करण्यात आले तसेच निवेदन ही देण्यात आले.

शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले महाराष्ट्रातील वृक्षांच संवर्धन व्हावं आणि या महाराष्ट्र सुजलाम रहावा. हिरवाई अशीच कायम टिकून रहावी, म्हणून नवीन कायदा अमलात आणला होता. आणि त्याद्वारे महाराष्ट्रातील झाडांची कत्तल थांबणार होती. सर्व थरातून या नवीन कायद्याच कौतुक झालं होत. आदित्य ठाकरेंच झालेल कौतुक या आताच्या चालू त्रि कुटील सरकारला बघवल गेल नाही म्हणून अधिवेशनामध्ये या सरकारने नवीन विधेयक आणून मविआने केलेला कायदा रद्दबादल ठरवण्यात आला. त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो, धिक्कार करतो. तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून केलेला कायदा जर अमलात आला असता आणि टिकला असता तर या महाराष्ट्रातील संपूर्ण झाडे सांभाळली गेली असती, पुण्यातील वेताळ टेकडीवरील झाडे असतील, नदी सुधार प्रकल्पातील जी साडेसात हजार झाडांची कत्तल होणार आहे ती थांबण्यासाठी मदत झाली असती. पर्यावरणाचा होणारा र्हास थांबण्यास मदत झाली असती.

थरकुडे म्हणाले पुण्यातल पर्यावरण म्हणून आदित्य ठाक,ए आग्रही होते. त्यांनी पुण्यात अनेक संस्थासोबत, अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्या होत्या. पुण्याचीच हरितकरण व्हावे म्हणून ते आग्रही होते.

याप्रसंगी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महिला शहरसंघटिका संगिता ठोसर, पल्लवी जावळे, उपशहरप्रमुख बाळा ओसवाल, भरत कुंभारकर, तानाजी लोणकर, गजानन पंडित, अनंत घरत, उमेश गालिंदे, उमेश वाघ, विश्वास चव्हाण, रविंद्र मुजुमले, विधानसभाप्रमुख उत्तम भुजबळ, राजेंद्र बाबर, नितीन शिंदे, रामदास गायकवाड, विभाग प्रमुख राजेश मोरे, संतोष सोनवणे, अतुल गोंदकर, भगवान वायाळ, चंदन साळुंके, मुकुंद चव्हाण, बाळा अल्हाट, युवासेनेचे सनी गवते, परेश खांडके, निकिता मारटकर, गायत्री गरूड, आदर्श नानावरे, नागेश खडके, संतोष शेलार , संतोष गोपाळ, प्रविण डोंगरे, नंदू घाटे, अजय परदेशी, विकी धोत्रे, संजय वाल्हेकर, बाळासाहेब मोडक, देवेंद्र शेळके, संदिप नवले, मारूती ननावरे, रमेश सोनवणे,विजय परदेशी, दत्ता घुले, शरद गुप्ते, नरेंद्र दरवडे, परवेश राव, विलास कथलकर, ज्ञानेश्वर पोळ, काका कुलकर्णी , शाहेबाज पंजाबी, सागर मोकर, संदीप सोनार, राहुल शेडगे, प्रविण रणदिवे , हर्षद ठाकर, राहुल बोडके , विशाल डोंगरे, नितीन थोपटे, नितीन रावळेकर, दिलीप महादे, नंदू जांभळे , इतर शिवसैनिक उपस्थित होते ..

सुस-म्हाळुंगे हद्दीवर PMPML बस सेवा सुरु, आता लवकरच पाण्याच्या लाईनचे काम सुरु करणार – अमोल बालवडकर

पुणे:

आज सुस-म्हाळुंगे हद्दीवरील अगदी शेवटच्या भागात असणार्या निलांचल सोसायटी ते पुणे मनपा अशी बस सेवा परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरीकांच्या उपस्थितीमध्ये सुरु करण्यात आली.
मागील आठवड्यामध्ये या परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरीकांनी व विशेषतः महिलांनी या परिसरात दळण-वळणाकरीता नागरीकांना सार्वजनिक वाहतुक व्यवस्था उपलब्ध नाही, तरी या परिसरात पी.एम.पी.एम.एल. बस सेवा सुरु करण्याची मागणी माझ्याकडे केली होती.
याचीच तातडीने दखल घेवुन पी.एम.पी.एम.एल.च्या वरीष्ठ अधिकार्यांशी चर्चा करुन त्वरीत आजपासुन हि बससेवा सुरु केली आहे.
या भागात सार्वजनिक वाहतुक व्यवस्था नसल्याने नागरीकांची गैरसोय होत होती परंतु आता या बससेवेचा फायदा या भागीतील ज्येष्ठ नागरीक, महिला तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.
“अनेक वर्षांची प्रतिक्षा संपली व आम्हा सर्व ज्येष्ठ नागरीकांना कोणत्याही अडथळा न येता प्रवास करणे व शहरातील इतर भागात दळण-वळण करणे सोपे झाले. आमच्या समस्येची तातडीने दखल घेवुन ती सोडवल्याबद्दल या भागातील नगरसेवक अमोल बालवडकर तसेच सर्वच भाजपा पदाधिकार्यांचे आम्ही आभार मानतो” असे मत या परिसरातील ज्येष्ठ नागरीकांनी व्यक्त केले.

यावेळी विबग्योर स्कुलच्या परिसरात गतिरोधक बसवुन तसेच वाहतुक व्यवस्थेचे योग्य नियोजन केले. या भागातील वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडविल्याबद्दल सर्व सभासदांनी आभार व्यक्त केले.

तसेच यापरिसरात येत्या २-३ महिन्यांमध्ये पुणे मनपाच्या माध्यमातुन २४x७ समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सुमारे १८०० मी. लांबीच्या दोन लाईन त्यामध्ये २० इंच व्यासाची ट्रान्समिशन लाईन व ६” व्यासाची डिस्ट्रिब्युशन लाईन टाकण्याचे काम पुर्ण करण्यात येणार आहे असा शब्द या सर्व नागरीकांना दिला.

यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, मा.सरपंच नारायण चांदेरे, युवा नेते अनिलबाप्पु ससार, युवा नेते शरद भोते, अभय तडवळकर, संदिप प्रधान, हरिभाऊ कुलकर्णी, सुषमा देशमुख, विजयराव देशपांडे, राजेंद्र नेवे, रविंद्र वैद्य, सुनिल देशमुख, प्राची घाटे, लता बिराजदार तसेच सर्व नागरीक व महिला उपस्थित होत्या.

शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेचा आदर्श घ्यावा – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. १० : मुंबई विद्यापीठाचा एक विभाग म्हणून स्थापन झालेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे उत्तम शैक्षणिक व संशोधन संस्थेत रुपांतर झाले. अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर दमदार प्रवास या संस्थेने केला आहे. अन्य शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेचा आदर्श घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केले.

माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्था परिसरात १३ व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलपती पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, कुलगुरु अनिरुध्द पंडित, संचालक उदय अन्नपुरे प्राध्यापक प्रदीप वाविया, कुलसचिव राजेंद्र देशमुख, अधिष्ठाते, विविध विभागांचे विभाग प्रमुख, आजी माजी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे आजी – माजी विद्यार्थी, संस्थेत शिकून पुढे विविध कंपन्यांचे प्रमुख झालेले माजी विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, या संस्थेने आतापर्यंत १९ पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्ती, कोणत्याही व्यवसायाची पार्श्वभूमी नसलेले ६०० पेक्षा अधिक उद्योजक देशाला दिले आहेत. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थांमध्ये नॅकमध्ये ४ पैकी ३.७७ असे सर्वोत्तम गुण मिळवून A++ ग्रेड, टाइम्स हायर एज्युकेशन २०२३ क्रमवारीत आशिया युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये २५१ ते ३०० च्या दरम्यान तर केंद्र सरकारच्या एनआयआरएफ क्रमवारीत विद्यापीठांमध्ये २३ वा क्रमांक तसेच एमएचआरडीने जाहीर केलेल्या अटल (ARIIA) क्रमवारीत सहावा क्रमांक मिळविल्याबद्दल मंत्री श्री. पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशाला बलशाली आणि वैभवशाली बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यामध्ये तरुणांचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे. त्यासाठी तरुणांनी नवीन संशोधन, पेटंट आणि नाविन्यता यावर अधिक भर द्यावा, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

संशोधनाच्या क्षेत्रातही  रसायन तंत्रज्ञान संस्था उत्तम कामगिरी करीत आहे. गेल्या १० वर्षांत ४०० पेक्षा अधिक पेटेंट्स घेतलेले आहेत. अनेक संशोधन प्रकल्पांवर काम सुरू आहे. औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन संस्थेने जालना व भुवनेश्वर येथे सेंटर सुरू केले आहे. या दोन्ही ठिकाणी नविन्यपूर्ण प्रयोग करीत आहेत यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्राणिक्लेश समितीवरील अशासकीय सदस्य नियुक्तीबाबत २५ ऑगस्टपर्यंत  प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 10 : जिल्हा प्राणिक्लेश प्रतिबंधक समिती, मुंबई उपनगर व शहर येथे शासन अधिसूचना 14 मार्च 2017 नुसार अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहेत.

प्राणी कल्याणाकरिता कार्यरत नागरिकांनी अशासकीय सदस्य पदाकरिता प्राणी कल्याणाविषयी केलेल्या कामकाजाच्या माहितीसह डॉ. शैलेश पेठे, उपआयुक्त पशुसंवर्धन, तथा, सदस्य सचिव, जिल्हा प्राणिक्लेश प्रतिबंधक सोसायटी, आरे, गोरेगाव, मुंबई-६५ यांच्याकडे दिनांक २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत  अर्ज करावे.

इच्छुकांनी इच्छापत्र, अर्ज, फोटो, आधारकार्ड, पोलिसांकडून प्राप्त चारित्र्य प्रमाणपत्र सादर करावे. तसेच आवश्यकतेनुसार कागदपत्रे सादर करावीत, असे डॉ शैलेश पेठे सदस्य सचिव यांनी कळविले आहे.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या पन्नास टक्के अनुदान व बीज भांडवल योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, ‍‍दि. १० : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई शहर आणि उपनगर कार्यालयामार्फत सन २०२३- २४ या आर्थिक वर्षामध्ये ५० टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना आणि प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कर्ज प्रस्ताव ३१ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या पन्नास टक्के अनुदान व बीज भांडवल  योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी महामंडळाच्या mpbcdc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर संकेतस्थळावर योजनानिहाय उपलब्ध अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रतीसह (तीन प्रती) आपले अर्ज महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालयात स्वतः दाखल करावेत. त्रयस्थ तसेच मध्यस्थामार्फत कर्ज अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी.

इच्छुक अर्जदारांचे कर्ज मागणी अर्ज ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत महामंडळाचे जिल्हा कार्यालय महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., गृहनिर्माण भवन, तळमजला रूम नं ३५, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१ या ठिकाणी स्वीकारले जातील, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.