‘गांधी – लोहिया – आंबेडकर : संयुक्त विचारधारा’ विषयावरील व्याख्यानास प्रतिसाद
पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या वतीने आयोजित ‘गांधी – लोहिया – आंबेडकर : संयुक्त विचारधारा’ या विषयावरील ज्येष्ठ समाजवादी विचारवंत रघु ठाकूर(मध्य प्रदेश) यांच्या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला.
हे व्याख्यान गुरूवार, १० ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता गांधी भवन, कोथरूड येथे झाले. युवक क्रांती दल संस्थापक,आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते.
नीलम पंडित यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले.डॉ. प्रवीण सप्तर्षी, डॉ. उर्मिला सप्तर्षी, विकास देशपांडे,जांबुवंत मनोहर, सचिन पांडुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रघू ठाकूर म्हणाले, ‘गांधी,लोहिया, आंबेडकर यांचे विचार वेगळे नाहीत, एकच आहेत. समतेवर त्यांचे एकमत आहे. त्यांच्या विचारात अंतर असल्याचे सांगण्याचा प्रयत्न होतो. तो प्रयत्न चुकीचा आहे. गांधींजींच्या विरोधात अफवा पसरविण्याने काहीही साध्य होणार नाही. गांधी आणि डॉ.आंबेडकर यांच्याही विचारात अंतर नाही. कोणाच्याही जन्मापेक्षा त्या व्यक्तीने केलेल्या कर्मावर चर्चा झाली पाहिजे ‘.
चरखा, अहिंसा यामुळेच स्वातंत्र्य मिळाले आहे. सर्व भिंती ओलांडून देशाला एकत्र येण्याचे माध्यम मिळाले. मनातील भीती आणि दास्यत्वाची भावना घालवली.
राखीव जागांवरून डॉ.आंबेडकरांना जेवढी अपेक्षा होत्या, त्यापेक्षा अधिक जागा देण्यात गांधी यशस्वी झाले. गांधीजींना मने बदलून परिवर्तन आणू पाहत होते, तर डॉ.आंबेडकर, लोहिया यांना संघर्षातून परिवर्तन हवे होते.लोहिया हे विद्रोही व्यक्तीमत्व होते, असेही ठाकूर म्हणाले.
‘समाजवाद हा शब्द घटनेत वाढवला हे योग्य पाऊल होते. कारण समतेकडे आपला प्रवास करायचा होता. लोकशाही ही जीवनशैली आहे, ती जगून दाखवावी लागते.
गांधी, डॉ.आंबेडकर,लोहिया यांचे विचार कालसुसंगत आहेत. सध्याचे वैचारिक प्रदूषण दूर करण्यासाठी या विचारांची आवश्यकता आहे ‘ असे त्यांनी आवर्जून सांगीतले.