Home Blog Page 1399

गणेशोत्सव चांगल्या व उत्साही वातावरणात साजरा करा, पुणे पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

पुणे : आगामी गणेशोत्सव 2023 च्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली झोन-1 मधील सार्वजनिक गणेश मंडळ व पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित केली होती. टिळक रोड येथील दुर्वांकुर सभागृहात सायंकाळी 6 ते 9 या वेळेत गणेश मंडळांची व त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवा दरम्यान त्यांना येणाऱ्या अडचणी बाबत सूचना मांडल्या.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीमध्ये अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 संदिपसिंह गिल , पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त विशेष शाखा आर.राजा यांनी उपस्थित सर्व गणेश मंडळ आणि त्यांचे पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. मिटिंगच्या शेवटी पुणे शहराचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी उपस्थितांना सूचना वजा मार्गदर्शन केले. येणारा गणेशोत्सव चांगल्या व उत्साही वातावरणात पार पाडण्याचे आवाहन त्यांनी गणेश मंडळांना केले.

या बैठकीला अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल,पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा विजयकुमार मगर, पोलीस उपायुक्त विशेष शाखा आर.
राजा, सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग वसंत कुवर ,सहायक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग अशोक धुमाळ ,सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल तांबे , सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 सतिश गोवेकर, सहायक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा मौला सैय्यद ,विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा , विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे दादासाहेब गायकवाड ,फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक गुन्हे मंगेश जगताप तसेच विशेष शाखा व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक खडक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी केले.

नवी सीडी ११० ड्रीम डिलक्स १० वर्षांचे खास वॉरंटी पॅकेज घेऊन लाँच

नवी दिल्ली, ११ ऑगस्ट २०२३ – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) आज नवी सीडी ११० ड्रीम डिलक्स लाँच केली. होंडाची ही आधुनिक मोटरसायकल सर्वात किफायतशीर किंमतीत उपलब्ध करण्यात आली असून अत्याधुनिक तंत्रज्ञान, आरामदायी वैशिष्ट्यं आणि आकर्षक स्टायलिंगच्या मदतीने ती प्राथमिक टप्प्यावरील मोटरसायकल श्रेणीची समीकरणे बदलण्यासाठी सज्ज आहे.

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. त्सुत्सुमु ओतानी म्हणाले, ‘ओबीडी२ नियमानुसार बनवण्यात आलेली सीडी ११० ड्रीम डिलक्स लाँच करताना आम्हाला आनंद होत असून वाजवी किंमत आणि दमदार कामगिरीमुळे ती भारतीय मोटरसायकल्सच्या बाजारपेठेत क्रांती घडवून आणेल. ही आधुनिक मोटरसायकल आरामदायी, सोयीस्कर आणि टिकाऊ झाली असून त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या पैशांचे पूर्ण मूल्य देण्याची होंडाची बांधिलकी नव्याने अधोरेखित झाली आहे.’

एचएमएसआयच्या या नव्या उत्पादनाविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक योगेश माथुर म्हणाले, ‘सीडी ब्रँडचा वारसा पुढे नेण्यासाठी नवी सीडी ११० डिलक्स लाँच करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. ही मोटरसायकल आरामदायीपणा, सोयीस्करपणा व स्टाइल यांचे सर्वसमावेशक पॅकेज आहे. आम्हाला खात्री आहे, की वाजवी किंमत आणि असामान्य मूल्य तसेच रोजच्या प्रवासासाठी अगदी योग्य असल्यामुळे ग्राहक वर्गाचा तिला भरभरून प्रतिसाद लाभेल.’

आधुनिक तंत्रज्ञान

सीडी ११० ड्रीम डिलक्सच्या केंद्रस्थानी होंडाचे ओबीडी२ नियमानुसार तयार करण्यात आलेले पीजीएम- एफआय इंजिन होंडाच्याच नाविन्यपूर्ण एनहान्स्ड स्मार्ट पॉवरसह (ईएसपी) बसवण्यात आले आहे.

एससीजी स्टार्टरच्या मदतीने आवाजरहित स्टार्ट – ब्रशशिवाय बसवण्यात आलेल्या एसीजी स्टार्टर स्टार्टर गियरमध्ये नेहमीचा खरखरीत आवाज करत नाही आणि इंजिन झटक्याशिवाय सुरू होते, तसेच रायडिंग करताना बॅटरीही चार्ज करते. दोन मेकॅनिकल वैशिष्ट्यांमुळे कमी प्रयत्नांत इंजिन सुरू होते – यातले पहिले म्हणजे डीकंप्रेशनचा कार्यक्षम वापर आणि किंचित उघडलेले एक्झॉस्ट व्हॉल्व्हज (कंप्रेशन स्ट्रोकच्या सुरुवातीला दिलेले) आणि त्यानंतर स्विंग बॅक सुविधा, ज्यामुळे इंजिन जरासे विरूद्ध दिशेला फिरते व त्यामुळे पिस्टनला रनिंग स्टार्ट मिळतो. पर्यायाने कमीत कमी उर्जेच्या वापराने इंजिन सुरू होते.

–   प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्शन (पीजीएम- एफआय): कार्यक्षमता आणि पर्यावरण जागरूकता हे या मोटरसायकलचे मुख्य आधारस्तंभ असून त्यामध्ये प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्शन (पीजीएम- एफआय) इंटेलिजंट सेन्सर्ससह (इंजिन तेलाचे तापमान मोजणारे सेन्सर, इंजिनचा वेग मोजणारे सेन्सर, हवेचा दाब मोजणारे सेन्सर, हवेचे तापमान मोजणारे सेन्सर, थ्रॉटल पोझिशन सेन्सर) बसवण्यात आले असून त्यामुळे रायडिंगच्या परिस्थितीनुसार इंधन वितरण होते. पर्यायाने कंबशन प्रभावी होते, तर उत्सर्जन कमी होते.

·         कमी घर्षणऑफसेट सिलेंडर रॉकर रोलर आर्मचा नीडलसह वापर करत असल्यामुळे घर्षणातून होणारे नुकसान आणखी कमी होते व इंधन कार्यक्षमता वाढते. पिस्टन कूलिंग जेटमुळे तापमान कमी करण्याची क्षमता वाढते घर्षण कमी होते व इंजिनचे तापमान योग्य पातळीवर राखले जाते.

·         सोलेनॉइड व्हॉल्व्ह – ऑटोमॅटिक चोक यंत्रणेप्रमाणे काम करून रिच एयर फ्युएल मिक्श्चरची खात्री करते आणि अगदी कोणत्याही वेळी एकाच प्रयत्नात स्टार्ट होते.

·         सीडी ११० ड्रीम डिलक्समध्ये दर्जेदार ट्यूबलेस टायर्स बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे पंक्चर झाल्यास लगेच हवा जात नाही.

इन- बिल्ट साइड स्टँड इनहिबिटर – यामुळे साइड स्टँडवर असताना इंजिन सुरू होत नाही व प्रवास आरामदायी तसेच काळजीमुक्त होतो.

आरामदायी आणि सोयीस्कर

सीडी ११० ड्रीम डिलक्समध्ये डीसी हेडलॅम्प वापरण्यात आले आहेत, जे एकसलग प्रकाश देतात आणि रात्रीच्या वेळेस ताणमुक्त प्रवास करता येतो.

दुहेरी इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विच इंजिन सुरू करण्यासाठी खालच्या बाजूने, तर बंद करायचे असल्यास वरच्या बाजूस दाबता येतो.

सीडी ११० ड्रीम डिलक्सवरचा प्रत्येक प्रवास आरामदायी आणि सोयीस्कर व्हावा यासाठी त्यात कॉम्बी- ब्रेक सिस्टीम (सीबीएस) इक्विलायझरसह देण्यात आला आहे. यामुळे पुढील आणि मागील टायर्समधे ब्रेकिंग क्षमतेचे विभाजन होते. यामध्ये सील चेन देण्यात आली आहे, ज्यासाठी कमी अडजस्टमेंट व देखभाल लागते. यामुळे रायडिंगचा एकंदर अनुभव उंचावतो.

लांबलचक आणि आरामदायी सीट (७२० एमएम) इंधनाच्या टाकीसह बसवण्यात आल्यामुळे रायडर तसेच पिलियनसाठी दूरचा प्रवास आरामदायी होतो. गाडीत ४एएच (एमएफ बॅटरी) बसवण्यात आली आहे, जी डीसी हेडलॅम्पसाठी पूरक आहे. व्हिसकॉस पेपर फिल्टरमुळे प्रत्येक सर्व्हिसिंगदरम्यान सखोल स्वच्छता करण्याची गरज पडत नाही. १८,००० किमी प्रवास झाल्यानंतर ती बदलता येऊ शकते.

आकर्षक स्टाइल

टँक आणि साइड कव्हरवरील स्टायलिश ग्राफिक्स, आकर्षक व्हायसर आणि फ्रंट फेंडर यामुळे सीडी ११० ड्रीम डिलक्सचे एकंद स्वरूप उठावदार झाले आहे. आकर्षक क्रोम मफलर कव्हर आणि फाइव्ह स्पोक सिल्व्हर अलॉय व्हील्समुळे मोटरसायकलच्या साइड प्रोफाइलच्या स्टायलिशपणात भर पडली आहे.

परिपूर्ण मूल्य

सीडी११० ड्रीम डिलक्स चार आकर्षक रंगांत उपलब्ध आहे – काळा व लाल, काळा व निळा, काळा व हिरवा आणि काळा व राखाडी यांचा त्यात समावेश आहे. गाडीची किंमत रू. ७३,४०० पासून (एक्स शोरूम दिल्ली) सुरू होते. एचएमएसआयतर्फे सीडी११० ड्रीम डिलक्सवर १० वर्षांचे खास वॉरंटी पॅकेज (३ वर्षांची स्टँडर्ड + ७ वर्षांची पर्यायी विस्तारित वॉरंटी) देण्यात आले आहे.

डोळे येण्याच्या संसर्गावर वारंवार हात धुण्याच्या सवयीने प्रतिबंध करावा – आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई, दि. 11 : राज्यातील अनेक भागात ‘डोळे येणे’ या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. डोळे येणे मुख्यत्वे ॲडिनो वायरसमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्याला सुज येणे अशी लक्षणे आढळतात. डोळे आलेल्या व्यक्तींनी स्वत:ला घरामध्ये विलगीकरण करणे गरजेचे आहे. आजाराचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला वेगाने होतो. त्यामुळे हा आजार होवू नये म्हणून वारंवार हात धुणे, वैयक्तिक स्वच्छता ठेवणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे, डोळ्यांना हात न लावून या आजाराला प्रतिबंध करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ज्या भागामध्ये डोळे येण्याची साथ सुरू आहे, त्या भागामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यांना आरोग्य शिक्षणाचे प्रोटोटाईप तयार करून देण्यात आले आहे. ज्या भागामध्ये साथ सुरू झाली आहे. त्या भागातील शाळेतील मुलांची डोळ्याची तपासणी करून उपचार देण्यात येत आहेत. सर्व आरोग्य संस्थांमध्ये आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत. राष्ट्रीय विषाणू संस्था व राज्यातील शीघ्र प्रतिसाद पथकाने आळंदी येथील साथीचे अन्वेषण केले आहे.  राज्यात 9 ऑगस्ट 2023 पर्यंत 3 लक्ष 57 हजार 265 एकूण रुग्ण आढळले आहेत.

जिल्हानिहाय व महानगर पालिका निहाय रुग्णांची आकडेवारी

सर्वात जास्त 44398 रूग्ण बुलढाणा जिल्ह्यात आहेत. त्यानंतर पुणे 28042, जळगांव 22417, नांदेड 18996, चंद्रपूर 15348, अमरावती 14738, परभणी 14614, अकोला 13787, धुळे 13273, वर्धा 11303, नंदुरबार 10294, भंडारा 10054, वाशिम 9458, यवतमाळ 9441, नांदेड मनपा क्षेत्र 8855, मालेगांव जि. नाशिक मनपा 8655, लातूर 7039, औरंगाबाद 6839, पुणे मनपा 6720, गोंदिया 6532, जालना 6506, पिंपरी चिंचवड मनपा 6010, हिंगोली 5780, नाशिक 5575, अहमदनगर 4992, कोल्हापूर 4702, औरंगाबाद मनपा 4643, नागपूर मनपा 4620, सोलापूर 4282, नाशिक मनपा 3183, नागपूर 3063, मुंबई 2862, गडचिरोली 2796, पालघर 1977, उस्मानाबाद 1910, सांगली मनपा 1848, बीड 1666, सांगली 1540, सातारा 1538, धुळे मनपा 1065, रायगड 816, नवी मुंबई मनपा 790, सिंधुदुर्ग 679, लातूर मनपा 555, चंद्रपूर मनपा 429, ठाणे मनपा 414, सोलापूर मनपा 406, पनवेल मनपा 324, अहमदनगर मनपा 223, रत्नागिरी 222, ठाणे 186, परभणी मनपा 166, अकोला मनपा 151, भिवंडी निजामपूर मनपा 133, वसई विरार मनपा 130, मीरा भाईंदर मनपा 108, कोल्हापूर मनपा 74, कल्याण – डोबिंवली मनपा 58 आणि सर्वात कमी उल्हासनगर मनपा 20 रुग्ण आहेत. अशाप्रकारे 3,57,265 रूग्ण राज्यात आढळले आहेत.

पुण्यात पहिल्यांदाच सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये एबीओ- इनकम्पॅटिबल यकृत प्रत्यारोपण यशस्वी

पुणे, 11, ऑगस्ट २३ – शेवटच्या टप्प्यावर असलेला यकृताचा आजार आणि हेप्टोसेल्युलर कार्सिनोमाशी (एचसीसी) लढत असलेल्या रुग्णांसाठी यकृत प्रत्योरोपण प्रक्रिया वरदान ठरली आहे. सामान्यतः यशस्वी प्रत्यारोपणासाठी डोनर आणि रिसीपियंट यांच्यात एबीओ जुळणे (कम्पॅटिबल) आवश्यक असते. मात्र, सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये लिव्हर आणि मल्टी- ऑर्गन ट्रान्सप्लँट विभागाचे प्रमुख डॉ. बिपीन विभूते यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय टीमने एबीओ- जुळत नसतानही रुग्णावर यशस्वीपणे यकृत प्रत्यारोपण करत वैद्यकीय समुदायाचे लक्ष वेधून घेतले आहे.

महाराष्ट्रात सोलापूर येथे राहात असलेल्या ५२ वर्षीय रिक्षा चालकाला एचसीव्ही संसर्ग, सिरोसिस आणि एचसीसी (यकृताच्या कर्करोगाचा एक प्रकार) झाला होता. या आजारांवर मात करण्यासाठी त्यांना तातडीने यकृत प्रत्यारोपणाची गरज होती. मात्र, एबीओ जुळत असलेले डोनर मिळणे कठीण जात होते. त्यावेळी नर्स असलेली त्यांची २५ वर्षांची मुलगी प्रत्यारोपणासाठी धाडसाने पुढे आली. खरं तर तिचा रक्तगटही वडिलांशी जुळत नव्हता. रुग्णाचा रक्तगट ओ प्रकारातील आहे, तर यकृत दिलेल्या मुलीचा रक्तगट ए प्रकारातील आहे.

विस्तृत शस्त्रक्रियापूर्व तयारी आणि मल्टी- डिसीप्लिनरी टीमच्या समन्वयानंतर एबीओ- विसंगत यकृत प्रत्यारोपण यशस्वीपणे करण्यात आले. विसंगत असलेल्या रक्तगटामुळे इम्युनच्या प्रतिक्रियेवर मात करणे हे प्राथमिक आव्हान होते. वैद्यकीय टीमने सर्वसमावेशक प्रत्यारोपणपूर्व इम्युनोसप्रेसिव्ह नियमावली तयार केली. त्यात इंजेक्शन देण्यापासून अँटीबॉडी तयार करणाऱ्या पेशी कमी करण्यापर्यंत व अँटी- ए अँटीबॉडीजना काढून टाकण्यासाठी प्लास्माफेरसिस सेशन्स, प्लास्माफेरेसिस व इम्युनोसप्रेसिव्ह औषधांपर्यंतचा समावेश होता.

शस्त्रक्रियेनंतरच्या देखरेखीत यकृत व्यवस्थित काम करत असल्याचे दिसून आले. प्रत्यारोपणानंतर अवयव झिडकारला जाण्याची शक्यतेस इम्युनोसप्रेसिव्ह औषधांच्या मदतीने प्रतिबंध करण्यात आला. एबीओ- विसंगत यकृत प्रत्यारोपण क्रिया यशस्वी ठरली व रुग्णाचे यकृत चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे शस्त्रक्रियेनंतरच्या देखरेखीत दिसून आले

या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे सह्याद्रि हॉस्पिटलच्या लिव्हर आणि मल्टी- ऑर्गन ट्रान्सप्लँट विभागाचे प्रमुख डॉ. बिपीन विभूते यांनी मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, या विलक्षण शस्त्रक्रियेमुळे डोनर वर्गाची व्याप्ती वाढेल आणि मर्यादित डोनर्समुळे हतबल असलेल्या असंख्य रुग्णांमध्ये नवी आशा निर्माण होईल. एबीओ- विसंगत यकृत प्रत्यारोपणास मिळालेल्या यशामुळे प्रत्यारोपण क्षेत्रात सुरू असलेल्या संशोधनाचे महत्त्व नव्याने अधोरेखित झाले आहे. अशाप्रकारचे नवीन तंत्र आणि इम्युनोसप्रेसिव्ह धोरणांमुळे या क्षेत्रात क्रांती येईल व पर्यायाने जीवरक्षक अवयवांच्या प्रत्यारोपणाची तातडीने गरज असलेल्या रुग्णांना लाभ होईल.

सह्याद्रि हॉस्पिटल नाविन्यपूर्ण तंत्रे आणि इम्युनोसप्रेसिव्ह धोरणांविषयी संशोधन करण्यासाठी बांधील असून त्यामुळे प्रत्यारोपण क्षेत्रात क्रांती येऊ शकते. जीवरक्षक अवयवांच्या प्रत्यारोपणाची तातडीने गरज असलेल्या रुग्णांना त्यामुळे चांगला लाभ होईल. या यशस्वी प्रत्यारोपणामुळे एचसीसी किंवा यकृताचा आजार शेवटच्या टप्प्यावर असलेल्या रुग्णांना नव्या भविष्याचे दरवाजे खुले झाले आहेत. यकृत प्रत्यारोपण प्रक्रिया त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे

ग्राहकाभिमुख वीजसेवा देताना तत्परता सर्वाधिक महत्वाची; ग्राहकसेवा गतिमान करा

महावितरणचे सीएमडी श्री. लोकेश चंद्र यांचे निर्देश

पुणे, दि. ११ ऑगस्ट २०२३: वीजविषयक विविध ग्राहकसेवा देताना कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीत सेवा मिळाली तरच ग्राहकांचे समाधान होते. अशी सेवा देणे ही महावितरणची जबाबदारी व कर्तव्य आहे. त्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये क्षमता असली तरी सकारात्मक तत्परता सर्वाधिक महत्वाची आहे. यापुढे वीजग्राहकांना आणखी गतिमान सेवा देण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सजग राहावे असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी दिले.

पुणे येथील ‘प्रकाशभवन’मध्ये शुक्रवारी (दि. ११) आयोजित पुणे व कोकण प्रादेशिक विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे, कोकण सहव्यवस्थापकीय संचालक श्री. चंद्रकांत डांगे, पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे, मुख्य अभियंता सर्वश्री मनीष वाठ (चाचणी), राजेंद्र पवार (पुणे), सुनील पावडे (बारामती), परेश भागवत (कोल्हापूर), दीपक कुमठेकर (नाशिक), कैलास हुमणे (जळगाव), संजय पाटील (देयके व महसूल), वादिराज जहागिरदार (स्थापत्य) यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र म्हणाले की, नवीन वीजजोडणीसह वीजग्राहकांच्या विविध सेवा गतिमान करण्याच्या उद्दिष्टानुसार गेल्या दोन महिन्यांपासून मुख्यालयातून स्वतंत्रपणे पर्यवेक्षण करण्यात येत आहे. सातत्याने आढावा घेण्यात येत आहे. ग्राहकांनी केलेली कोणतीही तक्रार असो, ती गांभीर्याने स्वीकारली पाहिजे व त्याचे विनाविलंब निराकरण केले पाहिजे. यात हयगय झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई केली जाईल. यासोबतच वीजबिलांच्या वसूलीसाठी विशेष लक्ष द्यावे. येत्या तीन महिन्यांमध्ये वीजबिलांची थकबाकी वसूल करण्याची कार्यवाही करावी अशी सूचना अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी केली.

यावेळी संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे म्हणाले की, ग्राहक सेवा व तक्रारींना प्रतिसाद मिळत नसल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येत आहे. नवीन वीजजोडणी, ग्राहक तक्रारींचे निवारण व सुरळीत वीजपुरवठा याकडे प्रत्येक कार्यालयाने सर्वोच्च प्राथमिकता द्यावी. कोणत्याही परिस्थितीत वीजग्राहकांना नाहक त्रास व मनस्ताप होणार नाही याची काळजी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी असे निर्देश संचालक श्री. ताकसांडे यांनी दिले.

या बैठकीमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०, विविध योजना, नवीन वीजजोडणी, ग्राहक तक्रारींचे निवारण, बिलिंग, डिजिटल पेमेंट, वीजबिल वसूली आदींबाबत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी आढावा घेतला. बैठकीला विशेष कार्य अधिकारी श्री. मंगेश कोहाट, अधीक्षक अभियंता श्री. मनोज धाबर्डे (मुख्यालय) यांच्यासह पुणे, कोल्हापूर, बारामती, जळगाव व नाशिक परिमंडलातील वरिष्ठ अभियंते उपस्थित होते.

पुण्यातील शिवसेना भवनात प्रवेशाचा वाढता ओघ

पुणे- शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश करण्यासाठी जोर वाढला असून सारसबाग येथील शिवसेना भवन येथे काल हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या शेकडो तरुणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. माजी नगरसेवक श्रीकांत पुजारी यावेळेस उपस्थित होते .

यावेळी शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाला पुढे घेऊन जाण्यासाठी व पक्ष संघटन बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहू असेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या अध्यक्षपदी असलेल्या अभिजीत बोराटे यांना शिवसेना शहराच्या प्रवक्तापदी जबाबदारी देण्यात आली. तसेच विविध पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका सुद्धा करण्यात आल्या. शहरात शिवसेनेचे पक्ष संघटन मोठ्या प्रमाणावर बळकट होत असून येत्या काही काळात शिवसेनेत विविध पक्षाचे मोठे पदाधिकारी सुद्धा प्रवेश करणार असल्याचे सुतोवाच शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केले.

यावेळी उपस्थित जिल्हा प्रमुख उल्हास भाऊ तुपे, महिला शहर प्रमुख लीना ताई पानसरे, शहर संघटक श्रीकांत पुजारी, वैद्यकीय शहर प्रमुख अजय सपकाळ, उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर, राजाभाऊ भिलारे, श्रद्धा शिंदे ,सामाजिक कार्यकर्ता अमर घुले, विभाग प्रमुख हडपसर अक्षय तारू, व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. काहीच दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेच्या काही माजी नगरसेवकांनी ही शिवसेना पक्षात प्रवेश केला हे विशेष.

गुंठेवारीसाठी मुदत वाढवून द्या : नाना भानगिरे

पुणे- महापालिकेच्यावतीने १० जानेवारी 2022 पासून गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करून घ्यायला सुरुवात झाली. ज्या नागरिकांनी शहरातील खाजगी जमिनीवरच्या अनधिकृत रेखांकनात दिनांक 31 डिसेंबर 2020 पुर्वी अनधिकृत बांधकाम करुन घरे/इमारती बांधल्या आहेत, त्यांनी गुंठेवारी विकास नियमित करणे करीता अधिनियमा अन्वये महानगरपालिकेकडे अर्ज सादर करणे आवश्यक होते . त्यानुसार १० जानेवारी २०२२ पासून सर्व गुंठेवारी धारकांनी त्यांच्या गुंठेवारीविकासाच्या नियमितीकरणाची प्रकरणे दाखल करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले होते. त्याची मुदत 31 जुलै ला संपली आहे. ही मुदत चार वेळा वाढवून देण्यात आली आहे. मात्र नागरिकांना लाभ होण्यासाठी याची मुदत अजून वाढवून देण्याची मागणी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी महापालिका आयुक्त तसेच राज्य सरकारकडे केली आहे.
नागरीकानी दिनांक ३१ डिसेंबर २०२० पूर्वी विभागणी करण्यात आलेले भूखंड व त्यावर केलेल्या अनाधिकृत बांधकामासाठी लायसेन्स आर्किटेक्ट अथवा ला.इंजिनिअर्स यांचे मार्फत संगणक प्रणालीमध्ये प्रस्ताव दाखल करणे बंधनकारक आहे. असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार 10 जानेवारी 2022 पासून याची सुरुवात झाली होती. मात्र यासाठी नागरिकांचा म्हणावा तेवढा प्रतिसाद दिसून येत नव्हता. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून यासाठी आतापर्यंत चार वेळा मुदतवाढ देण्यात आली. शेवटची मुदत 31 जुलै ला संपली आहे. मात्र अजूनही काही नागरिकांना याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे याची मुदत वाढवून देण्याची मागणी शहर शिवसेना प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी महापालिका आयुक्त तसेच राज्य सरकारकडे केली आहे

पीएमपीच्या डिझेलवरील बसेस सीएनजीवर रुपांतरीत कराव्यात- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, दि. ११: प्रदुषणावर मात करण्यासाठी हरित ऊर्जेचा वापरावर भर देणे आवश्यक असून त्यादृष्टीने पीएमपीएमएलच्या डिझेलवरील सर्व बसेस सीएनजी इंधनावर रूपांतरित कराव्यात, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

पुणे महानगरपालिका येथे पीएमपीएमएल, पाणीपुरवठा, जायका प्रकल्प, पुणे शहरातील रस्तेदुरुस्ती, कात्रज- कोंढवा रस्ता तसेच वाघोली येथील समस्यांच्या अनुषंगाने आढावा बैठकांचे पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी पीएमपीएमएलचे मनुष्यबळ, निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी व इतर आर्थिक बाबींचा आढावा घेतला. पीएमपीएमएलच्या मालकीच्या डिझेल इंधनावरील कार्यरत १२३ बसेस तसेच बंद स्थितीतील ५० बसेस अशा सर्व बसेस येत्या दोन महिन्यात टप्प्याटप्प्याने सीएनजीवर रुपांतरीत करण्यात याव्यात, जेणेकरुन पीएमपीएमएल ही संपूर्ण बसेस सीएनजी व ई-बसेसच्या रुपात हरित उर्जेवर आधारित सेवा होईल. चालू बसेस बंद पडण्याचे प्रमाण शून्यावर येण्यासाठी प्रयत्न करा, असेही ते म्हणाले.

यावेळी पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचींद्र प्रताप सिंह यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीस आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह पीएमपीएमएलचे अधिकारी उपस्थित होते.

२४ x ७ समान पाणीपुरवठा योजनेचा आढावा

यावेळी २४ x ७ समान पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेताना टाक्यांची कामे, दाब जलवाहिन्या, वितरण नलिकांच्या कामांची सद्यस्थितीची माहिती पालकमंत्री श्री. पाटील यांनी घेतली. सर्व कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सादरीकरण केले. या प्रकल्पांतर्गत ८२ साठवण टाक्यांची कामे प्रस्तावित होती. त्यातील ४४ टाक्या पूर्ण झाल्या असून २० टाक्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. ५ टाक्या लगतच्या झोनमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ५ टाक्यांचे नव्याने कार्यादेश देण्यात आले असून तेवढ्याच टाक्यांची नव्याने निविदा प्रक्रिया करण्यात येत आहे. १०७ कि.मी. च्या मुख्य दाब नलिकांपैकी ७४ कि.मी.चे काम पूर्ण करण्यात आले असून वितरण १२०० कि.मी.च्या वितरण नलिकांपैकी ८३६ कि.मी. चे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित कामही गतीने सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत २ लाख ८२ हजार एएमआर मीटर बसविण्यात येणार असून आतापर्यंत १ लाख २७ हजार मीटर बसविण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी जायका प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. या प्रकल्पाची पूर्णत्वाची मुदत २०२५ अखेरची असून प्रक्रिया होणारे पाणी बांधकाम, उद्योग, उद्याने, शेती जलसिंचन आदींना देण्याच्यादृष्टीने मागणी- पुरवठ्याबाबत अहवाल तयार करावा, असे ते म्हणाले.

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम संबंधित कंत्राटदारांकडूनच करुन घेतले जात असल्याचे महानगरपालिकेच्या अधिकऱ्यांनी यावेळी सांगितले.

कात्रज- कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी महानगरपालिका तसेच शहर पोलीस वाहतूक शाखेने एकत्रित उपाययोजना करुन अंमलबजावणी करावी. नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागू नये यासाठी प्रयत्न करा, असेही पालकमंत्री श्री.पाटील यावेळी म्हणाले.

वाघोली येथील विकासकामांचा आढावा

वाघोली येथे पुणे-अहमदनगर रस्त्यास बाह्यवळण करुन जुळणारा रस्ता करण्याबाबत मागणीच्या अनुषंगाने या रस्त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद पुणे महानगरपालिकेने करावी, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. वाघोलीसह पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासाबाबत एकात्मिक तसेच टप्पेनिहाय आराखडे तयार करावेत. त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवून कामे हाती घ्यावीत, असेही ते म्हणाले.

रस्त्यावर अनियंत्रितरित्या उभ्या राहणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसेससाठी जागा निश्चित करुन त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. वाघोलीसाठीच्या नवीन वीज उपकेंद्रासाठी जागा उपलब्धतेबाबत गतीने कार्यवाही करावी आदी निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

बैठकीस पीएमआरडीएचे आयुक्त राहूल महिवाल, शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, पुणे मनपा तसेच पीएमआरडीएचे अधिकारी तसेच वाघोलीचे नागरिक प्रतिनिधी उपस्थित होते.
0000

17 ऑगस्ट रोजी पत्रकारांची राज्यभर निदर्शने :कुचकामी ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायदयाची होळी करणार

*मुंबई : पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या अर्वाच्च शिव्या आणि नंतर त्यांच्यावर झालेल्या हल्लयाचा निषेध करण्यासाठी येत्या 17 ऑगस्ट 23 रोजी मुंबईसह राज्यभर निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायदयाची होळी करण्याचा निर्णय आज मुंबईत झालेल्या 11 पत्रकार संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला..या दिवशी मुंबईत दुपारी 12 वाजता हुतात्मा चौकात हे आंदोलन होईल.. बैठकीच्या आरंभी एस.एम.देशमुख यांनी पाचोरयातील घटनेची सविस्तर माहिती देऊन सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन आमदाराच्या दादागिरीच्या विरोधात आवाज उठविला पाहिजे असा आग्रह धरला.. तेव्हा सर्व उपस्थित संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यास संमती दर्शवत 17 ऑगस्ट रोजी राज्यभर निदर्शने करून पत्रकारांचे संरक्षण करण्यास निष्प्रभ ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला.. यावेळी उपस्थित सर्वच संघटनांच्या प्रतिनिधींनी किशोर पाटील यांच्या अरेरावीचा निषेध करीत किशोर पाटील यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली..सुसंस्कृत महाराष्ट्रात कायदे मंडळाचा एक सदस्यच कायदा हातात घेऊन आपल्या असंस्कृतपणाचे दर्शन घडवतो, आणि वरती “होय मीच शिव्या दिल्या, काय करायचं ते करा अशी” अशी मस्तवाल भाषा वापरतो हे चिंताजनक, संतापजनक आणि किळसवाणे असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री, गृहमंत्री आदिंना संयुक्त निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.. महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत.. राज्यात गेल्या वर्षभरात 46 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.. पोलीस पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ करीत असल्याने हा कायदा सर्वार्थाने कुचकामी ठरला असल्याने पत्रकार संरक्षण कायदयाची होळी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.. राज्यातील पत्रकार संघटनांनी, पत्रकारांनी एकत्र येत 17 ऑगस्ट रोजी आपल्या तालुक्याच्या तहसिल आणि आणि जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस समोर निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायदयाची होळी करावी असे आवाहन सर्व पत्रकार संघटनांच्यावतीने करण्यात आले आहे.. बैठकीस अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, टीव्ही जर्नलिस्ट असोशिएशन, मुंबई मराठी पत्रकार संघ, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, बीयूजे, क्राईम रिपोर्टर असोशिएशन, पोलिटिकल फोटो जर्नलिस्ट असोशिएशन, म्हाडा पत्रकार संघ, महापालिका पत्रकार संघ आदि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.. बैठकीनंतर या संघटनांनी राज्यपाल श्री. रमेश बैस यांची भेट घेऊन राज्यातील पत्रकारांवरील वाढत्या हलिलयाबद्ल त्यांच्याकडे चिंता व्यक्त केली..

11 पत्रकार संघटनांनी घेतली राज्यपालांची भेट; किशोर पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई : पाचोरा येथील सत्ताधारी पक्षाचे आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायदयाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आज मुंबईतील अकरा पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल श्री. रमेश बैस यांची भेट घेऊन केली . या विषयात लक्ष घालण्याचे आश्वासन राज्यपालांनी शिष्टमंडळास दिले..शिष्टमंडळात मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने एस.एम.देशमुख, शरद पाबळे, दीपक कैतके, राजा आदाटे, दीपक पवार आदि होते. पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांना अर्वाच्च शब्दात शिविगाळ करून दुसरया दिवशी गुंडाकरवी मारहाण केली याची संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रभर उमटली. ठिकठिकाणी त्यांचा निषेध झाला.. आज मुंबईतील प्रमुख अकरा पत्रकार संघटनांची बैठक मुंबई मराठी पत्रकार संघात झाली. त्यानंतर सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल श्री. रमेश बैस यांची भेट घेऊन किशोर पाटील यांच्यावर कारवाई करून संदीप महाजन यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली.. यावर या विषयात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन राज्यपाल महोदयांनी दिले.यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, टीव्ही जर्नलिस्ट असोशिएशन, मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई प्रेस क्लब, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, बीयूजे, क्राईम रिपोर्टर असोशिएशन, पोलिटिकल फोटो जर्नलिस्ट असोशिएशन, म्हाडा पत्रकार संघ, मुंबई महापालिका पत्रकार संघ आदि संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते…

नेमके प्रकरण काय?

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे 8 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हे प्रकरण राज्यभर गाजत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट जाब विचारणाऱ्या यूट्यूब पत्रकार संदीप महाजन यांना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी शिवीगाळ केल्याची कथित ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. याच संदर्भात संदीप महाजन यांनी बातमी दिली होती. त्याचा राग धरून किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना चार दिवसांपूर्वी फोन करून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली होती. ही क्लिप व्हायरल झाल्यावर आमदारांनी साळसुदपणे शिविगाळीचे समर्थन देखील केले होते. मात्र तेव्हा संदीप महाजन यांनी समन्वयाची, सामंजस्याची भूमिका घेतली होती.

त्यानंतर संदीप महाजन गुरुवारी रेल्वे आंदोलनाची बातमी कव्हर करून घरी परतत असताना चार पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. पाचोरा नगरपालिकेसमोर ज्या चौकात हल्ला झाला तो चौक महाजन यांचे स्वातंत्र्यसैनिक वडिलांच्या नावाने ओळखला जातो. येथेच त्यांना लाथा बुक्कयांनी बेदम मारहाण करण्यात आली. महाजन त्यात गंभीर जखमी झाले आहेत. संदीप महाजन यांनी पोलिसात तक्रार दिली असून किशोर पाटलांनीच आपल्यावर गुंडाकरवी हल्ला केल्याची तक्रार केली आहे.

पाचोऱ्यातील नेमके प्रकरण काय?

बलात्कार व हत्येचे प्रकरण उजेडात आल्यानंतर आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमीत पाटील यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पीडित मुलीच्या आई-वडिलांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क करून दिला. त्यात पीडित कुटुंबीयांनी हा खटला फास्टट्रॅकवर चालवण्याची मागणी केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगत पोलिसांशी बोलतो असे म्हणत त्यांची बोळवण केली. हा प्रकार निदर्शनास येताच यूट्यूब पत्रकार संदीप महाजन यांनी मुख्यमंत्र्यांची ‘चमकोगिरी’ अशा आशयाची बातमी दिली.

भाजपातर्फे १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका दिवस’ पाळला जाणार

नागरिकांच्या सहभागाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे आवाहन

पुणे (प्रतिनिधी) देशासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या लाखो भारतीयांच्या संघर्ष व बलिदानाचे स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका (फाळणीच्या वेदना) स्मृती दिवस’ पाळण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने सोडला आहे. देशाचे विभाजन झाल्यामुळे झालेल्या वेदनांचे स्मरण ठेवण्यासाठी तसेच फाळणीच्या वेळी ज्यांनी प्राण गमावले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यानी केले.

उपाध्ये म्हणाले की, दीडशे वर्षांच्या ब्रिटीश गुलामगिरीतून मुक्त होऊन प्राप्त झालेल्या स्वातंत्र्याचा यंदाचा अमृत महोत्सव हा प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने अभिमानाचा सोहळा आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये देश आत्मनिर्भरतेच्या दिशेने विकासपथावर वाटचाल करत असताना स्वातंत्र्याकरिता बलिदान दिलेल्यांचे स्मरण ठेवलेच पाहिजे, या उद्देशाने २४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका (फाळणीच्या वेदना) स्मृती दिवस’ पाळण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे.

भारताची फाळणी ही धार्मिक आधारावर झालेल्या विश्वासघाताची कहाणी आहे, अशी भारतीय जनता पाटीची धारणा असल्याचे श्री. उपाध्ये म्हणाले. स्वातंत्र्यापूर्वी २० फेब्रुवारी १९४७ या दिवशी ब्रिटीश पंतप्रधान क्लेमंट एटली यानी स्वातंत्र्याचा निर्णय जाहीर केला. ३० जून १९४८ पूर्वी सत्तेचे हस्तांतरण करून देश सोडण्याचे ब्रिटीशांनी जाहीर केले होते. मात्र, त्याआधी ब्रिटिशांनी देशाची फाळणी केली. भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण करून अखंड भारताच्या नकाशाला छेद दिला. ही कृती कधीच विसरता येणार नाही, असे उपाध्ये म्हणाले.

प्रत्यक्षात स्थलांतराच्या काळात प्रचंड हिंसाचार होऊन जवळपास सव्वा कोटी नागरिकांना सर्वस्व गमावून अक्षरशः रस्त्यावर यावे लागले. सुमारे ६० लाख बिगर मुस्लिमांनी पश्चिम पाकिस्तानातील आपली घरेदारे सोडून भारतात पळ काढला, तर २० लाख बिगर मुस्लिमांनी पूर्व पाकिस्तानातून (आताचा बांगलादेश) घरेदारे सोडून भारतात स्थलांतर केले. या प्रक्रियेत पाच लाखांहून अधिक नागरिकांची हत्या झाली, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात हा आकडा दहा लाखांहून अधिक असावा, असेही ते म्हणाले.

अधिवेशन काळात सत्ताधारी व विरोधीपक्षात सांगड घालण्याचा प्रयत्न केला – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पावसाळी अधिवेशनातील विधान परिषदेतील कामकाजाचा अहवालाचे प्रकाशन.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार संपन्न.

पुणे दि.११: पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये काही विकासासाठी पूरक विधेयकही मंजूर झाली. पूर्ण काळ चाललेल्या अधिवेशनात राजकीय मुद्यांवर काही चर्चा झाली. या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यामध्ये विसंवाद होवू नये म्हणून उपसभापती या नात्याने दोन्ही बाजूशी संवादाच्या माध्यमातून सांगड घालत सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे पार पाडल्याची भावना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ दरम्यान मुंबई येथे संपन्न झाले. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात झालेल्या कामकाजाच्या अहवालाचे प्रकाशन आज, शुक्रवार (दि.११) पुणे येथे युवासेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव किरण साळी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला. यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी डॉ. गोऱ्हे यांनी संवाद साधला.

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महाराष्ट्र विधानपरिषदेला २०२१ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली आहेत मात्र कोरोनामुळे त्याबाबतचा कार्यक्रम घेता आला नाही. त्यामुळे अधिवेशनात यासंदर्भातील बैठक घेण्यात आली. त्यामध्ये परिषदेबाबत माहिती देणारे ‘कॉफी टेबल बुक’ करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती मा. श्रीमती.द्रौपदी मुर्मु यांना बोलावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात विविध प्रश्नांवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सकारत्मक चर्चा झाली. यासोबतच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत, राज्यातील देवस्थानांच्या विकासासंदर्भात, महिलांच्या प्रश्नांबाबत बैठक घेण्यात येऊन त्यासंदर्भातील योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

यासोबतच MPSC च्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आयोगाच्या सचिव आणि इतर सदस्यांना बोलावून आमदारांच्या उपस्थितीत विधानभवनात बैठक घेण्यात आली. यामध्ये कोर्टात प्रलंबित असणाऱ्या विषयांची माहिती देण्याचे निर्देश दिले असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच राज्यातील मंदिरांच्या ट्रस्ट वरती महिला सदस्यांना अधिक प्रतिनिधित्व देण्याबाबतची सूचना मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांना केली असून त्याबाबत त्यांनी सकारत्मक प्रतिसाद दिला असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच पुणे जिल्ह्यातील जेजुरी देवस्थानच्या संदर्भात लवकरच पुणे विभागीय आयुक्तांशी बोलणार असल्याचे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

पुणे शहरातील वाहतुकीसंदर्भातील प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली. सध्या प्रत्येक महापालिकेवर प्रशासक आहेत त्यामुळे लोकप्रतिनिधीचे मत विचारात घेतले जात नाही. याबाबत सगळ्या लोकप्रतिनिधींनी मिळून निवडणूक आयोगाकडे जाऊन निवडणूक घेण्यास सांगण्याबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे एकमत झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रम प्रसंगी, पुणे शहर संघटक लीना पानसरे, पूजा रावेतकर, सुनीता मोरे, श्रुती नाझीरकर, बाळासाहेब चांदेरे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. पांडुरंग सांडभोर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. उपसभापती महोदयांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री. किरण काकडे यांनी केले.

मुख्यमंत्र्यांच्या एका खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्री डोळा ठेवून….

एक वर्षानंतरही राज्यातील १७ जिल्ह्यांना पालकमंत्रीच नाही.

मुंबई, दि. ११ ऑगस्ट.
राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकार हे गम्मत जम्मतचे सरकार आहे. या सरकारमध्ये एक मंत्री सहा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, ३६ जिल्ह्याला १९ पालकमंत्री नियुक्त केले असून १७ जिल्ह्याला अजून पालकमंत्रीच नाहीत. १५ ऑगस्टला ध्वजारोहण कोण करणार यावरून सरकार संभ्रमात आहे. पालकमंत्री नसताना जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाईल असे सरकारने जाहीर केले होते पण त्यात पुन्हा सुधारणा करावी लागली. मुख्यमंत्र्यांच्या एका खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्री डोळा ठेवून आहेत. सरकारमध्ये सावळा गोंधळ सुरु आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, तीन पक्षांच्या या सरकारला जनतेच्या समस्यांचे काहीही पडलेले नाही. राज्यातील प्रशासन कोलमडले आहे, तहसिलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ अटक केले जात आहे, हे चांगले लक्षण नाही. प्रशासनावर सरकारचा वचक नसल्याने भ्रष्टाचार बोकाळला आहे. राज्यात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे, आधी अतिवृष्टी झाली तर आता पाऊसच गायब झाला आहे. खरीपाची पिकं धोक्यात आली आहेत. जनता बेहाल असताना त्यांच्यासाठी काही करण्याऐवजी सरकारी तिजोरी कोण जास्त लुटतो याची तीन पक्षात स्पर्धा सुरु आहे.
मख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात एकाच दिवसात ५ रूग्णांचे मृत्यू होतात हे दुर्दैवी आहे. राज्याचे आरोग्य बजेट एक टक्का आहे ते वाढवून १५ टक्के केले पाहिजे. राज्यातील आरोग्य सेवाच आजारी पडली आहे, रुग्णालयात डॉक्टर, नर्सेस, औषधे नाहीत ही अवस्था आहे. दुसरीकडे फक्त जाहिराती सुरु आहेत. लोकांना साध्या वैद्यकीय सुविधाही मिळत नाहीत, केवळ मुठभर लोकांचे हे सरकार आहे. राज्यात ७५ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत आणि सरकार शिक्षक भरतीच्या फक्त घोषणा करत आहे. शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे, शाळा ओस पडल्या आहेत. राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणही मिळत नाही. भाजपाच्या या कारभाराला जनता कंटाळली असून आता जनताच त्यांना सत्तेतून बाहेर फेकून देईल, असेही नाना पटोले म्हणाले.

पुण्यातील ध्वजारोहणाला दोन्हीपैकी एकही दादा नाही: संभ्रम दूर करण्यास सरसावले भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर

चंद्रकांतदादा रायगडमध्ये, तर अजितदादा कोल्हापूर मध्ये करणार ध्वजारोहण

पुणे :  स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील जिल्ह्यांच्या मुख्यालयात ध्वजारोहण करणाऱ्यांची यादी गुरुवारी (दि.10) प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील ध्वजारोहण करणार आहेत. मात्र, पुण्यात राज्याचे राज्यपाल हे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करत असतात. यावर स्पष्टीकरण देताना भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले, पुण्यातील ध्वजारोहणावरुन विविध प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. काही संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जात आहे. पुण्यात राज्याचे राज्यपाल रमेश बैस ध्वजारोहण करणार असल्याचे खर्डेकर यांनी सांगितलं.

भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर

स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण जिल्हा मुख्यालयात कोण करणार, याची यादी जाहीर करण्यात आली होती. पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव जाहीर झाले होते. परंतु शासनाने यादीत एक बदल केला असून नवीन यादी जाहीर केली आहे. पुण्यात राज्यपाल रमेश बैस ध्वजारोहण करणार असून चंद्रकांत पाटील रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत.

संदीप खर्डेकर म्हणाले, पुण्यातील ध्वजारोहणावरुन संभ्रमाचं वातावरण तयार केलं जात आहे. पुणे शहराच्या परंपरेनुसार याठिकाणी असा संकेत आहे की स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाला राज्याचे राज्यपाल येत असतात. त्यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण करण्यात येते. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे राज्यातील वरिष्ठ मंत्री आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा निर्णय घेतला की वरिष्ठ मंत्र्यांनी देखील एखाद्या जिल्ह्यात ध्वजारोहणासाठी गेलं पाहिजे. त्यानुसार चंद्रकांत पाटील यांना रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे ध्वजारोहण करण्यास सांगितले आहे.त्यानुसार चंद्रकांत पाटील हे अलिबाग येथे ध्वजारोहण करणार आहेत. तर पुण्यात राज्यपाल ध्वजारोहण करणार आहेत.यानंतर पुण्याचे पालकमंत्री या नात्याने ते संध्याकाळी राज्यपालांच्या चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पुण्यातील ध्वजारोहणावरुन सुरु असलेल्या चर्चा अनाठायी असून हा प्रशासकीय भाग असल्याचे संदीप खर्डेकर यांनी सांगितले.

कांद्याच्या विक्रीला केंद्र सरकारकडून सुरुवात

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2023

या वर्षी साठा केलेल्या 3.00 लाख मेट्रिक टन कांद्याच्या बफरसाठ्यातील  कांद्याच्या विक्रीला सुरुवात करण्याचा निर्णय केंद्रीय  ग्राहक व्यवहार विभागाने घेतला आहे. या विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी 10.08.2023 रोजी नाफेड (NAFED) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघाच्या (NCCF)  व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक घेतली आणि या कांद्याची विक्री करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित केली. ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कांद्याच्या किरकोळ किमती या देशपातळीवरील किमतींच्या सरासरीपेक्षा जास्त आहेत अशी राज्ये किंवा केंद्र शासित प्रदेशांमधील प्रमुख बाजारपेठांना लक्ष्य करून कांद्याचा साठा विक्रीला काढण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच ज्या ठिकाणी मागील महिन्याच्या आणि वर्षाच्या तुलनेत किमतीत वाढ होण्याचे प्रमाण  खूपच अधिक  आहे त्या ठिकाणी ई-ऑक्शन च्या माध्यमातून कांद्याची विक्री करणे तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून कांद्याची किरकोळ विक्री करण्याचे ठरवण्यात आले. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दर आणि उपलब्धतेच्या परिस्थितीनुसार त्याचे प्रमाण आणि विक्री करण्याची गती देखील ठरवली जाईल. बाजारांमधल्या विक्री व्यतिरिक्त, राज्यांना त्यांच्या ग्राहक सहकारी संस्था आणि महामंडळांच्या विक्री केंद्रांमधून कांद्याची विक्री करता यावी यासाठी सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

चालू वर्षात, बफर साठ्यासाठी एकूण 3.00 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला आहे, परिस्थितीनुसार गरज भासल्यास  हा साठा आणखी वाढवता येईल . दोन केंद्रीय नोडल एजन्सी, म्हणून नाफेड (NAFED) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ (NCCF) यांनी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून जून आणि जुलै महिन्यामध्ये प्रत्येकी 1.50 लाख मेट्रिक टन रब्बी कांदा खरेदी केला होता. साठवणुकीदरम्यान कांदा अधिक टिकवा यासाठी यावर्षी भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) च्या सहकार्याने प्रायोगिक तत्त्वावर कांद्याचे विकिरण हाती घेण्यात आले होते. या माध्यमातून सुमारे 1,000 मेट्रिक टन कांद्यावर  विकिरण प्रक्रिया करण्यात आली आणि हा कांदा नियंत्रित तापमानात गोदामात साठवण्यात आला आहे .

कांद्याच्या दरामधील अस्थिरता रोखण्यासाठी केंद्र सरकार किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत कांद्याचा बफर साठा ठेवत असते. दरवर्षी रब्बी कांदे खरेदी करून बफर साठा निर्माण केला जातो आणि तो कांद्याची मागणी वाढण्याच्या काळात मुख्य ग्राहक केंद्रांमध्ये पाठवला जातो. गेल्या चार वर्षांत कांद्याच्या बफर साठ्याच्या क्षमतेत तिपटीने वाढ झाली असून वर्ष 2020-21 मध्ये 1.00 लाख मेट्रिक टन एवढा साठा असलेला कांदा वर्ष 2023-24 मध्ये 3.00 लाख मेट्रिक टन एवढा झालेला आहे. कांद्याच्या या बफर साठ्याने  ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत कांद्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आणि कांद्याच्या दरात स्थिरता आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.