महावितरणचे सीएमडी श्री. लोकेश चंद्र यांचे निर्देश
पुणे, दि. ११ ऑगस्ट २०२३: वीजविषयक विविध ग्राहकसेवा देताना कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीत सेवा मिळाली तरच ग्राहकांचे समाधान होते. अशी सेवा देणे ही महावितरणची जबाबदारी व कर्तव्य आहे. त्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये क्षमता असली तरी सकारात्मक तत्परता सर्वाधिक महत्वाची आहे. यापुढे वीजग्राहकांना आणखी गतिमान सेवा देण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सजग राहावे असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी दिले.
पुणे येथील ‘प्रकाशभवन’मध्ये शुक्रवारी (दि. ११) आयोजित पुणे व कोकण प्रादेशिक विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे, कोकण सहव्यवस्थापकीय संचालक श्री. चंद्रकांत डांगे, पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे, मुख्य अभियंता सर्वश्री मनीष वाठ (चाचणी), राजेंद्र पवार (पुणे), सुनील पावडे (बारामती), परेश भागवत (कोल्हापूर), दीपक कुमठेकर (नाशिक), कैलास हुमणे (जळगाव), संजय पाटील (देयके व महसूल), वादिराज जहागिरदार (स्थापत्य) यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र म्हणाले की, नवीन वीजजोडणीसह वीजग्राहकांच्या विविध सेवा गतिमान करण्याच्या उद्दिष्टानुसार गेल्या दोन महिन्यांपासून मुख्यालयातून स्वतंत्रपणे पर्यवेक्षण करण्यात येत आहे. सातत्याने आढावा घेण्यात येत आहे. ग्राहकांनी केलेली कोणतीही तक्रार असो, ती गांभीर्याने स्वीकारली पाहिजे व त्याचे विनाविलंब निराकरण केले पाहिजे. यात हयगय झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई केली जाईल. यासोबतच वीजबिलांच्या वसूलीसाठी विशेष लक्ष द्यावे. येत्या तीन महिन्यांमध्ये वीजबिलांची थकबाकी वसूल करण्याची कार्यवाही करावी अशी सूचना अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी केली.
यावेळी संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे म्हणाले की, ग्राहक सेवा व तक्रारींना प्रतिसाद मिळत नसल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येत आहे. नवीन वीजजोडणी, ग्राहक तक्रारींचे निवारण व सुरळीत वीजपुरवठा याकडे प्रत्येक कार्यालयाने सर्वोच्च प्राथमिकता द्यावी. कोणत्याही परिस्थितीत वीजग्राहकांना नाहक त्रास व मनस्ताप होणार नाही याची काळजी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी असे निर्देश संचालक श्री. ताकसांडे यांनी दिले.
या बैठकीमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०, विविध योजना, नवीन वीजजोडणी, ग्राहक तक्रारींचे निवारण, बिलिंग, डिजिटल पेमेंट, वीजबिल वसूली आदींबाबत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी आढावा घेतला. बैठकीला विशेष कार्य अधिकारी श्री. मंगेश कोहाट, अधीक्षक अभियंता श्री. मनोज धाबर्डे (मुख्यालय) यांच्यासह पुणे, कोल्हापूर, बारामती, जळगाव व नाशिक परिमंडलातील वरिष्ठ अभियंते उपस्थित होते.