चंद्रकांतदादा रायगडमध्ये, तर अजितदादा कोल्हापूर मध्ये करणार ध्वजारोहण
पुणे : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील जिल्ह्यांच्या मुख्यालयात ध्वजारोहण करणाऱ्यांची यादी गुरुवारी (दि.10) प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील ध्वजारोहण करणार आहेत. मात्र, पुण्यात राज्याचे राज्यपाल हे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करत असतात. यावर स्पष्टीकरण देताना भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले, पुण्यातील ध्वजारोहणावरुन विविध प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. काही संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जात आहे. पुण्यात राज्याचे राज्यपाल रमेश बैस ध्वजारोहण करणार असल्याचे खर्डेकर यांनी सांगितलं.
स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण जिल्हा मुख्यालयात कोण करणार, याची यादी जाहीर करण्यात आली होती. पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव जाहीर झाले होते. परंतु शासनाने यादीत एक बदल केला असून नवीन यादी जाहीर केली आहे. पुण्यात राज्यपाल रमेश बैस ध्वजारोहण करणार असून चंद्रकांत पाटील रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत.
संदीप खर्डेकर म्हणाले, पुण्यातील ध्वजारोहणावरुन संभ्रमाचं वातावरण तयार केलं जात आहे. पुणे शहराच्या परंपरेनुसार याठिकाणी असा संकेत आहे की स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाला राज्याचे राज्यपाल येत असतात. त्यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण करण्यात येते. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे राज्यातील वरिष्ठ मंत्री आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा निर्णय घेतला की वरिष्ठ मंत्र्यांनी देखील एखाद्या जिल्ह्यात ध्वजारोहणासाठी गेलं पाहिजे. त्यानुसार चंद्रकांत पाटील यांना रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे ध्वजारोहण करण्यास सांगितले आहे.त्यानुसार चंद्रकांत पाटील हे अलिबाग येथे ध्वजारोहण करणार आहेत. तर पुण्यात राज्यपाल ध्वजारोहण करणार आहेत.यानंतर पुण्याचे पालकमंत्री या नात्याने ते संध्याकाळी राज्यपालांच्या चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पुण्यातील ध्वजारोहणावरुन सुरु असलेल्या चर्चा अनाठायी असून हा प्रशासकीय भाग असल्याचे संदीप खर्डेकर यांनी सांगितले.