Home Blog Page 1402

पुणे पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना मिळणार अत्याधुनिक प्रशिक्षण;ART टेक्नॉलॉजी प्रशिक्षण केंद्राची स्थापना

पुणे – पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना विविध तांत्रिक विषयांची माहिती मिळावी यासाठी प्रशिक्षण सत्राचे आयोजन वेळोवेळी करण्यात येते. त्यापार्श्वभूमीवर पोलीस शहर पोलीस आयुक्तालयात अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त Digital Smart Board, Audio Amplifier System, UPS या State of ART Technology चा वापर असलेल्या सुसज्ज अशा वातानुकूलीत प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

या प्रशिक्षण केंद्रामध्ये 45 व्यक्तींची बैठक व्यवस्था,चर्चासत्र, प्रशिक्षण सत्र होऊ शकेल असे मोठे सभागृह आहे. या प्रशिक्षण सभागृहाचे उद्घाटन पोलीस महासंचालक यांच्या हस्ते रोजी झाले.पोलीस महासंचालक यांनी प्रशिक्षण केंद्राची पाहणी करुन समाधान व्यक्त केले.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था संजय सक्सेना,पोलीस आयुक्त रितेश कुमार,राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष डुंबरे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

माझी माती माझा देश” अंतर्गत पुणे महापालिकेत पंचप्रण शपथ

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा आज पासून सुरु झाला आहे. सदर सांगता सोहळ्याच्या निमित्त राज्यात ‘‘मेरी माटी मेरा देश” हा उपक्रम देशभर साजरा करण्यात येत आहे. पुणे महापालिका प्रांगणातील महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्णाकृती पुतळ्यानजीक हिरवळीवर ‘‘पंचप्रण शपथ” घेण्यात आली.

पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शपथ घेतली,त्या पाठोपाठ उपस्थित मनपा अधिकारी व कर्मचारी यांनी शपथ घेतली.
याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रविंद्र बिनवडे, उप आयुक्त (सामान्य प्रशासन) सचिन इथापे, मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी, विद्युत विभागाचे श्रीनिवास कंदुल,माहिती व जनसंपर्क अधिकारी योगेश हेंद्रे (प्रभारी) सुरक्षा अधिकारी राकेश विटकर व अन्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली मणिपूरमधील आपत्तीग्रस्त भागात भेट.

पुणेकरांसह संपूर्ण देशातील नागरिक मणिपूरवासीयांच्या पाठीशी
पुणे :

९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने भारताचा अविभाज्य घटक असलेल्या मणिपूरची राजधानी इम्फ़ाल येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ध्वजारोहण व आप्पत्तीग्रस्त भागास भेट दिली.
यावेळी त्यांनी इम्फ़ाल पासून सुमारे ५० किमी अंतरावरील तेरापुर व लिटानपोप्पी या परिसरात जाळपोळ व हल्ले झालेल्या गावांमध्ये भेट दिली तेथील नुकसानीची पाहणी केली.परिसरातील आपत्तीग्रस्त नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की,
“मणिपूर राज्यात सध्या घडत असलेल्या घटनांची पार्श्वभूमी अत्यंत विदारक अशी आहे. प्रचंड जाळ- पोळ , हिंसाचार महिलांवरील अत्याचार हे सर्व राजरोसपणे सुरू असलेल्या मणिपूरमध्ये परिस्थिती अतिशय भीषण असताना देखील सरकार म्हणून येथील सरकारने अक्षरश: जबाबदारी झटकलेली आहे. पूर्णपणे हुकूमशाही पद्धतीचे वातावरण असून मनिपुर मधील कुठलीही गोष्ट जगासमोर येऊन नये यासाठी इंटरनेट सेवा देखील विस्कळीत करण्यात आली आहे. ठिक -ठिकाणी पोलीस दलातील जवान तैनात असून कुठल्याही प्रकारे मणिपूरमध्ये घडलेला प्रकार जगासमोर येऊ नये याची पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मनिपुर येथे येऊन येथील लोकांमध्ये आत्मविश्वास जागे करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण सर्व भारतीय नागरिक एक आहोत. संपूर्ण देश मणिपूरच्या सोबत उभा आहे. मनिपुर सोबत जे घडले आहे ते सरकारने कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी आपण सर्वजण मिळून सत्य जगासमोर आणणारच या दृढनिश्चयासह आज येथे ध्वजारोहण संपन्न झाले. तसेच येथील युवक ,महिला व लहान मुलांना भारतीय राष्ट्रध्वजाचे वाटप केले”.

“मणिपूर मधील परिस्थिती हाताबाहेर गेलेली असताना देशात लोकशाही वाचवण्यासाठी विविध सामाजिक संस्था ,राजकीय पक्ष हे सर्व मणिपूरच्या सोबत आहेत”,हाच संदेश या निमित्ताने आम्हाला द्यावयाचा आहे.

यावेळी माझ्या समवेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरजभैय्या शर्मा,मणिपूरचे प्रदेशाध्यक्ष इबोमिया सोराम ,जावेद इनामदार, संदीप बालवडकर, सुषमा सातपुते आदी सहकारी देखील उपस्थित आहेत.

जुना मुंबई -पूणे महामार्ग कामाचा आढावा,खडकीतील वाहतूक प्रश्न लवकरच सुटेल

-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – जुन्या मुंबई -पुणे महामार्गाच्या रस्तारूंदीच्या कामाचा सातत्याने पाठपुरावा घेत असून, खडकीतील वाहतुकीचा प्रश्न लवकरच सुटेल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) पत्रकारांना सांगितले.

महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे खडकी भागात जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या रस्त्यावर येणाऱ्या अडथळ्यांची पाहणी करून ते अडथळे दूर करण्याबाबत, संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आमदार शिरोळे यांनी सविस्तर चर्चा केली.

त्याचप्रमाणे बोपोडी चौक ते ऑल सेंट स्कूल दरम्यानचा रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी दोन चाकी, तीन चाकी, व चार चाकी वाहनांसाठी दि. १ सप्टेंबर २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच खडकी एलिफिस्टन रोड वरून जुन्या पुणे–मुंबई महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत साधारण दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागणार असल्यामुळे याठीकाणाहून जड वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. यामुळे खडकी भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले. रूंदीकरणाचे ८० टक्के काम पूर्ण झालेले आहे, उर्वरित काम येत्या ३ ते ४ महिन्यात पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या पाहणी दरम्यान प्रकाश भाऊ ढोरे, गणेश बगाडे, आनंद छाजेड, धर्मेश शहा, शाम काची, गणेश स्वामी, सुभाष पाडळे, देवेंद्र बिडलान, प्रवीण बिडलान, संकेत कांबळे, राहुल कांबळे, अजित पवार, नेहाताई गोरे, अतुल गायकवाड, राजू पिल्ले, अनिल भिसे, खडकी वाहतूक पोलीस विभागाचे मासाळकर, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी गोजारे तसेच भारतीय जनता पार्टी छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

भाजपा सरकारच्या काळात आदिवासी समाजावरचे अत्याचार वाढले.

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासींचा भव्य मोर्चा.

मुंबई, दि. ९ ऑगस्ट
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली, त्यातील ५५ वर्ष केंद्रात काँग्रेसची सत्ता राहिली. काँग्रेस पक्ष सत्तेवर असताना आदिवासी समाजावर अत्याचार होऊ दिले नाहीत पण भाजपा सरकारच्या काळात मात्र मणिपूर असो वा महाराष्ट्र सर्व भागात अत्याचार वाढले आहेत. आदिवासीच या देशाचा मुळनिवासी आहे, जल, जमीन जंगलवर त्यांच्याच अधिकार आहे परंतु आदिवासींची ही संस्कृतीच संपवण्याचे पाप भाजपा करत आहे, या भाजपाला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्ह बिरसा ब्रिगेडने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला होता. यावेळी मार्चेकरांना मार्गदर्शन करताना नाना पटोले पुढे म्हणाले की, जमिनीचे पट्टे देण्याचा अधिकार काँग्रेस सरकारने दिला असतानाही भाजपा सरकार नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना हे जमीन पट्टे देण्यात टाळाटाळ करत आहे. भाजपा आदिवासी समाजाला आदिवासी नाही तर वनवासी म्हणतो, वनवासी म्हणजे कायम वनातच राहणारे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले ते संविधानच संपवण्याचे काम भाजपा करत आहे पण याच बाबासाहेबांनी आपल्याला मतांची तलवार दिलेली आहे, त्याचा वापर करा आणि भाजपाचा धडा शिकवा असे आवाहन नाना पटोले यांनी केले.
मणिपूर पेटले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर काहीच बोलत नाहीत, त्यांना देश पेटवायचा आहे. लोक भाजपाला भारत जलाव पार्टी असे म्हणतात तेच खरे आहे. नरेंद्र मोदी सरकार गरिबांच्या खिशातले पैसे काढून श्रीमंतांचे खिसे भरत आहे. महागाईने जगणे मुश्कील झाले आहे, सिलिंडर महाग केले, वीज बिल वाढवले, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, तरुण मुले शिकून मोठी झाली पण या तरुणांच्या हाताला रोजगार नाही, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. विकासाच्या गप्पा मारल्या जात आहेत पण हा विकास आदिवासी बांधवांपर्यंत पोहचलेलाच नाही, असेही नाना पटोले म्हणाले.
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी समाज व बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, आमदार हिरामण खोसकर, माजी मंत्री शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष आकाश छाजेड, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ब्रीज दत्त, प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, राहुल दिवे बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्यासह पदाधिकारी व हजारो आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डी .वाय.पाटील युनिव्हर्सिटीमध्ये ‘फ्रेशमन ओरिएंटेशन प्रोग्राम ‘ चा प्रारंभ-१८ ऑगस्ट पर्यंत  विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्रे 

पुणे :
 डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी (आंबी,पुणे) यांच्या वतीने  विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘आरंभ ‘या फ्रेशमन ओरिएंटेशन प्रोग्रॅमचे उदघाटन ९ ऑगस्ट २०२३ रोजी  करण्यात आले .या उपक्रमाचे हे चौथे वर्ष  आहे. ‘बार्कलेज’चे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण वुक्कलम,अदानी इलेक्ट्रिसिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध खेकाळे,’लुपिन लिमिटेड’ चे उपाध्यक्ष रितुराज सार,कर्नल सुनील भोसले,प्रा.कारंडे  यांच्या उपस्थितीत झाले.डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू डॉ.सायली गणकर यांनी स्वागत केले .१८ ऑगस्टपर्यंत  सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.अभियांत्रिकी ,व्यवस्थापनशास्त्र,आर्किटेक्चर,फार्मसी, लॉ,डिझाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांचे स्वागत या कार्यक्रमातून करण्यात आले .विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीची पायाभरणी होण्यासाठी आणि वैयक्तिक विकासाची, व्यक्तिमत्व विकासाची योग्य सुरुवात म्हणून या कार्यक्रमाचे  नियोजन केले जाते .
 अनिरुद्ध खेकाळे यांनी यशस्वी कारकिर्दीसाठी आवश्यक गोष्टींवर मार्गदर्शन केले.’आपल्या आवडीला उद्दिष्ट प्राप्त करून दिले तर कारकिर्दीला अर्थ प्राप्त होतो’,असे त्यांनी सांगितले.रितुराज सार म्हणाले,’अध्ययन करताना स्वतःचा ब्रँड निर्माण करण्याचे ध्येय समोर ठेवले पाहिजे.’प्रवीण वुक्कलम म्हणाले,’विद्यापीठाने उपलब्ध केलेल्या सर्व संधी आणि सुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे,स्वतःची गती ओळखून कार्यरत राहिले पाहिजे’.डॉ सायली गणकर म्हणाल्या,’यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रमाला आणि जबाबदारी घ्यायला पर्याय नसतो.आपण तशा तयारीने मेहनत घेतली पाहिजे’. इस्कॉन चे  कृष्ण माधव दास यांनी मूल्य व्यवस्था,योग याविषयी मार्गदर्शन केले.प्रा.ओंकार समुद्र यांनी आभार मानले.   
शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी  व्यक्तिमत्व,रोल मॉडेल त्यांच्यासमोर यावीत, यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. ,अँटिनार्कोटिक्सचे पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार,आयटीसी इन्फोटेक चे प्रमोद हंकारे,डॉ.ज्योती जैन, प्राची कुलकर्णी, डॉ.संतोष राणे, ह्यासिंथ आर्या हे मार्गदर्शन करणार आहेत.दररोज १० ते ४ या वेळात ओरिएंटेशन प्रोग्राम पार पडणार आहे

 Mahindra ने अधिक पल्ल्याची नवीन e-Alfa Super रिक्षा  आणली बाजारात

• अतुलनीय विश्वास असलेला भारताचा क्रमांक 1* 3-व्हीलर ईव्ही ब्रँड: 50000 हून अधिक e-Alfa ग्राहकांचा विश्वास.

• अधिकच्या कमाईसाठी 20% इतका वाढीव पल्ला: एका चार्जवर 95+ किलोमीटर.

• व्यापक चार्जिंग इकोसिस्टम: उच्च क्षमता असलेला 18 A चार्जर व देशभरात 10000+ चार्जिंग स्टेशन्सची सुविधा.

• व्यापक वॉरंटी: एक वर्षाची वाहनाची वॉरंटी आणि 18 महिन्यांची बॅटरीची वॉरंटी.

• सर्वांत भव्य सर्व्हिस नेटवर्क: उत्कृष्ट ग्राहकांच्या सहाय्यासाठी भारतभरात 1150 हून अधिक Mahindra touchpoints.

• चालकाला 10 लाख रुपयांचा मोफत अपघाती विमा: सुरक्षा व सुरक्षिततेची निश्चिती

मुंबई, 9 ऑगस्ट 2023: Mahindra Last Mile Mobility(LMM) या भारतातील नंबर 1* इलेक्ट्रिक 3-व्हीलर कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर लाइन अपमध्ये महिंद्रा e-Alfa Super बाजारात आणून भर घातली आहे. Mahindra ब्रँडची विश्वसनियता लाभलेली ही नवीन ई-रिक्षा तिची दूरचा पल्ला गाठण्याची क्षमता, तिच्या श्रेणीतील सर्वोत्तम सुरक्षा आणि सुविधाजनक वैशिष्ट्यांमुळे चालक सहकाऱ्यांसाठी सर्वोत्तम स्वयंरोजगार पर्याय म्हणून कायम राहील.

या e-Alfa Super च्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे Mahindra द्वारे व्यापक ड्रायव्हिंग व्हॅलिडेशनद्वारे प्राप्त केलेली तिची एका चार्जवर 95+ किलोमीटरचा पल्ला गाठण्याची क्षमता; यामुळे चालकांना जास्तीत जास्त कमाई करता येते. 140 Ah लीड-एसिड बॅटरीमुळे e-Alfa Super पूर्वीपेक्षा 20% जास्त इतका एक प्रमाणित पल्ला गाठते. हिची मोटर 1.64 kW पीक पॉवर आणि 22 Nm टॉर्क तयार करते, त्यामुळे ही दमदार कामगिरी करते.

50000 पेक्षा जास्त e-Alfa ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर e-Alfa Super रोजच्या धकाधकीच्या वापरासाठी तयार केलेली आहे. हिच्या मालकाचा अनुभव समृद्ध करण्यासाठी Mahindra वाहन खरेदी करताना .चालकासाठी 10 लाख रुपयांचा मोफत अपघाती विमादेखील देत आहे, जेणेकरून हिच्या ग्राहकांची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित होईल.

Mahindra Last Mile Mobility चे मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) सुमन मिश्रा म्हणाले, ” पर्यावरणपूरक वाहनांची वाढती मागणी असलेल्या जगात आमची e-Alfa Super रिक्षा अधिक पल्ला आणि कमाईची क्षमता देते. यामुळे आमच्या चालक सहकाऱ्यांना Mahindra ब्रँडच्या विश्वास आणि भरवश्याचे बळ मिळून त्यांचे उद्योगातील उत्पन्न वाढविण्यास आणि पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कमी करण्याची संधी मिळते.”

e-Alfa Super बरोबर एक उत्कृष्ट 18 A चार्जर मिळतो. त्याची 12 महिन्यांची वॉरंटी असते आणि तो अधिक वेगाने चार्जिंग करतो; त्यामुळे चालकांना डाउनटाइम(अनुत्पादक काळ) कमी करून आपली उत्पादकता जास्तीत

जास्त करण्याची संधी मिळते. आमच्या चार्जिंग सेवा देणाऱ्या सहकाऱ्यांच्या मदतीने, Mahindra 3-व्हीलर EV ग्राहकांसाठी देशभरात 10000 पेक्षा अधिक चार्जिंग स्टेशन्सदेखील उपलब्ध आहेत.

Mahindra या वाहनासाठी व्यापक कव्हरेजसह एक वर्षाची वॉरंटी देते. तसेच, हिच्या बॅटरीसाठी 18 महिन्यांची वॉरंटी आहे. ही दीर्घकालीन विश्वसनीयता आणि ग्राहकांच्या समाधानाची हमी देते. भारतातील 1150 हून अधिक Mahindra touchpoints मध्ये या वाहनाची देखभाल केली जाऊ शकते.

मेटल बॉडी असलेल्या e-Alfa Super मध्ये प्रगत ब्रेकिंग सिस्टम आणि छताला बसविलेल्या ग्रॅब हँडलसह हिच्या श्रेणीतील सर्वोत्तम सुरक्षाविषयक वैशिष्ट्ये दिली आहेत. हिची किंमत ₹ 1.77 लाख असून, ही एक्स-शोरूम आणि त्या-त्या राज्यातील स्थानिक सरकारच्या ई-रिक्षांसाठीच्या मान्यतेनुसार उपलब्ध आहे.

गौतमीच्या डीजे शो वर भारी पडली माधुरीची मराठमोळी लावणी

महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या दोन व्यक्ती असं जरी म्हटलं तरी लगेच
माधुरी पवार आणि गौतमी पाटील अशी दोन नावं आठवतात.  कारण महाराष्ट्रातील सार्वजनिक कार्यक्रम गाजवण्यात या दोघी अग्रेसर आहेत. अभिनेत्री माधुरी पवार आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांनी त्यांच्या नृत्यांतून जनतेची मनं जिंकली आहेत. दोघींचाही फॅन क्लब प्रचंड मोठा आहे. आतापर्यंत या दोघींना चाहत्यांनी वेगवेगळ्या मंचावर पाहिले आहे. पण नुकतंच, इतिहासात पहिल्यांदाच या दोघी एकत्र आणि एकाच मंचावर दिसल्या आणि निमित्त होते हडपसर येथील ‘टिओस कॅफे’चे उद्घाटन.

माधुरी पवार आणि गौतमी पाटील या दोघींच्याही अदा एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. तसेच दोघींचीही नृत्य सादर करण्याची शैली देखील वेगळी आहे. दोघींचीही क्रेझ जास्त असली तरी सुध्दा या कार्यक्रमात गौतमीच्या डीजे शो वर माधुरीची मराठमोळी लावणी भारी पडली.

झी युवा वरील ‘अप्सरा आली’ या डान्स रिॲलिटी शोची विजेती म्हणून माधुरीने तिच्या जिद्दीने आणि मेहनतीने हे यश कमवले. स्वतःच्या कलेच्या बळावर आज माधुरी पवारने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. लावणी हा महाराष्ट्राची लोककला आणि लावणी नेमकी काय असते हे लावण्यवती माधुरी पवार पेक्षा चांगली कोणाला माहित असणार. दिलखेचक अदांनी लावणी सादर करणारी माधुरी ही महाराष्ट्राची आवडती अभिनेत्री, नृत्यांगना आहे, हे या कार्यक्रमात माधुरीने सिध्द करुन दाखवलं. माधुरीने सादर केलेल्या लावणीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि तिचे कौतुक देखील झाले.

पश्चिम महाराष्ट्रात वीजग्राहकांकडे सुरक्षा ठेवीच्या रकमेची थकबाकी २३५२ कोटींवर, वीजपुरवठा खंडित होणार

पुणे, दि. ०९ ऑगस्ट २०२३: पश्चिम महाराष्ट्रातील लघु व उच्चदाब वीजग्राहकांना गेल्या एप्रिल व मे महिन्याच्या वीजबिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात आले होते. मात्र सद्यस्थितीत ४८ लाख ५१ हजार ५३६ ग्राहकांकडे सुरक्षा ठेवीचे २३५२ कोटी ५९ लाख रुपयांची थकबाकी आहे. या सर्व ग्राहकांना सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यासाठी महावितरणकडून ३० दिवसांच्या मुदतीची नोटीस देण्यात येत आहे. या मुदतीनंतरही रक्कम भरली नाही तर नाईलाजाने संबंधितांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

दरम्यान, वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यास जास्तीत जास्त सहा समान मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरक्षा ठेवीची रक्कम घरबसल्या ऑनलाइन भरण्याची सोय www.mahadiscom.in वेबसाईट व महावितरण मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरून सहकार्य करावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक  श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.

मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता २०२१ च्या विनिमय १३.१ नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक (कृषी ग्राहक) असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद मा. आयोगाकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विनिमय १३.११ नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दराच्या सममूल्य दराने व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून वीजग्राहकांना अदा करण्यात येते.

त्याप्रमाणे वीजग्राहकांनी याआधी भरलेली सुरक्षा ठेव व नियमानुसार आवश्यक असलेली ठेव यातील फरकाच्या रकमेचे स्वतंत्र बिल गेल्या एप्रिल व मे महिन्यात देण्यात आली आहेत. तथापि अद्यापही लघुदाबाच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ४८ लाख ४७ हजार १२० ग्राहकांकडे १८५३ कोटी ७ लाख रुपयांची आणि उच्चदाबाच्या ४ हजार ४१६ वीजग्राहकांकडे ४९९ कोटी ५२ लाख रुपयांची थकबाकी आहे. या दोन्ही वर्गवारीमध्ये पुणे जिल्ह्यात २५ लाख ८१ हजार १४ ग्राहकांकडे १४८७ कोटी ९२ लाख, सातारा जिल्ह्यामध्ये ४ लाख ८४ हजार ७५७ ग्राहकांकडे १३४ कोटी ६४ लाख, सोलापूर जिल्ह्यात ५ लाख ५७ हजार ४७५ ग्राहकांकडे १८१ कोटी १६ लाख, कोल्हापूर जिल्ह्यात ७ लाख ३३ हजार ८०३ ग्राहकांकडे ४०७ कोटी १५ लाख आणि सांगली जिल्ह्यामध्ये ४ लाख ९४ हजार ४८७ ग्राहकांकडे १४१ कोटी ७२ लाख रुपयांची थकबाकी आहे.

पुण्यातील लाचखोर महापालिकेचा चेहरा उघड : मनसे आक्रमक: महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाची तोडफोड

पुणे- महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना प्रवेशासाठी दहा लाखांची लाच घेताना अटक झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाच्या आवरात बुधवारी दुपारी आंदोलन केले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील कक्षाची तोडफोड केली.वैद्यकीय शाखेत प्रवेश देण्यासाठी दहा लाख रुपये लाच घेताना अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता डॉ. आशिष श्रीनाथ बनगिरवार ( वय ५४) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (८ ऑगस्ट) सायंकाळी अटक केली. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ते बुधवारी दुपारी वैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात जमले. अधिष्ठाता डॉ. बनगिरवार यांच्या निषेधाच्या घोषणा देऊन कक्षाची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

प्रा. हरी नरकेंच्या निधनाने पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ता हरपला – नाना पटोले

मुंबई, दि. ९ ऑगस्ट
ज्येष्ठ लेखक आणि पुरोगामी विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक व वेदनादायी आहे. मागास व उपेक्षित समाजासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. हरी नरके यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीत स्वतःला वाहून घेतलेला एक ज्येष्ठ कार्यकर्ता आज हरपला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

प्रा. हरी नरके ओबीसी, मागास, वंचित, दलित समाज घटकाच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढत होते. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासन केंद्रात हरी नरके यांनी प्राध्यापक म्हणून काम पाहिले. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य, भांडारकर प्राच्यविद्या संस्था, रंगनाथ पठारे समितीमध्ये प्रमुख समन्वयक अशा विविध शासकीय समित्यांवर त्यांनी उल्लेखनिय काम केले आहे. महात्मा ज्योतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर संशोधनपर साहित्याची निर्मितीही नरके यांनी केली आहे. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यासाठी तसेच पुणे विद्यापीठांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा उभा करण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले.
प्रा. हरी नरके यांच्या निधनाने साहित्य, कला, सांकृतिक, सामाजिक क्षेत्राची तसेच पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नरके कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे अशा भावना व्यक्त करुन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण केली.

शालेय अभ्यासक्रमात ‘गुड टच बॅड टच’चा समावेश व्हावा

अभिनेत्री तनिशा मुखर्जी यांची अपेक्षा; ग्रॅव्हिटस फाऊंडेशनतर्फे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी जागृती

पुणे : “मुलांमध्ये चांगल्या-वाईट स्पर्शाची जाणीव करून देणारा ‘गुड टच बॅड टच’ उपक्रम व्यापक होण्यासाठी त्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हायला हवा. लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी अशा उपक्रमांना शासकीय स्तरावरून पाठबळ मिळायला हवे,” अशी अपेक्षा प्रसिद्ध अभिनेत्री तनिशा मुखर्जी यांनी व्यक्त केली. आपल्याला जाणवणाऱ्या चुकीच्या स्पर्शाबद्दल वेळीच आवाज उठवायला हवा, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.


ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘गुड टच बॅड टच’ या उपक्रमाविषयी तनिशा मुखर्जी यांनी बुधवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे उपस्थित होत्या. शाळांमधून हा उपक्रम राबवून मुलांमध्ये स्पर्शज्ञान जागृत करण्याचे महत्वाचे काम सुरु असल्याचे सांगून मुखर्जी यांनी उषा काकडे व फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी काकडे यांनी ग्रॅव्हिट्स फाउंडेशन व ‘गुड टच बॅड टच’ उपक्रमाचा लेखाजोखा असलेली पुस्तिका देऊन मुखर्जी यांचे स्वागत केले.
तनिशा मुखर्जी म्हणाल्या, “लहान मुलांवरील, महिलांवरील अत्याचाराच्या घटना दुःखदायक आहेत. हे अत्याचार रोखण्यासाठी कायद्याच्या अंमलबजावणीसह समाजात जागृती होणेही तितकेच महत्वाचे आहे. अनेकदा अशा घटना दाबण्याचा प्रयत्न केला जातो. लहान मुले कधीही खोटे बोलत नाहीत. त्यामुळे पालकांनी, शिक्षकांनी मुलांशी नियमित संवाद ठेवून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे. मनमोकळा संवाद ठेवला पाहिजे. आपल्या शरीरावर आपला अधिकार असतो. त्यामुळे आपल्याला न आवडणाऱ्या स्पर्शावर प्रतिक्रिया दिली पाहिजे. विश्वासातील व्यक्तीला याबाबत अवगत करावे. या उपक्रमात मी स्वतः सहभागी होणार असून, येत्या काळात गुड टच व बॅड टच याविषयी जागृती करण्यावर भर देणार आहे.”


उषा काकडे म्हणाल्या, “दिल्लीतील निर्भया घटनेनंतर सामाजिक जाणिवेतून आम्ही हा उपक्रम हाती घेतला. सुरुवातीला शाळांमधून, पालकांकडून काहीसा नकार मिळाला. परंतु, नंतर हा उपक्रम अतिशय यशस्वी झाला. ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या माध्यमातून पुण्यातील विविध शाळांमध्ये हा उपक्रम सुरु आहे. आजवर साडेचार लाख विद्यार्थ्यांना चांगल्या व वाईट स्पर्शाची जाणीव करून दिली आहे. प्रशिक्षित स्वयंसेवकांची टीम यामध्ये काम करते. अनेक घटना यातून समोर येत असून, त्यावर उपाययोजना केल्या जात आहे. जागृतीसाठी ‘उडने दो’ हा लघुपट बनविला आहे. ‘गुड टच बॅड टच’ उपक्रम देशव्यापी व्हावा, यासाठी आम्ही सरकारकडेही मागणी करणार आहोत.”

जागतिक आदिवासी दिन:आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालघर दि.९; जल, जंगल, जमिनीचे रक्षण करत पर्यावरण जपणाऱ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असून शासनातर्फे अनेक योजना राबविण्यात येत आहेत. असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना नमन करून जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधवाना शुभेच्छा दिल्या.
आज पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील राजीव गांधी मैदान येथे जागतिक आदिवासी दिना निमित्त आदिवासी विकास विभागामार्फत राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते दूरदृष्य प्रणाली मार्फत बोलत होते.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. तर, आदिवासी विकास मंत्री डाॅ विजय कुमार गावित,श्रीमती कुमुद गावित, सार्वजनिक बांधकाम (सार्वंजनिक उपक्रम वगळून)मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खा. राजेंद्र गावित, आ.शांताराम मोरे, आ.श्रीनिवास वनगा, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप कुमार व्यास, माजी आमदार रवींद्र फाटक, आदिवासी विकास आयुक्त श्रीमती नैना गुंडे, राज्यस्तरीयआढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, अपर आयुक्त आदिवासी विकास बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, डहाणू प्रकल्प अधिकारी संजीता महापात्रा, जव्हार प्रकल्प अधिकारी नेहा भोसले, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब फटांगरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थीत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, प्रत्येक घटकाला मान सन्मान आणि विकासाची संधी देण्याचे काम प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रेरणेने होत आहे. आपल्या राष्ट्रपती या आदिवासी समाजाच्या आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे त्या आपल्याला मार्गदर्शक व दिशादर्शक ठरत आहेत.

आज क्रांती दिन ही आहे आणि ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमांचा शुभारंभ झाला आहे. याचा उल्लेख करून स्वतंत्र चळवळीत आदिवासी बांधवांनी दिलेले यागदानाचे स्मरण करून मुख्यमंत्र्यांनी शहिद आदिवासींना नमन केले.
आदिवासी आश्रम शाळांचा कायापालट करण्यात आला आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी पूर्व परिक्षा केंद्र सुरू केले. 100 विद्यार्थ्यांना पीच डी साठी छात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. जिथे आदिवासींची लोकसंख्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे. तिथे १७ संवर्गातील भरती ही स्थानिकांमधूनच करण्यात येईल.असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

देशाचा गौरव जपण्यात आदिवासींचे काम अविस्मरणीय- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आदिवासींची प्राकृतिक परंपरा जपणारी जीवनशैली आहे. देशाचा गौरव जपण्यात आदिवासींचे काम अविस्मरणीय आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
श्री फडणवीस यांनी आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मुल निवासींसाठीचा हा दिवस असल्याचे सांगितले. भगवान बिरसा मुंडा यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचाही गौरवपूर्ण उल्लेख केला.
उपमुख्यमंत्रीश्री फडणवीस म्हणाले, देशाच्या अर्थसंकल्पात आदिवासींसाठी पाचपट आर्थिक तरतूद वाढविली आहे. आदिवासी विभाग आणि ग्रामविकास विभागाच्या मदतीने प्रत्येक पाडा हा रस्त्याने जोडणार आहे. रस्त्या अभावी वैद्यकीय सुविधा मिळण्यात अडचण येऊ नये, विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबु नये यासाठी पालघर आणि गडचिरोली या आदिवासी बहुल भागात प्राधान्याने रस्त्याचे जाळे विकसीत केले जाणार आहे. शबरी योजनेची तरतूद 3 पटीने वाढविली आहे.प्रत्येक आदिवासी बांधवास पक्के घर मिळणार आहे.सुमारे दोन लाख आदिवासींना वनहक्काचे पट्टे वाटप करण्यात आले आहेत. शासकीय रूग्णालय, उत्तम शाळा, पायाभूत सुविधा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून होत असल्याची माहिती श्री. फडणवीस यांनी दिली.

आदिवासींच्या विकासासाठी निधी तातडीने देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

आदिवासी बांधवांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी आवश्यक असलेला निधी तातडीने वितरीत केला जाईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले .
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, आदिवासी बांधव हे खऱ्या अर्थाने निसर्गाचे तसे संस्कृतीचे संवर्धन करित आहेत. बहुसंख्य आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आठ तालुका असलेल्या पालघर जिल्ह्याची निर्मीती झाली.हा जिल्हा पर्यटन स्थळ म्हणून अनेकांच्या पसंतीस उतरत असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासींच्या विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी केले.

आदिवासी पाड्याना जोडणारे रस्ते विकसित करणार- पालकमंत्री रविंद्र चव्हाण

आदिवासी पाडे हे मुख्य रस्त्यांना जोडणे आवश्यक आहे. या कामाला प्राधान्य देणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम तथा पालघर जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. जिल्हात ५६१ विकास कामं सुरू असून ८० अमृत सरोवर तयार होत असल्याचेही श्री चव्हाण यांनी सांगितले.

आदिवासींच्या योजना प्रभावी पणे राबविणार

  • आदिवासी विकास मंत्री डाॅ विजयकुमार गावित

आदिवासींच्या पाड्यांना जोडणारे रस्ते,त्याच्यासाठी घरे, शिक्षणाच्या सुविधा, धान खरेदी, दाखले वितरण या सर्व योजना पारदर्शकपणे राबवून आदिवासींना जास्तीत जास्त लाभ देणार असल्याची ग्वाही आदिवासी विकास मंत्री डाॅ विजयकुमार गावित यांनी दिली.

यावेळी खासदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, राज्यस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांचीही समयोचित भाषणे झाली.

आदिवासी समाजाचे सांस्कृतिक वेगळेपणा, मानवतेबद्दल असीम श्रध्दा, निसर्गावरील अतुलनीय प्रेम आणि अत्युच्च प्रामाणिकपणा व पारंपारिक निखळ गुणांचा गौरव म्हणून दरवर्षी जागतिक स्तरावर ०९ ऑगस्ट हा “जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येतो. हा दिवस महाराष्ट्रातील समग्र आदिवासी समाजासाठी अस्मितेचा व आत्मसन्मानाचा दिवस आहे.
या कार्यक्रमामध्ये विविध शासकीय योजनांचा मान्यवरांच्या हस्ते लाभ वाटप कार्यक्रम व विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या आदिवासी बांधवांचा गुण गौरव करण्यात आला. यावेळी चाळीस प्रकारचे पारिपारिक नृत्य प्रकार सादर करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी विकास आयुक्त श्रीमती नैना गुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी जव्हार श्रीमती नेहा भोसले यांनी आभार केले.
पालघर जिल्हया प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणु व जव्हार यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांना श्रद्धांजली

पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड विचारवंत

मुंबई, दि.९:- ‘महाराष्ट्रातील पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड असा विचारवंत आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘महाराष्ट्राच्या विचार व्यासपीठावर आपल्या अभ्यासपूर्ण आणि परखड विचारांनी प्रा. हरी नरके यांनी आपली अशी ओळख निर्माण केली. फुले – शाहू -आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्रासह सर्वदूर पोहोचावा यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय आणि त्यांच्या विषयीचे संशोधनात्मक लेखन याचा त्यांचा व्यासंग होता. यातून त्यांनी उत्कृष्ट अशा ग्रंथसंपदेची निर्मिती केली. वक्तृत्वाची आगळी शैली आणि अभ्यासपूर्ण मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी समता परिषदेच्या माध्यमातून रचनात्मक काम केले. त्यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळ आणि राज्यातील अभ्यास – संशोधनात्मक लेखन प्रवाहाची हानी झाली आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
0000

मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण प्रतिज्ञा

मुंबई, दि. ९ : “आम्ही शपथ घेतो की, भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू, भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू, देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू”, अशी पंचप्रण शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयातील अधिकारी- कर्मचारी यांना दिली.

“माझी माती, माझा देश” या अभियानांतर्गत आज मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, ‘माझी माती माझा देश’ अभियानाचे नोडल अधिकारी (ग्रामीण) एकनाथ डवले आणि नोडल अधिकारी (शहरी) गोविंद राज, पोस्ट मास्तर जनरल अभिकांत सिंग तसेच मंत्रालयातील प्रशासकीय व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श कार्य डोळ्यासमोर ठेवून आपण राज्याचा कारभार करत आहोत. लोकाभिमुख निर्णय घेण्याचे तसेच जनतेला न्याय देण्याचे काम हे शासन करत आहे. 2023- 24 च्या अर्थसंकल्पात नमूद विकासाच्या पंचसूत्रीनुसार देशातील सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आपले सरकार करत आहे. ज्या वीरांनी आपल्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या वीर हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे. त्यांच्या शौर्याला स्मरण करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले की, देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. वीर शहिदांची महती त्यांनी वर्णित केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी चालविलेला राज्यकारभार, त्यांचे प्रशासन याबाबतही श्री.मुनगंटीवार यांनी आपले विचार मांडले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत असल्याने महाराष्ट्र शासनाकडून दर महिन्याला एक विशेष टपाल तिकीट किंवा विशेष आवरणाचे विमोचन करण्यात येते. याप्रसंगी भारतीय टपाल विभागाने तयार केलेल्या शहाजीराजे भोसले यांच्या विशेष टपाल आवरणाचे विमोचन सर्व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या “घरोघरी तिरंगा” या अभियानाची सुरुवात उपस्थित सर्व मान्यवरांना कापडी तिरंगा ध्वज देऊन यावेळी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण होत असल्याने सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे स्मरण करणारी 2 ते 3 मिनिटांची उद्घोषणा वर्षभरासाठी मंत्रालयात कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.45 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. याही उपक्रमाची सुरुवात आजपासून मंत्रालयात करण्यात आली.

यावेळी राज्य शासनाच्या लाभात असलेल्या दोन महामंडळांनी आपापला लाभांश धनादेशाद्वारे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांना सुपूर्द केला. यात वन विकास महामंडळाचे 3 कोटी 27 लाख 50 हजार रुपये आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळाचे 1 कोटी 34 लाख 15 हजार 733 रुपयांचा समावेश आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री कार्यालयाला आय.एस.ओ. प्रमाणपत्र मिळाले असून हे प्रमाणपत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान करण्यात आले.

सुरुवातीला “माझी माती, माझा देश” या उपक्रमाची रूपरेषा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी विषद केली.