पुणे, दि. ०९ ऑगस्ट २०२३: पश्चिम महाराष्ट्रातील लघु व उच्चदाब वीजग्राहकांना गेल्या एप्रिल व मे महिन्याच्या वीजबिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात आले होते. मात्र सद्यस्थितीत ४८ लाख ५१ हजार ५३६ ग्राहकांकडे सुरक्षा ठेवीचे २३५२ कोटी ५९ लाख रुपयांची थकबाकी आहे. या सर्व ग्राहकांना सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यासाठी महावितरणकडून ३० दिवसांच्या मुदतीची नोटीस देण्यात येत आहे. या मुदतीनंतरही रक्कम भरली नाही तर नाईलाजाने संबंधितांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
दरम्यान, वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यास जास्तीत जास्त सहा समान मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरक्षा ठेवीची रक्कम घरबसल्या ऑनलाइन भरण्याची सोय www.mahadiscom.in वेबसाईट व महावितरण मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरून सहकार्य करावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.
मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता २०२१ च्या विनिमय १३.१ नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक (कृषी ग्राहक) असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद मा. आयोगाकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विनिमय १३.११ नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दराच्या सममूल्य दराने व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून वीजग्राहकांना अदा करण्यात येते.
त्याप्रमाणे वीजग्राहकांनी याआधी भरलेली सुरक्षा ठेव व नियमानुसार आवश्यक असलेली ठेव यातील फरकाच्या रकमेचे स्वतंत्र बिल गेल्या एप्रिल व मे महिन्यात देण्यात आली आहेत. तथापि अद्यापही लघुदाबाच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ४८ लाख ४७ हजार १२० ग्राहकांकडे १८५३ कोटी ७ लाख रुपयांची आणि उच्चदाबाच्या ४ हजार ४१६ वीजग्राहकांकडे ४९९ कोटी ५२ लाख रुपयांची थकबाकी आहे. या दोन्ही वर्गवारीमध्ये पुणे जिल्ह्यात २५ लाख ८१ हजार १४ ग्राहकांकडे १४८७ कोटी ९२ लाख, सातारा जिल्ह्यामध्ये ४ लाख ८४ हजार ७५७ ग्राहकांकडे १३४ कोटी ६४ लाख, सोलापूर जिल्ह्यात ५ लाख ५७ हजार ४७५ ग्राहकांकडे १८१ कोटी १६ लाख, कोल्हापूर जिल्ह्यात ७ लाख ३३ हजार ८०३ ग्राहकांकडे ४०७ कोटी १५ लाख आणि सांगली जिल्ह्यामध्ये ४ लाख ९४ हजार ४८७ ग्राहकांकडे १४१ कोटी ७२ लाख रुपयांची थकबाकी आहे.