Home Blog Page 1398

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची २४ तारखेला कसब्यात रॅली

0

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली असून, भाजपाकडून हेमंत रासने, तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर यांच्यात निवडणूक होत आहे. या निवडणुकीत हेमंत रासने यांना मतदारसंघात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर २४ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दुपारी तीनच्या सुमारास कसबा विधानसभा मतदारसंघात रॅली होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या निवडणुकीत हेमंत रासने प्रचंड मतांनी विजयी होतील, असा विश्वासदेखील म्हस्के यांनी व्यक्त केला.

नरेश म्हस्के म्हणाले की, “कसबा पोटनिवडणुकीत भाजपा आणि शिवसेना निवडणुकीला सामोर जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी विविध समाजातील नागरिकांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये नागरिकांनी अनेक व्यथा मांडल्या. त्या सोडविण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल आहे. आजपर्यंत विविध समाजाची बैठक कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. ती बैठक घेण्याच काम एकनाथ शिंदे यांनी केल्याने नागरिक समाधानी आहे”, असे सांगत म्हस्के यांनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

शिंदे गटाला व्हीप बजावता येणार नाही, आयोगाच्या निर्णयाला तूर्त स्थगिती नाही

0

निवडणूक आयोग, शिंदे गटाला नोटीस

नवी दिल्ली- निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह दिल्याच्या निर्णयालाही उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाकडून ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला. त्यांची याचिका सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतली. त्यानंतर आता यावर दोन आठवड्यानंतर सुनावणी घेण्यात येईल. विशेष म्हणजे शिंदे गट या काळात ठाकरे यांच्या आमदारांना व्हीप बजावू शकणार नाही.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाचे वाचन ठाकरेयांचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केले आहे. त्यानंतर नीरज कौल यांनी शिंदे गटातर्फे बाजू मांडली.

निवडणूक आयोगाने पक्ष नाव व धनुष्यबाणाबाबत दिलेला निर्णय चुकीचा आहे, असा दावा ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. या याचिकेवर आज स्वतंत्र बेंच समोर सुनावणी आज झाली. केंद्रीय निवडणूक आयोग आणि शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालय नोटीस देणार आहे.

ठाकरे गटाची बाजू सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल मांडत आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला. त्याबाबत बाजू मांडली. यादरम्यान निवडणूक आयोगाचा निकाल आम्हाला दाखवा असे कोर्टाने म्हटले आहे.

निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात थेट सुप्रीम कोर्टात येण्याची गरज नव्हती. त्यापूर्वी खालच्या कोर्टात दाद मागता आली असती – शिंदे गटाचे वकील कौल

निवडणूक आयोगाने केवळ विधीमंडळ पक्षातील बहुमताचाच विचार केला, मात्र संघटनेचा नाही – सिब्बल

त्यांच्याकडे 40 आमदार आहेत, त्याच भरवशावर त्यांना पक्षचिन्ह दिलं गेलं – सिब्बल

निवडणूक आयोगानं त्यांच्या निकालात म्हणालं की संघटनात्मक संख्येचे दाखले पुरेसे नाहीत, यावर आमचा आक्षेप आहे – सिब्बल

राज्यसभेत आमच्याकडे बहुमत आहे, पण केवळ 40 या संख्याबळावर त्यांना चिन्ह दिलंय – सिब्बल

हा प्रश्न सुप्रीम कोर्टासमोरचा आहे, त्यात उच्च न्यायालय काय करणार – सिब्बल

या संघर्षातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दाच हा आहे की तुम्ही विधीमंडळ पक्षालाच मुख्य पक्ष समजलात. आणि थेट सरकार पाडलं, पण विधीमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाचा केवळ एक भाग असतो – सिब्बल

निवडणूक आयोगाने त्यांचा निर्णय देतांना राजकीय पक्ष म्हणून असलेली मान्यता, मतं या सर्व बाबींचा विचार केलाय. आयोग पक्षाच्या पूर्ण स्ट्रक्चरचा विचार करतं – कौल

राजकीय पक्षाचा अविभाज्य घटक असतो विधीमंडळ पक्ष – कौल

येथे पक्षप्रमुख सर्वेसर्वा आहेत. नाराजीचाही निर्णय तेच करणार, त्या आधारावर आमदार अपात्र ठरवलेच जाणार आणि पक्षातून बाहेर फेकले जाणार – कौल

इथली पक्ष घटना अशी आहे ज्यात कुणालाही बोलण्याची मुभा नाही, म्हणूनच आयोगाने आमदारांची संख्या, मतं या सर्व बाबींचा विचार केला – कौल

अपात्रतेबाबत जोवर निर्णय होता नाही तोवर आमदार किंवा खासदाराला सभागृहातील कामकाजात सहभागी होण्याचा पूर्ण अधिकार असतो – कौल

विधीमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष असा भेद करता येत नाही कारण एकच व्यक्ती दोन्हीचा भाग असते. तोच आमदार पुढे जाऊन निवडणूकही लढतो – कौल

हाच (अपात्रतेचा) मुद्दा होता जो विचारात घेत सुप्रीम कोर्टाने चिन्हाबाबत निर्णय घेण्यास आयोगाला सुचना दिल्या होत्या – मनिंनदर सिंह
 
याचिका ऐकण्यास कोर्टाचा होकार, दोन्ही पक्षांना नोटीस देणार असे न्यायमुर्ती चंद्रचूड म्हणाले.

निर्णयाला स्थगिती देण्याची सिब्बलांची मागणी. 

स्थगिती दिली नाही तर काय होऊ शकेल – चंद्रचूड

सिंघवी – ते व्हिप जारी करतील आणि व्हिप पाळला नाही म्हणून आमच्या आमदारांना अपात्र ठरवतील. 

आम्ही हे प्रकरण दोन आठवड्यांनी घेतलं तर तुम्ही व्हिप जारी करणार का?

कौल – म्हणतात नाही

पार्टी फंड, ऑफिसेस यावरही ते दावा करु शकतात – सिब्बल

देवदत्त कामत – आम्हाला निवडणुकीपुरतं मशाल चिन्ह मिळालं होतं.

हे प्रकरण या कोर्टात असेपर्यंत हे चिन्ह आमच्याकडे राहील असे निर्देश द्यावेत..

अन्यथा आम्हाला राजकीयदृष्ट्या अडचणी येतील – कामत

दोन्ही पक्षांना नोटीसीला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी

आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिलं. 

सुप्रीम कोर्ट काय म्हणाले ?

प्रकरण हायकोर्टात नाही तर सुप्रीम कोर्टातच ऐकलं जाणार
 
दोन आठवडे शिंदे गटाकडून व्हिप जारी केला जाणार नाही
 
ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली जाणार नाही.

सुप्रीम कोर्टात प्रकरण असेपर्यंत मशाल चिन्ह ठाकरे गटाकडे राहील.

ठाकरे आणि शिंदे गटाला कोर्ट नोटीस पाठवणार.
 
नोटीशीला उत्तरासाठी दोन्ही गटाला दोन आठवड्याची मुदत.

पक्षाची संपत्ती आणि निधीबाबत स्थगिती नाही.

कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

  • निवडणूक आयोगाने शिवसेनेची घटना ऑन रेकार्ड नसल्याचे म्हटले आहे.
  • शिवसेनेची (ठाकरे) घटना ऑन रेकार्ड असून त्याचे पुरावेही आहेत.
  • निर्णय देताना पक्षाचे सदस्यत्व विचारात घेतले नाही.
  • फक्त आमदार, खासदारांच्या संख्येवर शिंदे गटाला चिन्ह मिळाले.
  • सत्तासंघर्षाचे प्रकरण आणि निवडणूक आयोगाने नुकताच दिलेला निकालाचे प्रकरण एकसारखे म्हणून सुप्रीम कोर्टात आलो.
  • निवडणूक आयोगाने पक्षाची बांधणी विचारात घेतली नाही.
  • कपिल सिब्बल म्हणाले – आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्या

शिंदे गटातर्फे नीरज कौल यांचा युक्तिवाद

  • तुम्ही थेट सुप्रीम कोर्टात येऊ शकत नाही – शिंदे गटाच्या वकील निरज कौल यांचा युक्तिवाद
  • घटनेचा 136 चा अधिकार सुप्रीम कोर्टाने येथे वापरू नये.
  • सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी हस्तक्षेप करू नये.
  • निवडणूक आयोगाने निकाल देताना पक्षाचे स्ट्र्क्चर विचारात घेतले.
  • खासदार, आमदारांच्या संख्येवरूनच पक्षाचे रजिस्ट्रेशन होते.
  • पक्षप्रमुखाकडे सर्वाधिकार हे लोकशाहीविरोधी
  • पक्ष रजिस्टर करताना निवडणूक आयोग मतदानाचा विचार करतो. याच तर्कावरून विधीमंडळ पक्ष वेगळा मानला गेला.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सोमवारी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. त्यावर आधी तुमचे म्हणणे ऐकून घेऊ. त्यानंतर मेरिटनुसार निर्णय घेऊ, असे न्यायमूर्तींनी गेल्या सुनावणीत स्पष्ट केले आहे. त्यामुळे आज सुनावणीत नेमके काय होते?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.सोमवारी अ‌ॅड. कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी. अन्यथा शिवसेनेचे बँक अकाऊंट, पक्षनिधी सर्व जाईल. यावर निवडणूक आयोगाविरोधात तुमचे काय म्हणणे आहे?, हे प्रथम आम्ही घेऊ. त्यानंतर मेरिटनुसार निर्णय घेऊ, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.

पहाटेचा शपविधी झाला नसता तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते : शरद पवार

पुणे-: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीनंतर राष्ट्रपती राजवट उठली. जर राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला. ते चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. तुम्हाला पहाटेच्या शपथविधीबाबत माहीत होते का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी शरद पवारांना विचारला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, असं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? असेही पवार म्हणाले. चिंचवडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी शरद पवार चिंचवडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. त्यावेळी सरकार बदलायचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्याचा एक फायदा झाला, तो म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली, असे पवार म्हणाले. काही गोष्टी सांगणं उचित नसतं, पण राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? असे पवार म्हणालेकेंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेनसंदर्भात दिलेल्या निर्णयावरही पवारांनी भाष्य केलं. राजकारणात मतभेद असतात, संघर्ष होतो. मात्र सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेणं असं कधीच झालं नाही. मी देखील काँग्रेसमधून बाहेर पडलो. मात्र मी असं काही केलं नसल्याचे शरद पवार म्हणाले. निवडणूक आयोगाने आम्हाला सुचवलं मग त्यांनी हात आणि आम्ही घड्याळ घेतलं. पण इथं वैशिष्ट्य निवडणूक आयोगाचे आहे की, पक्षाचे नाव आणि चिन्ह देऊन टाकलं. देशाच्या इतिहासात असं कधीच घडलं नसल्याचे शरद पवार म्हणाले. निवडणूक आयोगाचे निर्णय नेमकं कोण घेतंय याची शंका आहे. आयोग कोणाच्या सांगण्यावरुन बोलतोय असा प्रश्न देखील निर्माण होत असल्याचे शरद पवार म्हणाले. यामागे कोणती तरी शक्ती आणि त्यांचं मार्गदर्शन असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, अशावेळी ज्या पक्षावर अन्याय झाला त्याच्या बाजूने जनता जाते. सध्या मी राज्यात फिरतोय, त्यातून जनता उद्धव ठाकरेंच्या बाजूने हे दिसतंय. याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसतील असेही शरद पवार म्हणाले. जे झालं ते चुकीचं झालं असल्याचे पवार म्हणाले.

निवडून आलेल्या 45 आमदारांनी लेटरहेडचा गैरवापर करत पक्षप्रमुखांना न विचारता गोगावलेंची नियुक्ती केली ती बेकायदेशीर- कपिल सिब्बल

0

पक्षातील आमदारांनी वेगळे होऊन स्वतंत्र ओळख निर्माण करणे, हा पक्ष हायजॅक करण्याचा प्रकार; कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद

नवी दिल्ली- सुनावणीत दुसऱ्या दिवशीही ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद सुरू आहे. अध्यक्षांचे अधिकार, अपात्रतेची कारवाई यावरून घमासान सुरू न्यायालयात सुरू आहे. पक्ष सोडून गेलेले 39 आमदार हे विधिमंडळ पक्षाचे सदस्य आहेत.  मात्र ते पक्ष हायजॅक करू शकत नाहीत. जर तुम्ही त्या कायद्याचा दुरुपयोग होऊ दिला तर तो सरकार पाडण्याचे नवीन मॉडेल असेल, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टात केला आहे.कपिल सिब्बल म्हणाले,  39 सदस्य विधीमंडळ पक्षाचे सदस्य आहेत. मुद्दा इतकाच आहे की, 39 सदस्य पक्षाला हायजॅक करू शकत नाहीत.  मी एवढेच म्हणू शकतो की जर तुम्ही त्या कायद्याचा दुरुपयोग होऊ दिला तर ते सरकार पाडण्याचे नवीन मॉडेल असेल.  दुसरे म्हणजे कोणत्याही विधिमंडळात ‘एक्स’ संख्येचे लोक वेगळी ओळख निर्माण करतात आणि म्हणू शकतात की आम्ही पक्षाचे ऐकणार नाही?  महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की, एका पक्षातील काही आमदार वेगळे होऊन स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करु शकतात का? जर करू शकत असतील तर हा तर पक्ष हायजॅक करण्याचा प्रकार झाला. 

निवडून आलेल्या 45 आमदारांनी लेटरहेडचा गैरवापर केला. पक्षप्रमुखांना न विचारता केलेली गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीर आहे. निवडून आलेले आमदार पक्षप्रमुखांना विचारूनच निर्णय घेऊ शकतात. दुसऱ्या राज्यात बसून आमदारांनी निर्णय घेणे चुकीचे असल्याचे युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.. सर्वोच्च न्यायालय पक्षाची रचना समजून घेत आहे. आज दिवसभर ठाकरे गट आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे. ही सुनावणी उद्याही सुरू राहणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी आज सुनावणीदरम्यान शिवसेनेचे ठराव मराठीतून वाचून दाखवले. घटनापीठातील इतर न्यायाधीशांनी शिवसेनेच्या ठरावाबाबत म्हटले की, आपले सरन्यायाधीश आहेत यामुळे मराठी भाषेत असलेले ठराव ते वाचू शकतील. यानंतर सीजेआय चंद्रचूड यांनी या ठरावांचे मराठीतून वाचन केले.

सीजेआय म्हणाले की, गुरुवार दि. 31 ऑक्टोबर 2019 रोजी शिवसेना भवन दादर मुंबई येथे शिवसेनेच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2019 मध्ये निवडून आलेल्या आमदारांनी या बैठकीच्या सुरुवातीलाच होणाऱ्या निर्णयांचे सर्वस्वी अधिकार अध्यक्ष म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले. याप्रमाणे बैठकीत विधिमंडळातील शिवसेना पक्षाचा गटनेता म्हणून आमदार श्री. एकनाथ संभाजी शिंदे व विधानसभेतील मुख्य प्रतोद म्हणून आमदार श्री. सुनील प्रभू यांची निवड करण्यात आली. या दोन्ही निवडींचे दोन ठराव पुढीलप्रमाणे आहेत. यानंतर सरन्यायाधीशांनी घटनापीठातील इतर न्यायाधीशांना याचे इंग्रजी भाषांतर समजावून सांगितले.

यावेळी कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंना या बैठकीच्या ठरावात बहाल केलेल्या अधिकारांचा उल्लेख केला. सरन्यायाधीशांनी म्हटले की, या शिवाय या ठरावांखाली सर्व नवनिर्वाचीत आमदारांची स्वाक्षरीही आहे.या सुनावणीदरम्यान कोर्टाने काही प्रश्नही उपस्थित केले. 2019ला ठाकरे आमदार नव्हते तरी त्यांना अधिकार कसे? पक्षाचे सर्व अधिकार एका व्यक्तीकडे असू शकतात का? असा सवाल सरन्यायाधीशांनी केला.

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, हॉट एअर बलूनच्या उड्डाणास १४ मार्चपर्यंत बंदी

0

मुंबई, दि. २२ : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅराहॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअरच्या विनापरवाना उड्डाणाला १४ मार्च पर्यंत बंदीचे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उप आयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी विशाल ठाकूर यांनी जारी केले आहेत.

संभाव्य घातपात रोखण्यासाठी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात अशा घटकांच्या कारवाया रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आणि सक्रिय उपाययोजना करणे आवश्यक असल्याने बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात १४ मार्च २०२३ पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये मुंबई पोलिसांकडून हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस उपआयुक्त(अभियान), बृहन्मुंबई यांच्या लेखी विशिष्ट परवानगीने करण्यात येणारी कारवाई अपवाद राहील.

हा आदेश १४ मार्च २०२३ रोजी २४.०० वाजेपर्यंत लागू राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती दंडास पात्र असेल.

गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा

मुंबई- गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता.
अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना १ किलो रवा, १ किलो चनाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील १ महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल.

हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे २१ दिवसांऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. २०२२ मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत २७९ प्रति संच या दरानुसार ४५५ कोटी ९४ लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी १७ कोटी ६४ लाख अशा ४७३ कोटी ५८ लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

 राहुल नार्वेकर यांची निवडच चुकीची,एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी केलेली निवड, शपथविधीही नियमबाह्य, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

0

जुने सरकार, जुने विधानसभा अध्यक्ष परत आणा;

नवीदिल्ली- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या दुसऱ्या टप्प्यातील सुनावणीला मंगळवारपासून (ता. 21) सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली. आज सुनावणीच्या दुसऱ्या दिवशीही ठाकरे गटाकडून अ‌ॅड. कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत.

पहिल्या दिवशी ठाकरे गटाचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी आमदार अपात्रतेचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना असल्याच्या मुद्द्यावर भर दिला. सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तो मान्य करत त्यात न्यायालय हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच आमदार अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित असताना सभागृहात मतदान घेऊन भाजपचे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करणे हे नियमबाह्य असल्याचा मुद्दाही सिब्बल यांनी मांडला.

ठाकरे गटाचे वकील अ‌ॅड. कपिल सिब्बल यांनी काल घटनापीठासमोर उपस्थित केलेले प्रश्न

  • अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना राज्यपालांनी शिंदेंना शपथ दिलीच कशी?
  • विधानसभा उपाध्यक्षांनी 16 आमदारांना अपात्र ठरवल्यावर न्यायालय त्या निर्णयात हस्तक्षेप करू शकतो का?
  • बंडखोर 39 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय येण्यापूर्वी नवीन विधिमंडळ पक्षनेता, प्रतोद यांची निवड करण्याबाबत अध्यक्ष करू शकतात का?
  • पक्षनेता, प्रतोद बदलण्याचे अधिकार पक्षप्रमुखांच्या परवानगीने प्रतोद घेत असतात. एकनाथ शिंदे, भरत गोगावले यांना या पदावर कुणाच्या शिफारशीवरून निवडले गेले?
  • मुळात राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवडच चुकीच्या पद्धतीने झाली. या निवडीत शिंदे गटाने पक्षाच्या ‘व्हीप’चे उल्लंघन केले आहे. नार्वेकरांची निवड होण्यापूर्वी 39 आमदारांना अपात्रतेची नोटीस देण्यात आली होती, त्यांच्यावर काहीच कारवाई न होता त्यांना अध्यक्षपद निवडणुकीत मतदान कसे करता आले?
  • एकनाथ शिंदे यांच्यावरही अपात्रतेची कारवाई प्रलंबित होती, तरीही राज्यपालांनी शिंदेंना सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण कसे काय दिले? राज्यपालांची ही कृती नियमबाह्य, घटनाविरोधी नव्हती का? राज्यपालांच्या अधिकारांची तपासणी व्हायला हवी. संविधानाचे संरक्षण हे राज्यपालांचे कर्तव्य आहे. पण ते राज्यपाल राजकारणात हस्तक्षेप करत आहेत. ही दुर्दैवी बाब आहे. हेतूबाबत शंका येईल असे निर्णय राज्यपालांनी त्या काळात घेतले म्हणून उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आज अकरा वाजता पुन्हा सुनावणी सुरु झाली

अ‌ॅड. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

  • उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असताना शिवसेनेच्या कार्यकारिणीबद्दलची माहिती अ‌ॅड. कपिल सिब्बल घटनापीठाला देत आहे.
  • उद्धव ठाकरे यांच्या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांचे पद चौथ्या क्रमांकावर होते. या पदावर उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांची नेमणूक केली होती. पक्षाचे सर्व निर्णय उद्धव ठाकरेच घेत होते.
  • 31 ऑक्टोबर 2019 ला शिंदे यांची गटनेतेपदी नियुक्ती तर शिवसेनेचे प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती झाली. उद्धव ठाकरे यांनीच ही नियुक्ती केली.
  • व्हीपचा निर्णय पक्षच घेऊ शकतो.
  • 25 नोव्हेंबर 2019ला उद्धव ठाकरे आमदार नव्हते. मुख्यमंत्रीही नव्हते. ते केवळ शिवसेनेचे अध्यक्ष होते. पक्षाचे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना होता.
  • राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार उद्धव ठाकरेंना देण्यात आले होते.

आमदारांनीच उद्धव ठाकरेंना अधिकार दिले

  • कपिल सिब्बल यांच्या या युक्तिवादानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, ही बैठक मात्र फक्त निवडून आलेल्या आमदारांची होती.
  • शिवसेनेत मुख्य प्रतोद याची निवड कशी होते?, याबाबतच्या शिवसेनेच्या ठरावाचे वाचन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड करत आहे. विशेष म्हणजे हा ठराव मराठीत असून मराठीतून चंद्रचूड ठरावाचे वाचन करत आहेत. यादरम्यान, धनंजय चंद्रचूड यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. आमदारांनीच सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना दिले होते, असे सरन्यायाधीश म्हणाले.
  • तसेच, पक्षाबाबत उद्धव ठाकरेंना अधिकार देण्याबाबतचे निर्णय पक्षाने नव्हे तर निवडून आलेल्या लोकांनी घेतले, असे महत्त्वाचे निरीक्षण घटनापीठाने मांडले. विधिमंडळाच्या बैठकीत हा ठराव घेतला, पक्षाने हा निर्णय घेतला नाही, असे कोर्ट म्हणाले.

सिब्बल यांचा युक्तिवाद

  • शिंदे यांच्या बंडानंतर अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यात हा निर्णय घेण्यात आला. विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय मान्य केला होता.
  • 22 जून 2022 रोजी पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप बजावला होता. शिंदे गटालाही हा व्हीप लागू होता. याची माहिती शिंदे गटाला देण्यात आली होती.
  • व्हीपचा सर्व पत्रव्यवहार हा अधिकृत मेलवरुन करण्यात आला.
  • सभागृहातील सर्व आमदार हे पक्षाचा आवाज असतात. आमदार पक्षप्रमुखांना विचारुनच निर्णय घेऊ शकतात.

भाजपाकडून दहशतीचे वातावरण, नाना पटोले यांचा आरोप; पोलीस आयुक्तांना निवेदन

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून कार्यकर्त्यांना दमदाटी करण्यात येत आहे. भाजपाकडून दहशत निर्माण केली जात आहे. या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली आहे.

पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी पोलीस आयुक्तांची मंगळवारी भेट घेतली. पटोले यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, भानुदास माली, अमित मेश्राम आदी या वेळी उपस्थित होती. पोटनिवडणुकीत पराभवाच्या भीतीने भारतीय जनता पक्षाकडून मतदारसंघात दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. भाजपचे खासदार, मंत्री, आमदार गाड्यांमधून फिरत आहेत. त्यांच्याबरोबर गुंड प्रवृत्तीचे काही जण आहेत. ते कार्यकर्त्यांना दमदाटी करत आहेत. मतदारांना प्रलोभने आणि आमिष दाखविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. दत्तवाडी, गंज पेठ, लोहियानगर परिसरात पैसै वाटप करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. पोलिसांच्या नावाने कार्यकर्त्यांना धमकावले जात आहे, असे पटोले यांनी निवेदनात म्हटले आहे.पोलिसांच्या नावे दूरध्वनी करणाऱ्यांचा शोध घ्यायला हवा. पोलीस यंत्रणेचा वापर भारतीय जनता पक्ष करत आहे. पोलीस आयुक्तांनी आचारसंहितेचा भंग होऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे पटोले यांनी निवेदनात नमूद केले आहे.

मत्स्य व्यवसायाला चालना देणारे उद्योग महाराष्ट्रात आणणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

सागर परिक्रमेच्या तिसऱ्या टप्प्याची आज ससून डॉक येथे सांगता

मुंबई,  :- महाराष्ट्रातले मच्छिमार बांधव हे दररोज उत्तुंग लाटांशी सामना करुन आपला जीव धोक्यात घालून आपला मच्छिमारीचा व्यवसाय करतात. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात हरित आणि पर्यावरणपूरक उद्योगाबरोबरच मत्स्य व्यवसायाला चालना देणारे उद्योग महाराष्ट्रात आणले जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ससून डॉक येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले.

गेल्या काही काळात एनडीआरएफ मार्फत मच्छिमारांचे नुकसान झाल्यास त्यांना देण्यात येणारी मदत कमी असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे मदतीबाबतचे निकष बदलण्यासाठी आपण स्वत: प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय  मंत्री परशोत्तम रुपाला यांनी सांगितले.

मच्छिमारांसाठी मत्स्यव्यवसाय विषयक कल्याणकारी योजनांच्या लाभासंबंधी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सागर परिक्रमेचा सांगता समारंभ (तृतीय चरण) कार्यक्रम मुंबई शहर जिल्हयातील नवीन भाऊचा धक्का येथे आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री श्री. परषोत्तम रूपाला, श्रीमती सविता रुपाला, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार महेश बालदी, केंद्रीय मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव श्री. जे एन स्वेन, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ.अतुल पाटणे  यांच्यासह ससून डॉक येथील स्थानिक मच्छिमार मोठया संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की,  महाराष्ट्राला 720 किमी लांबीचा विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभलेला असून येणाऱ्या काळात पर्यटन आणि मत्स्य व्यवसायाला चालना देण्याचे काम राज्य शासन प्राधान्याने करणार आहे. याशिवाय मुंबईतील कोळीवाड्यांचे सुशोभीकरण, कोळीवाड्यांचा पुनर्विकास यालाही प्राधान्य देण्यात येईल. दर्याचा राजा अशी ओळख असणाऱ्या कोळीबांधवांचा विकास, त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा यासह त्यांची सुरक्षा याला सुध्दा आगामी काळात प्राधान्य देण्यात येईल. डिझेल परतावा, कोल्ड स्टोरेजची सुविधा यासारखे प्रश्न मार्गी लावण्यात येतील.  काही दिवसांपूर्वी 10 लोकांच्या मच्छिजाळीचे नुकसान झाले होते. 10 मच्छिमारांची जाळी जळाल्याने त्यांना मत्स्यव्यवसाय करण्यास अडचण येत होती. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्या 10 मच्छिमारांना जाळीसाठी 54 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात येतील असे या कार्यक्रमात जाहीर केले.

केंद्रीय मंत्री श्री. रुपाला म्हणाले की,  मत्स्य संपदा साठवणूक करणे व वितरण करणे यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबविण्यात येत आहे. मत्स्य संपदा योजनेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 20 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध देण्यात येत आहे. या योजनेचा आणि इतर योजनांचा फायदा येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील मच्छिमारांनी घ्यावा.

मत्स्य उत्पादन अधिक काळ टिकण्यासाठी शीतगृहाची सुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.पुढच्या पिढीलासुद्धा मत्स्य उत्पादनाचा लाभ मिळावा यासाठी मत्स्य संगोपन व संवर्धनासाठी मच्छीमार बांधवांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री.रूपाला यांनी केले.सागर परिक्रमेदरम्यान महाराष्ट्रातील मच्छिमारांचे प्रेम आणि आपुलकी अनुभवल्याचेही श्री. रुपाला यांनी यावेळी सांगितले.

विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यावेळी म्हणाले की, मच्छिमार हे आपला जीव मुठीत घेऊन मच्छिमारी करुन आपली उपजिविका करतात. मात्र हे करीत असताना त्यांची सुरक्षेची काळजी शासनाने घेणे आवश्यक आहे. मुंबईतील सर्वात महत्वाचे असे ससून बंदर हे मोठे आणि महत्वाचे बंदर असून त्याच्या विकासाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. मासे हे नाशवंत प्रकारात येत असल्याने कमी वेळेत हे विकले जाणे आवश्यक आहे. ते त्वरीत विकण्यासाठीची एक साखळी प्रक्रिया तयार करणे, मत्स्यव्यवसाय उद्योगाला चालना देणारे पूरक जोडधंदे आणि रोजगार उपलब्ध होणे यावर भर देणे आवश्यक आहे.

मच्छिमारांना डिझेल परतावा लवकरच देण्यात येणार – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

डिझेल परतावा वेळेवर मिळावा यासाठी प्रशासकीय यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच भविष्यामध्ये याविषयी कायदा करण्याची आवश्यकता असल्यास राज्य शासन मच्छीमारांच्या हितासाठी कायदाही करेल, असे श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी आश्वस्त केले.

मच्छिमारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे तेथे कायदे करु तसेच येत्या काळात मच्छिमारांसाठी राज्यस्तरीय नुकसान भरपाई धोरण लवकरच आणण्यात येणार आहे.  राज्यातील विविध बांधकाम प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या मच्छिमारांसाठी राज्यस्तरीय नुकसान भरपाई धोरण लवकरच आणण्यात येणार आहे.मत्स्यव्यवसाय हा रोजगार देणारा व्यवसाय असल्याने शासन या व्यावसायिकांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी पाठीशी असून यासाठीच हे धोरण ठरविण्यात येत आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला येथील स्थानिक कोळी बांधवांनी पारंपरिक कोळी नृत्य आणि गीत सादर केले.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षाच्या मुख्य नेते पदी निवड

मुंबई: शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज संध्याकाळी 7 पासून ते 9.45 पर्यंत कफ परेड येथील ताज रेसिडंट या हाॅटेलमध्ये झाली.

शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर ही पक्षाची पहिली राष्ट्रीय कार्यकारिणीची पार पडली.

या कार्यकारिणीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षाच्या मुख्य नेते पदी निवड करण्यात आली.

सिद्धेश रामदास कदम हे शिवसेनेचे सचिव असतील.

धान खरेदीने 700 लाख मेट्रीक टनांचा टप्पा ओलांडला, 96 लाख शेतकऱ्यांना फायदा

0

हमीभावापोटी शेतकऱ्यांना दिले 1,45,845 कोटी रुपये

नवी दिल्‍ली, 21 फेब्रुवारी 2023 खरीप विपणन हंगाम(केएमएस) 2022-23 साठी 20.02.2023 पर्यंत 702 लाख मेट्रीक टनापेक्षा जास्त खरेदीसह धान खरेदी सुरळीतपणे सुरू आहे. याआधीच 96 लाखांहून अधिक शेतकर्‍यांना सुरू असलेल्या केएमएस खरेदी प्रक्रीयेचा लाभ झाला आहे. थेट शेतकऱ्यांच्या खात्यात 1,45,845 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.सुविहित खरेदी प्रक्रियेसाठी सर्व व्यवस्था केली आहे. 20.02.2023 पर्यंत मध्यवर्ती साठ्यात खरेदी केलेल्या धानाच्या तुलनेत वितरण सुमारे 218 लाख मेट्रीक टन आहे. देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्रीय साठ्यात सध्या पुरेसा तांदूळ साठा उपलब्ध आहे.चालू केएमएस 2022-23 च्या खरीप हंगामासाठी, मागील केएमएस 2021-22 मध्ये प्रत्यक्षात खरेदी केलेल्या 749 लाख मेट्रीक टन धानाच्या (तांदूळाच्या बाबतीत 503 लाख मेट्रीक टन) तुलनेत 765.43 लाख मेट्रीक टन धान (तांदूळाच्या बाबतीत 514 लाख मेट्रीक टन) खरेदीचा अंदाज आहे.केएमएस 2022-23 च्या रब्बी हंगामासाठी धानाची अंदाजे खरेदी 01.03.2023 रोजी होणाऱ्या आगामी खाद्यान्न सचिवांच्या बैठकीत निश्चित केली जाणार आहे. रब्बी पिकाच्या समावेशासह, संपूर्ण केएमएस 2022-23 मध्ये सुमारे 900 लाख मेट्रीक टन धानाची खरेदी होण्याची अपेक्षा आहे.

एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत युवा संगम:मणिपूर राज्याच्या युवक- युवतींचे नागपूरात स्वागत

0

नागपूर 21 फेब्रुवारी 2023

आयआयआयटी- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूरद्वारे “एक भारत श्रेष्ठ भारत” अंतर्गत महाराष्ट्र-मणिपूर युवा संगम कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मणिपूर राज्यातील  युवक – युवतीं प्रतिनीधींचे काल  नागपूरच्या  डॉ, बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय  विमानतळावर आगमन होताच  स्वागत  करण्यात आले.  आयआयआयटी नागपूरचे संचालक डॉ. ओ.जी. काकडे यांनी अतिथींचे स्वागत केले.  यावेळी कुलसचिव कैलास डाखले,  विधान परिषद सदस्य प्रविण दटके प्रामुख्याने उपस्थित होते.    

भाषा, शिक्षण, संस्कृती, परंपरा आणि संगीत, पर्यटन आणि पाककृती, खेळ आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण इत्यादी क्षेत्रातील सांस्कृतिक संबंधासाठी हे प्रतिनिधी नागपूर दौ-यावर असून ‘युवा संगम  हा व्यापक सांस्कृतिक आदान प्रदान कार्यक्रम देशातील तरुणांना भारताची प्राचीन संस्कृती आणि नैसर्गिक विविधता अनुभवण्याची संधी देईल. एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत युवा संगम कार्यक्रमाच्या माध्यमातून १८ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांना देशातील विविध राज्यांना भेटी देण्याची तसेच त्यांच्या कला संस्कृती आणि भाषा समजून घेण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे.

ईशान्येकडील राज्य आणि इतर राज्यामधील तरुणांना पर्यटन,परंपरा,प्रगती,औद्योगिकी आणि परस्पर संपर्क या पाच व्यापक क्षेत्रांतर्गत विविध पैलूंचा बहुआयामी अनुभव प्रदान करून देण्याचा युवा संगम उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नोडल ऑफिसर डॉ. कीर्ती दोरशेटवार यांच्या द्वारे युवा संगमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आगामी दिवसांमध्ये अनेक उपक्रमांचे नियोजन केले आहे.  

दरम्यान आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग  मंत्री  नितीन गडकरी यांनी  त्यांच्या नागपूर  निवासस्थानी युवा संगम कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या  मणिपूरच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी या प्रतिनिधींचे स्वागत करून आणि त्यांना इथं राहून अनुभव समृद्ध होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.


 पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तात पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडाला दांडेकर पूलावर पकडले

पुणे-

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या बंदाेबस्तात पोलिसांनी दांडेकर पूल परिसरात पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडाला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, दोन काडतुसे जप्त करण्यात आली.

गणेश नंदकुमार महामुनी (वय २८, रा. दांडेकर पूल, सिंहगड रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. महामुनी याच्या विरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तो दांडेकर पूल भागात थांबला असून त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने मांगीरबाबा चौकात सापळा लावून महामुनीला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली.

दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, हवालदार कुंदन शिंदे, नवनाथ भोसले, अमित सुर्वे, प्रकाश मरगजे, प्रशांत शिंदे, दयानंद तेलंगे, किशोर वळे आदींनी ही कारवाई केली.

ज्ञान तीर्थक्षेत्र आळंदी-देहू ते विद्वतनगरी काशी-वाराणसी जगाच्या नकाशावर भारत ‘विश्वगुरू’ची उद्घोषणा

(९ व्या विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञानाच्या जागतिक परिषदेची मान्यता)

पुणे दि. २१ फेब्रुवारीः भारताचे द्रष्टे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैश्विक संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या नॉलेज कॉरिडॉरमधून ‘भारत विश्वगुरू’ या संकल्पनेची उद्घोषणा ९ व्या विज्ञान, धर्म/अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाच्या जागतिक परिषदेचे संकल्पक व संयोजक, थोर शिक्षणतज्ञ विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी केली. माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे ९ ते ११ फेब्रुवारी या दरम्यान ही परिषद नवनिर्मित श्री काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर करण्यात आली होती.४५ वर्षे अथकपणे विश्वशांती, मानवता आणि सांप्रदायिक सद्भावनेचे कार्य करणारे, तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली-जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज ते तत्त्वज्ञ शास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणजेच अध्यात्म ते विज्ञान या प्रवासाला एक नवीन अर्थ देणारे  विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना या ९व्या जागतिक परिषदेमध्ये काशी विद्वत परिषदेच्या वतीने ‘विश्वशांती विद्यारत्न’, बनारस हिंदू विद्यापीठाच्या भारत अध्ययन केंद्रातर्फे ‘विश्वशांती उद्गाता’,  बनारस हिंदू विद्यापीठाच्या युनेस्को अध्यासनातर्फे ‘समर्पिंत जीवन गौरव पुरस्कार’ आणि  संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठातर्फे ‘संस्कृत श्री’  असे अत्यंत प्रतिष्ठेचे सन्मान मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
९व्या जागतिक परिषदेचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री व बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे माजी कुलपती डॉ. करणसिंग यांनी केले होते. यावेळी इंद्रेश कुमार, प्रमोद कुमार, योगी अमरनाथ, अविनाश धर्माधिकारी, भूषण पटवर्धन, डॉ. ए. एस. किरण कुमार यांची सन्माननीय उपस्थिती होती. याप्रसंगी जगप्रसिद्ध संगणक तज्ञ डॉ. विजय भटकर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा सहभागी झाले होते.
जागतिक परिषदेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, १० फेब्रुवारी रोजी पार पडलेला सर्व धर्मीय शुभाशिर्वाद सोहळा आहे. यामध्ये जगातील सर्व धर्मग्रंथ हे खर्‍या अर्थाने जीवनग्रंथ आहेत, या तत्त्वावर आधारित जगातील विविध धर्मांचे पवित्र भगवद्गीता, पवित्र, कुराण, पवित्र बायबल, पवित्र त्रिपिटक, पवित्र गुरु ग्रंथसाहेब, पवित्र तोराह यांचे त्या त्या धर्मातील मानवकल्याणाविषयीचे मुलभूत तत्त्वज्ञान थोडक्यात उपस्थितांसमोर मांडण्यात आले. प्रत्येक धर्माची उपासनापद्धती वेगळी असली, तरी सर्व धर्मांमध्ये प्रेम, करुणा, दया, त्याग, समर्पण याचीच शिकवण दिली जाते.
सदरील ९ व्या जागतिक परिषदेमध्ये विविध विषयांवरील एकूण १० सत्रांचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये चाणक्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश धर्माधिकारी, नॅकचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, इटलीचे माजी राजदूत डॉ. बसंत गुप्ता, बिहारचे माजी पर्यटन मंत्री प्रमोद कुमार, सुप्रसिध्द वैद्यकीय तज्ञ डॉ. दिपक रानडे, ज्येष्ठ तज्ञ हरी राम त्रिपाठी, थोर विचारवंत डॉ. रामविलास वेदांती, आचार्य लोकेश मुनी, फिरोज बख्त अहमद, फेलिक्स मच्याडो, डॉ. एडिसन सामराज, डॉ. अ‍ॅलेक्स हॅन्की, सौ. आनंदी रविनाथन् अशा अनेकांनी विद्वत्तापूर्ण विचार मांडले.
 या ऐतिहासिक परिषदेची सांगता काशी बनारस जाहीरनाम्याच्या द्वारे करण्यात आली. सदरील ऐतिहासिक जाहीरनाम्या द्वारे, सर्वसंमतीने भारत विश्वगुरू असा उद्घोष करण्यात आली. तसेच उपस्थितांनी  स्वामी विवेकानंदांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने कार्यरत राहण्याची कटिबध्दता जाहीर केली.
आयोजित पत्रकार परिषदेत एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, डॉ. संजय उपाध्ये, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, पर्यावरण तज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे आणि प्रा.मिलिंद पात्रे उपस्थित होते.

आम्ही गुलाम नाही हे कसब्याची जनता यंदा दाखवून देतील  – सुनील केदार

पुणे- गेली ३० वर्षे भाजपाची पकड व वर्चस्व असलेल्या कसबा मतदार संघातील जनता यंदा ‘आम्ही गुलाम नाही’ हे दाखवून देतील असा विश्वास कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी आज येथे व्यक्त केला.कसबा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी ते पुण्यात आले असता कॉंग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ही पोटनिवडणूक म्हणजे उमेदवार निवडून आला किंवा नाही आला त्यामुळे सरकारवर फरक पडणार नसला तरी कलुषित झालेल्या सामाजिक व राजकीय वातावरणाला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी रिंगणात उभी ठाकली आहे, असे ते म्हणाले.नुकत्याच झालेल्या नागपूरमधील शिक्षक मतदार संघातील निवडणुकीमध्ये भाजपाचे झालेले पानिपत यामुळे संघाचे हेडक्वार्टर व भाजपा राज्यातील व देशातील प्रमुख नेत्यांचा जिल्हा म्हणून नागपूरची ओळख आहे. हा घाव त्यांना वर्मी लागला असल्यानेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपासून भाजपचे सगळेच राज्यातील व देशातील नेते पुण्याकडे येत आहेत. असे ते म्हणाले.कसब्यामध्ये मागील तीस वर्षापासून एकच व्यक्ती वर्षानुवर्षे सत्तेवर असूनही येथील पाणी प्रश्न सुटला नाही हे भाजपाचे अपयश आहे. असे ते म्हणाले. पुणे शहराला क्रीडा विद्यापीठ देण्याचा निर्णय महाविकास सरकारने घेतला. पुण्याचे महत्त्व व देशातील स्थान लक्षात घेता पुणेकर नेहमी बदलाला प्राधान्य देतात. कसब्यामध्येही पुणेकर जनता त्याचा प्रत्यय घडवतील असा मला आत्मविश्वास असल्याचे त्यांनी म्हटले.     महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित होते.