पुणे-
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या बंदाेबस्तात पोलिसांनी दांडेकर पूल परिसरात पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडाला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, दोन काडतुसे जप्त करण्यात आली.
गणेश नंदकुमार महामुनी (वय २८, रा. दांडेकर पूल, सिंहगड रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. महामुनी याच्या विरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तो दांडेकर पूल भागात थांबला असून त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने मांगीरबाबा चौकात सापळा लावून महामुनीला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली.
दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, हवालदार कुंदन शिंदे, नवनाथ भोसले, अमित सुर्वे, प्रकाश मरगजे, प्रशांत शिंदे, दयानंद तेलंगे, किशोर वळे आदींनी ही कारवाई केली.