पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून कार्यकर्त्यांना दमदाटी करण्यात येत आहे. भाजपाकडून दहशत निर्माण केली जात आहे. या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली आहे.
पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी पोलीस आयुक्तांची मंगळवारी भेट घेतली. पटोले यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, भानुदास माली, अमित मेश्राम आदी या वेळी उपस्थित होती. पोटनिवडणुकीत पराभवाच्या भीतीने भारतीय जनता पक्षाकडून मतदारसंघात दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. भाजपचे खासदार, मंत्री, आमदार गाड्यांमधून फिरत आहेत. त्यांच्याबरोबर गुंड प्रवृत्तीचे काही जण आहेत. ते कार्यकर्त्यांना दमदाटी करत आहेत. मतदारांना प्रलोभने आणि आमिष दाखविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. दत्तवाडी, गंज पेठ, लोहियानगर परिसरात पैसै वाटप करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. पोलिसांच्या नावाने कार्यकर्त्यांना धमकावले जात आहे, असे पटोले यांनी निवेदनात म्हटले आहे.पोलिसांच्या नावे दूरध्वनी करणाऱ्यांचा शोध घ्यायला हवा. पोलीस यंत्रणेचा वापर भारतीय जनता पक्ष करत आहे. पोलीस आयुक्तांनी आचारसंहितेचा भंग होऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे पटोले यांनी निवेदनात नमूद केले आहे.