Home Blog Page 1377

श्री सद्गुरू साईबाबा संस्थेचा पालखी सोहळा उत्साहात

श्री सद्गुरू साईबाबा सेवा संस्थेचा साई उत्सव २०२३  : विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

पुणे : कर्वेनगर मधील श्री सद्गुरू साई बाबा सेवा संस्थेच्या वतीने साई उत्सव २०२३  चे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री साईबाबा पालखीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साईबाबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. भक्ती पूर्ण वातावरणात साईबाबा पालखीची नगर प्रदक्षिणा संपन्न झाली. उत्सवाचे यंदा १५  वे वर्ष आहे. 

संस्थापक अध्यक्ष तुषार कैलास झेंडे, कुमार लांडे , कैलास जाधव,  अमोल शिंदे , ओंकार लांडगे, उमेश झेंडे, वैभव नवसे ,  राजू  पलमाटे, राहुल ढमाले ,साई धंगेकर, विजय मोरे, योगेश झेंडे , दिनेश गालफाडे, विजय साळवी , भारत भगत आणि नगरसेवक श्री सुशीलभाऊ मेंगडे, विठ्ठल बराटे,विजय  खळदकर,संतोष  बराटे, गिरीश खत्री,अमोल कांबळे,अंकित वाघमारे आणि मित्र परिवार उपस्थित होते.  दिनांक २३ ते २६ नोव्हेंबर दरम्यान साई उत्सव होणार आहे.

तुषार झेंडे म्हणाले, साई उत्सवानिमित्त विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये साई मूर्तीचे मंगल स्नान, साई पादुकांची महापूजा व अभिषेक श्री साई सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद साईबाबांची सांज आरती व महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय हा जल्लोष महाराष्ट्राचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय दिनांक   २६ नोव्हेंबर  रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मिसेस युनिव्हर्स डॉ.प्रचिती पुंडे यांचापहिल्या ‘यशकल्याणी राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कार’ ने सन्मान

पुणे, दि.२४ नोव्हेंबर: उर्जेचा वापर करून रोग व्यवस्थापन आणि निरोगीपण आयुष्य जगण्यासाठी समाजला दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेतर्फे ग्लॅमोवेल संस्थाच्या संस्थापक संचालक व मिसेस युनिव्हर्स डॉ. प्रचिती पुंडे यांना पहिला ‘यशकल्याणी राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कार’ २०२३ ने गौरविण्यात आले आहे. त्यांना हा पुरस्कार पुणे येथील सी मेटचे संचालक व प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. भारत काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मान पत्र, स्मृती चिन्ह आणि रोख पारितोषिक असे पुरस्काराचे स्वरूप होते.
वसंतराव दिवेकर स्मृतिदिन व यशकल्याणी परिवाराच्या दशकपूर्ती वाटचाली निमित्त या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत व विज्ञान संशोधक पद्मश्री अरिवंद गुप्ता, भारतीय नौसेनेचे रिअर अ‍ॅडमिरल रविंद्र नाडकर्णी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ  डॉ. के.जी कानडे, आयसरचे विज्ञान संशोधक प्रा. अशोक रुपनेर, ज्येष्ठ स्त्री रोग तज्ञ डॉ. वसंतराव पुंडे आणि संशोधक डॉ. प्रवीण देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शास्त्रज्ञ अरविंद गुप्ता म्हणाले,” निसर्गातील प्रत्येक गोष्टीत खेळणी लपलेली आहेत. झाले, पालापाचोळा, कचरा हा खेळणी बनवण्याचा कच्चा माल आहे. त्यातून निर्माण झालेली वैज्ञानिक खेळणी गरिबांच्या चेहर्‍यावरील हास्य फुलवतील व भविष्यातले शास्त्रज्ञ घडवितील.”
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. प्रचिती पुंडे म्हणाल्या,” विज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान संशोधक पद्मश्री अरिवंद गुप्ता व आयसरचे विज्ञान संशोधक प्रा. अशोक रुपनेर यांच्या बरोबर मझा जो सन्मान करण्यात आला ते शब्दात सांगता येणार नाही. माझे सौभाग्य आहे की यामुळे मला उजबेगिस्थान येथे एप्रिल व स्न्ड येथे मे महिन्यात विज्ञान परिषदेत भाग घेऊन पेपर प्रेझेंटेशनची संधी मिळाली आहे.”
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राला वाहून घेतलेल्या डॉ.प्रचिती पुंडे यांनी विज्ञान क्षेत्रात तब्बल २५ संशोधन ग्रंथ लिहिले आहे. त्यांनी आपल्या जीवनात चित्रकार, पत्रकार, किर्तनकार, कलाकार, डॉक्टर, लेखक, गायक, समाजसेवा, संशोधन, मिसेस इंडिया व मिसेस युनिव्हर्स ऑस्ट्रेलिया, मिसेस युनिव्हर्स वॅलरन्स पर्यंतची मजल मारली आहे. तसेच प्रोलेक्स वेलनेस अँड प्रोडक्शन्सची स्थापना करून स्वःला उद्योजिका म्हणून प्रस्थापित केले आहे. या सर्व क्षेत्रात असतांना त्यांनी समाजसेवेचे धोरण कधीही सोडले नाही.
यशकल्याणी ग्रामीण सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे पाटील यांनी प्रास्ताविक केले आणि सचिव अमृत खरे पाटील यांनी आभार मानले.

पीएमपीएमएलच्या स्वमालकीच्या जागा लीज तत्वावर ई-लिलाव पद्धतीने देण्याची प्रक्रिया सुरु

पुणे –

पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. कडील स्वमालकीच्या डेक्कन, हडपसर, स्वारगेट, मार्केटयार्ड,
न.ता.वाडी (शिवाजीनगर) येथील संकुलातील जागा लीजने देणेकामी www.eauction.gov.in या
पोर्टलवर ई-लिलाव प्रक्रिया सुरु केली असून या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा बँका,
शासकीय/खासगी कार्यालय, खासगी संस्था / व्यक्तींना लीज तत्वावर ई-लिलावाचे माध्यमातून मिळू
शकतील असे पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

‘महिलांवरील हिंसाचाराचे निराकरण’ चर्चासत्राचे आयोजन.विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे करणार मार्गदर्शन

0

मुंबई दि.२४: महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाच्यावतीने ‘महिलांवरील हिंसाचाराचे निराकरण’ विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन उद्या शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सह्याद्री शासकीय अतिथी गृह येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम सकाळी १० वाजता सुरू होणार आहे.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्या ‘महाराष्ट्रातील महिलांसाठीच्या सरकारी निवासाच्या व्यवस्थेबाबतचा बदलता दृष्टिकोन’ याविषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

याप्रसंगी, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग अध्यक्ष, न्यायमूर्ती श्री. के के तातेड, मा. न्यायाधीश श्रीमती. साधना जाधव, महाराष्ट्र रेल्वे पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे, डॉ. मंजू लोढा, डॉ. कविता लालचंदानी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

झिकाचा प्रसार रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्सची निर्मिती करा- मुरलीधर मोहोळ

पुणे-झिकाचा प्रसार रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्सची निर्मिती करण्याची मागणी माजीमहापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

महापालिका आयुक्तांना दिलेल्या पात्रात मोहोळ यांनी म्हटले आहे कि,’पुणे महानगरपालिका हद्दीत झिका विषाणूचे रुग्ण आढळत असल्याचे स्पष्ट झाले असून झिका व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी, त्यावर उपाययोजनांची दिशा ठरवण्यासाठी एका विशेष टास्क फोर्सची निर्मिती करणे आवश्यक आहे. कोरोनासारख्या संसर्गजन्य विषाणूची पार्श्वभूमी पाहता, यावर योग्यवेळी आवर घालणे आणि नागरिकांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे.
येरवडा येथील प्रतीकनगर येथे राहणाऱ्या ६४ वर्षीय महिलेला झिका विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे बाधित भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून, या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्स नियुक्त करावी. यासोबतच या संसर्गजन्य विषाणूसंदर्भात नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्या. सदर विषय गांभीर्याने घेऊन याबाबत तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, ही विनंती !

टिपू सुलतान चे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही – भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे

पुणे: ‘ज्याने असंख्य हिंदूंची कत्तल केली ज्याने अनेक लोकांचे बळजबरी धर्मांतर करून त्यांचा अमानुष छळ केला अशा धर्मांध विकृती असलेल्या टिपू सुलतान ची जयंती महाराष्ट्रात साजरी केली जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही त्याचे उदात्तीकरण होऊ देणार नाही पोलिसांनी वेळीच असल्या प्रवृत्तीला आळा घालावा अन्यथा या प्रवृत्तीचा बिमोड करण्यास आम्ही समर्थ आहोत,’ असा इशारा भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिला.
पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन तातडीने अशी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना शासन करण्याची मागणी केली.
नुकतीच पुण्यात टिपू सुलतान ची जयंती साजरी करण्यात आली.
पुढे बोलताना घाटे यांनी पोलिसांनी या बाबत गंभीरतेने दखल घेऊन ह्या लोकांचा शोध घेऊन कारवाई करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी अशी मागणी केली.
या शिष्टमंडळामध्ये घाटे यांच्यासह सरचिटणीस पुनीत जोशी, राघवेंद्र मानकर ,राजेंद्र शिळीमकर ,राहुल भंडारे ,वर्षा तापकीर, महेश पुंडे यांचा समावेश होता.

दुचाकीचाच नंबर चारचाकीला पाहिजे असेल तर… अर्ज करा

पुणेपुणे प्रादेशिक परिवहन-कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचाकींसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक चारचाकींसाठी हवे असलेल्या वाहन मालकांनी विहित तीनपट शुल्कासह 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे धनाकर्ष (डीडी) 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्याच दिवशी दुपारी 4 वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल.

दुचाकी वाहन मालकांनी आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असल्यास 29 नोव्हेंबर रोजी सकाळी (Pune) 10.30 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे डीडी 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्याच दिवशी दुपारी 4 वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल.

अर्ज कार्यालयाच्या खासगी वाहन नोंदणी विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा. हा डीडी ‘आर.टी.ओ.,पुणे’यांच्या नावे राष्ट्रीयकृत, अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर न केल्यास राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नाही. प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणेच्या कार्यक्षेत्रातील वाहनधारकांनीच अर्ज सादर करावेत, कार्यक्षेत्राबाहेरील अर्ज बाद ठरविण्यात येतील.

पुण्यात 19 वर्षीय तरुणीचा क्लास शिक्षकाकडून विनयभंग, गुन्हा दाखल

 पुणे-खासगी क्लासेससाठी एका व्यक्तीच्या घरी जाणाऱ्या 19 वर्षीय तरुणीचा शिक्षकानेच विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणी 19 वर्षाची असून यूपीएससी आणि एफवायबीकॉमच्या क्लाससाठी ती आरोपींकडे जात होती.

चतु:शृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार अमित सिरमनवर (वय 28, रा. मिटकॉन कॉलेजच्या मागे बालेवाडी पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. 19 वर्षीय पीडित तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी यूपीएससी आणि एफवायबी कॉमच्या क्लाससाठी आरोपीकडे जात होती. दरम्यान क्लास घेत असताना आरोपीने फिर्यादीला घरातील कामे करायला लावून काम न केल्यास प्लास्टिकच्या छडीने फिर्यादीला मारहाण केली.तसेच अश्लील भाषेत बोलत संबंधित शिक्षकाने वारंवार विनयभंग केल्याचे फिर्यादी तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकारानंतर फिर्यादी तरुणीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे, दि. २४: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाकडील स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजनांच्या लाभासाठी https://www.msobcfdc.org किंवा https://msobcfdc.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महामंडळाकडून इतर मागासवर्गीय प्रवर्गांतील व्यक्तींसाठी २० टक्के बीज भांडवल कर्ज, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना तसेच थेट कर्ज व्याज परतावा (एक लाख रुपयांपर्यंत) अशा विविध योजना राबविण्यात येतात.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांस बँकेमार्फत १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत देशातंर्गत अभ्यासक्रमासाठी १० लाख तर परदेशी अभ्यासक्रमासाठी २० लाख, गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत बँकेमार्फत बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था आदींना व्यवसायासाठी १५ लाखापर्यंतचे कर्ज वितरित करण्यात येते. व्याज परतावा योजनेमध्ये बँककडून घेतलेल्या कर्जाचे १२ टक्के पर्यंतचे व्याज महामंडळाकडून अदा करण्यात येते. यामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका तसेच सहकारी बँकाचा समावेश करण्यात आला आहे.

थेट कर्ज योजनेअंतर्गत महामंडळामार्फत लाभार्थ्यांस व्यवसायासाठी १ लाख रुपयांपर्यंत कर्ज वितरित करण्यात येते आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यास व्याज अदा करावे लागत नाही.

योजनांच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत क्र. बी, स.नं. १०४/१०५, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, पोलीस चौकी समोर, विश्रांतवाडी, येरवडा पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहनही महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

आपल्या अधिकाऱ्यांना मराठी भाषेचा अभिमान व आपल्या कर्तव्याचे भान उरलेले नाही -मनसेचा महापालिकेवर आरोप

पुणे- दुकानांच्या पाट्या मराठीत च असाव्यात या न्यायालयीन आदेशाच्या मुद्द्यावरून पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांना मनसे ने टार्गेट केले आहे. आपल्या अधिकाऱ्यांना मराठी भाषेचा अभिमान व आपल्या कर्तव्याचे भान उरलेले नाही असा आरोप करत उद्यापर्यंत पुण्यातील सर्व दुकानांच्या , कंपन्यांच्या , व्यावसायिकांच्या पाट्या मराठीत दिसल्या नाहीत तर आमच्या स्टाईल ला सामोरे जाण्याची तयारी ठेवा ,मागाहून तक्रार करू नका ,आणि सांगितले नाही म्हणू नका असा स्पष्ट इशारा मनसेने आज येथे दिला आहे.

मनसेने महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे कि,’आपल्या पुणे शहरातील व उपनगरातील भागात आपल्या अधिकार क्षेत्रातील दुकाने व आस्थापना वरील पाट्या मराठी भाषेत नसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनास आले असून आपल्या शॉप अॅड एस्ट्याब्लिशमेन्ट कायद्यातील तरतुदी नुसार दुकाने व आस्थापने वरील पाट्या मराठी भाषेतच असणे बंधनकारक आहे परंतु अनेक दुकानदार व आस्थापना प्रचलीत कायदेशीर तरतुदींचा सरस भंग करीत आहेत. सदरील बाब अतिशय गंभीर असून आपल्या कार्यालयाकडूनही याकडे डोळेझाक करण्यात येत आहे. आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना आपल्या मराठी भाषेचा अभिमान व आपल्या कर्तव्याचे भान नसल्याचे दिसत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दोन महिन्यांत सर्व पाट्या दुकानदारांनी मराठी स्थानीक भाषेत करावेत या आदेशाची मुदत दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी संपत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार प्रत्येक प्रांतातील त्या भाषेमध्येच म्हणजे महाराष्ट्रात दुकानावरील पाटया मराठीतच असाव्यात असा निर्णय देण्यात आला तरी सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवून आपण आपल्या पुणे शहरातील व उपनगरातील भागात सर्व दुकानदाराना व आस्थापना यांना कायदेशीर तरतुदी नुसार कार्यवाही करण्यात यावी तसेच सर्व पाट्या मराठी भाषेत मोठ्या अक्षरातच आहेत का नाही याची तपासणी करण्यात यावी. सदर पत्राने आपणांस कळविण्यात येते कि स्थानिक प्रशासनाने तातडीने दुकानदाराना व आस्थापना यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या निष्क्रीय प्रशासनाच्या व सर्व दुकानदाराच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडेल याची आपण गांभीर्याने दखल घ्यावी. हि विनंती.

बॅनरवर ‘हिंदुहृदयसम्राट’ लिहिले तर काय बिघडले?:उगीच एवढा बाऊ अन् राजकारण का करता? सुधीर मुनगंटीवार यांचा ठाकरे गटाला टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका बॅनरवरून सध्या राज्यात आकांडतांडव मांडले आहे. शिंदे यांच्या या बॅनरवर त्यांचा उल्लेख हिंदूहृदयसम्राट असा होता. त्यावरुन शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. आता मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत ठाकरे गटाला या प्रकरणी उगीचच महत्त्व न देण्याचा सल्ला दिला आहे.

एकनाथ शिंदे यांनी हातावर प्राण घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या संरक्षणासाठी एवढे मोठे पाऊल उचलले. त्यामुळे एकनाथ शिंदे म्हणजे हिंदुत्त्वाचा आवाज असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटणे साहजिकच आहे. त्यांनी उत्साहाच्या भरात त्यांच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट असा उल्लेख केला असेल. आता त्याचा एवढा मोठा बाऊ करून राजकारण करणे गैर आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे गटाला टोला हाणताना म्हटले आहे.

नेमके काय घडले होते?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 23 नोव्हेंबर रोजी राजस्थानच्या प्रचार दौऱ्यावर होते. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या भाजप उमेदवार बालमुकुंदाचार्य महाराज यांचा प्रचार केला. यावेळी बालमुकुंदाचार्य यांच्या समर्थकांनी काही बॅनर्स छापले होते. या बॅनर्सवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदूहृदयसम्राट असा करण्यात आला होता.

ठाकरे गटाने या बॅनरवर तीव्र आक्षेप घेऊन एका ट्विटद्वारे एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवली होती. पक्ष चोरला, नाव चोरलं, बाप चोरायचा प्रयत्न केला. आता हेही? किती तो निर्लज्जपणा? जगात हिंदुह्रदयसम्राट फक्त एकच..वंदनीय बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या आधी ना कुणी होता, त्यांच्यानंतर ना कुणी होऊ शकेल. दनता दूधखुळी नाही. सगळ्याचा हिशेब होणार, असे ठाकरे गटाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दुसरीकडे, सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली टीकाही फेटाळून लावली आहे. आंतरवाली सराटीतील लाठीचार्जप्रकरणी पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर दोषारोप असतानाही त्यांची बदली पुण्यात गुन्हे अन्वेषण विभागात करण्यात आली. केसरकर यांनी आपल्या पत्राद्वारे गृह मंत्रालयाच्या या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी या पत्रावर हरकत घेतली आहे. एकाने मारल्यासारखे करायचे आणि दुसऱ्याने लागल्यासारखे करायचे. या सरकारमध्ये नेमके चाललंय काय?, असे ते म्हणाले होते.

याविषयी सुधीर मुनगंटीवार यांना छेडले असता त्यांनी वडेट्टीवारांची टीका फेटाळून लावली. एका मंत्र्याने भाषा केली म्हणजे 29 मंत्र्यांमध्ये मतभेद आहेत असा का आभास होतो? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.

आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका:नावापुढे हिंदुहृदयसम्राट लिहिले तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही

चिपळूण-राजस्थानमध्ये भाजपच्या प्रचारासाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नावापुढे हिंदुहृदयसम्राट लिहिण्यात आले आहे. त्यावरुन आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर आज घणाघाती टीका केली. हे सगळे केले तरी माथ्यावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाऊ शकत नाही, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.

आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून आज त्यांची चिपळूण येथे खळा बैठक झाली. यावेळी एकनाथ शिंदेंचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट केल्याबद्दल आदित्य ठाकरे म्हणाले, पक्ष, नाव चोरणारे हे पण चोरणार का? निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. किती मास्क लावून फिराल? किती देखावा कराल? त्यापेक्षा जी करताय ती अॅक्टिंग करा. पण हे सगळे केले तरी माथ्यावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाऊ शकत नाही.

31 डिसेंबरला सरकार जाणार म्हणजे जाणार, असा पुनरुल्लेखही आदित्य ठाकरेंनी केला. राजस्थानमध्ये एकनाथ शिंदे भाजपचा प्रचार करत असल्याबद्दल आदित्य ठाकरे म्हणाले, जिथून त्यांना पगार येतो तिथे हे करावेच लागणार ना. आदित्य ठाकरे म्हणाले, नवी मुंबई मेट्रो पाच महिन्यांपासून तयार होती. हा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा जिल्हा होता, पण उद्घाटन केले नाही. मी ट्विट केल्यानंतर उद्घाटन झाले. बीएमसी, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसची आठवणही मी ट्विट केल्यावर आली आणि बोनस द्यावा लागला. मुंबईतला डिलाईन रोड 15 दिवसांपासून तयार होता, आमच्यावर गुन्हा दाखल केला. मुंबई ट्रान्सहार्बर लिंकही (एमटीएचएल) पूर्ण तयार आहे. जे 5 टक्के काम राहिल्याचे दाखवतात ही सरकारी यंत्रणेची जादू असते. यात रंगरंगोटी दाखवतात, डागडुजी बाकी असल्याचे म्हणतात. पण एमटीएचएल पूर्ण तयार आहे, पण महाराष्ट्रासाठी वेळ नसणारे इतर राज्यात प्रचाराला व्यस्त असल्याने उद्घाटन उशिरा होत आहे.

काही दिवसांपूर्वी चिपळूणमधील बहादूर शेख नाका येथे काम सुरु असतानाच पुल कोसळण्याची घटना घडली होती. या पुलाची पाहणीही आदित्य ठाकरे यांनी केली. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, चिपळूणमधील कोसळलेल्या पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारालाच मुंबईत 980 कोटींची कामे दिली आहेत. याबाबत कारवाई व चौकशी झालेली नाही. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही जो कोणी दोषी असेल कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. तसेच, मुंबई-गोवा महामार्गाचा दर्जा बेकार असून हा महामार्ग आहे की नाही काही कळायला मार्ग नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईत पाच कंत्राटदारांना सेटिंग करून कंत्राट दिले. त्यातून एकाला बाजूला काढले, पण काळ्या यादीत टाकले नाही. म्हणजे नक्कीच साटेलोटे असणार. कोणीतरी जवळचा असणार. कारण हे बीसी (बिल्डर कॉन्ट्रॅक्टर) सरकार आहे. कंत्राटदाराला काळ्या यादीत का टाकत नाही, एवढे प्रेम का आहे? एवढेच नाही तर कंत्राटदाराला जो दंड लावला आहे तो बीएमसी त्याला देणाऱ्या पैशातून वजा करणार आहे. हे पैसे कंत्राटदाराच्या खात्यातून यायला हवे, मुंबईच्या खात्यातून नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संवेदनशीलतेने प्रयत्न करा-ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

0

पुणे दि.२४: ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनातर्फे अनेक योजना राबविण्यात येत असून अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने आणि पूर्ण क्षमतेने या योजनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले.

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे ग्रामविकास व पंचायतराज विभागातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपायुक्त (आस्थापना/विकास), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प संचालकांसाठी आयोजित राज्यस्तरीय प्रशिक्षण व कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला यशदाचे महासंचालक एस.चोक्कलिंगम, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सचिव के.टी. पाटील, एमएसआरएलएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, पंचायत राज संचालक आनंद भंडारी, ग्रामीण गृहनिर्माण संचालक डॉ.राजाराम दिघे, यशदाचे उपसंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, विविध जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.महाजन म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात असताना अजूनही ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्याचे प्रश्न पूर्णतः सुटलेले नाही. ते सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने आणि कल्पकतेने काम करावे. गाव स्वच्छ आणि सुंदर होईल यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न व्हावा. गावातील शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीविषयी अधिकाऱ्यांनी नियमित आढावा घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

पंचायत राज विभाग ग्रामीण भागाचा आत्मा असल्याचे नमूद करून श्री. महाजन म्हणाले, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तंत्रज्ञानामुळे कामकाजात सुलभता येत असताना शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सुलभता झाली आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करीत समाज आणि देशासाठी आपण काय योगदान देऊ शकू या भावनेने ग्रामीण माणसाचे जीवन सुसह्य करण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे. कार्यशाळेच्या माध्यमातून विचारांचे आदानप्रदान होईल आणि त्याचा फायदा ग्रामीण भागासाठी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अभिनव कल्पना राज्यस्तरावर राबविण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही श्री.महाजन यांनी दिली.

महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी ‘उमेद’सारखी महत्वाची योजना राबविण्यात येत आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून चांगले काम होत आहे. गरीब माणसाला हक्काचे घर देण्यासाठी घरकुल योजना आहे. अशा विविध योजनांचा माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचे, त्याला त्याच्या हक्कच्या मूलभूत सुविधा आणि त्याचे जीवनमान उंचाण्याचे कार्य ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या माध्यमातून व्हावे, अशी अपेक्षा मंत्री श्री.महाजन यांनी व्यक्त केली.

प्रधान सचिव श्री.डवले यांनी कार्यशाळेविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ग्रामविकास विभागाच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शिकण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्यादृष्टीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कामकाज सुलभीकरण, संगणकीकरण आणि विविध शासकीय योजनांच्या अभिसरणाबाबतही चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील शेवटच्या माणसाला शासकीय योजनांचा लाभ देण्याची भावना विकसित करण्याच्यादृष्टीने कार्यशाळेकडे पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.

तीन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), ग्रामीण गृहनिर्माण, पंचायतराज, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान, त्रिस्तरीय विकास आराखडे, विविध योजनांचे अभिसरण-महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना व इतर योजनांची अंमलबजावणी, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ शाळा-सुंदर शाळा, शाळा विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, शाश्वत विकास ध्येये, पंचायत विकास निर्देशांक, पर्यावरणपुरक ग्रामीण विकास, प्रशासनातील नैतिकता व नितीमत्ता आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. विविध जिल्ह्यांचे नाविन्यपूर्ण उपक्रम व यशोगाथांचे सादरीकरणही यादरम्यान करण्यात येईल. जिल्हा परिषदेतील प्र

फर्ग्युसनच्या मैदानावर 16-24 डिसेंबर या कालावधीत ‘पुणे पुस्तक महोत्सव’  

पुणे, दिनांक 24 – राष्ट्रीय पुस्तक न्यास (नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया) या संस्थेच्या वतीने  16 ते 24 डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर ‘पुणे पुस्तक महोत्सव-2023’ चे  आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष डॉ. रविंद्र आचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती. महोत्सवाच्या बोधचिन्हाचे पत्रकार परिषदेत अनावरण करण्यात आले. ‘ऑक्सफर्ड ऑफ इस्ट’ अशी ओळख असणाऱ्या पुणे शहरातील पुस्तक महोत्सवाचे हे पहिलेच पर्व असणार आहे.  

मराठे म्हणाले, ‘राष्ट्रीय कीर्तीच्या प्रकाशकांबरोबर इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, कन्नड आणि इतर भारतीय भाषांमधील विस्तृत पुस्तक संग्रहांचे प्रदर्शन या ठिकाणी भरविण्यात येणार आहे. दोनशेहून अधिक प्रकाशकांची दालने, सांस्कृतिक सादरीकरण, साहित्य विषयक विविध सत्रे, शालेय विद्यार्थी-महाविद्यालयीन युवकांसाठी विशेष उपक्रम, रमणीय खाद्यजत्रा अशा कार्यक्रमांचा महोत्सवात समावेश असेल.’

मराठे पुढे म्हणाले, ‘गोमती, लडाख, उज्जैन, शिमला, शिलाँग येथील महोत्सवांच्या यशातून प्रेरणा घेत एनबीटी-इंडियाने पुणे पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून पुस्तकांची आवड आणि वाचन संस्कृती जोपासण्याचा निर्धार केला आहे. आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवात सर्व वयोगटातील विविध प्रकारचे आकर्षक उपक्रम सादर करून साहित्यिक आनंदाची हमी देण्यात आली आहे.’

पांडे म्हणाले, ‘ पुणे शहरात वाचन संस्कृतीला पोषक वातावरण आहे. या शहरात पुस्तकांची जागतिक बाजारपेठ होण्याची क्षमता आहे. यातून पुस्तक महोत्सवाची संकल्पना पुढे आली. शहरातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा, साहित्य संस्था, ग्रंथालये, प्रकाशन संस्था, लेखक, अभ्यासक या सर्वांचा सहभाग घेऊन या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.’  

कुंटे म्हणाले, शिक्षण हे केवळ खडू आणि फळ्यापुरते मर्यादित नाही. जीवनातील सर्व अंगांचा विकास होणे शिक्षणात अभिप्रेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे महत्त्वाचे काम आहे.  हे काम या निमित्ताने होईल. हजारो पुस्तके या निमित्ताने पहायला मिळतील. विद्यार्थ्यांचे बौद्धिक आणि मानसिक पोषण करण्याची संधी या महोत्सवाच्या निमित्ताने मिळत आहे. 

पुण्यातील वाढती बांधकामे तातडीने थांबवा-खा. सुप्रिया सुळे आक्रमक

पुणे- पाण्याची समस्या , वाढते प्रदूषण , वाहतूक कोंडी , कचऱ्याची समस्या यामुळे मानवी जीवन धोक्यात येत असून तातडीने आता पुण्यातील वाढती बांधकामे काही महिन्यापुरती तरी थांबवा अशी मागणी करत १ डिसेंबरला घेरावो आंदोलनाची घोषणा आज येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. पुणे महापालिका आयुक्तांच्या भेटी नंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हि मागणी केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दुर्देवाने मागील 2 वर्षांत मनपा निवडणूक होऊ शकली नाही. यामुळे नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याची साेडवणूक करण्यासाठी मी मनपा आयुक्तांची भेट घेतली. हक्काचे लाेकप्रतिनिधी नसल्याने जनतेची माेठया प्रमाणात गैरसाेय हाेत आहे. महाराष्ट्रात माेठ्या प्रमाणात दुष्काळ असून पुण्यासारख्या शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीचे पाणी, गुरांचे पाणी, पिण्याचे पाणी याचे नियाेजन झाले नसल्यामुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे सरकारला माझी विनंती आहे की, पाण्याचे नियाेजन करा.

पुण्यात माेठया प्रमाणात बांधकामे सुरु आहेत. नागरिकांना पाणी, कचरा व्यवस्थापन, रस्ते, पायाभूत सुविधा पुरेशा उपलब्ध नाही. त्यामुळे आगामी काळात त्याचे स्वरुप आणखी गंभीर हाेईल. काही महिन्यांसाठी पुण्यातील बांधकाम थांबवा अशी माझी सरकारला विनंती आहे. पुण्यात माेठ्या प्रमाणात प्रदूषण हाेत आहे. त्यामुळे आजारांत वाढ झाली आहे. सरकारने पुण्याचा व राज्याचा पाण्याचा आढावा घ्यावा, प्रदूषण नियंत्रित करावे, वाहतूक काेंडी साेडवावी अशी आमची मागणी आहे. दुष्काळात टँकर माफिया जिवंत राहताे. त्यामुळे कर भरुन सुविधा मिळत नसतील तर पुणे मनपावर आम्ही आगामी काळात 1 डिसेंबरला घेराव घालू, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.सत्ता केवळ लाल दिवा व पक्ष फाेडण्यासाठी किंवा आयकर विभाग, सीबीआय, ईडी या यंत्रणांचा गैरवापर करण्यासाठी नसते. ती सर्वसामान्य लाेकांचे आयुष्यात चांगला बदल करण्याचे सत्ता एक साधन असते. या सरकारने जनतेला अनेक मोठी आश्वासने दिली. पण त्याची पूर्तता केली नाही.दिल्लीतील अदृश्य शक्ती महाराष्ट्राच्या सर्व गोष्टींत ढवळाढवळ करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी येथे बोलताना केली आहे. राज्यात ट्रिपल इंजिनचे खाेके सरकार सुरू आहे. पण दिल्लीची अदृश्य शक्ती महाराष्ट्रात सर्व गाेष्टींत ढवळाढवळ करते. त्यामुळे तीच राज्यात सरकार चालवते का? असा प्रश्न उपस्थिति होत आहे, असे त्या म्हणाल्यात.