Home Blog Page 1378

तुळशी विवाह सोहळा पारंपरीक पद्धतीने थाटात साजरा

पुणे : शुभमंगल सावधानचे स्वर कानी पडताच वधू-वरांवर अक्षता व पुष्पवर्षाव करणाऱ्या पारंपरिक वेशातील महिला… राधे कृष्ण, गोपाल कृष्णचा वऱ्हाडी मंडळींनी केलेला अखंड जयघोष आणि डोक्यावर कृष्णाची मूर्ती व तुळशी वृदांवन घेऊन काढलेली वरात… अशा थाटात पारंपरिक पद्धतीने तुळशी विवाह सोहळा मंडईतील साखरे महाराज मठात पार पडला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये सकाळी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मठापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने मंडईतील साखरे महाराज मठ येथे तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. एरवी वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक असलेल्या वऱ्हाडी मंडळींनी आज चक्क श्रीकृष्ण-तुलसी विवाह सोहळ्यानंतर परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होत, उत्तम आरोग्य व सुखी समाज याकरीता प्रार्थना केली. तब्बल ४० वर्षांहून अधिक काळ ही परंपरा सुरू आहे.

विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित मिरवणुकीचे चौका-चौकात उत्साहात स्वागत करत श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. मिरवणुकीत फुगड्या घालत फेर धरुन महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. दरबार ब्रास बँडदेखील सहभागी झाले होते. रांगोळीच्या पायघड्यांनी मिरवणुकीचा संपूर्ण मार्ग सुशोभित करण्यात आला होता. दगडूशेठ गणपती मंदिरापासून निघालेल्या मिरवणुकीचा समारोप समाधान चौक-रामेश्वर चौक-टिळक पुतळा मंडईमार्गे साखरे महाराज मठात झाला. त्यानंतर आयोजित विवाहसोहळ्याला पुणेकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी, अमोल केदारी, राजाभाऊ घोडके, विलास रासकर, ज्ञानेश्वर रासने, संतोष रसाळ, गजानन धावडे, बाळासाहेब सातपुते तसेच सुलोचना रासने, संगीता रासने, मृणाली रासने, राजश्री गोडसे, माई चव्हाण, लोंढे ताई यांसह महिलावर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.

 अक्का मध्ये कीर्ती सुरेश विरुद्ध राधिका आपटे:YRF ची रिवेंज थ्रिलर

आघाडीचा भारतीय स्टुडिओ यशराज फिल्म्सची स्ट्रीमिंग निर्मिती शाखा YRF एंटरटेनमेंटने त्याच्या पुढच्या टेंटपोल प्रोजेक्टला हिरवा कंदील दाखवला आहे, जो आज भारतातील दोन सर्वात प्रशंसित महिला कलाकारांना एकमेकांच्या विरोधात उभे करणारा एक उत्कट रिव्हेंज थ्रिलर आहे! या सुपर पिरियड थ्रिलरमध्ये कीर्ती सुरेश विरुद्ध राधिका आपटे असा सामना असणार आहे.

“कीर्ती सुरेश आणि राधिका आपटे या आज भारतातील सर्वात प्रतिभाशाली महिला कलाकारांपैकी दोन मानल्या जातात. ते आश्चर्यकारकपणे नैसर्गिक कलाकार आहेत ज्यांनी अविश्वसनीय परफॉर्मन्स सादर केल्यामुळे स्क्रीनवर संपूर्ण टूर डी फोर्स म्हणून कौतुक केले जाते! त्यामुळे, कीर्ती आणि राधिका एकमेकांच्या विरोधात आहेत ही वस्तुस्थिती अक्काला सध्या देशात बनवल्या जाणार्‍या सर्वात मनोरंजक स्ट्रीमिंग प्रोजेक्टपैकी एक बनवते!” एक ट्रेड सूत्रानी माहिती दिली

“ह्या सीरीज चे दिग्दर्शन नवोदित लेखक आणि दिग्दर्शक धर्मराज शेट्टी करत आहेत, अक्काबद्दलच्या त्याच्या दृष्टीने आदित्यचं लक्ष वेधून घेतलं आणि YRF एंटरटेनमेंटच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या टेंटपोल सीरीजपैकी अक्काला बनवण्यासाठी आदित्य ने लगेच प्रोजेक्टला  हिरवा कंदील दिला. या सीरिज ची प्लानिंग करण्यासाठी  या प्रोजेक्ट चा प्रत्येक तपशील YRF द्वारे हेतुपुरस्सर लपविला जाईल,” सूत्रांनी पुढे सांगितले 
YRF एंटरटेनमेंटची पहिली मालिका द  रेल्वे मैन ही सध्या जागतिक यशोगाथा आहे कारण ती Netflix वर जगभरातील टॉप 10 शोमध्ये ट्रेंड करत आहे! आर. माधवन, के के मेनन, दिव्येंदु शर्मा आणि बाबिल खान यांनी अभिनय केलेल्या 1984 च्या भोपाळ वायू दुर्घटनेतील समोर न आलेल्या नायकांना ही श्रद्धांजली आहे.

YRF एंटरटेनमेंटची दुसरी सीरीज मंडला मर्डर्स आहे, ही एक बहु-सीझन मालिका आहे जी एक भयंकर गुन्हेगारी थ्रिलर आहे . चंदिगड करे आशिकी चित्रपटात ट्रान्सजेंडर ची भूमिका साकारून समीक्षकांची प्रशंसा मिळवणारी वाणी कपूर, वैभव राज गुप्ता (गुलक फेम) सोबत, स्ट्रीमिंग स्पेसमध्ये पदार्पण करत मालिकेचे नेतृत्व करतेय . सुरवीन चावला (डीकपल्ड) आणि जमील खान (गुलक) प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेची निर्मिती सध्या सुरू आहे.

“YRF एंटरटेनमेंटला नवीन पण  वेगळे प्रोजेक्ट तयार करायचे आहेत जे भारतातील कंटेंट  लँडस्केपला आकार देण्यासाठी योगदान देऊ शकतात. प्रत्येक प्रकल्पासोबत, जागतिक प्रेक्षकांना अतुलनीय भारतीय कथा सांगण्याच्या आपल्या हेतूवर शिक्कामोर्तब करत आहे जे याआधी कोणीही पाहिले नाही. द रेल्वे मैन , हिट ठरले आहे आणि त्याला प्रेक्षकांकडून सर्वानुमते सकारात्मक रिव्यु आणि तोंडी समर्थन मिळाले आहे.

कोरोनाकाळात घोटाळा: पुणे महापलिकेच्या तत्कालीन आरोग्याप्रमुखांसह २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

पुणे : महापालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, मेडिकल ऑफिसर डॉ. अरुणा सूर्यकांत तरडे, डॉ. ऋषिकेश हनुमंत गार्डी यांच्या विरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये कोरोना काळात ८० ते ९० लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०२१ मध्ये कोरोना काळात कै. अरविंद बारटक्के रुग्णालय वारजे या ठिकाणी हा घोटाळा झाल्याचे पोलिसांनी संगितले .शासनाकडून नागरिकांसाठी आलेल्या टेस्टिंग किट वापरल्या असल्याचे भासविण्यात आले.  त्या टेस्टिंग किट प्रायव्हेट लॅब आणि खाजगी व्यक्तींना विकल्या. त्यामधून जवळपास ८० ते ९० लाख रुपयांची अफरातफर केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

वारजे पोलीस ठाण्यात महापालिकेचे आरोग्य अधिकारी सतीश बाबुराव कोळुसरे (वय ४२, रा. पिंपळे गुरव, नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर तारडे डॉ. गार्डी आणि डॉ. भारती यांनी आपापसात संगनमत केले. कोविड काळामध्ये कै. अरविंद बारटक्के हॉस्पिटलमध्ये कोरोना तपासणीसाठी लागणारे साहित्य पुरविण्यात आले होते. यामध्ये टेस्टिंग किट, सॅनिटायझर, औषधे यांचा समावेश होता. या सर्वांनी स्वतःच्या हितासाठी आणि स्वार्थासाठी अन्य साथीदारांना हाताशी धरले.सरकारी कागदपत्रांमध्ये अनेक फेरफार केले. खोटी कागदपत्रे तयार करून खरी असल्याचे भासवले. ही कागदपत्रे महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिकेला सादर करून पैसे कमावण्याच्या हेतूने कोरोना टेस्ट तपासणीसाठी येणाऱ्या लोकांच्या नोंदवहीमध्ये खोट्या नोंदी केल्या. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जैतापूरकर करीत आहेत.

दादा… धरणातले पाणी प्रदूषित होतेय .. सुप्रियाताईंनी घातली हाक

प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी , महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त बैठक लावण्याची मागणी

पुणे- एकीकडे शरद पवार या आपल्या राजकीय पितामहांशी फारकत घेऊन, त्यांचा पक्ष आणि समर्थक या दोहोंवर कबजा मिळवून पवार साहेबांच्या मनाविरुद्ध भाजप समवेत जाणाऱ्या अजित पवारांचे आणि पवारांची कन्या सुप्रिया यांच्यातील बहीण भावाच्या नात्याचा गोडवा अनेकांना ठाऊक आहे , कित्येक वेळा माध्यमांनी त्याला ठळक प्रसिद्धीही दिली आहे. मात्र पवार साहेबांबद्दल बोलाल तर खबरदार .. अशी तंबीही वेळप्रसंगी याच कन्येने दिलेली आहे. एकीकडे प्रियाचा आशीर्वाद , पित्याचं प्रेम आणि दुसरीकडे भावाचे सत्तेसाठी महत्वाकांक्षी राजकारण यात सुप्रिया सुळे पित्याच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या अनेकांनी आपल्या पित्याशी केलेली प्रतारणा (‘गद्दारी’)त्यांना मानवलेली नाही. मात्र यापूर्वीच्या काळात त्यांच्याशी असलेले स्नेहसंबंध देखील त्या विसरू शकलेल्या नाहीत . अशा अवस्थेत आता संपूर्ण पक्षाचा गाडा त्यांच्या खांद्यावर आहे. तो वाहताना त्यांना याच आपल्या नातलग अथवा जुन्या , सहकारी , आदरणीय अशा नेत्यांच्या विरोधातही प्रसंगी उभे ठाकावे लागणार आहे .. या पार्श्वभूमीचा विचार केला तर त्यांनी कालचे केलेले ट्वीट अजितदादांना टोला मानले तर गैर समजण्याचे कारण नाही अर्थात सुळे यांनी जरी ते लोकहितासाठी केले असले तरी त्याला राजकीय रंगही काहींनी दिला तर तो नाकारताही येणारा नाही . काय केले आहे सुप्रिया सुळे यांनी ट्वीट ते पहा ….


खडकवासला धरणातून पुणे शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु येथे साठणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरातील जलस्रोत प्रदूषित होत आहेत. त्याचा परिणाम धरणातील पाण्यावरही होत आहे. याशिवाय परिसरात डासांची पैदास होत असून हिवताप, मलेरिया यांसारखे आजारही पसरत आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे, महापालिका पुणे आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची एक संयुक्त बैठक लावणे आवश्यक आहे. तरी पालकमंत्री पुणे यांनी याबाबत वैयक्तिक लक्ष घालून ही बैठक लावावी ही विनंती.
अर्थात आता पालकमंत्री अजितदादा आहेत. आणि दादांचा आणि धरणातील पाण्याचा वारंवार संबध आलेला आहे . त्यांचा पुण्याच्या पाण्याचा प्रश्न , स्थिती यावर चांगला अभ्यास आहे . पण असे असतानाही त्यांना त्यांच्याच बहिणीला अशी विनंती करण्याची वेळ आली हे विशेषच मानावे लागणार आहे . आता अजितदादा यावर किती लक्ष देतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त दिव्यांगासाठी मोफत कॅलिपर्स वाटप शिबिराचे आयोजन

0

भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांचे सहकार्य; ५ डिसेंबरला बावधनमध्ये होणार शिबीर
पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सच्या सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स, कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांच्या सहकार्याने सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त, तसेच ‘इंटरनॅशनल डे ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज’ या दिनाचे औचित्य साधून पाचव्या मोफत कॅलिपर्स वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचे आयोजन सोमवार, दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स व कॉलेज ऑफ फिजिओथेरपी बावधन पुणे येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत करण्यात आले आहे. शिबिरात २५ जणांना कॅलिपर्सचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. यासाठी पूर्व नावनोंदणी आवश्यक असून, जयंत साठे (९८२०७३०४५३) आणि डॉ. कांचन गोडे (७२६२०११७७४) यांचेशी त्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
समाजातील दिव्यांग व्यक्तींना सर्वसाधारण जीवनमान जगता यावे, या दृष्टिकोनातून या कृत्रिम हात-पायांची निर्मिती करण्यात आली आहे. ज्या व्यक्तींना वरच्या टोकाच्या कृत्रिम अवयवांची गरज आहे, त्यांनाही उपकरणाच्या अधिक गतिशीलतेचा फायदा होतो. कृत्रिम पाय किंवा कृत्रिम अवयव, पाय विच्छेदन झालेल्या लोकांना अधिक सहजतेने हालचाल करण्यास मदत करू शकतात. काही लोकांना कृत्रिम पाय घेऊन चालण्यासाठी अजूनही छडी, वॉकर किंवा क्रॅचची आवश्यकता असते, तर काहींना मुक्तपणे चालता येते.

दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे त्यांच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण होते. या सामाजिक कार्यामुळे उपेक्षित-वंचित घटकास लाभ मिळणार असून, दिव्यांग बांधवांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्याचे अत्यंत महत्वाचे असे पुण्यकर्म सर्व स्तरासाठी कौतुकास्पद व अनुकरणीय आहे, असे सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया पुढे म्हणाले, “आपण समाजाचे काही तरी देणे लागतो व त्या ऋणातून गरजूंची सेवा घडावी, या उदात्त हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सूर्यदत्त’ यंदा रौप्य महोत्सव साजरा करत आहे. गेल्या २५ वर्षाच्या कालावधीत संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यात पुढाकार घेण्यात आला आहे. जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. कात्रज, येरवडा, पिरंगुट, किवळे व पिंपरी-चिंचवड येथून वाहन व्यवस्था (पिकअप-ड्रॉप) केली आहे.”

सामान्यांना निःशुल्क आरोग्य सेवेसाठी मुंबई महानगरपालिकेच्‍या रुग्‍णालयांत ‘झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी’ राबवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

0

मुंबई, : मुंबई महानगरपालिकेच्‍या रुग्‍णालयात देण्‍यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा व औषधोपचार नागरिकांना उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी ‘झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी’ राबविण्यासाठी सविस्तर आढावा घेऊन सर्वंकष अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांना दिले आहेत. ‘झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी’ राबविणारी मुंबई देशातली पहिली महापालिका ठरणार असून त्यामुळे आरोग्य सेवा पूर्णतः लोकाभिमुख व निःशुल्क उपलब्ध होतील.

ही योजना राबविण्यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्‍यात येणाऱ्या औषधे व संसाधने खरेदी प्रक्रियेमध्‍ये सुधारणा करण्‍याचे निर्देश देखील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.

मध्यंतरी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी के.ई.एम रुग्‍णालयाला भेट दिली होती. त्यावेळी रुग्ण व नागरिकांशी झालेल्‍या चर्चेदरम्यान काही त्रुटी निदर्शनास आल्या होत्या. महानगरपालिका रुग्‍णालयात उपलब्‍ध औषधे व संसाधनां व्‍यतिरिक्‍त नातेवाईकांमार्फत रुग्णांच्या उपचारासाठी खर्च केला जातो.

गरीब रुग्णांवर या खर्चाचा अतिरिक्त बोजा पडतो. आरोग्‍य उपचारावर होणाऱ्या (आऊट ऑफ पॉकेट एक्‍सपेंडिचर) खर्चामुळे साधारणतः १० टक्‍के नागरिक दारिद्रयरेषेखाली खेचले जातात. राष्‍ट्रीय स्‍तरावर विविध संस्‍थांनी केलेला अभ्‍यास व संशोधनातून निदर्शनास आल्याचे महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

गरीब रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयांमार्फत नि:शुल्क सेवा उपलब्ध व्हावी यासाठी “झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी” राबविण्याबाबत महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत. त्यासाठी यासंदर्भात सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका आयुक्त यांना दिले आहेत.

मुंबई महानगरपालिकेमार्फत ४ वैद्यकीय महाविद्यालय, १ दंत महाविद्यालय, १६ उपनगरीय रुग्णालये, ५ विशेष रुग्णालये, ३० प्रसुतिगृहे, १९२ दवाखाने सुरू आहेत. याखेरीज २०२ “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” देखील कार्यरत आहेत. या वैद्यकीय व्यवस्थेतील रुग्‍णालयांमध्ये ७१००, उपनगरीय रुग्णालयामध्ये ४०००, विशेष रुग्णालयात ३००० व इतर अशा एकूण सुमारे १५ हजार रुग्णशय्या आहेत. यामध्ये ५० हजार पेक्षा अधिक रुग्ण दररोज बाह्य रुग्ण सेवेचा लाभ घेतात. तसेच, वार्षिक सरासरी २० लाख पेक्षा अधिक रुग्ण आंतर रुग्ण सेवेचा लाभ घेतात.

लघु उद्योग भारतीकडून महाराष्ट्रात ‘एमएसएमई सक्षमीकरण’ विषयावर सर्वेक्षण मोहीम सुरू

0

उद्योगाच्या समस्यांसाठी सर्वेक्षणद्वारे मोहीम जाहीर

मुंबई, 23 नोव्हेंबर, 2023: लघु उद्योग भारती (LUB) या भारतातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांना सेवा देणाऱ्या समर्पित संस्थेने मुंबईत “एमएसएमईचे सक्षमीकरण – (टू मार्च टूवर्ड वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी)” नावाची नवीन सर्वेक्षण मोहीम जाहीर केली आहे. या सर्वेक्षणात बँकिंगसारख्या आठ प्रमुख विषयांचा समावेश आहे. लघु उद्योग भारती 1 लाखांहून अधिक उद्योजक, कारखाना मालक आणि सेवा प्रदात्यांकडून महाराष्ट्रातील सर्व प्रदेश आणि जिल्ह्यांतील उत्पादन उद्योगांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि अभिप्राय देण्यासाठी सर्वेक्षणाद्वारे कार्यक्रम आयोजित करेल. लघु उद्योग भारती व्यवसायांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि 45 दिवसांच्या अंदाजे वेळेत निराकरण करण्यासाठी सर्वेक्षणाचे परिणाम विश्लेषित करेल आणि राज्य सरकारसोबत सामायिक करेल.

लघु उद्योग भारती नोंदणीकृत सहभागींसोबत व्हॉट्सएप आणि ईमेलद्वारे सर्वेक्षण क्यूआर कोड (QR) शेअर करेल. इच्छुक व्यक्ती आणि संस्था कोड स्कॅन करून किंवा लघु उद्योग भारतीच्या वेबसाइटवरील फॉर्ममध्ये प्रवेश करून सर्वेक्षण करू शकतात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, सर्वेक्षणाशी लिंक करणारे क्यूआर कोड संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील एमआयडीसी (MIDC) आणि बिगर एमआयडीसी (Non MIDC) दोन्ही भागात असलेल्या सर्व औद्योगिक उद्यानांच्या बाहेर लावलेल्या बॅनरवर ठळकपणे प्रदर्शित केले जातील.याव्यतिरिक्त, क्यूआर कोड लघु उद्योग भारतीच्या मुख्य सोशल मीडिया पृष्ठांवर संकलित केले जातील. या व्यापक दृष्टिकोनाचा उद्देश अनेक भौतिक आणि डिजिटल चॅनेलचा लाभ घेऊन संपूर्ण प्रदेशातील भागधारकांना सर्वेक्षणाच्या संधीबद्दल जागरूकता वितरित करणे आहे. सहभागींच्या सोयीसाठी हे सर्वेक्षण इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.

लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष, श्री रवींद्र वैद्य-महाराष्ट्र म्हणाले की, “महाराष्ट्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे पॉवरहाऊस आहे आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराच्या (MSME) व्यवसायांचे सर्वात मोठे योगदानकर्ता आहे. हे भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात 15% पेक्षा जास्त, औद्योगिक उत्पादनात 20% आणि भारतीय निर्यातीत 20% योगदान देते. या डिजिटल सर्वेक्षणाद्वारे, रिअल-टाइममध्ये डेटाचे मूल्यांकन करणे आणि समस्यांचे जलद निराकरण करण्यासाठी 45-दिवसांच्या कालावधीत डेटामधून निष्कर्ष प्रदान करण्याचे आमचे लक्ष्य आहे.हे उद्योजक आणि व्यवसायांना त्वरीत समस्यांचे स्पष्टपणे निराकरण करण्यात मदत करेल. हे सर्वेक्षण व्यवसाय सुलभतेच्या संदर्भात या क्षेत्रासाठी एक मार्ग प्रदान करेल, ज्यामुळे विकासाला गती मिळण्यास मदत होईल. हे निष्कर्ष संबंधित अधिकाऱ्यांना समस्या मान्य करण्यासाठी आणि उपाय शोधण्यासाठी तयार संदर्भ म्हणून काम करतील. पोर्टलने या उद्योगासाठी झटपट काही निश्चित वेळेसह किती यशस्वीपणे समस्या सोडवल्या आहेत हे सर्वेक्षण दर्शवेल.”

लघु उद्योग भारतीच्या महाराष्ट्राचे सरचिटणीस भूषण मर्दे म्हणाले की, “पॉलिसी अॅडव्होकसी, पॉलिसी इंटरव्हेंशन, अंमलबजावणी हे प्रमुख मुद्दे आहेत ज्यांचे निराकरण करण्यावर लघु उद्योग भारती लक्ष केंद्रित करते. या सर्वेक्षणामागील विचार प्रक्रिया म्हणजे आम्ही निवडलेल्या विषयांवरील औद्योगिक अंतर दूर करणे आणि उद्योजक आणि व्यवसाय मालकांना आव्हानांवर मात करण्यास मदत करणे.बँकिंगशी संबंधित क्षुल्लक समस्या, व्यवसायासाठी जमिनीचे नमुने घेणे, नफा तोट्याचे गणितं मांडणे, वीज जोडणी मिळण्यास विलंब होणे, दाखल केलेल्या तक्रारींवर सरकारी अधिकाऱ्यांकडून त्वरित निराकरण न होणे इत्यादी बाबींवर या सर्वेक्षणाद्वारे लक्ष केंद्रित केले जाईल.

लघु उद्योग भारती बद्दल:

लघु उद्योग भारती ही १९९४ पासून भारतातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांची नोंदणीकृत अखिल भारतीय संस्था आहे. आज लघु उद्योग भारतीची सदस्यत्व देशभरात पसरलेली आहे. देशभरातील 250 शाखांसह 580 हून अधिक जिल्ह्यांमध्ये त्याचे सदस्यत्व आहे. लघु उद्योग भारती हे एमएसएमई क्षेत्राला संघटित करण्याच्या प्रामाणिक प्रयत्नात या क्षेत्राला ग्रासणाऱ्या विविध आजारांशी लढा देत आहे आणि एमएसएमईच्या मार्गात येणारे अडथळे दूर करत आहेत.

54 व्‍या इफ्फी मध्‍ये प्रसिध्‍द अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी अभिनय कलेविषयी घेतला ‘मास्टरक्लास’

गोवा 23 नोव्‍हेंबर 2023

54 व्या इफ्फी अर्थात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोलकाताच्या सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने प्रसिद्ध अभिनेते  पंकज त्रिपाठी यांच्या मास्‍टरक्लासचे आयोजन केले होते. या  सत्राचे सूत्रसंचालन प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि पत्रकार मयंक शेखर यांनी केले.

अभिनय कलेविषयी आपले विचार व्यक्त करताना  त्रिपाठी म्हणाले की, हे संपूर्ण जग  एक रंगभूमी  आहे,  आणि आपण सर्वजण आपआपल्या जीवनात वेगवेगळ्या भूमिका बजावत असतो. अभिनय म्हणजे वास्तविक जीवनातील भूमिकेची पुन्‍हा एकदा होणारी निर्मिती असते आणि त्‍यावेळी भावनांतून  इतरांचे  मनोरंजन केले जात असते.  प्रतिथयश, व्यावसायिक अभिनेता होण्यासाठी प्रत्येक गोष्‍टीविषयी मनामध्‍ये  सह-अनुभूती वाटणे आवश्यक आहे, असे त्रिपाठी म्हणाले.  अभिनय एक व्यापक उद्देश पूर्ण करतो. तसेच  विविध दृष्टीकोन समजून घेऊन व्यक्तीला अभिनयामुळे चांगला  मानव बनता येते,  असे आपल्याला वाटत असल्याचे, ‍ पंकज त्रिपाठी यांनी नमूद केले. “ज्यावेळी तुम्ही स्वत: दुस-या एखाद्या व्यक्तीच्या भूमिकेमध्‍ये शिरता आणि त्या व्यक्तीचे  विचार, त्यांच्या भावना आणि त्यांचे दृष्टीकोन समजून घेता,  तेव्हा तुम्ही एक चांगला माणूस बनता.” असं यावेळी त्रिपाठी म्हणाले.

अर्थात हे घडत असताना  तुम्ही इतरांच्या जीवनातील चांचांगल्या वाईट घटना, गुण यांचे विश्लेषण करीत असता, निरीक्षण करून समजून घेत असता, त्यामुळेच  स्वतःला चांगले बनवण्यासाठी त्या पात्राकडून  – त्या व्यक्तिमत्वाकडून तुम्ही  शिकता.

नैसर्गिक अभिनय तुमच्या वठला जावा, किंवा तुमचा अभिनय नैसर्गिक वाटला पाहिजे, यासाठी  शरीर आणि मन संतुलित ठेवण्‍याचे महत्त्व  कलाकार पंकज त्रिपाठी यांनी अधोरेखित केले. “स्वतःला व्यक्तिरेखेनुसार घडवण्यासाठी मन आणि शरीराची लवचिकता आणि मोकळेपणा महत्त्वाचा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. ज्यावेळी  तुम्ही मेंदूतील पात्राला  काल्पनिक परिस्थितीमध्‍ये तुम्हाला हवे ते काम करण्‍यास   भाग पाडता त्याचवेळी पडद्यावर भावनांचे मनोरंजन होत असल्याचे प्रदर्शन होते. आणि यासाठी स्वतःला, मनाला तसे  प्रशिक्षित करावे लागते.

स्टार आणि अभिनेता यांच्यातला फरक सांगताना पंकज त्रिपाठी म्हणाले, “एक अभिनेता नेहमीच त्याच्या वाट्याला आलेल्या भूमिकेमध्‍ये  प्रयोग करण्याची संधी घेऊ शकतो.” अभिनेत्याला  भूमिका शोधण्याचे स्वातंत्र्य  असते.  मात्र प्रत्यक्ष आयुष्यापेक्षा मोठी प्रतिमा निर्माण करणाऱ्या स्टारडमला काही मर्यादा आहेत. प्रेक्षकांच्याही  मनात स्टारने असेच काहीतरी मोठे दाखवावे अशा अपेक्षा असतात. मात्र कलाकार म्हणून  प्रयोगाचे महत्त्व अधोरेखित करताना त्रिपाठी म्हणाले,  “प्रयोगामुळे अभिनय जिवंत राहतो.”

अभिनेता म्हणून आपल्या  सुरुवातीच्या वर्षांमध्‍ये आपल्याला कराव्या लागलेल्या  संघर्षाची माहिती देवून, या आव्हानाला आपण मात केली,  असे त्रिपाठी म्हणाले.   ज्यावेळी तुमच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण होतो, त्यावेळी अभिनय दुय्यम बनतो, असे ते म्हणाले.  तथापि, कधी ना कधी  पुढे जाउूच, अशी  आशा मनात बाळगून होतो, पण केवळ आशा पुरेशी नाही, आत्म-मूल्यांकन देखील आवश्यक आहे. तुम्हाला हे का करायचे आहे हे स्वतःला विचारा,” असे त्रिपाठी  पुढे म्हणाले. प्रेक्षकामध्‍ये उपस्थित असलेल्या  महत्त्वाकांक्षी, उदयोन्मुख कलाकार, अभिनेते आणि चित्रपट निर्मात्यांनी संशोधन, निरीक्षण आणि आपल्या भवतालच्या गोष्‍टींचे चिकित्सक दृष्‍टीने  अन्वेषण करण्‍याचे आवाहनही त्यांनी केले.

मास्टरक्लासच्या चर्चेचे सूत्रधार मयंक शेखर म्हणाले की, प्रसिध्‍दीचे वलय प्राप्त झालेले  असूनही त्रिपाठी यांच्याकडे असलेली नम्रता कौतुकास्पद आहे.  या टिपणीवर प्रतिसाद देताना पंकज  त्रिपाठी म्हणाले की,  जेव्हा एखादी व्यक्ती आपली मुळे विसरते तेव्हाच अहंकाराचा प्रवेश होतो. “पंधरा वर्षांपूर्वी कोणीही मला ओळखत नव्हते, आणि  15 वर्षांनंतर कदाचित  कोणीही माझी आठवणही काढणार  नाही.’’ असे सांगून त्रिपाठी म्हणाले,  इथे प्रत्येकाने जागरूक आणि सतर्क राहण्‍याची गरज असल्याचे मत व्यक्त करून त्रिपाठी म्हणाले की, “ज्यावेळी  प्रसिद्धी आणि पैसा यांचा सदुपयोग आणि चांगल्या हेतूसाठी केला जातो तेव्हाच जीवन सार्थक बनते.”

मास्टरक्लासमुळे  एका कलाकाराचा कलाप्रवास   आणि वैयक्तिक पातळीवर त्या कलाकाराने गाठलेली उंची, त्यांच्या  अभिनयाचा सखोल अभ्यास करता आला.  यामुळे प्रेक्षकांना अभिनेता पंकज  त्रिपाठी यांच्याकडे असलेला अनुभव, त्‍यांचे ज्ञान यांची माहिती घेता आली.

विमल पानमसाला, आरएमडी पानमसाला, व्ही १ सुगंधित तंबाखु व एम सुगंधित तंबाखु जप्त

पुणे, दि. २३: अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने बोराडेवाडी, मोशी प्राधिकरण परिसरात प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य पानमसाला, सुगंधित तंबाखू आदींचा सुमारे ६ लाख ४९ हजार २० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून पदार्थ साठवणूक व वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.

या कारवाईत वाहन क्रमांक एमएच १४ एचयु २०४२ या वाहनातून प्रतिबंधित असलेला विमल पानमसाला, आरएमडी पानमसाला, व्ही १ सुगंधित तंबाखु व एम सुगंधित तंबाखु इत्यादी पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्रीसाठी साठवण करणारे आरोपी किशोर हरकचंद सुंदेचा यांच्याविरूद्ध भोसरी औद्यागिक वसाहत पोलीस ठाणे, मोशी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांचे जनहित व जनआरोग्याच्या दृष्टिकोनातून १८ जुलै २०२३ च्या आदेशानुसार राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाकु, सुगंधित सुपारी इत्यादी तंबाखु जन्य पदार्थावर उत्पादक, साठा, वितरण, व विक्री यावर १ वर्षाकरिता बंदी घातलेली आहे.

प्रतिबंधीत गुटखा, पान मसाला इत्यादीच्या विक्रीबाबतची माहिती असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधण्याचे आवाहन सह आयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे यांनी केले आहे.

सर्व समाजात एकजूटता वाढू दे… विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे विठुरायाला साकडे…

महाराष्ट्र राज्यातील दुष्काळी तालुक्यांबाबत न्यायीक मार्ग काढण्यासाठी आशीर्वाद दे

पुणे दि. २३ : महाराष्ट्राचे काही तालुके दुष्काळग्रस्त झालेले आहेत, प्रदूषणाचा प्रश्न वाढला आहे, आरक्षणाच्या प्रश्नावर वेगवेगळे मोर्चे निघत आहेत. या सर्वांमधून न्यायिक मार्ग काढण्याची संधी आणि बुद्धी आमच्या सरकारला द्यावी अशी प्रार्थना महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी पुण्यातील निवडुंगा विठ्ठल मंदिरात विठ्ठलाच्या चरणी केली. आज कार्तिकी एकादशीनिमित्ताने डॉ.गोऱ्हे यांच्या हस्ते मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी यांची सर्व धार्मिक विधी व महापूजा संपन्न झाली.
डॉ.गोऱ्हे पुढे म्हणाल्या की,पुढील वर्षाच्या डिसेंबर महिन्यातील कार्तिकी एकादशीला केंद्र व राज्य अशा दोन्ही ठिकाणच्या निवडणुका झालेल्या असतील अशा वेळी केंद्रात नरेंद्र मोदी हे परत पंतप्रधान व्हावे तसेच नामदार एकनाथ शिंदे यांना परत मुख्यमंत्री म्हणून संधी मिळावी अशी प्रार्थना केल्याचेही त्यांनी सांगितले, यावेळी ऐतिहासिक वारसा असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिरातील विठ्ठलाच्या गाभाऱ्याला चांदीची प्रभावळ स्वखर्चातून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले, याप्रसंगी डॉ. गोऱ्हे काही वेळ महिला वारकऱ्यांच्या समवेत गळ्यात टाळ घेत भजनात रंगल्या होत्या.

यावेळी डॉ.गोऱ्हे यांच्या समवेत स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, निवडुंग विठोबा मंदिराचे पुजारी रविंद्र पाधे, विश्वस्त किशोर बाबर, ऍड अरुण स्वामी अनेक शिवसैनिक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

डॉ. अमोल कोल्हे यांचे सकाळी अपात्रता यादीतून नाव वगळलं, दुपारी ते मंत्रालयात अजित पवारांच्या भेटीला …पण

शिवसेना आमदार अपात्रतेची गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यात ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू याची उलटतपासणी घेण्यात आली. यावेळी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी व अनिल साखरे आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला. या प्रकरणी येत्या मंगळवारी पुढील सुनावणी होणार आहे.तत्पूर्वी, ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांवर सुनावणीत शिंदे गटाला झुकते माप देण्याचा आरोप केला. साक्ष, पुरावे व प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी ठराविक वेळ दिली आहे. त्यानंतरही विधानसभा अध्यक्ष शिंदे गटाला झुकते माप देत आहेत. याद्वारे सत्ताधारी गटाला वाढीव वेळ देऊन कारवाई लांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सुनील प्रभू यांनी विधानभवनाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

मुंबई–राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मंत्रालयात राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये अँटीचेंबरमध्ये भेट झाल्याची माहिती आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, ही भेट मतदारसंघातील विकासकामाबाबत होती, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

नुकतेच अजित पवार गटाकडून लोकसभेतील खासदारांवर कारवाई करण्यासाठी पत्र देण्यात आले, यामध्ये खासदार अमोल कोल्हे यांचे नाव वगळण्यात आले आहे. अमोल कोल्हे यांनी आधीच अजित पवार गटाला प्रतिज्ञापत्र सादर करत आपला पाठिंबा दर्शवला आहे. परंतू त्यांनी शरद पवार गटाला देखील शपथपत्र दाखवत त्यांच्यासोबत असल्याचा दावा केला आहे. शरद पवार गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यांना, बैठकांना डॉ. अमोल कोल्हे यांनी हजेरी लावली होती.

शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा झाली. मात्र ही भेट फक्त मतदारसंघातील विकास कामांबाबत असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले. तसेच मी शरद पवार यांच्या सोबतच आहे असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गेली अनेक वर्ष पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे असेल, इंद्रायणी मेडीसीटी असेल या अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी अजितदादांनी महत्त्वाची भूमिका सुरुवातीपासून घेतली आहे. या प्रकल्पांचा पाठपुरावा आणि इतर प्रकल्पांबाबत चर्चेकरिता ही भेट झाली असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले.

पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा प्रकल्प लवकरात लवकर व्हावा ही मागणी होणं गरजेचं आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारत या दोन्ही रेल्वे नेटवर्कला शिरूर मतदारसंघ जोडला जाणार असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले.

चौघांची खासदारकी रद्द करा, अजित गटाची मागणी
शरद पवार गटानं अजित पवार गटाचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना अपात्र करा, अशी मागणी करणारं पत्र राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांना पत्र लिहून केली आहे. आता यालाच पलटवार म्हणून अजित पवार गटानंही शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात याचिका लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे दाखल केली आहे.शरद पवार गटाविरोधात अजित पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार गटानं अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांना अपात्र ठरवण्यासंदर्भात राज्यसभेच्या सभापतींना एक पत्र लिहिलं. आता यालाच अजित पवार गटाकडून पलटवार करत प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राज्यसभेतील शरद पवार, वगळता वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. तर, लोकसभेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांना वगळून श्रीनिवास पाटील, फैजल मोहम्मद यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे.

54व्या इफ्फीचा अर्धा टप्पा पूर्ण: महोत्सवाचा मिडफेस्ट चित्रपट म्हणून उद्या “अबाउट ड्राय ग्रासेस” या तुर्की चित्रपटाचे प्रदर्शन होणार

गोवा23 नोव्‍हेंबर 2023

गोवा येथे आयोजित 54 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा मध्यावधी टप्पा उद्या पूर्ण होत आहे, त्यानिमित्त मिडफेस्ट चित्रपट म्हणून नुरी बिल्ज सेलन यांनी दिग्दर्शित केलेला “अबाउट ड्राय ग्रासेस” हा उत्कृष्ट तुर्की चित्रपट उद्या सादर करण्यात येणार आहे. रोचक कथाविषय आणि कलाकारांचे विलक्षण सादरीकरण यांसाठी प्रसिद्ध झालेल्या या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव प्राप्त केला आहे. कान चित्रपट महोत्सव 2023 मध्ये या चित्रपटातील अभिनेत्रीला  सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

“अबाउट ड्राय ग्रासेस” या चित्रपटाने कान्स चित्रपट महोत्सव 2023, टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023, कार्लोव्ही वॅरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023, बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 तसेच साओ पाऊलो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 यांसह   जगभरातील इतर अनेक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांमध्ये याआधीच आपला ठसा उमटवला आहे. या चित्रपटाची आकर्षक कथावस्तू जागतिक पातळीवरील प्रेक्षकांना भावली असून त्यामुळे चित्रपटीय क्षितिजावर हा चित्रपट ठळकपणे उठून दिसणारा झाला आहे.

“अबाउट ड्राय ग्रासेस” हा चित्रपट पणजी येथील आयनॉक्सच्या पडदा क्र.1 वर उद्या म्हणजे 24 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी साडेपाच वाजता प्रदर्शित करण्यात येईल. या सादरीकरणादरम्यान चित्रपटाचे कलाकार आणि इतर तंत्रज्ञ यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

चित्रपटाच्या कथावस्तूची एक झलक

अनिवार्य कर्तव्य पार पाडल्यानंतर, एका छोट्याश्या गावाच्या हद्दीतून सुटका करून घेण्याच्या  एका तरुण शिक्षिकेच्या आकांक्षेभोवती या चित्रपटाची कथा फिरते. उदासवाण्या जीवनामुळे आलेल्या निराशेला तोंड देत असलेल्या मुख्य पात्राच्या दृष्टीकोनाला नुरे या सहकाऱ्याने दिलेल्या पाठींब्याने चित्रपटाला अनपेक्षित वळण मिळते.

दिग्दर्शक नुरी बिल्ज सेलन

इस्तंबूलमध्ये 1959 मध्ये जन्मलेल्या नुरी बिल्ज सेलन यांनी स्वतःला चित्रपट निर्मिती क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती म्हणून प्रस्थापित केले आहे. फेस्टीव्हल द कान मध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘कोझा’ या लघुपटाने त्यांचा दिग्दर्शकीय प्रवास सुरु झाला. वर्ष 1998 मध्ये भरलेल्या बर्लिन चित्रपट महोत्सवात त्यांच्या ‘कसाबा’ या चित्रपटाला मिळालेला कॅलिगारी पुरस्कार, वर्ष 2003 मध्ये कान येथे भरलेल्या महोत्सवात त्यांच्या ‘युझक’ या चित्रपटाने पटकावलेले ग्रां प्री आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कार यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्यामध्ये समावेश होतो. त्यांच्या ‘विंटर स्लीप’ या चित्रपटाने 2014 मध्ये भरलेल्या 67 व्या कान चित्रपट महोत्सवात पाल्मा डोर पुरस्कार मिळवला. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म साठीच्या अकादमी पुरस्कारांसाठी तुर्कस्थानतर्फे “अबाउट ड्राय ग्रासेस” सह सेलन यांच्या एकूण सहा चित्रपटांच्या प्रवेशिक सादर करण्यात आल्या आहेत.

पुनर्संचयित केलेले सात जुने चित्रपट इफ्फीमध्ये प्रदर्शित

गोवा 23 नोव्‍हेंबर 2023

दिग्दर्शक केतन आनंद यांनी जुने चित्रपट पुनर्संचयित करण्याच्या केंद्र सरकार आणि एनएफडीसीच्या प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले, “त्यांनी प्रिंट घेतली आहे आणि ती पुनर्संचयित केली आहे, हे एक उल्लेखनीय तंत्रज्ञान आहे मात्र  प्रक्रिया क्लिष्ट आहे ज्यामध्ये फ्रेम बाय फ्रेम रिस्टोरेशन करावे लागते.” ते आज गोव्यात 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलत होते.

1962 च्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेला ‘ हकीकत ‘ चित्रपट पुनर्संचयित करण्यात आल्याबद्दल आनंद यांनी सांगितले की या चित्रपटात  युद्धाची मानवी बाजू आणि सर्व अडचणींवर सैनिकांनी केलेली मात याचे अचूक चित्रण केले आहे. ते पुढे म्हणाले की त्यांच्या वडिलांच्या कलाकृतीत  कुठलीही छेडछाड केलेली  नाही आणि ती अबाधित ठेवली आहे  आणि त्याची रंगीत आवृत्ती इफ्फी 54 मध्ये प्रदर्शित करण्यात आली. “कोणीही कृष्णधवल  काढून टाकू शकत नाही मात्र रंगीत आवृत्ती युवा पिढीसाठी , त्यांच्यासाठी आकर्षक बनवण्यासाठी केली आहे ,” असे आनंद म्हणाले . केतन आनंद यांनी  हकीकत 2 ची आणि महान अभिनेते देव आनंद यांच्यावर पुढील वर्षी एक वेब सिरीज बनवण्याची घोषणा केली.

वैभव आनंद म्हणाले, “योग्य तंत्रज्ञानाच्या  अभावामुळे आपण यापूर्वी अनेक चित्रपटांच्या प्रिंट गमावल्या आहेत.  ही एक खर्चिक प्रक्रिया कशी आहे हे सांगताना सेल्युलॉइड आवृत्त्या जतन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

ते पुढे म्हणाले, “डिजिटल माध्यमाकडे वळणे चांगलेच आहे”, पण डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ घेताना, ‘क्लासिक’ श्रेणीत गणल्या जाणाऱ्या चित्रपटांच्या मूळ सेल्युलॉइड आवृत्तीचे जतन करणेही तेवढेच महत्वाचे आहे.

वैभव आनंद यांनी, चित्रपट पुनर्संचयन प्रक्रियेमधील गुंतागुंत आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक कौशल्याचा उल्लेख करत, या कामासाठी नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडियाच्या (एनएफएआय) प्रयत्नांची प्रशंसा केली. ते म्हणाले की, जुन्या क्लासिक चित्रपटांबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी इफ्फीसारखे आणखी महोत्सव आयोजित केले जातील. हा उपक्रम मर्यादित साधन-संपत्ती असलेल्या देशाच्या दुर्गम भागातील कलाकारांना त्यांच्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्यासाठी आणि चित्रपटसृष्टीत संधी मिळण्यासाठी व्यासपीठ कसे उपलब्ध करून देईल यावर त्यांनी प्रकाश टाकला.

“माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मुक्त हस्ते निधी पुरवलेल्या, राष्ट्रीय फिल्म हेरिटेज मिशन अंतर्गत काळजीपूर्वक पुनर्संचयित करण्यात आलेल्या सात क्लासिक चित्रपटांचे प्रदर्शन करण्यासाठी आपण एकत्र आलो आहेत. सामुहिक प्रयत्नांचा कळसाध्याय ठरणारा हा क्षण  54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महत्वाचा ठरणार आहे.” माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे महोत्सव संचालक आणि सहसचिव (चित्रपट) प्रितुल कुमार यांनी सांगितले.

नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन आपल्या सिनेमॅटिक वारशाचा अमूल्य ठेवा जतन करण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचा दाखला आहे. हा एक असा प्रवास आहे, जो आपली सांस्कृतिक ओळख घडवण्यामध्ये आणि कथाकथनाच्या कलेचा आस्वाद घेण्याची क्षमता विकसित करण्यामध्ये आपल्या  सिनेमॅटिक वारशाच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करतो. NFDC-NFAI गेले अनेक महिने क्लासिक चित्रपटांच्या जतनाचे काम करत असून, या ठिकाणी चित्रपटाची प्रत्येक चौकट काळजीपूर्वक पुनर्संचयित केली जात आहे. आपला सिनेमॅटिक इतिहास जतन करणे, आणि आज आपण ज्या प्रकारात चित्रपट पाहतो, त्या 4K रिझोल्यूशनमध्ये ते पाहता यावेत, हे याचे उद्दिष्ट आहे.

नगर रचना विभागाच्या शिपाई पदाची परीक्षा २५ नोव्हेंबर रोजीसंकेतस्थळावरुन प्रवेशपत्रे डाऊनलोड करुन घेण्याचे आवाहन

पुणे, दि. २३: नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील १२५ रिक्त पदे ऑनलाईन परीक्षेद्वारे भरण्यासाठी टीसीएस या संस्थेच्या माध्यमातून २५ नोव्हेंबर रोजी राज्यातील ३६ जिल्ह्यातील ५४ केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आलेली असून उमेदवारांनी त्यांची प्रवेशपत्रे विभागाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करून घ्यावीत, असे आवाहन नगर रचना विभागाने केले आहे.

शिपाई पदाच्या परीक्षेची उद्घोषणा नगर रचना विभागाने यापूर्वीच त्यांच्या संकेतस्थळावर केली आहे. अर्ज सादर करतेवेळी सहायक पुरविण्याची मागणी केलेल्या दिव्यांग उमेदवारांना विभागातर्फे परीक्षा केंद्रावर सहायक उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

परीक्षेची प्रवेशपत्रे विभागाच्या संकेतस्थळावर उमेदवाराच्या लॉगीन आयडीवर उपलब्ध करुन देण्यात आलेली असून ती प्रवेशपत्रे उमेदवारांनी त्वरित डाऊनलोड करुन सर्व उमेदवारांनी परीक्षेस उपस्थित राहण्याचे आवाहन, नगर रचना पुणे विभागाचे सहसंचालक तथा राज्यस्तरीय निवड समितीचे (गट ड) अध्यक्ष स. म. पवार यांनी केले आहे.

यंत्रणांनी समन्वयातून आळंदी यात्रा यशस्वी करावी- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे, दि. २३: आरोग्य, नगरपालिका, पंचायत समिती, पाणीपुरवठा व स्वच्छता, आपत्तीव्यवस्थापन, महावितरण, पोलीस आदी सर्वच विभागांनी योग्य समन्वय ठेऊन आळंदी यात्रा उत्साहात पार पडेल याचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

कार्तिकी एकादशी निमित्त श्री क्षेत्र आळंदी येथे होणाऱ्या आळंदी कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, खेडचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले, श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त ॲड. विकास ढगे पाटील, योगी निरंजननाथ, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदींसह विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी, वारकरी संप्रदायचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. देशमुख यावेळी म्हणाले, दरवर्षी भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व विभागांतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्नपूर्वक हा सोहळा यशस्वी करावा. यात्रेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी आवश्यक तो औषधांचा साठा, ऑक्सिजन साठा उपलब्ध ठेवावा. १०२ सेवेच्या आणि १०८ सेवेच्या रुग्णवाहिका सुसज्ज ठेवाव्यात. स्रोतांच्या ठिकाणी तसेच टँकरच्या पाण्याचे नमुन्यांची तपासणी करावी तसेच निर्जंतुकीकरण करावे. खासगी रुग्णालयातील खाटाही आरक्षित करुन ठेवाव्यात, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालये आणि स्वच्छतेचे योग्य नियोजन करावे. गर्दीच्या जवळ, दिंड्यांलगत फिरती शौचालये ठेऊन त्याठिकाणी पाणी, विजेची व्यवस्था तसेच मनुष्यबळाची नेमणूक करावी. महावितरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने वीज पुरवठा आणि वीज यंत्रणा सुरळीत राहील तसेच कोणतीही दुर्घटना होणार नाही याबाबत सर्व त्या उपाययोजना कराव्यात. दिंड्यांना गॅसचा पुरवठा तसेच केरोसीन पुरवठ्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. डासांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नियमित धुरळणी करावी.

पोलीस विभागाने गर्दी नियंत्रण तसेच अनुचित दुर्घटना घडू नये याठी उपाययोजना कराव्यात. वाहतूक सुरळीत सुरू रहावी यासाठी वाहतूक वळविण्याबाबतचे आदेश त्वरीत निर्गमीत करावेत. पीएमपीएमएल व एसटीने पुरेशा प्रमाणात बसेसची व्यवस्था ठेवावी. नदीमध्ये स्नान करणारे भाविक पाहता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने पथके तसेच आवश्यक संख्येने बोटी तैनात ठेवाव्यात. आळंदी नगरपरिषद, पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आपली अग्नीशमन वाहने सतर्क ठेवावीत, आदी सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

नदीमध्ये सध्या असलेले अस्वच्छ पाणी वाहून जावे यासाठी यात्रेस प्रारंभ होण्यापूर्वी तीन दिवस अगोदरपासून वडिवळे धरणाचे पाणी सोडण्याचे नियोजन करावे, असेही डॉ. देशमुख यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

उपविभागीय अधिकारी श्री. कट्यारे यांनी यात्रेच्या अनुषंगाने केलेल्या आणि करावयाच्या उपाययोजनांबाबतची माहिती दिली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि पंचायत समितीच्या सहायक गट विकास अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात केलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने माहिती सादर केली. गतवर्षीपेक्षा अधिक संख्येने एकूण ४०० फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या यात्रेसाठी येणारी भाविक संख्या मोठ्या प्रमाणात लगतच्या ग्रामीण भागात मुक्काम करत असल्याने त्या ठिकाणी देखील पाणी, स्वच्छता, वीज आदींबाबत योग्य नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

बैठकीस पोलीस, आरोग्य, अन्न व औषध प्रशासन, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्नीशमन दल, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा आदी यंत्रणांचे अधिकारी यांच्यासह वारकरी महामंडळचे उपाध्यक्ष डी. डी. भोसले पाटील आदी उपस्थित होते.