पुणे- पाण्याची समस्या , वाढते प्रदूषण , वाहतूक कोंडी , कचऱ्याची समस्या यामुळे मानवी जीवन धोक्यात येत असून तातडीने आता पुण्यातील वाढती बांधकामे काही महिन्यापुरती तरी थांबवा अशी मागणी करत १ डिसेंबरला घेरावो आंदोलनाची घोषणा आज येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. पुणे महापालिका आयुक्तांच्या भेटी नंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हि मागणी केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दुर्देवाने मागील 2 वर्षांत मनपा निवडणूक होऊ शकली नाही. यामुळे नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याची साेडवणूक करण्यासाठी मी मनपा आयुक्तांची भेट घेतली. हक्काचे लाेकप्रतिनिधी नसल्याने जनतेची माेठया प्रमाणात गैरसाेय हाेत आहे. महाराष्ट्रात माेठ्या प्रमाणात दुष्काळ असून पुण्यासारख्या शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीचे पाणी, गुरांचे पाणी, पिण्याचे पाणी याचे नियाेजन झाले नसल्यामुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे सरकारला माझी विनंती आहे की, पाण्याचे नियाेजन करा.
पुण्यात माेठया प्रमाणात बांधकामे सुरु आहेत. नागरिकांना पाणी, कचरा व्यवस्थापन, रस्ते, पायाभूत सुविधा पुरेशा उपलब्ध नाही. त्यामुळे आगामी काळात त्याचे स्वरुप आणखी गंभीर हाेईल. काही महिन्यांसाठी पुण्यातील बांधकाम थांबवा अशी माझी सरकारला विनंती आहे. पुण्यात माेठ्या प्रमाणात प्रदूषण हाेत आहे. त्यामुळे आजारांत वाढ झाली आहे. सरकारने पुण्याचा व राज्याचा पाण्याचा आढावा घ्यावा, प्रदूषण नियंत्रित करावे, वाहतूक काेंडी साेडवावी अशी आमची मागणी आहे. दुष्काळात टँकर माफिया जिवंत राहताे. त्यामुळे कर भरुन सुविधा मिळत नसतील तर पुणे मनपावर आम्ही आगामी काळात 1 डिसेंबरला घेराव घालू, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.सत्ता केवळ लाल दिवा व पक्ष फाेडण्यासाठी किंवा आयकर विभाग, सीबीआय, ईडी या यंत्रणांचा गैरवापर करण्यासाठी नसते. ती सर्वसामान्य लाेकांचे आयुष्यात चांगला बदल करण्याचे सत्ता एक साधन असते. या सरकारने जनतेला अनेक मोठी आश्वासने दिली. पण त्याची पूर्तता केली नाही.दिल्लीतील अदृश्य शक्ती महाराष्ट्राच्या सर्व गोष्टींत ढवळाढवळ करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी येथे बोलताना केली आहे. राज्यात ट्रिपल इंजिनचे खाेके सरकार सुरू आहे. पण दिल्लीची अदृश्य शक्ती महाराष्ट्रात सर्व गाेष्टींत ढवळाढवळ करते. त्यामुळे तीच राज्यात सरकार चालवते का? असा प्रश्न उपस्थिति होत आहे, असे त्या म्हणाल्यात.