Home Blog Page 1374

देशाच्याअमृत काळाकडून स्वर्णिम काळाच्या दिशेने प्रवासात युवा पिढी महत्वाची भूमिका बजावणार- केंद्रीय मंत्री अनुरागसिंह ठाकूर

पुणे, 11 मार्च 2023 

भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहयोगाने आज पुणे इथल्या सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी (SIU), मध्ये चौथी Y20 सल्लामसलत बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री, अनुराग सिंह ठाकूर, उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे अध्यक्ष, डॉ.संदीप वासलेकर यांनी कार्यक्रमात बीजभाषण दिले. सिम्बायोसिस चे संस्थापक आणि अध्यक्ष, आणि सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलपति प्रा. (डॉ.) एस. बी. मुजुमदार, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे संचालक पंकज सिंह, Y20 इंडियाचे अध्यक्ष अनमोल सोवित, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या उप कुलगुरू रजनी गुप्ते हे देखील यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारण मंत्री, अनुराग सिंग ठाकूर म्हणाले, “मला पुण्यात आल्याचा आनंद होत आहे, जे भरभराटीला आलेले उत्पादन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि एक अग्रगण्य शैक्षणिक केंद्र आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. 10 पेक्षा जास्त विद्यापीठे आणि 100 संस्थांसह, हे शहर अनेक पिढ्यांसाठी ज्ञान आणि संस्कृतीचा दीपस्तंभ ठरले असून, ते  जगभरातील विद्यार्थी आणि प्रज्ञावंतांना आकर्षित करत आहे. सिम्बायोसिस सारख्या संस्था जगभरातील हजारो विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत आहेत. Y20 कार्यक्रमाच्या आयोजनासाठी यापेक्षा चांगले ठिकाण असू शकत नाही. अशा संस्था बदलाची बीजे पेरतात आणि जोपासतात.”

कार्यक्रमामधील मोठ्या प्रमाणातील उपस्थितीबद्दल समाधान व्यक्त करून ते म्हणाले, “या सल्लामसलत परिषदेला 44 देश आणि तिथल्या 97 पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित आहेत, याबद्दल मला आनंद वाटत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये झालेल्या अशा प्रकारच्या 36 कार्यक्रमांचे विजेते असलेले 72 विद्यार्थी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत.”  

भारताच्या आणि जगाच्या विकासामध्ये युवा वर्गाच्या योगदानाच्या महत्त्वाविषयी बोलताना मंत्री म्हणाले, ” सध्याच्या काळात युवावर्ग हा समान हितधारक आहे त्यांची भूमिका आज आणि आताही महत्त्वाची आहे. आजूबाजूला पाहिले तर दिसेल की जगात सर्वाधिक वेगाने विकसित होणारी महाकाय अर्थव्यवस्था असल्याने भारत जगामध्ये ठळक बातम्यांचा विषय बनला आहे. 2014 मध्ये जगातील 5 नाजूक  अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट असलेले आता आम्ही जगातील आघाडीच्या पाच अर्थव्यवस्थांपैकी एक बनलो आहोत. आठ वर्षांच्या कालावधीत 77 हजार स्टार्ट अप्स आणि 107 पेक्षा जास्त युनिकॉर्नमुळे आम्ही स्टार्ट अप्समध्ये जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. समाज माध्यम प्रणीत सामाजिक समस्या असोत किंवा अब्जावधी डॉलरचे स्टार्टअप असोत, आमचा युवा वर्ग आघाडीवर राहून नेतृत्व करत आहे.

भारताच्या जी20 अध्यक्षपदाचा आणि वाय20 शिखर परिषदेचा संदर्भ देत मंत्र्यांनी सांगितले, अतिशय प्रतिष्ठेच्या जी20 चे यजमानपद भूषवणे हा आमचा मोठा सन्मान आहे. यामुळे जगातील युवा वर्गाला सर्वाधिक भेडसावत असलेल्या समस्यांबाबत एकत्रित प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याची असाधारण संधी उपलब्ध झाली आहे. या शिखर परिषदेत केवळ भाषण करण्यापुरती भारताची भूमिका मर्यादित नाही तर युवा वर्गाचे म्हणणे ऐकले जावे आणि त्यानुसार जागतिक जाहीरनाम्याची निर्मिती सक्रियपणे व्हावी असा देखील या बैठकीचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार वाय20 शिखर परिषद 2023 ने पाच प्रमुख संकल्पना निश्चित केल्या आहेत, ज्या आपल्या युवा वर्गासाठी मार्गदर्शक म्हणून काम करतील. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि समृद्धी निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या आपल्या प्रयत्नांमध्ये बदलत्या काळाच्या वस्तुस्थिती नुसार जगामध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी तातडीने ज्या मुद्यांची आवश्यकता आहे त्यासंदर्भातील ही प्राधान्यक्रमाची क्षेत्रे आहेत.

आजच्या सल्लामसलत बैठकीच्या संकल्पनेविषयी बोलताना ते म्हणाले की आजची चर्चा ‘शांतता प्रस्थापित करणे आणि सलोखा निर्माण करणे- युद्धविरहित युगामध्ये प्रवेश’ यावर आधारित आहे.  या पुढच्या दशकांमध्ये भारत कशा प्रकारे आपला प्रतिसाद निश्चित करतो हे यातून स्पष्ट होणार आहे आणि हा या बैठकीचा फायदा आहे असे त्यांनी सांगितले. शांतता निर्मितीमध्ये भारताच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले भारताने शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जागतिक पातळीवर सलोखा निर्माण करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली आहे. आम्ही नि:शस्त्रीकरणाचे, अण्वस्त्र प्रसार बंदीचे कट्टर पुरस्कर्ते आहोत आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांततेच्या प्रयत्नांमध्ये आम्ही योगदान दिले आहे.

नव्याने उदयाला यायला येणाऱ्या युद्धाच्या पैलूंबाबत बोलताना त्यांनी सांगितले की 21व्या शतकात शांततेची व्याख्या काय असेल त्याचा विचार महत्त्वाचा आहे. आपण शांतता आणि युद्ध यांच्या पारंपरिक संकल्पना पासून वेगळा विचार केला पाहिजे. आपल्या भाषणाचा समारोप करताना मंत्री म्हणाले येथे उपस्थित असलेल्या युवा वर्गाच्या सक्रिय सहभागामुळे एक समाज आणि मानवता म्हणून आम्हाला भेडसावत असणाऱ्या आव्हानांचे सखोल आकलन करण्यासाठी मदत मिळेल आणि वाय20 चर्चेच्या मंचावर त्यांचे निराकरण करण्याचे उपाय सापडतील. स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नानुसार आपल्याला 21वे शतक हे आपले असेल हे सुनिश्चित केले पाहिजे. आपण अमृत काळातून स्वर्णिम काळाकडे वाटचाल करत आहोत. आपल्या युवा वर्गाची या प्रवासामध्ये महत्त्वाची भूमिका आहे, असे ते म्हणाले.

“तरुण भविष्य घडवतील. आपल्या समाजाचे आणि पृथ्वीचे काय होईल हे तरुणांना काय वाटते यावर ठरवले जाईल.आज युद्धाशिवाय जग हे आदर्श  स्वप्न नसून व्यावहारिक वास्तव आहे. संस्कृती विकसित होण्यासाठी  बारा हजार वर्षे लागली.हे सर्व जागतिक युद्धात नष्ट  होऊ शकते.शांतातामय जग सुनिश्चित   करण्याची मोठी  जबाबदारी तरुणांवर आहे. केवळ वसुधैव कुटुंबकमचे तत्त्वज्ञानच हे सुनिश्चित करू शकते” , असे स्ट्रॅटेजिक फोरसाइट समूहाचे अध्यक्ष  डॉ. संदीप वासलेकर यांनी आपल्या प्रमुख भाषणात उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.

परदेशी आणि भारतीय विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने सिम्बायोसिसची सुरुवात झाली  भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांमधील आंतरराष्ट्रीय  समज वाढवण्यासाठी  शिक्षण हे एकमेव साधन आहे. एक दिवस असा येईल जेव्हा वेगवेगळ्या सीमा असलेली राष्ट्रे एकत्र येतील, एकत्र राहतील आणि परस्परांना समजून घेतील.युद्ध होणार नाही, असे सिम्बायोसिसचे संस्थापक आणि अध्यक्ष तसेच सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरु, प्रा (डॉ.) एस. बी. मुजुमदार यांनी वैश्विक कुटुंबाच्या नवनिर्मितीबद्दल आशा व्यक्त करताना सांगितले. ते म्हणाले की, माझा  विश्वास आहे की वसुधैव कुटुंबकम हे मानवाचे अंतिम प्राक्तन आहे. सिम्बायोसिसमध्ये आम्ही शिक्षणाच्या माध्यमातून हे सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो.”

सल्लामसलत  बैठकीच्या निमित्त तसेच  आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा प्रयत्न म्हणून, सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन येथे 9 आणि 10 मार्च रोजी झालेल्या मोबाईल चित्रपट निर्मिती  कार्यशाळेत सहभागी झालेल्या 18 ते 35 वयोगटातील पंचवीस महिलांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, पत्रसूचना कार्यालय , मुंबई आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ , माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने   त्यांच्या जनसंपर्क  कार्यक्रमांतर्गत दत्तक घेतलेल्या सहभागी तरुणी पुण्याच्या आसपासच्या ग्रामीण भागातील आहेत.

जागतिक समस्यांबद्दल जागरुकता वाढवणे, विचारांची देवाणघेवाण करणे, वाद प्रतिवाद करणे , वाटाघाटी करणे आणि सहमतीपर्यंत पोहोचणे यासाठी वाय 20 भविष्यातील नेते म्हणून तरुणांना प्रोत्साहन देते. जी 20 फिरते अध्यक्षपद युवा शिखर परिषदेच्या आयोजनाची जबाबदारी घेते,ही परिषद  सामान्यतः पारंपारिक मंचाच्या बैठकीच्या काही आठवड्यांपूर्वी, युवा वर्ग  काय विचार करीत आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या सूचना त्यांच्या स्वत: च्या धोरण प्रस्तावांमध्ये समाविष्ट करण्यासाठी आयोजित केली  जाते. जी 20 सरकारे  आणि  स्थानिक तरुण यांच्यात संबंध  निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. 2023 मधील वाय  20 इंडिया परिषद  भारताच्या युवा-केंद्रित प्रयत्नांचे उदाहरण निर्माण करेल आणि जगभरातील तरुणांना त्यांची  मूल्ये आणि धोरणात्मक उपाय प्रदर्शित करण्याची संधी देईल. येथे भारताच्या अध्यक्षपदाच्या काळातील  वाय 20 बद्दल अधिक जाणून घ्या.

जी 20 किंवा  वीस देशांचा समूह  हा 19 देश आणि युरोपियन महासंघाचा  समावेश असलेला आंतरसरकारी मंच आहे. तुम्हाला येथे क्लिक करून जी 20 बद्दल अधिक जाणून घेता येईल.  भारताने या वर्षी 1 डिसेंबर रोजी इंडोनेशियाकडून जी 20 अध्यक्षपद स्वीकारले आणि 2023 मध्ये देशात प्रथमच जी 20 नेत्यांची शिखर परिषद आयोजित केली जाईल.

पुण्यातील रोझरी शिक्षण संस्थेचे विनय अऱ्हानांना ईडीकडून अटक: 20 मार्चपर्यंत कोठडी

पुणे : पुणे कॅम्प परिसरातील रोझरी शिक्षण संस्थेचे संचालक विनय अऱ्हाना यांना 46 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून काल अटक करण्यात आली आहे.ईडीने अरान्हा यांना सत्र न्यायाधीश, शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय, मुंबई येथे हजर केलं असून न्यायालयाने त्यांना 20 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ईडीकडून केला जाणार आहे. यापूर्वी ईडीनं पुणे कॅम्पमधील रोझरी शिक्षण संस्थेचे विनय अऱ्हाना यांच्या घरी आणि कार्यालयावर छापे टाकले होते.

या प्रकरणी कॉसमॉस बँकेचे शिवाजी विठ्ठल काळे यांनी पुण्यात विनय अरान्हा आणि विवेक अँथनी अऱ्हाना यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. एफआयआरमध्ये आरोपींनी मालमत्तेची बनावट कागदपत्रे दाखवून कॉसमॉस बँकेकडून 20.44 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे. या एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला होता.कर्जाची परतफेड करण्यात न आल्याने बँकेकडून फसवणुकीची तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर आरहाना यांनी व्यवसायात बेकायदा काळा पैसा गुंतविल्याचा संशय ‘ईडी’ला होता.ईडीच्या तपासात समोर आलं आहे की, विनय अऱ्हाना हा रोझरी एज्युकेशन सोसायटीचा प्रमुख व्यक्ती होता आणि त्याने शाळांच्या नूतनीकरण आणि पुनर्विकासासाठी एकूण 46 कोटी रुपयांची 7 कर्ज घेतली होती. मात्र हा पैसा शाळांसाठी वापरण्याऐवजी, त्यानं आपल्या मित्र आणि सहकाऱ्यांसह मेसर्स पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर, शब्बीर पाटणवाला, अश्विन कामत आणि मेसर्स दीप्ती एंटरप्रायझेस यांना 21 कोटी रुपये दिले.त्यानंतरही ही रक्कम नमूद कारणासाठी वापरली गेली नाही. उलट विनय अऱ्हानांच्या सूचनेनुसार संपूर्ण रक्कम रोख स्वरूपात त्यांना परत देण्यात आली. अशाप्रकारे, एकूण कर्ज रकमेपैकी सुमारे 17.66 कोटी रुपये विनय अऱ्हानांनी रोख स्वरूपात काढले आणि कोणत्याही कागदपत्रांशिवाय खर्चही केले.‘ईडी’कडून या प्रकरणात समांतर तपास सुरू करण्यात आला होता. त्यानंतर पिंपरीतील सेवा विकास बँकेचे संचालक अमर मुलचंदानी आणि रोझरी स्कूलचे विनय आरहाना यांच्या मालमत्तेवर ‘ईडी’च्या पथकाने २८ जानेवारी रोजी छापे टाकले होते. त्यानंतर आरहाना यांना ‘ईडी’च्या मुंबई कार्यालयातील पथकाने आरहाना यांना शुक्रवारी (१० मार्च) अटक केली. आरहाना यांना मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी आरहाना यांना २० मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

कसब्याच्या पराभवाचे पोस्टमार्टेम आम्ही केलंय -देवेंद्र फडणवीस

पुणे-कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर आज पुण्यात उपमुख्यमंत्री आणि २ केंद्रीय मंत्री असे भाजपचे नेते वेगवेगळ्या कार्यक्रम अगर कामास्तव पुण्यात आलेले असताना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना कसब्याच्या पराभवाचे आम्ही पोस्ट मार्टेम केले आहे आणि आम्ही आता यापुढे योग्य काळजी घेऊ असेही म्हटले आहे.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पराभव केल्यानंतर भाजपाचे नेते, तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच पुणे दौऱ्यावर आले. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पराभवावर पक्षांतर्गत काही चर्चा झाली का किंवा शहर पातळीवर बदल होणार आहेत का? यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“एखादी निवडणूक जिंकलो किंवा हरलो तर त्याने काही फार फरक पडत नाही. मात्र, कोणत्याही गोष्टीच्या विजय किंवा पराजयानंतर आम्ही त्याचे मुल्यमापन किंवा दुसर्‍या भाषेत सांगायचे झाल्यास त्याचा पोस्टमार्टम करीत असतो. ते आम्ही केल असून, आम्ही काळजी घेऊ”, असे फडणवीस म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आज पुन्हा एकदा ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला त्याबाबत काही माहिती नाही. माध्यमातूनच ही माहिती पाहायला मिळत आहे. असे सांगत त्यावर त्यांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला.

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अद्याप पंचनामे झाले नाही. त्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. त्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला, त्यानंतर तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्याची सुरवातदेखील झाली आहे. तसेच सर्वांचे पंचनामे होण्यास थोडा वेळ लागणारच आहे. तसेच मला विरोधी पक्षाचे आश्चर्य वाटते. आम्ही त्यांच्या काळातील पैसे देत आहोत. आता रात्री पाऊस पडला तर ते सकाळी गोंधळ घालण्यास सुरुवात करतात. हे योग्य नाही, असे सांगत महाविकास आघाडीतील नेत्यांना त्यानी सुनावले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा प्रमुख खनिज प्रकल्पांमध्ये गुंतवणुक भागीदारीत गाठला एक महत्त्वाचा टप्पा

नवी दिल्‍ली, 11 मार्च 2023

भारत आणि ऑस्ट्रेलियाने दोन्ही देशांमध्ये पुरवठा साखळी विकसित करण्यासाठी प्रमुख खनिज प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि ऑस्ट्रेलियाचे संसाधन मंत्री मॅडेलिन किंग यांनी शुक्रवारी द्विपक्षीय चर्चेनंतर घोषणा केली की दोन्ही देशांमधील भागीदारी अंतर्गत पाच  प्रकल्प (दोन लिथियम आणि तीन कोबाल्ट) निर्धारित केले   आहेत ज्यावर आवश्यक त्या तत्परतेने आणि  तपशीलवार  काम  केले जाईल.  

दोन्ही देशांच्या मंत्र्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान महत्वपूर्ण खनिज गुंतवणूक भागीदारीसाठी सहकार्य अधिक दृढ करण्यास आणि त्यांचा विद्यमान सहभाग वाढवण्यासही सहमती दर्शवली.

या भागीदारी गुंतवणुकीद्वारे ऑस्ट्रेलियामध्ये प्रक्रिया केलेल्या महत्त्वपूर्ण खनिजांद्वारे समर्थित नवीन पुरवठा साखळी सुरु करण्याचा प्रयत्न केला जाईल. या प्रयत्नांमुळे भारताला त्याच्या विजेच्या नेटवर्कमधून   होणारे उत्सर्जन कमी करण्यास मदत होईल आणि इलेक्ट्रिक वाहनांसह इतर विजेवर आधारित उत्पादनांचे जागतिक  केंद्र बनण्याची संधी मिळेल.जगातील लिथियम उत्पादनापैकी जवळपास निम्म्या उत्पादनात ऑस्ट्रेलियाचा वाटा असून कोबाल्टचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक आणि दुर्मिळ खनिजांचा पृथ्वीवरील चौथा सर्वात मोठा उत्पादक आहे. पुढील तीन दशकांत कार्बन-कमी करणार्‍या तंत्रज्ञानाच्या जागतिक मागणीतील अपेक्षित वाढीचा परिणाम म्हणून, ही भागीदारी परस्पर फायदेशीर खनिज पुरवठा साखळी सुरक्षित करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण ठरेल.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार: नितीन गडकरी

चांदणी चौकातील पूल एक मे रोजी खुला होणार

पुणे, 11 मार्च 2023 

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण केले जाईल आणि पुढील वर्षीच्या प्रारंभी त्याचे उद्घाटन होऊन तो सुरू होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला.चांदणी चौकातीलवाहतूक कोंडींचा प्रश्न सोडवण्यासाठी सुरू असललेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्यात असतांना या पुलाचे उद्घाटन महाराष्ट्र दिनीअर्थात, 1 मे ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली .

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यातील देहू आणि आळंदी येथून पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गांची हवाई पाहणी केली. यामध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून केले जाणारे काम त्यांनी तपासले. या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी आज बोलले.

कामाचा आढावा घेतल्यानंतर येत्या मे महिन्यापर्यंत या दोन्ही मार्गांचे मिळून सुमारे 60 ते 70 टक्के काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. वर्षाअखेर हे काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

महाराष्ट्रासाठी वारी आणि पर्यायाने पालखी हा खूप महत्वाचा, अस्थेचा विषय आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

देहू, आळंदी, पंढरपूर ही महत्वपूर्ण क्षेत्र आहेत. हा भक्ती मार्ग साधारण नसावा,  इथे आम्ही विशेषत्व जपण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञानेश्वरीत उल्लेख असलेले वृक्ष लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. 

या मार्गांवरील दुपदरी रस्ते चौपदरी करत आहोत आणि वारकऱ्यांचे पाय भाजू नयेत, याची काळजी घेणार आहोत, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

यासह पुण्यातील चांदणी चौकातील मार्गाचे अपूर्ण काम येत्या एप्रिल अखेर पर्यंत पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 

दौंड-बारामती मार्गे नवी मुंबई मधील जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंत नवीन रेल्वे मार्ग उभारण्याचा प्रस्ताव आपण रेल्वे मंत्रालयाकडे सादर केला असल्याचे गडकरी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

राज्यातील महामार्गाच्या कामासाठी लागणारे सिमेंट आणि पोलाद यावरील वस्तू सेवा कर राज्य शासनाने माफ करावा, त्याचबरोबर धरणांमधील वाळू काढून त्याचा वापर रस्ते बांधकामासाठी केला जावा, अशी विनंती करणार असल्याचे देखील गडकरी यांनी यावेळी सांगितले.

पुणे शहरासह जिल्ह्यात रस्ते विकासाची सुमारे 53 हजार कोटी रुपयांची कामे सुरू असून त्यात पुणे-नगर, पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर आणि शहरातील वर्तुळाकार मार्गाचा समावेश असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – 965 जी) हा 130 किमी लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस – बारामती – इंदापूर – अकलुज – बोंडले पर्यंत विकसित करण्यात येत आहे. या मार्गावर एकूण 11 पालखी स्थळे असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी या सर्व ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.

सदर पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदि सुविधांसह सौंदर्यीकरण करण्यात येईल. यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल तसेच वारकऱ्यांना वारीच्या दरम्यान या सुविधांचा फायदा होईल.

पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यामध्ये विशेषतः चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या मध्यात 57200 व दोन्ही बाजूस मिळून 18840 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

उडत्या बसच्या घोषणेबद्दल गडकरी म्हणाले.

पुणे-एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली होती की, पुणेकर नागरिकांना लवकरच हवेतील उडत्या बसने प्रवास करता येणार. या घोषणेची अनेकांनी खिल्ली उडवली होती .यावर आता पत्रकारांनी केलेल्या प्रश्नावर नितीन गडकरी यांनी उत्तर दिले आहे.

उडत्या बसचे पुढे काय झाले यावर नितीन गडकरी म्हणाले की, मी घोषणा करणार्‍यांपैकी नाही. कोणती घोषणा केली आणि ती पूर्ण केली नाही ते सांगा. तसेच हवेतील बससाठी पुणे महापालिकेने डीपीआर द्यावा. पुणे महापालिके मार्फत डीपीआर आल्यावर मंजुरी देण्यास तयार असल्याची भूमिका त्यावर त्यांनी मांडली.

सदानंद कदम यांना 15 मार्चपर्यंत ईडी कोठडी

मुंबई-अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने 15 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. काल ताब्यात घेत जवळपास 4 चौकशी केल्यानंतर त्यांनी समाधानकारक माहिती न दिल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.दरम्यान ईडीने सादर केलेल्या पुराव्यात अनिल परब यांच्या खात्यातून एक कोटी रुपये विभा साठे यांना दिल्याचे उघड झाले आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार ही रक्कम सदानंद कदम यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. ईडीचा युक्तिवाद कोर्टाने मान्य केला असला, तरी सुद्धा 14 दिवसांच्या कोठडीची मागणी फेटाळली आहे.

पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे साई रिसॉर्ट पाडण्यासाठी राज्याच्या बांधकाम विभागाने स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिरात दिली होती.

रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम हे अनिल परब यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे ईडीच्या पथकाने ताब्यात घेतले. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करून, अनिल परब यांचे पार्टनर सदानंद कदम यांना अटक केल्याचे म्हटले.

साई रिसॉर्ट प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दापोलीचे आमदार संजय कदम यांनीही रामदास कदम यांच्यावर आरोप केले होते. कदम म्हणाले होते की, साई रिसॉर्ट हे अनिल परबांचे नाही. तर ते रामदास कदम यांचा भाऊ सदानंद कदम यांचे आहे. रामदास कदम हे काय आहेत, हे जनतेला माहित आहे. जे सख्ख्या भावाचे झाले नाहीत, ते जनतेचे काय होणार असा टोलाही हाणला होता.

सूर संवादातून उलगडला आनंदी जीवनाचा प्रवास 

आस्था फाऊंडेशन प्रस्तुत व कलांगण चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे स्तन कर्करोग जनजागृतीसाठी हीलिंग हार्मनी कार्यक्रम
पुणे : कुहू कुहू बोले कोयलिया, जब दिल जले आना जब शाम ढले आना, निगाहे मिलाने को जी चाहता है… अशा एकाहून एक सुरेल गाण्यांच्या साथीने स्तनांच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारावर अतिशय उभारत्या शैलीमध्ये मार्गदर्शन, त्याचबरोबर आहार-व्यायाम यांचे संतुलन कसे राखावे याचे मार्गदर्शन करताना डॉक्टर आणि रुग्णांनी एकत्रितरित्या सादरीकरण केले. हीलिंग हार्मनी या कार्यक्रमातून सूर आणि संवादाच्या माध्यमातून आनंदी जीवनाचा प्रवास पुणेकरांसमोर उलगडण्यात आला. 
आस्था फाउंडेशन प्रस्तुत आणि कलांगण चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित हीलिंग हार्मनी हा विशेष कार्यक्रम कोथरुडमधील यशवंतराव चव्हाण नाटयगृहात पार पडला. प्रख्यात स्तन कर्करोगतज्ञ डॉ. शेखर कुलकर्णी यांच्यासह प्रतिभा कर्णिक, स्वाती देव ,माधवी फडणीस या कलाकारांनी आणि रुग्णांनी आपले स्तन कर्करोगा संदर्भातील अनुभव प्रेक्षकांना सांगितले. 
स्तनांचा कर्करोग टाळण्यासाठी आणि कर्करोग झालाच तर तो कशाप्रकारे लवकर बरा करता येईल, यासाठी कोणत्या प्रकारची आहार आणि व्यायाम आवश्यक आहे, या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.  कलांगण च्या संचालिका आणि गायिका चैत्राली अभ्यंकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन व निवेदन देखील केले.
स्तनांच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारासंदर्भात मार्गदर्शन करतानाच रुग्णांनी अतिशय सुरेल आवाजामध्ये हिंदी आणि मराठी गीते सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. चितळे उद्योग ग्रुपच्या संचालिका अनघा चितळे, उम्मीद कॅन्सर सपोर्ट ग्रुपचे अनुप मेहता यावेळी उपस्थित होते. उम्मीद संस्थेच्या सहयोगाने हा कार्यक्रम पार पडला. 
डॉ. शेखर कुलकर्णी म्हणाले, निसर्गासोबत जगण्यामुळे पूर्वी आजारांचे प्रमाण कमी होते. परंतु आता माणसाला मॉडर्न होण्याची घाई लागल्यामुळे आजारांचे प्रमाणही वाढत आहे. आपल्या जीवनशैलीमध्ये झालेल्या बदल हे सुद्धा स्तनांच्या कर्करोगासाठी कारणीभूत आहेत.  स्तनांच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर निराश न होता योग्य वेळी उपचार, आहार आणि व्यायाम केल्यास आपल्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल घडून आपण त्यामधून सुखरूप बरे होऊ शकतो. 
अनघा चितळे म्हणाल्या, हीलिंग हार्मनी हा समाजाला सकारात्मक दिशा आणि ऊर्जा देणारा कार्यक्रम आहे. हा केवळ संगीताचा कार्यक्रम नव्हे तर कर्करोगाशी दोन हात करून आनंदी जीवन जगणा-या लढवय्या महिलांनी इतर महिलांना दिलेला आधार आहे.

जैन समाजाची लोककल्याणकारी भावना सर्वपरिचित- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ११ : जैन समाज हा दुसऱ्यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. संकट प्रसंगी जैन समाजाने देशाला भरभरून मदत केली आहे. समाजाप्रती त्यांची लोक कल्याणकारी भावना सर्वांना माहिती आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज काढले.

राष्ट्रसंत परमपूज्य श्री नयपद्मसागर सुरीश्वरजी महाराज यांना आचार्य पद प्रदान महा-महोत्सव कार्यक्रम आज मुंबईतील महालक्ष्मी रेस कोर्स येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योगगुरू बाबा रामदेव तसेच देश-विदेशातील संत आणि जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने नुकताच राज्याचा अर्थसंकल्प घोषित केला असून यात सर्व लोकांच्या प्रगती आणि उन्नतीचा विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात गो-सेवा आयोगाची स्थापना करण्यात आली असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले. राष्ट्रसंत नयपद्मसागरजी आणि प्रशांतसागरजी यांना आचार्य पदवी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाकडून त्यांचे अभिनंदन केले.

जैन समाजाची आचार्य पदवी ही एक तपश्चर्या- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आज राष्ट्रसंत नयपद्मसागर यांना प्रदान करण्यात आलेली आचार्य ही पदवी असली तरी हे पद एक तपश्चर्या आहे. आचार्य बनण्यासाठी तप करावे लागते. या पदावर पोहोचल्यानंतर कोटी कोटी जनतेच्या विधायक आशा-आकांशांना आशीर्वाद द्यावा लागतो. हे काम अविरतपणे सुरू राहणारे आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, राष्ट्रसंत नयपद्मसागर केवळ संत नसून एक विचार आहेत. ते समाजाला संघटीत करून पुढे नेत आहेत. ते धर्मासोबतच लोकांना राष्ट्रभक्तीचीही शिकवण देत आहेत. समाजातील सर्व लोकांना योग्य वाटेने जाण्याचे मार्गदर्शन राष्ट्रसंत नयपद्मसागरजी यांच्याकडून मिळेल असेही श्री.फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे, उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस, पालकमंत्री श्री.लोढा, योगगुरू रामदेव यांच्या हस्ते महान मंगल ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

गुलटेकडीच्या गुंड सचिन माने आणि त्याच्या टोळीवर मोक्का कारवाई

पुणे-पुण्यातील स्वारगेट परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सचिन माने व त्याच्या 13 साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुणे पाेलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 199 चे कलम 3 (1),3 (2), 3 (4) अंतर्गत कारवाई केल्याची माहिती शुक्रवारी दिली आहे. पाेलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली माेक्का अंर्तगत झालेली ही 16 वी कारवाई आहे.स्वारगेट व आजूबाजूच्या भागात दराेडा, जबरी चाेरी, खंडणी, हफ्ता गाेळा करणे, अवैध मार्गाने आर्थिक प्राप्तीसाठीसह खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे, मुलींची छेडाछाड काढणे अशाप्रकारचे गंभीर गुन्हे या टाेळीवर दाखल आहेत.

टाेळी प्रमुख सचिन परशुराम माने (वय-24,रा.गुलटेकडी,पुणे) , निखील राकेश पेटकर (22,रा.बिबवेवाडी,पुणे), राेहित मधुकर जाधव (27), अजय प्रमाेद डिखळे (24), यश किसन माने (18), अमर तानाजी जाधव (23), विजय प्रमाेद डिखळे (18), माेन्या ऊर्फ सुरज सतिश काकडे (26, सर्व रा.गुलटेकडी,पुणे) व एक विधीसंघर्षित बालक आणि इतर चार साथीदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

या आरोपींनी गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागील काळात केले असल्याने त्यांना सन 2021 मध्ये एक वर्षाकरिता स्थानबध्द करण्यात आले हाेते. परंतू त्यातून सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा आपले साथीदार एकत्र करत खुनाचा प्रयत्न व दुखापतीचे गुन्हे करत जबरदस्तीने दहशत करुन हप्ते वसुली केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखा एकचे सहाय्यक पाेलिस आ​​​​​​​युक्त सुनिल पवार करत आहेत.

ही कारवाई पाेलिस आयुक्त रितेश कुमार, सहपाेलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पाेलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, परिमंडळ दाेन पाेलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी सुनिल पवार, यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस अशाेक इंदलकर, साेमनाथ जाधव, एपीआय प्रशांत संदे, पीएसआय अशाेक येवले, प्रमाेद कळमकर, पाेलिस अंमलदार विजय खाेमणे, सुनिता आ​​​​​​​​​​​​​​आंधळे, अनिस शेख, एस गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

बाईक चोरांची टोळी पकडली, चोरीच्या २९ बाईक्स हस्तगत

पुणे -जिल्हयातील विविध भागात माेटारसायकल चाेरी करणाऱ्या टाेळीच्या दाेन महाेरक्यांसह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. पाेलिसांनी या आरोपींकडून एकूण 29 माेटारसायकल जप्त केल्या आहेत . पुणे ग्रामीण पाेलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.चाेरी गेलेल्या माेटारसायकल या ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग तसेच नाेकरदार लाेकांच्या आहेत .

अमाेल नवनाथ मधे, विजय संजय मधे, संताेष उमेश मधे, संदिप सुभाष मधे, विकास साहेबराव मधे (सर्व रा.पारनेर, अहमदनगर),विजय विठ्ठल जाधव, सुनील वामन मेंगाळ, भारत पाेपट मेंगाळ, मयुर गंगाराम मेंगाळ ( सर्व रा.संगमनेर, अहमदनगर) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आ​​​​लेल्या आराेपींची नावे आहेत.

पुणे ग्रामीण जिल्हयात मागील वर्षभरात माेटारसायकल चाेरीचे प्रमाण वाढले हाेते. त्या अनुषंगाने पाेलिस अधीक्षक अंकित गाेयल यांनी एलसीबीचे पथकास माेटारसायकल चाेरांवर लक्ष्य केंद्रित करण्यास सांगितले हाेते. माेटार सायकल चाेरांचा आढावा घेत असताना, माेटारसायकल चाेरी करण्याची वेळ, निवडलेली ठिकाणे, चाेरी करण्यासाठी वापरण्यात येणारे मार्ग तसेच चाेरटयांनी अवलंबलेली पध्दत याचा बारकाईने अभ्यास करत, कारवाईसाठी प्रथम पुणे-नाशिक रस्त्याची निवड केली गेली.त्यासाठी एक पथक स्थापन करण्यात आले. तपास पथकास याेग्य मार्गदर्शन करुन तपास काैशल्य सांगून कारवाईचे आदेश देण्यात आले हाेते.

जुन्नर विभागात स्थानिक गुन्हे शाखेचे काम करणाऱ्या सपाेनि महादेव शेलार यांचे पथकास माेटार सायकल चाेरी करणाऱ्या आं​​​तरजिल्हा टाेळीची गाेपनीय माहिती मिळाली. त्याआधारे पाेलिसांनी कारवाई सुरु केली. या दरम्यान, गुन्हयाची व्याप्ती माेठी असल्याचे लक्षात येताच आणखी एक तपास पथक तयार करण्यात आले. दाेन्ही तपास पथकाने अहमदनगर जिल्हयातील आंतरजिल्हा टाेळीच्या दाेन महाेरक्यांसह नऊ जणांना जांबूत फाटा परिसरातून अटक केली.

पुणे ग्रामीण, अहमदनगर व ठाणे ग्रामीण जिल्हयातील माेटारसायकल चाेरीचे व घरफाेडी चाेरीचे एकूण 26 गुन्हे उघडकीस आले असून पाेलिसांनी 29 माेटारसायकल जप्त केल्या आहेत.

ही कारवाई पाेलिस अधीक्षक अंकित गाेयकल, अपर पाेलिस अधीक्षक मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पाेलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सपाेनि महादेव शेलार, पाेसई गणेश जगदाळे, सफाै तुषार पंदारे, पाेहवा दिपक साबळे, विक्रम तापकीर, हेमंत विराेळे, मंगेश थिगळे, राजू माेमीण , जर्नादन शेळके, याेगेश नागरगाेजे, पाेना संदिप वारे, पाेकाॅ अक्षय नवले, चासफाै मुकुंद कदम, अक्षय सुपे यांनी केली आहे.

दोन डिलरसह सात सराईत गुन्हेगारांना अटक, 17 गावठी पिस्तुल हस्तगत

पुणे- पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठा शस्त्र साठा जप्त करुन 17 गावठी पिस्तुल व 13 जिवंत काडतुसांसह 24 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करुन 7 आरोपींना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीं मध्ये पिस्तुल विक्री करणाऱ्या दोन डिलरचा देखील समावेश असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पिस्तुल विक्री करणारे डिलर हनुमंत अशोक गोल्हार (वय-24 रा. मु.पो. जवळवाडी ता. पाथर्डी जि. अहमदनगर), प्रदिप विष्णू गायकवाड (वय-25 रा. मु.पो. ढाकणवाडी ता. पाथर्डी मुळ रा. नगर रोड, चहाट फाटा, ता.जि. बीड)पिस्तुल विकत घेणारे अरविंद श्रीराम पोटफोडे (वय-38 रा. अमरापुरता शेगाव जि. नगर) शुभम विश्वनाथ गरजे (वय-25 रा. मु.पो. वडुले, ता. नेवासा जि. नगर), ऋषिकेश सुधाकर वाघ (वय-25 रा. मु.पो. सोनई ता. नेवासा), अमोल भाऊसाहेब शिंदे (वय-25 रा. मु.पो. खडले परमानंद ता. नेवासा), साहिल तुळशीराम चांदेरे उर्फ आतंक (वय-21 रा. वरची आळी, बालमित्र मंडळाजवळ,सुसगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पुणे शहरामध्ये अवैधरित्या पिस्तुल ) बाळगणाऱ्या तसेच विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले होते. त्यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून हद्दीमध्ये पेट्रोलींग व गुन्हेगार चेकिंग मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने 25 फेब्रुवारी रोजी पिस्तुल विक्री करणारे दोन डिलर हे वाघोली येथील नानाश्री लॉज समोर आल्याची माहिती मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे युनिट सहाच्या पथकाने सपाळा रचून हनुमंत गोल्हार, प्रदिप गायकवाड यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या महिंद्रा कारची झडती घेतली असता 1 गावठी पिस्तुल व 2 जिवंत काडतुसे मिळाली. पोलिसांनी कार,पिस्तुल व काडतुस जप्त करुन आरोपींवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केली.

पोलिसांनी आरोपींची पोलीस कस्टडी घेऊन सखोल चौकशी केली. त्यावेळी हनुमंत गोल्हार हा ए.पी.एम.सी पोलीस स्टेशन नवी मुंबई येथील दोन कोटी 80 रुपयांच्या दरोड्यातील आरोपी असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती समजली. तसेच पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात त्याच्यावर आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात तो wanted आरोपी असल्याचे समजले.

अधिक तपासात अनधिकृत पिस्तुल विक्री करणारे तसेच त्यांच्याकडून पिस्तुल विकत घेणारे अरविंद पोटफोडे, शुभम गरजे, ऋषिकेश वाघ, अमोल शिंदे यांना अटक केली. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून 13 गावठी पिस्टल 4 काडतुसे तसेच एक महिंद्रा कार, मोबाईल असा एकूण 21 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याशिवाय गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाकडून पेट्रोलींग दरम्यान बाणेर रोड सिंचन भवन समोरून साहिल चांदेरे उर्फ आतंक याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्याच्याकडून 60 हजार रुपये किमतीची पिस्तुल व 2 हजार रुपयांचे दोन जिवंत काडतुसे जप्त केली. त्याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केली. त्याच्याकडे अधिक तपास केला असता तो ज्या ठिकाणी काम करतो त्या गॅरेजमध्ये आणखी तीन पिस्तुल व काही काडतुसे लपवून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी सुतारवाडी येथील गॅरेजवर छापा टाकून पिस्तुलव काडतुसे जप्त केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 4 पिस्तुल 9 काडतुसे असा एकूण 2 लाख 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गुन्हे शाखेने केलेल्या दोन कारवायांमध्ये दोन डिलरसह 7 सराईत गुन्हेगारांना अटक करुन 17 गावठी पिस्टल,
13 जिवंत काडतुसे, एक महिंद्रा कार, मोबाईल असा एकूण 23 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार , पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे , सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल पवार, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 नारायण शिरगांवकरयांच्या मार्गदर्शनाखाली युनिट -6 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनिश निर्मलयुनिट -1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले ,सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक अजय जाधव, सुनिल कुलकर्णी,
उप-निरीक्षक सुरेश जायभाय, भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे,
कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, नितीन मुंडे, मोहीते, ऋषिकेश ताकवणे,
ऋषिकेश व्यवहारे,ऋषिकेश टिळेकर, सचिन पवार, नितीन धाडगे, अश्पाक मुलाणी, ज्योती काळे, सुहास तांबेकर,
अमोल पवार, इम्रान शेख, आण्णा माने, आय्याज दड्डीकर, महेश बामगुडे, विठ्ठल साळुंखे, निलेश साबळे,
शुभम देसाई, दत्ता सोनवणे यांच्या पथकाने केली.

जावडेकर यांच्या खासदार निधीतून दहा खुल्या व्यायामशाळा

पुणे, ता. १० मार्च : प्रकाश जावडेकर यांच्या खासदार विकास निधीतून सरस्वती विद्यामंदीर प्रशाला आणि अभिजात एज्युकेशन सोसायटीला खुल्या व्यायामशाळेचे साहित्य देण्यात आले. या व्यायामशाळांचे उद्घाटन नुकतेच जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरस्वती विद्यामंदीरचे अध्यक्ष विनायक आंबेकर, अविनाश नाईक, सुधीर चौधरी, दिलीप बोकील, श्रीनिवास खंडेलवाल, प्रा. ए. पी. कुलकर्णी, अभिजात एज्युकेशन सोसायटीचे अमला भागवत, सुप्रिया पालकर, पूर्वा म्हाळगी यांची प्रमुख उपस्थिती होती.

जावडेकर म्हणाले, ‘शरीर आणि मन चांगले राहाण्यासाठी खासदार निधीतून दहा शाळांमध्ये खुल्या व्यायामशाळा बसविल्या, आणखी काही शाळांमध्ये बसविणार आहे. कारण मुलांनी खेळणे पाहिजे, धावले पाहिजे, व्यायाम केला पाहिले भारताला पुढे नेणारा हा मंत्र आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या कल्पनेतील ‘फिट इंडिया’ उपक‘माअंतर्गत थोड्याच दिवसात देशाची ङ्गिटनेस लेव्हल वर जाईल. मोदींनी जे स्वप्न पाहिले तशी खेळात आपली प्रगती होईल, खूप पदके आणणारा देश होईल, त्याची सुरुवात झाली आहे. देश खेळतो कसा यावरही देशाची प्रगती अवलंबून असते.’

अल्प मुदतीच्या व्यवसायिक अभासक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि.१०: कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पीएमकेव्हीवाय ४.० अंतर्गत बेरोजगार अल्पसंख्यांक युवक-युवतींसाठी २० मार्चपासून अल्प मुदतीच्या रोजगारक्षम विनाशुल्क व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या प्रशिक्षणात तांत्रिक प्रशिक्षण घेण्याची इच्छा असलेले बेरोजगार युवक-युवती किंवा तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण उमेदवारांना अधिकचे कौशल्य प्राप्त करण्यासाठी या अल्पमुदतीच्या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल.

पीएमकेव्हीवाय ४.० अंतर्गत महिला व युवकांसाठी एकूण सहा अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहेत. त्यामध्ये मेकॅनिक हायड्रोलिक ॲण्ड न्यूम्यॅटिक सिस्टीम, योग प्रशिक्षक, सीएनसी ऑपरेटर टर्निंग, सीएनसी ऑपरेटर व्हर्टिकल मशीनिंग सेंटर, मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग/शिल्डेड मेटल आर्क वेल्डर, असिस्टंट सर्व्हेअर –कस्टमाईझ्ड कोर्स या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ४० असावी. उमेदवार किमान ८ वी ते १२ वी उत्तीर्ण असावेत. या अभ्यासक्रमासाठी प्रत्येक व्यवसायातील प्रवेश क्षमता ३० ते ६० आहे. किमान ३ महिन्याचा हा अभ्यासक्रम असून प्रवेश घेण्यासाठी गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट, आधार कार्डची झेरॉक्स इ. कागदपत्रे तसेच दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी एस.एम. तुपलोंढे (मो. क्र. ९८५०१५१८२५), जे. आय. गवंडी (मो.क्र.८०८७१५०५०५) व सोहेल शेख (मो.क्र.९६३७३९५८३३) यांचेशी संपर्क साधावा. अधिकाधिक उमेदवारांनी या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाचा लाभ घेवून कौशल्य वृद्धी करावी, असे आवाहन संस्थेचे उपसंचालक आर. बी. भावसार यांनी केले आहे.

आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांचा लाभ मराठा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत- नरेंद्र पाटील

पुणे, दि. १०: आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनांचा लाभ व्यवसाय, उद्योग उभारण्यास इच्छुक मराठा समाजातील युवकांना मिळेल यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.

महामंडळाच्या योजनेंतर्गत कर्जवाटपाबाबत बँक प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, पुणे शहर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजय राऊत, पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रकाश जगताप आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. पाटील यांनी राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, सहकारी बँकांकडून महामंडळाच्या कर्ज व्याज परताव योजनेंतर्गत कर्जवाटपाचा बँकनिहाय आढावा घेतला. राष्ट्रीयकृत बँकांनी अपेक्षित कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले नसून आगामी आर्थिक वर्षामध्ये नियोजनबद्धरित्या या योजनेचा प्रचार- प्रसार बँक शाखास्तरावर करावा तसेच कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गांभिर्याने प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

महामंडळाने छोट्या स्वरुपातील व्यवसायासाठी २ लाख रुपयांचे कर्जाची योजना जाहीर आहे. समाजातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज देण्याबाबत योजनेचा आराखडा तयार करण्यात येत आहे. कर्जवाटपासाठी आवश्यक सिबील स्कोअर बाबतच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास संस्था, आरसेटी आदी संस्थांसोबत करार करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री.पाटील यांनी दिली.

महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज योजनेची मर्यादा १० लाख रुपयांवरुन १५ लाख रुपयांपर्यंत व कर्जपरतफेडीचा कालावधी ७ वर्षापर्यंत वाढविला असून ४ लाख ५९ हजार रुपयांपर्यंत व्याजपरतावा देण्यात येतो. त्याचबरोबर किमान दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींना गटाने एकत्र येऊन व्यवसाय, उद्योगासाठी गट प्रकल्प व्याज परतावा योजनाही राबवण्यात येत आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्यासह मराठा संघटनांचे प्रतिनिधी, राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, सहकारी बँकांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
0000